०२ उपोद्घात

हा ग्रंथ श्री काशी येथे राहणारा महापंडित कमलाकरभट्ट यानें केला आहे. ह्या पंडितांचे इतिवृत्त आम्हास जें कांहीं उपलब्ध झाले आहे, तें खालीं लिहिल्याप्रमाणें: __ पूर्वी दक्षिण देशांत पैठण नांवाच्या शहरांत गोविंदभट्ट नांवाचा ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण राहत होता. हा मोठा विद्वान् असून सदाचारसंपन्न होता. त्याला रामेश्वर भट्ट नांवाचा मुलगा झाला. तोही महापंडित असून सदाचारसंपन्न होता. त्याचें बरेंच वय झालें, तथापि याला संतति झाली नाहीं. त्यामुळें कांहीं वैराग्य उत्पन्न होऊन कांही दिवस काशीवास करावा म्हणून सकुटुंब तो काशीयात्रेस गेला. तेथें नेहमीं अनेक विद्वानांचा सहवास, श्रीभागीरथीचें स्नान, श्रीविश्वेश्वराचें दर्शन इत्यादि प्रतिदिवशीं घडत होतें यामुळें त्याचें अंतःकरण तेथेंच रमलें. काही दिवसांनी त्याला असें वाटलें की, आतां हें क्षेत्र सोडून कोठें जाऊं नये. आणखी आपणाला घरीं जाऊन तरी काय कर्तव्य आहे ? असे मनांत आणून काशीवास कारण्याचा संकल्प करून तो तेथेंच राहिला. ___ रामेश्वरभट्ट हा मूळपासून श्रीरामचंद्राचा उपासक होता. दिवसानुदिवस त्याचा तो मार्ग अत्यंत सुदृढ होत चालला होता. इतक्यांत श्रीरामाच्या कृपेनें म्हणा अथवा काही प्रारब्धयोगानें म्हणा, त्याला म्हातारपणांत नारायणभट्ट नांवाचा एक गुणवान् पुत्र झाला. त्याची कीर्ति वर्णन करावी तितकी थोडीच. नारायणभट्टानें मोठी विद्या संपादन केली होती, यामुळे त्याची कीर्ति अद्यापि सर्व पृथ्वीवर प्रसृत आहेच; पण त्याच्या अंगी विनय, दाक्षिण्य, दया इत्यादि जे गुण होते त्यांहींकरून त्यावेळचे लोक असें म्हणत असत कीं,-पूर्वी रामावतारीं दशरथ राजाला वृद्धपणी रामचंद्रापासून काही सौखय मिळालें नाहीं, तें त्यास द्यावें म्हणून रामेश्वरभट्ट हाच कोणी एक दशरथराना व त्याचे पोटीं वैदिकधर्मस्थापनार्थ हा नारायणभट्टनांवानें साक्षात् रामचंद्रच अवतीर्ण झाला आहे. याविषयी निर्णयसिंधूच्या प्रारंभी कमलाकरभट्टानें असें मटलें आहे की,

वेदार्थधर्मरक्षायै मायामानुषरूपिणम् । पितामहं हरिं वन्दे भट्टनारायणादयम् ॥ १ ॥

अस्तु. याप्रमाणें त्या गुणवान् पुत्राच्या योगानें त्याच्या आईबापांस परमानंद प्राप्त झाला. ___ आधींच म्हातारपणीं मूल झालें म्हणजे आईबापांचा त्यावर अतिशय लळा असतो; त्यांतून ते गुणी निपजलें म्हणजे विशेषच असतो यांत संशय नाहीं. नारायण भट्टासारखा गुणवान् , विनयी व सदाचारसंपन्न असून पितृभक्त अशा एकुलत्या पुत्रावर त्याच्या पुत्रवत्सल पित्याचें प्रेम किती असेल याचें अनुमान करतां येत नाही. अस्तु. याप्रमाणे त्याचें लालन करीत व लोकांनी वर्णन केलेल्या त्याच्या कीर्ति श्रवण करीत करीत परमानंदित होत्साता रामेश्वरभट्ट, उत्तम पुत्राच्या लाभानें ज्याचा शेवट गोड झाला आहे अशा संसाराचा अनुभव घेऊन सतत निरिच्छपणानें केलेल्या श्रीरामोपासनेच्या प्रभावानें जीर्ण झालेल्या स्वकलेवराचा त्याग करून श्रीरामचंद्राच्या चरणकमलासंनिध गेला. यानें काही ग्रंथ वगैरे केल्याची प्रसिद्धि नाहीं.

नारायणभट्ट हा लहानपणापासून विद्याविनयसंपन्न होता, असें वर सांगितलेंच आहे; व याच्या अंगीं इतर सर्व गुणांपेक्षां ब्रम्हवर्चस फार प्रज्वलित होतें, त्यामुळें सर्व लोकांची त्याच्याविषयीं अतिशय पूज्यबुद्धि होती.

त्या काळीं आपल्या हिंदुस्थानांत मुसलमानांचे प्राबल्य होतें. मुसलमान लोक हे हिंदुधर्माचा नुस्ता द्वेषच करून राहत नसत, तर आपल्या सत्तेच्या जोरानें अनेकप्रकारें त्यांचा नाश करीत, हें सर्वांस विदित आहेच. एके समयीं त्यांच्या मनांत असें आलें कीं, " हिंदु लोकांच्या पवित्र क्षेत्रांत काशी हें मुख्य क्षेत्र आहे; आणि सर्व देवस्थानांत विश्वेश्वराचें स्थान हें मुख्य आहे; आणि या क्षेत्राचें माहात्म्य वाढविण्यास हा विश्वेश्वरच कारण आहे. तेव्हां याचा उच्छेद करावा म्हणजे हिंदुधर्माचा बऱ्याच अंशी मोड होईल.” असें मनांत आणून त्यांनी श्रीविश्वेश्वराचें मंदिर उच्छिन्न केलें. त्याविषयीं सर्व हिंदुलोकांस फार वाईट वाटलें. पण कोणाचा कांहीं इलाज चालला नाहीं. सर्व लोक दुःखी होऊन आपआपल्या ठिकाणीं स्वस्थ बसले. त्याच संधीस ईश्वरी क्षोभानें म्हणा किंवा अन्य कोणत्याही कारणानें म्हणा, सर्वत्र अवर्षण पडलें, त्यामुळें जिकडेतिकडे हाहाकार झाला. ह्या प्रसंगींची अशी एक चमत्कारिक गोष्ट सांगतात की, नारायणभट्टाचें साधुत्व व तपोबल किती आहे हें पाहण्याकरितां यवन अधिकारी त्यांजकडे गेले, आणि तुम्ही पर्जन्य पाडाल काय? म्हणून विचारू लागले. नारायणभट्टानें उत्तर दिलें की, श्रीविश्वेश्वराच्या मंदिराचा तुम्ही उच्छेद केल्यामुळें त्याच्या क्षोभाचा हा परिणाम आहे; ह्यासाठीं तें मंदिर बांधण्याची जर तुम्ही मला परवानगी द्याल तर तोच विश्वेश्वर सन्तुष्ट होऊन आलेलें विघ्न निवारील. यवन म्हणाले “ आणि पर्जन्य पडला नाहीं तर ? " नारायणभट्ट म्हणाले " नाही पडला तर मी यवनधर्म स्वीकारीन अशी प्रतिज्ञा करितों.” ही प्रतिज्ञा श्रवण करतांच त्या दुष्ट यवनांनीं, नारायणभट्टास आतां खचित मुसलमान व्हावे लागेल असें मनांत समजून व त्याबद्दल अन्तर्यामीं संतोष मानून, आजच पर्जन्य पडला तर मंदिर बांधण्याची तुम्हांस परवानगी मिळेल, आणि न पडला तर तुम्हांस मुसलमान करूं असें सांगितलें. तेव्हां चमत्कार असा झाला कीं, त्याच दिवशीं पर्जन्य पुष्कळ पडून सर्वत्र आनंद झाला, व यवनांची नारायणभट्टाविषयीं परम पूज्यबुद्धि होऊन संकेताप्रमाणे मंदिर बांधण्याची परवानगी देणें त्यांस भाग पडलें. नंतर यानें उत्तम मंदिर बांधून श्रीविश्वेश्वराची स्थापना केली, त्यावेळीं सर्वांस परमानंद झाला, व त्यांनीं नारायणभट्टास जगद्गुरु ही पदवी दिली. आणि त्यास सर्वप्रसंगीं अग्रपूजा मिळावी असा ठराव केला. ती अग्रपूजा अद्यापि त्याच्या वंशजांस मिळत असल्याची प्रसिद्धि आहे. जगद्गुरु ही पदवी त्यालाच मात्र मिळाली होती. ती पुढें चालू राहिली नाहीं.

पूर्वी सांगितलेंच आहे कीं, रामेश्वरभट्ट हा श्रीरामचंद्राचा परम भक्त होता; म्हणून तीच रामोपासना पुढें त्याच्या वंशक्रमानें चालू होती. नारायणभट्ट हाही मोठा रामोपासक होता.

याचा जन्मकाल व मरणकाल निश्चयानें सांगवत नाहीं, तथापि विक्रम शकाच्या १६ व्या शतकांत याचा जीवनसमय असावा असें अनुमान होतें. यानें केलेले त्रिस्थलीसेतु व प्रयोगरत्न ( नारायणभट्टी ) हे दोन ग्रंथ सर्वत्र प्रसिद्ध आहेत. ब्राह्मण लोकांत विवाहादि सर्व संस्कार बहुतकरून प्रयोगरत्नाच्या आधारें चालतात. याशिवाय अन्यही ग्रंथ त्याने केल्याची प्रसिद्धि आहे, पण त्यांच्याविषयीं विशेष माहिती मिळाली नाहीं. याला दोन पुत्र होते. पहिल्याचें नांव रामकृष्णभट्ट, हा प्रकृत ग्रंथकर्त्याचा बाप होय, व दुसरयाचें शंकरभट्ट. हे दोघेही महापंडित असून सदाचारसंपन्न होते. रामकृष्णभट्टानें अनेक ग्रंथ केले आहेत. त्यांत तंत्रवार्तिक नांवाच्या प्रसिद्ध ग्रंथाची व्याख्या हा मुख्य होय. याशिवाय जीवत्पितकनिर्णय इत्यादि बहुत आहेत. याप्रमाणें शंकरभट्टानेंही द्वैतनिर्णय नांवाचा मोठा ग्रंथ केला आहे.

रामकृष्णभट्टास तीन पुत्र होते. वडील पुत्राचें नांव दिनकरभट्ट हा प्रकृत ग्रंथकार्त्याचा वडील बंधु होय. याची विद्वत्ता किती होती याचें अनुमान त्याच्या ग्रंथांवरून होतें. हा मोठा मीमांसक होता. याच्या ग्रंथांची भाषासरणी मोठी मार्मिक असून प्रौढ आहे. याचा मासला त्यानें भाट्टदिनकर नांवाचा मीमांसेवर मोठा ग्रंथ केला आहे. त्याच्या प्रारंभी पुढील श्लोक आहे. त्यावरून सहज समजेल:

दारेष्विव निबन्धेषु जीर्णेषु सुधियां ग्रहः । वयसः क्षपणायैव न रसाय कदाचन ॥१॥

ही उक्ति मोठी मार्मिक आहे. याशिवाय त्याचे उद्योग, शान्तिसार इत्यादि अन्यही ग्रंथ सर्वमान्य आहेत. यालाच दिवाकरभट्ट म्हणत असत. याविषयीं निर्णय सिन्धूच्या आरंभी-

बिन्दुमाधवपादाजरोलम्बीकृतविग्रहम् । ज्यायांसं भ्रातरं भट्टदिवाकरमुपास्महे ॥१॥

असा एक श्लोक असून त्याच ग्रंथांत प्रत्येक प्रकरणाच्या शेवटीं-“दिनकरभट्टानुजकमलाकरभट्टविरचिते” असें हटलें आहे. यावरून दिवाकर, आणि दिनकर हीं एकाचींच नावे असावी असें वाटतें. वस्तुतः हे दोन्ही शब्द एकमेकांचे पर्याय आहेत व अर्थही एकच आहे, तेव्हां असें असण्याचा संभव आहे. याचाही जन्मकाल वगैरे नीट समजत नाहीं. याला विश्वेश्वरभट्ट नांवाचा एकच पुत्र होता. हा महापंडित आपल्या महाराष्ट्र देशांत फार प्रसिद्ध आहे. यालाच गागाभट्ट म्हणत. याविषयीं तत्कृत कायस्थधर्मदीप नामक ग्रंथाच्या प्रारंभीं-

गागाभट्टापराख्यस्य विश्वेश्वरमनीषिणः । सुमनोमानसे शर्म मम निर्मातु निर्मितिः ॥१॥

असा श्लोक आहे. इसवी सन १६७४ रांत रायगडावर शिवाजी राजाला राज्याभिषेक करणारा जो गागाभट्ट तो हाच असावा. यानें भादृचिंतामणि इत्यादि अनेक ग्रंथ केले आहेत. याला संतति नव्हती. याचा स्थितिसमय वर सांगितलेल्या गोष्टी वरून सहज कळतो.

रामकृष्णभट्टाचा कनिष्ठ पुत्र लक्ष्मणभट्ट१ हा मोठा विद्वान असल्याची प्रसिद्धि आहे; त्यानेंही आचाररत्न इत्यादि ग्रंथ केल्याची माहिती आहे. यालाही कांहीं संतान नव्हतें.

रामकृष्णभट्टाचा द्वितीय पुत्र कमलाकरभट्ट हा प्रकृत ग्रंथाचा कर्ता होय. हा महापंडित असून रामोपासक होता. याच्या आईचें नांव उमा. याविषयीं यानेंच निर्णयसिंधूच्या प्रारंभीं

सर्वकल्याणसन्दोहनिदानं यत्पदद्वयम् ॥ द्युनदीसोदरीमम्बामुमाख्यां नौमि सादरम् ॥१॥

असा श्लोक घातला आहे. याला तीन मुलगे होते. थोरल्याचें नांव अनंतभट्ट, दुसरा प्रभाकरभट्ट आणि तिसरा शामभट्ट. यांतून अनंतभट्ट हा मोठा विद्वान् होता. याने रामकल्पद्रुम नांवाचा ग्रंथ केला आहे. रामकृष्णभट्टाच्या तिघां पुत्रांत कमलाकरभट्टच वंशस्थापक झाला. याचा वंश उत्तरोत्तर अधिकाधिक वाढत गेला. याच्या वंशांतले सुमारें १७ । १८ पुरुष काशीक्षेत्रांत सांप्रत हयात आहेत असें चांगल्या आधारावरून आम्हांस कळलें आहे. यानें निर्णयसिन्धु नांवाचा सर्वमान्य ग्रंथ केला आहे. हा ग्रंथ सर्व हिन्दुस्थानांत धर्मशास्त्रनिर्णयाविषयीं प्रमाण मानतात. याशिवाय याने पूर्तकमलाकर, शान्तिकमलाकर इत्यादि धर्मशास्त्रग्रंथ केले आहेत. व्यवहारांत विवादताण्डव अथवा विवादकमलाकर नांवाचा याचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. याशिवाय साहित्यशात्रांतील प्रसिद्ध काव्यप्रकाश नांवाच्या ग्रंथावर यानें टीका केली आहे. ही त्या ग्रंथावर ज्या अनेक टीका आहेत त्यांत अत्युत्तम आहे. आणखी कमलाकराह्निक नांवाचें अति विस्तृत आह्निक यानें केलें आहे. यांवांचूनही तत्कृत ग्रंथ कांही असतील, पण त्यांची विशेष माहिती नाही.

प्रकृत ग्रंथ शूद्रधर्मतत्त्व हा याच महापंडितानें केला आहे. यालाच शूद्रकमलाकर असें म्हणतात. या ग्रंथकर्त्यानें स्वकृत ग्रंथास स्वतंत्र एक नांव ठेविलेलें असतें; पण

  • १ हा प्रकृत ग्रन्थकर्त्याञ्चा कनिष्ठ बन्धु होय.

स्वनामघटित दुसरेंही नांव दिलेलें आढळतें. उदाहरणार्थ, निर्णयसिन्धूस निर्णयकमलाकर असेंही म्हटलें आहे. या ग्रंथाचीं विषयसंदर्भानुसार चार प्रकरणें केलीं आहेत. तीं अशी कीं, यांत प्रथम श्रुति, स्मृति, पुराणें आणि मीमांसान्याय यांच्या आधारें कोणकोणचीं कामें शूद्रांस कसकशीं करण्याचा अधिकार आहे याचें विवेचन केलें आहे, म्हणून त्याला अधिकारसिद्धिप्रकरण असें नांव दिलें आहे. नंतर शूद्रांच्या गर्भाधानादि सर्व संस्कारांचे प्रयोग व त्यांचे निर्णय सांगितले आहेत; म्हणून त्याला संस्कारादिप्रयोगप्रकरण असें नांव दिले आहे. पुढे शूद्रांचें आह्निक व पार्वणश्राद्ध वगैरे सांगितले आहे, म्हणून त्यास आह्निकादिप्रकरण असें नांव दिलें आहे. शेवटीं जातिनिर्णय व त्यांचे स्वरूप वगैरे सांगितले आहे, म्हणून त्यास जातिनिर्णयप्रकरण असें नांव दिलें आहे. यातून पहिलें प्रकरण हें निर्णयसिंधूंत ठिकठिकाणीं जो निर्णय साङ्गितला आहे तोच सर्व एकत्र करून केलें आहे. बाकीचीं तीन प्रकरणे नवीं रचलेलीं आहेत, तथापि संस्कारादिकांचे प्रयोग व जातिनिर्णयांवाचून बाकीचा सर्व भाग स्वकृत अन्य ग्रंथांतले वेंचे एकत्र करून रचला आहे असें म्हटल्यास चालेल.

आता हा ग्रम्थ कधीं रचला याविषयीं विचार केला असतां, निर्णयसिन्धु संवत् १६६८त रचला असें त्याच ग्रंथाच्या शेवटीं-

वसुऋतुऋतुभूमिते गतेऽब्दे नरपतिविक्रमतोऽथ याति रौद्रे । तपसि शिवतिथौ समापितोऽयं रघुपतिपादसरोरुहेऽर्पितश्च ॥१॥

असा श्लोक आहे त्यावरून सिद्ध होतें; पण इतक्यावरून प्रकृत ग्रंथ कधी केला याचा निर्णय होत नाहीं. यांत स्थलविशेपी निर्णयसिन्धूवर हवाले दिले आहेत. यावरून त्याच्या नंतर हा रचला असें म्हणावें तर निर्णयसिन्धूंतही स्थलविशेषीं या ग्रंथाचा हवाला दिला आहे तेव्हां याच्या पूर्वी तो, किंवा त्याच्या पूर्वी हा रचला असावा याच्या कालाचा निश्चय होत नाही. तथापि निर्णयसिंधु, पूर्तकमलाकर व शान्तिकमलाकर इत्यादिकांच्या नंतर हा रचला असावा असें अनेक कारणांवरून संभवतें.

या ग्रंथांत सुमारें १७५ प्राचीन ग्रंथांतलीं प्रमाणवाक्यें घेतलीं आहेत. त्यांची अनुक्रमणिका पुढें दिली आहे. या प्रमाणवाक्यांच्या स्थलांचा ठिकठिकाणी निर्देश करण्याचा आमचा विचार होता; परंतु त्यांपैकी बरेच ग्रंथ आम्हांस उपलब्ध नसल्यामुळें तो हेतु सफल झाला नाहीं. श्रुतिवाक्यांचा स्थलनिर्देश बहुतकरून केला आहे; पण स्मृतिवाक्यांविषयीं तसें करतां आलें नाहीं; कारण, वृद्ध, लघु, बृहत् , गद्य, आणि पद्य असे एकेका कर्त्याचे निरनिराळे स्मृतिग्रंथ आहेत, ते सर्व आम्हांस मिळाले नाहींत. फक्त काशींत छापलेलें विंशतिस्मृतीचें पुस्तक व कलकत्त्यास छापलेलें षड्विंशतिस्मृतींचें पुस्तक अशीं दोन पुस्तकें आम्हांस मिळालीं, त्यांवरून पाहतां बहुतेक वाक्ये त्या त्या स्मृतींत उपलब्ध होत नाहींत. मनु आणि याज्ञवल्क्य या दोन स्मृतींतलीं निर्दिष्ट वाक्ये मात्र बहुतकरून त्या त्या स्मृतींत आढळतात. एकंदरीत ज्या ज्या प्रमाणवाक्यांचीं स्थलें आम्हांस उपलब्ध झाली त्यांचा निर्देश केला आहे.

या ग्रंथांत शास्त्रीय पारिभाषिक वगैरे अनेक दुर्बोध शब्द आले आहेत, त्यांचा अर्थ समजावा याकरितां टिपा दिल्या आहेत. स्थलविशेषीं उपयुक्त अवांतर माहितीही दिली आहे. यांत भाषेच्या गौलतेविषयीं विशेषसें लक्ष्य दिलें नाहीं. त्याबद्दल वाचक आम्हावर दोष ठेवणार नाहीत असे वाटते.

तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम् ।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पन्थाः ॥१॥