२२ भजन-महिमा

मूल (चौपाई)

रघुपति भगति सजीवन मूरी।
अनूपान श्रद्धा मति पूरी॥
एहि बिधिभलेहिं सो रोग नसाहीं।
नाहिं त जतन कोटि नहिं जाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांची भक्ती ही संजीवनी मुळी आहे. श्रद्धेने पूर्ण बुद्धी ही तिचे अनुपान आहे. अशाप्रकारे योग असेल, तर रोग कदाचित नष्ट होईल. नाहीतर कोटॺवधी प्रयत्नांनीही ते जात नाहीत.॥४॥

मूल (चौपाई)

जानिअ तब मन बिरुज गोसाँई।
जब उर बल बिराग अधिकाई॥
सुमति छुधा बाढ़इ नित नई।
बिषय आस दुर्बलता गई॥

अनुवाद (हिन्दी)

हे गोस्वामी, मन निरोगी झाले, असे तेव्हाच समजावे, जेव्हा मनामधील वैराग्याचे बल वाढेल, उत्तम बुद्धिरूपी भूक नित्य वाढत राहील आणि विषयांच्या विषयीची आशारूपी दुर्बळता नष्ट होईल.॥५॥

मूल (चौपाई)

बिमल ग्यानजल जब सो नहाई।
तब रह राम भगति उर छाई॥
सिव अज सुक सनकादिक नारद।
जे मुनि ब्रह्म बिचार बिसारद॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे सर्व रोगांपासून सुटका झाल्यावर जेव्हा मनुष्य निर्मल ज्ञानरूपी जलामध्ये स्नान करील, तेव्हा त्याच्या मनात रामभक्ती पसरेल. शिव, ब्रह्मदेव, शुकदेव, सनकादिक आणि नारद इत्यादी ब्रह्मविचारामध्ये जे अत्यंत निपुण असे मुनी आहेत,॥६॥

मूल (चौपाई)

सब कर मत खगनायक एहा।
करिअ राम पद पंकज नेहा॥
श्रुति पुरान सब ग्रंथ कहाहीं।
रघुपति भगति बिना सुख नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराजा, त्या सर्वांचे हेच मत आहे की, श्रीरामांच्या चरणकमलांची भक्ती केली पाहिजे. श्रुती, पुराण आणि सर्व ग्रंथ सांगतात की, श्रीरघुनाथांच्या भक्तीविना सुख नाही.॥७॥

मूल (चौपाई)

कमठ पीठ जामहिं बरु बारा।
बंध्या सुत बरु काहुहि मारा॥
फूलहिं नभ बरु बहुबिधि फूला।
जीव न लह सुख हरि प्रतिकूला॥

अनुवाद (हिन्दी)

कासवाच्या पाठीवर एखादे वेळी केस उगवतील, वांझेचा मुलगा एखादे वेळी कोणाला मारूनही टाकेल, आकाशात सुद्धा एखादे वेळी अनेक प्रकारची फुले उमलतील, परंतु श्रीहरींना विन्मुख होऊन जिवाला सुख कधीच मिळू शकणार नाही.॥८॥

मूल (चौपाई)

तृषा जाइ बरु मृगजल पाना।
बरु जामहिं सस सीस बिषाना॥
अंधकारु बरु रबिहि नसावै।
राम बिमुख न जीव सुख पावै॥

अनुवाद (हिन्दी)

मृगतृष्णेच्या पाण्याने कदाचित तहान भागली, सशाला शिंगे उगवली, अंधकाराने सूर्याचा नाश केला, अशा अशक्या गोष्टी झाल्या, तरी श्रीहरींना विन्मुख होऊन जिवाला सुख मिळू शकत नाही.॥९॥

मूल (चौपाई)

हिम ते अनल प्रगट बरु होई।
बिमुख राम सुख पाव न कोई॥

अनुवाद (हिन्दी)

कदाचित बर्फातून आग उत्पन्न झाली, तरीही श्रीहरींना विन्मुख होऊन कुणालाही सुख मिळू शकत नाही.॥१०॥

दोहा

मूल (दोहा)

बारि मथें घृत होइ बरु सिकता ते बरु तेल।
बिनु हरि भजन न भव तरिअ यह सिद्धांत अपेल॥१२२ (क)॥

अनुवाद (हिन्दी)

पाणी घुसळल्याने कदाचित तूप उत्पन्न होईल आणि वाळू घाण्यातून काढल्यास एखादे वेळी तेल निघेल, परंतु श्रीहरींच्या भजनाशिवाय संसाररूपी सागरातून तरून जाता येणार नाही, हा अटळ सिद्धांत आहे.॥१२२(क)॥

मूल (दोहा)

मसकहि करइ बिरंचि प्रभु अजहि मसक ते हीन।
अस बिचारि तजि संसय रामहि भजहिं प्रबीन॥१२२(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू हे कीटकाला ब्रह्मदेव बनवू शकतात आणि ब्रह्मदेवालाही कीटकाहून क्षुद्र करू शकतात. असा विचार करून चतुर पुरुष सर्व संशय सोडून श्रीहरींचे भजन करतात.॥१२२(ख)॥

श्लोक

मूल (दोहा)

विनिश्चितं वदामि ते न अन्यथा वचांसि मे।
हरिं नरा भजन्ति येऽतिदुस्तरं तरन्ति ते॥१२२(ग)॥

अनुवाद (हिन्दी)

मी तुला चांगल्याप्रकारे निश्चित केलेला सिद्धांत सांगतो. माझे वचन मिथ्या नाही. जे मनुष्य श्रीहरींचे भजन करतात, ते अत्यंतदुस्तर असा संसारसागर सहजपणे पार करतात.॥१२२(ग)॥

मूल (चौपाई)

कहेउँ नाथ हरि चरित अनूपा।
ब्यास समास स्वमति अनुरूपा॥
श्रुति सिद्धांत इहइ उरगारी।
राम भजिअ सब काज बिसारी॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, मी श्रीहरींचे अनुपम चरित्र आपल्या बुद्धीप्रमाणे काही ठिकाणी विस्ताराने तर काही ठिकाणी संक्षिप्तपणे सांगितले. हे गरुडा, श्रुतींचा हाच सिद्धांत आहे की, सर्व कामे सोडून देऊन श्रीरामांचे भजन केले पाहिजे.॥ १॥

मूल (चौपाई)

प्रभु रघुपति तजि सेइअ काही।
मोहि से सठ पर ममता जाही॥
तुम्ह बिग्यानरूप नहिं मोहा।
नाथ कीन्हि मो पर अति छोहा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांचे माझ्यासारख्या मूर्खावर सुद्धा प्रेम आहे, अशा प्रभू श्रीरामचंद्रांना सोडून इतर कुणाचे भजन करावे? तू ज्ञानरूप आहेस. तुला मोह नाही. तू तर माझ्यावर हे विचारून मोठी कृपा केलीस.॥२॥