२० मासपारायण, एकोणतिसावा विश्राम

मूल (दोहा)

भगति पच्छ हठ करि रहेउँ दीन्हि महारिषि साप।
मुनि दुर्लभ बर पायउँ देखहु भजन प्रताप॥११४(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

मी हट्टाने भक्तीच्या पक्षावर अडून राहिलो, त्यामुळे महर्षी लोमश यांनी मला शाप दिला, परंतु त्याचा परिणाम असा झाला की, मुनींनाही दुर्लभ असलेले वरदान मला मिळाले. भक्तीचा प्रताप कसा असतो, तो बघा.॥११४(ख)॥

मूल (चौपाई)

जे असि भगति जानि परिहरहीं।
केवल ग्यान हेतु श्रम करहीं॥
ते जड़ कामधेनु गृहँ त्यागी।
खोजत आकु फिरहिं पय लागी॥

अनुवाद (हिन्दी)

भक्तीचा असा महिमा जाणूनही जे लोक ती सोडून केवळ ज्ञानासाठी साधन करतात, ते मूर्ख घरी कामधेनू असताना, तिला सोडून दुधासाठी रुईचे झाड शोधत फिरतात.॥१॥

मूल (चौपाई)

सुनु खगेस हरि भगति बिहाई।
जे सुख चाहहिं आन उपाई॥
ते सठ महासिंधु बिनु तरनी।
पैरि पार चाहहिं जड़ करनी॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराज, जे लोक श्रीहरींची भक्ती सोडून दुसऱ्या उपायांनी सुख मिळवू इच्छितात, ते दुर्दैवी मूर्ख जहाजाविना पोहून जाऊन महासागर ओलांडून जाण्याची इच्छा बाळगतात.’॥२॥

मूल (चौपाई)

सुनि भसुंडि के बचन भवानी।
बोलेउ गरुड़ हरषि मृदु बानी॥
तव प्रसाद प्रभु मम उर माहीं।
संसय सोक मोह भ्रम नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीशिव म्हणतात, ‘हे भवानी, भुशुंडींचे बोलणे ऐकून गरुड आनंदाने कोमल शब्दांत म्हणाला, ‘हे प्रभो, तुमच्या प्रसादामुळे माझ्या मनातील संदेह, शोक, मोह आणि भ्रम यांपैकी काहीही राहिले नाही.॥३॥

मूल (चौपाई)

सुनेउँ पुनीत राम गुन ग्रामा।
तुम्हरी कृपाँ लहेउँ बिश्रामा॥
एक बात प्रभु पूँछउँ तोही।
कहहु बुझाइ कृपानिधि मोही॥

अनुवाद (हिन्दी)

मी तुमच्या कृपेमुळे श्रीरामांचे पवित्र गुणसमूह ऐकले आणि शांती प्राप्त केली. हे प्रभो, आता मी तुम्हांला आणखी एक गोष्ट विचारतो. हे कृपासागर, मला ती समजावून सांगा.॥४॥

मूल (चौपाई)

कहहिं संत मुनि बेद पुराना।
नहिं कछु दुर्लभ ग्यान समाना॥
सोइ मुनि तुम्ह सन कहेउ गोसाईं।
नहिं आदरेहु भगति की नाईं॥

अनुवाद (हिन्दी)

संत, मुनी, वेद आणि पुराणे असे म्हणतात की, ज्ञानासमान दुर्लभ काहीही नाही. हे गोस्वामी, तेच ज्ञान मुनींनी तुम्हांला सांगितले. परंतु तुम्ही भक्तीसारखा त्याला मान दिला नाही.॥५॥

मूल (चौपाई)

ग्यानहि भगतिहि अंतर केता।
सकल कहहु प्रभु कृपा निकेता॥
सुनि उरगारि बचन सुख माना।
सादर बोलेउ काग सुजाना॥

अनुवाद (हिन्दी)

हे कृपेचे धाम, हे प्रभो, ज्ञान आणि भक्ती यांमध्ये किती अंतर आहे, ते मला सांगा.’ गरुडाचे बोलणे ऐकून सुज्ञ काकभुशुंडी यांना समाधान वाटले आणि आदराने त्यांनी म्हटले,॥६॥

मूल (चौपाई)

भगतिहि ग्यानहि नहिं कछु भेदा।
उभय हरहिं भव संभव खेदा॥
नाथ मुनीस कहहिं कछु अंतर।
सावधान सोउ सुनु बिहंगबर॥

अनुवाद (हिन्दी)

‘भक्ती आणि ज्ञान यांमध्ये काहीही फरक नाही. दोन्हीही संसारापासून उत्पन्न क्लेश हरण करतात. हे गरुडा! मुनीश्वर यांत थोडेसे अंतर असल्याचे सांगतात. हे पक्षिश्रेष्ठा, ते लक्ष देऊन ऐक.॥७॥

मूल (चौपाई)

ग्यान बिराग जोग बिग्याना।
ए सब पुरुष सुनहु हरिजाना॥
पुरुष प्रताप प्रबल सब भाँती।
अबला अबल सहज जड़ जाती॥

अनुवाद (हिन्दी)

हे हरिवाहना, ज्ञान, वैराग्य, योग , विज्ञान हे सर्व पुुरुष आहेत. पुरुषाचा प्रताप सर्व तऱ्हेने प्रबळ असतो. अबला माया ही दुबळी व स्वभावतःच अज्ञानी असते.॥८॥

दोहा

मूल (दोहा)

पुरुष त्यागि सक नारिहि जो बिरक्त मति धीर।
न तु कामी बिषयाबस बिमुख जो पद रघुबीर॥११५(क)॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु जे वैराग्यवान आणि धीरबुद्धीचे पुरुष आहेत, तेच स्त्रीचा त्याग करू शकतात. कामी पुरुष करीत नाहीत. ते विषयांचे गुलाम असतात आणि श्रीरघुनाथांच्या चरणांपासून विन्मुख असतात.॥११५(क)॥

सोरठा

मूल (दोहा)

सोउ मुनि ग्याननिधान मृगनयनी बिधु मुख निरखि।
बिबस होइ हरिजान नारि बिष्नु माया प्रगट॥११५(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

ते ज्ञानाचे भांडार असलेले मुनीसुद्धा मृगनयना स्त्रीचा मुख-चंद्र पाहून लाचार होतात. हे गरुडा, प्रत्यक्ष भगवान विष्णूंची मायाच स्त्रीरूपाने प्रकट झालेली आहे.॥११५(ख)॥

मूल (चौपाई)

इहाँ न पच्छपात कछु राखउँ।
बेद पुरान संत मत भाषउँ॥
मोह न नारि नारि कें रूपा।
पन्नगारि यह रीति अनूपा॥

अनुवाद (हिन्दी)

हे मी काही पक्षपाताने सांगत नाही. वेद, पुराणे आणि संत यांचे मतच सांगतो. हे गरुडा, ही विलक्षण रीत आहे की, एका स्त्रीच्या रूपावर दुसरी स्त्री भाळून जात नाही.॥१॥

मूल (चौपाई)

माया भगति सुनहु तुम्ह दोऊ।
नारि बर्ग जानइ सब कोऊ॥
पुनि रघुबीरहि भगति पिआरी।
माया खलु नर्तकी बिचारी॥

अनुवाद (हिन्दी)

तू ऐकून घे. माया आणि भक्ती या दोन्ही स्त्रिया आहेत; हे सर्वांना माहीत आहे. शिवाय श्रीरघुवीरांना भक्ती प्रिय आहे. माया ही बिचारी निश्चितपणे नर्तकी आहे.॥२॥

मूल (चौपाई)

भगतिहि सानुकूल रघुराया।
ताते तेहि डरपति अति माया॥
राम भगति निरुपम निरुपाधी।
बसइ जासु उर सदा अबाधी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुवीर भक्तीला विशेष अनुकूल असतात. त्यामुळे माया तिला फार घाबरून असते. ज्याच्या हृदयात उपमारहित आणि उपाधिरहित विशुद्ध रामभक्ती सदा बिनधास्त वसत असते,॥३॥

मूल (चौपाई)

तेहि बिलोकि माया सकुचाई।
करि न सकइ कछु निज प्रभुताई॥
अस बिचारि जे मुनि बिग्यानी।
जाचहिं भगति सकल सुख खानी॥

अनुवाद (हिन्दी)

तिला पाहून माया ओशाळते. भक्तीवर ती आपला प्रभाव मुळीच पाडू शकत नाही. असा विचार करून जे ज्ञानी मुनी आहेत, तेसुद्धा सर्व सुखांची खाण असलेल्या भक्तीचीच याचना करतात.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

यह रहस्य रघुनाथ कर बेगि न जानइ कोइ।
जो जानइ रघुपति कृपाँ सपनेहुँ मोह न होइ॥११६(क)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांचे हे रहस्य कुणाला लवकर कळून येत नाही. श्रीरघुनाथांच्या कृपेने जो हे जाणतो, त्याला स्वप्नातही मोह होत नाही.॥११६(क)॥

मूल (दोहा)

औरउ ग्यान भगति कर भेद सुनहु सुप्रबीन।
जो सुनि होइ राम पद प्रीति सदा अबिछीन॥११६(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे बुद्धिमान गरुडा, ज्ञान आणि भक्तीमध्ये आणखीही अंतर ऐक. ते ऐकल्यावर श्रीरामांच्या चरणी सदा अविच्छिन्न प्रेम उत्पन्न होते.॥११६(ख)॥

मूल (चौपाई)

सुनहु तात यह अकथ कहानी।
समुझत बनइ न जाइ बखानी॥
ईस्वर अंस जीव अबिनासी।
चेतन अमल सहज सुख रासी॥

अनुवाद (हिन्दी)

हे तात, ही न सांगण्याजोगी गोष्ट ऐक. ही अनुभवानेच कळते. सांगता येत नाही. जीव हा ईश्वराचा अंश आहे. म्हणून तो अविनाशी, चेतन, निर्मल आणि स्वभावतःच सुखाची खाण आहे.॥१॥

मूल (चौपाई)

सो मायाबस भयउ गोसाईं।
बँध्यो कीर मरकट की नाईं॥
जड़ चेतनहि ग्रंथि परि गई।
जदपि मृषा छूटत कठिनई॥

अनुवाद (हिन्दी)

हे गोस्वामी, तो मायेत गुंतल्यामुळे पोपटाप्रमाणे किंवा माकडाप्रमाणे आपल्या आपणच बंदिस्त झालेला आहे. अशाप्रकारे जड आणि चेतन यांची गाठ पडली आहे. जरी ती गाठ मिथ्याच आहे, तरीही ती सुटण्यास कठीण आहे.॥२॥

मूल (चौपाई)

तब ते जीव भयउ संसारी।
छूट न ग्रंथि न होइ सुखारी॥
श्रुति पुरान बहु कहेउ उपाई।
छूट न अधिक अधिक अरुझाई॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हापासून जीव जन्मणारा-मरणारा असा झाला आहे. आता ती गाठ सुटत नाही आणि जीव सुखी होत नाही. वेदांनी व पुराणांनी पुष्कळ उपाय सांगितले आहेत, परंतु ती गाठ काही सुटत नाही, उलट अधिकाधिक गुंतत जाते.॥२॥

मूल (चौपाई)

जीव हृदयँ तम मोह बिसेषी।
ग्रंथि छूट किमि परइ न देखी॥
अस संजोग ईस जब करई।
तबहुँ कदाचित सो निरुअरई॥

अनुवाद (हिन्दी)

जीवाच्या हृदयामध्ये अज्ञानरूपी अंधकार विशेष रीतीने पसरलेला असतो, त्यामुळे ती गाठ दिसतच नाही. जेव्हा केव्हा परमेश्वर असा योग आणून देतो, तेव्हासुद्धा कदाचितच ती गाठ सुटू शकते.॥४॥

मूल (चौपाई)

सात्त्विक श्रद्धा धेनु सुहाई।
जौं हरि कृपाँ हृदयँ बस आई॥
जप तप ब्रत जम नियम अपारा।
जे श्रुति कह सुभ धर्म अचारा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीहरीच्या कृपेने जर सात्त्विक श्रद्धारूपी सुंदर गाय हृदयरूपी घरात येऊन राहिली; असंख्य जप, तप, व्रत, यम आणि नियम इत्यादी शुभ धर्म आणि आचार हे जे श्रुतींमध्ये सांगितले आहेत,॥५॥

मूल (चौपाई)

तेइ तृन हरित चरै जब गाई।
भाव बच्छ सिसु पाइ पेन्हाई॥
नोइ निबृत्ति पात्र बिस्वासा।
निर्मल मन अहीर निज दासा॥

अनुवाद (हिन्दी)

तेच धर्माचरणरूपी हिरवे गवत जर ती गाय चरेल आणि आस्तिक भावरूपी लहान वासराला पाहून तिला पान्हा फुटेल. सांसारिक विषयातून व प्रपंचातून निवृत्तीच्या दोरीने तिचे पाय बांधून धार काढण्याच्या विश्वासरूपी भांडॺात, निर्मल मनाचा, संयमी धार काढणारा गवळी असेल,॥६॥

मूल (चौपाई)

परम धर्ममय पय दुहि भाई।
अवटै अनल अकाम बनाई॥
तोष मरुत तब छमाँ जुड़ावै।
धृति सम जावनु देइ जमावै॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधू, अशाप्रकारे ताब्यात असलेल्या गाईचे परम धर्ममय दूध काढून ते निष्काम भावरूपी अग्नीवर चांगल्याप्रकारे तापवील, नंतर क्षमा व संतोषरूपी हवेने ते थंड करील आणि धैर्य व शमरूपी विरजणाने त्याचे दही लावील,॥७॥

मूल (चौपाई)

मुदिताँ मथै बिचार मथानी।
दम अधार रजु सत्य सुबानी॥
तब मथि काढ़ि लेइ नवनीता।
बिमल बिराग सुभग सुपुनीता॥

अनुवाद (हिन्दी)

मग प्रसन्नतारूपी डेऱ्यात तत्त्वविचाररूपी रवीने इंद्रियदमनाच्या खांबाच्या आधारे, सत्य व सुंदर वाणीरूपी दोरी लावून त्याला घुसळेल, मग त्यातून सुंदर आणि पवित्र वैराग्यरूपी लोणी काढून घेईल,॥८॥

दोहा

मूल (दोहा)

जोग अगिनि करि प्रगट तब कर्म सुभासुभ लाइ।
बुद्धि सिरावै ग्यान घृत ममता मल जरि जाइ॥११७(क)॥

अनुवाद (हिन्दी)

मग योगरूपी अग्नी तयार करून त्यात सर्व शुभाशुभ कर्मरूपी इंधन घालील, तर सर्व कर्मे त्यात जळून जातील. जेव्हा वैराग्यरूपी लोण्यातील ममतारूपी मळ जळून जाईल, तेव्हा उरलेले ज्ञानरूपी तूप निश्चयात्मक बुद्धीने थंड करील,॥११७(क)॥

मूल (दोहा)

तब बिग्यानरूपिनी बुद्धि बिसद घृत पाइ।
चित्त दिआ भरि धरै दृढ़ समता दिअटि बनाइ॥११७(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर विज्ञानरूप बुद्धीने ते ज्ञानरूपी निर्मल तूप मिळाल्यावर ते चित्तरूपी दिव्यात भरून समतारूपी तिवईवर तो घट्ट ठेवील.॥११७(ख)॥

मूल (दोहा)

तीनि अवस्था तीनि गुन तेहि कपास तें काढ़ि।
तूल तुरीय सँवारि पुनि बाती करै सुगाढ़ि॥११७(ग)॥

अनुवाद (हिन्दी)

जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था आणि सत्त्व, रज, तम या तीन गुणरूपी कापसातून तुरीयावस्थारूपी स्वच्छ कापूस काढून आणि नंतर तो चांगल्याप्रकारे वळून त्याची सुंदर घट्ट वात तयार करील,॥११७(ग)॥

सोरठा

मूल (दोहा)

एहि बिधि लेसै दीप तेज रासि बिग्यानमय।
जातहिं जासु समीप जरहिं मदादिक सलभ सब॥११७(घ)॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे तेजाची राशी असलेला विज्ञानमय दिवा लावील, ज्याच्या जवळ जाताच मद इत्यादी सर्व पतंग-कीटक जळून जातील,॥११७(घ)॥

मूल (चौपाई)

सोहमस्मि इति बृत्ति अखंडा।
दीप सिखा सोइ परम प्रचंडा॥
आतम अनुभव सुख सुप्रकासा।
तब भव मूल भेद भ्रम नासा॥

अनुवाद (हिन्दी)

‘सोऽहमस्मि’ तेच ब्रह्म मी आहे. ही वृत्ती तेलाच्या धारेसारखी अखंड राहील, तीच त्या ज्ञानदीपाची प्रचंड ज्वाळा होय. अशाप्रकारे आत्मानुभवाच्या सुखाचा सुंदर प्रकाश पसरेल, तेव्हा सर्व संसाराचे मूळ असणारा भेदरूपी भ्रम नष्ट होईल.॥१॥

मूल (चौपाई)

प्रबल अबिद्या कर परिवारा।
मोह आदि तम मिटइ अपारा॥
तब सोइ बुद्धि पाइ उँजिआरा।
उर गृहँ बैठि ग्रंथि निरुआरा॥

अनुवाद (हिन्दी)

आणि अत्यंत बलवान असलेल्या अविद्येचा परिवार असलेला अंधकार नाहीसा होईल. मग तीच विज्ञानरूपी बुद्धी आत्मानुभवाचा प्रकाश मिळाल्यावर हृदयरूपी घरात बसून ती जड-चेतनाची पडलेली गाठ सोडवते.॥२॥

मूल (चौपाई)

छोरन ग्रंथि पाव जौं सोई।
तब यह जीव कृतारथ होई॥
छोरत ग्रंथि जानि खगराया।
बिघ्न अनेक करइ तब माया॥

अनुवाद (हिन्दी)

जर ती विज्ञानरूपी बुद्धी ती गाठ सोडवू शकली, तर हा जीव कृतार्थ होईल. हे पक्षिराज गरुडा, गाठ सोडविली जात आहे, असे पाहून माया अनेक विघ्ने निर्माण करते.॥३॥

मूल (चौपाई)

रिद्धि सिद्धि प्रेरइ बहु भाई।
बुद्धिहि लोभ दिखावहिं आई॥
कल बल छल करि जाहिं समीपा।
अंचल बात बुझावहिं दीपा॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधू, ती पुष्कळशा ऋद्धि-सिद्धींना पाठवते. त्या येऊन बुद्धीला लोभ दाखवितात आणि त्या ऋद्धि-सिद्धी कला, बल व कपट करून जवळ जाऊन आपल्या पदराच्या वाऱ्याने तो ज्ञानरूपी दीपक विझवून टाकतात.॥४॥

मूल (चौपाई)

होइ बुद्धि जौं परम सयानी।
तिन्ह तन चितव न अनहित जानी॥
जौं तेहि बिघ्न बुद्धि नहिं बाधी।
तौ बहोरि सुर करहिं उपाधी॥

अनुवाद (हिन्दी)

जर बुद्धी ही शहाणी असेल तर त्या ऋद्धि-सिद्धी धोक्याच्या समजून त्यांच्याकडे पहातसुद्धा नाहीत. अशाप्रकारे जर मायेच्या विघ्नांमुळे बुद्धीला बाधा झाली नाही, तर मग देव विघ्ने आणतात.॥५॥

मूल (चौपाई)

इंद्री द्वार झरोखा नाना।
तहँ तहँ सुर बैठे करि थाना॥
आवत देखहिं बिषय बयारी।
ते हठि देहिं कपाट उघारी॥

अनुवाद (हिन्दी)

हृदयरूपी घराला इंद्रियांच्या द्वारांचे अनेक झरोके आहेत. त्या प्रत्येक झरोक्यावर देवांनी ठाण मांडले आहे. विषयरूपी हवा येत आहे, असे पहाताच ते देव जोराने दारे उघडतात.॥६॥

मूल (चौपाई)

जब सो प्रभंजन उर गृहँ जाई।
तबहिं दीप बिग्यान बुझाई॥
ग्रंथि न छूटि मिटा सो प्रकासा।
बुद्धि बिकल भइ बिषय बतासा॥

अनुवाद (हिन्दी)

तो जोराचा वारा हृदयरूपी घरात शिरतो, त्यासरशी तो विज्ञानरूपी दिवा विझतो. गाठ सुटत नाही आणि आत्मानुभवाचा प्रकाश नाहीसा होतो. विषयरूपी वाऱ्यामुळे बुद्धी व्याकूळ होते. केले-सवरलेले सर्व नष्ट होते.॥७॥

मूल (चौपाई)

इंद्रिन्ह सुरन्ह न ग्यान सोहाई।
बिषय भोग पर प्रीति सदाई॥
बिषय समीर बुद्धि कृत भोरी।
तेहि बिधि दीप को बार बहोरी॥

अनुवाद (हिन्दी)

इंद्रिये आणि त्यांचे देव यांना स्वभावतः हे चांगले वाटत नाही, कारण त्यांना विषय-भोगांविषयी नेहमी प्रेम वाटते. बुद्धीलाही विषयरूपी वाऱ्याने बावचळून टाकले की, मग पुन्हा तो ज्ञानदीप त्याचप्रकारे कोण उजळणार?॥८॥

दोहा

मूल (दोहा)

तब फिरि जीव बिबिधि बिधि पावइ संसृति क्लेस।
हरि माया अति दुस्तर तरि न जाइ बिहगेस॥११८(क)॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे ज्ञानदीप विझल्यावर मग अनेक प्रकारचे जन्म-मरणादी क्लेश जिवाला भोगावे लागतात. हे पक्षिराज, माया ही फार दुस्तर आहे. ती सहजासहजी तरून जाता येत नाही.॥११८(क)॥

मूल (दोहा)

कहत कठिन समुझत कठिन साधत कठिन बिबेक।
होइ घुनाच्छर न्याय जौं पुनि प्रत्यूह अनेक॥११८(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

ज्ञान हे समजावून सांगण्यास कठीण, समजण्यास कठीण आणि साध्य करण्यासही कठीण आहे. जर घुणाक्षरन्यायाने योगायोगाने कदाचित ते ज्ञान मिळाले, तरीही ते जतन करून ठेवण्यामध्ये अनेक विघ्ने आहेत.॥११८(ख)॥

मूल (चौपाई)

ग्यान पंथ कृपान कै धारा।
परत खगेस होइ नहिं बारा॥
जो निर्बिघ्न पंथ निर्बहई।
सो कैवल्य परम पद लहई॥

अनुवाद (हिन्दी)

ज्ञानाचा मार्ग हा दुधारी तलवारीच्या धारेसारखा आहे. हे पक्षिराज,या मार्गावरून अधःपतित होण्यास वेळ लागत नाही. जो या मार्गावरून निर्विघ्नपणे निभावून जातो, तोच मोक्षरूप असलेले परमपद प्राप्त करतो.॥१॥

मूल (चौपाई)

अति दुर्लभ कैवल्य परम पद।
संत पुरान निगम आगम बद॥
राम भजत सोइ मुकुति गोसाईं।
अनइच्छित आवइ बरिआईं॥

अनुवाद (हिन्दी)

संत, पुराणे, वेद आणि तंत्रादी सर्व हेच सांगतात की, कैवल्यरूप परमपद हे अत्यंत दुर्लभ आहे, परंतु हे गोस्वामी, ती अत्यंत दुर्लभ अशी मुक्ती श्रीरामांची भक्ती केल्यावर इच्छा नसताही जबरदस्तीने येते.॥२॥

मूल (चौपाई)

जिमि थल बिनु जल रहि न सकाई।
कोटि भाँति कोउ करै उपाई॥
तथा मोच्छ सुख सुनु खगराई।
रहि न सकइ हरि भगति बिहाई॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे कुणी कितीही उपाय केले, तरीसुद्धा जमिनीशिवाय पाणी साठून रहात नाही, तसेच हे पक्षिराज, मोक्षसुखसुद्धा श्रीहरीच्या भक्तीशिवाय राहू शकत नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

अस बिचारि हरि भगत सयाने।
मुक्ति निरादर भगति लुभाने॥
भगति करत बिनु जतन प्रयासा।
संसृति मूल अबिद्या नासा॥

अनुवाद (हिन्दी)

असा विचार करून हरिभक्त हे भक्तीवर लुब्ध होऊन मुक्तीचा तिरस्कार करतात. भक्ती केल्याने जन्म-मृत्युरूप संसाराचे मूळ असलेली अविद्या प्रयत्न व परिश्रमाविना आपोआप अशी नष्ट होते,॥४॥

मूल (चौपाई)

भोजन करिअ तृपिति हित लागी।
जिमि सो असन पचवै जठरागी॥
असि हरि भगति सुगम सुखदाई।
को अस मूढ़ न जाहि सोहाई॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे तृप्तीसाठी भोजन केले जाते आणि ते भोजन आपण प्रयत्न न करताही जठराग्नी आपोआप पचवून टाकतो. अशी परमसुख देणारी हरिभक्ती ही ज्याला आवडत नाही, असा मूर्ख कोण असेल?॥५॥

दोहा

मूल (दोहा)

सेवक सेब्य भाव बिनु भव न तरिअ उरगारि।
भजहु राम पद पंकज अस सिद्धांत बिचारि॥११९(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हे गरुडा, मी सेवक आहे आणि भगवान माझे स्वामी आहेत, या भावनेशिवाय संसाररूपी समुद्र तरून जाणे शक्य नाही. या सिद्धांताचा विचार करून श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांचे भजन कर.॥११९(क)॥

मूल (दोहा)

जो चेतन कहँ जड़ करइ जड़हि करइ चैतन्य।
अस समर्थ रघुनायकहि भजहिं जीव ते धन्य॥११९(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

जे चेतनाला जड करतात आणि जडाला चेतन करतात, अशा समर्थ श्रीरघुनाथांना जे जीव भजतात, ते धन्य होत.॥११९(ख)॥

मूल (चौपाई)

कहेउँ ग्यान सिद्धांत बुझाई।
सुनहु भगति मनि कै प्रभुताई॥
राम भगति चिंतामनि सुंदर।
बसइ गरुड़ जाके उर अंतर॥

अनुवाद (हिन्दी)

येथवर मी ज्ञानाचा सिद्धांत समजावून दिला. आता भक्तिरूपी रत्नाचा महिमा ऐक. श्रीरामांची भक्ती ही सुंदर चिंतामणी आहे. हे गरुडा, ही ज्याच्या हृदयात वसते,॥१॥

मूल (चौपाई)

परम प्रकास रूप दिन राती।
नहिं कछु चहिअ दिआ घृत बाती॥
मोह दरिद्र निकट नहिं आवा।
लोभ बात नहिं ताहि बुझावा॥

अनुवाद (हिन्दी)

तो रात्रंदिवस स्वतःच परम प्रकाशरूप असतो. त्याला दिवा, तूप आणि वात हे काहीही नको. अशाप्रकारे रत्नाचा एक तर स्वाभाविक प्रकाश असतो. शिवाय मोहरूपी दारिद्रॺ जवळ फिरकत नाही, कारण रत्न हे स्वतःच धनरूप आहे आणि तिसरे म्हणजे, लोभरूपी वारा त्या रत्नरूप दिव्याला विझवू शकत नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रबल अबिद्या तम मिटि जाई।
हारहिं सकल सलभ समुदाई॥
खल कामादि निकट नहिं जाहीं।
बसइ भगति जाके उर माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच्या प्रकाशाने अविद्येचा प्रबळ अंधकार नाहीसा होतो. मद इत्यादी पतंग—कीटकांचा संपूर्ण थवा पराभूत होतो. ज्याच्या हृदयात भक्ती रहाते, त्याच्याजवळ काम, क्रोध आणि लोभ इत्यादी दुष्ट येत नाहीत.॥३॥

मूल (चौपाई)

गरल सुधासम अरि हित होई।
तेहि मनि बिनु सुख पाव न कोई॥
ब्यापहिं मानस रोग न भारी।
जिन्ह के बस सब जीव दुखारी॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच्यासाठी विष हे अमृत आणि शत्रू हे मित्र बनतात. त्या रत्नाविना कुणालाही सुख मिळत नाही. मोठमोठॺा ज्या मानसिक रोगांमुळे सर्व जीव दुःखी होतात, ते रोग त्याला व्यापत नाहीत.॥४॥

मूल (चौपाई)

राम भगति मनि उर बस जाकें।
दुख लवलेस न सपनेहुँ ताकें॥
चतुर सिरोमनि तेइ जग माहीं।
जे मनि लागि सुजतन कराहीं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामभक्तिरूपी रत्न ज्याच्या हृदयात असते, त्याला स्वप्नातही लेशमात्र दुःख होत नाही. जगात जे त्या भक्तिरूपी रत्नासाठी खूप प्रयत्न करतात, तेच लोक अत्यंत चतुर होत.॥५॥

मूल (चौपाई)

सो मनि जदपि प्रगट जग अहई।
राम कृपा बिनु नहिं कोउ लहई॥
सुगम उपाय पाइबे केरे।
नर हतभाग्य देहिं भट भेरे॥

अनुवाद (हिन्दी)

जरी ते रत्न जगात प्रत्यक्ष आहे, तरी श्रीरामांच्या कृपेविना कुणाला ते मिळू शकत नाही. ते मिळविण्याचा उपायसुद्धा सुगम आहे, परंतु भाग्यहीन मनुष्य तो सोडून देतात.॥६॥

मूल (चौपाई)

पावन पर्बत बेद पुराना।
राम कथा रुचिराकर नाना॥
मर्मी सज्जन सुमति कुदारी।
ग्यान बिराग नयन उरगारी॥

अनुवाद (हिन्दी)

वेद-पुराण हे पवित्र पर्वत आहेत. श्रीरामांच्या नाना प्रकारच्या कथा या त्या पर्वतावरील सुंदर खाणी आहेत. संत पुरुष या खाणीचे रहस्य जाणतात आणि सुंदर बुद्धी ही खोदण्यासाठी कुदळ आहे. हे गरुडा, ज्ञान आणि वैराग्य- हे दोन त्यांचे नेत्र आहेत.॥७॥

मूल (चौपाई)

भाव सहित खोजइ जो प्रानी।
पाव भगति मनि सब सुख खानी॥
मोरें मन प्रभु अस बिस्वासा।
राम ते अधिक राम कर दासा॥

अनुवाद (हिन्दी)

जो जीव प्रेमाने शोधतो, त्याला सर्व सुखांची खाण असलेले हे भक्तिरूपी रत्न सापडते. हे प्रभो, माझ्या मनात असा विश्वास आहे की, श्रीरामांचे दास हे श्रीरामांपेक्षा मोठे आहेत.॥८॥

मूल (चौपाई)

राम सिंधु घन सज्जन धीरा।
चंदन तरु हरि संत समीरा॥
सब कर फल हरि भगति सुहाई।
सो बिनु संत न काहूँ पाई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्र हे समुद्र आहेत, तर धीर संत पुरुष मेघ होत. श्रीहरी चंदनाचे वृक्ष आहेत, तर संत हे पवन आहेत. सर्व साधनांचे फल सुंदर हरिभक्ती हेच आहे. संतांविना कुणाला ते मिळाले नाही.॥९॥

मूल (चौपाई)

अस बिचारि जोइ कर सतसंगा।
राम भगति तेहि सुलभ बिहंगा॥

अनुवाद (हिन्दी)

असा विचार करून जो कोणी संतांची संगती करतो, हे गरुडा, त्याला श्रीरामांची भक्ती सुलभ असते.॥१०॥

दोहा

मूल (दोहा)

ब्रह्म पयोनिधि मंदर ग्यान संत सुर आहिं।
कथा सुधा मथि काढ़हिं भगति मधुरता जाहिं॥१२०(क)॥

अनुवाद (हिन्दी)

वेद हे समुद्र आहेत, ज्ञान हे मंदराचल आहे आणि संत हे देव आहेत. देव त्या समुद्राचे मंथन करून कथारूपी अमृत काढतात. त्यात भक्तिरूपी माधुर्य वसत असते.॥१२०(क)॥

मूल (दोहा)

बिरति चर्म असि ग्यान मद लोभ मोह रिपु मारि।
जय पाइअ सो हरि भगति देखु खगेस बिचारि॥१२०(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

वैराग्यरूपी ढालीने स्वतःचा बचाव करीत आणि ज्ञानरूपी तलवारीने मद, लोभ आणि मोहरूपी वैऱ्यांना मारून जी विजय मिळविते, ती हरिभक्तीच होय. हे पक्षिराजा, याचा विचार करून बघ.’॥१२०(ख)॥