०९ श्रीरामांचा प्रजेला उपदेश

मूल (चौपाई)

एक बार रघुनाथ बोलाए।
गुर द्विज पुरबासी सब आए॥
बैठे गुर मुनि अरु द्विज सज्जन।
बोले बचन भगत भव भंजन॥

अनुवाद (हिन्दी)

एकदा श्रीरघुनाथांनी बोलावल्यावर गुरू वसिष्ठ, ब्राह्मण आणि इतर सर्व नगरवासी सभेला आले. जेव्हा गुरू मुनी व इतर सर्व सज्जन यथायोग्य स्थानी बसले, तेव्हा भक्तांचे जन्म-मरण नष्ट करणारे श्रीराम म्हणाले.॥१॥

मूल (चौपाई)

सुनहु सकल पुरजन मम बानी।
कहउँ न कछु ममता उर आनी॥
नहिं अनीति नहिं कछु प्रभुताई।
सुनहु करहु जो तुम्हहि सोहाई॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे सर्व नगरवासींनो, माझे म्हणणे ऐकून घ्या. ही गोष्ट मी मनातील ममतेमुळे सांगत नाही. मी अनीतीची गोष्ट सांगत नाही, किंवा यात काही राजसत्तेचा संबंध नाही. म्हणून संकोच व भय सोडून लक्ष देऊन ऐका आणि मग तुम्हांला योग्य वाटेल त्याप्रमाणे करा.॥२॥

मूल (चौपाई)

सोइ सेवक प्रियतम मम सोई।
मम अनुसासन मानै जोई॥
जौं अनीति कछु भाषौं भाई।
तौ मोहि बरजहु भय बिसराई॥

अनुवाद (हिन्दी)

जो माझी आज्ञा मानतो, तोच माझा सेवक, आणि तो मला अत्यंत प्रिय होय. हे बंधूंनो, जर मी काही अनीतीचे सांगत असेन, तर निर्भयपणे मला अडवा.॥३॥

मूल (चौपाई)

बड़े भाग मानुष तनु पावा।
सुर दुर्लभ सब ग्रंथन्हि गावा॥
साधन धाम मोच्छ कर द्वारा।
पाइ न जेहिं परलोक सँवारा॥

अनुवाद (हिन्दी)

मोठॺा भाग्याने हे मनुष्य-शरीर लाभले आहे. हे शरीर देवांनाही दुर्लभ आहे, असे सर्व ग्रंथ सांगतात. हे शरीर साधनेचे स्थान व मोक्षाचे द्वार आहे. हे मिळूनही जो आपला परलोक बनवू शकला नाही,॥४॥

दोहा

मूल (दोहा)

सो परत्र दुख पावइ सिर धुनि धुनि पछिताइ।
कालहि कर्महि ईस्वरहि मिथ्या दोस लगाइ॥४३॥

अनुवाद (हिन्दी)

त्याला परलोकी दुःख मिळते व डोके बडवून घेऊन पश्चात्ताप करावा लागतो आणि तो आपला दोष न मानता कालाला, कर्माला व ईश्वराला दोष देऊ लागतो.॥४३॥

मूल (चौपाई)

एहि तन कर फल बिषय न भाई।
स्वर्गउ स्वल्प अंत दुखदाई॥
नर तनु पाइ बिषयँ मन देहीं।
पलटि सुधा ते सठ बिष लेहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधूंनो, हे शरीर प्राप्त होण्याचे फल म्हणजे विषयभोग नव्हे. या जगातील काय, स्वर्गातील भोगही फारच तुच्छ आहेत आणि शेवटी दुःख देणारे आहेत, म्हणून जे लोक मनुष्यशरीर मिळूनही आपले मन विषयांमध्ये लावतात, ते मूर्ख अमृताच्या बदली विष घेतात.॥१॥

मूल (चौपाई)

ताहि कबहुँ भल कहइ न कोई।
गुंजा ग्रहइ परस मनि खोई॥
आकर चारि लच्छ चौरासी।
जोनि भ्रमत यह जिव अबिनासी॥

अनुवाद (हिन्दी)

जो परीस टाकून गुंज घेतो, त्याला कधी कोणी शहाणा म्हणत नाही. हा अविनाशी जीव अंडज, स्वेदज, जरायुज आणि उद्भिज्ज या चार जातींच्या चौऱ्याऐंशीं लाख योनींमध्ये फिरत असतो.॥२॥

मूल (चौपाई)

फिरत सदा माया कर प्रेरा।
काल कर्म सुभाव गुन घेरा॥
कबहुँक करि करुना नर देही।
देत ईस बिनु हेतु सनेही॥

अनुवाद (हिन्दी)

मायेच्या प्रेरणेमुळे तो काल, कर्म, स्वभाव आणि गुणांना बळी पडून नेहमी भटकत असतो.विनाकारण स्नेह करणारा ईश्वर कधी तरी एखाद्या विरळ्यावर दया करून त्याला हे मनुष्यशरीर देत असतो.॥३॥

मूल (चौपाई)

नर तनु भव बारिधि कहुँ बेरो।
सन्मुख मरुत अनुग्रह मेरो॥
करनधार सदगुर दृढ़ नावा।
दुर्लभ साज सुलभ करि पावा॥

अनुवाद (हिन्दी)

हे मनुष्यशरीर भवसागर तरून जाण्यासाठी जहाज आहे. माझी कृपा ही अनुकूल हवा आहे. सद्गुरू हा मजबूत जहाज वाहून नेणारा कर्णधार आहे. अशा प्रकारचे दुर्लभ साधन सुलभपणे भगवत्कृपेमुळे त्याला प्राप्त झाले आहे.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

जो न तरै भव सागर नर समाज अस पाइ।
सो कृत निंदक मंदमति आत्माहन गति जाइ॥४४॥

अनुवाद (हिन्दी)

जो मनुष्य असे साधन मिळूनही भवसागर तरू शकत नसेल, तर तो कृतघ्न,मंदबुद्धीचा आणि आत्महत्या करणाऱ्याची गती प्राप्त करतो.॥४४॥

मूल (चौपाई)

जौं परलोक इहाँ सुख चहहू।
सुनि मम बचन हृदयँ दृढ़ गहहू॥
सुलभ सुखद मारग यह भाई।
भगति मोरि पुरान श्रुति गाई॥

अनुवाद (हिन्दी)

जर मनुष्याला परलोकी व या जगात, दोन्ही ठिकाणी सुखाची इच्छा असेल, तर माझे बोलणे ऐकून ते मनात दृढपणे धरून ठेवा. हे बंधूंनो, हा माझ्या भक्तीचा मार्ग सुलभ व सुखदायक आहे. पुराणांनी व वेदांनी याचेच प्रतिपादन केले आहे.॥१॥

मूल (चौपाई)

ग्यान अगम प्रत्यूह अनेका।
साधन कठिन न मन कहुँ टेका॥
करत कष्ट बहु पावइ कोऊ।
भक्ति हीन मोहि प्रिय नहिं सोऊ॥

अनुवाद (हिन्दी)

ज्ञान अगम्य आहे. ते प्राप्त करण्यामध्ये खूप विघ्ने आहेत. त्याचे साधन फार कठीण आहे आणि त्यामध्ये मनाला कोणताही आधार नसतो. पुष्कळ कष्ट केल्यावर कुणी ते मिळवूही शकेल, तरीही भक्तिरहित असल्यामुळे तो ज्ञानी मला प्रिय नसतो. ॥२॥

मूल (चौपाई)

भक्ति सुतंत्र सकल सुख खानी।
बिनु सतसंग न पावहिं प्रानी॥
पुन्य पुंज बिनु मिलहिं न संता।
सतसंगति संसृति कर अंता॥

अनुवाद (हिन्दी)

भक्ती ही स्वतंत्र आहे आणि सुखांची खाण आहे. परंतु सत्संगाविना कुणालाही ती मिळत नाही. आणि पुण्याचा संचय असल्याशिवाय संत भेटत नाहीत. सत्संगती ही जन्म-मरणाचा अंत करते.॥३॥

मूल (चौपाई)

पुन्य एक जग महुँ नहिं दूजा।
मन क्रम बचन बिप्र पद पूजा॥
सानुकूल तेहि पर मुनि देवा।
जो तजि कपटु करइ द्विज सेवा॥

अनुवाद (हिन्दी)

जगात एकच पुण्य आहे, त्याच्यासारखे दुसरे नाही. ते म्हणजे कायावाचामनाने ब्राह्मणांची सेवा करणे. जो सरळ मनाने ब्राह्मणांची सेवा करतो, त्याच्यावर मुनी व देव प्रसन्न होतात. ॥४॥

दोहा

मूल (दोहा)

औरउ एक गुपुत मत सबहि कहउँ कर जोरि।
संकर भजन बिना नर भगति न पावइ मोरि॥ ४५॥

अनुवाद (हिन्दी)

आणखी एक गुपित आहे. मी सर्वांना हात जोडून सांगतो की, शंकरांच्या भजनाविना मनुष्याला माझी भक्ती मिळत नाही.॥४५॥

मूल (चौपाई)

कहहु भगति पथ कवन प्रयासा।
जोग न मख जप तप उपवासा॥
सरल सुभाव न मन कुटिलाई।
जथा लाभ संतोष सदाई॥

अनुवाद (हिन्दी)

भक्तिमार्गामध्ये कोणते कष्ट आहेत, सांगा बरे? यात योगाची गरज नाही. यज्ञ, जप, तप आणि उपवास यांची गरज नाही. फक्त एवढेच हवे की, सरळ स्वभाव असावा, मनात कपट नसावे आणि जे काही मिळेल, त्यात नेहमी समाधान मानावे. ॥१॥

मूल (चौपाई)

मोर दास कहाइ नर आसा।
करइ तौ कहहु कहा बिस्वासा॥
बहुत कहउँ का कथा बढ़ाई।
एहि आचरन बस्य मैं भाई॥

अनुवाद (हिन्दी)

स्वतःला माझा दास म्हणवीत असतानाही जर कुणी माणसांपासून काही मिळण्यासाठी आशा धरत असेल, तर तुम्हीच सांगा की, माझ्यावर त्याचा विश्वास आहे काय? अधिक काय सांगू? हे बंधूंनो, मी अशाच आचरणाला वश होतो. ॥२॥

मूल (चौपाई)

बैर न बिग्रह आस न त्रासा।
सुखमय ताहि सदा सब आसा॥
अनारंभ अनिकेत अमानी।
अनघ अरोष दच्छ बिग्यानी॥

अनुवाद (हिन्दी)

कधी कुणाशी वैर करू नये, भांडण-तंटा करू नये, कसली आशा धरू नये व भय बाळगू नये. असे करणाऱ्याला दाही दिशांना नेहमी सुख असते. जो कोणी फलाची इच्छा ठेवून कर्म करीत नाही, ज्याला आपल्या घराविषयी ममता नाही, जो मानहीन, पापहीन व क्रोधरहित असतो, जो भक्ती करण्यात निपुण व ज्ञानी असतो,॥३॥

मूल (चौपाई)

प्रीति सदा सज्जन संसर्गा।
तृन सम बिषय स्वर्ग अपबर्गा॥
भगति पच्छ हठ नहिं सठताई।
दुष्ट तर्क सब दूरि बहाई॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याला सत्संगाविषयी नेहमी प्रेम असते, ज्याच्या मनात भक्तीपुढे सर्व विषय, इतकेच काय स्वर्ग व मुक्ती हे सुद्धा कस्पटासमान असतात, जो भक्तीचा आग्रह बाळगतो, परंतु दुसऱ्याच्या मताचे खंडन करण्याचा मूर्खपणा करीत नाही आणि ज्याने सर्व कुतर्क सोडून दिले आहेत, ॥४॥

दोहा

मूल (दोहा)

मम गुन ग्राम नाम रत गत ममता मद मोह।
ता कर सुख सोइ जानइ परानंद संदोह॥४६॥

अनुवाद (हिन्दी)

जो माझ्या गुण-समूहांच्या व माझ्या नामाच्या स्मरणात तत्पर असतो, तसेच ममता, मद आणि मोह यांनी रहित असतो, त्याचे सुख ज्याला परमानंदराशिरूप परमात्मा प्राप्त झालेला असतो, त्यालाच कळते.’॥४६॥

मूल (चौपाई)

सुनत सुधासम बचन राम के।
गहे सबनि पद कृपाधाम के॥
जननि जनक गुर बंधु हमारे।
कृपा निधान प्रान ते प्यारे॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे अमृतासमान बोलणे ऐकून सर्वांनी कृपानिधान श्रीरामांचे चरणकमल पकडून म्हटले, ‘हे कृपानिधान, तुम्हीच आमचे माता, पिता,गुरू, बंधू—सर्व काही आहात. आणि आम्हांला प्राणांहूनही प्रिय आहात.॥१॥

मूल (चौपाई)

तनु धनु धाम राम हितकारी।
सब बिधि तुम्ह प्रनतारति हारी॥
असिसिख तुम्ह बिनु देइ न कोऊ।
मातु पिता स्वारथ रत ओऊ॥

अनुवाद (हिन्दी)

आणि हे शरणागताचे दुःख हरण करणारे श्रीराम, तुम्हीच आमचे शरीर, धन, घरदार आहात आणि सर्व प्रकारे हित करणारे आहात. तुमच्या व्यतिरिक्त अशी शिकवण कोणी देऊ शकणार नाही. माता-पिता हे हिताच्या इच्छेने शिकवण देतात, परंतु ते सुद्धा स्वार्थासाठी ते करतात.॥ २॥

मूल (चौपाई)

हेतु रहित जग जुग उपकारी।
तुम्ह तुम्हार सेवक असुरारी॥
स्वारथ मीत सकल जग माहीं।
सपनेहुँ प्रभु परमारथ नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे असुरांचे शत्रू, जगामध्ये निःस्वार्थ भावनेने उपकार करणारे फक्त दोघेच आहेत, एक म्हणजे तुम्ही आणि दुसरे तुमचे भक्त. उरलेले जगातील सर्वजण स्वार्थाचे मित्र आहेत. हे प्रभो, त्यांच्यामध्ये स्वप्नातही परमार्थाचा भाव नसतो.’॥३॥

मूल (चौपाई)

सब के बचन प्रेम रस साने।
सुनि रघुनाथ हृदयँ हरषाने॥
निज निज गृह गए आयसु पाई।
बरनत प्रभु बतकही सुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांचे प्रेमपूर्ण बोलणे ऐकून श्रीरामांच्या मनाला आनंद झाला. नंतर आज्ञा मिळाल्यावर सर्वजण प्रभूंच्या सुंदर बोलण्याची चर्चा करीत आपापल्या घरी गेले.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

उमा अवधबासी नर नारि कृतारथ रूप।
ब्रह्म सच्चिदानंद घन रघुनायक जहँ भूप॥ ४७॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीशिव म्हणतात, ‘हे उमा, अयोध्येमध्ये राहणारे सर्व स्त्री-पुरुष हे कृतार्थ होत. तेथे प्रत्यक्ष सच्चिदानंदघन ब्रह्म असलेले श्रीरघुनाथ हे राजा होते.॥ ४७॥