१५ गुरूंचा अपमान आणि ‍शिवांच्या शापाची गोष्ट

सोरठा

मूल (दोहा)

गुर नित मोहि प्रबोध दुखित देखि आचरन मम।
मोहि उपजइ अति क्रोध दंभिहि नीति कि भावई॥१०५(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

माझे आचरण पाहून गुरूंना वाईट वाटे. ते मला नेहमी योग्य प्रकारे समजावत, परंतु मला समजत नसल्यामुळे उलट फार राग येई. ढोंगी माणसाला नीती कधी बरी वाटते काय?॥१०५(ख)॥

मूल (चौपाई)

एक बार गुर लीन्ह बोलाई।
मोहि नीति बहु भाँति सिखाई॥
सिव सेवा कर फल सुत सोई।
अबिरल भगति राम पद होई॥

अनुवाद (हिन्दी)

एकदा गुरुजींनी मला बोलावले आणि अनेक प्रकारे परमार्थाची शिकवण दिली की, ‘हे पुत्रा, शिवांच्या सेवेचे फळ हेच आहे की, श्रीरामांच्या चरणी प्रगाढ भक्ती निर्माण व्हावी.॥१॥

मूल (चौपाई)

रामहि भजहिं तात सिव धाता।
नर पावँर कै केतिक बाता॥
जासु चरन अज सिव अनुरागी।
तासु द्रोहँ सुख चहसि अभागी॥

अनुवाद (हिन्दी)

बाळा, श्रीरामांना शिव व ब्रह्मदेव हे सुद्धा भजतात, मग क्षुद्र मनुष्याचे ते काय? ब्रह्मदेव आणि शिव यांना ज्यांच्या चरणी प्रेम आहे, अरे अभाग्या, त्यांच्याशी द्रोह करून तुला सुख मिळेल काय?’॥२॥

मूल (चौपाई)

हर कहुँ हरि सेवक गुर कहेऊ।
सुनि खगनाथ हृदय मम दहेऊ॥
अधम जाति मैं बिद्या पाएँ।
भयउँ जथा अहि दूध पिआएँ॥

अनुवाद (हिन्दी)

गुरुजींनी शिव हे हरीचे सेवक असल्याचे सांगितले. ते ऐकून हे पक्षिराज, माझ्या मनाचा जळफळाट झाला. नीच जातीचा मी ही विद्या मिळाल्यावर असा झालो की, जसा दूध पाजल्यावर साप बनतो.॥३॥

मूल (चौपाई)

मानी कुटिल कुभाग्य कुजाती।
गुर कर द्रोह करउँ दिनु राती॥
अति दयाल गुर स्वल्प न क्रोधा।
पुनि पुनि मोहि सिखाव सुबोधा॥

अनुवाद (हिन्दी)

अभिमानी, कुटिल, अभागी आणि क्षुद्र जातीचा मी रात्रंदिवस गुरूंचा द्रोह करू लागलो. गुरुजी अत्यंत दयाळू होते. त्यांना थोडासाही राग येत नव्हता. जरी मी द्रोह केला, तरी ते वारंवार मला उत्तम ज्ञान शिकवत.॥४॥

मूल (चौपाई)

जेहि ते नीच बड़ाई पावा।
सो प्रथमहिं हति ताहि नसावा॥
धूम अनल संभव सुनु भाई।
तेहि बुझाव घन पदवी पाई॥

अनुवाद (हिन्दी)

नीच मनुष्याला ज्याच्याकडून मोठेपण लाभते, त्यालाच तो मारून त्याचा नाश करतो. हे बंधू, आगीमुळे उत्पन्न झालेला धूर मेघासारखा होऊन त्या अग्नीलाच विझवून टाकतो.॥५॥

मूल (चौपाई)

रज मग परी निरादर रहई।
सब कर पद प्रहार नित सहई॥
मरुत उड़ाव प्रथम तेहि भरई।
पुनि नृप नयन किरीटन्हि परई॥

अनुवाद (हिन्दी)

धूळ ही रस्त्यामध्ये अपमानित होऊन पडलेली असते आणि नेहमी वाटेने जाणाऱ्यांच्या लाथांचा मार खाते. परंतु जेव्हा तिला वारा उडवून नेतो, तेव्हा ती सर्वांत प्रथम त्या वाऱ्यालाच व्यापून टाकते आणि मग राजांच्या डोळ्यांत व मुकुटांवर जाऊन पडते.॥६॥

मूल (चौपाई)

सुनु खगपति अस समुझि प्रसंगा।
बुध नहिं करहिं अधम कर संगा॥
कबि कोबिद गावहिं असि नीती।
खल सन कलह न भल नहिं प्रीती॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराजा, हे लक्षात घेऊन लोक अधम माणसाची संगती धरत नाहीत. कवी व पंडित हे अशी नीती सांगतात की, दुष्टाशी भांडण-तंटा आणि त्यांच्यावर प्रेम दोन्ही वाईटच.॥७॥

मूल (चौपाई)

उदासीन नित रहिअ गोसाईं।
खल परिहरिअ स्वान की नाईं॥
मैं खल हृदयँ कपट कुटिलाई।
गुर हित कहइ न मोहि सोहाई॥

अनुवाद (हिन्दी)

हे गोस्वामी, त्यामुळे त्याच्याशी नेहमी उदासीन राहिले पाहिजे. दुष्टाला कुत्र्याप्रमाणे दुरूनच पिटाळले पाहिजे. मी दुष्ट होतो. मनात कपट भरले होते. म्हणून गुरुजी जरी हिताची गोष्ट सांगत होते, तरी मला ती बरी वाटत नव्हती.॥८॥

दोहा

मूल (दोहा)

एक बार हर मंदिर जपत रहेउँ सिव नाम।
गुर आयउ अभिमान तें उठि नहिं कीन्ह प्रनाम॥१०६(क)॥

अनुवाद (हिन्दी)

एके दिवशी मी शिवमंदिरात शिवनामाचा जप करीत होतो. त्यावेळी गुरुजी तेथे आले, परंतु घमेंडीमुळे मी उठून त्यांना प्रणाम केला नाही.॥१०६(क)॥

मूल (दोहा)

सो दयाल नहिं कहेउ कछु उर न रोष लवलेस।
अति अघ गुर अपमानता सहि नहिं सके महेस॥१०६(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

गुरुजी दयाळू होते. माझा अपराध पाहूनही ते काहीच बोलले नाहीत. त्यांच्या मनात जरासुद्धा राग आला नाही. परंतु गुरूंचा अपमान हे मोठे पाप आहे. म्हणून महादेवांना ते सहन झाले नाही.॥१०६(ख)॥

मूल (चौपाई)

मंदिर माझ भई नभबानी।
रे हतभाग्य अग्य अभिमानी॥
जद्यपि तव गुर कें नहिं क्रोधा।
अति कृपाल चित सम्यक बोधा॥

अनुवाद (हिन्दी)

मंदिरात आकाशवाणी झाली. ‘हे हतभाग्या, मूर्खा, घमेंडखोरा, जरी तुझ्या गुरूंना राग आला नाही, ते अत्यंत कृपाळू मनाचे आहेत आणि त्यांना पूर्ण व यथार्थ ज्ञान आहे,॥१॥

मूल (चौपाई)

तदपि साप सठ दैहउँ तोही।
नीति बिरोध सोहाइ न मोही॥
जौं नहिं दंड करौं खल तोरा।
भ्रष्ट होइ श्रुतिमारग मोरा॥

अनुवाद (हिन्दी)

तरीही हे मूर्खा, मी तुला शाप देतो. कारण सदाचार सोडून वागणे मला आवडत नाही. अरे दुष्टा, जर मी तुला शिक्षा केली नाही, तर माझा वेदमार्गच नष्ट होईल.॥२॥

मूल (चौपाई)

जे सठ गुर सन इरिषा करहीं।
रौरव नरक कोटि जुग परहीं॥
त्रिजग जोनि पुनि धरहिं सरीरा।
अयुत जन्म भरि पावहिं पीरा॥

अनुवाद (हिन्दी)

जे मूर्ख गुरूंशी ईर्ष्या करतात, ते कोटॺावधी युगे रौरव नरकात पडतात. मग तेथून सुटल्यावर ते पशु-पक्ष्यांचे शरीर धारण करतात आणि दहा हजार जन्मांपर्यंत दुःख भोगतात.॥३॥

मूल (चौपाई)

बैठि रहेसि अजगर इव पापी।
सर्प होहि खल मल मति ब्यापी॥
महा बिटप कोटर महुँ जाई।
रहु अधमाधम अधगति पाई॥

अनुवाद (हिन्दी)

हे पाप्या, तू गुरूंसमोर अजगरासारखा बनून राहिलास. अरे दुष्टा, तुझी बुद्धी पापाने झाकलेली आहे. म्हणून तू सर्प हो. आणि हे अधमांतील अधमा, सर्पाच्या अधम योनीतील अधोगती मिळाल्यावर एखाद्या मोठॺा वृक्षाच्या ढोलीत जाऊन राहा.’॥४॥

दोहा

मूल (दोहा)

हाहाकार कीन्ह गुर दारुन सुनि सिव साप।
कंपित मोहि बिलोकि अति उर उपजा परिताप॥१०७(क)॥

अनुवाद (हिन्दी)

शिवांचा तो भयानक शाप ऐकून गुरुजींना खूप वाईट वाटले. मी भीतीने कापत असल्याचे पाहून त्यांच्या मनाला अतिशय दुःख झाले.॥१०७ (क)॥