०६ रामराज्याचे वर्णन

मूल (चौपाई)

दैहिक दैविक भौतिक तापा।
राम राज नहिं काहुहि ब्यापा॥
सब नर करहिं परस्पर प्रीती।
चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीती॥

अनुवाद (हिन्दी)

रामराज्यामध्ये त्रिविध तापांचा मागमूस नव्हता. सर्वजण परस्परांवर प्रेम करीत होते आणि वेदांमध्ये प्रतिपादित केलेल्या मर्यादेमध्ये तत्पर राहून आपापल्या धर्माचे पालन करीत होते.॥१॥

मूल (चौपाई)

चारिउ चरन धर्म जग माहीं।
पूरि रहा सपनेहुँ अघ नाहीं॥
राम भगति रत नर अरु नारी।
सकल परम गति के अधिकारी॥

अनुवाद (हिन्दी)

धर्म हा सत्य, शौच, दया आणि दान या आपल्या चारही चरणांनी युक्त होऊन राहिला होता. स्वप्नातही कुठे पाप नव्हते. सर्व स्त्रीपुरुष राम-भक्तीत तत्पर होते आणि ते सर्व परमगतीचे अधिकारी झाले होते.॥२॥

मूल (चौपाई)

अल्पमृत्यु नहिं कवनिउ पीरा।
सब सुंदर सब बिरुज सरीरा॥
नहिं दरिद्र कोउ दुखी न दीना।
नहिं कोउ अबुध न लच्छन हीना॥

अनुवाद (हिन्दी)

अल्प वयात मृत्यू होत नव्हता की कुणाला कोणतीही पीडा नव्हती. सर्वांचे देह सुंदर व निरोगी होते. कोणीही दरिद्री नव्हता, दुःखी नव्हता आणि दीनही नव्हता. कोणीही मूर्ख नव्हता व शुभलक्षणांनी हीन नव्हता.॥३॥

मूल (चौपाई)

सब निर्दंभ धर्मरत पुनी।
नर अरु नारि चतुर सब गुनी॥
सब गुनग्य पंडित सब ग्यानी।
सब कृतग्य नहिं कपट सयानी॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व दंभरहित होते, धर्मपरायण होते आणि पुण्यात्मे होते. सर्व स्त्री-पुरुष हे नीतिनिपुण व गुणी होते. सर्वजण गुणांचा आदर करणारे व पंडित होते आणि सर्वजण ज्ञानी होते. सर्वजणांमध्ये कृतज्ञता होती आणि कुणामध्येही लबाडी नव्हती.’॥४॥

दोहा

मूल (दोहा)

राम राज नभगेस सुनु सचराचर जग माहिं।
काल कर्म सुभाव गुन कृत दुख काहुहि नाहिं॥२१॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडी म्हणतात, ‘हे गरुडा, श्रीरामांच्या राज्यात चराचराला काल, कर्म, स्वभाव आणि गुण यांपासून उत्पन्न होणारे दुःख नव्हते.॥२१॥

मूल (चौपाई)

भूमि सप्त सागर मेखला।
एक भूप रघुपति कोसला॥
भुअन अनेक रोम प्रति जासू।
यह प्रभुता कछु बहुत न तासू॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्येमध्ये श्रीरघुनाथ हे सात समुद्रांच्या मेखलेच्या पृथ्वीचे एकमात्र राजे होते. ज्यांच्या रोमारोमात अनेक ब्रह्मांडे समाविष्ट होती, त्यांना या सात द्वीपांच्या पृथ्वीचे राज्य म्हणजे काहीच नव्हते.॥१॥

मूल (चौपाई)

सो महिमा समुझत प्रभु केरी।
यह बरनत हीनता घनेरी॥
सोउ महिमा खगेस जिन्ह जानी।
फिरि एहिं चरित तिन्हहुँ रति मानी॥

अनुवाद (हिन्दी)

उलट प्रभूंचा हा महिमा जाणल्यावर, ते सात समुद्रांनी वेढलेल्या सप्तद्वीपांच्या पृथ्वीचे एकमात्र सम्राट होते, असे म्हणणे म्हणजे त्यांची एक प्रकारे निंदाच होय. परंतु हे गरुडा, ज्यांनी त्यांचा हा महिमा जाणला, त्यांना सुद्धा मग या प्रभूंच्या लीलेविषयी प्रेम वाटत होते.॥२॥

मूल (चौपाई)

सोउ जाने कर फल यह लीला।
कहहिं महा मुनिबर दमसीला॥
राम राज कर सुख संपदा।
बरनि न सकइ फनीस सारदा॥

अनुवाद (हिन्दी)

कारण तो महिमाही जाणण्याचे फल म्हणजे या लीलेचा अनुभवच होय, असे जितेंद्रिय श्रेष्ठ महामुनी म्हणतात. रामराज्यातील सुख-संपत्तीचे वर्णन शेष व सरस्वती हे सुद्धा करू शकत नाहीत.॥३॥

मूल (चौपाई)

सब उदार सब पर उपकारी।
बिप्र चरन सेवक नर नारी॥
एकनारि ब्रत रत सब झारी।
ते मन बच क्रम पति हितकारी॥

अनुवाद (हिन्दी)

रामराज्यामधील सर्व स्त्रीपुरुष उदार होते, सर्वच परोपकारी होते आणि सर्वजण ब्राह्मणांच्या चरणांची सेवा करणारे होते. सर्वच पुरुष एकपत्नीव्रती होते. अशा प्रकारे स्त्रियासुद्धा कायावाचामनाने पतीचे हित करणाऱ्या होत्या.॥४॥

दोहा

मूल (दोहा)

दंड जतिन्ह कर भेद जहँ नर्तक नृत्य समाज।
जीतहु मनहि सुनिअ अस रामचंद्र कें राज॥ २२॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांच्या राज्यात ‘दंड’ हा फक्त संन्याशांच्याच हातामध्ये होता. ‘भेद’ हा फक्त नर्तकांच्या ताल-सुरांच्या संदर्भात ऐकू येत होता. ‘जिंका’ हा शब्द मन जिंकण्याच्या संदर्भात ऐकू येई.॥२२॥

मूल (चौपाई)

फूलहिं फरहिं सदा तरु कानन।
रहहिं एक सँग गज पंचानन॥
खग मृग सहज बयरु बिसराई।
सबन्हि परस्पर प्रीति बढ़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

वनांमध्ये वृक्ष नित्य फुलत व फळत होते. सिंह व हत्ती आपले जन्मजात वैर विसरून वावरत होते. सर्वच पशु-पक्षी आपले स्वाभाविक वैर विसरून गुण्यागोविंदाने रहात होते.॥१॥

मूल (चौपाई)

कूजहिं खग मृग नाना बृंदा।
अभय चरहिं बन करहिं अनंदा॥
सीतल सुरभि पवन बह मंदा।
गुंजत अलि लै चलि मकरंदा॥

अनुवाद (हिन्दी)

पक्षी गोड कूजन करीत होते. तऱ्हेतऱ्हेचे पशूंचे कळप वनामध्ये निर्भयपणे आनंदाने वावरत होते. शीतल, मंद व सुगंधित वारे वाहात होते. पुष्पांचा रस घेऊन भ्रमर गुंजारव करीत होते.॥२॥

मूल (चौपाई)

लता बिटप मागें मधु चवहीं।
मन भावतो धेनु पय स्रवहीं॥
ससि संपन्न सदा रह धरनी।
त्रेताँ भइ कृतजुग कै करनी॥

अनुवाद (हिन्दी)

वेली व वृक्ष हे मागणी करताच मध टपकू लागत. गाई मनासारखे दूध देत होत्या. धरती नेहमी पिकांनी भरलेली असे. त्रेतायुग असताना सत्ययुगातील स्थिती प्रकट झाली होती.॥३॥

मूल (चौपाई)

प्रगटींगिरिन्ह बिबिधि मनि खानी।
जगदातमा भूप जग जानी॥
सरिता सकल बहहिं बर बारी।
सीतल अमल स्वाद सुखकारी॥

अनुवाद (हिन्दी)

संपूर्ण जगाचे आत्मा असलेले भगवान हे जगात राज्य करीत आहेत, हे जाणून पर्वतांनी अनेक प्रकारची रत्ने प्रकट केली. सर्व नद्या श्रेष्ठ, शीतल, निर्मळ आणि सुखप्रद स्वादिष्ट जल प्रवाहित करीत होत्या.॥४॥

मूल (चौपाई)

सागर निज मरजादाँ रहहीं।
डारहिं रत्न तटन्हि नर लहहीं॥
सरसिज संकुल सकल तड़ागा।
अति प्रसन्न दस दिसा बिभागा॥

अनुवाद (हिन्दी)

समुद्र आपल्या मर्यादेमध्ये रहात होते. ते आपल्या लाटांबरोबर किनाऱ्याला रत्ने टाकीत होते. ती माणसांना मिळत होती. सर्व तलाव कमळांनी फुललेले होते. दाही दिशांतील प्रदेश अत्यंत प्रसन्न होते. ॥५॥

दोहा

मूल (दोहा)

बिधु महि पूर मयूखन्हि रबि तप जेतनेहि काज।
मागें बारिद देहिं जल रामचंद्र कें राज॥२३॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांच्या राज्यात चंद्र हा आपल्या अमृतमय किरणांनी पृथ्वीला भरून टाकीत होता. जेवढी गरज असेल, तेवढीच उष्णता सूर्य देत होता. मेघ हे जेवढे हवे तेवढेच पाणी देत होते.॥२३॥

मूल (चौपाई)

कोटिन्ह बाजिमेध प्रभु कीन्हे।
दान अनेक द्विजन्ह कहँ दीन्हे॥
श्रुति पथ पालक धर्म धुरंधर।
गुनातीत अरु भोग पुरंदर॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीरामांनी कोटॺवधी अश्वमेध यज्ञ केले आणि ब्राह्मणांना अनेक दाने दिली. श्रीरामचंद्र हे वेदमार्गाचे पालन करणारे, धर्माची धुरा वाहाणारे, त्रिगुणातीत व ऐश्वर्यामध्ये इंद्रासारखे होते.॥१॥

मूल (चौपाई)

पति अनुकूल सदा रह सीता।
सोभा खानि सुसील बिनीता॥
जानति कृपासिंधु प्रभुताई।
सेवति चरन कमल मन लाई॥

अनुवाद (हिन्दी)

सौंदर्याची खाण असलेली, सुशील व विनम्र सीता ही नित्य पतीला अनुकूल वागत होती.ती कृपासागर श्रीारामांचा महिमा जाणत होती. आणि मनःपूर्वक त्याच्या चरणांची सेवा करीत होती.॥२॥

मूल (चौपाई)

जद्यपि गृहँ सेवक सेवकिनी।
बिपुल सदा सेवा बिधि गुनी॥
निज कर गृह परिचरजा करई।
रामचंद्र आयसु अनुसरई॥

अनुवाद (हिन्दी)

जरी घरामध्ये पुष्कळ दास-दासी होत्या आणि त्या साऱ्या सेवेमध्ये निपुण होत्या, तरीही स्वामींच्या सेवेचे महत्त्व जाणणारी सीता घरची सर्व सेवा स्वतः आपल्या हातांनी करीत असे आणि श्रीरामचंद्रांच्या आज्ञेचे अनुसरण करीत असे.॥३॥

मूल (चौपाई)

जेहि बिधि कृपासिंधु सुख मानइ।
सोइ कर श्री सेवा बिधि जानइ॥
कौसल्यादि सासु गृह माहीं।
सेवइ सबन्हि मान मद नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

कृपासागर श्रीरामचंद्रांना ज्यात सुख वाटे, तेच सीता करीत असे. कारण ती सेवेची पद्धत जाणणारी होती. घरामध्ये कौसल्या इत्यादी सर्व सासूंची सेवा ती करीत असे व तिला कोणत्याही गोष्टीचा अभिमान किंवा घमेंड नव्हती.॥४॥

मूल (चौपाई)

उमा रमा ब्रह्मादि बंदिता।
जगदंबा संतत मनिंदिता॥

अनुवाद (हिन्दी)

शिव म्हणतात की, ‘हे उमा, जगज्जननी सीता ही ब्रह्मदेवादिक देवांना वंद्य व नित्य सर्वगुण-संपन्न होती.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

जासु कृपा कटाच्छु सुर चाहत चितव न सोइ।
राम पदारबिंद रति करति सुभावहि खोइ॥ २४॥

अनुवाद (हिन्दी)

जिचा कृपाकटाक्ष मिळावा, असे देवांना वाटे, परंतु जी त्यांच्याकडे ढुंकूनही पहात नसे, तीच लक्ष्मी आपला महामहिम स्वभाव सोडून श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांवर प्रेम करीत असे.॥२४॥

मूल (चौपाई)

सेवहिं सानकूल सब भाई।
राम चरन रति अति अधिकाई॥
प्रभु मुख कमल बिलोकत रहहीं।
कबहुँ कृपाल हमहि कछु कहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व बंधू श्रीरामांना अनुकूल अशी सेवा करीत. श्रीरामांच्या ठिकाणी त्यांचे आत्यंतिक प्रेम होते. ते नेहमी प्रभूंच्या मुखकमलाकडे पहात असत की, आम्हांलाही काही सेवा करण्यास कृपाळू प्रभूंनी सांगावे.॥१॥

मूल (चौपाई)

राम करहिं भ्रातन्ह पर प्रीती।
नाना भाँति सिखावहिं नीती॥
हरषित रहहिं नगर के लोगा।
करहिं सकल सुर दुर्लभ भोगा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामसुद्धा भावांवर प्रेम करीत असत आणि त्यांना सर्व प्रकारच्या नीतींची शिकवण देत. नगरामधील लोक आनंदित होते आणि देवदुर्लभ असे सर्व प्रकारचे भोग भोगत होते.॥२॥