२३ रामायण-महात्म्य, तुलसीविनय आणि फलश्रुति

मूल (चौपाई)

पूँछिहु राम कथा अति पावनि।
सुक सनकादि संभु मन भावनि॥
सत संगति दुर्लभ संसारा।
निमिष दंड भरि एकउ बारा॥

अनुवाद (हिन्दी)

तू मला शुकदेव, सनकादिक आणि शिव यांच्या मनाला आवडणारी अतिपवित्र रामकथा विचारलीस. जगामध्ये घडीभर किंवा पळभर एकवेळ मिळणारा सत्संगही दुर्लभ आहे.॥३॥

मूल (चौपाई)

देखु गरुड़ निज हृदयँ बिचारी।
मैं रघुबीर भजन अधिकारी॥
सकुनाधम सब भाँति अपावन।
प्रभु मोहि कीन्ह बिदित जग पावन॥

अनुवाद (हिन्दी)

हे गरुडा, आपल्या मनात विचार करून बघ. मी काय श्रीरामांच्या भजनास पात्र आहे? पक्ष्यांमध्ये मी सर्वांत नीच आणि सर्वप्रकारे अपवित्र आहे. परंतु असे असतानाही प्रभूंनी मला सर्व जगाला पवित्र करणारा म्हणून प्रसिद्ध केले.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

आजु धन्य मैं धन्य अति जद्यपि सब बिधि हीन।
निज जन जानि राम मोहि संत समागम दीन॥१२३(क)॥

अनुवाद (हिन्दी)

जरी मी सर्व प्रकारे हीन आहे, तरीही मी आज धन्य आहे. अत्यंत धन्य आहे. कारण श्रीरामांनी मला ‘आपला’ मानून संत-समागम दिला.॥१२३(क)॥

मूल (दोहा)

नाथ जथामति भाषेउँ राखेउँ नहिं कछु गोइ।
चरित सिंधु रघुनायक थाह कि पावइ कोइ॥१२३(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, मी आपल्या बुद्धीप्रमाणे सांगितले, काहीही लपवून ठेवले नाही. तरीही श्रीरघुवीरांचे चरित्र समुद्रासमान आहे. त्याचा थांग कुणाला तरी लागू शकेल काय?॥१२३(ख)॥

मूल (चौपाई)

सुमिरि राम के गुन गन नाना।
पुनि पुनि हरष भुसुंडि सुजाना॥
महिमा निगम नेति करि गाई।
अतुलित बल प्रताप प्रभुताई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांच्या अनेक गुण-समूहांचे स्मरण करता-करता भुशुंडी वारंवार हर्षित होत होते. ज्यांचा महिमा वेदांनी ‘नेति नेति’ म्हणून गायिला आहे, ज्यांचे बल, प्रताप व सामर्थ्य अतुलनीय आहे,॥१॥

मूल (चौपाई)

सिव अज पूज्य चरन रघुराई।
मो पर कृपा परम मृदुलाई॥
अस सुभाउ कहुँ सुनउँ न देखउँ।
केहि खगेस रघुपति सम लेखउँ॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या श्रीरघुनाथांचे चरण शिव व ब्रह्मदेव यांना पूज्य आहेत, त्यांची कृपा माझ्यावर झाली, ही त्यांचीच परम कोमलता आहे. कुणाचा असा कृपाळू स्वभाव असल्याचे मी ऐकले नाही की पाहिले नाही. म्हणून हे पक्षिराज, मी रघुनाथांसमान कुणाला समजू?॥२॥

मूल (चौपाई)

साधक सिद्ध बिमुक्त उदासी।
कबि कोबिद कृतग्य संन्यासी॥
जोगी सूर सुतापस ग्यानी।
धर्म निरत पंडित बिग्यानी॥

अनुवाद (हिन्दी)

साधक, सिद्ध, जीवन्मुक्त, विरक्त, कवी, विद्वान, कर्म-रहस्याचे ज्ञाते, संन्यासी, योगी, शूर, मोठे तपस्वी, ज्ञानी, धर्मपरायण, पंडित आणि ज्ञानी,॥३॥

मूल (चौपाई)

तरहिं न बिनु सेएँ मम स्वामी।
राम नमामि नमामि नमामी॥
सरन गएँ मो से अघ रासी।
होहिं सुद्ध नमामि अबिनासी॥

अनुवाद (हिन्दी)

यांपैकी कुणीही माझे स्वामी श्रीराम यांचे भजन केल्याविना तरून जाऊ शकत नाहीत. मी त्याच श्रीरामांना वारंवार नमस्कार करतो. त्यांना शरण गेल्यावर माझ्यासारखा पापांची राशी असलेलाही पापरहित होतो. त्या अविनाशी श्रीरामांना मी नमस्कार करतो.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

जासु नाम भव भेषज हरन घोर त्रय सूल।
सो कृपाल मोहि तो पर सदा रहउ अनुकूल॥१२४(क)॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांचे नाम जन्म-मरणरूपी रोगाचे परिणामकारक औषध आहे आणि आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक या तीन भयंकर दुःखाचे हरण करणारे आहे, ते कृपाळू श्रीराम माझ्यावर व तुझ्यावर नेहमी प्रसन्न राहोत.’॥१२४(क)॥

मूल (दोहा)

सुनि भुसुंडि के बचन सुभ देखि राम पद नेह।
बोलेउ प्रेम सहित गिरा गरुड़ बिगत संदेह॥१२४(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडी यांचे मंगलमय बोलणे ऐकून व श्रीरामांच्या चरणी त्यांचे अतिशय प्रेम पाहून गरुडाचा संशय पूर्णपणे नाहीसा झाला. तो प्रेमाने म्हणाला,॥१२४(ख)॥

मूल (चौपाई)

मैं कृतकृत्य भयउँ तव बानी।
सुनि रघुबीर भगति रस सानी॥
राम चरन नूतन रति भई।
माया जनित बिपति सब गई॥

अनुवाद (हिन्दी)

‘श्रीरघुवीरांच्या भक्तिरसात बुडालेली तुमची वाणी ऐकून मी कृतकृत्य झालो. श्रीरामांच्या चरणी मला नवीन प्रेम उत्पन्न झाले आणि मायेमुळे उत्पन्न झालेली सर्व संकटे निघून गेली.॥१॥

मूल (चौपाई)

मोह जलधि बोहित तुम्ह भए।
मो कहँ नाथ बिबिध सुख दए॥
मो पहिं होइ न प्रति उपकारा।
बंदउँ तव पद बारहिं बारा॥

अनुवाद (हिन्दी)

मोहरूपी समुद्रात बुडत असताना मला वाचविण्यासाठी तुम्ही जहाज झालात. हे नाथ, तुम्ही मला अनेक प्रकारचे सुख दिले. माझ्याकडून या उपकाराची परतफेड होऊ शकत नाही. मी फक्त तुमच्या चरणांना वारंवार वंदनच करू शकतो.॥२॥

मूल (चौपाई)

पूरन काम राम अनुरागी।
तुम्ह सम तात न कोउ बड़भागी॥
संत बिटप सरिता गिरि धरनी।
पर हित हेतु सबन्ह कै करनी॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही पूर्णकाम आहात आणि श्रीरामांचे भक्त आहात. हे तात, तुमच्यासारखा मोठा भाग्यवान कुणी नाही. संत, वृक्ष, नदी, पर्वत आणि पृथ्वी या सर्वांचे कार्य दुसऱ्यांच्या हितासाठीच असते.॥३॥

मूल (चौपाई)

संत हृदय नवनीत समाना।
कहा कबिन्ह परि कहै न जाना॥
निज परिताप द्रवइ नवनीता।
पर दुख द्रवहिं संत सुपुनीता॥

अनुवाद (हिन्दी)

कवी असे म्हणतात की, संतांचे हृदय हे लोण्याप्रमाणे कोमल असते. परंतु त्यांना खरी गोष्ट सांगणे, जमले नाही. कारण लोणी हे स्वतःला ताप झाल्याने वितळते आणि परम पवित्र संत हे दुसऱ्याच्या तापाने विरघळतात.॥४॥

मूल (चौपाई)

जीवन जन्म सुफल मम भयऊ।
तव प्रसाद संसय सब गयऊ॥
जानेहु सदा मोहि निज किंकर।
पुनि पुनि उमा कहइ बिहंगबर॥

अनुवाद (हिन्दी)

माझे जीवन व जन्म सफळ झाला. तुमच्या कृपेमुळे सर्व संशय निघून गेले. तुम्ही मला नेहमी आपला दास माना.’ शिव म्हणतात, ‘हे उमा, पक्षिश्रेष्ठ गरुड वारंवार असे म्हणत होता.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

तासु चरन सिरु नाइ करि प्रेम सहित मतिधीर।
गयउ गरुड़ बैकुंठ तब हृदयँ राखि रघुबीर॥१२५(क)॥

अनुवाद (हिन्दी)

भुशुंडींच्या चरणी प्रेमाने मस्तक ठेवून आणि हृदयामध्ये श्रीरघुवीरांना धारण करून धीरबुद्धीचा गरुड नंतर वैकुंठाला निघून गेला.॥१२५(क)॥

मूल (दोहा)

गिरिजा संत समागम सम न लाभ कछु आन।
बिनु हरि कृपा न होइ सो गावहिं बेद पुरान॥१२५(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे गिरिजा, संत-समागमासमान दुसरा कोणताही लाभ नाही. परंतु तो संत-समागम श्रीहरींच्या कृपेशिवाय होत नाही, असे वेद-पुराणांनी सांगितले आहे.॥१२५(ख)॥

मूल (चौपाई)

कहेउँ परम पुनीत इतिहासा।
सुनत श्रवन छूटहिं भव पासा॥
प्रनत कल्पतरु करुना पुंजा।
उपजइ प्रीति राम पद कंजा॥

अनुवाद (हिन्दी)

मी हा परम पवित्र इतिहास सांगितला. तो कानांनी ऐकताच भवपाश तुटून जातात आणि शरणागतांना मनोवांछित फल देणारे कल्पवृक्ष व दयेचे समूह असलेल्या श्रीरामांच्या चरणकमलांविषयी प्रेम उत्पन्न होते.॥१॥

मूल (चौपाई)

मन क्रम बचन जनित अघ जाई।
सुनहिं जे कथा श्रवन मन लाई॥
तीर्थाटन साधन समुदाई।
जोग बिराग ग्यान निपुनाई॥

अनुवाद (हिन्दी)

जे कान देऊन आणि मन लावून कथा ऐकतात, त्यांची कायावाचामनाने केलेली सर्व पापे नष्ट होतात. तीर्थयात्रा इत्यादी पुष्कळशी साधने, योग, वैराग्य, ज्ञान-निपुणता,॥२॥

मूल (चौपाई)

नाना कर्म धर्म ब्रत दाना।
संजम दम जप तप मख नाना॥
भूत दया द्विज गुर सेवकाई।
बिद्या बिनय बिबेक बड़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारची कर्मे, धर्म, व्रत व दान, अनेक संयम, दम, जप, तप आणि यज्ञ, प्राण्यांवर दया, ब्राह्मण व गुरूंची सेवा, विद्या, विनय, विवेक यांचे आधिक्य इत्यादी॥३॥

मूल (चौपाई)

जहँ लगि साधन बेद बखानी।
सब कर फल हरि भगति भवानी॥
सो रघुनाथ भगति श्रुति गाई।
राम कृपाँ काहूँ एक पाई॥

अनुवाद (हिन्दी)

जी वेदांनी अनेक साधने सांगितली आहेत, हे भवानी, त्या सर्वांचे फल हरिभक्ती हेच आहे. हे श्रीरामांच्या कृपेने एखाद्यालाच मिळते, असे वेद सांगतात.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

मुनि दुर्लभ हरि भगति नर पावहिं बिनहिं प्रयास।
जे यह कथा निरंतर सुनहिं मानि बिस्वास॥१२६॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु जे मनुष्य विश्वास बाळगून ही कथा निरंतर ऐकतात, ते विनासायास मुनींना दुर्लभ अशीही हरिभक्ती प्राप्त करतात.॥१२६॥

मूल (चौपाई)

सोइ सर्बग्य गुनी सोइ ग्याता।
सोइ महि मंडित पंडित दाता॥
धर्म परायन सोइ कुल त्राता।
राम चरन जा कर मन राता॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याचे मन श्रीरामांच्या चरणी अनुरक्त आहे, तोच सर्वज्ञ, तोच गुणी, तोच ज्ञानी, तोच पृथ्वीचे भूषण, पंडित, दानी, तोच धर्मपरायण आणि कुलाचा रक्षक होय.॥१॥

मूल (चौपाई)

नीति निपुन सोइ परम सयाना।
श्रुति सिद्धांत नीक तेहिं जाना॥
सोइ कबि कोबिद सोइ रनधीरा।
जो छल छाड़ि भजइ रघुबीरा॥

अनुवाद (हिन्दी)

जो कपट सोडून श्रीरामांचे भजन करतो, तोच नीतीमध्ये निपुण, तोच परम बुद्धिमान होय. त्यानेच वेदांचे सिद्धांत चांगल्याप्रकारे जाणले आहेत. तोच कवी, तोच विद्वान आणि तोच रणधीर होय.॥२॥

मूल (चौपाई)

धन्य देस सो जहँ सुरसरी।
धन्य नारि पतिब्रत अनुसरी॥
धन्य सो भूपु नीति जो करई।
धन्य सो द्विज निज धर्म न टरई॥

अनुवाद (हिन्दी)

जिथे श्रीगंगा आहे, तो देश धन्य होय, जी पतिव्रता धर्माचे पालन करते, ती स्त्री धन्य होय, जो न्याय करतो, तो राजा धन्य होय आणि जो आपल्या धर्मापासून ढळत नाही, तो ब्राह्मण धन्य होय.॥ ३॥

मूल (चौपाई)

सो धन धन्य प्रथम गति जाकी।
धन्य पुन्य रत मति सोइ पाकी॥
धन्य घरी सोइ जब सतसंगा।
धन्य जन्म द्विज भगति अभंगा॥

अनुवाद (हिन्दी)

जे दान देण्यात खर्च होते, ते धन धन्य होय. जी पुण्याकडे लागते, तीच बुद्धी धन्य व परिपक्व होय. जेव्हा सत्संग घडतो, ती घडी धन्य होय आणि ज्यामध्ये ब्राह्मणाविषयी अखंड भक्ती असते, तोच जन्म धन्य होय.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सो कुल धन्य उमा सुनु जगत पूज्य सुपुनीत।
श्रीरघुबीर परायन जेहिं नर उपज बिनीत॥१२७॥

अनुवाद (हिन्दी)

हे उमा, ऐक. ज्या कुलात श्रीरघुवीरपरायण विनम्र पुरुष उत्पन्न होतो, ते कुल धन्य होय आणि जगासाठी ते पूज्य होय.॥१२७॥

मूल (चौपाई)

मति अनुरूप कथा मैं भाषी।
जद्यपि प्रथम गुप्त करि राखी॥
तव मन प्रीति देखि अधिकाई।
तब मैं रघुपति कथा सुनाई॥

अनुवाद (हिन्दी)

जरी ही कथा मी पूर्वी गुप्त ठेवली होती, तरी ती मी आपल्या बुद्धीप्रमाणे तुला सांगितली. जेव्हा मी तुझ्या मनात अधिक प्रेम आहे, असे पाहिले, तेव्हाच श्रीरघुनाथांची कथा तुला सांगितली.॥१॥

मूल (चौपाई)

यह न कहिअ सठही हठ सीलहि।
जो मन लाइ न सुन हरि लीलहि॥
कहिअ न लोभिहि क्रोधिहि कामिहि।
जो न भजइ सचराचर स्वामिहि॥

अनुवाद (हिन्दी)

जे मूर्ख असतील, धूर्त स्वभावाचे असतील आणि श्रीहरींची लीला मनःपूर्वक ऐकत नसतील, त्यांना ही कथा सांगू नये. जे लोभी, क्रोधी आणि कामी हे चराचराचे स्वामी असलेल्या श्रीरामांना भजत नाहीत, त्यांना ही कथा सांगू नये.॥२॥

मूल (चौपाई)

द्विज द्रोहिहि न सुनाइअ कबहूँ।
सुरपति सरिस होइ नृप जबहूँ॥
राम कथा के तेइ अधिकारी।
जिन्ह कें सत संगति अति प्यारी॥

अनुवाद (हिन्दी)

जरी तो देवराज इंद्रासमान ऐश्वर्यशाली राजा असला, परंतु ब्राह्मणांचा द्रोही असला, तरीही त्याला ही कथा ऐकवू नये. ज्यांना सत्संगती अत्यंत आवडते, तेच श्रीरामांच्या कथेचे अधिकारी आहेत.॥३॥

मूल (चौपाई)

गुर पद प्रीति नीति रत जेई।
द्विज सेवक अधिकारी तेई॥
ता कहँ यह बिसेष सुखदाई।
जाहि प्रानप्रिय श्रीरघुराई॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांना गुरूंच्या चरणी प्रेम आहे, जे नीतिपरायण आहेत आणि ब्राह्मणांचे सेवक आहेत, तेच या कथेचे अधिकारी असून त्यांनाच ही कथा सुख देते आणि तेच श्रीरघुनाथांना प्राणांसमान प्रिय असतात.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

राम चरन रति जो चह अथवा पद निर्बान।
भाव सहित सो यह कथा करउ श्रवन पुट पान॥१२८॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याला श्रीरामांच्या चरणी प्रेम हवे आहे किंवा मोक्षपद हवे आहे, त्याने हे कथारूपी अमृत प्रेमपूर्वक आपल्या कानरूपी द्रोणांतून प्यावे.॥१२८॥

मूल (चौपाई)

राम कथा गिरिजा मैं बरनी।
कलि मल समनि मनोमल हरनी॥
संसृति रोग सजीवन मूरी।
राम कथा गावहिं श्रुति सूरी॥

अनुवाद (हिन्दी)

हे गिरिजा, मी कलियुगातील पापांचा नाश करणाऱ्या आणि मनातील मलिनता दूर करणाऱ्या रामकथेचे वर्णन केले. ही रामकथा जन्ममरणरूपी रोगाच्या नाशासाठी संजीवनी मुळी आहे, असे वेद आणि विद्वान म्हणतात.॥१॥

मूल (चौपाई)

एहि महँ रुचिर सप्त सोपाना।
रघुपति भगति केर पंथाना॥
अति हरि कृपा जाहि पर होई।
पाउँ देइ एहिं मारग सोई॥

अनुवाद (हिन्दी)

यामध्ये सात पायऱ्या आहेत. त्या श्रीरघुनाथांची भक्ती प्राप्त करण्याचा मार्ग आहेत. ज्याच्यावर श्रीहरीची अत्यंत कृपा होते, तोच या मार्गावर पाऊल ठेवतो.॥२॥

मूल (चौपाई)

मन कामना सिद्धि नर पावा।
जे यह कथा कपट तजि गावा॥
कहहिं सुनहिं अनुमोदन करहीं।
ते गोपद इव भवनिधि तरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

जे कपट न ठेवता ही कथा गातात, त्यांची मनोकामना पूर्ण होते. जे ही सांगतात, ऐकतात आणि हिची प्रशंसा करतात, ते संसाररूपी समुद्राला गाईच्या खुरामुळे झालेल्या खड्ड्ॺाप्रमाणे सहज पार करून जातात.’॥३॥

मूल (चौपाई)

सुनि सब कथा हृदय अति भाई।
गिरिजा बोली गिरा सुहाई॥
नाथ कृपाँ मम गत संदेहा।
राम चरन उपजेउ नव नेहा॥

अनुवाद (हिन्दी)

याज्ञवल्क्य म्हणतात, ‘ही सर्व कथा ऐकून पार्वतीच्या मनाला फार आवडली. ती सुंदर वाणीने म्हणाली, ‘स्वामींच्या कृपेने माझा संशय निघून गेला आणि श्रीरामांच्या चरणी मला नवीन प्रेम उत्पन्न झाले.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

मैं कृतकृत्य भइउँ अब तव प्रसाद बिस्वेस।
उपजी राम भगति दृढ़ बीते सकल कलेस॥१२९॥

अनुवाद (हिन्दी)

हे विश्वनाथ, तुमच्या कृपेने आता मी कृतार्थ झाले. माझ्यामध्ये दृढ रामभक्ती उत्पन्न झाली आणि माझे सर्व क्लेश नष्ट झाले.’॥१२९॥

मूल (चौपाई)

यह सुभ संभु उमा संबादा।
सुख संपादन समन बिषादा॥
भव भंजन गंजन संदेहा।
जन रंजन सज्जन प्रिय एहा॥

अनुवाद (हिन्दी)

शिव-पार्वतींचा हा कल्याणकारी संवाद सुख देणारा आणि शोकाचा नाश करणारा आहे. तो जन्म-मरणाचा अंत करणारा, संशयांचा नाश करणारा, भक्तांना आनंद देणारा आणि संत पुरुषांना प्रिय असा आहे.॥१॥

मूल (चौपाई)

राम उपासक जे जग माहीं।
एहि सम प्रिय तिन्ह कें कछु नाहीं॥
रघुपति कृपाँ जथामति गावा।
मैं यह पावन चरित सुहावा॥

अनुवाद (हिन्दी)

जगामध्ये जितके म्हणून रामोपासक आहेत, त्यांना तर या रामकथेसमान काहीही प्रिय नाही. श्रीरघुनाथांच्या कृपेने मी हे सुंदर आणि पवित्र करणारे चरित्र आपल्या बुद्धीनुसार गायिले आहे.॥२॥

मूल (चौपाई)

एहिं कलिकाल न साधन दूजा।
जोग जग्य जप तप ब्रत पूजा॥
रामहि सुमिरिअ गाइअ रामहि।
संतत सुनिअ राम गुन ग्रामहि॥

अनुवाद (हिन्दी)

तुलसीदास म्हणतात, ‘या कलियुगात योग, यज्ञ, जप, तप, व्रत आणि पूजन इत्यादी कोणतेही दुसरे साधन नाही. बस्स. श्रीरामांचेच स्मरण, त्यांचेच गुण गाणे आणि निरंतर त्यांचेच गुणसमूह ऐकणे, एवढेच करावे.॥३॥

मूल (चौपाई)

जासु पतित पावन बड़ बाना।
गावहिं कबि श्रुति संत पुराना॥
ताहि भजहि मन तजि कुटिलाई।
राम भजें गति केहिं नहिं पाई॥

अनुवाद (हिन्दी)

पतितांना पवित्र करणे हा ज्यांचा बाणा प्रसिद्ध आहे, असे कवी, वेद, संत आणि पुराणे सांगतात, अरे मना, कुटिलता सोडून त्यांनाच भज. श्रीरामांना भजल्यामुळे कुणाला परम गती मिळाली नाही?॥४॥

छंद

मूल (दोहा)

पाई न केहिं गति पतित पावन राम भजि सुनु सठ मना।
गनिका अजामिल ब्याध गीध गजादि खल तारे घना॥
आभीर जमन किरात खस स्वपचादि अति अघरूप जे।
कहि नाम बारक तेपि पावन होहिं राम नमामि ते॥१॥

अनुवाद (हिन्दी)

अरे मूर्ख मना! ऐक. पतितांना पावन करणाऱ्या श्रीरामांना भजून कुणाला परम गती मिळाली नाही? गणिका, अजामेळ, व्याध, गिधाड, गज इत्यादी अनेक दुष्टांना त्यांनी तारले. आभीर, यवन, किरात, खस, चांडाळ इत्यादी जे अत्यंत पापरूपच आहेत, तेसुद्धा एकदा त्यांचे नाम घेऊन पवित्र होतात, त्या श्रीरामांना मी नमस्कार करतो.॥१॥

मूल (दोहा)

रघुबंस भूषन चरित यह नर कहहिं सुनहिं जे गावहीं।
कलि मल मनोमल धोइ बिनु श्रम राम धाम सिधावहीं॥
सत पंच चौपाईं मनोहर जानि जो नर उर धरै।
दारुन अबिद्या पंच जनित बिकार श्री रघुबर हरै॥२॥

अनुवाद (हिन्दी)

जे मनुष्य रघुवंशाचे भूषण श्रीराम यांचे हे चरित्र सांगतात, ऐकतात आणि गातात, ते कलियुगातील पापे आणि मनाची मलिनता धुऊन टाकून, विनासायास श्रीरामांच्या परमधामास जातात. जास्त काय, जे मनुष्य या रामचरित मानसामधील पाच-सात चौपायासुद्धा मनोहर मानून हृदयामध्ये धारण करतात, त्यांचेही पाच प्रकारच्या अविद्यांमुळे उत्पन्न झालेले विकार श्रीराम हरण करून घेतात.॥२॥

मूल (दोहा)

सुंदर सुजान कृपा निधान अनाथ पर कर प्रीति जो।
सो एक राम अकाम हित निर्बानप्रद सम आन को॥
जाकी कृपा लवलेस ते मतिमंद तुलसीदासहूँ।
पायो परम बिश्रामु राम समान प्रभु नाहीं कहूँ॥३॥

अनुवाद (हिन्दी)

परम सुंदर, सर्वज्ञ, कृपानिधान आणि अनाथांवर प्रेम करणारे, असे एक श्रीरामचंद्रच आहेत. त्यांच्यासारखा निष्काम भावनेने हित करणारा सुहृद आणि मोक्ष देणारा दुसरा कोण आहे? ज्यांच्या लेशमात्र कृपेमुळे मंदबुद्धीच्या तुलसीदासानेही परम शांती प्राप्त केली, त्या श्रीरामांसमान प्रभू कुठेही नाही.॥३॥

दोहा

मूल (दोहा)

मो सम दीन न दीन हित तुम्ह समान रघुबीर।
अस बिचारि रघुबंस मनि हरहु बिषम भव भीर॥१३० (क)॥

अनुवाद (हिन्दी)

हे रघुवीर, माझ्यासारखा दीन कोणी नाही आणि तुमच्यासारखा दीनांचे हित करणारा कोणी नाही. असा विचार करून हे रघुवंशशिरोमणी, माझे जन्म-मरणाचे भयानक दुःख हरण करा.॥१३०(क)॥

मूल (दोहा)

कामिहि नारि पिआरि जिमि लोभिहि प्रिय जिमि दाम।
तिमि रघुनाथ निरंतर प्रिय लागहु मोहि राम॥१३०(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे कामी पुरुषाला स्त्री प्रिय असते आणि लोभी मनुष्याला धन प्रिय वाटते, तसेच हे रघुनाथ, हे श्रीराम, तुम्ही मला निरंतर प्रिय वाटत रहा.॥१३०(ख)॥

श्लोक

मूल (दोहा)

यत्पूर्वं प्रभुणा कृतं सुकविना श्रीशम्भुना दुर्गमं
श्रीमद्रामपदाब्जभक्तिमनिशं प्राप्त्यै तु रामायणम्।
मत्वा तद्रघुनाथनामनिरतं स्वान्तस्तमःशान्तये
भाषाबद्धमिदं चकार तुलसीदासस्तथा मानसम्॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

श्रेष्ठ कवी भगवान शंकरांनी प्रथम ज्या दुर्लभ मानस-रामायणाची रचना श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांवर अनन्य भक्ती प्राप्त होण्यासाठी केली होती, ते मानस-रामायण श्रीरघुनाथांच्या नामामध्येच निरत आहे, हे जाणून तुलसीदासाने आपल्या अंतःकरणातील अंधकार नष्ट करण्यासाठी या ‘मानसा’ च्या रूपाने ते लोकभाषेत रचले.॥१॥

मूल (दोहा)

पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदं
मायामोहमलापहं सुविमलं प्रेमाम्बुपूरं शुभम्।
श्रीमद्रामचरित्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ये
ते संसारपतङ्गघोरकिरणैर्दह्यन्ति नो मानवाः॥२॥

अनुवाद (हिन्दी)

हे श्रीरामचरितमानस पुण्यरूप, पापांचे हरण करणारे, सदा कल्याणकारी, विज्ञान आणि भक्ती देणारे, माया, मोह आणि मल यांचा नाश करणारे, परम निर्मल प्रेमरूपी जलाने भरलेले आणि मंगलमय आहे. जे मनुष्य भक्तिपूर्वक या मानससरोवरात बुडी मारतात, त्यांना संसाररूपी सूर्याची अत्यंत प्रखर किरणे होरपळवीत नाहीत.॥ २॥