[[सार्थश्रीभागवतसुभाषितानि Source: EB]]
[
मुंबई इलाखा व मध्यप्रांत वन्हाड सरकारने, शालांत
लायब्रन्यांकरितां मंजूर केलें आहे
________________________________________________________________
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
_________________________________________________________________
किंमत ३ आणे
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724055153Screenshot2024-08-19134209.png"/>
संपादक व भाषांतरकार
विष्णु विनायक परांजपे, पेण
प्रकाशक
केशव भिकाजी ढवले, गिरगांव–मुंबई
आवृत्ति तिसरी
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724055191Screenshot2023-07-21172948.png"/>
कार्तिक शके १८५३ सन १९३१
किंमत ३ आणे
प्रस्तावना
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724055384Screenshot2024-08-19134612.png"/>
श्रीभागवत हा पुराणग्रंथांमध्यें प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे १२ स्कंध असून लोकसंख्या १८ हजार आहे. यांतील निवडक १२१ संस्कृत सुभाषितवचनें प्रस्तुत पुस्तकांत घेतलीं आहेत. आणि प्रत्येक श्लोकाच्याखालीं त्याचें मराठी भाषांतर दिलें आहे. वचनें वर्णक्रमानें लाविलीं असून शेवटीं मुख्य विषयांची सूची जोडिली आहे. वचनांच्या डावीकडे क्रमांक घातले आहेत व उजवीकडे स्थलनिर्देश केला आहे. स्थलनिर्देशांत डावीकडून पहिला अंक स्कंधाचा, दुसरा अध्यायाचा व तिसरा श्लोकाचा समजावा. सूचीमध्यें विपयापुढील अंक हे वचनाचे क्रमांक आहेत.
धार्मिक शिक्षण देण्याच्या कामीं हें सुभाषितांचें पुस्तक उपयोगीं पडतें, असें पुष्कल पालकांच्या व शिक्षकांच्या प्रत्ययास आलें आहे. हीं सभापितवचनें सर्वांच्या वाचनांत येवोत अशी श्रीकृष्णपरमात्म्याची प्रार्थना करून प्रस्तावना संपवितों.
कार्तिक शके १८५३
विष्णु विनायक परांजपे
रहाणार पेण, जिल्हा कुलाबा
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724055443Screenshot2024-08-19134713.png"/>
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723620070Screenshot(8"/>.png)
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723619962Screenshot(9"/>.png)
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः॥
१ अचक्षुरन्धस्य यथाग्रणीः कृतः स्क. अ. श्लो.
तथा जनस्याविदुषोऽबुधो गुरुः॥८।२४।५०
ज्याप्रमाणें आंधल्या मनुष्यानें आंधला मनुष्य आपला पुढारी केला असतां त्यापासून कांहींएक उपयोग होत नाहीं, त्याप्रमाणें ज्ञान नसलेल्या लोकांनी अडाणी गुरु केला असतां त्याचा कांहींएक उपयोग होत नाहीं.
२ अज्ञानादथवा ज्ञानादुत्तमश्लोकनाम यत्।
संकीर्तितमघं पुंसो दहेदेधो यथानलः॥६।२।१८
ज्याप्रमाणें जाणूनबुझून टाकिलेला किंवा नकलत पडलेला अग्नि काष्ठें जालून टाकितो, त्याप्रमाणें पवित्र कीर्ति असलेल्या परमेश्वराचें नांव समजून उच्चारिलें किंवा त्याचा सहज उच्चार झाला, तरी तें नांव मनुष्याचें पातक नाहींसें करून टाकितें.
३ अणुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः।
सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः॥११।८।१०
ज्याप्रमाणें भ्रमर लहानमोठ्या फुलांतील रस ग्रहण करतो, त्याप्रमाणें विवेकी मनुष्यानें लहानमोठ्या सर्व शास्त्रांतील महत्त्वाचा भाग ग्रहण करावा.
४ अण्वप्युपाहृतं भक्तैः प्रेम्णा भूर्येव मे भवेत्।
भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोषाय कल्पते॥१०।८९।३
(श्रीकृष्ण सुदाम्याला म्हणाले) भक्तांनीं प्रेमानें अर्पण केलेली वस्तू जरी थोडी असली तरी ती मला पुष्कल वाटते. आणि अभक्तांनी पुष्कल वस्तू जरी अर्पण केल्या, तरी त्यापासून मला संतोष होत नाहीं.
५ अनागतमतीतं च वर्तमानमतीन्द्रियम्।
विप्रकृष्टं व्यवहितं सम्यक् पश्यन्ति योगिनः॥१०।६१।२१
पुढें होणाप्या, पूर्वीं झालेल्या आणि वर्तमानकालीं इंद्रियांना न समजणाऱ्या, दूर असलेल्या, मध्यें पडदा, भिंत इत्यादि व्यवधान असल्यामुलें न दिसणाऱ्या सर्व वस्तूंना योगी लोक प्रत्यक्ष पाहतात.
६ अनापृष्टमपि ब्रूयुर्गुरवो दीनवत्सलाः॥३।७।३६
दीनांवर दया करणारे गुरु न विचारलेल्यादेखील गोष्टींबद्दल सांगत असतात.
७ अयं हि परमो लाभो नृणां साधुसमागमः॥१२।१०।७
साधूंचा समागम घडणें हा मनुष्यांना मोठाच लाभ होय.
८ अरयोऽपि हि संधेयाः सति कार्यार्थगौरवे॥८।६।२०
एखादें मोठें कार्य घडवून आणण्यासाठीं शत्रूंबरोबर सुद्धां मैत्री केली पाहिजे.
९ असतः श्रीमदान्धस्य दारिद्र्यं परमञ्जनम्।
आत्मौपम्येन भूतानि दरिद्रः परमीक्षते॥१०।१०।१३
संपत्तीच्या मदानें अंध झाल्यामुलें कर्तव्याकर्तव्य न पाहणाया विवेकशून्य पुरुषाला दारिद्र्य हेंच उत्तम अंजन होय. कारण, दरिद्री पुरुष आपल्यासारखींच दुःखें सर्वांना प्राप्त होत असतील असें निश्चयानें जाणतो.
१० अहं भक्तपराधीनो स्वतंत्र इव द्विज॥९।४।६३
(श्रीभगवान् विष्णु सुदर्शन चक्राने पीडित झालेल्या दुर्वास ऋषींना म्हणाले) हे ब्राह्मणा, मी भक्ताच्या अधीन आहे, यामुलें (तुझ्या रक्षणाविषयीं) स्वतंत्र असल्यासारखा नाहीं.
११ अहो दैन्यमहो कष्टं पारक्यैः क्षणभङ्गुरैः।
यन्नोपकुर्यादस्वार्थैर्मर्त्यः स्वज्ञातिविग्रहैः॥६।१०।१०
द्रव्य, पुत्रादिक बांधव व शरीर यांची स्थिति अशी आहे कीं, यांचा स्वतःला उपयोग होत नाहीं, हीं दुसप्याचीं आहेत. (यांना कोल्हीं कुत्रीं खाऊन टाकणार) व यांचा क्षणाचाही भरंवसा नाहीं. तेव्हां यांच्या योगानें मनुष्यानें कोणावरही उपकार न करणें ही किती तरी दैन्याची व दुःखाची गोष्ट आहे!
१२ आयुः श्रियं यशो धर्मं लोकानाशिष एव च।
हन्ति श्रेयांसि सर्वाणि पुंसो महदतिक्रमः॥१०।४।४६
सज्जनांचा छल केला असतां, मनुष्याचें आयुष्य, संपत्ति, यश, धर्म, उत्तमलोकप्राप्ति, आशीर्वाद, कल्याणकारक गोष्टी या सर्वांचा नाश होतो.
१३ आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखम्॥११।८।४४
आशा धरणें हें अतिशय दुःखाचें कारण आहे. आणि आशा नसणें हें परम सुखाचें कारण आहे.
१४ इन्द्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिणः।
वर्जयित्वा तु रसनं तन्निरन्नस्य वर्धते॥११।८।२०
आहाराचा त्याग करणारे विचारी पुरुष रसनेंद्रियाशिवाय बाकीच्या सर्व इंद्रियांना जिंकतात. परंतु अन्नरहित पुरुषाचें रसनेंद्रिय वाढत जातें. (त्याला रसाविषयों अधिक आसक्ति उत्पन्न होते.)
१५ इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्त्यपि यतेर्मनः॥७।१२।७
इंद्रियें इतकीं अनावर आहेत कीं, तीं संन्याशाचे देखील मन बहकवून सोडतात.
१६ उत्तमश्चिन्तितं कुर्यात्प्रोक्तकारी तु मध्यमः।
अधमोऽश्रद्धया कुर्यादकर्तोच्चरितं पितुः॥९।१८।४४
(जो मुलगा) बापाच्या मनांत असलेलें कार्य करतो तो उत्तम, जो सांगितलेलें करतो तो मध्यम, जो सांगितलेलें अश्रद्धेनें करतो तो कनिष्ठ आणि जो बापाचें सांगणें (अश्रद्धेनेंसुद्धां) करीत नाहीं, तो केवल पित्याची विष्ठाच होय.
१७ उद्यतस्य हि कामस्य प्रतिवादो न शस्यते।
अपि निर्मुक्तसङ्गस्य कामरक्तस्य किं पुनः॥३।२२।१२
सर्वसंगपरित्याग केलेल्या पुरुषाला देखील स्वतः प्राप्त झालेल्या विषयाचा अव्हेर करणें योग्य नाहीं, मग विषयासक्त पुरुषाला तो कोठून योग्य होईल?
१८ एकः प्रसूयते जन्तुरेक एव प्रलीयते।
एकोऽनुभुङ्क्ते सुकृतमेक एव च दुष्कृतम्॥१०।४९।२१
प्राणी एकटाच जन्मास येतो, (स्त्रीपुत्रादिकांसह जन्मास येत नाहीं) व एकटाच मरण पावतो. तसेंच पुण्याचें फल सुख, एकटाच भोगितो व पापाचें फल दुःखसुद्धां एकटाच भोगितो.
१९ एतदेव हि सच्छिष्यैः कर्तव्यं गुरुनिष्कृतम्।
यद्धै विशुद्धभावेन सर्वार्थात्मार्पणं गुरौ॥१०।८०।४१
उत्तम शिष्यांनी गुरूंच्या उपकारांची फेड हीच करावी कीं, सर्व पुरुषार्थ ज्यापासून प्राप्त होतात, तो देह शुद्धभक्तीनें गुरूंना अर्पण करावा.
२० एतावत्येव शुश्रूषा कार्या पितरि पुत्रकैः।
बाढमित्यनुमन्येत गौरवेण गुरोर्वचः॥३।२४।१३
मुलांनी वडिलांची सेवा करावयाची म्हणजे एवढेच कीं, त्यांच्या आज्ञेचा स्वीकार ‘ठीक आहे’ अशा बहुमानानें करावयाचा.
२१ ञएतावानव्ययो धर्मः पुण्यश्लोकैरुपासितः।
यो भूतशोकहर्षाभ्यामात्मा शोचति हृष्यति॥६।१०।९
प्राणिमात्राला दुःख झालें असतां, ज्याला स्वतःला दुःख होतें, व प्राणिमात्राचें सुख पाहून ज्याला सुख होतें, अशा पुरुषाचा जो धर्म, तोच अक्षय धर्म होय. कारण सत्कीर्तिमान लोकांनी याच धर्माचें आचरण केलें आहे.
२२ एतावान् हि प्रभोरर्थो यद्दीनपरिपालनम्॥८।७।३८
समर्थ पुरुषांचें हेंच कर्तव्य आहे कीं, त्यांनी दीन जनांचें परिपालन करावें.
२३ एष राज्ञां परो धर्मो ह्यार्तानामार्तिनिग्रहः॥१।१७।११
पीडित झालेल्या लोकांचें दुःख निवारण करणें हाच राजांचामुख्य धर्म आहे.
२४ एष वै परमो योगो मनसः संग्रहः स्मृतः।
हृदयज्ञत्वमन्विच्छन् दम्यस्येवार्वतो मुहुः॥११।२०।२१
शिक्षण देण्यास योग्य अशा उद्घट घोड्याला शिकवितांना, ज्याप्रमाणें कांहीं वेल त्याच्या तंत्रानें चालून हलूहलू त्याला योग्य तें वलण लावावें लागतें, त्याप्रमाणें प्रथम कांहीं प्रसंगी मनाच्या तंत्राने चालून शेवटीं तें मन पूर्णपणें ताब्यांत आणावें. अशा रीतीनें मनाचा निग्रह करणें हेंच मोठें योगसाधन आहे.
२५ कर्मणा जायते जन्तुः कर्मणैव निलीयते।
सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते॥१०।२४।१३
प्राणी कर्माच्या योगानें उत्पन्न होतो, कर्माच्या योगानें लय पावतो. सुख दुःख, भय, आणि कल्याण हीं सर्वही कर्माच्याच योगानें प्राप्त होतात.
२६ कालो बलीयान्बलिनां भगवानीश्वरोऽव्ययः।
प्रजाः कालयते क्रीडन् पशुपालो यथा पशून्१०।५१।१९
काल हा सर्व बलिष्ठांमध्ये बलिष्ठ असून अविनाशी भगवान् ईश्वर आहे. तो क्रीडा करीत असतां, ज्याप्रमाणे पशूंचें रक्षण करणारा पशूंना इकडे तिकडे नेतो, त्याप्रमाणें प्रजांची घडामोड करतो.
२७ किं विद्यया किं तपसा
किं त्यागेन श्रुतेन वा।
किं विविक्तेन मौनेन
स्त्रीभिर्यस्य मनो हृतम्॥११।२६।१२
ज्याचें मन स्त्रियांनी आपल्या ताब्यांत ठेविलें आहे, (जो स्त्रीलंपट झाला आहे) त्याच्या विद्येचा, तपाचा, त्यागाचा, अध्ययनाचा, एकान्तवासाचा आणि मौनाचा काय उपयोग आहे?
२८ किं दुर्मर्षं तितिक्षूणां
किमकार्यमसाधुभिः।
किं न देयं वदान्यानां
** कः परः समदर्शिनाम्॥१०।७२।१९**
सहनशील पुरुषांना दुःसह असें कांहींच नाहीं. दुष्टांना अकार्य म्हणून कांहींच नाहीं. (वाटेल तें दुष्कृत्य करण्याची त्यांची तयारी असते.) देतां येणार नाहीं असें दानशूर पुरुषांजवल काय आहे? (ते वाटेल ती वस्तू देऊन टाकतील.) आणि समदृष्टि असलेल्या लोकांना परका असा कोणीच नाहीं.
२९ किं प्रमत्तस्य बहुभिः परोक्षैर्हायनैरिह।
वरं मुहूर्तं विदितं घटेत श्रेयसे यतः॥२।१।१२
या लोकीं सावध नसल्यामुलें अविचारानें केवल विषयसेवनांत एखाद्या मनुष्याचीं पुष्कल वर्षे निघून गेलीं, तरी त्यांचा काय उपयोग आहे? त्यापेक्षां ज्ञानानें युक्त अशा दोन घटकाही श्रेष्ठ होत. कारण, मनुष्य त्या दोन घटकांमध्यें स्वहितासाठीं यत्न करतो.
३० कोन्वर्थः सुखयत्येनं कामो वा मृत्युरन्तिके।
आघातं नीयमानस्य वध्यस्येव न तुष्टिदः॥११।१०।२०
या जीवाच्या संनिध मृत्यु उभा आहे अशा स्थितींत कोणता धनादि पदार्थ किंवा शब्दादि विषय त्याला सुख देणार आहे? वध्यपुरुषाला वध करण्याच्या जागेकडे नेत असतां, त्यावेलीं (माला,चंदन, मिष्टान्न इत्यादि) पदार्थ दिले असतां, ते त्याला सुखदायक होत नाहींत; त्याप्रमाणें पुढें मृत्यु असलेल्या या जीवाला कोणताच पदार्थ संतोष उत्पन्न करीत नाहीं.
३१ कौमार आचरेत्प्राज्ञो धर्मान् भागवतानिह।
दुर्लभं मानुषं जन्म तदप्यध्रुवमर्थदम्॥७।६।१
ज्ञात्या पुरुषानें या मनुष्यजन्मांतच व त्यांतूनही कौमारावस्थेंतच भागवतधर्माचें आचरण करावें. कारण, हा मनुष्यजन्म दुर्लभ असून पुरुषार्थ साधून देणारा आहे, तथापि तो अशाश्वत आहे.
३२ गुरुर्न स स्यात्स्वजनो न स स्यात्
पिता न स स्याञ्जननी न सा स्यात्।
दैवं न तत्स्यान्न पतिश्च स स्यात्।
न मोचयेद्यः समुपेतमृत्युम्॥५।५।१८।
आपल्याजवल आलेल्या लोकांची मृत्यूपासून ज्याला सुटका करतां येत नाहीं, तो गुरु नव्हे, स्वजन नव्हे, आणि पिता होण्याला योग्य नव्हे, ती माता नव्हे, तें दैवत नव्हे, तो पति नव्हे, (ज्याला आपलें कर्तव्य बरोबर करतां येत नसेल, त्यानें ती ती पदवी प्राप्त करून घेऊं नये.)
३३ जन्मलाभः परः पुंसामन्ते नारायणस्मृतिः॥२।१।६
अंतकालीं नारायणाची स्मृति होणें हाच मनुष्यजन्म प्राप्त झाल्याचा मोठा लाभ होय.
३४ जातस्य मृत्युर्भुव एष सर्वतः
प्रतिक्रिया यस्य न चेह क्लृप्ता।
लोको यशश्वाथ ततो यदि ह्यमुं
को नाम मृत्युं न वृणीत युक्तम्॥६।१०।३२
उत्पन्न झालेल्या प्राण्याला तो कोठेंही गेला तरी मृत्यु निःसंशय येणारच. या लोकीं मृत्यु टालण्याचा उपाय ईश्वरानें निर्माण केला नाहीं. म्हणून या मृत्यूपासून जर (उत्तम) लोक आणि यश हीं प्राप्त होत असतील,तर या प्राप्त झालेल्या योग्य मृत्यूचा कोण बरें स्वीकार करणार नाहीं? (सर्वही करतीलच.)
३५ जिह्वयातिप्रमाथिन्या जनो रसविमोहितः।
मृत्युमृच्छत्यसद्बुद्धिर्मीनस्तु बडिशैर्यथा॥११।८।१९
ज्याप्रमाणें मासा आमिष लाविलेल्या गलाच्या (लोहकंटकाच्या) योगानें मृत्युमुखीं पडतो,त्याप्रमाणें रससेवनाविषयीं आसक्त झालेला दुर्बुद्धि मनुष्य उच्छृंखल,दुर्जय अशा जिव्हेच्या योगानें मृत्युमुखांत पडतो.
३६ जिह्वां क्वचित्संदशति स्वदद्भिः
तद्वेदनायां कतमाय कुप्येत्॥११।२३।५१
केव्हां तरी मनुष्य आपल्याच दांतांनीं आपली जीभ चावतो, त्यावेलीं होणाप्यावेदनांमुलें त्यानें कोणावर रागें भरावें?(दांतांना रागें भरून ताडण करावें तर आपणांलाच दुसरी पीडा होईल.)
३७ जीवितं मरणं जन्तोः
गतिः स्वेनैव कर्मणा।
राजंस्ततोऽन्यो नान्यस्य
प्रदाता सुखदुःखयोः॥१२।६।२५
(बृहस्पति जनमेजय राजाला सांगतात) हे राजा, जिवंत राहणें, मृत्यु येणें, स्वर्गादिलोकांची प्राप्ति होणें हींसर्व, प्राण्याला आपल्या कर्माच्याच योगानें प्राप्त होत असतात.यासाठीं दुसऱ्याला सुखदुःखेंदेणारा दुसरा कोणी नाहीं.
३८ तत्कर्म हरितोषं यत्
सा विद्या तन्मतिर्यया॥४।२९।४९
ज्याच्या योगानें ईश्वराला संतोष होतो तेंच खरें कर्म होय.आणि जिच्या योगानें श्रीहरीकडे बुद्धि लागते,तीच खरी विद्या होय.
३९ तथारिभिर्न व्यथते शिलीमुखैः
शेतेऽर्दिताङ्गो हृदयेन दूयता।
स्वानां यथा वक्रधियां दुरुक्तिभिः
दिवानिशं तप्यति मर्मताडितः॥४।३।१९
ज्याप्रमाणें आपल्या कुटिलबुद्धि बांधवांच्या दुर्भाषणानें मर्मस्थानीं ताडित झालेला पुरुष व्यथित झालेल्या अंतःकरणामुलें रात्रंदिवस संताप पावतो, त्याप्रमाणे शत्रूंनीं बाणांच्या योगानें आंगाचे तुकडे पाडिले तरी संताप पावत नाहीं.कारण,त्याला थोडी तरी झोंप येते, परंतु मर्मभेद झालेल्याला मुलींच चैन पडत नाहीं.
४० तद्वै धनुस्त इषवः स रथो हयास्ते
सोऽहं रथी नृपतयो यत आनमन्ति।
सर्व क्षणेन तदभूदसदीशरिक्तं
भस्मन्हुतं कुहकराद्धमिवोप्तमूष्याम्॥१।१५।११
(श्रीकृष्ण निजधामास गेल्यानंतर अर्जुनाचा गवल्यांनीं पराजय केला त्यासंबंधानें अर्जुन युधिष्ठिरास सांगतो) संग्रामाचेवेलीं राजे लोक ज्याला नमस्कार करीत असत,तेंच गांडीव धनुष्य,तेच बाण,तोच अग्नीनें दिलेला दिव्यरथ,तेच घोडे,तोच मी रथी पण हें सर्व साहित्य श्रीकृष्णाचा वियोग झाल्यामुलें एका क्षणांत व्यर्थ झालें! भस्मामध्ये केलेलें हवन,मायावी पुरुषापासून मिलविलेल्या वस्तु किंवा उखर म्हणजे खाऱ्या जमिनींत पेरलेलें धान्य हीं ज्याप्रमाणं व्यर्थ होतात,त्याप्रमाणें श्रीकृष्णाचें अधिष्ठान नाहींसें झाल्याबरोबर माझें सर्व सामर्थ्य फुकट गेलें.
४१ तप्यन्ते लोकतापेन साधवः प्रायशो जनाः।
परमाराधनं तद्धि पुरुषस्याखिलात्मनः॥८।७।४४
साधु पुरुष बहुतकरून लोकांच्या दुःखानें स्वतः दुःखी होतात.(लोकांचें दुःख निवारण करण्यासाठीं स्वतः दुःख भोगितात.) दुसऱ्याकरितां दुःख सहन करणें हेंच सर्वात्म्या परमेश्वराचें उत्कृष्ट आराधन होय.
४२ तांस्तान्कामान्हरिर्दद्यात् यान् यान् कामयते जनः।
आराधितो यथैवैष तथा पुंसां फलोदयः॥४।१३।३४
मनुष्य ज्या ज्या विषयांची इच्छा धारण करतो,ते ते विषय श्रीहरि त्याला देतो.जसें हरीचें आराधन करावें,तशीच फलप्राप्ति मनुष्यांना होते.
४३ तावजितेन्द्रियो न स्याद्विजितान्येन्द्रियः पुमान्।
न जयेद्रसनं यावज्जितं सर्वं जिते रसे॥११।८।२१
इतर इंद्रियें जिंकणाऱ्या पुरुषानें जोंपर्यंत रसनेंद्रिय जिंकिलें नाहीं, तोंपर्यंत तो जितेंद्रियच नव्हे.रसनेंद्रिय जिंकिलें असतां त्याने सर्व इंद्रियें जिंकिल्यासारखी आहेत.
४४ तावत्प्रमोदते स्वर्गे यावत्पुण्यं समाप्यते।
क्षीणपुण्यः पतत्यर्वागनिच्छन्कालचालितः॥११।१०।२६
प्राणी स्वर्गामध्ये पुण्य संपेपर्यंत विषयांचा उपभोग घेत असतां आनंद पावतो,परंतु तेथून पडण्याची इच्छा करीत नसतांही,पुण्य संपतांच कालानें त्यास पाडिलें म्हणजे तो खालीं पडतो.
४५ दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभङ्गुरः।
तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठप्रियदर्शनम्॥११।२।२९
(निमिराजा,कवि हरि इत्यादि नऊ योगेश्वरांना म्हणाला.) क्षणभंगुर असलेलाही हा मनुष्यदेह जीवांना दुर्लभ आहे;आणित्या मनुष्यजन्मामध्येंही भगवद्भक्तांचें दर्शन दुर्लभ आहे असें मी मानितों.
४६ दुष्करः को नु साधूनां दुस्त्यजो वा महात्मनाम्॥ ९\।५\।१५
महात्म्या साधूंना करण्यास अथवा टाकण्यास कठीण असें काय आहे?( कांहींच नाहीं.)
४७ दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिवेज्जलम्।
सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत्॥११।१८।१६
दृष्टीनें पाहून शुद्ध ठरलेल्या जागीं पाऊल टाकावें, वस्त्रानें गाललेले पाणी प्यावें,सत्यानें पवित्र अशी वाणी उच्चारावी आणि मनानें विचार करून शुद्ध असेल तेंच आचरण करावें.
४८ द्वावेव चिन्तया मुक्तौ परमानन्द आप्लुतौ।
यो विमुग्धो जडो बालो यो गुणेभ्यः परं गतः॥११।९।४
या जगांत ज्यांना चिंता नाहीं,व जे परमानंदांत निमग्न आहेत,असे दोघेजणच आहेत.एक अज्ञानी उद्योगरहित बालक आणि दुसरा परमेश्वराशींऐक्य पावलेला गुणातीत साधु.
४९ धर्मव्यतिक्रमो दृष्ट ईश्वराणां च साहसम्।
तेजीयसां न दोषाय वह्नेः सर्वभुजो यथा॥१०।३३।३०
** नैतत्समाचरेज्जातु मनसापि ह्यनीश्वरः।
विनश्यत्याचरन्मौढ्याद्यथा रुद्रोऽब्धिजं विषम्॥१०।३३।३१**
पवित्र असलेल्या सर्वभक्षक अग्नीनें जरी अमंगल पदार्थ जालून टाकिले तरी त्यामुलें तो जसा अपवित्र होत नाहीं,त्याप्रमाणें तेजस्वी समर्थ पुरुषांच्या हातून धर्ममर्यादांचें उल्लंघन आणि भलत्याच गोष्टी करण्याचें साहस जरी झालें,तरी त्यांना दोष लागत नाहीं.शंकरांनीं कालकूट विष भक्षण केलें.म्हणून दुसरा सामान्य पुरुष तसें करण्यास प्रवृत्त होईल,तर तो जसा नाश पावेल, त्याप्रमाणें मूर्खपणामुलें शास्त्रविरुद्ध कर्म करणारा नाश पावेल. समर्थ नसलेल्या पुरुषानें शास्त्रविरुद्ध कर्म मनानेंही आचरण करूं नये.
५० धर्मार्थकाममोक्षाख्यं य इच्छेच्छ्रेय आत्मनः।
एकमेव हरेस्तत्र कारणं पादसेवनम्॥४।८।४१
ज्याला धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ साधून आपलें कल्याण व्हावें,अशी इच्छा असेल,त्याला त्यासाठीं श्रीहरीच्या चरणांचे सेवन करणें हेंच मुख्य साधन आहे.
५१ न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति।
हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते॥९।१९।१४
ज्याप्रमाणें अग्नि हा तूप इत्यादि हवनीय द्रव्यांच्या योगानें शांत न होतां अधिकच प्रदीप्त होतो,त्याप्रमाणें विषयांच्या उपभोगानें विषय भोगण्याची इच्छा कधींही शांत होत नाहीं.उलट वाढतच जाते.
५२ न तथा तप्यते विद्धः पुमान्वाणैः सुमर्मगैः।
यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः॥११।२३।३
मर्मस्थलीं लागलेल्या दुर्जनांच्या कठोर वाग्बाणांनीं पुरुष दुःखानें जसा संतप्त होतो,तसा मर्मस्थानीं लागलेल्या लोहमय खऱ्या बाणांनीं विद्ध झाला असतांही संतप्त होत नाहीं.
५३ ननु स्वार्थपरो लोको न वेद परसंकटम्।
यदि वेद न याचेत नेति नाह यदीश्वरः॥६।१०।६
(देव दधीचि ऋषींना म्हणतात) खरोखर स्वार्थाविषयीं तत्पर असलेल्या लोकांना दुसऱ्याचें संकट समजत नाहीं.जर समजेल तर ते याचनाच करणार नाहींत,तसेंच ज्याच्यापाशीं याचना केली,तो जर देण्यास समर्थ असेल व दुसऱ्याचें संकट जाणणारा असेल,तर ‘देत नाहीं’ असें कधींच म्हणणार नाहीं.
५४ नमः पतन्त्यात्मसमं पतत्रिणः॥२।१८।२३
पक्षी आपल्या शक्तीप्रमाणें (अनंत) आकाशांत उडत असतात.
५५ न वै शूरा विकत्थन्ते दर्शयन्त्येव पौरुषम्॥१०।५०।२०
शूर पुरुष आपली स्वतःची स्तुति करीत नाहींत, तर (स्तुतीला कारण असलेला) पराक्रमच करून दाखवितात.
५६ न संरम्भेण सिध्यन्ति सर्वेऽर्थाः सान्त्वया यथा॥८।६।२४
सामोपचारानें जशी सर्व कार्यें सिद्ध होतात तशीं तीं रागानें सिद्ध होत नाहींत.
५७ न सभां प्रविशेत्प्राज्ञः सभ्यदोषाननुस्मरन्।
अब्रुवन्ब्रुवन्नज्ञो नरः किल्बिषमश्नुते॥१०।४४। १०
सभासदांचे दोष जाणणाऱ्या बुद्धिमान मनुष्यानें आधीं सभेमध्येंच जाऊं नये. कारण, दोष जाणूनही न बोलेल, किंवा धर्मपक्षाच्या उलट बोलेल, अथवा विचारिलें असतां मी जाणत नाहीं असें म्हणेल, तर त्याला पाप लागतें.
५८ नहि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्॥६।१।५३
कोणीही एक क्षणभर देखील कर्म केल्यावांचून कधींही राहूं शकत नाहीं.
५९ न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः।
ते पुनन्त्युरुकालेन दर्शनादेव साधवः॥१०।४८।३१
उदकानें युक्त असलेलीं तीर्थें हींतीर्थें नव्हत,असें नाहीं.त्याचप्रमाणें मातीचे व दगडाचे देव हे देव नव्हत असें नाहीं, परंतु हीं तीर्थे व हे देव पुष्कल कालपर्यंत सेवा केली असतां पवित्र करतात आणि साधुलोक त्यांचें दर्शन होतांच पवित्र करतात.
६० नामसंकीर्तनं यस्य
सर्वपापप्रणाशनम्।
प्रणामो दुःखशमन–
स्तं नमामि हरिं परम्॥१२।१३।२३
ज्याचें नामसंकीर्तन केलें असतां तें सर्व पातकांचा नाश करितें व ज्याला नमस्कार केला असतां सकल दुःखांचा नाश होतो,त्या सर्वोत्तम श्रीहरीला मी नमस्कार करितों.
६१ नाश्नतः पथ्यमेवान्नं व्याधयोऽभिभवन्ति हि॥६॥१।१२
पथ्यकारकच अन्न सेवन केलें असतां रोग होत नाहींत.
६२ नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं
प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम्।
मयानुकूलेन नभस्वतेरितं
पुमान्भवाब्धिंन तरेत्स आत्महा॥११।२०।१७
(भगवान् श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात) सर्व उत्कृष्ट फलें प्राप्त करून देण्याचें मुख्य साधन हा नरदेह आहे. हा कोट्यवधि उद्योगांनींही प्राप्त होणारा नाहीं तथापि सहज प्राप्त झाला आहे.ही नरदेहरूपी नौका चांगल्या प्रकारची आहे. गुरु हा तिच्या मधील नावाडी होय. बारा अनुकूल असला म्हणजे नाव चांगल्या तऱ्हेने चालते त्याप्रमाणें माझें स्मरण केलें असतां मी अनुकूल होऊन प्रेरणा करतो. अशा तन्हेची सर्व सामग्री असलेली ही नरदेहरूपी नौका प्राप्त झाली असतां जो संसाररूपी सागर तरून जात नाहीं, तो आत्मघातकी समजावा.
६३ नेह चात्यन्तसंवासः कर्हिचित्केनचित्सह।
राजस्वेनापि देहेन किमु जायात्मजादिभिः॥१०।४९।२०
(अक्रूर धृतराष्ट्र राजाला सांगतो) हे राजा, यालोकीं कोणत्याही प्राण्याचा कोणाही प्राण्याबरोबर केव्हांही निरंतर एकत्र सहवास घडत नाहीं. अत्यंत प्रिय असलेल्या आपल्या देहाबरोबर सुद्धां निरंतर सहवास घडत नाहीं, मग स्त्रीपुत्रादिकांबरोबर घडत नाहीं हैं काय सांगावें?
६४ नैकत्र प्रियसंवासः सुहृदां चित्रकर्मणाम्।
ओघेन व्यूह्यमानानां प्लवानां स्रोतसो यथा॥१०।५।२५
ज्याप्रमाणें उदकप्रवाहाच्या ओघानें वाहून जाणान्या तृणकाष्ठादिकांची स्थिति एके ठिकाणीं घडत नाहीं, त्याप्रमाणें चित्रविचित्र कर्में असणाऱ्या सुहृज्जनांचा प्रिय असलेला समागम एका ठिकाणीं कायमचा घडत नाहीं.
६५ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः॥१०।८१।४
(श्रीकृष्ण सुदाम्याला सांगतात) जो कोणी मला पान, फूल,फल आणि पाणी यांपैकीं कांहींही भक्तीनें अर्पण करतो, त्या शुद्ध अंतःकरणाच्या मनुष्यानें तें भक्तीनें अर्पण केलेलें भी सेवन करतों.(आनंदानें ग्रहण करतों.)
६६ पथि च्युतं तिष्ठति दिष्टरक्षितं
गृहे स्थितं तद्विहतं विनश्यति।
जीवत्यनाथोऽपि तदीक्षितो वने
गृहेऽपि गुप्तोऽस्य हतो न जीवति॥७।२।४०
ईश्वरानें रक्षण केलेली वस्तू मार्गामध्येंही पडली असतां तशीच राहते, तिला कोणी नेत नाहीं. आणि ज्या वस्तूची ईश्वरानें उपेक्षा केली ती घरामध्यें असली तरी नाहींशी होते. त्याचप्रमाणें एखादा पुरुष अनाथ असूनही ईश्वरानें त्याच्यावर कृपादृष्टि ठेविली असतां तो वनामध्येंही जिवंत राहतोच. आणि ईश्वरानें ज्याची उपेक्षा केली तो पुरुष घरामध्यें सुरक्षित असूनही जगत नाहीं.
६७ परोऽप्यपत्यं हितकृद्यथौषधं
स्वदेहजोऽप्यामयवत्सुतोऽहितः।
छिन्द्यात्तदङ्गं यदुतात्मनोऽहितं
शेषं सुखं जीवति यद्विवर्जनात्॥७।५।३७
परिणामी हितकारक असणाऱ्या औषधाप्रमाणें एखादा परका पुरुष जर आपला हितकर्ता असेल, तर तो आपलेंअपत्यच समजला पाहिजे,आणि प्रत्यक्ष औरस पुत्र असूनही अहित करणारा असेल, तर तो रोगाप्रमाणें (शत्रु) समजला पाहिजे.फारतर काय,शरीराचा एखादा अवयव आपणांस अपायकारक असेल तर तो तोडून टाकावा. कारण तेवढ्या भागाचा त्याग केला असतां बाकीचें शरीर सुखानें जिवंत राहते.
६८ पुत्रदारातबन्धूनां संगमः पान्थसंगमः॥११।१७।५३
पुत्र,स्त्री,आप्त आणि बांधव यांचा समागम केवल पांथस्थ लोकांच्या सहवासासारखा (क्षणिक) आहे.
६९ पुत्राणांहि परो धर्मः
पितृशुश्रूषणं सताम्॥६।७।२८
पितरांची सेवा करणें हाच सत्पुत्रांचा श्रेष्ठ धर्म होय.
७० पौरुषं दर्शयन्ति स्म शूरा न बहुभाषिणः॥१०।७७।१९
शूर पुरुष (युद्धामध्यें) पुष्कल बोलून न दाखवितां आपला पराक्रमच करून दाखवितात.
७१ प्रभवो ह्यात्मनः स्तोत्रं जुगुप्सन्त्यपि विश्रुताः॥४।१५।२५
प्रख्यात असलेले समर्थ पुरुष आपल्या वर्णनीय पराक्रमाचीही स्तुति करवीत नाहींत स्तुति ऐकण्याचा त्यांस कंटाला येतो.
७२ प्रायेणाभ्यर्चितो देवो येऽप्रजा गृहमेधिनः।
कदपत्यभृतं दुःखं ये न विन्दन्ति दुर्भरम्॥४।१३।४ ३
जे गृहस्थ निपुत्रिक आहेत त्यांनीं बहुतकरून देवाचें चांगलें पूजन केलें असलें पाहिजे. कारण त्यांना कुपुत्रापासून होणारें अतिशय दुःसह दुःख मुलींच सोसावें लागत नाहीं.
७३ बन्ध इन्द्रियविक्षेपो मोक्ष एषां च संयमः॥११।१८।२२
इंद्रियें विषयासक्त होणें हाच बंध व इंद्रियें विषयांपासून आवरून धरणें हाच मोक्ष होय.
७४ ब्राह्मणस्य हि देहोऽयं क्षुद्रकामाय नेष्यते।
कृच्छ्राय तपसे चेह प्रेत्यानन्तसुखाय च॥११।१७।४२
ब्राह्मणाचा देह संसारांतील तुच्छ विषय भोगण्यासाठीं नाहीं,तर या लोकीं, जिवंत असेपर्यंत कष्ट करून तप करण्याकरितां,आणि मरण पावल्यानंतर परलोकीं अनंत सुख भोगण्याकरितां आहे.
७५ ब्राह्मणः समदृक् शान्तो दीनानां समुपेक्षकः।
स्रवते ब्रह्म तस्यापि भिन्नभाण्डात्पयो यथा॥४।१४।४१
सर्व ठिकाणीं समदृष्टि ठेवणारा व शांत असा ब्राह्मणही जर दीन जनांची उपेक्षा करील, तर त्याचेंही तप ज्याप्रमाणें फुटक्या भांड्यांतून पाणी हलूहलू पाझरून जातें, त्याप्रमाणें उत्तरोत्तर क्षीण होत जाऊन शेवटीं नाहींसें होतें.
७६ ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुमप्युत॥१।१।१८
गुरु प्रेमल शिष्याला रहस्यही सांगतात.
७७ भयं प्रमत्तस्य वनेष्वपि स्यात्
यतः स आस्ते सहषट्सपत्नः।
जितेन्द्रियस्यात्मरतेर्बुधस्य
गृहाश्रमः किं नु करोत्यवद्यम्॥५।१।१७
आसक्ति उत्पन्न होईल या भीतीनें इंद्रियें स्वाधीन नसलेला मनुष्य या वनांतून त्या वनांतून जरी फिरत राहिला,तथापि तेर्थेत्याला संसारभय प्राप्त होतेच. कारण त्याच्याबरोबर कामक्रोधादि सहा शत्रु असतातच.बरें,इंद्रियें जिंकून आत्मस्वरूपीं रममाण असणारा ज्ञाता पुरुष गृहस्थाश्रमांत राहिला, तरी त्याचें काय नुकसान होणार आहे?(कांहीं नाहीं.)
७८ भूतानामिह संवासः प्रपायामिव सुव्रते॥७।२।२१
(हिरण्यकशिपु आपल्या मातेला म्हणतो) हे सुव्रते,पाणपोईवर जमलेल्या लोकांचा सहवास जसा (क्षणिक) असतो, त्याप्रमाण या लोकामध्यें प्राण्यांचा समागम (क्षणिक) आहे.
७९ भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोपाय कल्पते॥११।२७\।१८
(श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात) ज्याच्या अंतःकरणांत भक्ति नाहीं त्यानें पुष्कल उपचार अर्पण केले तरी त्यापासून मलासंतोष होत नाहीं.
८० भौमान् रेणून् स विममे यो विष्णोर्वर्णयेद्गुणान्॥८।५। ६
श्रीविष्णूचे (संपूर्ण) गुण जो वर्णन करील,तो भूमीच्या रजःकणांचीही गणना करील!
८१ भ्रातरीशकृतः पाशो नृणां यः स्नेहसंज्ञितः।
तं दुस्त्यजमहं मन्ये शूराणामपि योगिनाम्॥१०।८४।६१
(वसुदेव नंदाला म्हणाला) हे दादा,स्नेह नांवाचा जो मनुष्यांना पाशच आहे,तो ईश्वरानें निर्माण केलेला असल्यामुले शूर लोकांना व योगिजनांना देखील तोडण्यास मोठा कठीण आहे असें मी समजतों.
८२ मल्लानामशनिर्नृणां नरवरः स्त्रीणां स्मरो मूर्तिमान्
गोपानां स्वजनोऽसतां क्षितिभुजां शास्ता स्वपित्रोः शिशुः।
मृत्युर्भोजपतेर्विराडविदुषां तत्त्वं परं योगिनां
वृष्णीनां परदेवतेति विदितो रङ्गं गतः साग्रजः॥१०।४३।१७
(कंसाच्या रंगमंडपांत असलेल्या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या अभिप्रायाप्रमाणें श्रीकृष्ण भासला) चाणूरमुष्टिकादिक मल्लांना वज्र, सामान्य मनुष्यांना श्रेष्ठ पुरुष, स्त्रियांना मूर्तिमंत मदन,नंदादिक गोपांना स्वजन,दुष्ट राजांना शासन करणारा,वसुदेव देवकी यांना बालक,कंसाला मृत्यु,अज्ञ लोकांना मोठाच पराक्रम करणारा,योग्यांना परमात्मतत्व आणि यादवांना परमदेवता.याप्रमाणे श्रीकृष्ण बलरामासह रंगमंडपांत शिरला असतां,एकच असून ज्याच्या त्याच्या भावनेप्रमाणें अनेकप्रकारचा भासला.
८३ महत्सेवां द्वारमाहुर्विमुक्तेः॥५।५।२
सत्पुरुषांची सेवा करणें हेंच मुक्तीचें द्वार आहे,असें म्हणतात.
८४ मातरं पितरं वृद्धं भार्यां साध्वीं सुतं शिशुम्।
गुरुं विप्रं प्रपन्नं च कल्पोऽविभ्रच्छ्रसन्मृतः॥१०।४५।७
जो पुरुष पालनपोषण करण्यास समर्थ असूनही वृद्ध आईबापांचें, पतिव्रता स्त्रीचें,लहान पुत्राचें,गुरूचें,ब्राह्मणाचें,व शरणागताचें रक्षण करीत नाहीं,तो जिवंत असून मेल्यासारखाच होय.
८५ मातरं पितरं भ्रातृन्सर्वांश्च सुहृदस्तथा।
घ्नन्ति ह्यसुतृपो लुब्धा राजानः प्रायशो भुवि॥१०।१।६७
पृथ्वीवर आपल्या प्राणांची तृप्ति करणारे व लोभी असलेले राजे बहुतकरून आई,बाप,भाऊ,त्याचप्रमाणे सर्वही मित्र यांचा सुद्धां वध करतात मग इतरांची कथा काय?
८६ मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सह जायते।
अद्य वाब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः॥१०।१।३८
(वसुदेव कंसाला म्हणाला) हे वीरा,जन्मास आलेल्या प्राण्यांचा मृत्यु देहाबरोबरच उत्पन्न होतो.आज किंवा शंभर वर्षांनीं तरी प्राण्यांना मृत्यु हा निश्चित प्राप्त होणार.
८७ मृत्युर्बुद्धिमताऽपोह्यो यावद्बुद्धिबलोदयम्।
यद्यसौ न विवर्तेत नापराधोऽस्ति देहिनः॥१०।१।४८
बुद्धिमान् पुरुषानें आपल्या बुद्धीची व बलाची पराकाष्ठा करून प्राप्त झालेला मृत्यु चुकवावा.प्रयत्न करूनही मृत्यु टालतां आला नाहीं,तर त्या प्राण्याकडे कांहीं दोष नाहीं.
८८ य उद्धरेत्करं राजा प्रजा धर्मेष्वशिक्षयन्।
प्रजानां शमलं भुङ्के भगं च स्वं जहाति सः॥४।२१।२४
(पृथुराजा सभासदांना म्हणाला) जो राजा प्रजांना धर्माविषयीं शिक्षण न देतां त्यांच्यापासून करभार मात्र ग्रहण करितो,त्याला प्रजांचें पाप भोगावें लागतें.आणि तो आपल्या ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो.
८९ य उद्यतमनादृत्य कीनाशमभियाचते।
क्षीयते तद्यशः स्फीतं मानश्चावज्ञया हतः॥३।२२।१३
जो पुरुष न मागतां प्राप्त झालेल्या वस्तूचा अनादर करून पुढें त्या वस्तूची याचना एखाद्या कृपण मनुष्याजवल करतो, त्या पुरुषाचें यश जरी सर्व ठिकाणीं पसरलेलें असलें तरी तें नाश पावतें,आणि लोकांमध्यें त्याची अवज्ञा होऊन मानखंडनाही होते.
९० यत्पृथिव्यां व्रीहियवं हिरण्यं पशवः स्त्रियः।
न दुह्यन्ति मनःप्रीतिं पुंसः कामहतस्य ते॥९।१९।१३
(ययाति देवयानीला म्हणतो) तांदूल,जव,सोनें,पशु,स्त्रिया इत्यादि पृथ्वीवरील सर्व विषय,विषयवासनांनीं ग्रस्त झालेल्या पुरुषाच्या मनाला संतोष देण्यासाठीं कधींही पुरे पडत नाहींत.
९१ यथा प्रयान्ति संयान्ति स्रोतोवेगेन वालुकाः।
संयुज्यन्ते वियुज्यन्ते तथा कालेन देहिनः॥६।१५।३
ज्याप्रमाणे (नदीच्या) प्रवाहवेगानें वालू एका ठिकाणीं जमते व दूरही जाते.त्याप्रमाणें कालाच्या योगानें प्राण्यांचा समागम आणि वियोग हे घडत असतात.
९२ यदा न कुरुते भावं सर्वभूतेष्वमङ्गलम्।
समदृष्टस्तदा पुंसः सर्वाः सुखमया दिशः॥९।१९।१५
जो पुरुष प्राणिमात्राच्या अकल्याणाची इच्छा करीत नाहीं,आणि सवत्र समदृष्टि ठेवितो,त्याला सर्वही दिशा सुखमयच होतात.
९३ यद्यदाचरति श्रेयानितरस्तत्तदीहते।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥६।२।४
श्रेष्ठ पुरुष जें जें कम करितो,तें तें कर्म इतर लोकही करतात,व तो श्रेष्ठ पुरुष र्जे (शास्त्र) प्रमाण मानितो, त्यालाच प्रमाण मानून इतर लोकही वागत असतात.
९४ ययोरात्मसमं वित्तं जन्मैश्वर्याकृतिर्भवः।
तयोर्विवाहो मैत्री च नोत्तमाधमयोः क्वचित्॥१०।६०।१५
जात,(कूल,) स्वरूपसौंदर्य,संपत्ति,ऐश्वर्य व उत्कर्ष हीं परस्परांना अनुरूप ज्यांच्यामध्यें असतील, त्यांच्यामध्यें विवाहसंबंध घडून येतो व मैत्री जडते.श्रेष्ठ व कनिष्ठ यांच्यामध्यें विवाहसंबंध होत नाहीं व अशा लोकांची मैत्रीही जुलत नाहीं.
९५ यशो यशस्विनां शुद्धं
श्लाघ्या ये गुणिनां गुणाः।
लोभः स्वल्पोऽपि तान् हन्ति
श्वित्रो रूपमिवेप्सितम्॥११।२३।१६
ज्याप्रमाणें श्वेतकुष्ठाच्या योगानें सुंदर रूपाला कमीपणा येतो,त्याप्रमाणें स्वल्प असलेलाही लोभ यशस्वी पुरुषांच्या निर्मल यशाचा व गुणी पुरुषांच्या स्तुत्य गुणांचा नाश करतो.
९६ यश्च मूढतमो लोके यश्च बुद्धेः परं गतः।
तावुभौ सुखमेधेते क्लिश्यत्यन्तरितो जनः॥३।७।१७
देहादिकांच्या ठिकाणीं अत्यंत आसक्त असलेला परममूर्ख व प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या परमेश्वरस्वरूपाला प्राप्त झालेला ज्ञानी हे दोघे सुखानें राहतात.यांच्या स्थितींच्या मधल्या अवस्थेंत असणारा हा मात्र अतिशय क्लेश भोगितो.(जो केवल अज्ञानी तो एक सुखी किंवा जो पूर्ण ज्ञानी तो एक सुखी.परंतु धड ज्ञानी नाहीं व अज्ञानीही नाहीं,तो अतिशय दुःखी असतो.)
९७ यस्य राष्ट्रे प्रजाः सर्वास्त्रस्यन्ते साध्व्यसाधुभिः।
तस्य मत्तस्य नश्यन्ति कीर्तिरायुर्भगो गतिः॥१।१७।१०
(परीक्षिति राजा गोरूप धारण केलेल्या पृथ्वीला म्हणतो)हे साध्वि,ज्या राजाच्या राष्ट्रांतील निरपराधी लोकांना दुष्टांपासून त्रास उत्पन्न होतो,त्या मत्त झालेल्या राजाची कीर्ति,आयुष्य,भाग्य व परलोक हीं सर्वही नाश पावतात.
९८ सा दुस्त्यजा दुर्मतिभिर्जीर्यतो या न जीर्यते।
तां तृष्णां दुःखनिवहां शर्मकामो द्रुतं त्यजेत्॥९।१९।१६
दुर्बुद्धि असलेल्या पुरुषाला विषयतृष्णा सोडवत नाहीं.तो जरी वृद्ध झाला तरी विषयांची तृष्णा कमी होत नाहीं.या विषयतृष्णेमुलें अतिशय दुःखें प्राप्त होतात,हें जाणून कल्याणेच्छु पुरुषानें हिचा सत्वर त्याग करावा.
९९ यावद्भ्रियेत जठरं तावत्स्वत्वं हि देहिनाम्।
अधिकं योऽभिमन्येत स स्तेनो दण्डमर्हति॥७।१४।८
आपलें पोट भरण्यास जितकें अन्न लागेल,तितकेंच अन्न खरोखर आपलें आहे असें म्हणतां येईल.त्यापेक्षां अधिकावर जो आसक्ति ठेवितो,तो केवल चोर होय.तो दंडाला पात्र होतो.
१०० योऽनित्येन शरीरेण
सतों गेयं यशो ध्रुवम्।
नाचिनोति स्वयं कल्पः
स वाच्यः शोच्य एव सः॥१०।७२।२०
जो प्राणी स्वतः समर्थ असूनही आपल्या अनित्य शरीरानें साधूंर्नीगायन करण्यास योग्य असें शाश्वत यश संपादन करीत नाहीं,तो निंद्य होय व भाग्यहीनपणामुलें शोक करण्यासही योग्य होय.(त्याची कीव करावी तितकी थोडीच.)
१०१ यो वा अनन्तस्य गुणाननन्तान्
अनुक्रमिष्यन्स तु बालबुद्धिः।
रजांसि भूमेर्गणयेत्कथंचित्
कालेन नैवाखिलशक्तिधाम्नः॥११।४।२
जो पुरुष ईश्वराच्या अनंत गुणांची गणना करण्यास तयार होईल तो मंदबुद्धि समजला पाहिजे.कारण कोणी एखादा महाबुद्धिमान पुरुष दीर्घकालपर्यंत मोठा प्रयत्न करून कदाचित् भूमीच्या रजःकणांची गणना करील,परंतु सर्व शक्तींचा आश्रय अशा भगवंताच्या गुणांची गणना करण्यास तो समर्थ होणार नाहीं.
१०२ राज्ञो हि परमो धर्मः स्वधर्मस्थानुपालनम्।
शासतोऽन्यान् यथाशास्त्रमनापद्युत्पथानिह॥१।१७।१६
आपत्काल नसतां भलत्याच मार्गानें (शास्त्रविरुद्धमार्गानें) जाणान्या अधार्मिक लोकांस यथाशास्त्र शासन करून स्वधर्मनिष्ठ सज्जनांचें निरंतर पालन करणें हाच राजाचा मुख्य धर्म होय.
१०३ लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते
मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीरः।
तूर्णं यतेत न पतेदनुमृत्यु यावत्
निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतः स्यात्॥११।९।२९
अनित्य असूनही सर्व पुरुषार्थ साधून देणारा म्हणूनच अत्यंत दुर्लभ असा नरदेह यालोकीं पुष्कल जन्म घेतल्यानंतर भाग्यानें प्राप्त झाला असतां,हा वारंवार मरणारा आहे म्हणून जोपर्यंत हा पडला नाहीं,तोंपर्यंतच धैर्यवान् पुरुषानें मोठ्या त्वरेनें मोक्ष मिलविण्यासाठीं यत्न करावा.खरोखर केवल विषयसेवन है(श्वानसूकरादिक) सर्व योनींमध्येंही प्राप्त होतेच.(त्यासाठीं यत्न कशाला?)
१०४ विक्रीडतोऽमृताम्भोधौ किं क्षुद्रैःखातकोदकैः॥६।१२।२२
अमृताच्या सागरामध्यें क्रीडा करणान्याला लहानशा खलग्यांतील पाण्याचें काय महत्त्व आहे? (कांहींच नाहीं.)
१०५ श्रेयः कुर्वन्ति भूतानां साधवो दुस्त्यजासुभिः॥८।२०।१७
साधु लोक त्याग करण्यास कठीण अशा प्राणांच्या योगानंही (प्राण खचीं घालूनही) प्राणिमात्राचें कल्याण करितात.
१०६ श्रेयः प्रजापालनमेव राज्ञः॥४।२०।१४
प्रजांचें पालन करणें हेंच राजाला श्रेयस्कर आहे.
१०७ षड्वर्गसंयमैकान्ताः सर्वा नियमचोदनाः॥७।१५।२८
सर्वही नियमविधींचें पर्यवसान कामक्रोधादि सहा शत्रूंचें संयमन करण्यामध्येंच आहे.
१०८ संसारेऽस्मिन्क्षणार्धोऽपि सत्सङ्गःशेवधिर्नृणाम्॥११।२।३०
एखादा द्रव्याचा निधि प्राप्त झाला असतां जसा आनंद होतो,तसा या संसारामध्यें मनुष्यांना अर्धा क्षणभर सुद्धां घडलेल्या सत्समागमापासून आनंद होतो.
१०९ संकीर्त्यमानो भगवाननन्तः
श्रुतानुभावो व्यसनं हि पुंसाम्।
प्रविश्य चित्तं विधुनोत्यशेपं
यथा तमोऽर्कोऽभ्रमिवातिवातः॥१२।१२।४७
ज्याप्रमाणें सूर्य अंधकाराचा नाश करतो,किंवा प्रचंड वारा मेघांना वितलून नाहींसें करितो,त्याप्रमाणें भगवान् अनंताचें कीर्तन केलें असतां, अथवा त्याचा प्रभाव श्रवण केला असतां तो भगवान्कीर्तन किंवा श्रवण करणाऱ्या मनुष्यांच्या हृदयांत प्रवेश करून त्यांची सर्व दुःखें नाहींशी करितो.
११० संनिकर्षोऽत्र मर्त्यानामनादरणकारणम्।
गाङ्गं हित्वा यथान्याम्भस्तत्रत्यो याति शुद्धये॥१०।८४।३१
या लोकीं अत्यंत सहवास असला म्हणजे मनुष्यांना अनादर उत्पन्न होतो. गंगेच्या तीरीं राहणारा मनुष्य शुद्धतेसाठीं गंगोदक सोडून दुसऱ्या तीर्थाच्या उदकाकडे जात असतो.
१११ संभावितस्य स्वजनात्पराभवो
यदा स सद्यो मरणाय कल्पते॥४।३।२५
संभावित मनुष्याचा आप्तजनांकडून अपमान झाला म्हणजे त्याचवेलीं त्याला तो अपमान मरणासारखा वाटतो.(अपमानापेक्षां मरण बरें,असें त्याला होतें.)
११२ सर्वार्थसंभवो देहो जनितः पोषितो यतः।
न तयोर्याति निर्वेशं पित्रोर्मर्त्यः शतायुषा॥१०।४५।५
सर्व पुरुषार्थ संपादन करून देणारा देह ज्यांच्यापासून उत्पन्न झाला,व ज्यांनीं त्याचें पोषण केलें,त्या आईबापाचे ऋण मनुष्याला शंभर वर्षे जगूनही (दीर्घकाल प्रयत्न करूनही) फेडतां येत नाहीं.
११३ सर्वाश्रमानुपादाय स्वाश्रमेण कलत्रवान्।
व्यसनार्णवमत्येति जलयानैर्यथार्णवम्॥३।१४।१७
ज्याप्रमाणें नावाडी नौकेच्या योगानें दुसऱ्या लोकांसह समुद्रांतून तरून जातो,त्याप्रमाणें सपत्नीक पुरुष आपल्या गृहस्थाश्रमाच्या योगानें इतर आश्रमी लोकांस बरोबर घेऊन (त्यांना अन्नवस्त्रादिक देऊन) संकटरूपी सागरांतून तरून जातो.
११४ सर्वाः समुद्धरेद्राजा पितेव व्यसनात्प्रजाः॥११।१७।४५
ज्याप्रमाणें बाप आपल्या मुलांना संकटांतून सोडवितो,त्याप्रमाणें राजानें आपल्या सर्व प्रजांना सकटांतून सोडवावें.
११५ साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहम्।
मदन्यते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि॥९।४।६८
(भगवान् विष्णु दुर्वास ऋषींना म्हणाले) साधु हे माझें हृदय आहेत (साधु हे मला फार प्रिय आहेत) आणि मी साधूंचें हृदय आहे (मी त्यांना फार प्रिय आहें) कारण ते माझ्याहून दुसरी प्रिय वस्तू कोणतीहि जाणत नाहींत आणि मीही त्यांच्याहून प्रिय असलेली दुसरी स्वल्पही वस्तू जाणत नाहीं.
११६ साधुषु प्रहितं तेजः प्रहर्तुःकुरुतेऽशिवम्॥९।४।६९
साधूंवर गाजविलेला प्रभाव प्रहार करणाऱ्याचेच अकल्याण करितो.
११७ सुखदुःखदो न चान्योऽस्ति
यतः स्वकृतभुक् पुमान्॥१०।५४।३८
मनुष्याला सुख किंवा दुःख देणारा दुसरा कोणीच नाहीं. तर तो आपण स्वतः केलेल्या कर्मानेंच सुख किंवा दुःख भोगीत असतो.
११८ सुलभा युधि विप्रर्षे ह्यनिवृत्तास्तनुत्यजः।
न तथा तीर्थ आयाते श्रद्धया ये धनत्यजः॥८।२०।९
(बली शुक्राचार्यांना सांगतो) हे ब्रह्मर्षे, युद्धामध्यें परत न फिरतां देहाचा त्याग करणारे लोक या लोकीं जस पुष्कल आढलतात, तसे सत्पात्रीं श्रद्धापूर्वक द्रव्य देणारे लोक पुष्कल आढलत नाहींत.
११९ स्त्रीषु नर्म विवाहे च
वृत्त्यर्थे प्राणसंकटे।
** गेब्राह्मणार्थे हिंसायां
नानृतं स्याज्जुगुप्सितम्॥८।१९।४३**
स्त्रियांना अधीन ठेवणें, विनोद, विवाह, उपजीविका, प्राणसंकट, गोब्राह्मणांचे हित, आणि हिंसा टालणें या प्रसंगीं असत्य भाषण केलें असतां तें निंद्य ठरत नाहीं.
१२० स्नेहानुबन्धो बन्धूनां मुनेरपि सुदुस्त्यजः॥१०।४७।५
बांधवांच्या स्नेहाचा संबंध सोडून देणें, हें एखाद्या मननशील मुनीला देखील कठीण जातें.
१२१ स्वयं हि तीर्थानि पुनन्ति सन्तः॥१।१९।८
सत्पुरुष तीर्थांना स्वतः पवित्र करीत असतात.
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724067407Screenshot2024-08-19170622.png"/>
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723641582Screenshot(10"/>.png)
विषयसूची
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723641685Screenshot(11"/>.png)
| विषयः | क्रमाङ्कः |
| अग्रणीः | १ |
| अनादरः | ८९ |
| अनृतम् | ११९ |
| अपत्यम् | ६७ |
| अमङ्गलम् | ९२ |
| अमृतम् | १०४ |
| अरिः | ८ |
| अर्थः | ८ |
| अवज्ञा | ८९ |
| असन् | ९ |
| आत्मा | ९ |
| आनन्दः | ४४ |
| आयुः | १२ |
| आर्तः | २३ |
| आशा | १३ |
| इन्द्रियम् | ५ |
| ईश्वरः | २ |
| उपकारः | ११ |
| ऐश्वर्यम् | ८८ |
| कर्म | २५ |
| कामः | १७ |
| कार्यम् | ८ |
| कालः | २६ |
| कीर्तनम् | ६० |
| कृच्छ्रम् | ७४ |
| कोपः | ३६ |
| क्लेशः | ९६ |
| गतिः | ३७ |
| गुणः | ४८ |
| गुरुः | १ |
| गृहस्थाश्रमः | ७२ |
| चिन्ता | ४८ |
| जन्म | १८ |
| जयः | १४ |
| जिह्वा | ३५ |
| जीवितम् | ३७ |
| ज्ञानम् | २ |
| तपः | २७ |
| तीर्थम् | ५९ |
| तृष्णा | ९८ |
| तेजः | ४९ |
| तोषः | ४ |
| दण्डः | ९९ |
| दर्शनम् | ८२ |
| दानम् | ११८ |
| दारिद्र्यम् | ९ |
| दीनः | २२ |
| दुःखम् | १३ |
| दुरुक्तिः | ३९ |
| दुर्मतिः | ९८ |
| दुष्कृतम् | १८ |
| देवः | ३२ |
| देहः | ११ |
| दोषः | ४९ |
| धनम् | ९ |
| धर्मः | १२ |
| धीरः | १०३ |
| नाम | २ |
| नियमः | १०७ |
| पतत्री | ५४ |
| पतिः | ३२ |
| पराभवः | १११ |
| पापम् | २ |
| पिता | १६ |
| पुण्यम् | ४४ |
| पुत्रः | १६ |
| पूतम् | ४७ |
| पौरुषम् | ५५ |
| प्रजा | २६ |
| प्रणामः | ६० |
| प्रभुः | २२ |
| प्रमत्तः | २९ |
| प्रमाणम् | ९३ |
| प्राज्ञः | ३१ |
| प्राणः | ८५ |
| प्रेम | ४ |
| फलम् | ४२ |
| बन्धः | ७३ |
| बन्धुः | ६८ |
| बलम् | २६ |
| बालः | ४८ |
| बुद्धिः | ३५ |
| ब्राह्मणः | ७४ |
| भक्तः | ४ |
| भक्तिः | ५० |
| भयम् | २५ |
| मदः | ९ |
| मनः | १५ |
| मनीषी | १४ |
| महान् | १२ |
| माता | ३२ |
| मानः | ८९ |
| मुनिः | १२० |
| मूढः | ९६ |
| मृत्युः | १८ |
| मैत्री | ९४ |
| मोक्षः | ५० |
| यशः | १२ |
| याचना | ५३ |
| युद्धम् | ११८ |
| योगः | २४ |
| योगी | ५ |
| रक्षणम् | ६६ |
| रसः | ३५ |
| रसनम् | १४ |
| राजा | २३ |
| राष्ट्रम् | ९७ |
| लाभः | ७ |
| लोभः | ८५ |
| लोकः | १२ |
| वदान्यः | २८ |
| वाक् | ४७ |
| वाच्यः | १०० |
| विद्या | २७ |
| विनाशः | ६६ |
| वियोगः | ९१ |
| विवाहः | ९४ |
| विषयः | १०३ |
| व्यसनम् | १०९ |
| व्याधिः | ६१ |
| शास्त्रम् | ३ |
| शिष्यः | १९ |
| शुश्रूषा | २० |
| शूरः | ५५ |
| शोकः | २१ |
| श्रद्धा | १६ |
| श्रीः | ९ |
| श्रेयः | १२ |
| श्रेयान् | ९३ |
| संयमः | ७३ |
| संयोगः | ९१ |
| संरम्भः | ५६ |
| संवासः | ६३ |
| संसारः | ६२ |
| संकटम् | ५३ |
| सत्यम् | ४७ |
| सन् | ६९ |
| संधिः | ८ |
| संनिकर्षः | ११० |
| सभा | ५७ |
| समदृक् | २८ |
| संभावितः | १११ |
| साधुः | ७ |
| साम | ५६ |
| सारम् | ३ |
| साहसम् | ४९ |
| सुकृतम् | १८ |
| सुखम् | १३ |
| सुहृद् | ६४ |
| स्तेनः | ९९ |
| स्तोत्रम् | ७१ |
| स्त्री | २७ |
| स्नेहः | ७६ |
| स्वधर्मः | १०२ |
| स्वर्गः | ४४ |
| स्वार्थः | ५३ |
| हननम् | ८५ |
| हर्षः | २१ |
| हितम् | ६७ |
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724067827Screenshot2024-08-19171316.png"/>
मुद्रक :— एस्. व्ही. परुलेकर, मुंबई वैभव प्रेस, सर्व्हंटस् ऑफ इंडिया
सोसायटीज् बिल्डिंग, सँढर्स्टरोड, गिरगांव—मुंबई.
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724067757Screenshot2024-08-19134713.png"/>
प्रकाशक—केशव भिकाजी ढवले, रामचंद्र बिल्डींग गिरगांव—मुंबई.
(सर्व हक्कप्रकाशकाच्या स्वाधीन)
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724067848Screenshot2024-08-19171333.png"/>
]