१४ काकभुशुंडीची पूर्वजन्म-कथा व कलिमहिमा

मूल (चौपाई)

सुनु खगेस रघुपति प्रभुताई।
कहउँ जथामति कथा सुहाई॥
जेहि बिधि मोह भयउ प्रभु मोही।
सोउ सब कथा सुनावउँ तोही॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराज गरुडा, श्रीरामांची महती ऐकून घे. मी आपल्या बुद्धीप्रमाणे ती सुंदर कथा तुला सांगतो. हे प्रभो, मला ज्याप्रकारे मोह झाला, ती सर्व कथाही तुला सांगतो.॥१॥

मूल (चौपाई)

राम कृपा भाजन तुम्ह ताता।
हरि गुन प्रीति मोहि सुखदाता॥
ताते नहिं कछु तुम्हहि दुरावउँ।
परम रहस्य मनोहर गावउँ॥

अनुवाद (हिन्दी)

हे तात, तू श्रीरामांचा कृपापात्र आहेस. श्रीहरींच्या गुणाविषयी तुला प्रेम आहे. म्हणून तू मला सुख देणारा आहेस. म्हणून मी तुझ्यापासून काहीही लपवून ठेवीत नाही आणि अत्यंत रहस्याच्या गोष्टी मी तुला गाऊन ऐकवितो.॥२॥

मूल (चौपाई)

सुनहु राम कर सहज सुभाऊ।
जन अभिमान न राखहिं काऊ॥
संसृत मूल सूलप्रद नाना।
सकल सोक दायक अभिमाना॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांचा सहज स्वभाव ऐक. ते भक्तामध्ये कधीही अभिमान राहू देत नाहीत. कारण अभिमान हा जन्म-मरणरूप संसाराचे मूळ आहे आणि अनेक प्रकारचे क्लेश व सर्व शोक देणारा आहे.॥३॥

मूल (चौपाई)

ताते करहिं कृपानिधि दूरी।
सेवक पर ममता अति भूरी॥
जिमि सिसु तन ब्रन होइ गोसाईं।
मातु चिराव कठिन की नाईं॥

अनुवाद (हिन्दी)

म्हणून कृपानिधी श्रीराम तो दूर करतात. कारण सेवकाबद्दल त्यांना फारच ममता आहे. हे गोस्वामी, ज्याप्रमाणे मुलाच्या अंगावर फोड आला, तर आई हृदय कठोर बनवून तो फोड फोडते.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

जदपि प्रथम दुख पावइ रोवइ बाल अधीर।
ब्याधि नास हित जननी गनति न सो सिसु पीर॥७४(क)॥

अनुवाद (हिन्दी)

जरी मुलाला सुरवातीला फोड फोडताना दुःख होते व तो घाबरून रडतो, तरीही रोग नाहीसा करण्यासाठी आई मुलाच्या दुःखाकडे लक्ष देत नाही. फोड फोडून टाकते.॥७४(क)॥

मूल (दोहा)

तिमि रघुपति निज दास कर हरहिं मान हित लागि।
तुलसिदास ऐसे प्रभुहि कस न भजहु भ्रम त्यागि॥७४(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

त्याचप्रमाणे श्रीरघुनाथ आपल्या दासाचा अभिमान त्याच्या कल्याणासाठी हरण करतात. तुलसीदास म्हणतात की, भ्रम सोडून अशा प्रभूंना मनुष्य का भजत नाही?॥७४(ख)॥

मूल (चौपाई)

राम कृपा आपनि जड़ताई।
कहउँ खगेस सुनहु मन लाई॥
जब जब राम मनुज तनु धरहीं।
भक्त हेतु लीला बहु करहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराज, श्रीरामांची कृपा व माझ्या मूर्खतेची गोष्ट सांगतो. लक्ष देऊन ऐक. जेव्हा जेव्हा श्रीरामचंद्र मनुष्यशरीर धारण करतात आणि भक्तांच्या सुखासाठी अनेक लीला करतात,॥१॥

मूल (चौपाई)

तब तब अवधपुरी मैं जाऊँ।
बालचरित बिलोकि हरषाऊँ॥
जन्म महोत्सव देखउँ जाई।
बरष पाँच तहँ रहउँ लोभाई॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा तेव्हा मी अयोध्यापुरीत जातो आणि त्यांच्या बाललीला पाहून हर्षित होतो. तेथे जाऊन मी जन्ममहोत्सव पाहतो आणि भगवंतांच्या शिशुलीलांनी लुब्ध होऊन मी तेथे पाच वर्षे राहातो.॥२॥

मूल (चौपाई)

इष्टदेव मम बालक रामा।
सोभा बपुष कोटि सत कामा॥
निज प्रभु बदन निहारि निहारी।
लोचन सुफल करउँ उरगारी॥

अनुवाद (हिन्दी)

बालकरूप श्रीरामचंद्र माझे इष्टदेव आहेत. त्यांच्या अंगी अब्जावधी कामदेवांची शोभा आहे. हे गरुडा, आपल्या प्रभूंचे मुख पाहात-पाहात मी डोळ्यांचे पारणे फेडतो.॥३॥

मूल (चौपाई)

लघु बायस बपु धरि हरि संगा।
देखउँ बालचरित बहु रंगा॥

अनुवाद (हिन्दी)

लहानशा कावळ्याचे शरीर धारण करून आणि भगवंतांच्या सोबत फिरून मी त्यांची विभिन्न बालचरित्रे पाहातो.॥४॥

मूल (दोहा)

लरिकाईं जहँ जहँ फिरहिं तहँ तहँ संग उड़ाउँ।
जूठनि परइ अजिर महँ सो उठाइ करि खाउँ॥७५(क)॥

अनुवाद (हिन्दी)

लहानपणी ते जेथे जेथे फिरतात, तेथे तेथे मी त्यांच्यासोबत उडत जातो आणि अंगणात त्यांचे उष्टे पडते, ते उचलून खातो.॥७५(क)॥

मूल (दोहा)

एक बार अतिसय सब चरित किए रघुबीर।
सुमिरत प्रभु लीला सोइ पुलकित भयउ सरीर॥७५(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

एकदा श्रीरघुवीरांनी खूप लीला केल्या.’ प्रभूंच्या त्या लीलांचे स्मरण होताच काकभुशुंडींचे शरीर प्रेमानंदामुळे पुलकित होऊन गेले.॥७५(ख)॥

मूल (चौपाई)

कहइ भसुंड सुनहु खगनायक।
राम चरित सेवक सुखदायक॥
नृप मंदिर सुंदर सब भाँती।
खचित कनक मनि नाना जाती॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडी म्हणतात, ‘हे पक्षिराज, ऐक. श्रीरामांचे चरित्र सेवकांना सुख देणारे आहे. अयोध्येचा राजमहाल सर्व प्रकारे सुंदर आहे. सोन्याच्या महालात नाना प्रकारची रत्ने जडविली आहेत.॥१॥

मूल (चौपाई)

बरनि न जाइ रुचिर अँगनाई।
जहँ खेलहिं नित चारिउ भाई॥
बालबिनोद करत रघुराई।
बिचरत अजिर जननि सुखदाई॥

अनुवाद (हिन्दी)

सुंदर अंगणाचे तर वर्णन करता येत नाही. तेथे चौघे भाऊ नित्य खेळतात. एकदा मातेला सुख देणारे श्रीरघुनाथ बालविनोद करीत अंगणात फिरत होते.॥२॥

मूल (चौपाई)

मरकत मृदुल कलेवर स्यामा।
अंग अंग प्रति छबि बहु कामा॥
नव राजीव अरुन मृदु चरना।
पदज रुचिर नख ससि दुति हरना॥

अनुवाद (हिन्दी)

पाचूसारखे त्यांचे सावळे व कोमल शरीर आहे. अंगाअंगातून अनेक कामदेवांची शोभा पसरली आहे. नवीन लाल कमळासमान लाल-लाल कोमल चरण आहेत. सुंदर बोटे आहेत आणि नखे आपल्या ज्योतीने चंद्राची कांती हरण करणारी आहेत.॥३॥

मूल (चौपाई)

ललित अंक कुलिसादिक चारी।
नूपुर चारु मधुर रवकारी॥
चारु पुरट मनि रचित बनाई।
कटि किंकिनि कल मुखर सुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

पायांच्या तळव्यावर वज्रादी चार चिन्हे आहेत. चरणांमध्ये मधुर ध्वनी करणारे सुंदर नूपुर आहेत. रत्नजडित सोन्याच्या करदोटॺाचा मधुरध्वनी गोड वाटत आहे.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

रेखा त्रय सुंदर उदर नाभी रुचिर गँभीर।
उर आयत भ्राजत बिबिधि बाल बिभूषन चीर॥७६॥

अनुवाद (हिन्दी)

उदरावर त्रिवळी सुंदर दिसते. नाभी सुंदर व खोल आहे. विशाल वक्षःस्थळावर अनेक प्रकारचे बालकांचे दागिने व वस्त्र शोभून दिसत आहे.॥७६॥

मूल (चौपाई)

अरुन पानि नख करज मनोहर।
बाहु बिसाल बिभूषन सुंदर॥
कंध बाल केहरि दर ग्रीवा।
चारु चिबुक आनन छबि सींवा॥

अनुवाद (हिन्दी)

हातांचे लाल लाल तळवे, नखे व बोटे हे सर्व मनोहर आहेत आणि विशाल भुजांवर सुंदर आभूषणे आहेत. सिंहाच्या छाव्यासारखे खांदे आणि शंखासारखा गळा आहे. सुंदर हनुवटी आणि मुख हे लावण्याची परिसीमाच आहे.॥१॥

मूल (चौपाई)

कलबल बचन अधर अरुनारे।
दुइ दुइ दसन बिसद बर बारे॥
ललित कपोल मनोहर नासा।
सकल सुखद ससि कर सम हासा॥

अनुवाद (हिन्दी)

बोलणे बोबडे आहे. लालसर ओठ आहेत. उज्ज्वल, सुंदर व इटुकले दोन-दोन दात आहेत. सुंदर गाल, मनोहर नासिका आणि सर्व सुखे देणारे चंद्रकिरणांसारखे मधुर स्मित हास्य आहे.॥२॥

मूल (चौपाई)

नील कंज लोचन भव मोचन।
भ्राजत भाल तिलक गोरोचन॥
बिकट भृकुटि सम श्रवन सुहाए।
कुंचित कच मेचक छबि छाए॥

अनुवाद (हिन्दी)

नील कमलांसारखे नेत्र हे जन्म-मृत्यूच्या बंधनांतून सोडविणारे आहेत. ललाटावर गोरोचनाचा टिळा शोभत आहे. भुवया वक्र, कान सम आणि सुंदर आहेत. मस्तकावर काळ्या, कुरळ्या केसांची शोभा पसरली आहे.॥३॥

मूल (चौपाई)

पीत झीनि झगुली तन सोही।
किलकनि चितवनि भावति मोही॥
रूप रासि नृप अजिर बिहारी।
नाचहिं निज प्रतिबिंब निहारी॥

अनुवाद (हिन्दी)

अंगावर पिवळे झुळझुळीत झबले शोभून दिसत आहे. त्यांची किलकारी व नजर मला फार फार आवडते. राजा दशरथांच्या अंगणी विहार करणारे व सौंदर्यसंपन्न श्रीरामचंद्र आपलेच प्रतिबिंब पाहून नाचत आहेत.॥४॥

मूल (चौपाई)

मोहिसन करहिं बिबिधि बिधि क्रीड़ा।
बरनत मोहि होति अति ब्रीड़ा॥
किलकत मोहि धरन जब धावहिं।
चलउँ भागि तब पूप देखावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

आणि माझ्याबरोबर अनेक प्रकारचे खेळ करीत आहेत. त्या चरित्राचे वर्णन करताना मला ओशाळल्यागत होते. किलकारी मारत ते मला पकडायला धावत. मग मी पळून जाई, तेव्हा ते खाण्यासाठी मला हातातील घारी दाखवत.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

आवत निकट हँसहिं प्रभु भाजत रुदन कराहिं।
जाउँ समीप गहन पद फिरि फिरि चितइ पराहिं॥७७(क)॥

अनुवाद (हिन्दी)

मी जवळ आलो की, प्रभू हसत आणि मी पळून गेलो की रडत. जेव्हा मी त्यांच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी जाई, तेव्हा ते वळून वळून माझ्याकडे बघत पळून जात.॥७७(क)॥

मूल (दोहा)

प्राकृत सिसु इव लीला देखि भयउ मोहि मोह।
कवन चरित्र करत प्रभु चिदानंद संदोह॥७७(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

सामान्य बालकासारखी त्यांची लीला पाहून मला शंका आली की, सच्चिदानंदघन प्रभू ही कसली लीला करीत आहेत?॥७७(ख)॥

मूल (चौपाई)

एतना मन आनत खगराया।
रघुपति प्रेरित ब्यापी माया॥
सो माया न दुखद मोहि काहीं।
आन जीव इव संसृत नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराज, मनात एवढी शंका येताच श्रीरघुनाथांनी प्रेरित केलेल्या मायेने माझ्यावर पकड घातली. परंतु ती माया मला दुःख देणारी झाली नाही किंवा इतर जीवांप्रमाणे संसारात टाकणारी झाली नाही.॥१॥

मूल (चौपाई)

नाथ इहाँ कछु कारन आना।
सुनहु सो सावधान हरिजाना॥
ग्यान अखंड एक सीताबर।
माया बस्य जीव सचराचर॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, येथे काही दुसरेच कारण आहे. हे भगवंतांचे वाहन असलेल्या गरुडा, ते लक्ष देऊन ऐक. एक सीतापती श्रीरामच अखंड ज्ञानस्वरूप आहेत आणि जड-चेतन असे सर्वच जीव हे मायेच्या अधीन होणारे आहेत.॥२॥

मूल (चौपाई)

जौं सब कें रह ग्यान एकरस।
ईस्वर जीवहि भेद कहहु कस॥
माया बस्य जीव अभिमानी।
ईस बस्य माया गुन खानी॥

अनुवाद (हिन्दी)

जर जीवांना अखंड ज्ञान असेल, तर मग सांग बरे, ईश्वर व जीव यांच्यात फरक तो काय? अभिमानी जीव मायेच्या अधीन आहेत. तर सत्त्व, रज, तम या तिन्ही गुणांची खाण असलेली माया ईश्वराच्या अधीन आहे.॥३॥

मूल (चौपाई)

परबस जीव स्वबस भगवंता।
जीव अनेक एक श्रीकंता॥
मुधा भेद जद्यपि कृत माया।
बिनु हरि जाइ न कोटि उपाया॥

अनुवाद (हिन्दी)

जीव परतंत्र आहे आणि भगवान स्वतंत्र आहेत. जीव अनेक आहेत, मात्र श्रीपती भगवंत एक आहेत. जरी मायेने केलेला भेद असत्य आहे, तरी तो भगवंतांच्या भजनाविना कोटॺवधी उपाय केल्यानेही जाऊ शकत नाही.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

रामचंद्र के भजन बिनु जो चह पद निर्बान।
ग्यानवंत अपि सो नर पसु बिनु पूँछ बिषान॥७८(क)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांच्या भजनाविना ज्याला मोक्षपद हवे आहे, तो मनुष्य ज्ञानवान असूनही शेपूट व शिंगे यांच्याविना असलेला पशू आहे.॥७८(क)॥

मूल (दोहा)

राकापति षोडस उअहिं तारागन समुदाइ।
सकल गिरिन्ह दव लाइअ बिनु रबि राति न जाइ॥७८(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

संपूर्ण तारागणांसह सोळा कलांनी पूर्ण चंद्र उदय पावला आणि जितके पर्वत आहेत, त्या सर्वांना दावाग्नी लावला, तरीसुद्धा सूर्याचा उदय झाल्याविना रात्र नाहीशी होत नाही.॥७८ (ख)॥

मूल (चौपाई)

ऐसेहिं हरि बिनु भजन खगेसा।
मिटइ न जीवन्ह केर कलेसा॥
हरि सेवकहि न ब्याप अबिद्या।
प्रभु प्रेरित ब्यापइ तेहि बिद्या॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराज, याचप्रमाणे श्रीहरीच्या भजनाविना जीवांचे क्लेश नाहीसे होत नाहीत. श्रीहरींच्या सेवकाला अविद्या बाधत नाही. उलट प्रभूंच्या कृपेने त्याला विद्या व्यापून टाकते.॥१॥

मूल (चौपाई)

ताते नास न होइ दासकर।
भेद भगति बाढ़इ बिहंगबर॥
भ्रम तें चकित राम मोहि देखा।
बिहँसे सो सुनु चरित बिसेषा॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिश्रेष्ठा, म्हणूनच भगवंताच्या दासाचा नाश होत नाही, उलट भेद-भक्ती वाढते. श्रीरामांनी जेव्हा मी भ्रमामुळे चकित झाल्याचे पाहिले, तेव्हा ते हसले. ती विशेष कथा ऐक.॥२॥

मूल (चौपाई)

तेहि कौतुक कर मरमु न काहूँ।
जाना अनुज न मातु पिताहूँ॥
जानु पानि धाए मोहि धरना।
स्यामल गात अरुन कर चरना॥

अनुवाद (हिन्दी)

त्या लीलेंचे मर्म कुणालाही समजले नाही. त्यांच्या लहान भावांना नाही की माता-पित्यांना नाही. श्यामशरीर आणि लाल लाल तळहात आणि लाल चरण-तळवे असलेले बालरूप श्रीराम रांगत रांगत मला पकडण्यास धावले.॥३॥

मूल (चौपाई)

तब मैं भागि चलेउँ उरगारी।
राम गहन कहँ भुजा पसारी॥
जिमि जिमि दूरि उड़ाउँ अकासा।
तहँ भुज हरि देखउँ निज पासा॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा गरुडा, मी पळू लागलो. श्रीरामांनी मला पकडण्यासाठी हात पुढे केला. मी जसा जसा आकाशात दूर उडत होतो, तसा तसा तेथे श्रीहरींचा हात मला आपल्या मागे असल्याचे दिसत होते.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

ब्रह्मलोक लगि गयउँ मैं चितयउँ पाछ उड़ात।
जुग अंगुल कर बीच सब राम भुजहि मोहि तात॥ ७९(क)॥

अनुवाद (हिन्दी)

मी ब्रह्मलोकात गेलो आणि उडत असताना मी मागे वळून पाहिले, तर हे तात, श्रीरामांचा हात आणि मी यांच्यात दोन बोटांचेच अंतर होते.॥७९(क)॥

मूल (दोहा)

सप्ताबरन भेद करि जहाँ लगें गति मोरि।
गयउँ तहाँ प्रभु भुज निरखि ब्याकुल भयउँ बहोरि॥७९(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

सात आवरणे भेदून माझी गती जिथवर होती, तिथवर मी गेलो. परंतु तेथेही प्रभूंचा हात माझ्या मागे पाहून मी व्याकूळ झालो.॥७९(ख)॥

मूल (चौपाई)

मूदेउँ नयन त्रसित जब भयऊँ।
पुनि चितवत कोसलपुर गयऊँ॥
मोहि बिलोकि राम मुसुकाहीं।
बिहँसत तुरत गयउँ मुख माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मी भयभीत झालो, तेव्हा डोळे मिटून घेतले. मग जेव्हा डोळे उघडून पहातो तोच मी अयोध्यापुरीत पोहोचलो होतो. मला पाहून श्रीराम मंदहास्य करू लागले. ते हसत असल्याचे पाहून मी पटकन त्यांच्या तोंडात शिरलो.॥१॥

मूल (चौपाई)

उदर माझ सुनु अंडज राया।
देखेउँ बहु ब्रह्मांड निकाया॥
अति बिचित्र तहँ लोक अनेका।
रचना अधिक एक ते एका॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराज, मी त्यांच्या पोटात अनेक ब्रह्मांडांचे समूह पाहिले. त्या ब्रह्मांडांमध्ये अनेक प्रकारचे लोक होते. त्यांची रचना एकापेक्षा एक चांगली होती.॥२॥

मूल (चौपाई)

कोटिन्ह चतुरानन गौरीसा।
अगनित उडगन रबि रजनीसा॥
अगनित लोकपाल जम काला।
अगनित भूधर भूमि बिसाला॥

अनुवाद (हिन्दी)

कोटॺावधी ब्रह्मदेव आणि शिव, अगणित तारागण, सूर्य आणि चंद्र, अगणित लोकपाल, यम व काल, अगणित पर्वत व विशाल भूमी,॥३॥

मूल (चौपाई)

सागर सरि सर बिपिन अपारा।
नाना भाँति सृष्टि बिस्तारा॥
सुर मुनि सिद्ध नाग नर किंनर।
चारि प्रकार जीव सचराचर॥

अनुवाद (हिन्दी)

असंख्य समुद्र, नद्या, तलाव आणि वने, तसेच आणखी सुद्धा नाना प्रकारच्या सृष्टीचा विस्तार दिसला. देव, मुनी, सिद्ध, नाग, मनुष्य, किन्नर आणि चार प्रकारचे जड व चेतन जीव पाहिले.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

जो नहिं देखा नहिं सुना जो मनहूँ न समाइ।
सो सब अद्भुत देखेउँ बरनि कवनि बिधि जाइ॥८०(क)॥

अनुवाद (हिन्दी)

जे कधी पाहिले नव्हते की, ऐकले नव्हते आणि ज्याची मनात कल्पनाही करता येत नाही, अशी ती सर्व सृष्टी मी पाहिली. मग तिचे वर्णन कसे करता येईल?॥८० (क)॥

मूल (दोहा)

एक एक ब्रह्मांड महुँ रहउँ बरस सत एक।
एहि बिधि देखत फिरउँ मैं अंड कटाह अनेक॥८०(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

मी एकेका ब्रह्मांडामध्ये शंभर शंभर वर्षे राहिलो. अशा प्रकारे अनेक ब्रह्मांडे पहात फिरलो.॥८०(ख)॥

मूल (चौपाई)

लोक लोक प्रति भिन्न बिधाता।
भिन्न बिष्नु सिव मनु दिसित्राता॥
नर गंधर्ब भूत बेताला।
किंनर निसिचर पसु खग ब्याला॥

अनुवाद (हिन्दी)

प्रत्येक लोकात भिन्न भिन्न ब्रह्मदेव, भिन्न भिन्न विष्णू, शिव, मनू, दिक्पाल, माणसे, गंधर्व, किन्नर, भूत, वेताळ, किन्नर, राक्षस, पशू, पक्षी, सर्प,॥१॥

मूल (चौपाई)

देव दनुज गन नाना जाती।
सकल जीव तहँ आनहि भाँती॥
महि सरि सागर सर गिरि नाना।
सब प्रपंच तहँ आनइ आना॥

अनुवाद (हिन्दी)

आणि नाना जातीचे देव आणि दैत्यगण होते. सर्व जीव तेथे वेगवेगळ्या प्रकारचे होते. अनेक पृथ्वी, नद्या, समुद्र, तलाव, पर्वत आणि सर्व सृष्टी तेथे वेगळ्याच प्रकारची होती.॥२॥

मूल (चौपाई)

अंडकोस प्रति प्रति निज रूपा।
देखेउँ जिनस अनेक अनूपा॥
अवधपुरी प्रति भुवन निनारी।
सरजू भिन्न भिन्न नर नारी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रत्येक ब्रह्मांडात मी स्वतःचे रूप पाहिले आणि अनेक अनुपम वस्तृू पाहिल्या. प्रत्येक भुवनात निराळीच अयोध्यापुरी, वेगळीच शरयू आणि भिन्न प्रकारचे नर-नारी होते॥३॥

मूल (चौपाई)

दसरथ कौसल्या सुनु ताता।
बिबिध रूप भरतादिक भ्राता॥
प्रति ब्रह्मांड राम अवतारा।
देखउँ बालबिनोद अपारा॥

अनुवाद (हिन्दी)

हे तात, दशरथ, कौसल्या आणि भरतादी बंधू वेगवेगळ्या रूपांचे होते. मी प्रत्येक ब्रह्मांडामध्ये रामावतार आणि त्यांची अपार बाललीला पहात फिरलो.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

भिन्न भिन्न मैं दीख सबु अति बिचित्र हरिजान।
अगनित भुवन फिरेउँ प्रभु राम न देखेउँ आन॥८१(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हे हरिवाहना, मी सर्व काही भिन्न भिन्न व अत्यंत विचित्र पाहिले. मी अगणित ब्रह्मांडांतून फिरलो, परंतु प्रभू श्रीरामचंद्रांना मात्र वेगळ्या रूपात पाहिले नाही.॥८१ (क)॥

मूल (दोहा)

सोइ सिसुपन सोइ सोभा सोइ कृपाल रघुबीर।
भुवन भुवन देखत फिरउँ प्रेरित मोह समीर॥८१(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वत्र तेच शिशुपण, तीच शोभा आणि कृपाळू श्रीरघुवीर.अशाप्रकारे मोहरूपी वायूमुळे मी भुवना-भुवनातून हे सर्व पहात फिरत होतो.॥८१(ख)॥

मूल (चौपाई)

भ्रमत मोहि ब्रह्मांड अनेका।
बीते मनहुँ कल्प सत एका॥
फिरत फिरत निज आश्रम आयउँ।
तहँ पुनि रहि कछु काल गवाँयउँ॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक ब्रह्मांडांतून भटकत मला शंभर कल्प झाले. फिरत-फिरत मी आपल्या आश्रमात आलो आणि तेथे काही काळ घालविला.॥१॥

मूल (चौपाई)

निज प्रभु जन्म अवध सुनि पायउँ।
निर्भर प्रेम हरषि उठि धायउँ॥
देखउँ जन्म महोत्सव जाई।
जेहि बिधि प्रथम कहा मैं गाई॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर जेव्हा मला समजले की, आपल्या प्रभूंनी अयोध्येमध्ये जन्म घेतला आहे, तेव्हा मी मोठॺा प्रेमाने व आनंदाने तिकडे धाव घेतली. जाऊन मी तो जन्ममहोत्सव पाहिला. त्याचे वर्णन मी पूर्वी सांगितले.॥२॥

मूल (चौपाई)

राम उदर देखेउँ जग नाना।
देखत बनइ न जाइ बखाना॥
तहँ पुनि देखेउँ राम सुजाना।
माया पति कृपाल भगवाना॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांच्या पोटात मी पुष्कळ विश्वे पाहिली. ती पहातच रहावी, असे वाटे. त्यांचे वर्णन करता येत नाही. तेथेही मी सर्वज्ञ, मायेचे स्वामी, कृपाळू अशा भगवान श्रीरामांना पाहिले. ॥३॥

मूल (चौपाई)

करउँ बिचार बहोरि बहोरी।
मोह कलिल ब्यापित मति मोरी॥
उभय घरी महँ मैं सब देखा।
भयउँ भ्रमित मन मोह बिसेषा॥

अनुवाद (हिन्दी)

मी वारंवार विचार करीत होतो. माझी बुद्धी मोहरूपी चिखलाने बरबटली होती. हे सर्व मी दोनच घटकांमध्ये पाहिले. मनात विशेष मोह उत्पन्न झाल्यामुळे मी थकून गेलो.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

देखि कृपाल बिकल मोहि बिहँसे तब रघुबीर।
बिहँसतहीं मुख बाहेर आयउँ सुनु मतिधीर॥८२(क)॥

अनुवाद (हिन्दी)

मी व्याकूळ झाल्याचे पाहून कृपाळू श्रीरघुवीर हसले. हे धीरबुद्धीच्या गरुडा, ते हसताच मी त्यांच्या तोंडातून बाहेर आलो.॥८२ (क)॥

मूल (दोहा)

सोइ लरिकाई मो सन करन लगे पुनि राम।
कोटि भाँति समुझावउँ मनु न लहइ बिश्राम॥८२(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्र माझ्याबरोबर पुन्हा बालिशपणा करू लागले. मी असंख्य प्रकारे मनाची समजूत घालत होतो, परंतु चैन पडत नव्हते.॥८२(ख)॥

मूल (चौपाई)

देखि चरित यह सो प्रभुताई।
समुझत देह दसा बिसराई॥
धरनि परेउँ मुख आव न बाता।
त्राहि त्राहि आरत जन त्राता॥

अनुवाद (हिन्दी)

ते बालचरित्र पाहून आणि प्रभूंच्या पोटामध्ये पाहिलेल्या त्यांच्या महतीचे स्मरण झाल्यावर माझे देहभान हरपले. आणि ‘हे आर्तजनांचे रक्षक, रक्षण करा, रक्षण करा.’ असे म्हणत मी भूमीवर पडलो. तोंडातून शब्द फुटत नव्हता.॥१॥

मूल (चौपाई)

प्रेमाकुल प्रभु मोहि बिलोकी।
निज माया प्रभुता तब रोकी॥
कर सरोज प्रभु मम सिर धरेऊ।
दीनदयाल सकल दुख हरेऊ॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर प्रभूंनी मला प्रेमविव्हळ झाल्याचे पाहून आपल्या मायेचा प्रभाव थांबविला. प्रभूंनी आपले कर-कमल माझ्या मस्तकावर ठेवले. दीनदयाळू प्रभूंनी माझे संपूर्ण दुःख हरण केले. ॥२॥

मूल (चौपाई)

कीन्ह राम मोहि बिगत बिमोहा।
सेवक सुखद कृपा संदोहा॥
प्रभुता प्रथम बिचारि बिचारी।
मन महँ होइ हरष अति भारी॥

अनुवाद (हिन्दी)

सेवकांना सुख देणारे, कृपेचे समूह असलेल्या श्रीरामांनी माझा मोह पूर्णपणे घालविला. त्यांची पूर्वीची ती प्रभुता आठवून माझ्या मनाला मोठा हर्ष झाला.॥३॥

मूल (चौपाई)

भगत बछलता प्रभु कै देखी।
उपजी मम उर प्रीति बिसेषी॥
सजल नयन पुलकित कर जोरी।
कीन्हिउँ बहु बिधि बिनय बहोरी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंची भक्त-वत्सलता पाहून माझ्या मनात फार प्रेम निर्माण झाले. मग मी आनंदाने नेत्रांमध्ये पाणी आणून, पुलकित होऊन व हात जोडून त्यांना अनेक प्रकारे प्रार्थना केली.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

सुनि सप्रेम मम बानी देखि दीन निज दास।
बचन सुखद गंभीर मृदु बोले रमानिवास॥८३(क)॥

अनुवाद (हिन्दी)

माझे प्रेमपूर्ण बोलणे ऐकून व आपला हा दास दीन झाल्याचे पाहून रमानिवास श्रीराम सुखदायक, गंभीर व कोमल वाणीने म्हणाले.॥८३(क)॥

मूल (दोहा)

काकभसुंडि मागु बर अति प्रसन्न मोहि जानि।
अनिमादिक सिधि अपर रिधि मोच्छ सकल सुख खानि॥८३(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे काकभुशुंडी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे, असे समजून तू वर माग. अणिमादी अष्ट सिद्धी, दुसऱ्या ऋद्धी आणि संपूर्ण सुखांची खाण असलेला मोक्ष,॥८३ (ख)॥

मूल (चौपाई)

ग्यान बिबेक बिरति बिग्याना।
मुनि दुर्लभ गुन जे जग नाना॥
आजु देउँ सब संसय नाहीं।
मागु जो तोहि भाव मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ज्ञान, विवेक, वैराग्य, तत्त्वज्ञान आणि जगात मुनींनाही दुर्लभ असलेले अनेक गुण, हे सर्व मी आज तुला देईन, यात शंका नाही. जे तुझ्या मनाला आवडेल ते माग.’॥१॥

मूल (चौपाई)

सुनि प्रभु बचन अधिक अनुरागेउँ।
मन अनुमान करन तब लागेउँ॥
प्रभु कह देन सकल सुख सही।
भगति आपनी देन न कही॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंचे वचन ऐकून मला प्रेमाचे अतिशय भरते आले. तेव्हा मी मनात विचार करू लागलो की, प्रभूंनी सर्व सुखे मला देतो, असे सांगितले, ही गोष्ट खरी. परंतु आपली भक्ती देण्याची गोष्ट काढली नाही.॥२॥

मूल (चौपाई)

भगति हीन गुन सब सुख ऐसे।
लवन बिना बहु बिंजन जैसे॥
भजन हीन सुख कवने काजा।
अस बिचारि बोलेउँ खगराजा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे मिठाविना अनेक प्रकारचे भोजनपदार्थ बेचव असतात. तसे भक्तिरहित सर्व गुण आणि सर्व सुखे फिकी होत. भजनाविना सुख काय कामाचे? हे पक्षिराज, असा विचार करून मी म्हणालो,॥३॥

मूल (चौपाई)

जौं प्रभु होइ प्रसन्न बर देहू।
मो पर करहु कृपा अरु नेहू॥
मन भावत बर मागउँ स्वामी।
तुम्ह उदार उर अंतरजामी॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे प्रभो, जर तुम्ही प्रसन्न होऊन मला वर देत आहात आणि माझ्यावर कृपा व स्नेह करता, तर हे स्वामी, मी आपला मनपसंत वर मागतो. तुम्ही उदार आहात आणि मनातील जाणणारे आहात.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

अबिरल भगति बिसुद्ध तव श्रुति पुरान जो गाव।
जेहि खोजत जोगीस मुनि प्रभु प्रसाद कोउ पाव॥८४(क)॥

अनुवाद (हिन्दी)

तुमची जी प्रगाढ व विशुद्ध भक्ती श्रुती व पुराणे गातात, योगीश्वर, मुनी जी शोधत असतात आणि प्रभूंच्या कृपेने कोणी विरळाच जी प्राप्त करून घेतो,॥८४ (क)॥

मूल (दोहा)

भगत कल्पतरु प्रनत हित कृपा सिंधु सुख धाम।
सोइ निज भगति मोहि प्रभु देहु दया करि राम॥८४(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे भक्तांना मनोवांछित फल देणारे कल्पवृक्ष, हे शरणागताचे हितकारक, हे कृपासागर, हे सुखधाम श्रीराम, दया करून मला आपली तीच भक्ती द्या.’॥८४(ख)॥

मूल (चौपाई)

एवमस्तु कहि रघुुकुलनायक।
बोले बचन परम सुखदायक॥
सुनु बायस तैं सहज सयाना।
काहे न मागसि अस बरदाना॥

अनुवाद (हिन्दी)

‘तथास्तु’ असे म्हणून रघुवंशाचे स्वामी व परम सुख देणारे प्रभू म्हणाले, ‘हे कावळ्या, तू स्वभावतःच बुद्धिमान आहेस. मग असे वरदान का बरे मागणार नाहीस?’॥१॥

मूल (चौपाई)

सब सुख खानि भगति तैं मागी।
नहिं जग कोउ तोहि सम बड़भागी॥
जो मुनि कोटि जतन नहिं लहहीं।
जे जप जोग अनल तन दहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

तू सर्व गुणांची खाण असलेली भक्ती मागितलीस. जगामध्ये तुझ्यासारखा भाग्यशाली नाही. जे मुनी तप, योगाग्नीने आपले शरीर झिजवतात, त्यांनाही कोटॺावधी प्रयत्न करूनही जी भक्ती मिळत नाही,॥२॥

मूल (चौपाई)

रीझेउँ देखि तोरि चतुराई।
मागेहु भगति मोहि अति भाई॥
सुनुु बिहंग प्रसाद अब मोरें।
सब सुभ गुन बसिहहिं उर तोरें॥

अनुवाद (हिन्दी)

तीच भक्ती तू मागितलीस. तुझ्या चातुर्यावर मी प्रसन्न झालो. ही तुझी मखलाशी मला फारच आवडली. हे पक्ष्या, ऐकून घे. माझ्या कृपेमुळे आता सर्व शुभ गुण तुझ्या हृदयात निवास करतील.॥३॥

मूल (चौपाई)

भगति ग्यान बिग्यान बिरागा।
जोग चरित्र रहस्य बिभागा॥
जानब तैं सबही कर भेदा।
मम प्रसाद नहिं साधन खेदा॥

अनुवाद (हिन्दी)

भक्ती, ज्ञान, विज्ञान, वैराग्य, योग, माझ्या लीला आणि त्यांचे रहस्य तसेच त्यांचे विभाग-या सर्वांचे रहस्य माझ्या कृपेने तू जाणशील. तुला साधनाचे कष्ट होणार नाहीत.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

माया संभव भ्रम सब अब न ब्यापिहहिं तोहि।
जानेसु ब्रह्म अनादि अज अगुन गुनाकर मोहि॥ ८५(क)॥

अनुवाद (हिन्दी)

मायेमुळे उत्पन्न झालेले सर्व भ्रम आता तुला बाधणार नाहीत. मी अनादी, अजन्मा, प्रकृतीच्या गुणांनी रहित आणि गुणातीत दिव्य गुणांची खाण आहे, असे जाण.॥ ८५ (क)॥

मूल (दोहा)

मोहि भगत प्रिय संतत अस बिचारि सुनु काग।
कायँ बचन मन मम पद करेसु अचल अनुराग॥ ८५(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे काकभुशुंडी, ऐक. मला भक्त हे निरंतर प्रिय आहेत. असा विचार करून कायावाचामनाने माझ्या चरणी अढळ प्रेम बाळग.॥ ८५ (ख)॥

मूल (चौपाई)

अब सुनु परम बिमल मम बानी।
सत्य सुगम निगमादि बखानी॥
निज सिद्धांत सुनावउँ तोही।
सुनु मन धरु सब तजि भजु मोही॥

अनुवाद (हिन्दी)

आता माझी सत्य, सुगम आणि वेदादींनी वर्णन केलेली परम निर्मळ वाणी ऐक. मी तुला ‘निज सिद्धांत’ सांगतो. तो ऐकून घेऊन मनात धारण कर आणि सर्व काही सोडून देऊन माझे भजन कर.॥१॥

मूल (चौपाई)

मम माया संभव संसारा।
जीव चराचर बिबिधि प्रकारा॥
सब मम प्रिय सब मम उपजाए।
सब ते अधिक मनुज मोहि भाए॥

अनुवाद (हिन्दी)

हा संपूर्ण संसार माझ्या मायेपासून उत्पन्न झाला आहे. यामध्ये अनेक प्रकारचे चराचर जीव आहेत. ते सर्व मला प्रिय आहेत. कारण ते सर्व मीच उत्पन्न केले आहेत. परंतु मनुष्य मला सर्वांत जास्त आवडतात.॥२॥

मूल (चौपाई)

तिन्ह महँ द्विजद्विज महँ श्रुतिधारी।
तिन्ह महुँ निगम धरम अनुसारी॥
तिन्ह महँ प्रिय बिरक्त पुनि ग्यानी।
ग्यानिहु ते अति प्रिय बिग्यानी॥

अनुवाद (हिन्दी)

त्या मनुष्यांपैकी द्विज, द्विजांमध्येही वेद कंठस्थ करणारे, त्यातही वेदोक्त धर्माप्रमाणे चालणारे आणि विरक्त द्विज मला प्रिय आहेत. या वैराग्यवान द्विजांमध्येही ज्ञानी आणि ज्ञान्यांहूनही अत्यंत प्रिय विज्ञानी आहेत.॥३॥

मूल (चौपाई)

तिन्ह ते पुनि मोहि प्रिय निज दासा।
जेहि गति मोरि न दूसरि आसा॥
पुनि पुनि सत्य कहउँ तोहि पाहीं।
मोहि सेवक सम प्रिय कोउ नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

विज्ञानींमध्येही माझा दास मला प्रिय आहे कारण त्याला माझाच आश्रय आहे. दुसरी कोणतीही आशा त्याला नसते. मी तुला वारंवार सत्य असलेला ‘निज सिद्धांत’ सांगतो की, मला माझ्या दासासारखा कोणीही प्रिय नाही.॥४॥

मूल (चौपाई)

भगति हीन बिरंचि किन होई।
सब जीवहु सम प्रिय मोहि सोई॥
भगतिवंत अति नीचउ प्रानी।
मोहि प्रानप्रिय असि मम बानी॥

अनुवाद (हिन्दी)

भक्तिहीन ब्रह्मदेव का असेना, तो मला सर्व जीवांप्रमाणेच प्रिय आहे. परंतु भक्तिमान अत्यंत नीच असलेला प्राणी मला प्राणांसमान प्रिय आहे. ही माझी घोषणा आहे.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

सुचि सुसील सेवक सुमति प्रिय कहु काहि न लाग।
श्रुति पुरान कह नीति असि सावधान सुनु काग॥ ८६॥

अनुवाद (हिन्दी)

पवित्र, सुशील आणि चांगल्या बुद्धीचा सेवक कुणाला आवडत नाही, सांग बरे? वेद आणि पुराणे हाच नियम सांगतात. हे भुशुंडी, लक्ष देऊन ऐक.॥८६॥

मूल (चौपाई)

एक पिता के बिपुल कुमारा।
होहिं पृथक गुन सील अचारा॥
कोउ पंडित कोउ तापस ग्याता।
कोउ धनवंत सूर कोउ दाता॥

अनुवाद (हिन्दी)

एका पित्याचे पुत्र वेगवेगळ्या गुणांचे, स्वभावाचे, आणि वर्तनाचे असतात. कुणी पंडित असतो, कोणी तपस्वी, कोणी ज्ञानी, कोणी धनवान, कोणी शूरवीर, आणि कोणी दानी, ॥१॥

मूल (चौपाई)

कोउ सर्बग्य धर्मरत कोई।
सब पर पितहि प्रीति सम होई॥
कोउ पितु भगत बचनमन कर्मा।
सपनेहुँ जान न दूसर धर्मा॥

अनुवाद (हिन्दी)

कोणी सर्वज्ञ तर कोणी धर्मपरायण असतो. पित्याचे प्रेम या सर्वांवर सारखे असते. परंतु यांपैकी कोणी कायावाचामनाने, पित्याचाच भक्त असेल, त्याला पित्याशिवाय दुसरा विचार स्वप्नातही दिसत नसेल,॥२॥

मूल (चौपाई)

सो सुत प्रिय पितु प्रान समाना।
जद्यपि सो सब भाँति अयाना॥
एहि बिधि जीव चराचर जेते।
त्रिजग देव नर असुर समेते॥

अनुवाद (हिन्दी)

तो पुत्र पित्याला प्राणांसारखा प्रिय असतो, जरी सर्व प्रकारे तो अज्ञानी असला तरी. अशा प्रकारे तिर्यक् योनीतील पशु-पक्षी, देव, मनुष्य आणि असुरांसह जितके म्हणून चेतन व जड जीव आहेत,॥३॥

मूल (चौपाई)

अखिल बिस्व यह मोर उपाया।
सब पर मोहि बराबरि दाया॥
तिन्ह महँ जो परिहरि मद माया।
भजै मोहि मन बच अरु काया॥

अनुवाद (हिन्दी)

या सर्वांनी भरलेले हे विश्व मीच उत्पन्न केले आहे, म्हणून सर्वांवर माझी समान दया आहे. परंतु यांपैकी जो मद व माया सोडून कायावाचामनाने मला भजतो,॥४॥

दोहा

मूल (दोहा)

पुरुष नपुंसक नारि वा जीव चराचर कोइ।
सर्ब भाव भज कपट तजि मोहि परम प्रिय सोइ॥८७(क)॥

अनुवाद (हिन्दी)

तो पुरुष असो, नपुंसक असो वा स्त्री असो, अथवा चराचरातील कोणताही जीव असो, जो कोणी निष्कपटपणे सर्वभावे मला भजतो, तोच मला परम प्रिय आहे.॥८७(क)॥

सोरठा

मूल (दोहा)

सत्य कहउँ खग तोहि सुचि सेवक मम प्रान प्रिय।
अस बिचारि भजु मोहि परिहरि आस भरोस सब॥८७(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्ष्या, मी तुला सत्य आहे, ते सांगतो. अनन्य व निष्काम असा पवित्र सेवक मला प्राणांसमान प्रिय आहे, असा विचार करून सर्व आशा-आधार सोडून तू मलाच भज.॥८७(ख)॥

मूल (चौपाई)

कबहूँ काल न ब्यापिहि तोही।
सुमिरेसु भजेसु निरंतर मोही॥
प्रभु बचनामृत सुनि न अघाऊँ।
तनु पुलकित मन अति हरषाऊँ॥

अनुवाद (हिन्दी)

तुझ्यावर काळाची सत्ता चालणार नाही. निरंतर माझे स्मरण व भजन करीत राहा.’ प्रभूंचे वचनामृत ऐकून मी तृप्त होत नव्हतो. माझे शरीर पुलकित झाले होते आणि मनातून मी खूपच हर्षित झालो होतो.॥१॥

मूल (चौपाई)

सो सुख जानइ मन अरु काना।
नहिं रसना पहिं जाइ बखाना॥
प्रभु सोभा सुख जानहिं नयना।
कहि किमि सकहिं तिन्हहि नहिं बयना॥

अनुवाद (हिन्दी)

ते सुख मन व कान यांनाच समजत होते. जिभेने त्यांचे वर्णन करता येत नाही. प्रभूंच्या लावण्याचे सुख नेत्रच जाणतात, परंतु त्यांचे वर्णन ते कसे सांगणार? कारण नेत्रांना वाणी नाही.॥२॥

मूल (चौपाई)

बहु बिधि मोहि प्रबोधि सुख देई।
लगे करन सिसु कौतुक तेई॥
सजल नयन कछु मुख करि रूखा।
चितइ मातु लागी अति भूखा॥

अनुवाद (हिन्दी)

मला पुष्कळ प्रकारांनी व्यवस्थितपणे समजावून देऊन प्रभू पुन्हा मुलांबरोबर खेळ खेळू लागले. डोळ्यांत पाणी आणून आणि उतरलेल्या चेहऱ्याने आईकडे त्यांनी बघितले आणि आईला सुचवले की, आपल्याला फार भूक लागली आहे.॥३॥

मूल (चौपाई)

देखि मातु आतुर उठि धाई।
कहि मृदु बचन लिए उर लाई॥
गोद राखि कराव पय पाना।
रघुपति चरित ललित कर गाना॥

अनुवाद (हिन्दी)

ते पाहून आई लगेच उठून धावली आणि शब्दांनी समजावत तिने श्रीरामांना हृदयाशी धरले. आणि ती त्यांना मांडीवर घेऊन दूध पाजू लागली. आणि श्रीरघुनाथांना त्यांच्याच लीला गाऊन दाखवू लागली.॥४॥

सोरठा

मूल (दोहा)

जेहि सुख लागि पुरारि असुभ बेष कृत सिव सुखद।
अवधपुरी नर नारि तेहि सुख महुँ संतत मगन॥ ८८(क)॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांना सुख देणाऱ्या कल्याणरूप त्रिपुरारी शिवांनी ज्या सुखासाठी विचित्र वेष धारण केला, त्या सुखामध्ये अयोध्येतील नर-नारी निरंतर निमग्न रहात.॥ ८८ (क)॥

मूल (दोहा)

सोई सुख लवलेस जिन्ह बारक सपनेहुँ लहेउ।
ते नहिं गनहिं खगेस ब्रह्मसुखहि सज्जन सुमति॥ ८८(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सुखाचा लवलेशसुद्धा ज्यांना एकदा स्वप्नातही प्राप्त झाला, हे पक्षिराज, ते सुंदर बुद्धीचे सज्जन पुरुष त्या सुखासमोर ब्रह्मसुखालाही तुच्छ समजतात.॥८८(ख)॥

मूल (चौपाई)

मैं पुनि अवध रहेउँ कछु काला।
देखेउँ बालबिनोद रसाला॥
राम प्रसाद भगति बर पायउँ।
प्रभु पद बंदि निजाश्रम आयउँ॥

अनुवाद (हिन्दी)

मी आणखी काही काळ अयोध्यापुरीत राहिलो आणि श्रीरामांच्या रसपूर्ण बाललीला पाहिल्या. श्रीरामांच्या कृपेने मला भक्तीचे वरदान लाभले. त्यानंतर प्रभूंच्या चरणांना वंदन करून मी आपल्या आश्रमात परत आलो.॥१॥

मूल (चौपाई)

तब ते मोहि न ब्यापी माया।
जब ते रघुनायक अपनाया॥
यह सब गुप्त चरित मैं गावा।
हरि मायाँ जिमि मोहि नचावा॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे जेव्हापासून श्रीरामांनी मला आपले मानले, तेव्हापासून मला मायेने कधीही सतावले नाही. श्रीरामांच्या मायेने मला कसे नाचविले, ते सर्व गुप्त चरित्र मी तुला सांगितले. ॥२॥

मूल (चौपाई)

निज अनुभव अब कहउँ खगेसा।
बिनु हरि भजन न जाहिं कलेसा॥
राम कृपा बिनु सुनु खगराई।
जानि न जाइ राम प्रभुताई॥

अनुवाद (हिन्दी)

हे गरुडा, आता मी तुला आपला वैयक्तिक अनुभव सांगतो की, भगवंतांच्या भजनाविना क्लेश दूर होत नाहीत. तसेच श्रीरामांच्या कृपेविना श्रीरामांची महती जाणता येत नाही. ॥३॥

मूल (चौपाई)

जानें बिनु न होइ परतीती।
बिनु परतीति होइ नहिं प्रीती॥
प्रीति बिना नहिं भगति दिढ़ाई।
जिमि खगपति जल कै चिकनाई॥

अनुवाद (हिन्दी)

महती जाणल्याशिवाय त्यांच्याबद्दल विश्वास दृढ होत नाही, विश्वासाविना प्रेम उत्पन्न होत नाही. आणि ज्याप्रमाणे तेलाशिवाय केवळ पाण्याने मातीत ओलावा टिकत नाही, त्याप्रमाणे प्रेमाविना भक्ती दृढ होत नाही.॥४॥

सोरठा

मूल (दोहा)

बिनु गुर होइ कि ग्यान ग्यान कि होइ बिराग बिनु।
गावहिं बेद पुरान सुख कि लहिअ हरि भगति बिनु॥८९(क)॥

अनुवाद (हिन्दी)

गुरूविना कुठे ज्ञान होते काय? अथवा वैराग्याविना ज्ञान मिळू शकते काय? त्याचप्रमाणे वेद पुराणे विचारतात की, श्रीहरींच्या भक्तीविना सुख मिळू शकेल काय?॥८९(क)॥

मूल (दोहा)

कोउ बिश्राम कि पाव तात सहज संतोष बिनु।
चलै कि जल बिनु नाव कोटि जतन पचि पचि मरिअ॥८९(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे तात, स्वाभाविक संतोषाशिवाय कुणाला शांती मिळते काय? कोटॺावधी उपाय करून व जीव तोडून धडपड केली तरी कधी पाण्याविना नौका चालू शकते काय?॥८९ (ख)॥

मूल (चौपाई)

बिनु संतोष न काम नसाहीं।
काम अछत सुख सपनेहुँ नाहीं॥
राम भजन बिनु मिटहिं कि कामा।
थल बिहीन तरु कबहुंँ कि जामा॥

अनुवाद (हिन्दी)

संतोषाविना कामनेचा नाश होत नाही, कामना असताना स्वप्नातही सुख मिळत नाही. आणि श्रीरामांच्या भजनाविना कामना कुठे नष्ट होतात काय? जमिनीविना झाड कुठे उगवू शकते काय?॥१॥

मूल (चौपाई)

बिनु बिग्यान कि समता आवइ।
कोउ अवकास कि नभ बिनु पावइ॥
श्रद्धा बिना धर्म नहिं होई।
बिनु महि गंध कि पावइ कोई॥

अनुवाद (हिन्दी)

तत्त्वज्ञानाविना समभाव येऊ शकतो काय? आकाशाविना कुणाला पोकळी मिळू शकते काय? श्रद्धेविना धर्माचे आचरण होत नाही. पृथ्वीतत्त्वाशिवाय कुणाल गंध मिळू शकतो काय?॥२॥

मूल (चौपाई)

बिनु तप तेज कि कर बिस्तारा।
जल बिनु रस कि होइ संसारा॥
सील कि मिल बिनु बुध सेवकाई।
जिमि बिनु तेज न रूप गोसाँई॥

अनुवाद (हिन्दी)

तपाविना तेज पसरू शकते काय? जलतत्त्वाविना जगात रस असू शकतो काय? पंडितजनांच्या सेवेविना सदाचार मिळू शकतो काय? हे गोस्वामी, तेजतत्त्वाविना रूप कधीच मिळत नाही.॥३॥

मूल (चौपाई)

निजसुखबिनु मन होइ कि थीरा।
परस कि होइ बिहीन समीरा॥
कवनिउ सिद्धि कि बिनु बिस्वासा।
बिनु हरि भजन न भव भय नासा॥

अनुवाद (हिन्दी)

आत्मानंदाविना मन स्थिर होऊ शकते काय? वायुतत्त्वाविना स्पर्श होऊ शकतो काय? विश्वासाविना कोणतीही सिद्धी येऊ शकते काय? अशाच प्रकारे श्रीहरींच्या भजनाविना जन्म-मृत्यूच्या भयाचा नाश होत नाही.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

बिनु बिस्वास भगति नहिं तेहि बिनु द्रवहिं न रामु।
राम कृपा बिनु सपनेहुँ जीव न लह बिश्रामु॥ ९०(क)॥

अनुवाद (हिन्दी)

विश्वासाविना भक्ती येत नाही. भक्तीविना श्रीराम द्रवत नाहीत आणि श्रीरामांच्या कृपेविना जिवाला स्वप्नातही शांतता लाभत नाही.॥९०(क)॥

सोरठा

मूल (दोहा)

अस बिचारि मतिधीर तजि कुतर्क संसय सकल।
भजहु राम रघुबीर करुनाकर सुंदर सुखद॥९०(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे धीरबुद्धी! असा विचार करून संपूर्ण कुतर्क आणि संशय सोडून, करुणेची खाण व सुंदर सुख देणाऱ्या श्रीरामांचे भजन कर.॥९० (ख)॥

मूल (चौपाई)

निज मति सरिस नाथ मैं गाई।
प्रभु प्रताप महिमा खगराई॥
कहेउँ न कछु करि जुगुति बिसेषी।
यह सब मैं निज नयनन्हि देखी॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराजा, हे नाथ, मी आपल्या बुद्धीनुसार प्रभूंचा प्रताप व महिमा यांचे गायन केले. मी यामध्ये कोणतीही गोष्ट अतिशयोक्तीने सांगितली नाही. सर्व आपल्या डोळ्यांनी पाहिले, ते सांगितले आहे.॥१॥

मूल (चौपाई)

महिमा नाम रूप गुन गाथा।
सकल अमित अनंत रघुनाथा॥
निज निज मति मुनि हरि गुन गावहिं।
निगम सेष सिव पार न पावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांचा महिमा, नाम, रूप आणि गुणांची कथा हे सर्व अपार आणि अनंत आहे. तसेच श्रीराम स्वतःही अनंत आहेत. मुनिगण आपापल्या बुद्धीप्रमाणे श्रीहरींचे गुण गातात. वेद, शेष आणि शिव यांना सुद्धा त्यांचा थांग लागत नाही.॥२॥

मूल (चौपाई)

तुम्हहि आदि खग मसक प्रजंता।
नभ उड़ाहिं नहिं पावहिं अंता॥
तिमि रघुपति महिमा अवगाहा।
तात कबहुँ कोउ पाव कि थाहा॥

अनुवाद (हिन्दी)

तुझ्यापासून लहान कीटकापर्यंत सर्व लहान-मोठे जीव आकाशात असतात, परंतु आकाशाचा थांग कोणालाही लागत नाही, त्याचप्रमाणे हे तात, श्रीरघुनाथांचा महिमा हा सुद्धा अथांग आहे. कधी कुणाला त्यांचा थांग लागू शकेल काय?॥३॥

मूल (चौपाई)

रामु काम सत कोटि सुभग तन।
दुर्गा कोटि अमित अरि मर्दन॥
सक्र कोटि सत सरिस बिलासा।
नभ सत कोटि अमित अवकासा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे स्वरूप हे अब्जावधी कामदेवांसमान सुंदर आहे. ते अनंत कोटी दुर्गादेवींच्या समान शत्रुनाशक आहेत. अब्जावधी इंद्रांसमान त्यांचे ऐश्वर्य आहे. अब्जावधी आकाशांसारखा त्यांच्यामध्ये अनंत अवकाश आहे.॥४॥

मूल (दोहा)

मरुत कोटि सत बिपुल बल रबि सत कोटि प्रकास।
ससि सत कोटि सुसीतल समन सकल भव त्रास॥९१(क)॥

अनुवाद (हिन्दी)

अब्जावधी वायूसमान त्यांच्यामध्ये बळ आहे. अब्जावधी सूर्यांसमान त्यांचा प्रकाश आहे.अब्जावधी चंद्रांसमान ते शीतल आहेत व संसारातील सर्व भयांचा नाश करणारे आहेत.॥९१ (क)॥

मूल (दोहा)

काल कोटि सत सरिस अति दुस्तर दुर्ग दुरंत।
धूमकेतु सत कोटि सम दुराधरष भगवंत॥९१(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

अब्जावधी कालांप्रमाणे ते अत्यंत दुस्तर, दुर्गम व दुरंत आहेत. ते भगवान अब्जावधीअग्नींप्रमाणे अत्यंत प्रबल आहेत.॥९१ (ख)॥

मूल (चौपाई)

प्रभु अगाध सत कोटि पताला।
समन कोटि सत सरिस कराला॥
तीरथ अमित कोटि सम पावन।
नाम अखिल अघ पूग नसावन॥

अनुवाद (हिन्दी)

अब्जावधी पाताळांसमान प्रभू हे अथांग आहेत. अब्जावधी यमराजांप्रमाणे भयानक आहेत. अनंत कोटी तीर्थांसमान ते पवित्रकरणारे आहेत. त्यांचे नाम हे संपूर्ण पाप-समूहांचा नाश करणारे आहे.॥१॥

मूल (चौपाई)

हिमगिरि कोटि अचल रघुबीरा।
सिंधु कोटि सत सम गंभीरा॥
कामधेनु सत कोटि समाना।
सकल काम दायक भगवाना॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुवीर कोटॺवधी हिमालयांसमान अचल आहेत आणि अब्जावधी समुद्रांसमान खोल आहेत. भगवान हे अब्जावधी कामधेनूंसमान सर्व कामना पूर्ण करणारे आहेत.॥२॥

मूल (चौपाई)

सारद कोटि अमित चतुराई।
बिधि सत कोटि सृष्टि निपुनाई॥
बिष्नु कोटि सम पालन कर्ता।
रुद्र कोटि सत सम संहर्ता॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्यामध्ये अनंत कोटी सरस्वतींच्या समान चातुर्य आहे. अब्जावधी ब्रह्मदेवांसमान त्यांच्यामध्ये सृष्टिरचनेचे कौशल्य आहे. ते कोटॺवधी विष्णूंसमान पालन करणारे आणि अब्जावधी रुद्रांसमान संहार करणारे आहेत.॥३॥

मूल (चौपाई)

धनद कोटि सत सम धनवाना।
माया कोटि प्रपंच निधाना॥
भार धरन सत कोटि अहीसा।
निरवधि निरुपम प्रभु जगदीसा॥

अनुवाद (हिन्दी)

ते अब्जावधी कुबेरांसमान धनवान आणि कोटॺावधी मायेंच्यासमान सृष्टींचे खजिने आहेत. भार उचलण्यामध्ये ते अब्जावधी शेषांसमान आहेत. फार काय सांगावे! जगदीश्वर प्रभू श्रीराम हे सर्व गोष्टींमध्ये सीमारहित व उपमारहित आहेत.॥४॥

छंद

मूल (दोहा)

निरुपम न उपमा आन राम समान रामु निगम कहै।
जिमि कोटि सत खद्योत सम रबि कहत अति लघुता लहै॥
एहि भाँति निज निज मति बिलास मुनीस हरिहि बखानहीं।
प्रभु भाव गाहक अति कृपाल सप्रेम सुनि सुख मानहीं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम उपमारहित आहेत. त्यांना दुसरी कोणतीही उपमा नाही. श्रीरामांसमान श्रीरामच आहेत, असे वेद म्हणतात. ज्याप्रमाणे अब्जावधी काजव्यांसमान असे म्हटल्यास सूर्याची प्रशंसा होत नाही. उलट त्याला अत्यंत क्षुद्रता प्राप्त होते, त्याची निंदा होते. त्याचप्रमाणे आपापल्या बुद्धीच्या विकासाप्रमाणे मुनीश्वर लोक श्रीहरींचे वर्णन करतात. परंतु ते भक्तांचा भावमात्र ग्रहण करणारे आणि अत्यंत कृपाळू आहेत. भक्त त्यांचे वर्णन प्रेमाने ऐकून त्यात सुख मानतात.

दोहा

मूल (दोहा)

रामु अमित गुन सागर थाह कि पावइ कोइ।
संतन्ह सन जस किछु सुनेउँ तुम्हहि सुनायउँ सोइ॥९२(क)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम हे अपार गुणांचे समुद्र आहेत. त्यांचा थांग कुणाला लागू शकेल काय? संतांकडून मी जे काही ऐकले होते, तेच मी तुला सांगितले.॥९२(क)॥

सोरठा

मूल (दोहा)

भाव बस्य भगवान सुख निधान करुना भवन।
तजि ममता मद मान भजिअ सदा सीतारवन॥९२(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

सुखाचे भांडार, करुणाधाम भगवंत हे प्रेमभावाच्या अधीन असतात. म्हणून ममता, मद आणि मान सोडून नेहमी श्रीजानकीनाथांचे भजन केले पाहिजे.’॥९२(ख)॥

मूल (चौपाई)

सुनि भुसुंडि के बचन सुहाए।
हरषित खगपति पंख फुलाए॥
नयन नीर मन अति हरषाना।
श्रीरघुपति प्रताप उर आना॥

अनुवाद (हिन्दी)

भुशुंडींचे सुंदर बोलणे ऐकून पक्षिराजाने आनंदाने आपले पंख फुगवले. त्याच्या नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले आणि मन अत्यंत आनंदित झाले. त्याने श्रीरघुनाथांचा प्रताप हृदयामध्ये धारण केला.॥१॥

मूल (चौपाई)

पाछिल मोह समुझि पछिताना।
ब्रह्म अनादि मनुज करि माना॥
पुनि पुनि काग चरन सिरु नावा।
जानि राम सम प्रेम बढ़ावा॥

अनुवाद (हिन्दी)

आपला पूर्वीचा मोह आठवल्यामुळे त्याला पश्चात्ताप वाटू लागला की, मी अनादी ब्रह्मास मनुष्य समजलो. गरुडाने काकभुशुंडींच्या चरणांवर वारंवार मस्तक ठेवले आणि त्यांना श्रीरामांसमान मानून त्यांच्याविषयी त्याला खूप प्रेम वाटू लागले.॥२॥

मूल (चौपाई)

गुर बिनु भव निधि तरइ न कोई।
जौं बिरंचि संकर सम होई॥
संसय सर्प ग्रसेउ मोहि ताता।
दुखद लहरि कुतर्क बहु ब्राता॥

अनुवाद (हिन्दी)

गुरूविना कोणीही भवसागर तरू शकत नाही. मग तो ब्रह्मदेव किंवा शिवांसमान का असेना. गरुड म्हणाला, ‘हे तात! मला संदेहरूपी सापाचा दंश झाला होता. पुष्कळशा कुतर्करूपी दुःखाचे वेग येत होते.॥३॥

मूल (चौपाई)

तव सरूप गारुड़ि रघुनायक।
मोहि जिआयउ जन सुखदायक॥
तव प्रसाद मम मोह नसाना।
राम रहस्य अनूपम जाना॥

अनुवाद (हिन्दी)

तुमच्या स्वरूपरूपी गारुडॺाकडून भक्तांना सुख देणाऱ्या श्रीरामचंद्रांनी मला जिवंत केले. तुमच्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला आणि श्रीरघुनाथांचे अनुपम रहस्य मला समजले.’॥४॥

दोहा

मूल (दोहा)

ताहि प्रसंसि बिबिधि बिधि सीस नाइ कर जोरि।
बचन बिनीत सप्रेम मृदु बोलेउ गरुड़ बहोरि॥९३(क)॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडींची अनेक प्रकारे प्रशंसा करून, मस्तक नमवून हात जोडून गरुड प्रेमपूर्वक विनम्र आणि कोमल शब्दांत म्हणाला,॥९३ (क)॥

मूल (दोहा)

प्रभु अपने अबिबेक ते बूझउँ स्वामी तोहि।
कृपासिंधु सादर कहहु जानि दास निज मोहि॥९३(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे प्रभो, हे स्वामी, मी माझ्या अविवेकाचे कारण तुम्हांला विचारतो. हे कृपासमुद्र, मला आपला स्वतःचा सेवक समजून विचारपूर्वक माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगा.॥९३(ख)॥

मूल (चौपाई)

तुम्ह सर्बग्य तग्य तम पारा।
सुमति सुसील सरल आचारा॥
ग्यान बिरति बिग्यान निवासा।
रघुनायक के तुम्ह प्रिय दासा॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही सर्व काही जाणणारे आहात. तत्त्वाचे ज्ञाते आहात. मायेच्या अंधकारा-पलीकडचे आहात. उत्तम बुद्धीने युक्त आहात. सुशील सरळ आचरणाचे, ज्ञान, वैराग्य आणि विज्ञानाचे धाम आणि श्रीरघुनाथांचे प्रिय सेवक आहात.॥१॥

मूल (चौपाई)

कारन कवन देह यह पाई।
तात सकल मोहि कहहु बुझाई॥
राम चरित सर सुंदर स्वामी।
पायहु कहाँ कहहु नभगामी॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्हांला हे काकशरीर कसे मिळाले? ते तात, मला हे सर्व समजावून सांगा. हे स्वामी, हे आकाशगामी, हे सुंदर रामचरितरूपी सरोवर तुम्हांला कुठे मिळाले, ते सांगा.॥२॥

मूल (चौपाई)

नाथ सुना मैं अस सिव पाहीं।
महा प्रलयहुँ नास तव नाहीं॥
मुधा बचन नहिं ईस्वर कहई।
सोउ मोरें मन संसय अहई॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, मी शिवांकडून ऐकले आहे की, महाप्रलयातही तुमचा नाश होत नाही आणि शिव हे कधी मिथ्या बोलत नाहीत. माझ्या मनात तोही संशय आहे.॥३॥

मूल (चौपाई)

अग जग जीव नाग नर देवा।
नाथ सकल जगु काल कलेवा॥
अंड कटाह अमित लय कारी।
कालु सदा दुरतिक्रम भारी॥

अनुवाद (हिन्दी)

कारण हे नाथ, नाग, मनुष्य, देव इत्यादी चराचर जीव आणि सर्व जग हे कालाचा ग्रास आहे. असंख्य ब्रह्मांडाचा नाश करणारा काल हा नेहमीच अनिवार्य आहे.॥४॥

सोरठा

मूल (दोहा)

तुम्हहि न ब्यापत काल अति कराल कारन कवन।
मोहि सो कहहु कृपाल ग्यान प्रभाव कि जोग बल॥९४(क)॥

अनुवाद (हिन्दी)

असा तो अत्यंत भयंकर काल तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. याचे कारण काय? हे कृपाळू, मला सांगा, हा ज्ञानाचा प्रभाव आहे की, योग-बलाचा?॥९४(क)॥

मूल (दोहा)

प्रभु तव आश्रम आएँ मोर मोह भ्रम भाग।
कारन कवन सो नाथ सब कहहु सहित अनुराग॥९४(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभो, तुमच्या आश्रमात येताच माझा मोह व भ्रम पळून गेला. याचे कारण काय? हे नाथ, हे सर्व मला प्रेमाने सांगा.’॥९४(ख)॥

मूल (चौपाई)

गरुड़ गिरा सुनि हरषेउ कागा।
बोलेउ उमा परम अनुरागा॥
धन्य धन्य तव मति उरगारी।
प्रस्न तुम्हारि मोहि अति प्यारी॥

अनुवाद (हिन्दी)

शिव म्हणतात, ‘हे उमे, गरुडाचे हे प्रश्न ऐकून काकभुशुंडी आनंदित झाले आणि मोठॺा प्रेमाने म्हणाले, ‘हे गरुडा! तुझी बुद्धी धन्य आहे, धन्य आहे. तुझे प्रश्न मला आवडले.॥१॥

मूल (चौपाई)

सुनि तव प्रस्न सप्रेम सुहाई।
बहुत जनम कै सुधि मोहि आई॥
सब निज कथा कहउँ मैं गाई।
तात सुनहु सादर मन लाई॥

अनुवाद (हिन्दी)

प्रेमाने विचारलेले तुझे सुंदर प्रश्न ऐकून मला आपल्या पुष्कळ जन्मांची आठवण आली. मी आपली कथा विस्ताराने सांगतो. हे गरुडा, ती आदराने लक्ष देऊन ऐक.॥२॥

मूल (चौपाई)

जप तप मख सम दम ब्रत दाना।
बिरति बिबेक जोग बिग्याना॥
सब कर फल रघुपति पद प्रेमा।
तेहि बिनु कोउ न पावइ छेमा॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक जप, तप, यज्ञ, शम, दम, व्रत, दान, वैराग्य, विवेक, योग, विज्ञान इत्यादी सर्वांचे फळ श्रीरघुनाथांच्या चरणी प्रेम असण्यातच आहे. त्याशिवाय कुणाचे कल्याण होत नाही.॥३॥

मूल (चौपाई)

एहिं तन राम भगति मैं पाई।
ताते मोहि ममता अधिकाई॥
जेहि तें कछु निज स्वारथ होई।
तेहि पर ममता कर सब कोई॥

अनुवाद (हिन्दी)

मी याच शरीराने श्रीरामांची भक्ती प्राप्त केली. त्यामुळे या शरीरावर माझे अधिक प्रेम आहे. ज्याच्यामुळे आपला काही स्वार्थ साधतो, त्याच्यावर सर्वजण प्रेम करतात.॥४॥

सोरठा

मूल (दोहा)

पन्नगारि असि नीति श्रुति संमत सज्जन कहहिं।
अति नीचहु सन प्रीति करिअ जानि निज परम हित॥९५(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हे गरुडा, वेदांनी मान्य केलेली नीती ही अशी आहे आणि सज्जनसुद्धा सांगतात की, आपले परम हित जाणून अत्यंत नीच असलेल्यावरही प्रेम केले पाहिजे.॥९५(क)॥

मूल (दोहा)

पाट कीट तें होइ तेहि तें पाटंबर रुचिर।
कृमि पालइ सबु कोइ परम अपावन प्रान सम॥९५(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

किडॺापासून रेशीम तयार होते. त्यापासून सुंदर वस्त्रे बनतात, म्हणून त्या अत्यंत अपवित्र किडॺालाही सर्वजण मोठॺा प्रेमाने पाळतात.॥९५(ख)॥

मूल (चौपाई)

स्वारथ साँच जीव कहुँ एहा।
मन क्रम बचन राम पद नेहा॥
सोइ पावन सोइ सुभग सरीरा।
जो तनु पाइ भजिअ रघुबीरा॥

अनुवाद (हिन्दी)

कायावाचामनाने श्रीरामांच्या चरणी प्रेम व्हावे, हाच जिवाचा खरा स्वार्थ आहे. जे शरीर लाभल्यावर श्रीरघुनाथांचे भजन करता येईल, तेच शरीर पवित्र व सुंदर होय.॥१॥

मूल (चौपाई)

राम बिमुख लहि बिधिसम देही।
कबि कोबिद न प्रसंसहिं तेही॥
राम भगति एहिं तन उर जामी।
ताते मोहि परम प्रिय स्वामी॥

अनुवाद (हिन्दी)

जो श्रीरामांशी विन्मुख आहे, त्याला जरी ब्रह्मदेवांसमान शरीर मिळाले, तरीही कवी व पंडित त्याची प्रशंसा करीत नाहीत. या शरीरानेच माझ्या मनात रामभक्ती उत्पन्न झाली, म्हणूनच हे स्वामी, हे शरीर मला परमप्रिय आहे.॥२॥

मूल (चौपाई)

तजउँ न तन निज इच्छा मरना।
तन बिनु बेद भजन नहिं बरना॥
प्रथम मोहँ मोहि बहुत बिगोवा।
राम बिमुख सुख कबहुँ न सोवा॥

अनुवाद (हिन्दी)

माझे मरण माझ्या स्वतःच्या इच्छेवर आहे, परंतु तरीही मी हे शरीर सोडत नाही, कारण वेदांनी सांगितले आहे की, शरीराविना भजन होऊ शकत नाही. पूर्वी मोहाने माझी मोठी दुर्दशा केली होती. श्रीरामांना विन्मुख होऊन मी कधी सुखाने झोपू शकलो नाही.॥३॥

मूल (चौपाई)

नाना जनम कर्म पुनि नाना।
किए जोग जप तप मख दाना॥
कवन जोनि जनमेउँ जहँ नाहीं।
मैं खगेस भ्रमि भ्रमि जग माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक जन्मांमध्ये मी अनेक प्रकारचे योग, जप, तप, यज्ञ आणि दान इत्यादी कर्मे केली. हे गरुडा, जगात अशी कोणती योनी आहे की, जिच्यामध्ये मी वारंवार भटकत जन्म घेतला नाही?॥४॥

मूल (चौपाई)

देखेउँ करि सब करम गोसाईं।
सुखी न भयउँ अबहिं की नाईं॥
सुधि मोहि नाथ जन्म बहु केरी।
सिव प्रसाद मति मोहँ न घेरी॥

अनुवाद (हिन्दी)

हे गोस्वामी, मी सर्व कर्मे करून पाहिली, परंतु आता या जन्मासारखा मी कधी सुखी झालो नाही. हे नाथ, मला पुष्कळ जन्मांची आठवण आहे, कारण श्रीशिवांच्या कृपेमुळे माझ्या बुद्धीला मोहाने घेरले नाही.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

प्रथम जन्म के चरित अब कहउँ सुनहु बिहगेस।
सुनि प्रभु पद रति उपजइ जातें मिटहिं कलेस॥९६(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराज, आता मी आपल्या पहिल्या जन्माचे चरित्र सांगतो. ते ऐकल्यावर प्रभूंच्या चरणी प्रेम उत्पन्न होते आणि त्यामुळे सर्व क्लेश नष्ट होतात.॥९६(क)॥

मूल (दोहा)

पूरुब कल्प एक प्रभु जुग कलिजुग मल मूल।
नर अरु नारि अधर्मरत सकल निगम प्रतिकूल॥९६(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभो, पूर्वीच्या एका कल्पामध्ये पापांचे मूळ असलेले कलियुग होते. त्यावेळी पुरुष व स्त्रिया हे सर्व अधर्मपरायण व वेदविरोधी होते.॥९६(ख)॥

मूल (चौपाई)

तेहिं कलिजुग कोसलपुर जाई।
जन्मत भयउँ सूद्र तनु पाई॥
सिव सेवक मन क्रम अरु बानी।
आन देव निंदक अभिमानी॥

अनुवाद (हिन्दी)

त्या कलियुगात मी अयोध्यापुरीमध्ये जाऊन शूद्राचे शरीर प्राप्त केले. मी कायावाचामनाने शिवांचा सेवक होतो परंतु दुसऱ्या देवांची निंदा करणारा घमेंडी होतो.॥१॥

मूल (चौपाई)

धन मद मत्त परम बाचाला।
उग्रबुद्धि उर दंभ बिसाला॥
जदपि रहेउँ रघुपति रजधानी।
तदपि न कछु महिमा तब जानी॥

अनुवाद (हिन्दी)

मी धनाच्या घमेंडीने उन्मत्त, फारच बडबड करणारा व उग्र बुद्धीचा होतो. माझ्या हृदयात फार मोठा दंभ होता. जरी मी श्रीरामचंद्रांच्या राजधानीमध्ये रहात होतो, तथापि मी त्यांचा महिमा त्यावेळी काहीही जाणला नाही.॥२॥

मूल (चौपाई)

अब जाना मैं अवध प्रभावा।
निगमागम पुरान अस गावा॥
कवनेहुँ जन्म अवध बस जोई।
राम परायन सो परि होई॥

अनुवाद (हिन्दी)

आता मी अयोध्येचा प्रभाव जाणला. वेद, शास्त्र आणि पुराणांनी प्रतिपादन केले आहे की, कोणत्याही जन्मात जो कोणी अयोध्येमध्ये रहातो, तो नक्कीच श्रीरामांचा एकनिष्ठ भक्त होतो.॥३॥

मूल (चौपाई)

अवध प्रभाव जान तब प्रानी।
जब उर बसहिं रामु धनुपानी॥
सो कलिकाल कठिन उरगारी।
पाप परायन सब नर नारी॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्येचा प्रभाव जिवाला तेव्हाच कळतो, जेव्हा हातामध्ये धनुष्य धारण करणारे श्रीराम त्याच्या हृदयात निवास करतात. हे गरुडा, तो कलिकाल मोठा कठीण होता. त्यामध्ये सर्व स्त्रीपुरुष पाप करण्यात गढून गेले होते.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

कलिमल ग्रसे धर्म सब लुप्त भए सदग्रंथ।
दंभिन्ह निज मति कल्पि करि प्रगट किए बहु पंथ॥९७(क)॥

अनुवाद (हिन्दी)

कलियुगातील पापांनी सर्व धर्मांना ग्रासले होते. सद्ग्रंथ लुप्त झाले होते. ढोंगी लोकांनी आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करून बरेचसे पंथ निर्माण केले होते.॥९७(क)॥

मूल (दोहा)

भए लोग सब मोहबस लोभ ग्रसे सुभ कर्म।
सुनु हरिजान ग्यान निधि कहउँ कछुक कलिधर्म॥९७(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व लोक मोहाधीन झालेले होते. लोभाने शुभ कर्मे लुप्त केली. हे ज्ञाननिधे, हे श्रीहरींच्या वाहना, ऐकून घे. आता मी कलीचे काही धर्म सांगतो.॥९७(ख)॥

मूल (चौपाई)

बरन धर्म नहिं आश्रम चारी।
श्रुति बिरोध रत सब नर नारी॥
द्विज श्रुति बेचक भूप प्रजासन।
कोउ नहिं मान निगम अनुसासन॥

अनुवाद (हिन्दी)

कलियुगात वर्णधर्म रहात नाही. चारी आश्रम रहात नाहीत. सर्वस्त्री-पुरुष हे वेदांचा विरोध करू लागतात. ब्राह्मण हे वेद विकणारे आणि राजे प्रजेला खाऊन टाकणारे होतात. वेदांची आज्ञा कोणीही मानत नाही.॥१॥

मूल (चौपाई)

मारग सोइ जा कहुँ जोइ भावा।
पंडित सोइ जो गाल बजावा॥
मिथ्यारंभ दंभ रत जोई।
ता कहुँ संत कहइ सब कोई॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याला जो मार्ग चांगला वाटतो, तोच खरा मार्ग असे जो तो मानतो. जो बढाया मारतो तोच पंडित. जो अवडंबर माजवतो आणि जो ढोंगी असतो, त्यालाच सर्वजण संत म्हणतात.॥२॥

मूल (चौपाई)

सोइ सयान जो परधन हारी।
जो कर दंभ सो बड़ आचारी॥
जो कह झूँठ मसखरी जाना।
कलिजुग सोइ गुनवंत बखाना॥

अनुवाद (हिन्दी)

जो वाटेल तसा दुसऱ्याचा पैसा हडप करतो, तोच बुद्धिमान. जो ढोंगी असतो तो मोठा आचारशील. जो खोटे बोलतो आणि थट्टामस्करी करतो, तोच कलियुगात गुणवान मानला जातो.॥३॥

मूल (चौपाई)

निराचार जो श्रुति पथ त्यागी।
कलिजुग सोइ ग्यानी सो बिरागी॥
जाकें नख अरु जटा बिसाला।
सोइ तापस प्रसिद्ध कलिकाला॥

अनुवाद (हिन्दी)

जो आचारहीन असतो व ज्याने वेदमार्ग सोडून दिलेला असतो, तोच कलियुगात ज्ञानी आणि तोच वैराग्यवान होय. ज्याला मोठमोठी नखे आणि लांब लांब जटा आहेत, तोच कलियुगात प्रसिद्ध तपस्वी.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

असुभ बेष भूषन धरें भच्छाभच्छ जे खाहिं।
तेइ जोगी तेइ सिद्ध नर पूज्य ते कलिजुग माहिं॥९८(क)॥

अनुवाद (हिन्दी)

जे अमंगळ वेष आणि अमंगळ भूषणे घालतात व भक्ष्य-अभक्ष्य सर्व खात असतात, तेच योगी, तेच सिद्ध आणि तेच मनुष्य कलियुगात पूज्य असतात.॥९८(क)॥

सोरठा

मूल (दोहा)

जे अपकारी चार तिन्ह कर गौरव मान्य तेइ।
मन क्रम बचन लबार तेइ बकता कलिकाल महुँ॥९८(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांचे वर्तन दुसऱ्याचे अहित करणारे, त्यांचाच मोठा गौरव होतो आणि त्यांनाच सन्माननीय मानले जाते. जे कायावाचामनाने लबाड असतात, तेच कलियुगातील वक्ते मानले जातात.॥९८(ख)॥

मूल (चौपाई)

नारि बिबस नर सकल गोसाईं।
नाचहिं नट मर्कट की नाईं॥
सूद्र द्विजन्ह उपदेसहिं ग्याना।
मेलि जनेऊ लेहिं कुदाना॥

अनुवाद (हिन्दी)

हे गोस्वामी, सर्व पुरुष स्त्रियांच्या पूर्ण अधीन असतात आणि माकडवाल्याच्या माकडाप्रमाणे त्यांच्या तालावर नाचतात. ब्राह्मणांना शूद्र ज्ञानोपदेश करतात आणि गळ्यात जानवे घालून अयोग्य दान घेतात.॥१॥

मूल (चौपाई)

सब नर काम लोभ रत क्रोधी।
देव बिप्र श्रुति संत बिरोधी॥
गुन मंदिर सुंदर पति त्यागी।
भजहिं नारि पर पुरुष अभागी॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व पुरुष काम आणि लोभ यांमध्ये तत्पर व क्रोधी असतात. देव, ब्राह्मण, वेद आणि संतांचे ते विरोधक होतात. दुर्दैवी स्त्रिया गुणी असलेल्या सुंदर पतीला सोडून परपुरुषाशी कुकर्म करतात.॥२॥

मूल (चौपाई)

सौभागिनीं बिभूषन हीना।
बिधवन्ह के सिंगार नबीना॥
गुर सिष बधिर अंध का लेखा।
एक न सुनइ एक नहिं देखा॥

अनुवाद (हिन्दी)

सौभाग्यवती स्त्रिया अलंकार घालत नाहीत, परंतु विधवांचे नित्य नवे शृंगार असतात. शिष्य आणि गुरू यांच्यामध्ये बहिऱ्याचे व आंधळ्याचे नाते असते. शिष्य गुरूचा उपदेश ऐकत नाही व गुरूला ज्ञान-दृष्टी नसल्यामुळे तो पाहू शकत नाही.॥३॥

मूल (चौपाई)

हरइ सिष्य धन सोक न हरई।
सो गुर घोर नरक महुँ परई॥
मातु पिता बालकन्हि बोलावहिं।
उदर भरै सोइ धर्म सिखावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

जो गुरू शिष्याचे धन हरण करतो, परंतु त्याचा शोक हरण करत नाही, तो घोर नरकात पडतो. आई-वडील मुलांना पोट भरण्याचा धर्म शिकवतात.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

ब्रह्म ग्यान बिनु नारि नर कहहिं न दूसरि बात।
कौड़ी लागि लोभ बस करहिं बिप्र गुर घात॥९९(क)॥

अनुवाद (हिन्दी)

स्त्री-पुरुष ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरे काही बोलत नसतात, परंतु लोभामुळे थोडॺाशा लाभासाठी ब्राह्मण व गुरूंचीही हत्या करतात.॥९९(क)॥

मूल (दोहा)

बादहिं सूद्र द्विजन्ह सन हम तुम्ह ते कछु घाटि।
जानइ ब्रह्म सो बिप्रबर आँखि देखावहिं डाटि॥९९(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

शूद्र हे ब्राह्मणांशी वाद-विवाद करतात आणि म्हणतात की, आम्ही तुमच्यापेक्षा कमी आहोत काय? जो ब्रह्म जाणतो तोच श्रेष्ठ ब्राह्मण, असे म्हणून ते रागावून त्यांच्यावर डोळे वटारतात.॥९९(ख)॥

मूल (चौपाई)

पर त्रिय लंपट कपट सयाने।
मोह द्रोह ममता लपटाने॥
तेइ अभेदबादी ग्यानी नर।
देखा मैं चरित्र कलिजुग कर॥

अनुवाद (हिन्दी)

जे परस्त्रीमध्ये आसक्त, कपट करण्यात चतुर व मोह, द्रोह आणि ममता यांमध्ये लिप्त असतात, तेच लोक अभेदवादी ज्ञानी मानले जातात. मी त्या कलियुगाचे चरित्र पाहिले आहे.॥१॥

मूल (चौपाई)

आपु गए अरु तिन्हहू घालहिं।
जे कहुँ सत मारग प्रतिपालहिं॥
कल्प कल्प भरि एक एक नरका।
परहिं जे दूषहिं श्रुति करि तरका॥

अनुवाद (हिन्दी)

ते स्वतः तर नष्ट झालेलेच असतात आणि जे काही लोक सन्मार्गाचे पालन करतात, त्यांनाही नष्ट करून टाकतात. जे तर्क-वितर्क करून वेदांची निंदा करतात, ते लोक कल्प कल्पभर एकेका नरकात पडतात.॥२॥

मूल (चौपाई)

जे बरनाधम तेलि कुम्हारा।
स्वपच किरात कोल कलवारा॥
नारि मुई गृह संपति नासी।
मूड़ मुड़ाइ होहिं संन्यासी॥

अनुवाद (हिन्दी)

तेली, कुंभार, चांडाळ, भिल्ल, कोल, कलाल इत्यादी जे हलक्या वर्णाचे असतात, ते बायको मेल्यावर किंवा घरची संपत्ती नष्ट झाल्यावर डोक्याचे मुंडन करून संन्यासी बनतात.॥३॥

मूल (चौपाई)

ते बिप्रन्ह सन आपु पुजावहिं।
उभय लोक निज हाथ नसावहिं॥
बिप्र निरच्छर लोलुप कामी।
निराचार सठ बृषली स्वामी॥

अनुवाद (हिन्दी)

ते ब्राह्मणांकडून आपली पूजा करून घेतात आणि आपल्याच हातांनी लोक-परलोक दोन्ही नष्ट करतात. ब्राह्मण अशिक्षित, लोभी, कामी, आचारहीन, मूर्ख आणि नीच जातीच्या व्यभिचारिणी स्त्रियांचे स्वामी असतात.॥४॥

मूल (चौपाई)

सूद्र करहिं जप तप ब्रत नाना।
बैठि बरासन कहहिं पुराना॥
सब नर कल्पित करहिं अचारा।
जाइ न बरनि अनीति अपारा॥

अनुवाद (हिन्दी)

शूद्र हे नाना प्रकारचे जप, तप आणि व्रते करीत व्यासपीठावर बसून पुराण सांगतात. सर्व माणसे मनाला वाटेल तसे आचरण करतात. त्या अपार अनीतीचे वर्णन करणेच कठीण.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

भए बरन संकर कलि भिन्नसेतु सब लोग।
करहिं पाप पावहिं दुख भय रुज सोक बियोग॥१००(क)॥

अनुवाद (हिन्दी)

कलियुगातील सर्व लोक वर्णसंकर करणारे व मर्यादा सोडून वागणारे असतात. ते पापे करीत असल्यामुळे दुःख, भय, रोग, शोक आणि प्रिय वस्तूचा वियोग त्यांना होतो.॥१००(क)॥

मूल (दोहा)

श्रुति संमत हरि भक्ति पथ संजुत बिरति बिबेक।
तेहिं न चलहिं नर मोह बस कल्पहिं पंथ अनेक॥१००(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

वेदसंमत, वैराग्य व ज्ञानयुक्त असा जो हरिभक्तीचा मार्ग, त्या मार्गाने मोहामुळे माणसे जात नाहीत आणि अनेक नवनव्या संप्रदायांची कल्पना मांडतात.॥१००(ख)॥

छंद

मूल (दोहा)

बहु दाम सँवारहिंधाम जती।
बिषया हरि लीन्हि न रहि बिरती॥
तपसी धनवंत दरिद्र गृही।
कलि कौतुक तात न जात कही॥

अनुवाद (हिन्दी)

संन्यासी लोक बराच पैसा खर्च करून आपले मठ सजवतात. त्यांच्यामध्ये वैराग्य उरलेले नसते. त्यांचे वैराग्य विषयांनी हरण केलेले असते. तपस्वी लोक धनवान आणि गृहस्थ दरिद्री. हे तात, अशी ही कलियुगाची लीला काही अवर्णनीय आहे.॥१॥

मूल (दोहा)

कुलवंति निकारहिं नारि सती।
गृह आनहिं चेरि निबेरि गती॥
सुत मानहिं मातु पिता तब लौं।
अबलानन दीख नहीं जब लौं॥

अनुवाद (हिन्दी)

पुरुष हे कुलवती आणि सती असलेल्या पत्नीला घराबाहेर काढतात आणि चांगली वर्तणूक सोडून घरात दासी आणून ठेवतात. पुत्राला जोपर्यंत बायकोचा चेहरा दिसलेला नसतो, तोपर्यंतच तो आपल्या माता-पित्यांना मान देतो.॥२॥

मूल (दोहा)

ससुरारि पिआरि लगी जब तें।
रिपुरूप कुटुंब भए तब तें॥
नृप पाप परायन धर्म नहीं।
करि दंड बिडंब प्रजा नितहीं॥

अनुवाद (हिन्दी)

सासुरवाडी आवडू लागली की, घरचे लोक शत्रू होतात. राजे लोक पाप- मग्न होतात. त्यांच्यामध्ये धर्म रहात नाही. ते प्रजेला नेहमी अपराध नसताना शिक्षा देतात आणि तिची दुर्दशा करतात.॥३॥

मूल (दोहा)

धनवंत कुलीन मलीन अपी।
द्विज चिन्ह जनेउ उघार तपी॥
नहिं मान पुरान न बेदहि जो।
हरि सेवक संत सही कलि सो॥

अनुवाद (हिन्दी)

धनवान लोक खालच्या जातीचे असले, तरी कुलीन मानले जातात. ब्राह्मणांमध्ये ब्राह्मण्याचे चिन्ह म्हणून फक्त जानवे उरते आणि नग्न राहणे म्हणजे तपस्वीपण मानले जाते. जे वेदांना व पुराणांना मानत नसतात, तेच लोक कलियुगात हरिभक्त आणि संत म्हणवून घेतात.॥४॥

मूल (दोहा)

कबि बृंद उदार दुनी न सुनी।
गुन दूषक ब्रात न कोपि गुनी॥
कलि बारहिं बार दुकाल परै।
बिनु अन्न दुखी सब लोग मरै॥

अनुवाद (हिन्दी)

कवी पुष्कळ असतात, परंतु जगात कवींना आश्रय देणारा कोणी ऐकिवात येत नाही. गुणांमध्ये दोष दाखविणारे खूप असतात, परंतु कोणीही गुणी नसतो. कलियुगात वारंवार दुष्काळ पडतो. अन्नाअभावी कित्येक लोक तडफडून मरतात.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

सुनु खगेस कलि कपट हठ दंभ द्वेष पाषंड।
मान मोह मारादि मद ब्यापि रहे ब्रह्मंड॥१०१(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराज गरुडा, अशा त्या कलियुगात कपट, दुराग्रह, दंभ, द्वेष, पाखंड, मान, मोह, काम आणि मद हे संपूर्ण ब्रह्मांडात भरलेले होते.॥१०१(क)॥

मूल (दोहा)

तामस धर्म करहिं नर जप तप ब्रत मख दान।
देव न बरषहिं धरनीं बए न जामहिं धान॥१०१(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

मनुष्य जप, तप, यज्ञ, व्रत, दान इत्यादी धर्म तामसी भावनेने करू लागले. इंद्रदेव पृथ्वीवर पाऊस पाडत नव्हता आणि पेरलेले धान्य उगवत नव्हते.॥१०१(ख)॥

छंद

मूल (दोहा)

अबला कच भूषन भूरि छुधा।
धनहीन दुखी ममता बहुधा॥
सुख चाहहिं मूढ़ न धर्म रता।
मति थोरि कठोरि न कोमलता॥

अनुवाद (हिन्दी)

स्त्रियांचे केस हेच आभूषण होते, दुसरे आभूषण उरलेच नव्हते आणि त्या नेहमी अतृप्त असत. त्या धनहीन आणि अनेक प्रकारची ममता असल्यामुळे दुःखी असत. त्या मूर्ख स्त्रियांना सुख हवे होते, परंतु धर्माबद्दल त्यांना प्रेम नसे. बुद्धी थोडीशी होती, परंतु त्या कर्कश होत्या. त्यांच्यामध्ये कोमलता नव्हती.॥१॥

मूल (दोहा)

नर पीड़ित रोग न भोग कहीं।
अभिमान बिरोध अकारनहीं॥
लघु जीवन संबतु पंच दसा।
कलपांत न नास गुमानु असा॥

अनुवाद (हिन्दी)

मनुष्य रोगांनी त्रस्त होते. सुख कुठेच नव्हते. ते कारण नसता अभिमान व भांडण करीत. दहा-पाच वर्षांसारखे अल्प जीवन, परंतु घमेंड अशी की, जणू कल्पांत होईपर्यंत ते जगणार, त्यांचा नाश होणार नाही.॥२॥

मूल (दोहा)

कलिकाल बिहाल किए मनुजा।
नहिं मानत क्वौ अनुजा तनुजा॥
नहिं तोष बिचार न सीतलता।
सब जाति कुजाति भए मगता॥

अनुवाद (हिन्दी)

कलिकालाने माणसाला हलाखीला पोहोचवले होते. कुणाला बहीण-मुलगी यांचाही विचार उरला नव्हता. लोकांमध्ये संतोष नव्हता, विवेक आणि शांतपणा नव्हता. लहानथोर जातींचे सर्वच लोक भीक मागणारे झाले.॥३॥

मूल (दोहा)

इरिषा परुषाच्छर लोलुपता।
भरि पूरि रही समता बिगता॥
सब लोग बियोग बिसोक हए।
बरनाश्रम धर्म अचार गए॥

अनुवाद (हिन्दी)

ईर्ष्या, कठोर भाषण, लोभ हे मोठॺा प्रमाणात होते. समता नव्हती. लोक वियोग व शोक यांनी युक्त होते. वर्णाश्रमधर्म नष्ट झाले.॥४॥

मूल (दोहा)

दम दान दया नहिं जानपनी।
जड़ता परबंचनताति घनी॥
तनु पोषक नारि नरा सगरे।
परनिंदक जे जग मो बगरे॥

अनुवाद (हिन्दी)

इंद्रियांचे दमन, दान, दया आणि शहाणपणा कुणातही उरला नाही. मूर्खपणा, दुसऱ्याला फसविणे या गोष्टी फार वाढल्या. सर्व स्त्री-पुरुष शरीराचे पालन-पोषण करण्यामध्येच मग्न असत. जगामध्ये दुसऱ्याची निंदा करणारे लोकच भरले होते.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

सुनु ब्यालारि काल कलि मल अवगुन आगार।
गुनउ बहुत कलिजुग कर बिनु प्रयास निस्तार॥१०२(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हे गरुडा, कलिकाल हा पाप व अवगुणांचे घर आहे. परंतु कलियुगात एक मोठा गुणही आहे. त्यामध्ये परिश्रमाविनाच भव-बंधनातून मुक्ती मिळते.॥१०२(क)॥

मूल (दोहा)

कृतजुग त्रेताँ द्वापर पूजा मख अरु जोग।
जो गति होइ सो कलि हरि नाम ते पावहिं लोग॥१०२(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग यांमध्ये पूजा, यज्ञ आणि योग यांमुळे जी गती मिळते, तीच गती कलियुगात लोकांना फक्त भगवंतांच्या नाम-स्मरणाने प्राप्त होते.॥१०२(ख)॥

मूल (चौपाई)

कृतजुग सब जोगी बिग्यानी।
करि हरि ध्यान तरहिं भव प्रानी॥
त्रेताँ बिबिध जग्य नर करहीं।
प्रभुहि समर्पि कर्म भव तरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

सत्ययुगामध्ये सर्वजण योगी आणि ज्ञानी असतात. हरीचे ध्यान करून सर्व प्राणी भवसागर तरून जातात. त्रेतायुगात मनुष्य अनेक प्रकारचे यज्ञ करतात आणि सर्व कर्मे प्रभूंना समर्पित करून भवसागर पार करतात.॥१॥

मूल (चौपाई)

द्वापर करि रघुपति पद पूजा।
नर भव तरहिं उपाय न दूजा॥
कलिजुग केवल हरि गुन गाहा।
गावत नर पावहिं भव थाहा॥

अनुवाद (हिन्दी)

द्वापर युगात श्रीरघुनाथांच्या चरणांची पूजा करून मनुष्य संसारातून तरून जातो, दुसरा कोणताही उपाय नाही आणि कलियुगात तर फक्त श्रीहरींच्या गुणांचे गायन केल्यानेच मनुष्याला भवसागराचा थांग सापडतो.॥२॥

मूल (चौपाई)

कलिजुग जोग न जग्य न ग्याना।
एक अधार राम गुन गाना॥
सब भरोस तजि जो भज रामहि।
प्रेम समेत गाव गुन ग्रामहि॥

अनुवाद (हिन्दी)

कलियुगामध्ये योग, यज्ञ आणि ज्ञान नाहीतच. श्रीरामांचे गुणगान हाच एकमात्र आधार आहे. म्हणून सर्व आधार सोडून जो श्रीरामांना भजतो आणि प्रेमाने त्यांचे गुणगान करतो,॥३॥

मूल (चौपाई)

सोइ भव तर कछु संसय नाहीं।
नाम प्रताप प्रगट कलि माहीं॥
कलि कर एक पुनीत प्रतापा।
मानस पुन्य होहिं नहिं पापा॥

अनुवाद (हिन्दी)

तोच भवसागर पार करून जातो, यात कोणताही संशय नाही. नामाचा प्रभाव कलियुगात प्रत्यक्ष आहे. कलियुगाचा एक पवित्र महिमा असा आहे की, यामध्ये मनाने केलेले सुविचार पुण्यप्रद असतात; परंतु मनात येणारे कुविचार पाप ठरत नाहीत.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

कलिजुग सम जुग आन नहिं जौं नर कर बिस्वास।
गाइ राम गुन गन बिमल भव तर बिनहिं प्रयास॥१०३(क)॥

अनुवाद (हिन्दी)

मनुष्याने विश्वास ठेवला, तर कलियुगासमान दुसरे युग नाही. कारण या युगात श्रीरामांचे निर्मल गुणगान करीत करीत मनुष्य विनासायास संसाररूपी समुद्र तरून जातो.॥१०३(क)॥

मूल (दोहा)

प्रगट चारि पद धर्म के कलि महुँ एक प्रधान।
जेन केन बिधि दीन्हें दान करइ कल्यान॥१०३(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

सत्य, दया, तप आणि दान हे धर्माचे चार चरण प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी कलियुगात दानरूपी एकच चरण मुख्य आहे. कोणत्याही प्रकारे दान दिल्यावर ते कल्याणच करते.॥१०३(ख)॥

मूल (चौपाई)

नित जुग धर्म होहिं सब केरे।
हृदयँ राम माया के प्रेरे॥
सुद्ध सत्व समता बिग्याना।
कृत प्रभाव प्रसन्न मन जाना॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या मायेने प्रेरित होऊन सर्वांच्या हृदयांमध्ये सर्वच धर्म नेहमी असतात. शुद्ध सत्त्वगुण, समता, विज्ञान आणि मन प्रसन्न असणे या गोष्टी सत्ययुगाचा प्रभाव समजाव्यात.॥१॥

मूल (चौपाई)

सत्व बहुत रज कछु रति कर्मा।
सब बिधि सुख त्रेता कर धर्मा॥
बहु रज स्वल्प सत्व कछु तामस।
द्वापर धर्म हरष भय मानस॥

अनुवाद (हिन्दी)

सत्त्वगुण अधिक असेल, थोडासा रजोगुण असेल, कर्म करण्यात प्रेम असेल आणि सर्वप्रकारे सुख असेल तर हा त्रेतायुगाचा धर्म होय. रजोगुण जास्त असेल, सत्त्वगुण फारच कमी असेल आणि काहीसा तमोगुण असेल, मनात हर्ष व भय असेल, तर हा द्वापर युगाचा धर्म होय.॥२॥

मूल (चौपाई)

तामस बहुत रजोगुन थोरा।
कलि प्रभाव बिरोध चहुँ ओरा॥
बुध जुग धर्म जानि मन माहीं।
तजि अधर्म रति धर्म कराहीं॥

अनुवाद (हिन्दी)

तमोगुण जास्त असेल, रजोगुण थोडा असेल, चोहीकडे वैर असेल, तर हा कलियुगाचा प्रभाव होय. पंडित लोक युगांचे धर्म मनात ओळखून, अधर्म सोडून धर्मावर प्रेम करतात.॥३॥

मूल (चौपाई)

काल धर्म नहिं ब्यापहिं ताही।
रघुपति चरन प्रीति अति जाही॥
नट कृत बिकट कपट खगराया।
नट सेवकहि न ब्यापइ माया॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याला श्रीरघुनाथांच्या चरणी अत्यंत प्रेम आहे, त्याच्यावर युग-धर्माचा प्रभाव पडत नाही. हे पक्षिराज, जादुगाराने केलेली जादू पहाणाऱ्याला न कळणारी असते, परंतु त्याच्या साहाय्यकावर त्याच्या जादूचा पगडा बसत नाही.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

हरि माया कृत दोष गुन बिनु हरि भजन न जाहिं।
भजिअ राम तजि काम सब अस बिचारि मन माहिं॥ १०४(क)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीहरीच्या मायेने उत्पन्न केलेले दोष आणि गुण श्रीहरीच्या भजनाविना जात नाहीत. मनात असा विचार धरून सर्व कामना सोडून, निष्काम भावनेने श्रीरामांचे भजन केले पाहिजे.॥१०४(क)॥

मूल (दोहा)

तेहिं कलिकाल बरष बहु बसेउँ अवध बिहगेस।
परेउ दुकाल बिपति बस तब मैं गयउँ बिदेस॥१०४(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्षिराज, त्या कलिकालामध्ये मी बरीच वर्षे अयोध्येत राहिलो. एकदा तेथे दुष्काळ पडला, तेव्हा अन्ना अभावी मी परदेशी गेलो.॥१०४(ख)॥

मूल (चौपाई)

गयउँ उजेनी सुनु उरगारी।
दीन मलीन दरिद्र दुखारी॥
गएँ काल कछु संपति पाई।
तहँ पुनि करउँ संभु सेवकाई॥

अनुवाद (हिन्दी)

हे गरुडा, मी दीन, उदास, दरिद्री आणि दुःखी बनून उज्जयनीला गेलो. काही काळ गेल्यावर व थोडी संपत्ती मिळाल्यावर मग मी तेथेच भगवान शंकरांची आराधना करू लागलो.॥१॥

मूल (चौपाई)

बिप्र एक बैदिक सिव पूजा।
करइ सदा तेहि काजु न दूजा॥
परम साधु परमारथ बिंदक।
संभु उपासक नहिं हरि निंदक॥

अनुवाद (हिन्दी)

एक ब्राह्मण वेदविधिपूर्वक श्रीशिवांची नित्य पूजा करीत होता. त्याला दुसरे काही काम नव्हते. तो श्रेष्ठ साधू व परमार्थ जाणणारा होता. तो शंभूंचा उपासक होता, परंतु श्रीहरींची निंदा करणारा नव्हता.॥२॥

मूल (चौपाई)

तेहि सेवउँ मैं कपट समेता।
द्विज दयाल अति नीति निकेता॥
बाहिज नम्र देखि मोहि साईं।
बिप्र पढ़ाव पुत्र की नाईं॥

अनुवाद (हिन्दी)

मी मनात कपट धरून त्याची सेवा करू लागलो. तो ब्राह्मण मोठा दयाळू आणि नीतिमान होता. हे स्वामी, वरून मी नम्र असल्याचे पाहून ब्राह्मण मला पुत्रासारखा मानून शिकवीत असे.॥३॥

मूल (चौपाई)

संभु मंत्र मोहि द्विजबर दीन्हा।
सुभ उपदेस बिबिध बिधि कीन्हा॥
जपउँ मंत्र सिव मंदिर जाई।
हृदयँ दंभ अहमिति अधिकाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्या ब्राह्मणश्रेष्ठाने मला शिवांचा मंत्र दिला आणि अनेक प्रकारचा चांगला उपदेश केला. मी शिव-मंदिरात जाऊन मंत्र जपत असे. माझ्या मनात दंभ व अहंकार वाढत गेला.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

मैं खल मल संकुल मति नीच जाति बस मोह।
हरिजन द्विज देखें जरउँ करउँ बिष्नु कर द्रोह॥१०५(क)॥

अनुवाद (हिन्दी)

मी दुष्ट झालो. मी नीच जातीचा व पापमय मलिन बुद्धीचा होतो, त्यामुळे मोहवश होऊन श्रीहरींच्या भक्तांना व ब्राह्मणांना पाहून जळफळत असे आणि भगवान विष्णूंचा द्रोह करीत असे.॥१०५(क)॥