११ नारदांचे आगमन आणि स्तुती करून ब्रह्मलोकी जाणे

दोहा

मूल (दोहा)

तेहिं अवसर मुनि नारद आए करतल बीन।
गावन लगे राम कल कीरति सदा नबीन॥५०॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच प्रसंगी नारद मुनी हातात वीणा घेऊन आले. ते श्रीरामांची सुंदर व नित्य नवीन असणारी कीर्ती गाऊ लागले.॥५०॥

मूल (चौपाई)

मामवलोकय पंकज लोचन।
कृपा बिलोकनि सोच बिमोचन॥
नील तामरस स्याम काम अरि।
हृदय कंज मकरंद मधुप हरि॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणू लागले, ‘कृपापूर्वक पहाताच शोकमुक्त करणारे हे कमलनयन, माझ्याकडे कृपादृष्टीने पहा. हे हरी, तुम्ही नीलकमलासारख्या श्यामवर्णाचे आणि कामदेवाचे शत्रू महादेवांच्या हृदयकमलातील प्रेमरस प्राशन करणारे भ्रमर आहात.॥१॥

मूल (चौपाई)

जातुधान बरूथ बल भंजन।
मुनि सज्जन रंजन अघ गंजन॥
भूसुर ससि नव बृंद बलाहक।
असरन सरन दीन जन गाहक॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही राक्षसांच्या सेनेचे सामर्थ्य नष्ट करणारे आहात. मुनी व संतांना आनंद देणारे आणि पापांचा नाश करणारे आहात. ब्राह्मणरूपी शेतीसाठी तुम्ही नव्या मेघांसमान आहात आणि निराधारांना आधार देणारे, तसेच दीन जनांना आपल्याजवळ घेणारे आहात.॥२॥

मूल (चौपाई)

भुज बल बिपुल भार महि खंडित।
खर दूषन बिराध बध पंडित॥
रावनारि सुखरूप भूपबर।
जय दसरथ कुल कुमुद सुधाकर॥

अनुवाद (हिन्दी)

आपल्या बाहुबलाने पृथ्वीचा मोठा भार नष्ट करणारे, खर-दूषण आणि विराध यांचा वध करण्यात कुशल असलेले, रावणाचे शत्रू, आनंदस्वरूप, राजांमध्ये श्रेष्ठ आणि दशरथांच्या कुलरूपी कुमुदिनीसाठी चंद्रमा असणारे हे श्रीराम, तुमचा विजय असो.॥३॥

मूल (चौपाई)

सुजस पुरान बिदित निगमागम।
गावत सुर मुनि संत समागम॥
कारुनीक ब्यलीक मद खंडन।
सब बिधि कुसल कोसला मंडन॥

अनुवाद (हिन्दी)

तुमची सुंदर कीर्ती पुराणांमध्ये आणि तंत्रादी शास्त्रांमध्ये प्रकट झालेली आहे. देव, मुनी आणि संतांचा समुदाय ती गातो. तुम्ही करुणा करणारे आणि खोटॺा अहंकाराचा नाश करणारे, सर्व प्रकारे निपुण असे अयोध्येचे भूषणच आहात.॥४॥

मूल (चौपाई)

कलि मल मथन नाम ममताहन।
तुलसिदास प्रभु पाहि प्रनत जन॥

अनुवाद (हिन्दी)

तुमचे नाम कलियुगातील पापांना घुसळून काढणारे आणि ममतेला मारणारे आहे. हे तुलसीदासांचे प्रभू, शरणागताचे रक्षण करा.’॥५॥

दोहा

मूल (दोहा)

प्रेम सहित मुनि नारद बरनि राम गुन ग्राम।
सोभासिंधु हृदयँ धरि गए जहाँ बिधि धाम॥५१॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या गुणसमूहांचे वर्णन प्रेमपूर्वक करून नारद मुनी शोभेचे समुद्र असलेल्या प्रभूंना हृदयात धारण करून ब्रह्मलोकी निघून गेले.॥५१॥