०८ श्रीरामांचा भरताला उपदेश

मूल (चौपाई)

सुनी चहहिं प्रभु मुख कै बानी।
जो सुनि होइ सकल भ्रम हानी॥
अंतरजामी प्रभु सभ जाना।
बूझत कहहु काह हनुमाना॥

अनुवाद (हिन्दी)

जी ऐकल्यावर सर्व भ्रमांचा नाश होतो, ती प्रभूंची वाणी ऐकण्याची त्यांना इच्छा होती. अंतर्यामी प्रभूंनी ते जाणले आणि विचारू लागले, ‘हनुमाना, बोल. काय आहे?’॥२॥

मूल (चौपाई)

जोरि पानि कह तब हनुमंता।
सुनहु दीनदयाल भगवंता॥
नाथ भरत कछु पूँछन चहहीं।
प्रस्न करत मन सकुचत अहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा हनुमान हात जोडून म्हणाला, ‘हे दीनदयाळू भगवन, ऐका.भरताला काही विचारायचे आहे, परंतु प्रश्न विचारताना संकोच वाटत आहे.’॥३॥

मूल (चौपाई)

तुम्ह जानहु कपि मोर सुभाऊ।
भरतहि मोहि कछु अंतर काऊ॥
सुनि प्रभु बचन भरत गहे चरना।
सुनहु नाथ प्रनतारति हरना॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंत म्हणाले, ‘हनुमाना, तू माझा स्वभाव जाणतोसच. भरत व माझ्यात काही अंतर आहे काय?’ प्रभूंचे बोलणे ऐकून भरताने त्यांचे पाय धरले आणि म्हटले, ‘हे नाथ, हे शरणागताचे दुःख हरण करणारे,ऐका.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

नाथ न मोहि संदेह कछु सपनेहुँ सोक न मोह।
केवल कृपा तुम्हारिहि कृपानंद संदोह॥३६॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, मला कोणताही संशय नाही आणि स्वप्नातही शोक आणि मोह नाही. हे कृपा व आनंदाचे समूह, हे केवळ तुमच्याच कृपेचे फळ आहे.॥३६॥

मूल (चौपाई)

करउँ कृपानिधि एक ढिठाई।
मैं सेवक तुम्ह जन सुखदाई॥
संतन्ह कै महिमा रघुराई।
बहु बिधि बेद पुरानन्ह गाई॥

अनुवाद (हिन्दी)

तरीही हे कृपानिधान, मी तुमच्यासमोर एक धार्ष्ट्य करीत आहे. मी सेवक आहे आणि तुम्ही सेवकाला सुख देणारे आहात. म्हणून मला क्षमा करून माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगून माझे समाधान करा. हे रघुनाथ, वेदपुराणांनी संतांचा महिमा खूप गायिला आहे.॥१॥

मूल (चौपाई)

श्रीमुख तुम्ह पुनि कीन्हि बड़ाई।
तिन्ह पर प्रभुहि प्रीति अधिकाई॥
सुना चहउँ प्रभु तिन्ह कर लच्छन।
कृपासिंधु गुन ग्यान बिचच्छन॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्हीसुद्धा आपल्या श्रीमुखाने त्यांचा मोठेपणा अनेक प्रकारे सांगितला आहे. हे प्रभो, मी त्या संतांची लक्षणे ऐकू इच्छितो. तुम्ही कृपेचे सागर आणि गुण व ज्ञान यांमध्ये अत्यंत निपुण आहात.॥२॥

मूल (चौपाई)

संत असंत भेद बिलगाई।
प्रनतपाल मोहि कहहु बुझाई॥
संतन्ह के लच्छन सुनु भ्राता।
अगनित श्रुति पुरान बिख्याता॥

अनुवाद (हिन्दी)

हे शरणागताचे पालन करणारे, संत व असंत यांच्यातील फरक वेगवेगळा करून मला समजून द्या.’ श्रीराम म्हणाले, ‘हे बंधू, संतांची लक्षणे असंख्य आहेत. ती वेद व पुराणांत प्रसिद्ध आहेत.॥३॥

मूल (चौपाई)

संत असंतन्हि कै असि करनी।
जिमि कुठार चंदन आचरनी॥
काटइ परसु मलय सुनु भाई।
निज गुन देइ सुगंध बसाई॥

अनुवाद (हिन्दी)

संत व असंत यांची करणी चंदन व कुऱ्हाडीप्रमाणे आहे. हे बंधू, कुऱ्हाड चंदनाला तोडते, परंतु चंदन आपल्या स्वभावानुसार आपला गुण देऊन तोडणाऱ्या कुऱ्हाडीलाही सुगंधाने सुवासित करते.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

ताते सुर सीसन्ह चढ़त जग बल्लभ श्रीखंड।
अनल दाहि पीटत घनहिं परसु बदन यह दंड॥३७॥

अनुवाद (हिन्दी)

याच गुणामुळे चंदन हे देवांच्या शिरावर विराजमान होते आणि जगात प्रिय असते. आणि कुऱ्हाडीच्या तोंडाला दंड मिळतो. तिला आगीमध्ये जाळून मग घणाने बडविले जाते.॥३७॥

मूल (चौपाई)

बिषय अलंपट सील गुनाकर।
पर दुख दुख सुख सुख देखे पर॥
सम अभूतरिपु बिमद बिरागी।
लोभामरष हरष भय त्यागी॥

अनुवाद (हिन्दी)

संत हे विषय-लंपट नसतात. ते शील व सद्गुणांची खाण असतात. त्यांना परदुःख पाहून दुःख वाटते व परसुख पाहून सुख होते. ते सर्वांठायी व सर्वकाळी समता बाळगतात. त्यांच्या मनात कोणी त्यांचा शत्रू नसतो. ते मदरहित आणि वैराग्यवान असतात. तसेच लोभ, क्रोध, हर्ष व भय यांचा त्याग करून रहातात. ॥१॥

मूल (चौपाई)

कोमलचित दीनन्ह पर दाया।
मन बच क्रम मम भगति अमाया॥
सबहि मानप्रद आपु अमानी।
भरत प्रान सम मम ते प्रानी॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांचे मन फार कोमल असते. ते दीनांवर दया करतात आणि मन,वचन आणि कर्माने माझी विशुद्ध भक्ती करतात. सर्वांना सन्मान देतात, परंतु स्वतः मानरहित असतात. हे भरता, ते संतजन मला प्राण-प्रिय असतात.॥२॥

मूल (चौपाई)

बिगत काम मम नाम परायन।
सांति बिरति बिनती मुदितायन॥
सीतलता सरलता मयत्री।
द्विज पद प्रीति धर्म जनयत्री॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांना कोणतीही कामना नसते. ते माझ्या नामस्मरणात तत्पर असतात. शांती, वैराग्य, विनय आणि प्रसन्नतेचे माहेरघर असतात. त्यांच्यामध्ये शीतलता, सरळपणा, सर्वांविषयी मित्रभाव आणि ब्राह्मणांच्या चरणी प्रेम असते. हे सर्व धर्म उत्पन्न करणारे आहे. ॥३॥

मूल (चौपाई)

ए सब लच्छन बसहिं जासु उर।
जानेहु तात संत संतत फुर॥
सम दम नियम नीति नहिं डोलहिं।
परुष बचन कबहूँ नहिं बोलहिं॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधो, ही सर्व लक्षणे ज्या हृदयात वसत असतात, त्यांना नेहमी खरा संत समजावे. जे मनाचा निग्रह, इंद्रियांचा निग्रह, नियम व नीतीपासून कधीही ढळत नाहीत आणि तोंडाने कधी कठोर बोलत नाहीत,॥४॥

दोहा

मूल (दोहा)

निंदा अस्तुति उभय सम ममता मम पद कंज।
ते सज्जन मम प्रानप्रिय गुन मंदिर सुख पुंज॥३८॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांना निंदा आणि स्तुती दोन्हीही सारखेच असते आणि माझ्या चरण-कमलांविषयी ममता असते, ते गुणांचे धाम आणि सुखाची राशी असलेले संतजन मला प्राण-प्रिय असतात.॥३८॥

मूल (चौपाई)

सुनहु असंतन्ह केर सुभाऊ।
भूलेहुँ संगति करिअ न काऊ॥
तिन्ह कर संग सदा दुखदाई।
जिमि कपिलहि घालइ हरहाई॥

अनुवाद (हिन्दी)

आता दुष्टांचा स्वभाव ऐक. त्या दुष्टांची कधी चुकूनही संगत करू नये. त्यांची संगती नेहमी दुःख देणारी असते. ज्याप्रमाणे नाठाळ गाय ही सरळ गाईला आपल्या संगतीने नाठाळ करते, त्याप्रमाणे दुष्टांची संगती असते.॥१॥

मूल (चौपाई)

खलन्ह हृदयँ अति ताप बिसेषी।
जरहिं सदा पर संपति देखी॥
जहँ कहुँ निंदा सुनहिं पराई।
हरषहिं मनहुँ परी निधि पाई॥

अनुवाद (हिन्दी)

दुष्टांच्या मनात फार दाह असतो. ते दुसऱ्याची संपत्ती-सुख पाहून नेहमी जळफळत असतात. ते कुठे दुसऱ्याची निंदा ऐकायला मिळाली की, आनंदित होतात, जणू त्यांना वाटते, खजिनाच मिळाला असावा.॥२॥

मूल (चौपाई)

काम क्रोध मद लोभ परायन।
निर्दय कपटी कुटिल मलायन॥
बयरु अकारन सब काहू सों।
जो कर हित अनहित ताहू सों॥

अनुवाद (हिन्दी)

ते काम, क्रोध, मद व लोभ यांचे परायण तसेच निर्दय, कपटी, कुटिल व पापांचे घर असतात. ते कारण नसताना सर्वांशीच वैर करतात. जो त्यांचे भले करतो, त्याच्याशीही वाईट वागतात. ॥३॥

मूल (चौपाई)

झूठइ लेना झूठइ देना।
झूठइ भोजन झूठ चबेना॥
बोलहिं मधुर बचन जिमि मोरा।
खाइ महा अहि हृदय कठोरा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांचे घेणेही खोटेच असते. तसेच देणेही खोटेच असते. बोलाचीच कढी व बोलाचाच भात असतो. सर्व गोष्टी खोटॺाच असतात. ज्याप्रमाणे मोर गोड बोलतो, परंतु त्याचे हृदय कठोर असते. तो अत्यंत विषारी सापसुद्धा खातो, त्याप्रमाणेच हे दुष्टसुद्धा वरवर गोड बोलतात, परंतु मनाने निर्दय असतात.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

पर द्रोही पर दार रत पर धन पर अपबाद।
ते नर पाँवर पापमय देह धरें मनुजाद॥३९॥

अनुवाद (हिन्दी)

ते दुसऱ्यांशी द्रोह करतात आणि परस्त्री, परक्याचे धन आणि परक्याची निंदा यामध्येच आसक्त असतात. ते क्षुद्र आणि पापी मनुष्य नर-शरीर धारण केलेले राक्षसच होत.॥३९॥

मूल (चौपाई)

लोभइ ओढ़न लोभइ डासन।
सिस्नोदर पर जमपुर त्रास न॥
काहू की जौं सुनहिं बड़ाई।
स्वास लेहिं जनु जूड़ी आई॥

अनुवाद (हिन्दी)

लोभ हेच त्यांचे पांघरूण व लोभच त्यांचे अंथरूण असते. ते लोभानेच वेढलेले असतात. ते पशूप्रमाणे आहार आणि मैथुनात तत्पर असतात. त्यांना यमपुरीचे भय वाटत नाही. जर कुणाची स्तुती त्यांनी ऐकली, तर चक्कर आल्याप्रमाणे ते उसासे सोडतात. ॥१॥

मूल (चौपाई)

जब काहू कै देखहिं बिपती।
सुखी भए मानहुँ जग नृपती॥
स्वारथ रत परिवार बिरोधी।
लंपट काम लोभ अति क्रोधी॥

अनुवाद (हिन्दी)

आणि जर कुणावर विपत्ती कोसळली, तर त्यांना असे सुख वाटते की, जणू आपण जगाचे राजे झालो आहोत; ते स्वार्थपरायण कुटुंबीयांचे विरोधक, काम आणि लोभाने लंपट व अत्यंत रागीट असतात.॥२॥

मूल (चौपाई)

मातु पिता गुर बिप्र न मानहिं।
आपु गए अरु घालहिं आनहिं॥
करहिं मोह बस द्रोह परावा।
संत संग हरि कथा न भावा॥

अनुवाद (हिन्दी)

ते आई, वडील, गुरू, ब्राह्मण यांपैकी कोणालाही मानत नाहीत. स्वतः तर नष्ट होतातच व आपल्याबरोबर दुसऱ्याला नष्ट करतात. मोहामुळे दुसऱ्याशी द्रोह करतात. त्यांना संतांचा संग आवडत नाही आणि भगवंतांची कथाही आवडत नाही.॥३॥

मूल (चौपाई)

अवगुन सिंधु मंदमति कामी।
बेद बिदूषक परधन स्वामी॥
बिप्र द्रोह पर द्रोह बिसेषा।
दंभ कपट जियँ धरें सुबेषा॥

अनुवाद (हिन्दी)

ते अवगुणांचे समुद्र, मंदबुद्धी, कामी, वेदांचे निंदक, आणि जबरदस्तीने परक्याचे धन लुटणारे असतात. ते दुसऱ्यांचा द्रोह तर करतातच, परंतु विशेष करून ब्राह्मणांचा द्रोह करतात. त्यांच्या हृदयात दंभ आणि कपट भरलेले असते, परंतु वरून ते सुंदर वेष धारण करतात.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

ऐसे अधम मनुज खल कृतजुग त्रेताँ नाहिं।
द्वापर कछुक बृंद बहु होइहहिं कलिजुग माहिं॥४०॥

अनुवाद (हिन्दी)

असे नीच व दुष्ट मनुष्य सत्ययुग व त्रेतायुगात नसतात. द्वापारयुगात थोडेसे असतील आणि कलियुगात तर यांच्या झुंडीच्या झुंडी असतील.॥४०॥

मूल (चौपाई)

पर हित सरिस धर्म नहिं भाई।
पर पीड़ा सम नहिं अधमाई॥
निर्नय सकल पुरान बेद कर।
कहेउँ तात जानहिं कोबिद नर॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधू, परोपकारासारखा दुसरा कोणताही धर्म नाही आणि दुसऱ्याला दुःख देण्यासारखे कोणतेही पाप नाही. बाबा रे, सर्व पुराणांचा व वेदांचा हाच निर्णय आहे. तो मी तुला सांगितला. ही गोष्ट पंडित लोकांना माहीत असते.॥१॥

मूल (चौपाई)

नर सरीर धरि जे पर पीरा।
करहिं ते सहहिं महा भव भीरा॥
करहिं मोह बस नर अघ नाना।
स्वारथ रत परलोक नसाना॥

अनुवाद (हिन्दी)

मनुष्यशरीर धारण करून, जे लोक दुसऱ्यांना दुःख देतात, त्यांना जन्म-मृत्यूची महान संकटे सहन करावी लागतात. मनुष्य मोहामुळे स्वार्थपरायण होऊन अनेक पापे करतात. त्यामुळे त्यांचा परलोक नष्ट होऊन जातो.॥२॥

मूल (चौपाई)

कालरूप तिन्ह कहँ मैं भ्राता।
सुभ अरु असुभ कर्म फल दाता॥
अस बिचारि जे परम सयाने।
भजहिं मोहि संसृत दुख जाने॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधू, मी त्यांच्यासाठी भयंकर कालरूप आहे आणि त्यांच्या चांगल्या-वाईट कर्मांचे यथायोग्य फळ देणारा आहे. असा विचार करून जे लोक मोठे चतुर आहेत, ते संसार-प्रवाह दुःखरूप असल्याचे समजून मलाच भजतात.॥३॥

मूल (चौपाई)

त्यागहिं कर्म सुभासुभ दायक।
भजहिं मोहि सुर नर मुनि नायक॥
संत असंतन्ह के गुन भाषे।
ते न परहिं भव जिन्ह लखि राखे॥

अनुवाद (हिन्दी)

त्यामुळे ते शुभ व अशुभ फल देणाऱ्या कर्मांचा त्याग करून देव, मनुष्य आणि मुनींचा स्वामी असलेल्या मला भजतात. अशा प्रकारे मी संत आणि असंत यांचे गुण सांगितले. ज्या लोकांना हे गुण समजले आहेत, ते जन्म-मरणाच्या फेऱ्यात पडत नाहीत.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

सुनहु तात माया कृत गुन अरु दोष अनेक।
गुन यह उभय न देखिअहिं देखिअ सो अबिबेक॥४१॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधो, ऐक. मायेने रचलेले अनेक गुण व दोष आहेत. त्यांची वास्तविक सत्ता नाही. ते दोन्हीही पाहूच नयेत, यामध्येच विवेक आहे. ते पहाणे हाच अविवेक होय.’॥४१॥

मूल (चौपाई)

श्रीमुख बचन सुनत सब भाई।
हरषे प्रेम न हृदयँ समाई॥
करहिं बिनय अति बारहिं बारा।
हनूमान हियँ हरष अपारा॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंतांच्या श्रीमुखातून हे वचन ऐकून सर्व बंधूंना आनंद झाला. त्यांच्या मनात प्रेम मावत नव्हते. ते वारंवार विनवणी करीत होते. विशेषतः हनुमानाच्या मनाला अपार आनंद झाला होता.॥१॥

मूल (चौपाई)

पुनि रघुपति निज मंदिर गए।
एहि बिधि चरित करत नित नए॥
बार बार नारद मुनि आवहिं।
चरित पुनीत राम के गावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर श्रीराम आपल्या महालाकडे गेले. अशाप्रकारे ते नित्य नवीन लीला करीत होते. नारद मुनी वारंवार अयोध्येला येत असत आणि श्रीरामांचे पवित्र चरित्र गात असत.॥२॥

मूल (चौपाई)

नित नव चरित देखि मुनि जाहीं।
ब्रह्मलोक सब कथा कहाहीं॥
सुनि बिरंचि अतिसय सुख मानहिं।
पुनि पुनि तात करहु गुन गानहिं॥

अनुवाद (हिन्दी)

मुनी येऊन नित्य नवनवीन चरित्र लीला पाहून येथून जात व ब्रह्मलोकी जाऊन सर्व कथा सांगत. ब्रह्मदेवांना ती ऐकून समाधान वाटे व ते म्हणत ‘हे वत्सा! वारंवार श्रीरामांच्या गुणांचे गायन कर.’॥३॥

मूल (चौपाई)

सनकादिक नारदहि सराहहिं।
जद्यपि ब्रह्म निरत मुनि आहहिं॥
सुनि गुन गान समाधि बिसारी।
सादर सुनहिं परम अधिकारी॥

अनुवाद (हिन्दी)

सनकादिक मुनी नारदांची प्रशंसा करीत. जरी ते सनकादिक मुनी ब्रह्मनिष्ठ होते, तरी श्रीरामांचे गुणगान ऐकून तेसुद्धा आपली ब्रह्मसमाधी विसरून जात आणि ते आदराने ऐकत. ते रामकथा ऐकण्याचे श्रेष्ठ अधिकारी होते.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

जीवनमुक्त ब्रह्मपर चरित सुनहिं तजि ध्यान।
जे हरि कथाँ न करहिं रति तिन्ह के हिय पाषान॥ ४२॥

अनुवाद (हिन्दी)

सनकादी मुनींसारखे जीवन्मुक्त आणि ब्रह्मनिष्ठ पुरुषसुद्धा ब्रह्मसमाधी सोडून श्रीरामांचे चरित्र ऐकतात. हे समजल्यावरही जे श्रीहरीच्या कथेविषयी प्रेम बाळगत नाहीत, ते खरोखर पाषाणहृदयीच होत.॥४२॥