१३ मासपारायण, अठ्ठाविसावा विश्राम

मूल (दोहा)

सिव बिरंचि कहुँ मोहइ को है बपुरा आन।
अस जियँ जानि भजहिं मुनि माया पति भगवान॥ ६२(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

ही माया जर शिव आणि ब्रह्मदेवांनाही मोहित करते, तर दुसरा बिचारा कोण लागून गेला आहे? मनात असे जाणून मुनिजन भगवंतांचे भजन करतात.॥६२(ख)॥

मूल (चौपाई)

गयउ गरुड़ जहँ बसइ भुसुंडा।
मति अकुंठ हरि भगति अखंडा॥
देखि सैल प्रसन्न मन भयऊ।
माया मोह सोच सब गयऊ॥

अनुवाद (हिन्दी)

जेथे अकुंठित बुद्धी व पूर्ण भक्ती असणारे काकभुशुंडी रहातात, तेथे गरुड गेला. तो पर्वत पाहून तो प्रसन्न झाला आणि त्याच्या दर्शनानेच त्याची सर्व माया, मोह व चिंता नाहीशी झाली.॥१॥

मूल (चौपाई)

करि तड़ाग मज्जन जलपाना।
बट तर गयउ हृदयँ हरषाना॥
बृद्ध बृद्ध बिहंग तहँ आए।
सुनै राम के चरित सुहाए॥

अनुवाद (हिन्दी)

तलावात स्नान करून व पाणी पिऊन तो प्रसन्न मनाने वटवृक्षाखाली गेला. तेथे श्रीरामांचे सुंदर चरित्र ऐकण्यासाठी वयोवृद्ध पक्षी आले होते.॥२॥

मूल (चौपाई)

कथा अरंभ करै सोइ चाहा।
तेही समय गयउ खगनाहा॥
आवत देखि सकल खगराजा।
हरषेउ बायस सहित समाजा॥

अनुवाद (हिन्दी)

भुशुंडी कथा सांगण्यास प्रारंभ करणार, इतक्यात पक्षिराज गरुड तेथे पोहोचला. पक्ष्यांचा राजा गरुड याला येताना पाहून काकभुशुंडीसह सर्व पक्षिसमाजाला आनंद झाला.॥३॥

मूल (चौपाई)

अति आदर खगपति कर कीन्हा।
स्वागत पूछि सुआसन दीन्हा॥
करि पूजा समेत अनुरागा।
मधुर बचन तब बोलेउ कागा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी पक्षिराज गरुडाचा खूप आदर-सत्कार केला. क्षेमकुशल विचारल्यावर बसण्यासाठी चांगले आसन दिले. मग प्रेमपूर्वक स्वागत करून काकभुशुंडी गोड शब्दांत म्हणाले,॥४॥

मूल (दोहा)

नाथ कृतारथ भयउँ मैं तव दरसन खगराज।
आयसु देहु सो करौं अब प्रभु आयहु केहि काज॥ ६३(क)॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे नाथ, हे पक्षिराज, तुमच्या दर्शनाने मी कृतार्थ झालो. तुम्ही जे सांगाल, ते मी करीन. हे प्रभो, तुम्ही कोणत्या कामासाठी आला आहात?’॥६३(क)॥

मूल (दोहा)

सदा कृतारथ रूप तुम्ह कह मृदु बचन खगेस।
जेहि कै अस्तुति सादर निज मुख कीन्हि महेस॥ ६३(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

पक्षिराज गरुड गोड शब्दांत म्हणाला, ‘तुम्ही तर सदा कृतार्थरूप आहात. तुमचे मोठेपण स्वतः शिवांनी आदरपूर्वक आपल्या श्रीमुखाने सांगितले आहे.॥ ६३(ख)॥

मूल (चौपाई)

सुनहु तात जेहि कारन आयउँ।
सो सब भयउ दरस तव पायउँ॥
देखि परम पावन तव आश्रम।
गयउ मोह संसय नाना भ्रम॥

अनुवाद (हिन्दी)

हे तात, मी ज्यासाठी आलो होतो, ते सर्व काम येथे येताच पूर्ण झाले. शिवाय तुमचे दर्शन घडले. तुमचा पवित्र आश्रम पाहून माझा मोह, संशय आणि अनेक प्रकारचे भ्रम हे सर्व काही नाहीसे झाले.॥१॥

मूल (चौपाई)

अब श्रीराम कथा अति पावनि।
सदा सुखद दुख पुंज नसावनि॥
सादर तात सुनावहु मोही।
बार बार बिनवउँ प्रभु तोही॥

अनुवाद (हिन्दी)

आता हे तात, मला तुम्ही श्रीरामांची अत्यंत पवित्र करणारी, नित्य सुख देणारी आणि दुःखसमूहांचा नाश करणारी कथा आदराने समजावून सांगा. मी वारंवार तुम्हांला हीच विनवणी करतो.’॥ २॥

मूल (चौपाई)

सुनत गरुड़ कै गिरा बिनीता।
सरल सुप्रेम सुखद सुपुनीता॥
भयउ तासु मन परम उछाहा।
लाग कहै रघुपति गुन गाहा॥

अनुवाद (हिन्दी)

गरुडाची विनम्र, सरळ, सुंदर, प्रेमयुक्त, सुखप्रद आणि अत्यंत पवित्र वाणी ऐकताच भुशुंडींच्या मनाला परम उत्साह वाटला आणि ते श्रीरघुनाथांच्या गुणांची कथा सांगू लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

प्रथमहिं अति अनुराग भवानी।
रामचरित सर कहेसि बखानी॥
पुनि नारद कर मोह अपारा।
कहेसि बहुरि रावन अवतारा॥

अनुवाद (हिन्दी)

हे भवानी, प्रथम त्यांनी मोठॺा प्रेमाने रामचरितमानस सरोवराचे रूपक समजावून सांगितले. नंतर नारदांचा अपार मोह व मग रावणाचा जन्मवृत्तान्त सांगितला.॥ ४॥

मूल (चौपाई)

प्रभु अवतार कथा पुनि गाई।
तब सिसु चरित कहेसि मन लाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर प्रभूंच्या अवताराची कथा वर्णन केली. मग मनःपूर्वक श्रीरामांच्या बाललीला सांगितल्या.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

बालचरित कहि बिबिधि बिधि मन महँ परम उछाह।
रिषि आगवन कहेसि पुनि श्रीरघुबीर बिबाह॥ ६४॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्या मनात मोठा उत्साह भरला होता. अनेक प्रकारच्या बाललीला सांगून नंतर विश्वमित्रांचे अयोध्येमध्ये आगमन आणि श्रीरघुवीरांच्या विवाहाचे वर्णन केले.॥ ६४॥

मूल (चौपाई)

बहुरि राम अभिषेक प्रसंगा।
पुनि नृप बचन राज रस भंगा॥
पुरबासिन्ह कर बिरह बिषादा।
कहेसि राम लछिमन संबादा॥

अनुवाद (हिन्दी)

मग श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग, राजा दशरथांच्या वचनामुळे रसभंग होणे, नंतर नगरवासीयांचा विरह, विषाद आणि श्रीराम-लक्ष्मण यांचा झालेला संवाद सांगितला.॥ १॥

मूल (चौपाई)

बिपिन गवन केवट अनुरागा।
सुरसरि उतरि निवास प्रयागा॥
बालमीक प्रभु मिलन बखाना।
चित्रकूट जिमि बसे भगवाना॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे वनगमन, नाविक-प्रसंग, गंगा पार करून प्रयागामध्ये निवास, वाल्मीकी आणि प्रभू श्रीरामांची भेट आणि भगवंतांनी चित्रकूटावर निवास करणे, हे सर्व काही सांगितले.॥२॥

मूल (चौपाई)

सचिवागवन नगर नृप मरना।
भरतागवन प्रेम बहु बरना॥
करि नृप क्रिया संग पुरबासी।
भरत गए जहँ प्रभु सुख रासी॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर मंत्री सुमंत्राचे अयोध्येत येणे, राजा दशरथांचे देहावसान, भरताचे आजोळहून अयोध्येसपरत येणे आणि त्याचे प्रेम या सर्वांचे बरेच वर्णन केले. राजाची अंत्येष्टी क्रिया करून नगरवासीयांसह भरत सुखनिधान प्रभू श्रीरामचंद्र यांच्याकडे गेल्याची वार्ता,॥३॥

मूल (चौपाई)

पुनि रघुपति बहु बिधि समुझाए।
लै पादुका अवधपुर आए॥
भरत रहनि सुरपति सुत करनी।
प्रभु अरु अत्रि भेंट पुनि बरनी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांनी भरताला अनेक प्रकारे समजावणे, ते ऐकून भरताचे पादुका घेऊन अयोध्येस परतणे, ही कथा सांगितली. भरताची नंदिग्रामामध्ये राहण्याची रीत, इंद्रपुत्र जयंताचे नीच कर्म आणि मग प्रभू श्रीरामांची मुनी अत्रींशी भेट-यांचे वर्णन केले.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

कहि बिराध बध जेहि बिधि देह तजी सरभंग।
बरनि सुतीछन प्रीति पुनि प्रभु अगस्ति सतसंग॥ ६५॥

अनुवाद (हिन्दी)

विराधाचा वध कसा केला, शरभंगांनी शरीर त्याग केला तो प्रसंग, नंतर सुतीक्ष्णाच्या प्रेमाचे वर्णन करून प्रभू व अगस्त्य यांच्या सत्संगाचा वृत्तांत सांगितला.॥ ६५॥

मूल (चौपाई)

कहि दंडक बन पावनताई।
गीध मइत्री पुनि तेहिं गाई॥
पुनि प्रभु पंचबटीं कृत बासा।
भंजी सकल मुनिन्ह की त्रासा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी दंडकवनास पवित्र केल्याचे सांगून मग काकभुशुंडींनी गृध्रराज जटायूशी मैत्रीचे वर्णन केले. मग कशाप्रकारे प्रभूंनी पंचवटीत निवास करून सर्व मुनींचे भय दूर केले,॥ १॥

मूल (चौपाई)

पुनि लछिमन उपदेस अनूपा।
सूपनखा जिमि कीन्हि कुरूपा॥
खर दूषन बध बहुरि बखाना।
जिमि सब मरमु दसानन जाना॥

अनुवाद (हिन्दी)

आणि लक्ष्मणाला अनुपम उपदेश दिला व शूर्पणखेला कुरूप केले. खरदूषण यांचा वध आणि कशा प्रकारे रावणाला ही बातमी समजली, हे वर्णन करून सांगितले.॥२॥

मूल (चौपाई)

दसकंधर मारीच बतकही।
जेहि बिधि भई सो सब तेहिं कही॥
पुनि माया सीता कर हरना।
श्रीरघुबीर बिरह कछु बरना॥

अनुवाद (हिन्दी)

मग रावण व मारीच यांची झालेली चर्चा सांगितली. मायासीतेचे हरण व रघुवीरांच्या विरहाचे काहीसे वर्णन ऐकविले.॥३॥

मूल (चौपाई)

पुनि प्रभु गीध क्रिया जिमि कीन्ही।
बधि कबंध सबरिहि गति दीन्ही॥
बहुरि बिरह बरनत रघुबीरा।
जेहि बिधि गए सरोबर तीरा॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर प्रभूंनी गृध्र जटायूची कशाप्रकारे क्रिया केली, कबंधाला मारून शबरीला परमगती कशी दिली आणि नंतर श्रीरामांच्या विरहाचे वर्णन करीत श्रीरघुवीर पंपासरोवरावर कसे आले, ते सर्व सांगितले.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

प्रभु नारद संबाद कहि मारुति मिलन प्रसंग।
पुनि सुग्रीव मिताई बालि प्रान कर भंग॥ ६६(क)॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू व नारदांचा संवाद आणि मारुतीच्या भेटीचा प्रसंग सांगून मग सुग्रीवाशी मैत्री आणि वालीच्या वधाचे वर्णन केले.॥ ६६(क)॥

मूल (दोहा)

कपिहि तिलक करि प्रभु कृत सैल प्रबरषन बास।
बरनन बर्षा सरद अरु राम रोष कपि त्रास॥ ६६(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

सुग्रीवाचा राज्याभिषेक झाल्यावर प्रभूंनी प्रवर्षण पर्वतावर निवास केला त्यांचे आणि वर्षा व शरद ऋतूंचे वर्णन, श्रीरामांचा सुग्रीवावर रोष, सुग्रीवाची भीती इत्यादी प्रसंग सांगितले.॥ ६६(ख)॥

मूल (चौपाई)

जेहि बिधि कपिपति कीस पठाए।
सीता खोज सकल दिसि धाए॥
बिबर प्रबेस कीन्ह जेहि भाँती।
कपिन्ह बहोरि मिला संपाती॥

अनुवाद (हिन्दी)

वानरराज सुग्रीवाने वानरांना कशाप्रकारे पाठविले, सीतेच्या शोधासाठी ते सर्व दिशांना कसे गेले, कशा प्रकारे त्यांनी गुहेत प्रवेश केला आणि मग संपाती कसा भेटला, ही कथा सांगितली.॥१॥

मूल (चौपाई)

सुनि सब कथा समीर कुमारा।
नाघत भयउ पयोधि अपारा॥
लंकाँ कपि प्रबेस जिमि कीन्हा।
पुनि सीतहि धीरजु जिमि दीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

संपातीकडून सीतेची वार्ता ऐकून पवनपुत्र हनुमान कशाप्रकारे अपार समुद्र ओलांडून गेला, नंतर हनुमानाने लंकेत प्रवेश कसा केला आणि मग सीतेला धीर कसा दिला, हे सर्व सांगितले.॥२॥

मूल (चौपाई)

बन उजारि रावनहि प्रबोधी।
पुर दहि नाघेउ बहुरि पयोधी॥
आए कपि सब जहँ रघुराई।
बैदेही की कुसल सुनाई॥

अनुवाद (हिन्दी)

अशोकवन उध्वस्त करून, रावणाला समजावून, लंका जाळून त्याने समुद्र कसा ओलांडला आणि कशाप्रकारे सर्व वानर श्रीरघुनाथांजवळ आले आणि जानकीची खुशाली कशी सांगितली,॥३॥

मूल (चौपाई)

सेन समेति जथा रघुबीरा।
उतरे जाइ बारिनिधि तीरा॥
मिला बिभीषन जेहि बिधि आई।
सागर निग्रह कथा सुनाई॥

अनुवाद (हिन्दी)

मग श्रीरघुवीर सेनेसह निघून कशाप्रकारे समुद्रतटावर उतरले आणि कशाप्रकारे बिभीषण येऊन त्यांना भेटला, हे सर्व आणि समुद्राला केलेल्या शासनाची कथा त्यांनी सांगितली.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

सेतु बाँधि कपि सेन जिमि उतरी सागर पार।
गयउ बसीठी बीरबर जेहि बिधि बालिकुमार॥ ६७(क)॥

अनुवाद (हिन्दी)

पूल बांधून कशाप्रकारे वानरांची सेना समुद्र पार करून गेली आणि कशाप्रकारे वालिपुत्र अंगद दूत बनून गेला, हे सर्व सांगितले.॥ ६७(क)॥

मूल (दोहा)

निसिचर कीस लराई बरनिसि बिबिध प्रकार।
कुंभकरन घननाद कर बल पौरुष संघार॥ ६७(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर राक्षस व वानर यांच्यामध्ये झालेल्या युद्धाचे अनेक प्रकारे वर्णन करून सांगितले. नंतर कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे बल, पुरुषार्थ व संहार यांची कथा सांगितली.॥ ६७(ख)॥

मूल (चौपाई)

निसिचर निकर मरन बिधि नाना।
रघुपति रावन समर बखाना॥
रावन बध मंदोदरि सोका।
राज बिभीषन देव असोका॥

अनुवाद (हिन्दी)

नानाप्रकारच्या राक्षससमुदायांचे मरण आणि श्रीरघुनाथ व रावण यांच्या नाना तऱ्हेच्या युद्धाचे वर्णन करून सांगितले. रावणवध, मंदोदरीचाशोक, बिभीषणाचा राज्याभिषेक आणि देवांचेशोकरहित होणे, हे सर्व सांगून,॥ १॥

मूल (चौपाई)

सीता रघुपति मिलन बहोरी।
सुरन्ह कीन्हि अस्तुति कर जोरी॥
पुनि पुष्पक चढ़ि कपिन्ह समेता।
अवध चले प्रभु कृपा निकेता॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर सीता व रघुनाथ यांची भेट झाल्याचे सांगितले. त्यानंतर कशाप्रकारे देवांनी हात जोडून स्तुती केली आणि मग वानरांसह पुष्पक विमानात बसून कृपाधाम प्रभू हे अयोध्येला निघाले, या सर्व गोष्टी सांगितल्या.॥२॥

मूल (चौपाई)

जेहि बिधि राम नगर निज आए।
बायस बिसद चरित सब गाए॥
कहेसि बहोरि राम अभिषेका।
पुर बरनत नृपनीति अनेका॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्र कशाप्रकारे आपल्या अयोध्यानगरीला आले, ते सर्व उज्ज्वल चरित्र काकभुशुंडी यांनी विस्ताराने वर्णन केले. मग त्यांनी श्रीरामांच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले. शिव म्हणतात, ‘अयोध्यापुरीचे व नानाप्रकारच्या राजनीतींचे वर्णन करीत,॥३॥

मूल (चौपाई)

कथा समस्त भुसुंड बखानी।
जो मैं तुम्ह सन कही भवानी॥
सुनि सब राम कथा खगनाहा।
कहत बचन मन परम उछाहा॥

अनुवाद (हिन्दी)

हे भवानी, मी जी कथा तुला सांगितली होती, ती सर्व कथा भुशुंडींनी गरुडाला वर्णन करून सांगितली. सर्व रामकथा ऐकून पक्षिराज गरुडाच्या मनाला आनंद झाला व तो म्हणू लागला,॥४॥

सोरठा

मूल (दोहा)

गयउ मोर संदेह सुनेउँ सकल रघुपति चरित।
सो०—भयउ राम पद नेह तव प्रसाद बायस तिलक॥ ६८(क)॥

अनुवाद (हिन्दी)

‘श्रीरघुनाथांचे संपूर्ण चरित्र मी ऐकले. त्यामुळे माझा संशय नाहीसा झाला. हे काकशिरोमणी, तुमच्या कृपेमुळे मला श्रीरामांच्या चरणी प्रेम वाटू लागले.’॥ ६८(क)॥

मूल (दोहा)

मोहि भयउ अति मोह प्रभु बंधन रन महुँ निरखि।
चिदानंद संदोह राम बिकल कारन कवन॥ ६८(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

युद्धामध्ये प्रभूंना पडलेले नागपाशाचे बंधन पाहून मला फार मोह झाला होता की, श्रीराम हे तर सच्चिदानंदघन आहेत, मग ते का बरे व्याकूळ झाले आहेत?॥ ६८(ख)॥

मूल (चौपाई)

देखि चरित अति नर अनुसारी।
भयउ हृदयँ मम संसय भारी॥
सोइ भ्रम अबहित करि मैं माना।
कीन्ह अनुग्रह कृपानिधाना॥

अनुवाद (हिन्दी)

अगदी लौकिक माणसांसारखे त्यांचे चरित्र पाहून माझ्या मनात मोठा संशय उत्पन्न झाला होता. आता मला तो भ्रमही स्वतःसाठी हितकारक वाटतो. कृपानिधानांनी माझ्यावर हा मोठा अनुग्रहच केला.॥१॥

मूल (चौपाई)

जो अति आतप ब्याकुल होई।
तरु छाया सुख जानइ सोई॥
जौं नहिं होत मोह अति मोही।
मिलतेउँ तात कवन बिधि तोही॥

अनुवाद (हिन्दी)

जो उन्हामुळे व्याकूळ होतो, त्यालाच वृक्षाच्या सावलीचे सुख समजते. हे तात, जर मला अत्यंत संशय वाटला नसता, तर मी तुम्हांला कसा भेटलो असतो?॥२॥

मूल (चौपाई)

सुनतेउँ किमि हरि कथा सुहाई।
अति बिचित्र बहु बिधि तुम्ह गाई॥
निगमागम पुरान मत एहा।
कहहिं सिद्ध मुनि नहिं संदेहा॥

अनुवाद (हिन्दी)

आणि ही सुंदर व अत्यंत विलक्षण हरिकथा मला कशी ऐकायला मिळाली असती? वेद, शास्त्र आणि पुराणे यांचे हेच मत आहे. सिद्ध व मुनी हेही हेच सांगतात. यात काहीही संशय नाही की,॥३॥

मूल (चौपाई)

संत बिसुद्ध मिलहिं परि तेही।
चितवहिं राम कृपा करि जेही॥
राम कृपाँ तव दरसन भयऊ।
तव प्रसाद सब संसय गयऊ॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याला श्रीराम कृपादृष्टीने पहातात, त्यांनाच खरोखर संत भेटतात. श्रीरामांच्या कृपेमुळे मला तुमचे दर्शन घडले आणि तुमच्या कृपेने माझा संशय दूर झाला.’॥४॥

मूल (दोहा)

सुनि बिहंगपति बानी सहित बिनय अनुराग।
पुलक गात लोचन सजल मन हरषेउ अति काग॥ ६९(क)॥

अनुवाद (हिन्दी)

पक्षिराज गरुडाचे विनय व प्रेमपूर्ण बोलणे ऐकून काकभुशुंडी यांचे शरीर पुलकित झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि ते मनातून आनंदित झाले.॥ ६९(क)॥

मूल (दोहा)

श्रोता सुमति सुसील सुचि कथा रसिक हरिदास।
पाइ उमा अति गोप्यमपि सज्जन करहिं प्रकास॥६९(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे उमा, सुंदर बुद्धीचा, सुशील, पवित्र कथेचा प्रेमी आणि हरीचा सेवक श्रोता मिळाल्यामुळे सज्जन लोक अत्यंत गुप्त रहस्यही प्रकट करतात.॥६९(ख)॥

मूल (चौपाई)

बोलेउ काकभसुंड बहोरी।
नभग नाथ पर प्रीति न थोरी॥
सब बिधि नाथ पूज्य तुम्ह मेरे।
कृपापात्र रघुनायक केरे॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडींचे पक्षिराजावर काही कमी प्रेम नव्हते. ते म्हणाले, ‘हे नाथ, तुम्ही मला सर्व प्रकारे पूज्य आहात आणि श्रीरघुनाथांचे कृपापात्र आहात.॥१॥

मूल (चौपाई)

तुम्हहि न संसय मोह न माया।
मो पर नाथ कीन्हि तुम्ह दाया॥
पठइ मोह मिस खगपति तोही।
रघुपति दीन्हि बड़ाई मोही॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्हांला संशय नाही, मोह नाही किंवा मायाही नाही. हे नाथ, तुम्ही माझ्यावर उपकार केला आहे. हे पक्षिराज, मोहाच्या निमित्ताने का होईना, श्रीरघुनाथांनी तुम्हांला येथे पाठवून मला मोठेपणा दिला आहे.॥२॥

मूल (चौपाई)

तुम्ह निज मोह कही खगसाईं।
सो नहिं कछु आचरज गोसाईं॥
नारद भव बिरंचि सनकादी।
जे मुनिनायक आतमबादी॥

अनुवाद (हिन्दी)

हे पक्ष्यांचे स्वामी, हे गोस्वामी, तुम्ही आपला संशय व्यक्त केलात, यात काहीच आश्चर्य नाही. नारद, शिव, ब्रह्मदेव आणि सनकादिक हे आत्मतत्त्वाचे मर्मज्ञ आणि त्याचा उपदेश करणारे श्रेष्ठ मुनी आहेत.॥३॥

मूल (चौपाई)

मोह न अंध कीन्ह केहि केही।
को जग काम नचाव न जेही॥
तृस्नाँ केहि न कीन्ह बौराहा।
केहि कर हृदय क्रोध नहिं दाहा॥

अनुवाद (हिन्दी)

पण त्यांच्यापैकी कुणाकुणाला मोहाने विवेकशून्य अंध बनविले नाही? जगात असा कोण आहे की ज्याला कामाने नाचविले नाही? तृष्णेने कुणाला वेडे केले नाही? क्रोधाने कुणाच्या हृदयामध्ये दाह निर्माण केला नाही?॥४॥

दोहा

मूल (दोहा)

ग्यानी तापस सूर कबि कोबिद गुन आगार।
केहि कै लोभ बिडंबना कीन्हि न एहिं संसार॥ ७०(क)॥

अनुवाद (हिन्दी)

या जगामध्ये असा कोण ज्ञानी, तपस्वी, शूर, कवी, विद्वान आणि गुणी आहे की, ज्याची लोभाने विटंबना करून सोडली नाही?॥ ७०(क)॥

मूल (दोहा)

श्रीमद बक्र न कीन्ह केहि प्रभुता बधिर न काहि।
मृगलोचनि के नैन सर को अस लाग न जाहि॥७०(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

लक्ष्मीच्या मस्तीने कुणाला कुटिल बनविले नाही? आणि सत्तेने कुणाला बहिरे केले नाही? ज्याला मृगनयना युवतीचे नेत्र-बाण लागले नाहीत, असा कोण आहे?॥७०(ख)॥

मूल (चौपाई)

गुन कृत सन्यपात नहिं केही।
कोउ न मान मद तजेउ निबेही॥
जोबन ज्वर केहि नहिं बलकावा।
ममता केहि कर जस न नसावा॥

अनुवाद (हिन्दी)

रज, तम इत्यादी गुणांमुळे कुणाला सन्निपात झाला नाही? ज्याला मान व मद यांनी सोडले नाही, असा कुणीही नाही. यौवनाच्या ज्वराने कुणाला बेभान केले नाही? ममतेने कुणाची कीर्ती नष्ट केली नाही?॥१॥

मूल (चौपाई)

मच्छर काहि कलंक न लावा।
काहि न सोक समीर डोलावा॥
चिंता साँपिनि को नहिं खाया।
को जग जाहि न ब्यापी माया॥

अनुवाद (हिन्दी)

मत्सराने कुणाला कलंकित केले नाही? शोकरूपी पवनाने (वाऱ्याने) कुणाला हादरून टाकले नाही? चिंतारूपी सर्पिणीने कुणाला खाऊन टाकले नाही? जगात असा कोण आहे, ज्याला मायेने व्यापले नाही?॥२॥

मूल (चौपाई)

कीट मनोरथ दारु सरीरा।
जेहि न लाग घुन को अस धीरा॥
सुत बित लोक ईषना तीनी।
केहि कै मति इन्ह कृत न मलीनी॥

अनुवाद (हिन्दी)

मनोरथ ही कीड आहे आणि शरीर हे लाकूड. ज्याच्या शरीराला ही कीड लागली नाही, असा धैर्यशील कोण आहे? पुत्र, धन व लोकप्रतिष्ठा या तीन प्रबळ इच्छेंनी कुणाची बुद्धी बिघडून टाकली नाही?॥३॥

मूल (चौपाई)

यह सब माया कर परिवारा।
प्रबल अमिति को बरनै पारा॥
सिव चतुरानन जाहि डेराहीं।
अपर जीव केहि लेखे माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हा सर्व मायेचा मोठा प्रबळ परिवार आहे. हा अपार आहे. त्याचे वर्णन कोण करू शकेल? शिव आणि ब्रह्मदेवसुद्धा जर त्याला घाबरतात, मग इतर जीवांची कथा ती काय?॥४॥

दोहा

मूल (दोहा)

ब्यापि रहेउ संसार महुँ माया कटक प्रचंड।
सेनापति कामादि भट दंभ कपट पाषंड॥ ७१(क)॥

अनुवाद (हिन्दी)

मायेची प्रचंड सेना संसारात भरून राहिली आहे. काम, क्रोध व लोभ हे तिचे सेनापती आहेत आणि दंभ, कपट आणि पाखंड हे योद्धे आहेत.॥ ७१(क)॥

मूल (दोहा)

सो दासी रघुबीर कै समुझें मिथ्या सोपि।
छूट न राम कृपा बिनु नाथ कहउँ पद रोपि॥७१(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

ती माया श्रीरघुवीरांची दासी आहे. समजून घेतल्यावर ती मिथ्याच आहे, परंतु ती श्रीरामांच्या कृपेविना सुटत नाही. हे नाथ, हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो.॥७१(ख)॥

मूल (चौपाई)

जो माया सब जगहि नचावा।
जासु चरित लखि काहुँ न पावा॥
सोइ प्रभु भ्रू बिलास खगराजा।
नाच नटी इव सहित समाजा॥

अनुवाद (हिन्दी)

जी माया संपूर्ण जगाला नाचविते आणि जिचे चरित्र कुणी पाहू शकला नाही, हे खगराज गरुड, तीच माया प्रभू श्रीरामचंद्रांच्या भुवईच्या संकेतावर आपल्या परिवारासह नटीप्रमाणे नाचते.॥१॥

मूल (चौपाई)

सोइ सच्चिदानंद घन रामा।
अज बिग्यान रूप बल धामा॥
ब्यापक ब्याप्य अखंड अनंता।
अखिल अमोघसक्ति भगवंता॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम हेच सच्चिदानंदघन आहेत. ते अजन्मा, विज्ञानस्वरूप, रूप आणि बल यांचे धाम आहेत. सर्वव्यापक, सर्वरूप, अखंड, अनंत, संपूर्ण अमोघशक्तियुक्त आणि षड्गुणांनी युक्त भगवंत आहेत.॥२॥

मूल (चौपाई)

अगुन अदभ्र गिरा गोतीता।
सबदरसी अनवद्य अजीता॥
निर्मम निराकार निरमोहा।
नित्य निरंजन सुख संदोहा॥

अनुवाद (हिन्दी)

ते निर्गुण, महान, वाणी आणि इंद्रिये यांच्या पलीकडचे, सर्व काही पहाणारे, निर्दोष, अजेय, ममतारहित, निराकार, मोहरहित, नित्य, मायारहित, सुखाची खाण,॥३॥

मूल (चौपाई)

प्रकृति पार प्रभु सब उर बासी।
ब्रह्म निरीह बिरज अबिनासी॥
इहाँ मोह कर कारन नाहीं।
रबि सन्मुख तम कबहुँ कि जाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

प्रकृतीच्या पलीकडचे, सर्वसमर्थ प्रभू, सदा सर्वांच्या हृदयात वसणारे, इच्छारहित, विकाररहित, अविनाशी ब्रह्म आहेत. श्रीरामांविषयी मोहाला जागाच नाही. अंधकाराचा समूह कधी सूर्यासमोर जाऊ शकेल काय?॥४॥

दोहा

मूल (दोहा)

भगत हेतु भगवान प्रभु राम धरेउ तनु भूप।
किए चरित पावन परम प्राकृत नर अनुरूप॥७२(क)॥

अनुवाद (हिन्दी)

भगवान प्रभू श्रीरामचंद्रांनी भक्तांसाठी राजाचे शरीर धारण केले आणि सामान्य लोकांसाठी अनेक परम पवित्र लीला केल्या.॥७२(क)॥

मूल (दोहा)

जथा अनेक बेष धरि नृत्य करइ नट कोइ।
सोइ सोइ भाव देखावइ आपुन होइ न सोइ॥७२(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे एखादा नट अनेक वेष धारण करून नृत्य करतो आणि वेषाप्रमाणे भाव दाखवितो, परंतु तो त्या रूपांपैकी कुणीही नसतो.॥७२(ख)॥

मूल (चौपाई)

असि रघुपति लीला उरगारी।
दनुज बिमोहनि जन सुखकारी॥
जे मति मलिन बिषयबस कामी।
प्रभु पर मोह धरहिं इमि स्वामी॥

अनुवाद (हिन्दी)

हे गरुडा, अशीच श्रीरघुनाथांची ही लीला आहे. ती राक्षसांना विशेष मोहित करणारी व भक्तांना सुख देणारी आहे. हे स्वामी, जो मनुष्य मलिन बुद्धीचा, विषयांना वश झालेला व कामी आहे, तोच प्रभूंवर अशा प्रकारे मोहाचा आरोप करीत असतो.॥१॥

मूल (चौपाई)

नयन दोष जा कहँ जब होई।
पीत बरन ससि कहुँ कह सोई॥
जब जेहि दिसि भ्रम होइ खगेसा।
सो कह पच्छिम उयउ दिनेसा॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा एखाद्याला कावीळ इत्यादी नेत्ररोग होतो, तेव्हा त्याला चंद्र पिवळ्या रंगाचा दिसतो. हे पक्षिराज, ज्याला दिशाभ्रम होतो, तो म्हणतो की, सूर्य पश्चिमेला उगवला आहे.॥२॥

मूल (चौपाई)

नौकारूढ़ चलत जग देखा।
अचल मोहबस आपुहि लेखा॥
बालक भ्रमहिं न भ्रमहिं गृहादी।
कहहिं परस्पर मिथ्याबादी॥

अनुवाद (हिन्दी)

नावेत बसलेल्या मनुष्याला जग चालत असल्याचे दिसते आणि आपण स्थिर असल्याचे त्याला वाटते. बालक गोल गोल फिरतात, घर वगैरे काही फिरत नाही. परंतु ते एकमेकांना तू खोटारडा आहेस, असे म्हणतात.॥३॥

मूल (चौपाई)

हरि बिषइक अस मोह बिहंगा।
सपनेहुँ नहिं अग्यान प्रसंगा॥
मायाबस मतिमंद अभागी।
हृदयँ जमनिका बहुबिधि लागी॥

अनुवाद (हिन्दी)

हे गरुडा, श्रीहरींच्या बाबतीत मोहाची कल्पना करणे, हे असेच आहे. भगवंतांमध्ये स्वप्नातही अज्ञानाला जागा नाही. परंतु जे मायेच्या अधीन झालेले आहेत, मंदबुद्धीचे व भाग्यहीन आहेत आणि ज्यांच्या मनावर अनेक प्रकारची आच्छादने पडली आहेत,॥४॥

मूल (चौपाई)

ते सठ हठ बस संसय करहीं।
निज अग्यान राम पर धरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ते मूर्ख हट्टाला बळी पडून संशय घेतात आणि आपले अज्ञान श्रीरामांवर आरोपित करतात.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

काम क्रोध मद लोभ रत गृहासक्त दुखरूप।
ते किमि जानहिं रघुपतिहि मूढ़ परे तम कूप॥७३(क)॥

अनुवाद (हिन्दी)

जे काम, क्रोध, मद व मोह यामध्ये मग्न असतात आणि दुःखरूप घरामध्ये आसक्त असतात, ते श्रीरघुनाथांना कसे जाणणार? ते मूर्ख अंधकाररूपी विहिरीत पडलेले आहेत.॥ ७३(क)॥

मूल (दोहा)

निर्गुन रूप सुलभ अति सगुन जान नहिं कोइ।
सुगम अगम नाना चरित सुनि मुनि मन भ्रम होइ॥७३(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

निर्गुण रूप अत्यंत सुलभ आहे. परंतु गुणातीत दिव्य सगुण रूप कुणाला समजून येत नाही. म्हणून त्या सगुण भगवंतांची अनेक प्रकारची सुगम व अगम्य चरित्रे ऐकून मुनींच्या मनालाही भ्रम होतो.॥७३(ख)॥