०७ पुत्रोत्पत्ति, अयोध्येची रमणीयता, सनकादिकांचे आगमन

मूल (चौपाई)

अहनिसि बिधिहि मनावत रहहीं।
श्रीरघुबीर चरन रति चहहीं॥
दुइ सुत सुंदर सीताँ जाए।
लव कुस बेद पुरानन्ह गाए॥

अनुवाद (हिन्दी)

ते रात्रंदिवस ब्रह्मदेवांना प्रार्थना करीत की, श्रीरघुवीरांच्या चरणी आपले दृढ प्रेम असावे. सीतेला लव व कुश असे दोन पुत्र झाले. त्यांचे वर्णन वेद-पुराणांमध्ये केले आहे.॥३॥

मूल (चौपाई)

दोउ बिजई बिनई गुन मंदिर।
हरि प्रतिबिंब मनहुँ अति सुंदर॥
दुइ दुइ सुत सब भ्रातन्ह केरे।
भए रूप गुन सील घनेरे॥

अनुवाद (हिन्दी)

लव-कुश हे दोघेही विख्यात योद्धे, नम्र व सर्वगुण-संपन्न होते आणि असे अत्यंत सुंदर होते की, जणू श्रीरामांचे प्रतिबिंबच असावेत. सर्वभावांनाही दोन-दोन पुत्र झाले. तेही मोठे सुंदर, गुणवान व सुशील होते.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

ग्यान गिरा गोतीत अज माया मन गुन पार।
सोइ सच्चिदानंद घन कर नर चरित उदार॥ २५॥

अनुवाद (हिन्दी)

जे बौद्धिक ज्ञान, वाणी आणि इंद्रिये यांच्या पलीकडचे आणि अजन्मा आहेत, तसेच माया, मन व गुण यांच्या पलीकडचे आहेत, तेच सच्चिदानंद भगवंत श्रेष्ठ अशी मनुष्यलीला करीत होते.॥२५॥

मूल (चौपाई)

प्रातकाल सरऊ करि मज्जन।
बैठहिं सभाँ संग द्विज सज्जन॥
बेद पुरान बसिष्ट बखानहिं।
सुनहिं राम जद्यपि सब जानहिं॥

अनुवाद (हिन्दी)

ते प्रातःकाली शरयू नदीमध्ये स्नान करून ब्राह्मण व सज्जन यांच्याबरोबर सभेत बसत. वसिष्ठ मुनी, वेद व पुराणांतील कथा वर्णन करीत आणि श्रीराम जाणत असूनही त्या ऐकत असत.॥१॥

मूल (चौपाई)

अनुजन्ह संजुत भोजन करहीं।
देखि सकल जननीं सुख भरहीं॥
भरत सत्रुहन दोनउ भाई।
सहित पवनसुत उपबन जाई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम भावांबरोबर भोजन करीत. त्यांना पाहून सर्व माता आनंदमग्न होत. भरत आणि शत्रुघ्न हे दोन्ही भाऊ हनुमानासोबत उपवनात जाऊन,॥२॥

मूल (चौपाई)

बूझहिं बैठि राम गुन गाहा।
कह हनुमान सुमति अवगाहा॥
सुनत बिमल गुन अति सुख पावहिं।
बहुरि बहुरि करि बिनय कहावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

तेथे बसून श्रीरामांच्या गुणांच्या कथा विचारत व हनुमान आपल्या कुशल बुद्धीने त्या गुणांमध्ये मग्न होऊन त्यांचे वर्णन करीत असे. श्रीरामचंद्रांचे निर्मळ गुण ऐकून दोघे बंधू अत्यंत सुखावून जात आणि विनवणी करून हनुमानाला वारंवार ते सांगायला लावत.॥३॥

मूल (चौपाई)

सब कें गृह गृह होहिं पुराना।
राम चरित पावन बिधि नाना॥
नर अरु नारि राम गुन गानहिं।
करहिं दिवस निसि जात न जानहिं॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्येतील घरोघरी पुराणे व अनेक प्रकारच्या पवित्र श्रीरामकथेंचे वाचन व श्रवण होत होते. स्त्री-पुरुष सर्वजण श्रीरामांचे गुणगान करीत होते आणि त्या आनंदामध्ये रात्र व दिवस कसा सरला, हेही समजत नव्हते.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

अवधपुरी बासिन्ह कर सुख संपदा समाज।
सहस सेष नहिं कहि सकहिं जहँ नृप राम बिराज॥ २६॥

अनुवाद (हिन्दी)

जेथे भगवान श्रीरामचंद्र स्वतः राजा म्हणून विराजमान होते, त्या अयोध्येमधील निवासीयांच्या सुख-संपत्तीच्या भांडाराचे वर्णन हजारो शेषसुद्धा करू शकणार नाहीत.॥२६॥

मूल (चौपाई)

नारदादि सनकादि मुनीसा।
दरसन लागि कोसलाधीसा॥
दिन प्रति सकल अजोध्या आवहिं।
देखि नगरु बिरागु बिसरावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

नारदादी व सनकादी मुनीश्वर हे सर्व कोसलराज श्रीरामांच्या दर्शनासाठी दर दिवशी अयोध्येत येत आणि ती दिव्यनगरी पाहून आपले वैराग्य विसरून जात.॥१॥

मूल (चौपाई)

जातरूप मनि रचित अटारीं।
नाना रंग रुचिर गच ढारीं॥
पुर चहुँ पास कोट अति सुंदर।
रचे कँगूरा रंग रंग बर॥

अनुवाद (हिन्दी)

दिव्य सुवर्ण व रत्नांनी बनविलेल्या माडॺा व गच्च्या होत्या. तेथे रत्नांच्या अनेक रंगांच्या फरशा घातलेल्या होत्या. नगराच्या चारी बाजूंना तटबंदी होती. त्यावर सुंदर रंगीबेरंगी बुरूज होते.॥२॥

मूल (चौपाई)

नव ग्रह निकर अनीक बनाई।
जनु घेरी अमरावति आई॥
महि बहु रंग रचित गच काँचा।
जो बिलोकि मुनिबर मन नाचा॥

अनुवाद (हिन्दी)

जणू नवग्रहांनी मोठी सेना घेऊन अमरावतीला वेढा घातला होता. खडकांवर अनेक रंगांच्या दिव्य रत्नांची फरशी घातली होती. ती पाहून श्रेष्ठ मुनींचे मनही नाचू लागे.॥३॥

मूल (चौपाई)

धवल धाम ऊपर नभ चुंबत।
कलस मनहुँ रबि ससि दुति निंदत॥
बहु मनि रचित झरोखा भ्राजहिं।
गृह गृह प्रति मनि दीप बिराजहिं॥

अनुवाद (हिन्दी)

उज्ज्वल महाल आकाशाला भिडत होते. महालांवरील कळस आपल्या दिव्य प्रकाशाने जणू सूर्य व चंद्र यांच्या प्रकाशाला लाजवीत होते. महालांमध्ये अनेक रत्नांनी बनविलेले झरोके शोभून दिसत होते आणि घरोघरी रत्नदीप उजळत होते.॥४॥

छंद

मूल (दोहा)

मनि दीप राजहिं भवन भ्राजहिं देहरीं बिद्रुम रची।
मनि खंभ भीति बिरंचि बिरची कनक मनि मरकत खची॥
सुंदर मनोहर मंदिरायत अजिर रुचिर फटिक रचे।
प्रति द्वार द्वार कपाट पुरट बनाइ बहु बज्रन्हि खचे॥

अनुवाद (हिन्दी)

घरांमध्ये रत्नदीप शोभत होते. पोवळ्यांनी बनविलेले उंबरठे चमकत होते. रत्नजडित खांब होते. पाचूंनी बनविलेल्या सोन्याच्या भिंती अशा सुंदर दिसत होत्या की, जणू ब्रह्मदेवांनी खास करून त्या बनविल्या होत्या. महाल सुंदर, मनोहर व विशाल होते. त्यामध्ये सुंदर स्फटिकांची अंगणे बनविली होती. प्रत्येक सोन्याच्या दरवाजात पैलू पाडलेले हिरे जडविलेली दारे होती.

दोहा

मूल (दोहा)

चारु चित्रसाला गृह गृह प्रति लिखे बनाइ।
राम चरित जे निरख मुनि ते मन लेहिं चोराइ॥ २७॥

अनुवाद (हिन्दी)

घरोघरी चित्रशाळा होत्या. त्यामध्ये श्रीरामांच्या चरित्र-लीला सुंदरपणे चितारलेल्या होत्या. मुनी त्या पहात, तेव्हा त्यांचे चित्तही त्या हरण करीत होत्या.॥२७॥

मूल (चौपाई)

सुमन बाटिका सबहिं लगाईं।
बिबिध भाँति करि जतन बनाईं॥
लता ललित बहु जाति सुहाईं।
फूलहिं सदा बसंत कि नाईं॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व लोकांनी भिन्न भिन्न प्रकारच्या पुष्पवाटिका प्रयत्नपूर्वक लावल्या होत्या. त्यांमध्ये अनेक जातींच्या सुंदर व ललित लता वसंत ऋतूप्रमाणे नित्य फुललेल्या असत.॥१॥

मूल (चौपाई)

गुंजत मधुकर मुखर मनोहर।
मारुत त्रिबिधि सदा बह सुंदर॥
नाना खग बालकन्हि जिआए।
बोलत मधुर उड़ात सुहाए॥

अनुवाद (हिन्दी)

भ्रमर मनोहर गुंजारव करीत असत. नेहमी तिन्ही प्रकारची हवा वाहात असे. मुलांनी पुष्कळ पक्षी पाळले होते. ते गोड बोलत असत व उडताना सुंदर दिसत.॥२॥

मूल (चौपाई)

मोर हंस सारस पारावत।
भवननि पर सोभा अति पावत॥
जहँ तहँ देखहिं निज परिछाहीं।
बहु बिधि कूजहिं नृत्य कराहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मोर, हंस, सारस आणि कबुतरे घरांवर शोभून दिसत होती. ते पक्षी मण्यांच्या भिंतीवर व छतांवर जिकडे तिकडे आपले प्रतिबिंब पाहून व त्याला दुसरा पक्षी समजून अनेक प्रकारे गोड बोलत व नृत्य करीत असत.॥३॥

मूल (चौपाई)

सुक सारिका पढ़ावहिं बालक।
कहहु राम रघुपति जनपालक॥
राज दुआर सकल बिधि चारू।
बीथीं चौहट रुचिर बजारू॥

अनुवाद (हिन्दी)

मुले, पोपट-मैना यांना ‘रघुपति राघव राजाराम। पतितपावन सीताराम’ असे शिकवीत. राजद्वार सर्व तऱ्हेने सुंदर होते. गल्‍ल्या, चौक व बाजार सर्व सुंदर होते.॥४॥

छंद

मूल (दोहा)

बाजार रुचिर न बनइ बरनत बस्तु बिनु गथ पाइए।
जहँ भूप रमानिवास तहँ की संपदा किमि गाइए॥
बैठे बजाज सराफ बनिक अनेक मनहुँ कुबेर ते।
सब सुखी सब सच्चरित सुंदर नारि नर सिसु जरठ जे॥

अनुवाद (हिन्दी)

सुंदर बाजार होते. त्यांचे वर्णन करता येत नाही. तेथे वस्तू मोफत मिळत. जिथे स्वतः लक्ष्मीपती राजा असेल, तेथील संपत्तीचे वर्णन काय करावे? कपडॺांचे व्यापारी, सराफ इत्यादी व्यापारी जणू अनेक कुबेर बसल्यासारखे वाटत. सर्व स्त्री, पुरुष, मुले व म्हातारे सुखी, सदाचारी आणि सुंदर होते.

दोहा

मूल (दोहा)

उत्तर दिसि सरजू बह निर्मल जल गंभीर।
बाँधे घाट मनोहर स्वल्प पंक नहिं तीर॥२८॥

अनुवाद (हिन्दी)

नगराच्या उत्तरेला शरयू नदी वाहात होती. तिचे पाणी निर्मल व खोल होते. मनोहर घाट बांधले होते. किनाऱ्यावर जरासुद्धा चिखल नव्हता.॥२८॥

मूल (चौपाई)

दूरि फराक रुचिर सो घाटा।
जहँ जल पिअहिं बाजि गज ठाटा॥
पनिघट परम मनोहर नाना।
तहाँ न पुरुष करहिं अस्नाना॥

अनुवाद (हिन्दी)

काहीसा दूर वेगळा सुंदर घाट होता. तेथे घोडे व हत्ती यांच्या झुंडी पाणी पीत असत. स्त्रियांना पाणी भरण्यासाठी पुष्कळसे घाट होते. ते फार मनोहर होते. तेथे पुरुष स्नान करीत नसत.॥१॥

मूल (चौपाई)

राजघाट सब बिधि सुंदर बर।
मज्जहिं तहाँ बरन चारिउ नर॥
तीर तीर देवन्ह के मंदिर।
चहुँ दिसि तिन्ह के उपबन सुंदर॥

अनुवाद (हिन्दी)

राजघाट सर्व तऱ्हेने सुंदर व श्रेष्ठ होता. तेथे चारी वर्णांचे पुरुष स्नान करीत. शरयू नदीकाठी देवमंदिरे होती. त्यांच्या चारी बाजूंना सुंदर बागा होत्या.॥२॥

मूल (चौपाई)

कहुँ कहुँ सरिता तीर उदासी।
बसहिं ग्यान रत मुनि संन्यासी॥
तीर तीर तुलसिका सुहाई।
बृंद बृंद बहु मुनिन्ह लगाई॥

अनुवाद (हिन्दी)

नदीच्या किनाऱ्यावर कुठे कुठे विरक्त व ज्ञानपरायण मुनी आणि संन्यासी निवास करीत होते. शरयूच्या किनाऱ्यावर मुनींनी तुळशीच्या सुंदर बागाच्या बागा लावून ठेवल्या होत्या.॥३॥

मूल (चौपाई)

पुर सोभा कछु बरनि न जाई।
बाहेर नगर परम रुचिराई॥
देखत पुरी अखिल अघ भागा।
बन उपबन बापिका तड़ागा॥

अनुवाद (हिन्दी)

नगराची शोभा काही अवर्णनीय होती. नगराबाहेरही मोठे सौंदर्य होते. अयोध्यापुरीचे दर्शन करताच सर्व पापे पळून जात. तेथे वने, उपवने, आड आणि तलाव शोभत होते.॥४॥

छंद

मूल (दोहा)

बापीं तड़ाग अनूप कूप मनोहरायत सोहहीं।
सोपान सुंदर नीर निर्मल देखि सुर मुनि मोहहीं॥
बहु रंग कंज अनेक खग कूजहिं मधुप गुंजारहीं।
आराम रम्य पिकादि खग रव जनु पथिक हंकारहीं॥

अनुवाद (हिन्दी)

अनुपम पुष्करिणी, तलाव आणि मनोहर व विशाल विहिरी शोभत होत्या.त्यांच्या रत्नजडित पायऱ्या आणि निर्मल पाणी पाहून देव व मुनीसुद्धा मोहून जात होते. तलावांमध्ये अनेक रंगांची कमळे उमललेली असत. अनेक पक्षी कूजन करीत आणि भ्रमर गुंजारव करीत. तेथील रमणीय बागा कोकिळा इत्यादी पक्ष्यांच्या गोड बोलीने जणू वाटसरूंना बोलावीत असत.

दोहा

मूल (दोहा)

रमानाथ जहँ राजा सो पुर बरनि कि जाइ।
अनिमादिक सुख संपदा रहीं अवध सब छाइ॥२९॥

अनुवाद (हिन्दी)

स्वतः लक्ष्मीपती भगवान जेथे राजा होते, त्या नगराचे वर्णन काय करावे? अणिमा इत्यादी अष्टसिद्धी आणि संपूर्ण सुख-संपत्ती अयोध्येमध्ये पसरलेली होती.॥२९॥

मूल (चौपाई)

जहँ तहँ नर रघुपति गुन गावहिं।
बैठि परसपर इहइ सिखावहिं॥
भजहु प्रनत प्रतिपालक रामहि।
सोभा सील रूप गुन धामहि॥

अनुवाद (हिन्दी)

जिकडे-तिकडे लोक श्रीरामचंद्रांचे गुणगान करीत आणि बसून एक दुसऱ्याला हाच उपदेश करीत की, शरणागताचे पालन करणाऱ्या श्रीरामांना भजा. शोभा, शील, रूप व गुणांची खाण असलेल्या श्रीरामचंद्रांना भजा.॥१॥

मूल (चौपाई)

जलज बिलोचन स्यामल गातहि।
पलक नयन इव सेवक त्रातहि॥
धृत सर रुचिर चाप तूनीरहि।
संत कंज बन रबि रनधीरहि॥

अनुवाद (हिन्दी)

कमलनयन आणि सावळे शरीर असलेल्या श्रीरामांना भजा. पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांचे रक्षण करतात, त्याप्रमाणे आपल्या सेवकांचे रक्षण करणाऱ्या रामांना भजा. सुंदर बाण, धनुष्य आणि भाता धारण करणाऱ्या रामांना भजा. संतरूपी कमलवनाला प्रफुल्लित करण्यासाठी सूर्यरूप असलेल्या रणधीर श्रीरामांना भजा.॥२॥

मूल (चौपाई)

काल कराल ब्याल खगराजहि।
नमत राम अकाम ममता जहि॥
लोभ मोह मृगजूथ किरातहि।
मनसिज करि हरि जन सुखदातहि॥

अनुवाद (हिन्दी)

कालरूप भयानक सर्पाचे भक्षण करणाऱ्या श्रीरामरूप गरुडाला भजा. निष्काम भावनेने प्रणाम करताच ममतेचा नाश करणाऱ्या श्रीरामांना भजा. लोभ-मोहरूपी हरिणांच्या कळपाचा नाश करणाऱ्या श्रीरामरूप किराताला भजा. कामदेवरूपी हत्तीसाठी सिंहरूप व सेवकांना सुख देणाऱ्या श्रीरामांना भजा.॥३॥

मूल (चौपाई)

संसय सोक निबिड़ तम भानुहि।
दनुज गहन घन दहन कृसानुहि॥
जनकसुता समेत रघुबीरहि।
कस न भजहु भंजन भव भीरहि॥

अनुवाद (हिन्दी)

संशय व शोकरूपी घनदाट अंधकाराचा नाश करणाऱ्या श्रीरामरूप सूर्याला भजा. राक्षसरूपी घनदाट वनाला जाळून टाकणाऱ्या श्रीरामरूप अग्नीला भजा. जन्म-मृत्यूच्या भयाचा नाश करणाऱ्या श्रीसीतारामांना का भजत नाही?॥४॥

मूल (चौपाई)

बहु बासना मसक हिम रासिहि।
सदा एकरस अज अबिनासिहि॥
मुनि रंजन भंजन महि भारहि।
तुलसिदास के प्रभुहि उदारहि॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक वासनारूपी कीटकांचा नाश करणाऱ्या श्रीरामरूप बर्फराशीला भजा. नित्य एकरस, अजन्मा, अविनाशी श्रीरामचंद्रांना भजा. मुनींना आनंद देणाऱ्या, पृथ्वीचा भार उतरणाऱ्या आणि तुलसीदासाचे उदार स्वामी असलेल्या श्रीरामांना भजा.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

एहि बिधि नगर नारि नर करहिं राम गुन गान।
सानुकूल सब पर रहहिं संतत कृपानिधान॥३०॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे नगरातील स्त्री-पुरुष श्रीरामांचे गुणगान करीत आणि कृपानिधान श्रीराम हे नेहमी सर्वांवर अत्यंत प्रसन्न असत.॥३०॥

मूल (चौपाई)

जब ते राम प्रताप खगेसा।
उदित भयउ अति प्रबल दिनेसा॥
पूरि प्रकास रहेउ तिहुँ लोका।
बहुतेन्ह सुख बहुतन मन सोका॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडी म्हणतात, ‘हे पक्षिराज गरुडा, जेव्हापासून रामप्रतापरूपी अत्यंत प्रचंड सूर्य उगवला आहे, तेव्हापासून तिन्ही लोकांत पूर्ण प्रकाश भरून राहिला आहे. त्यामुळे अनेकांना सुख तर कित्येकांच्या मनाला दुःख झाले आहे.॥१॥

मूल (चौपाई)

जिन्हहि सोक ते कहउँ बखानी।
प्रथम अबिद्या निसा नसानी॥
अघ उलूक जहँ तहाँ लुकाने।
काम क्रोध कैरव सकुचाने॥

अनुवाद (हिन्दी)

आता ज्यांना ज्यांना शोक झाला आहे, त्यांच्याबद्दल सांगतो. सर्वत्रप्रकाश पसरल्यामुळे प्रथमतः अविद्यारूपी रात्र नष्ट झाली. पापरूपी घुबडे जिकडे-तिकडे लपली आणि काम-क्रोध-रूपी कुमुदे कोमेजली.॥२॥

मूल (चौपाई)

बिबिध कर्म गुन काल सुभाऊ।
ए चकोर सुख लहहिं न काऊ॥
मत्सर मान मोह मद चोरा।
इन्ह कर हुनर न कवनिहुँ ओरा॥

अनुवाद (हिन्दी)

तऱ्हेतऱ्हेचे बंधनकारक कर्म, गुण, काल, स्वभाव हे चकोर होत. रामप्रतापरूपी सूर्याच्या प्रकाशात त्यांना कधीच सुख मिळत नाही. मत्सर,मान, मोह आणि मदरूपी जे चोर होते, त्यांची चौर्यकला कुठे चालेनाशी झाली.॥३॥

मूल (चौपाई)

धरम तड़ाग ग्यान बिग्याना।
ए पंकज बिकसे बिधि नाना॥
सुख संतोष बिराग बिबेका।
बिगत सोक ए कोक अनेका॥

अनुवाद (हिन्दी)

धर्मरूपी तलावात ज्ञान-विज्ञान ही अनेक प्रकारची कमळे उमलली.सुख, संतोष, वैराग्य आणि विवेक हे अनेक चक्रवाक शोकरहित झाले.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

यह प्रताप रबि जाकें उर जब करइ प्रकास।
पछिले बाढ़हिं प्रथम जे कहे ते पावहिं नास॥३१॥

अनुवाद (हिन्दी)

हा श्रीरामप्रतापरूपी सूर्य ज्यांच्या हृदयात जेव्हा प्रकाश पाडतो, तेव्हा ज्यांचे वर्णन पूर्वी केले आहे, ते धर्म, ज्ञान, विज्ञान, सुख, संतोष, वैराग्य आणि विवेक वाढीस लागतात आणि अविद्या, पाप, काम, क्रोध, कर्म, काल, गुण, स्वभाव इत्यादींचा नाश होतो.॥३१॥

मूल (चौपाई)

भ्रातन्ह सहित रामु एक बारा।
संग परम प्रिय पवनकुमारा॥
सुंदर उपबन देखन गए।
सब तरु कुसुमित पल्लव नए॥

अनुवाद (हिन्दी)

एकदा बंधूंसोबत श्रीरामचंद्र परम प्रिय हनुमानाला घेऊन सुंदर उपवन पाहण्यास गेले. तेथील सर्व वृक्ष फुललेले होते आणि त्यांना नवी पालवी फुटली होती.॥१॥

मूल (चौपाई)

जानि समय सनकादिक आए।
तेज पुंज गुन सील सुहाए॥
ब्रह्मानंद सदा लयलीना।
देखत बालक बहुकालीना॥

अनुवाद (हिन्दी)

योग्य संधी पाहून सनकादिक मुनी तेथे आले. ते तेजाचे पुंज, सुंदर गुण-शीलयुक्त आणि नेहमी ब्रह्मानंदात मग्न असत. दिसायला ते बालकासारखे वाटत, परंतु ते होते बऱ्याच कालापासूनचे.॥२॥

मूल (चौपाई)

रूप धरें जनु चारिउ बेदा।
समदरसी मुनि बिगत बिभेदा॥
आसा बसन ब्यसन यह तिन्हहीं।
रघुपति चरित होइ तहँ सुनहीं॥

अनुवाद (हिन्दी)

जणू चारी वेदच बालकरूप धारण केलेले असावेत. ते मुनी समदर्शी आणि भेदरहित होते. दिशा हीच त्यांची वस्त्रे होती. जिथे श्रीरघुनाथांची चरित्र-कथा चाले, तेथे जाऊन ते ती अवश्य ऐकत. हेच त्यांचे व्यसन होते.॥३॥

मूल (चौपाई)

तहाँ रहे सनकादि भवानी।
जहँ घटसंभव मुनिबर ग्यानी॥
राम कथा मुनिबर बहु बरनी।
ग्यान जोनि पावक जिमि अरनी॥

अनुवाद (हिन्दी)

शिव म्हणतात, ‘हे भवानी, सनकादिक मुनी जेथे ज्ञानी मुनिश्रेष्ठ अगस्त्य रहात होते, तेथून आले होते. श्रेष्ठ मुनींनी श्रीरामांच्या अनेक कथा त्यांना वर्णन करून सांगितल्या होत्या. ज्याप्रमाणे अरणी नावाच्या काष्ठापासून अग्नी उत्पन्न होतो, त्याप्रमाणे त्या कथा ज्ञान उत्पन्न करण्यास समर्थ होत्या.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

देखि राम मुनि आवत हरषि दंडवत कीन्ह।
स्वागत पूँछि पीत पट प्रभु बैठन कहँ दीन्ह॥३२॥

अनुवाद (हिन्दी)

सनकादिक मुनी येत असल्याचे पाहून श्रीरामांनी हर्षित होऊन त्यांना दंडवत घातला आणि त्यांचे क्षेमकुशल विचारून त्यांना बसण्यासाठी आपला पीतांबर अंथरला.॥३२॥

मूल (चौपाई)

कीन्ह दंडवत तीनिउँ भाई।
सहित पवनसुत सुख अधिकाई॥
मुनि रघुपति छबि अतुल बिलोकी।
भए मगन मन सके न रोकी॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर हनुमान व इतर तीन बंधूंनी त्यांना दंडवत घातला. सर्वांना समाधान झाले. मुनिजन श्रीरघुनाथांचे अतुलनीय लावण्य पाहून त्यामध्ये मग्न होऊन गेले. ते आपले मन आवरू शकले नाहीत.॥१॥

मूल (चौपाई)

स्यामल गात सरोरुह लोचन।
सुंदरता मंदिर भव मोचन॥
एकटक रहे निमेष न लावहिं।
प्रभु कर जोरें सीस नवावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

ते मुनी जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करणाऱ्या, श्यामशरीर, कमलनयन, सौंदर्याचे धाम असलेल्या श्रीरामांकडे एकटक पहातच राहिले. पापण्या लवत नव्हत्या आणि प्रभू त्यांच्यासमोर हात जोडून नतमस्तक होते.॥२॥

मूल (चौपाई)

तिन्ह कै दसा देखि रघुबीरा।
स्रवत नयन जल पुलक सरीरा॥
कर गहि प्रभु मुनिबर बैठारे।
परम मनोहर बचन उचारे॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींची प्रेमविव्हळ दशा पाहून त्यांच्याप्रमाणेच श्रीरघुनाथांच्या नेत्रांतून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि शरीर पुलकित झाले. त्यानंतर प्रभूंनी हात धरून श्रेष्ठ मुनींना विराजमान केले आणि परम मनोहर शब्दांनी ते त्यांना म्हणाले.॥३॥

मूल (चौपाई)

आजु धन्य मैं सुनहु मुनीसा।
तुम्हरें दरस जाहिं अघ खीसा॥
बड़े भाग पाइब सतसंगा।
बिनहिं प्रयास होहिं भव भंगा॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे मुनीश्वरांनो, आज मी धन्य झालो. तुमच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात. मोठॺा भाग्याने सत्संगती लाभते. तिच्यामुळे परिश्रमाशिवायच जन्म-मृत्यूचे चक्र नष्ट होते.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

संत संग अपबर्ग कर कामी भव कर पंथ।
कहहिं संत कबि कोबिद श्रुति पुरान सदग्रंथ॥३३॥

अनुवाद (हिन्दी)

संत-संग हा मोक्षाचा व कामी लोकांचा संग जन्म-मृत्यूच्या बंधनात पडण्याचा मार्ग आहे. संत, कवी आणि पंडित तसेच वेद-पुराण इत्यादी सर्व सद्ग्रंथ असेच सांगतात.’॥३३॥

मूल (चौपाई)

सुनि प्रभु बचन हरषि मुनि चारी।
पुलकित तन अस्तुति अनुसारी॥
जय भगवंत अनंत अनामय।
अनघ अनेक एक करुनामय॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंचे वचन ऐकून चारी मुनी आनंदित होऊन, पुलकित शरीराने स्तुती करू लागले. ‘हे भगवन, तुमचा विजय असो. तुम्ही अंतरहित, विकाररहित, पापरहित, अनेक रूपांमध्ये प्रकट होणारे व अद्वितीय आणि करुणामय आहात.॥१॥

मूल (चौपाई)

जय निर्गुन जय जय गुन सागर।
सुख मंदिर सुंदर अति नागर॥
जय इंदिरा रमन जय भूधर।
अनुपम अज अनादि सोभाकर॥

अनुवाद (हिन्दी)

हे निर्गुण, तुमचा विजय असो. हे गुणसागर, तुमचा विजय असो, विजय असो. तुम्ही सुखधाम, अत्यंत सुंदर आणि अत्यंत चतुर आहात. हे लक्ष्मीपती, तुमचा विजय असो. हे पृथ्वी धारण करणारे, तुमचा विजय असो. तुम्ही उपमारहित, अजन्मा, अनादी आणि शोभेची खाण आहात.॥२॥

मूल (चौपाई)

ग्यान निधान अमान मानप्रद।
पावन सुजस पुरान बेद बद॥
तग्य कृतग्य अग्यता भंजन।
नाम अनेक अनाम निरंजन॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही ज्ञानाचे भांडार, स्वतः मानरहित आणि दुसऱ्यांना मान देणारे आहात. वेद-पुराणे आपल्या पवित्र व सुंदर यशाचे वर्णन करतात. तुम्ही तत्त्वज्ञानी आहात केलेली सेवा मान्य करणारे आणि अज्ञानाचा नाश करणारे आहात. हे मायारहित, तुमची अनंत नावे आहेत आणि तुम्हांला कोणतेही नाव नाही. तुम्ही नामातीत आहात.॥३॥

मूल (चौपाई)

सर्ब सर्बगत सर्ब उरालय।
बससि सदा हम कहुँ परिपालय॥
द्वंद बिपति भव फंद बिभंजय।
हृदि बसि राम काम मद गंजय॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही सर्वरूप, सर्वांमध्ये व्याप्त, आणि सर्वांच्या हृदयरूपी घरामध्ये सदा निवास करता. म्हणून तुम्ही आमचे पालन करा. राग-द्वेषादी द्वंद्वे, विपत्ती आणि जन्म-मृत्यूचे जाळे तोडून टाका. हे श्रीराम, तुम्ही आमच्या हृदयी निवास करून काम व मद यांचा नाश करा.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

परमानंद कृपायतन मन परिपूरन काम।
प्रेम भगति अनपायनी देहु हमहि श्रीराम॥ ३४॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही परमानंदस्वरूप, कृपाधाम आणि मनोकामना पूर्ण करणारे आहात. हे श्रीराम, आम्हांला आपली अविचल प्रेमभक्ती द्या.॥३४॥

मूल (चौपाई)

देहु भगति रघुपति अति पावनि।
त्रिबिधि ताप भव दाप नसावनि॥
प्रनत काम सुरधेनु कलपतरु।
होइ प्रसन्न दीजै प्रभु यह बरु॥

अनुवाद (हिन्दी)

हे रघुनाथ, तुम्ही आम्हांला आपली अत्यंत पवित्र करणारी आणि तिन्ही प्रकारचे ताप आणि जन्म-मरणाच्या क्लेशांचा नाश करणारी भक्ती द्या. हे शरणागताची कामना पूर्ण करण्यासाठी कामधेनू आणि कल्पवृक्षरूप असलेल्या प्रभो, प्रसन्न होऊन आम्हांला हाच वर द्या.॥१॥

मूल (चौपाई)

भव बारिधि कुंभज रघुनायक।
सेवत सुलभ सकल सुख दायक॥
मन संभव दारुन दुख दारय।
दीनबंधु समता बिस्तारय॥

अनुवाद (हिन्दी)

हे रघुनाथ, तुम्ही जन्म-मृत्यूरूप समुद्र शोषून घेण्यासाठी अगस्त्य मुनींप्रमाणे आहात. तुम्ही सेवा करण्यास सुलभ आहात आणि सर्व सुखे देणारे आहात. हे दीनबंधू, मनात उत्पन्न होणाऱ्या दारुण दुःखांचा नाश करा आणि आमच्यामध्ये समदृष्टीची वाढ करा.॥२॥

मूल (चौपाई)

आस त्रास इरिषादि निवारक।
बिनय बिबेक बिरति बिस्तारक॥
भूप मौलि मनि मंडन धरनी।
देहि भगति संसृति सरि तरनी॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही विषयांची आशा, भय आणि ईर्ष्या इत्यादींचे निवारण करणारे आहात आणि विनय, विवेक व वैराग्य यांचा विस्तार करणारे आहात. हे राजांचे शिरोमणी व पृथ्वीचे भूषण असलेले श्रीराम, जन्म-मृत्यूची प्रवाहरूपी नदी तरून जाण्यासाठी नौकारूप असलेली आपली भक्ती आम्हांला द्या.॥३॥

मूल (चौपाई)

मुनि मन मानस हंस निरंतर।
चरन कमल बंदित अज संकर॥
रघुकुल केतु सेतु श्रुति रच्छक।
काल करम सुभाउ गुन भच्छक॥

अनुवाद (हिन्दी)

हे मुनींच्या मनरूपी मानससरोवरात निरंतर निवास करणारे हंस, तुमच्या चरण-कमलांना ब्रह्मदेव व शिव वंदन करतात. तुम्ही रघुकुलाची पताका, वेदमर्यादेचे रक्षक आणि काल, कर्म, स्वभाव व गुणरूप बंधनांचे निवारक आहात.॥४॥

मूल (चौपाई)

तारन तरन हरन सब दूषन।
तुलसिदास प्रभु त्रिभुवन भूषन॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही स्वतः तरलेले व दुसऱ्यांना तारून नेणारे आहात आणि सर्व दोषांचे हरण करणारे आहात. त्रैलोक्याचे विभूषण असलेले तुम्हीच तुलसीदासांचे स्वामी आहात.’॥५॥

दोहा

मूल (दोहा)

बार बार अस्तुति करि प्रेम सहित सिरु नाइ।
ब्रह्म भवन सनकादि गे अति अभीष्ट बर पाइ॥३५॥

अनुवाद (हिन्दी)

प्रेमाने वारंवार स्तुती करून आणि मस्तक लववून तसेच आपल्या मनास हवा असलेला वर प्राप्त करून सनकादिक मुनी ब्रह्मलोकी गेले.॥३५॥

मूल (चौपाई)

सनकादिक बिधि लोक सिधाए।
भ्रातन्ह राम चरन सिर नाए॥
पूछत प्रभुहि सकल सकुचाहीं।
चितवहिं सब मारुतसुत पाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

सनकादिक मुनी ब्रह्मलोकी गेले, तेव्हा तिन्ही भावांनी श्रीरामांच्या चरणी मस्तक टेकले. सर्व प्रभूंना काही विचारताना बंधूंना संकोच वाटत होता. म्हणून सर्वजण हनुमानाकडे पहात होते.॥१॥