१८ काकभुशुंडीचे लोमशाकडे जाणे आणि शाप व अनुग्रह मिळविणे

दोहा

मूल (दोहा)

गुर के बचन सुरति करि राम चरन मनु लाग।
रघुपति जस गावत फिरउँ छन छन नव अनुराग॥११०(क)॥

अनुवाद (हिन्दी)

गुरूंच्या वचनांचे स्मरण केल्याने माझे मन श्रीरामांच्या चरणी लागले. प्रत्येक क्षणी मला नवनवीन प्रेम प्राप्त होत गेले आणि मी श्रीरघुनाथांची कीर्ती गात फिरू लागलो.॥११०(क)॥

मूल (दोहा)

मेरु सिखर बट छायाँ मुनि लोमस आसीन।
देखि चरन सिरु नायउँ बचन कहेउँ अति दीन॥११०(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

सुमेरू पर्वताच्या शिखरावर वडाच्या सावलीत लोमश मुनी बसले होते. त्यांना पाहून मी प्रणाम केला आणि अत्यंत दीनपणे म्हणालो.॥११०(ख)॥

मूल (दोहा)

सुनि मम बचन बिनीत मृदु मुनि कृपाल खगराज।
मोहि सादर पूँछत भए द्विज आयहु केहि काज॥११०(ग)॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराज, माझे अत्यंत नम्र व कोमल बोलणे ऐकून मुनी मला आदराने विचारू लागले, ‘हे ब्राह्मणा, तू कोणत्या कामासाठी येथे आला आहेस?’॥११०(ग)॥

मूल (दोहा)

तब मैं कहा कृपानिधि तुम्ह सर्बग्य सुजान।
सगुन ब्रह्म अवराधन मोहि कहहु भगवान॥११०(घ)॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा मी म्हणालो, ‘हे कृपानिधी, तुम्ही सर्वज्ञ आहात आणि सुज्ञ आहात. हे भगवन, मला सगुण ब्रह्माच्या आराधनेची रीत सांगा.’॥११०(घ)॥

मूल (चौपाई)

तब मुनीस रघुपति गुन गाथा।
कहे कछुक सादर खगनाथा॥
ब्रह्मग्यान रत मुनि बिग्यानी।
मोहि परम अधिकारी जानी॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा हे गरुडा, मुनीश्वरांनी श्रीरघुनाथांच्या गुणांच्या काही कथा आदराने मला सांगितल्या. मग ते ब्रह्मज्ञानपरायण व विज्ञानवान मुनी मला मोठा अधिकारी समजून,॥१॥

मूल (चौपाई)

लागे करन ब्रह्म उपदेसा।
अज अद्वैत अगुन हृदयेसा॥
अकल अनीह अनाम अरूपा।
अनुभव गम्य अखंड अनूपा॥

अनुवाद (हिन्दी)

ब्रह्माविषयी उपदेश देऊ लागले की, ब्रह्म जन्मरहित, अद्वैत, निर्गुण आणि अंतर्यामी आहे. बुद्धीने कोणी त्याला मापू शकत नाही. ते इच्छारहित, नामरहित, रूपरहित, अनुभवाने जाणण्याजोगे, अखंड व उपमारहित आहे.॥२॥

मूल (चौपाई)

मन गोतीत अमल अबिनासी।
निर्बिकार निरवधि सुख रासी॥
सो तैं ताहि तोहि नहिं भेदा।
बारि बीचि इव गावहिं बेदा॥

अनुवाद (हिन्दी)

ते मन आणि इंद्रिये यांच्या पलीकडचे, निर्मल, विनाशरहित, निर्विकार, सीमारहित आणि सुखाची खाण आहे. वेद म्हणतात की, ‘तेच तू आहेस.’ जल आणि जलाच्या तरंगाप्रमाणे तुझ्यात व त्याच्यात कोणताही फरक नाही.’॥३॥

मूल (चौपाई)

बिबिधि भाँति मोहि मुनि समुझावा।
निर्गुन मत मम हृदयँ न आवा॥
पुनि मैं कहेउँ नाइ पद सीसा।
सगुन उपासन कहहु मुनीसा॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींनी मला अनेक प्रकारे समजावून सांगितले, परंतु निर्गुण मत माझ्या मनात ठसत नव्हते. मग मी मुनींच्या चरणी मस्तक नमवून म्हटले, ‘हे मुनीश्वर, मला सगुण ब्रह्माच्या उपासनेसंबंधी सांगा.॥४॥

मूल (चौपाई)

राम भगति जल मम मन मीना।
किमि बिलगाइ मुनीस प्रबीना॥
सोइ उपदेस कहहु करि दाया।
निज नयनन्हि देखौं रघुराया॥

अनुवाद (हिन्दी)

माझे मन श्रीरामभक्तिरूपी जलातील मासोळीप्रमाणे तिच्यातच रमते. हे चतुर मुनीश्वरा, अशा अवस्थेमध्ये ते तिच्यापासून वेगळे कसे होऊ शकेल? तुम्ही दया करून मला तोच उपाय सांगा. त्यामुळे मी श्रीरघुनाथांना आपल्या डोळ्यांनी पाहू शकेन.॥५॥

मूल (चौपाई)

भरि लोचन बिलोकि अवधेसा।
तब सुनिहउँ निर्गुन उपदेसा॥
मुनि पुनि कहि हरिकथा अनूपा।
खंडि सगुन मत अगुन निरूपा॥

अनुवाद (हिन्दी)

प्रथम मला डोळे भरून श्रीअयोध्यानाथांना पाहू द्या. मग निर्गुणाचा उपदेश ऐकेन.’ मग मुनींनी अनुपम हरिकथा सांगून सगुण मताचे खंडन करून निर्गुण मताचे निरूपण केले.॥६॥

मूल (चौपाई)

तब मैं निर्गुन मत कर दूरी।
सगुन निरूपउँ करि हठ भूरी॥
उत्तर प्रतिउत्तर मैं कीन्हा।
मुनि तन भए क्रोध के चीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा मी निर्गुण मताचे खंडन करून आग्रहपूर्वक सगुणाचे निरूपण करू लागलो. मी उत्तर-प्रत्युत्तर केले. त्यामुळे मुनींच्या चेहऱ्यावर क्रोधाची चिन्हे उत्पन्न झाली.॥७॥

मूल (चौपाई)

सुनु प्रभु बहुत अवग्या किएँ।
उपज क्रोध ग्यानिन्ह के हिएँ॥
अति संघरषन जौं कर कोई।
अनल प्रगट चंदन ते होई॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे गरुडा, ऐकून घे. मोठा अपमान झाल्यावर ज्ञात्याच्या हृदयामध्येही क्रोध उत्पन्न होतो. जर चंदनाचे लाकूड फार घासले, तर त्यापासूनही अग्नी प्रकट होतो.’॥८॥

दोहा

मूल (दोहा)

बारंबार सकोप मुनि करइ निरूपन ग्यान।
मैं अपने मन बैठ तब करउँ बिबिधि अनुमान॥१११(क)॥

अनुवाद (हिन्दी)

मुनी रागारागाने वारंवार ज्ञानाचे निरूपण करू लागले. मग मी बसल्या बसल्या आपल्या मनात अनेक प्रकारचे अनुमान करू लागलो.॥१११(क)॥

मूल (दोहा)

क्रोध कि द्वैतबुद्धि बिनु द्वैत कि बिनु अग्यान।
मायाबस परिछिन्न जड़ जीव कि ईस समान॥१११(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

द्वैतबुद्धीविना क्रोध कसा येईल? आणि अज्ञानाविना द्वैतबुद्धी निर्माण होऊ शकते काय? मायेच्या अधीन असलेला परिच्छिन्न जड जीव ईश्वरासमान होऊ शकेल काय?॥१११(ख)॥

मूल (चौपाई)

कबहुँ कि दुख सबकर हित ताकें।
तेहि कि दरिद्र परस मनि जाकें॥
परद्रोही की होहिं निसंका।
कामी पुनि कि रहहिं अकलंका॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांचे हित व्हावे, अशी इच्छा झाल्यास कधी कुणाला दुःख होऊ शकेल काय? ज्याच्याजवळ परीस आहे, त्याच्याजवळ दारिद्रॺ कसे राहू शकेल? दुसऱ्याचा द्रोह करणारे निर्भय होऊ शकतील काय? आणि कामी मनुष्य कलंकरहित राहू शकतील काय?॥१॥

मूल (चौपाई)

बंस कि रह द्विज अनहित कीन्हें।
कर्म कि होहिं स्वरूपहि चीन्हें॥
काहू सुमति कि खल सँग जामी।
सुभ गति पाव कि परत्रिय गामी॥

अनुवाद (हिन्दी)

ब्राह्मणाचे वाईट केल्याने वंश राहू शकेल काय? आत्मज्ञान झाल्यावर आसक्तिपूर्ण कर्मे होऊ शकतील काय? दुष्टांच्या संगतीमुळे कुणाला सुबुद्धी येईल काय? परस्त्रीगमन करणाऱ्या पुरुषाला उत्तम गती मिळू शकेल काय?॥२॥

मूल (चौपाई)

भव कि परहिं परमात्मा बिंदक।
सुखी कि होहिं कबहुँ हरि निंदक॥
राजु कि रहइ नीति बिनु जानें।
अघ कि रहहिं हरिचरित बखानें॥

अनुवाद (हिन्दी)

परमात्म्याला जाणणारे कधी जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडू शकतील काय? भगवंतांची निंदा करणारा कधी सुखी होऊ शकेल काय? नीती न जाणता राज्य राहू शकेल काय? श्रीहरीच्या चरित्राचे वर्णन केल्यावर पाप राहू शकेल काय?॥३॥

मूल (चौपाई)

पावन जस कि पुन्य बिनु होई।
बिनु अघ अजस कि पावइ कोई॥
लाभुकि किछु हरिभगति समाना।
जेहि गावहिं श्रुति संत पुराना॥

अनुवाद (हिन्दी)

पुण्याविना पवित्र कीर्ती मिळू शकते काय? पापाविना कुठे कुणाला अपकीर्ती मिळते काय? जिचा महिमा वेद, संत आणि पुराणे गातात, त्या हरि-भक्तीसमान दुसरा कुठला लाभ आहे काय?॥४॥

मूल (चौपाई)

हानिकि जग एहि सम किछु भाई।
भजिअ न रामहि नर तनु पाई॥
अघ कि पिसुनता सम कछु आना।
धर्म कि दया सरिस हरिजाना॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधू, जगात मनुष्याचे शरीर मिळूनही श्रीरामांचे भजन केले नाही, तर या जगात यासारखी दुसरी कोणती हानी आहे? चहाडी करण्यासमान दुसरे कोणते पाप आहे? आणि हे गरुडा, दयेसमान दुसरा कोणता धर्म आहे?॥५॥

मूल (चौपाई)

एहि बिधि अमिति जुगुति मन गुनऊँ।
मुनि उपदेस न सादर सुनऊँ॥
पुनि पुनि सगुन पच्छ मैं रोपा।
तब मुनि बोलेउ बचन सकोपा॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे मी अगणित युक्त्यांचा विचार मनात करीत होतो आणि आदरपूर्वक मुनींचा उपदेश ऐकत नव्हतो. जेव्हा मी वारंवार सगुणाचा पक्ष मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मुनी क्रोधाने म्हणाले,॥६॥

मूल (चौपाई)

मूढ़ परम सिख देउँ न मानसि।
उत्तर प्रतिउत्तर बहु आनसि॥
सत्य बचन बिस्वास न करही।
बायस इव सबही ते डरही॥

अनुवाद (हिन्दी)

‘अरे मूढा, मी तुला सर्वोत्तम शिकवण देत आहे, तरीही तू ती मानत नाहीस आणि प्रत्युत्तर देत आहेस. माझ्या सत्य बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीस. कावळ्याप्रमाणे सर्वांना घाबरतोस.॥७॥

मूल (चौपाई)

सठ स्वपच्छ तव हृदयँ बिसाला।
सपदि होहि पच्छी चंडाला॥
लीन्ह श्राप मैं सीस चढ़ाई।
नहिं कछु भय न दीनता आई॥

अनुवाद (हिन्दी)

अरे मूर्खा, तुझ्या मनात आपल्या पक्षाचा फार मोठा हट्ट आहे, म्हणून तू लागलीच चांडाळ पक्षी कावळा हो.’ मी मुनींचा शाप शिरसावंद्य मानला. त्यामुळे मला काहीही भीती वाटली नाही किंवा दैन्यही वाटले नाही.॥८॥

दोहा

मूल (दोहा)

तुरत भयउँ मैं काग तब पुनि मुनि पद सिरु नाइ।
सुमिरि राम रघुबंस मनि हरषित चलेउँ उड़ाइ॥११२(क)॥

अनुवाद (हिन्दी)

मी त्याचक्षणी कावळा झालो. मग मुनींच्या चरणी नमस्कार करून आणि रघुकुलशिरोमणी श्रीरामांचे स्मरण करीत आनंदाने उडत निघालो.॥११२(क)॥

मूल (दोहा)

उमा जे राम चरन रत बिगत काम मद क्रोध।
निज प्रभुमय देखहिं जगत केहि सन करहिं बिरोध॥११२(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीशिव म्हणतात, ‘हे उमा, श्रीरामांच्या चरणांचे जे भक्त आहेत आणि काम, अभिमान आणि क्रोधाने जे रहित आहेत, त्यांना जग हे आपल्या प्रभूंनी भरलेले आहे, असे दिसते. मग ते कुणाशी कशाला वैर करतील?’॥११२(ख)॥

मूल (चौपाई)

सुनु खगेस नहिं कछु रिषि दूषन।
उर प्रेरक रघुबंस बिभूषन॥
कृपासिंधु मुनि मति करि भोरी।
लीन्ही प्रेम परिच्छा मोरी॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडी म्हणाले, हे गरुडा, यामध्ये ऋषींचा काहीही दोष नव्हता. रघुवंशविभूषण श्रीरामच सर्वांना प्रेरणा देणारे आहेत. कृपासागर प्रभूंनीच मुनींच्या बुद्धीला चकवून माझ्या प्रेमाची परीक्षा घेतली होती.॥१॥

मूल (चौपाई)

मन बच क्रम मोहि निज जन जाना।
मुनि मति पुनि फेरी भगवाना॥
रिषि मम महत सीलता देखी।
राम चरन बिस्वास बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

कायावाचामनाने जेव्हा प्रभूंनी मला आपला दास असल्याचे मानले, तेव्हा भगवंतांनी मुनींची बुद्धी फिरवली. ऋषींनी माझा महान पुरुषांसारखा धैर्य, अक्रोध व विनय इत्यादींनी भरलेला स्वभाव पाहिला आणि श्रीरामांच्या चरणी दृढ विश्वास आहे, असे पाहिले,॥२॥

मूल (चौपाई)

अति बिसमय पुनि पुनि पछिताई।
सादर मुनि मोहि लीन्ह बोलाई॥
मम परितोष बिबिधि बिधि कीन्हा।
हरषित राममंत्र तब दीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा मुनींनी मोठॺा दुःखाने वारंवार पश्चात्ताप व्यक्त करीत मला आदराने बोलावले. त्यांनी अनेक प्रकारे मला संतुष्ट केले आणि मग आनंदाने मला राममंत्र दिला.॥३॥

मूल (चौपाई)

बालकरूप राम कर ध्याना।
कहेउ मोहि मुनि कृपानिधाना॥
सुंदर सुखद मोहि अति भावा।
सो प्रथमहिं मैं तुम्हहि सुनावा॥

अनुवाद (हिन्दी)

कृपानिधान मुनींनी मला बालकरूप श्रीरामांच्या ध्यानाची पद्धत सांगितली. सुंदर आणि सुख देणारे ते ध्यान मला फारच आवडले. ते ध्यान मी तुला पूर्वीच ऐकविले आहे.॥४॥

मूल (चौपाई)

मुनि मोहि कछुक काल तहँ राखा।
रामचरितमानस तब भाषा॥
सादर मोहि यह कथा सुनाई।
पुनि बोले मुनि गिरा सुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींनी काही काळ मला तेथे आपल्याजवळ ठेवून घेतले. तेव्हा त्यांनी रामचरितमानसाचे वर्णन करून सांगितले. आदराने मला ती कथा सांगून, मग मुनी मला सुंदर वाणीने म्हणाले,॥५॥

मूल (चौपाई)

रामचरित सर गुप्त सुहावा।
संभु प्रसाद तात मैं पावा॥
तोहि निज भगत राम कर जानी।
ताते मैं सब कहेउँ बखानी॥

अनुवाद (हिन्दी)

‘वत्सा! हे सुंदर व गुप्त रामचरितमानस मला श्रीशिवांच्या कृपेने मिळाले होते. तुला श्रीरामांचा ‘निज भक्त’ असल्याचे पाहिले, म्हणून मी तुला संपूर्ण चरित्र विस्ताराने सांगितले.॥६॥

मूल (चौपाई)

राम भगति जिन्ह कें उर नाहीं।
कबहुँ न तात कहिअ तिन्ह पाहीं॥
मुनि मोहि बिबिधि भाँति समुझावा।
मैं सप्रेम मुनि पद सिरु नावा॥

अनुवाद (हिन्दी)

हे वत्सा! ज्याच्या हृदयात श्रीरामांची भक्ती नाही, त्याच्यासमोर हे चरित्र कधीही सांगू नये.’ मुनींनी अनेक प्रकारे मला समजावून दिले. तेव्हा मी प्रेमाने मुनींच्या चरणी प्रणाम केला.॥७॥

मूल (चौपाई)

निज करकमल परसि मम सीसा।
हरषित आसिष दीन्ह मुनीसा॥
राम भगति अबिरल उर तोरें।
बसिहि सदा प्रसाद अब मोरें॥

अनुवाद (हिन्दी)

मुनीश्वरांनी आपल्या करकमलांनी माझ्या मस्तकाला स्पर्श करून मोठॺा आनंदाने आशीर्वाद दिला की, ‘आता माझ्या कृपेने तुझ्या हृदयात नेहमी प्रगाढ रामभक्ती राहील.॥८॥

दोहा

मूल (दोहा)

सदा राम प्रिय होहु तुम्ह सुभ गुन भवन अमान।
कामरूप इच्छामरन ग्यान बिराग निधान॥११३(क)॥

अनुवाद (हिन्दी)

तू नेहमी श्रीरामांचा प्रिय होशील आणि कल्याणरूप गुणांचे धाम, मानरहित, इच्छेप्रमाणे रूप धारण करण्यास समर्थ, इच्छामृत्यू प्राप्त करणारा आणि ज्ञान व वैराग्याचे भांडार होशील.॥११३(क)॥

मूल (दोहा)

जेहिं आश्रम तुम्ह बसब पुनि सुमिरत श्रीभगवंत।
ब्यापिहि तहँ न अबिद्या जोजन एक प्रजंत॥११३(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

इतकेच नव्हे, तर श्रीभगवंतांचे स्मरण करीत तू ज्या आश्रमात निवास करशील, तेथे चार कोसांच्या परिसराला अविद्या व्यापू शकणार नाही.॥११३(ख)॥

मूल (चौपाई)

काल कर्म गुन दोष सुभाऊ।
कछु दुख तुम्हहि न ब्यापिहि काऊ॥
राम रहस्य ललित बिधि नाना।
गुप्त प्रगट इतिहास पुराना॥

अनुवाद (हिन्दी)

काल, कर्म, गुण, दोष आणि स्वभाव यांमुळे उत्पन्न होणारे कोणतेही दुःख तुला कधीही त्रास देणार नाही. अनेक प्रकारची श्रीरामांची सुंदर रहस्ये इतिहास व पुराणांत गुप्त व प्रकट आहेत,॥१॥

मूल (चौपाई)

बिनु श्रम तुम्ह जानब सब सोऊ।
नित नव नेह राम पद होऊ॥
जो इच्छा करिहहु मन माहीं।
हरि प्रसाद कछु दुर्लभ नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ती सर्व तुला आपोआप मिळतील. श्रीरामांच्या चरणी तुला नित्य नवीन प्रेम होत राहो. आपल्या मनात जी कोणती इच्छा करशील, तिची पूर्तता श्रीहरींच्या कृपेने मुळीच दुर्लभ रहाणार नाही.’॥२॥

मूल (चौपाई)

सुनि मुनि आसिष सुनु मतिधीरा।
ब्रह्मगिरा भइ गगन गँभीरा॥
एवमस्तु तव बच मुनि ग्यानी।
यह मम भगत कर्म मन बानी॥

अनुवाद (हिन्दी)

धीरबुद्धीच्या गरुडा, मुनींचा आशीर्वाद ऐकल्यावर आकाशातून गंभीर ब्रह्मवाणी झाली की, ‘हे ज्ञानी मुनी, तुझे वचन सत्य होवो. कायावाचामनाने हा माझा भक्त आहे.’॥३॥

मूल (चौपाई)

सुनि नभगिरा हरष मोहि भयऊ।
प्रेम मगन सब संसय गयऊ॥
करि बिनती मुनि आयसु पाई।
पद सरोज पुनि पुनि सिरु नाई॥

अनुवाद (हिन्दी)

आकाशवाणी ऐकून मला खूप आनंद झाला. मी प्रेममग्न झालो आणि माझा संपूर्ण संशय नाहीसा झाला. त्यानंतर मुनींना विनंती करून, त्यांची आज्ञा घेऊन आणि त्यांच्या चरणी वारंवार मस्तक ठेवून,॥४॥

मूल (चौपाई)

हरष सहित एहिं आश्रम आयउँ।
प्रभु प्रसाद दुर्लभ बर पायउँ॥
इहाँ बसत मोहि सुनु खग ईसा।
बीते कलप सात अरु बीसा॥

अनुवाद (हिन्दी)

मी मोठॺा हर्षाने या आश्रमात आलो. श्रीरामांच्या कृपेने दुर्लभ वर मला मिळाला. हे पक्षिराज, मला येथे निवास करीत सत्तावीस कल्प झाले आहेत.॥५॥

मूल (चौपाई)

करउँ सदा रघुपति गुन गाना।
सादर सुनहिं बिहंग सुजाना॥
जब जब अवधपुरीं रघुबीरा।
धरहिं भगत हित मनुज सरीरा॥

अनुवाद (हिन्दी)

मी येथे नित्य श्रीरामांचे गुणगान करीत असतो आणि चतुर पक्षी ते आदराने ऐकतात. श्रीरघुनाथ जेव्हा जेव्हा अयोध्येमध्ये भक्तांच्या कल्याणासाठी मनुष्यशरीर धारण करतात,॥६॥

मूल (चौपाई)

तब तब जाइ राम पुर रहऊँ।
सिसुलीला बिलोकि सुख लहऊँ॥
पुनि उर राखि राम सिसुरूपा।
निज आश्रम आवउँ खगभूपा॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा तेव्हा मी श्रीरामांच्या नगरीत जाऊन रहातो आणि प्रभूंच्या शिशुलीला पाहून सुख मिळवितो. मग हे पक्षिराज, श्रीरामांचे शिशुरूप हृदयामध्ये धारण करून मी आपल्या आश्रमात परत येतो.॥७॥

मूल (चौपाई)

कथा सकल मैं तुम्हहि सुनाई।
काग देह जेहिं कारन पाई॥
कहिउँ तात सब प्रस्न तुम्हारी।
राम भगति महिमा अति भारी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या कारणामुळे मला कावळ्याचा देह मिळाला, ती संपूर्ण कथा मी तुला सांगितली. हे तात, मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. अहाहा! रामभक्तीचा महिमा फार मोठा आहे!॥८॥