०४ नवाह्नपारायण, आठवा विश्राम

राज्याभिषेक, वेदस्तुति, शिवस्तुति

मूल (चौपाई)

अवधपुरी अति रुचिर बनाई।
देवन्ह सुमन बृष्टि झरि लाई॥
राम कहा सेवकन्ह बुलाई।
प्रथम सखन्ह अन्हवावहु जाई॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्यापुरी फारच सुंदर सजविली गेली होती. देव पुष्पांची सतत वृष्टी करीत होते. श्रीरामचंद्रांनी सेवकांना बोलावून सांगितले की, ‘तुम्ही जाऊन प्रथम माझ्या मित्रांना स्नान घाला.’॥ १॥

मूल (चौपाई)

सुनत बचन जहँ तहँ जन धाए।
सुग्रीवादि तुरत अन्हवाए॥
पुनि करुनानिधि भरतु हँकारे।
निज कर राम जटा निरुआरे॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंतांचे बोलणे ऐकताच सेवक जिकडे-तिकडे धावत गेले व त्यांनी लगेच सुग्रीवादींना स्नान घातले. नंतर कृपानिधान श्रीरामांनी भरताला बोलावले आणि स्वतःच्या हातांनी त्याच्या जटा सोडविल्या.॥ २॥

मूल (चौपाई)

अन्हवाए प्रभु तीनिउ भाई।
भगत बछल कृपाल रघुराई॥
भरत भाग्य प्रभु कोमलताई।
सेष कोटि सत सकहिं न गाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर भक्तवत्सल कृपाळू प्रभू श्रीरघुनाथांनी तिन्ही भावांना स्नान घातले. भरताचे भाग्य व श्रीरामांचे वात्सल्य यांचे वर्णन अब्जावधी शेषही करू शकणार नाहीत.॥ ३॥

मूल (चौपाई)

पुनि निज जटा राम बिबराए।
गुर अनुसासन मागि नहाए॥
करि मज्जन प्रभु भूषन साजे।
अंग अनंग देखि सत लाजे॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर श्रीरामांनी स्वतःची जटा सोडविली आणि गुरूंची आज्ञा मागून स्नान केले. स्नान झाल्यावर प्रभूंनी अलंकार धारण केले. त्यांचे सुंदर अंग पाहून असंख्य कामदेवही लाजले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सासुन्ह सादर जानकिहि मज्जन तुरत कराइ।
दिब्य बसन बर भूषन अँग अँग सजे बनाइ॥ ११(क)॥

अनुवाद (हिन्दी)

इकडे सासवांनी जानकीला मोठॺा प्रेमाने लगेच स्नान घालून तिच्या अंगभर दिव्य वस्त्रे आणि श्रेष्ठ अलंकार घालून तिला नटविले.॥ ११(क)॥

मूल (दोहा)

राम बाम दिसि सोभति रमा रूप गुन खानि।
देखि मातु सब हरषीं जन्म सुफल निज जानि॥ ११(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या डाव्या बाजूस रूप व गुणांची खाण असलेली जानकी शोभून दिसत होती. त्यांना पाहून सर्व मातेंना आपला जन्म सार्थक झाल्याचा आनंद झाला.॥ ११(ख)॥

मूल (दोहा)

सुनु खगेस तेहि अवसर ब्रह्मा सिव मुनि बृंद।
चढ़ि बिमान आए सब सुर देखन सुखकंद॥ ११(ग)॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडी म्हणतात, ‘हे पक्षिराज गरुड, त्याप्रसंगी ब्रह्मदेव, शिव, मुनींचा समाज व सर्व देव विमानांमध्ये बसून आनंदकंद भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी आले.॥ ११(ग)॥

मूल (चौपाई)

प्रभु बिलोकि मुनि मन अनुरागा।
तुरत दिब्य सिंघासन मागा॥
रबि सम तेज सो बरनि न जाई।
बैठे राम द्विजन्ह सिरु नाई॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंना पाहून मुनी वसिष्ठांच्या हृदयात प्रेमाचे भरते आले. त्यांनी ताबडतोब दिव्य सिंहासन मागविले. ते सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. त्याचे सौंदर्य अवर्णनीय होते. ब्राह्मणांसमोर नतमस्तक होऊन श्रीरामचंद्र त्याच्यावर विराजमान झाले.॥ १॥

मूल (चौपाई)

जनकसुता समेत रघुराई।
पेखि प्रहरषे मुनि समुदाई॥
बेद मंत्र तब द्विजन्ह उचारे।
नभ सुर मुनि जय जयति पुकारे॥

अनुवाद (हिन्दी)

जानकीसह श्रीरामांना पाहून मुनि-समुदाय अत्यंत आनंदित झाला. मग ब्राह्मणांनी वेद-मंत्रांचा उच्चार केला. आकाशामध्ये देव व मुनी ‘श्रीरामांचा विजय असो, विजय असो’ अशा घोषणा करू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रथम तिलक बसिष्ट मुनि कीन्हा।
पुनि सब बिप्रन्ह आयसु दीन्हा॥
सुत बिलोकि हरषीं महतारी।
बार बार आरती उतारी॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वप्रथम वसिष्ठ मुनींनी श्रीरामांना तिलक लावला. नंतर त्यांनी सर्व ब्राह्मणांना तिलक लावण्याची आज्ञा केली. पुत्राला राजसिंहासनारूढ झाल्याचे पाहून मातेंना आनंद झाला आणि त्यांनी वारंवार आरत्या ओवाळल्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

बिप्रन्ह दान बिबिधि बिधि दीन्हे।
जाचक सकल अजाचक कीन्हे॥
सिंघासन पर त्रिभुअन साईं।
देखि सुरन्ह दुंदुभीं बजाईं॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारची दाने दिली व सर्व याचकांना भरपूर दान देऊन याचनारहित केले. त्रिभुवनाचे स्वामी श्रीरामचंद्र अयोध्येच्या सिंहासनावर विराजमान झाल्याचे पाहून देवांनी नगारे वाजविले.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

नभ दुंदुभीं बाजहिं बिपुल गंधर्ब किंनर गावहीं।
नाचहिं अपछरा बृंद परमानंद सुर मुनि पावहीं॥
भरतादि अनुज बिभीषनांगद हनुमदादि समेत ते।
गहें छत्र चामर ब्यजन धनु असि चर्म सक्ति बिराजते॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

आकाशात खूप नगारे वाजत होते. गंधर्व व किन्नर गात होते. अप्सरांच्या झुंडीच्या झुंडी नृत्य करत होत्या. देव व मुनी यांना परमानंद होत होता. भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न, बिभीषण, अंगद, हनुमान, सुग्रीव इत्यादी छत्र, चामर, पंखा, धनुष्य, तलवार, ढाल आणि शक्ती धारण करून शोभत होते.॥ १॥

मूल (दोहा)

श्री सहित दिनकर बंस भूषन काम बहु छबि सोहई।
नव अंबुधर बर गात अंबर पीत सुर मन मोहई॥
मुकुटांगदादि बिचित्र भूषन अंग अंगन्हि प्रति सजे।
अंभोज नयन बिसाल उर भुज धन्य नर निरखंति जे॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेसह विराजमान झालेल्या, सूर्यवंशाचे विभूषण असलेल्या श्रीरामांच्या शरीरामध्ये अनेक कामदेवांचे सौंदर्य शोभून दिसत होते. नव्या जलयुक्त मेघांसमान सुंदर श्याम शरीरावरील पीतांबर देवांचेही मन मोहित करीत होते. मुकुट, बाजूबंद इत्यादी अलंकार श्रीरामांच्या अंगाअंगावर शोभत होते. कमलासमान नेत्र, विशाल वक्षःस्थल आणि लांब भुजा असलेल्या त्यांचे दर्शन घेणारे लोक धन्य होत.॥ २॥

दोहा

मूल (दोहा)

वह सोभा समाज सुख कहत न बनइ खगेस।
बरनहिं सारद सेष श्रुति सो रस जान महेस॥ १२(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हे गरुडा, ती शोभा, तो समाज आणि ते सुख यांचे मी वर्णन करू शकत नाही. सरस्वती, शेष व वेद त्यांचे निरंतर वर्णन करतात, परंतु त्याचा खरा आनंद श्रीमहादेवच जाणतात.॥ १२(क)॥

मूल (दोहा)

भिन्न भिन्न अस्तुति करि गए सुर निज निज धाम।
बंदी बेष बेद तब आए जहँ श्रीराम॥ १२(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व देव वेगवेगळी स्तुती करून आपापल्या लोकी निघून गेले. तेव्हा चारी वेद हे भाटांचे रूप धारण करून श्रीरामांजवळ आले.॥ १२(ख)॥

मूल (दोहा)

प्रभु सर्बग्य कीन्ह अति आदर कृपानिधान।
लखेउ न काहूँ मरम कछु लगे करन गुन गान॥ १२(ग)॥

अनुवाद (हिन्दी)

कृपानिधान सर्वज्ञ प्रभूंनी त्यांना ओळखून त्यांचा खूप आदर केला. याचे रहस्य कुणाला काहीही कळले नाही. वेद गुणगान करू लागले.॥ १२(ग)॥

छंद

मूल (दोहा)

जय सगुन निर्गुन रूप रूप अनूप भूप सिरोमने।
दसकंधरादि प्रचंड निसिचर प्रबल खल भुजबल हने॥
अवतार नर संसार भार बिभंजि दारुन दुख दहे।
जय प्रनतपाल दयाल प्रभु संजुक्त सक्ति नमामहे॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे सगुण आणि निर्गुण रूप, हे अनुपम रूपलावण्ययुक्त, हे राजांचे शिरोमणी, तुमचा विजय असो. तुम्ही रावण इत्यादी प्रचंड, प्रबळ आणि दुष्ट निशाचरांना आपल्या बाहुबलाने मारून टाकले. तुम्ही मनुष्य-अवतार घेऊन पृथ्वीचा भार हरण करून तिचे भीषण दुःख दूर केले. हे दयाळू, हे शरणागतांचे रक्षण करणाऱ्या प्रभो, तुमचा विजय असो. आम्ही शक्ती सीतेसह शक्तिमान असलेल्या तुम्हांला नमस्कार करतो.॥ १॥

मूल (दोहा)

तव बिषम माया बस सुरासुर नाग नर अग जग हरे।
भव पंथ भ्रमत अमित दिवस निसि काल कर्म गुननि भरे॥
जे नाथ करि करुना बिलोके त्रिबिधि दुख ते निर्बहे।
भव खेद छेदन दच्छ हम कहुँ रच्छ राम नमामहे॥२॥

अनुवाद (हिन्दी)

हे हरी, तुमच्या दुस्तर मायेत गुंतल्यामुळे देव, राक्षस, नाग, मनुष्य आणि चर, अचर हे सर्व काल, कर्म आणि गुणांच्या अधीन होऊन रात्रंदिवस जन्म-मरणाच्या अनंत फेऱ्यांतून भटकत आहेत. हे नाथ, यांपैकी तुम्ही ज्यांना कृपादृष्टीने पाहिले, ते मायाजनित तिन्ही प्रकारच्या दुःखांमधून मुक्त झाले. जन्ममरणाचे श्रम नष्ट करण्यामध्ये कुशल असलेले हे श्रीराम, आमचे रक्षण करा. आम्ही तुम्हांला नमस्कार करतो.॥ २॥

मूल (दोहा)

जे ग्यान मान बिमत्त तव भव हरनि भक्ति न आदरी।
ते पाइ सुर दुर्लभ पदादपि परत हम देखत हरी॥
बिस्वास करि सब आस परिहरि दास तव जे होइ रहे।
जपि नाम तव बिनु श्रम तरहिं भव नाथ सो समरामहे॥ ३॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांनी मिथ्या ज्ञानाच्या अभिमानाने फार उन्मत्त होऊन जन्म-मृत्यूच्या भयाचे हरण करणाऱ्या आपल्या भक्तीचा आदर केला नाही, हे हरी, देव-दुर्लभ पद प्राप्त झाल्यावरही ते त्या पदावरून पतित होताना आम्हांला दिसतात. परंतु जे सर्व आशा सोडून तुमच्यावर विश्वास ठेवून तुमचे दास बनून राहातात, ते केवळ तुमचे नामच जपत विनासायास भवसागर तरून जातात. हे नाथ, अशा तुमचे आम्ही स्मरण करतो.॥ ३॥

मूल (दोहा)

जे चरन सिव अज पूज्य रज सुभ परसि मुनिपतिनी तरी।
नख निर्गता मुनि बंदिता त्रैलोक पावनि सुरसरी॥
ध्वज कुलिस अंकुस कंज जुत बन फिरत कंटक किन लहे।
पद कंज द्वंद मुकुंद राम रमेस नित्य भजामहे॥ ४॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या चरणांची पूजा शिव व ब्रह्मदेव यांच्याकडून होते आणि ज्या चरणांच्या कल्याणमय धुळीच्या स्पर्शामुळे शिळा होऊन पडलेली गौतमऋषींची पत्नी अहिल्याही तरून गेली, मुनींना वंद्य असलेली व त्रैलोक्यास पावन करणारी देवनदी गंगा ज्या चरणांच्या नखातून निघाली तसेच ध्वज, वज्र, अंकुश आणि कमल या चिन्हांनी युक्त असलेल्या ज्या चरणांना वनातून फिरताना काटे बोचल्यामुळे घट्टे पडले आहेत, हे मुकुंदा, हे रामा, हे रमापती, आम्ही तुमच्या त्या दोन्ही चरणांना नित्य भजतो.॥ ४॥

मूल (दोहा)

अब्यक्तमूलमनादि तरु त्वच चारि निगमागम भने।
षट कंध साखा पंच बीस अनेक पर्न सुमन घने॥
फल जुगल बिधि कटु मधुर बेलि अकेलि जेहि आश्रित रहे।
पल्लवत फूलत नवल नित संसार बिटप नमामहे॥ ५॥

अनुवाद (हिन्दी)

वेद-शास्त्रांनी म्हटले आहे की, ज्याचे मूळ अव्यक्त प्रकृती आहे, जो प्रवाहरूपाने अनादी आहे, ज्याला चार त्वचा आहेत, सहा खोडे आहेत, पंचवीस शाखा आणि अनेक पाने व पुष्कळ फुले आहेत, ज्याला कडू व गोड अशा दोन प्रकारची फळे लागली आहेत; ज्याच्यावर एकच वेल असून ती त्याच्याच आधारे रहाते. जिला नित्य नवीन पाने व फुले लागतात, अशा संसारवृक्षस्वरूपाने विश्वात प्रकट असलेल्या तुम्हांला आम्ही नमस्कार करतो.॥ ५॥

मूल (दोहा)

जे ब्रह्म अजमद्वैतमनुभवगम्य मन पर ध्यावहीं।
ते कहहुँ जानहुँ नाथ हम तव सगुन जस नित गावहीं॥
करुनायतन प्रभु सदगुनाकर देव यह बर मागहीं।
मन बचन कर्म बिकार तजि तव चरन हम अनुरागहीं॥ ६॥

अनुवाद (हिन्दी)

ब्रह्म हे जन्म नसलेले, अद्वैत, केवल अनुभवानेच जाणता येणारे आणि मनापलीकडील आहे, अशा प्रकारे जे ब्रह्माचे ध्यान करतात, ते खुशाल असे म्हणोत व ध्यान करोत; परंतु हे नाथ, आम्ही तर नित्य तुमच्या सगुण रूपाचीच कीर्ती गातो. हे करुणानिधान प्रभो, हे सद्गुणांची खाण, हे देवा, कायावाचामनाने विकारांचा त्याग करून तुमच्या चरणी आमचे प्रेम असावे, हाच वर आम्ही मागतो.’॥ ६॥

दोहा

मूल (दोहा)

सब के देखत बेदन्ह बिनती कीन्हि उदार।
अंतर्धान भए पुनि गए ब्रह्म आगार॥ १३(क)॥

अनुवाद (हिन्दी)

वेदांनी सर्वांच्यासमोर अशी उत्तम प्रार्थना केली आणि ते अंतर्धान पावून ब्रह्मलोकी गेले.॥ १३(क)॥

मूल (दोहा)

बैनतेय सुनु संभु तब आए जहँ रघुबीर।
बिनय करत गदगद गिरा पूरित पुलक सरीर॥ १३(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडी म्हणतात, ‘हे गरुडा, तेव्हा जेथे श्रीरघुवीर होते, तेथे शिव आले आणि सद्गदित वाणीने स्तुती करू लागले. त्यांचे शरीर पुलकित झाले होते.॥ १३(ख)॥

छंद

मूल (दोहा)

जय राम रमा रमनं समनं।
भवताप भयाकुल पाहि जनं॥
अवधेस सुरेस रमेस बिभो।
सरनागत मागत पाहि प्रभो॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे राम, हे रमारमण लक्ष्मीकांत, हे जन्ममरणाचा त्रास नष्ट करणारे, तुमचा विजय असो. जन्ममरणाच्या भयाने व्याकूळ झालेल्या या सेवकाचे रक्षण करा. हे अयोध्यापती, हे देवांचे स्वामी, हे रमापती, हे विभो, मी शरणागत होऊन हेच मागतो की, हे प्रभो, माझे रक्षण करा.॥ १॥

मूल (दोहा)

दससीस बिनासन बीस भुजा।
कृत दूरि महा महि भूरि रुजा॥
रजनीचर बृंद पतंग रहे ।
सर पावक तेज प्रचंड दहे॥

अनुवाद (हिन्दी)

दहा शिरे व वीस भुजा असलेल्या रावणाचा विनाश करून पृथ्वीचा सर्वांत मोठा रोग दूर करणाऱ्या हे श्रीरामा, राक्षससमूहरूपी जे कीटक होते, ते सर्व तुमच्या बाणरूपी अग्नीच्या प्रचंड तेजाने भस्म झाले.॥ २॥

मूल (दोहा)

महि मंडल मंडन चारुतरं।
धृत सायक चाप निषंग बरं॥
मद मोह महा ममता रजनी।
तम पुंज दिवाकर तेज अनी॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही पृथ्वीमंडळाचे अत्यंत सुंदर भूषण आहात. तुम्ही श्रेष्ठ बाण, धनुष्य व भाता धारण केलेले आहात. मद, मोह आणि ममतारूपी रात्रीच्या अंधकाराच्या घोर समूहाचा नाश करण्यासाठी तुम्ही सूर्याचे तेजोमय किरणसमूह आहात.॥ ३॥

मूल (दोहा)

मनजात किरात निपात किए।
मृग लोग कुभोग सरेन हिए॥
हति नाथ अनाथनि पाहि हरे।
बिषया बन पावँर भूलि परे॥

अनुवाद (हिन्दी)

कामदेवरूपी भिल्लाने मनुष्यरूपी हरिणांच्या मनात कुभोगरूपी बाण मारून त्यांना पाडले आहे. हे नाथ, पाप-तापाचे हरण करणारे हे हरी, त्या कामाला मारून विषयरूपी वनात भटकणाऱ्या या बिचाऱ्या अनाथ जीवांचे रक्षण करा.॥ ४॥

मूल (दोहा)

बहु रोग बियोगन्हि लोग हए।
भवदंघ्रि निरादर के फल ए॥
भव सिंधु अगाध परे नर ते।
पद पंकज प्रेम न जे करते॥

अनुवाद (हिन्दी)

लोक बऱ्याच रोगांनी व दुःखांनी त्रासले आहेत. तुमच्या चरणांचा निरादर केल्याचे हे फळ आहे. जे मनुष्य तुमच्या चरणकमलांवर प्रेम करीत नाहीत, ते अथांग भवसागरात पडतात.॥ ५॥

मूल (दोहा)

अति दीन मलीन दुखी नितहीं।
जिन्ह कें पद पंकज प्रीति नहीं॥
अवलंब भवंत कथा जिन्ह कें।
प्रिय संत अनंत सदा तिन्ह कें॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांना तुमच्या चरणकमलांविषयी प्रेम नाही, ते नित्य अत्यंत दीन, उदास व दुःखी असतात आणि ज्यांना तुमच्या लीला-कथेंचा आधार आहे, त्यांना संत व भगवान हे नेहमी प्रिय वाटू लागतात.॥ ६॥

मूल (दोहा)

नहिं राग न लोभ न मान मदा।
तिन्ह कें सम बैभव वा बिपदा॥
एहि ते तव सेवक होत मुदा।
मुनि त्यागत जोग भरोस सदा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्यामध्ये आसक्ती, लोभ, मान आणि मद असत नाही, त्यांना सुख-दुःख समान वाटते. त्यामुळे मुनिजन योग-साधनेवरचा विश्वास कायमचा सोडून देऊन प्रसन्नपणे तुमचे सेवक बनतात.॥ ७॥

मूल (दोहा)

करि प्रेम निरंतर नेम लिएँ।
पद पंकज सेवत सुद्ध हिएँ॥
सम मानि निरादर आदरही।
सब संत सुखी बिचरंति मही॥

अनुवाद (हिन्दी)

ते सर्व संत प्रेमाने नियमपूर्वक निरंतर शुद्ध हृदयाने तुमच्या चरणकमलांची सेवा करीत रहातात आणि मान-अपमान समान मानून सुखाने पृथ्वीवर वावरतात.॥ ८॥

मूल (दोहा)

मुनि मानस पंकज भृंग भजे।
रघुबीर महा रनधीर अजे॥
तव नाम जपामि नमामि हरी।
भव रोग महागद मान अरी॥

अनुवाद (हिन्दी)

हे मुनींच्या मनरूपी कमलातील भ्रमर, हे महान रणधीर आणि अजेय श्रीरघुवीर, मी तुम्हांला भजतो. हे हरी, मी तुमचे नाम जपतो आणि तुम्हांला नमस्कार करतो. तुम्ही जन्म-मरणरूपी रोगाचे महान औषध व अभिमानाचे शत्रू आहात.॥ ९॥

मूल (दोहा)

गुन सील कृपा परमायतनं।
प्रनमामि निरंतर श्रीरमनं॥
रघुनंद निकंदय द्वंद्वघनं।
महिपाल बिलोकय दीनजनं॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही गुण, शील आणि कृपा यांचे परम स्थान आहात. तुम्ही लक्ष्मीपती आहात. मी तुम्हांला निरंतर प्रणाम करतो. हे रघुनंदन, तुम्ही जन्म-मरण, सुख-दुःख, राग-द्वेष इत्यादी द्वंद्वांच्या समूहाचा नाश करा. हे राजन, या दीन दासावरही कृपा-कटाक्ष टाका.॥ १०॥

दोहा

मूल (दोहा)

बार बार बर मागउँ हरषि देहु श्रीरंग।
पद सरोज अनपायनी भगति सदा सतसंग॥ १४(क)॥

अनुवाद (हिन्दी)

मी तुम्हांला वारंवार हेच वरदान मागतो की, मला तुमच्या चरणकमलांविषयी दृढ भक्ती आणि भक्तांचा सत्संग नेहमी मिळो. हे लक्ष्मीपती, प्रसन्न होऊन मला हेच वरदान द्या.’॥ १४(क)॥

मूल (दोहा)

बरनि उमापति राम गुन हरषि गए कैलास।
तब प्रभु कपिन्ह दिवाए सब बिधि सुखप्रद बास॥ १४(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांच्या गुणांचे वर्णन करून उमापती आनंदाने कैलासाला निघून गेले. तेव्हा प्रभूंनी वानरांना राहण्यास सर्व सुखसोयी असलेली घरे दिली.॥ १४(ख)॥

मूल (चौपाई)

सुनु खगपति यह कथा पावनी।
त्रिबिध ताप भव भय दावनी॥
महाराज कर सुभ अभिषेका।
सुनत लहहिं नर बिरति बिबेका॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे गरुडा, ऐक. ही कथा सर्वांना पवित्र करणारी आहे. तिन्ही प्रकारच्या तापांचा आणि जन्म-मृत्यूच्या भीतीचा नाश करणारी आहे. महाराज श्रीरामचंद्र कल्याणमय राज्याभिषेकाची चरित्र-लीला निष्कामभावनेने ऐकल्याने मनुष्याला वैराग्य आणि ज्ञान प्राप्त होते.॥ १॥

मूल (चौपाई)

जे सकाम नर सुनहिं जे गावहिं।
सुख संपति नाना बिधि पावहिं॥
सुर दुर्लभ सुख करि जग माहीं।
अंतकाल रघुपति पुर जाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

आणि जे मनुष्य सकाम भावनेने ती ऐकतात व गातात, त्यांना अनेक प्रकारची सुख-संपत्ती मिळते. ते जगामध्ये देवदुर्लभ सुखे भोगून शेवटी श्रीरघुनाथांच्या परम धामाला जातात.॥२॥

मूल (चौपाई)

सुनहिं बिमुक्त बिरत अरु बिषई।
लहहिं भगति गति संपति नई॥
खगपति राम कथा मैं बरनी।
स्वमति बिलास त्रास दुख हरनी॥

अनुवाद (हिन्दी)

जे जीवन्मुक्त, विरक्त आणि विषयी लोक ही कथा ऐकतात, त्यांना क्रमशः भक्ती, मुक्ती व नित्य नवे भोग मिळतात. हे पक्षिराज गरुडा, मी आपल्या बुद्धीनुसार रामकथेचे वर्णन केले आहे. ही कथा जन्ममरणाचे भय व दुःख यांचे हरण करते.॥३॥

मूल (चौपाई)

बिरति बिबेक भगति दृढ़ करनी।
मोह नदी कहँ सुंदर तरनी॥
नित नव मंगल कौसलपुरी।
हरषित रहहिं लोग सब कुरी॥

अनुवाद (हिन्दी)

ही रामकथा वैराग्य, विवेक आणि भक्ती यांना दृढ करणारी आणिमोहरूपी नदी तरून जाण्यासाठी उत्तम नौका आहे. अयोध्यापुरीमध्ये नित्य नवे मंगलोत्सव होत होते. तेथे सर्व वर्गांतील लोक आनंदाने रहात होते.॥४॥

मूल (चौपाई)

नित नइ प्रीति राम पद पंकज।
सब कें जिन्हहि नमत सिव मुनि अज॥
मंगन बहु प्रकार पहिराए।
द्विजन्ह दान नाना बिधि पाए॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या ज्या चरणकमलांना श्रीशिव, मुनिगण व ब्रह्मदेवही नमस्कार करतात, त्यांच्या ठिकाणी सर्वांच्या मनात नित्य नवीन प्रेम आहे. याचकांना अनेक प्रकारची वस्त्राभूषणे दिली आणि ब्राह्मणांनी नाना प्रकारची दाने घेतली.॥५॥