०३ श्रीरामांचे स्वागत, भरत-भेट

दोहा

मूल (दोहा)

आवत देखि लोग सब कृपासिंधु भगवान।
नगर निकट प्रभु प्रेरेउ उतरेउ भूमि बिमान॥ ४(क)॥

अनुवाद (हिन्दी)

कृपासागर भगवान श्रीरामचंद्रांनी सर्व लोक येत असल्याचे पाहिले, तेव्हा प्रभूंनी विमान नगराजवळ उतरण्याची प्रेरणा दिली. तेव्हा ते पृथ्वीवर उतरले.॥ ४(क)॥

मूल (दोहा)

उतरि कहेउ प्रभु पुष्पकहि तुम्ह कुबेर पहिं जाहु।
प्रेरित राम चलेउ सो हरषु बिरहु अति ताहु॥ ४(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

विमानातून उतरल्यावर प्रभूंनी पुष्पक-विमानाला कुबेराकडे परत जाण्यास सांगितले. श्रीरामांच्या आज्ञेने ते निघाले. त्याला आपल्या मालकाजवळ जाण्याचा आनंद वाटत होता, तर प्रभू श्रीरामचंद्रांपासून दूर होण्याचे अत्यंत दुःखही वाटत होते.॥ ४(ख)॥

मूल (चौपाई)

आए भरत संग सब लोगा।
कृस तन श्रीरघुबीर बियोगा॥
बामदेव बसिष्ट मुनिनायक।
देखे प्रभु महि धरि धनु सायक॥

अनुवाद (हिन्दी)

भरतासोबत सर्व लोक आले. श्रीरघुवीरांच्या वियोगामुळे सर्वजण अशक्तसे झाले होते. प्रभूंनी वामदेव, वसिष्ठ इत्यादी मुनिश्रेष्ठांना पाहिले, तेव्हा त्यांनी धनुष्य-बाण जमिनीवर ठेवून,॥ १॥

मूल (चौपाई)

धाइ धरे गुर चरन सरोरुह।
अनुज सहित अति पुलक तनोरुह॥
भेंटि कुसल बूझी मुनिराया।
हमरें कुसल तुम्हारिहिं दाया॥

अनुवाद (हिन्दी)

लक्ष्मणासह धावत जाऊन गुरुजींचे चरण धरले. त्यांचे रोम-रोम अत्यंत पुलकित होत होते. मुनिराज वसिष्ठांनी त्यांना आलिंगन देऊन क्षेम-कुशल विचारले. प्रभू म्हणाले, ‘तुमच्या कृपेमुळेच आमचे क्षेम आहे.’॥ २॥

मूल (चौपाई)

सकल द्विजन्ह मिलि नायउ माथा।
धर्म धुरंधर रघुकुलनाथा॥
गहे भरत पुनि प्रभु पद पंकज।
नमत जिन्हहि सुर मुनि संकर अज॥

अनुवाद (हिन्दी)

धर्माची धुरा धारण करणारे रघुकुलाचे स्वामी श्रीराम यांनी सर्वब्राह्मणांना भेटून त्यांना नमस्कार केला. मग देव, मुनी, शंकर आणि ब्रह्मदेवसुद्धा प्रभूंच्या ज्या चरणांना नमस्कार करतात, ते चरण भरताने धरले.॥ ३॥

मूल (चौपाई)

परे भूमि नहिं उठत उठाए।
बर करि कृपासिंधु उर लाए॥
स्यामल गात रोम भए ठाढ़े।
नव राजीव नयन जल बाढ़े॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने जमिनीवर लोटांगण घातले. उठवूनही तो उठत नव्हता. तेव्हा कृपासिंधू श्रीरामांनी त्याला बळेच उठवून छातीशी धरले. त्यांचे सावळेशरीर रोमांचित झाले. नवकमलासमान नेत्रांतून प्रेमाश्रूंच्या धारांचा पूर आला.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

राजीव लोचन स्रवत जल तन ललित पुलकावलि बनी।
अति प्रेम हृदयँ लगाइ अनुजहि मिले प्रभु त्रिभुअन धनी॥
प्रभु मिलत अनुजहि सोह मो पहिं जाति नहिं उपमा कही।
जनु प्रेम अरु सिंगार तनु धरि मिले बर सुषमा लही॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंच्या कमलासमान नेत्रांतून पाणी वाहात होते. सुंदर शरीरावर पुलकावली शोभून दिसत होती. त्रैलोक्याचे स्वामी प्रभू श्रीरामांनी भरताला अत्यंत प्रेमाने हृदयाशी धरले. भावाला भेटताना प्रभू असे आनंदित झाले होते की, त्याला मी उपमा देऊ शकत नाही. जणू भक्ती व वात्सल्य हे देह धारण करून एकमेकांना भेटले व श्रेष्ठ शोभेला प्राप्त झाले.॥ १॥

मूल (दोहा)

बूझत कृपानिधि कुसल भरतहि बचन बेगि न आवई।
सुनु सिवा सो सुख बचन मन ते भिन्न जान जो पावई॥
अब कुसल कौसलनाथ आरत जानि जन दरसन दियो।
बूड़त बिरह बारीस कृपानिधान मोहि कर गहि लियो॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

कृपानिधान श्रीरामांनी भरताला क्षेम-कुशल विचारले. परंतु आनंदामुळे भरताच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. श्रीशिव म्हणतात, ‘हे पार्वती,भरताला लाभलेले ते भेटीचे सुख सांगण्याच्या व कल्पनेच्या पलीकडील होते.ज्याला ते लाभले, तोच ते जाणतो.’ भरत म्हणाला, ‘हे कोसलनाथ, तुम्ही आर्त समजून या दासाला दर्शन दिले, त्यामुळे आता सर्व क्षेम आहे. विरह-समुद्रात बुडत असलेल्या मला कृपानिधानांनी हात पकडून वाचविले.’॥ २॥

दोहा

मूल (दोहा)

पुनि प्रभु हरषि सत्रुहन भेंटे हृदयँ लगाइ।
लछिमन भरत मिले तब परम प्रेम दोउ भाइ॥ ५॥

अनुवाद (हिन्दी)

मग प्रभू आनंदाने शत्रुघ्नाला हृदयाशी धरून भेटले. त्यानंतर लक्ष्मण व भरत हे बंधू परम प्रेमाने एकमेकांना भेटले.॥ ५॥

मूल (चौपाई)

भरतानुज लछिमन पुनि भेंटे।
दुसह बिरह संभव दुख मेटे॥
सीता चरन भरत सिरु नावा।
अनुज समेत परम सुख पावा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर लक्ष्मण शत्रुघ्नाला मिठी मारून भेटला आणि अशाप्रकारे विरहामुळे उत्पन्न झालेले दुःसह दुःख नाहीसे केले. नंतर भरत व शत्रुघ्न यांनी सीतेच्या चरणी नमन केले आणि त्यांना खूप सुख लाभले.॥ १॥

मूल (चौपाई)

प्रभु बिलोकि हरषे पुरबासी।
जनित बियोग बिपति सब नासी॥
प्रेमातुर सब लोग निहारी।
कौतुक कीन्ह कृपाल खरारी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंना पाहून सर्व अयोध्यावासी आनंदित झाले. राम-वियोगामुळे झालेले त्यांचे सर्व दुःख नाहीसे झाले. सर्व लोक प्रेमविव्हळ व भेटण्यास आतुर असलेले पाहून श्रीरामांनी एक चमत्कार केला.॥ २॥

मूल (चौपाई)

अमित रूप प्रगटे तेहि काला।
जथा जोग मिले सबहि कृपाला॥
कृपादृष्टि रघुबीर बिलोकी।
किए सकल नर नारि बिसोकी॥

अनुवाद (हिन्दी)

त्या प्रसंगी कृपाळू श्रीराम असंख्य रूपांमध्ये प्रकट झाले आणि सर्वांशी एकाच वेळी यथायोग्य रीतीने भेटले. श्रीरघुवीरांनी कृपादृष्टीने पाहून सर्व नर-नारींचा शोक दूर केला.॥ ३॥

मूल (चौपाई)

छन महिं सबहि मिले भगवाना।
उमा मरम यह काहुँ न जाना॥
एहि बिधि सबहि सुखी करि रामा।
आगें चले सील गुन धामा॥

अनुवाद (हिन्दी)

भगवान क्षणभरात सर्वांना भेटले. हे उमा! हे रहस्य कुणालाही कळले नाही. अशा प्रकारे सौजन्य आणि गुणांचे धाम असलेले श्रीराम यांनी सर्वांना सुखी करून ते पुढे गेले.॥ ४॥

मूल (चौपाई)

कौसल्यादि मातु सब धाई।
निरखि बच्छ जनु धेनु लवाई॥

अनुवाद (हिन्दी)

कौसल्या इत्यादी माता, नुकत्याच व्यालेल्या गाई आपल्या वासरांना पाहून धाव घेतात, तशा धावल्या.॥ ५॥

छंद

मूल (दोहा)

जनु धेनु बालक बच्छ तजि गृहँ चरन बन परबस गईं।
दिन अंत पुर रुख स्रवत थन हुंकार करि धावत भईं॥
अति प्रेम प्रभु सब मातु भेटीं बचन मृदु बहुबिधि कहे।
गइ बिषम बिपति बियोगभव तिन्ह हरष सुख अगनित लहे॥

अनुवाद (हिन्दी)

जणू नव्याने व्यालेल्या गाई आपल्या छोटॺा वासरांना घरी सोडून नाइलाजाने वनात गेल्या असाव्यात आणि दिवस मावळताच वासरांना भेटण्यासाठी हंबरत व स्तनांतून दूध स्रवत नगराकडे धावल्या असाव्यात. प्रभू अत्यंत प्रेमाने अशा सर्व मातेंना भेटून अत्यंत गोड शब्दात बोलले. वियोगामुळे आलेली भीषण विपत्ती नाहीशी झाली. भगवंतांना भेटून व त्यांचे बोलणे ऐकून त्या सर्वजणींना अपार सुख व आनंद मिळाला.

दोहा

मूल (दोहा)

भेटेउ तनय सुमित्राँ राम चरन रति जानि।
रामहि मिलत कैकई हृदयँ बहुत सकुचानि॥ ६(क)॥

अनुवाद (हिन्दी)

आपला पुत्र लक्ष्मण याचे श्रीरामांच्या चरणी असलेले प्रेम पाहून सुमित्रा त्यांना भेटली. श्रीरामांना भेटताना कैकेयीच्या मनास मात्र संकोच वाटत होता.॥ ६(क)॥

मूल (दोहा)

लछिमन सब मातन्ह मिलि हरषे आसिष पाइ।
कैकइ कहँ पुनि पुनि मिले मन कर छोभु न जाइ॥ ६(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व मातेंना भेटल्यामुळे व त्यांचा आशीर्वाद मिळाल्याने लक्ष्मणाला आनंद वाटला. तो कैकेयी मातेला वारंवार भेटला, परंतु त्याच्या मनातील राग गेला नव्हता.॥ ६(ख)॥

मूल (चौपाई)

सासुन्ह सबनि मिली बैदेही।
चरनन्हि लागि हरषु अति तेही॥
देहिं असीस बूझि कुसलाता।
होइ अचल तुम्हार अहिवाता॥

अनुवाद (हिन्दी)

जानकी सर्व सासूंना भेटली आणि त्यांच्या पाया पडून तिला खूप आनंद झाला. सर्व सासवा तिची खुशाली विचारून आशीर्वाद देत होत्या की, ‘तुझे सौभाग्य अखंड राहो.’॥ १॥

मूल (चौपाई)

सबरघुपति मुखकमल बिलोकहिं।
मंगल जानि नयन जल रोकहिं॥
कनक थार आरती उतारहिं।
बार बार प्रभु गात निहारहिं॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व माता श्रीरघुनाथांचे कमलासारखे मुख पहात राहिल्या. त्यांच्या नेत्रात प्रेमाचे अश्रू उचंबळून येत होते, परंतु हा मंगल प्रसंग मानून त्या आपले अश्रू डोळ्यातच रोखून धरत होत्या. सोन्याच्या तबकातून आरती करीत होत्या आणि वारंवार प्रभूंचे अंग प्रेमाने पहात होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

नाना भाँति निछावरि करहीं।
परमानंद हरष उर भरहीं॥
कौसल्या पुनि पुनि रघुबीरहि।
चितवति कृपासिंधु रनधीरहि॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारच्या वस्तू ओवाळून टाकत होत्या आणि त्यांच्या मनाला परमानंद वाटत होता. कौसल्या वारंवार कृपा-सागर आणि रणधीर अशा रघुवीरांना पहात होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

हृदयँ बिचारति बारहिं बारा।
कवन भाँति लंकापति मारा॥
अति सुकुमार जुगल मेरे बारे।
निसिचर सुभट महाबल भारे॥

अनुवाद (हिन्दी)

ती वारंवार मनात विचार करीत होती की, यांनी लंकापती रावणाला कसे मारले असेल? माझे हे दोन्ही पुत्र अत्यंत सुकुमार आहेत आणि राक्षस हे तर फार मोठे योद्धे आणि बलवान होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

लछिमन अरु सीता सहित प्रभुहि बिलोकति मातु।
परमानंद मगन मन पुनि पुनि पुलकित गातु॥ ७॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व माता लक्ष्मण व जानकी यांच्यासह श्रीरामांना न्याहाळत होत्या.त्यांचे मन परमानंदात मग्न झाले होते आणि शरीर वारंवार पुलकित होत होते.॥ ७॥

मूल (चौपाई)

लंकापति कपीस नल नीला।
जामवंत अंगद सुभसीला॥
हनुमदादि सब बानर बीरा।
धरे मनोहर मनुज सरीरा॥

अनुवाद (हिन्दी)

लंकापती बिभीषण, वानरराज सुग्रीव, नल, नील, जांबवान, अंगद व हनुमान इत्यादी सर्व उत्तम स्वभावाच्या वीर वानरांनी मनुष्यांची मनोहर रूपे धारण केली होती.॥ १॥

मूल (चौपाई)

भरत सनेह सील ब्रत नेमा।
सादर सब बरनहिं अति प्रेमा॥
देखि नगरबासिन्ह कै रीती।
सकल सराहहिं प्रभु पद प्रीती॥

अनुवाद (हिन्दी)

ते सर्व भरताचे प्रेम, सुंदर स्वभाव, त्यागव्रत आणि नियमांचे आचरण पाहून अत्यंत प्रेमाने व आदराने त्याची वाखाणणी करीत होते आणि नगरवासीयांची प्रेम, शील आणि विनयपूर्ण रीत पाहून ते सर्वजण प्रभूंच्या चरणी असलेल्या त्यांच्या प्रेमाचे कौतुक करीत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

पुनि रघुपति सब सखा बोलाए।
मुनि पद लागहु सकल सिखाए॥
गुर बसिष्ट कुलपूज्य हमारे।
इन्ह की कृपाँ दनुज रन मारे॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर श्रीरघुनाथांनी सर्व मित्रांना बोलावले आणि सर्वांना सांगितले की, ‘मुनींच्या पाया पडा. हे गुरू वसिष्ठ, आमच्या संपूर्ण कुलासाठी पूज्य आहेत. यांच्या कृपेमुळेच युद्धात राक्षस मारले गेले आहेत.’॥ ३॥

मूल (चौपाई)

ए सब सखा सुनहु मुनि मेरे।
भए समर सागर कहँ बेरे॥
मम हित लागि जन्म इन्ह हारे।
भरतहु ते मोहि अधिक पिआरे॥

अनुवाद (हिन्दी)

मग श्रीराम गुरूंना म्हणाले की, ‘हे मुनिवर्य! हे सर्व माझे मित्र आहेत. युद्धरूपी समुद्रामध्ये यांनी माझ्यासाठी जहाजाप्रमाणे आधार दिला. माझ्यासाठी यांनी आपले प्राणसुद्धा दिले. हे भरतापेक्षाही मला जास्त प्रिय आहेत.’॥ ४॥

मूल (चौपाई)

सुनि प्रभु बचन मगन सब भए।
निमिष निमिष उपजत सुख नए॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंचे बोलणे ऐकून सर्वजण प्रेम व आनंदात बुडून गेले. अशा प्रकारे त्यांना क्षणोक्षणी नवे नवे सुख वाटत होते.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

कौसल्या के चरनन्हि पुनि तिन्ह नायउ माथ।
आसिष दीन्हे हरषि तुम्ह प्रिय मम जिमि रघुनाथ॥ ८(क)॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर त्या सर्वांनी कौसल्येच्या चरणांवर मस्तक ठेवले. कौसल्येने आनंदाने आशीर्वाद दिले आणि म्हटले, ‘तुम्ही मला रघुनाथाप्रमाणेच प्रिय आहात.’॥ ८(क)॥

मूल (दोहा)

सुमन बृष्टि नभ संकुल भवन चले सुखकंद।
चढ़ी अटारिन्ह देखहिं नगर नारि नर बृंद॥ ८(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

आनंदकंद श्रीराम आपल्या महालाकडे निघाले. फुलांच्या वर्षावाने आकाश भरून गेले होते. नगरातील स्त्री-पुरुषांचे जमाव गच्च्यांवर चढून त्यांचे दर्शन घेत होते.॥ ८(ख)॥

मूल (चौपाई)

कंचन कलस बिचित्र सँवारे।
सबहिं धरे सजि निज निज द्वारे॥
बंदनवार पताका केतू।
सबन्हि बनाए मंगल हेतू॥

अनुवाद (हिन्दी)

सोन्याचे कलश रत्नांनी अलंकृत करून व सजवून सर्व लोकांनी आपापल्या दारात ठेवले होते. सर्व लोकांनी मंगलकारक तोरणे, ध्वज आणि पताका लावल्या होत्या.॥ १॥

मूल (चौपाई)

बीथीं सकल सुगंध सिंचाईं।
गजमनि रचि बहु चौक पुराईं॥
नाना भाँति सुमंगल साजे।
हरषि नगर निसान बहु बाजे॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व गल्‍ल्यांमध्ये सुगंधी द्रव्यांचे सडे घातले होते. मोत्यांच्या अनेक रांगोळ्या काढल्या होत्या. अनेक प्रकारची सुंदर व मंगल सजावट केली होती आणि आनंद व्यक्त करणारे खूप नगारे वाजत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

जहँ तहँ नारि निछावरि करहीं।
देहिं असीस हरष उर भरहीं॥
कंचन थार आरतीं नाना।
जुबतीं सजें करहिं सुभ गाना॥

अनुवाद (हिन्दी)

जिकडे-तिकडे स्त्रिया वस्तू ओवाळून टाकीत होत्या आणि आनंदाने आशीर्वाद देत होत्या. बऱ्याचशा तरुण सुवासिनी सोन्याच्या तबकांमध्ये आरत्या घेऊन मंगलगीते गात होत्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

करहिं आरती आरतिहर कें।
रघुकुल कमल बिपिन दिनकर कें॥
पुर सोभा संपति कल्याना।
निगम सेष सारदा बखाना॥

अनुवाद (हिन्दी)

दुःख हरण करणारे आणि सूर्यकुलरूपी कमलवनाला प्रफुल्लित करणारे सूर्य श्रीराम यांना ओवाळीत होत्या. नगराची शोभा, संपत्ती व कल्याण यांचे वर्णन वेद, शेष व सरस्वती करीत होते.॥ ४॥

मूल (चौपाई)

तेउ यह चरित देखि ठगि रहहीं।
उमा तासु गुन नर किमि कहहीं॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु तेसुद्धा भगवंतांचे हे चरित्र पाहून अवाक् होत होते. शिव म्हणतात, ‘हे उमा, मग मनुष्य त्यांचे गुण कसे गाऊ शकतील बरे?’॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

नारि कुमुदिनीं अवध सर रघुपति बिरह दिनेस।
अस्त भएँ बिगसत भईं निरखि राम राकेस॥ ९(क)॥

अनुवाद (हिन्दी)

स्त्रिया या कुमुदिनी, अयोध्या हे सरोवर आणि श्रीरघुनाथांचा विरह हा सूर्य होता, त्यामुळे त्या कोमेजल्या होत्या. आता विरहरूपी सूर्याचा अस्त झाल्यामुळे श्रीरामरूपी पूर्णचंद्र पाहून त्या प्रफुल्लित झाल्या.॥ ९(क)॥

मूल (दोहा)

होहिं सगुन सुभ बिबिधि बिधि बाजहिं गगन निसान।
पुर नर नारि सनाथ करि भवन चले भगवान॥ ९(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारचे शुभ-शकुन होत होते. आकाशात नगारे वाजत होते. नगरामधील पुरुष व स्त्रिया यांना दर्शन देऊन कृतार्थ करीत भगवान श्रीराम महालाकडे निघाले.॥ ९(ख)॥

मूल (चौपाई)

प्रभु जानी कैकई लजानी।
प्रथम तासु गृह गए भवानी॥
ताहि प्रबोधि बहुत सुख दीन्हा।
पुनि निज भवन गवन हरि कीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीशिव म्हणतात, ‘हे भवानी, प्रभूंना जाणवले की माता कैकेयीओशाळून गेली आहे. म्हणून प्रथम ते तिच्या महालाकडे गेले आणि तिची समजूतघालून त्यांनी तिचे समाधान केले. नंतर श्रीहरी आपल्या महालात गेले.॥ १॥

मूल (चौपाई)

कृपासिंधु जब मंदिर गए।
पुर नर नारि सुखी सब भए॥
गुर बसिष्ट द्विज लिए बुलाई।
आजु सुघरी सुदिन समुदाई॥

अनुवाद (हिन्दी)

कृपासागर श्रीराम जेव्हा आपल्या महालात गेले, तेव्हा नगरातील सर्व स्त्रीपुरुषांना आनंद झाला. गुरू वसिष्ठांनी ब्राह्मणांना बोलावून म्हटले, ‘आज शुभ दिवस व शुभ मुहूर्त इत्यादी सर्व शुभ योग आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

सब द्विज देहु हरषि अनुसासन।
रामचंद्र बैठहिं सिंघासन॥
मुनि बसिष्ट के बचन सुहाए।
सुनत सकल बिप्रन्ह अति भाए॥

अनुवाद (हिन्दी)

या प्रसंगी श्रीरामचंद्रांनी सिंहासनावर विराजमान व्हावे, अशी तुम्ही सर्व ब्राह्मणांनी आनंदाने आज्ञा द्यावी.’ वसिष्ठ मुनींचे सुंदर बोल ऐकताच सर्व ब्राह्मणांना फार बरे वाटले.॥ ३॥

मूल (चौपाई)

कहहिं बचन मृदु बिप्र अनेका।
जग अभिराम राम अभिषेका॥
अब मुनिबर बिलंब नहिं कीजै।
महाराज कहँ तिलक करीजै॥

अनुवाद (हिन्दी)

ते सर्व ब्राह्मण आनंदपूर्ण भाषेत म्हणाले, ‘श्रीरामांचा राज्याभिषेक हा संपूर्ण जगाला आनंददायक आहे. हे मुनिश्रेष्ठ, आता उशीर लावू नका आणि महाराजांचा राजतिलक लवकर करा.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तब मुनि कहेउ सुमंत्र सन सुनत चलेउ हरषाइ।
रथ अनेक बहु बाजि गज तुरत सँवारे जाइ॥ १०(क)॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा मुनींनी सुमंत्राला सांगितले. ते ऐकताच तो आनंदाने निघाला. त्याने त्वरित जाऊन अनेक रथ, घोडे आणि हत्ती सजविले.॥ १०(क)॥

मूल (दोहा)

जहँ तहँ धावन पठइ पुनि मंगल द्रब्य मगाइ।
हरष समेत बसिष्ट पद पुनि सिरु नायउ आइ॥ १०(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

आणि जिकडे-तिकडे सूचना देणाऱ्या दूतांना पाठवून मांगलिक वस्तू मागविल्या आणि नंतर आनंदाने येऊन तो वसिष्ठांच्या पाया पडला.॥ १०(ख)॥