०२ भरत-हनुमान् भेट, अयोध्येत आनंद

दोहा

मूल (दोहा)

रहा एक दिन अवधि कर अति आरत पुर लोग।
जहँ तहँ सोचहिं नारि नर कृस तन राम बियोग॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम परत यायला फक्त एक दिवस उरला होता. म्हणून नगरातील लोक अधीर झाले होते. श्रीरामांच्या वियोगामुळे निरुत्साही झालेले स्त्री-पुरुष सगळीकडे विचार करीत होते की, अजून श्रीराम का आले नाहीत?

मूल (दोहा)

सगुन होहिं सुंदर सकल मन प्रसन्न सब केर।
प्रभु आगवन जनाव जनु नगर रम्य चहुँ फेर॥

अनुवाद (हिन्दी)

इतक्यात शुभशकुन होऊ लागले आणि सर्वांची मने प्रसन्न झाली. अयोध्यानगरही चोहीकडून सुंदर बनले. जणू ही सर्व लक्षणे प्रभूंच्या आगमनाची सूचना देत होती.

मूल (दोहा)

कौसल्यादि मातु सब मन अनंद अस होइ।
आयउ प्रभु श्री अनुजजुत कहन चहत अब कोइ॥

अनुवाद (हिन्दी)

इतक्यात कोणीतरी येऊन सीता व लक्ष्मणासह प्रभू श्रीरामचंद्र आले असल्याची वार्ता जणू सांगू इच्छित आहे, असा आनंद कौसल्या इत्यादी सर्व मातेंच्या मनाला वाटत होता.

मूल (दोहा)

भरत नयन भुज दच्छिन फरकत बारहिं बार।
जानि सगुन मन हरष अति लागे करन बिचार॥

अनुवाद (हिन्दी)

भरताचा उजवा डोळा व उजवा हात वारंवार स्फुरू लागला होता. हा शुभशकुन समजून त्याच्या मनाला अत्यंत आनंद झाला आणि तो विचार करू लागला.

मूल (चौपाई)

रहेउ एक दिन अवधि अधारा।
समुझत मन दुख भयउ अपारा॥
कारन कवन नाथ नहिं आयउ।
जानि कुटिल किधौं मोहि बिसरायउ॥

अनुवाद (हिन्दी)

माझ्या प्राणांचा आधार असलेल्या अवधीचा एकच दिवस उरला आहे, या विचाराने भरताच्या मनाला फार दुःख झाले. माझे स्वामी अजुनी आले नाहीत, याचे काय कारण असावे? मी कपटी आहे, असे मानून प्रभू मला विसरून तर गेले नाहीत?॥ १॥

मूल (चौपाई)

अहह धन्य लछिमन बड़भागी।
राम पदारबिंदु अनुरागी॥
कपटी कुटिल मोहि प्रभु चीन्हा।
ताते नाथ संग नहिं लीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

अहाहा, लक्ष्मण मोठा धन्य व भाग्यशाली आहे. तो श्रीरामचंद्रांच्या चरण-कमलांचा प्रेमी आहे, म्हणून तो त्यांच्यापासून दूर राहिला नाही. प्रभूंनी मला मात्र कपटी मानून सोबत घेतले नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

जौं करनी समुझै प्रभु मोरी।
नहिं निस्तार कलप सत कोरी॥
जन अवगुन प्रभु मान न काऊ।
दीन बंधु अति मृदुल सुभाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

बरोबरच आहे. जर प्रभूंनी माझे कृत्य पाहिले तर शंभर कोटी कल्पांपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही. प्रभू हे सेवकाच्या अवगुणांकडे कधी लक्ष देत नाहीत, एवढी एकच आशा आहे. ते दीनबंधू आहेत आणि अत्यंत कोमल स्वभावाचे आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

मोरे जियँ भरोस दृढ़ सोई।
मिलिहहिं राम सगुन सुभ होई॥
बीतें अवधि रहहिं जौं प्राना।
अधम कवन जग मोहि समाना॥

अनुवाद (हिन्दी)

म्हणून श्रीरामांची भेट होईल, असा मला पक्का विश्वास आहे.कारण मला होणारे शकुन मोठे शुभ आहेत. परंतु अवधी संपल्यावरही जर माझे प्राण उरले, तर माझ्यासारखा नीच या जगात दुसरा कोण असेल?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम बिरह सागर महँ भरत मगन मन होत।
बिप्र रूप धरि पवनसुत आइ गयउ जनु पोत॥ १(क)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या विरह-समुद्रामध्ये भरताचे मन बुडू लागले होते. त्याचवेळी हनुमान हा ब्राह्मणाचे रूप घेऊन असा आला की, जणू बुडणाऱ्याला वाचविण्यासाठी नावच आली.॥ १(क)॥

मूल (दोहा)

बैठे देखि कुसासन जटा मुकुट कृस गात।
राम राम रघुपति जपत स्रवत नयन जलजात॥ १(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

अशक्त झालेला व जटांचा मुकुट असलेला, ‘राम, राम, रघुपती’, असे जपत आपल्या कमल-नेत्रांतून अश्रू ढाळत कुशाच्या आसनावर बसलेला भरत हनुमानाला दिसला.॥ १(ख)॥

मूल (चौपाई)

देखत हनूमान अति हरषेउ।
पुलक गात लोचन जल बरषेउ॥
मन महँ बहुत भाँति सुख मानी।
बोलेउ श्रवन सुधा सम बानी॥

अनुवाद (हिन्दी)

त्याला पहाताच हनुमानाला खूप आनंद झाला. त्याचे शरीर पुलकित झाले, नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले. मनातून मोठा प्रसन्न होऊन तो कानांना अमृतासमान वाटणाऱ्या वाणीने भरताला म्हणाला,॥ १॥

मूल (चौपाई)

जासु बिरहँ सोचहु दिन राती।
रटहु निरंतर गुन गन पाँती॥
रघुकुल तिलक सुजन सुखदाता।
आयउ कुसल देव मुनि त्राता॥

अनुवाद (हिन्दी)

‘ज्यांच्या विरहामध्ये तुम्ही रात्रंदिवस काळजीने क्षीण होत होता आणि ज्यांच्या गुण-समूहांचे वर्णन निरंतर करीत आहात, तेच रघुकुलतिलक, सज्जनांना सुख देणारे आणि देव व मुनींचे रक्षक श्रीराम सुखरूपपणे परत आले आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

रिपु रन जीति सुजस सुर गावत।
सीता सहित अनुज प्रभु आवत॥
सुनत बचन बिसरे सब दूखा।
तृषावंत जिमि पाइ पियूषा॥

अनुवाद (हिन्दी)

युद्धामध्ये शत्रूला जिंकून सीता व लक्ष्मणासोबत प्रभू येत आहेत. देवगण त्यांची सुंदर कीर्ती गात आहेत.’ हे बोलणे ऐकताच भरत सर्व दुःखे विसरून गेला. तहान लागलेला माणूस अमृत मिळाल्यावर तहानेचे दुःख विसरून जातो तसा.॥ ३॥

मूल (चौपाई)

को तुम्ह तात कहाँ ते आए।
मोहि परम प्रिय बचन सुनाए॥
मारुत सुत मैं कपि हनुमाना।
नामु मोर सुनु कृपानिधाना॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने विचारले की, ‘बाबा रे! तू कोण आहेस? आणि कुठून आला आहेस? तू मला अतिशय आनंद देणारे बोललास.’ हनुमान म्हणाला, ‘हे कृपानिधान, ऐका. मी पवनपुत्र असून जातीने वानर आहे. माझे नाव हनुमान आहे.॥ ४॥

मूल (चौपाई)

दीनबंधु रघुपति कर किंकर।
सुनत भरत भेंटेउ उठि सादर॥
मिलत प्रेम नहिं हृदयँ समाता।
नयन स्रवत जल पुलकित गाता॥

अनुवाद (हिन्दी)

मी दीनबंधू श्रीरघुनाथांचा दास आहे.’ हे ऐकताच भरताने उठून मोठॺा आदराने हनुमानाला मिठी मारली. भेट घेताना भरताच्या मनात प्रेम मावत नव्हते. त्याच्या नेत्रांतून आनंद व प्रेमाचे अश्रू वाहू लागले आणि शरीर रोमांचित झाले.॥ ५॥

मूल (चौपाई)

कपि तव दरस सकलदुख बीते।
मिले आजु मोहि राम पिरीते॥
बार बार बूझी कुसलाता।
तो कहुँ देउँ काह सुनु भ्राता॥

अनुवाद (हिन्दी)

भरत म्हणाला, ‘हे हनुमाना, तुझ्या दर्शनाने माझी सर्व दुःखे नाहीशी झाली. तुझ्या रूपाने आज मला प्रिय श्रीरामच भेटले.’ भरताने वारंवार क्षेम-कुशल विचारले आणि म्हटले, ‘हे बंधू, ही शुभवार्ता आणण्ल्याबद्दल मी तुला काय देऊ?॥ ६॥

मूल (चौपाई)

एहि संदेस सरिस जग माहीं।
करि बिचार देखेउँ कछु नाहीं॥
नाहिन तात उरिन मैं तोही।
अब प्रभु चरित सुनावहु मोही॥

अनुवाद (हिन्दी)

या वार्तेच्या बदली देण्यासारखे जगात काहीही नाही. मी विचार करून पाहिले. म्हणून हे बंधो! मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. आता मला प्रभूंची हकीकत सांग.’॥ ७॥

मूल (चौपाई)

तब हनुमंत नाइ पद माथा।
कहे सकल रघुपति गुन गाथा॥
कहु कपि कबहुँ कृपाल गोसाईं।
सुमिरहिं मोहि दास की नाईं॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा हनुमानाने भरताच्या चरणांवर माथा ठेवून श्रीरघुनाथांची सर्वगुणगाथा सांगितली. भरताने विचारले, ‘हे हनुमाना, कृपाळू स्वामी श्रीरामचंद्र कधी माझी आपला दास समजून आठवण काढतात काय?॥ ८॥

छंद

मूल (दोहा)

निज दास ज्यों रघुबंसभूषन कबहुँ मम सुमिरन करॺो।
सुनि भरत बचन बिनीत अति कपि पुलकि तन चरनन्हि परॺो॥
रघुबीर निज मुख जासु गुन गन कहत अग जग नाथ जो।
काहे न होइ बिनीत परम पुनीत सदगुन सिंधु सो॥

अनुवाद (हिन्दी)

रघुवंशाचे भूषण श्रीराम कधी आपल्या सेवकाप्रमाणे मानून माझे स्मरण करतात काय?’ भरताचे हे विनम्र बोलणे ऐकून हनुमानाचे अंग रोमांचित झाले व त्याने चरणांवर लोटांगण घातले. तो मनात विचार करू लागला की, चराचराचे स्वामी असलेले श्रीरघुवीर आपल्या मुखाने ज्याच्या गुणांचे वर्णन करतात, तो भरत इतका विनम्र, परमपवित्र आणि सद्गुणांचा समूह का बरे असणार नाही?

दोहा

मूल (दोहा)

राम प्रान प्रिय नाथ तुम्ह सत्य बचन मम तात।
पुनि पुनि मिलत भरत सुनि हरष न हृदयँ समात॥ २(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हनुमान म्हणाला, ‘हे नाथ! श्रीरामांना तुम्ही प्राणप्रिय आहात. हे तात, हे माझे बोलणे खरे आहे.’ हे ऐकल्यावर भरत वारंवार हनुमानाला मिठी मारू लागला. त्याच्या हृदयात आनंद मावत नव्हता.॥ २(क)॥

सोरठा

मूल (दोहा)

भरत चरन सिरु नाइ तुरित गयउ कपि राम पहिं।
कही कुसल सब जाइ हरषि चलेउ प्रभु जान चढ़ि॥ २(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर भरताच्या चरणी प्रणाम करून हनुमान लगेच श्रीरामांकडे परत आला आणि त्याने सर्व खुशाली सांगितली. मग प्रभू आनंदाने विमानात बसून निघाले.॥ २(ख)॥

मूल (चौपाई)

हरषि भरत कोसलपुर आए।
समाचार सब गुरहि सुनाए॥
पुनि मंदिर महँ बात जनाई।
आवत नगर कुसल रघुराई॥

अनुवाद (हिन्दी)

इकडे भरतसुद्धा आनंदित होऊन अयोध्येत आला आणि त्याने गुरूंना सर्व सांगितले. मग राजमहालात ही वार्ता पाठविली की, श्रीरघुनाथ सुखरूपपणे अयोध्येला येत आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

सुनत सकल जननीं उठि धाईं।
कहि प्रभु कुसल भरत समुझाईं॥
समाचार पुरबासिन्ह पाए।
नर अरु नारि हरषि सब धाए॥

अनुवाद (हिन्दी)

बातमी कळताच सर्व माता भरताजवळ आनंदाने धावत आल्या. भरताने प्रभूंची खुशाली सांगून सर्वांची समजूत घातली. नंतर नगरवासीयांना ही वार्ता कळताच सर्व स्त्री-पुरुष आनंदाने धावून आले.॥ २॥

मूल (चौपाई)

दधि दुर्बा रोचन फल फूला।
नव तुलसी दल मंगल मूला॥
भरि भरि हेम थार भामिनी।
गावत चलिं सिंधुरगामिनी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या स्वागतासाठी दही, दूर्वा, गोरोचन, फळे-फुले, मांगल्याचे मूळ असलेले तुलसीदल इत्यादी वस्तू सोन्याच्या तबकांमध्ये भरभरून घेऊन गजगामिनी सुवासिनी स्त्रिया गात-गात निघाल्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

जे जैसेहिं तैसेहिं उठि धावहिं।
बाल बृद्ध कहँ संग न लावहिं॥
एक एकन्ह कहँ बूझहिं भाई।
तुम्ह देखे दयाल रघुराई॥

अनुवाद (हिन्दी)

जे जशा अवस्थेत होते, ते तशाच अवस्थेत उठून धावले. उशीर होईल म्हणून कुणी मुलांना आणि म्हाताऱ्यांना सोबत घेतले नाही. ते परस्परांना विचारीत होते की, ‘अरे बाबा, तू दयाळू श्रीरामचंद्रांना पाहिलेस काय?’॥ ४॥

मूल (चौपाई)

अवधपुरी प्रभु आवत जानी।
भई सकल सोभा कै खानी॥
बहइ सुहावन त्रिबिध समीरा।
भइ सरजू अति निर्मल नीरा॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू येत आहेत, हे पाहून अयोध्यापुरी संपूर्ण शोभेची खाण झाली. तिन्ही प्रकारची सुंदर हवा वाहू लागली. शरयू नदीचे पाणी पूर्णपणे निर्मळ झाले.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

हरषित गुर परिजन अनुज भूसुर बृंद समेत।
चले भरत मन प्रेम अति सन्मुख कृपानिकेत॥ ३(क)॥

अनुवाद (हिन्दी)

गुरू वसिष्ठ, कुटुंबीय, लहान बंधू शत्रुघ्न आणि ब्रह्मवृंदासह आनंदित होऊन भरत अत्यंत प्रेमपूर्ण मनाने कृपाधाम श्रीरामांच्या स्वागतासाठी सामोरा निघाला.॥ ३(क)॥

मूल (दोहा)

बहुतक चढ़ीं अटारिन्ह निरखहिं गगन बिमान।
देखि मधुर सुर हरषित करहिं सुमंगल गान॥ ३(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

बऱ्याच स्त्रिया गच्च्यांवर चढून आकाशात विमान पाहू लागल्या आणि ते पाहिल्यावर आनंदाने गोड स्वराने सुंदर मंगलगीते गाऊ लागल्या.॥ ३(ख)॥

मूल (दोहा)

राका ससि रघुपति पुर सिंधु देखि हरषान।
बढ़ॺो कोलाहल करत जनु नारि तरंग समान॥ ३(ग)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ हे पौर्णिमेचे चंद्र होते, तर अयोध्यासमुद्र. पूर्णचंद्राला पाहून तो समुद्र आनंदित होऊन गर्जना करीत होता आणि त्याला भरती आली होती. इकडे-तिकडे धावणाऱ्या स्त्रिया त्या समुद्रातील लाटा वाटत होत्या.॥ ३(ग)॥

मूल (चौपाई)

इहाँ भानुकुल कमल दिवाकर।
कपिन्ह देखावत नगर मनोहर॥
सुनु कपीस अंगद लंकेसा।
पावन पुरी रुचिर यह देसा॥

अनुवाद (हिन्दी)

इकडे विमानातून सूर्यकुलरूपी कमलाला प्रफुल्लित करणारे सूर्य श्रीरामचंद्र वानरांना मनोहर नगर दाखवीत होते. ते म्हणत होते, ‘हे सुग्रीवा, हे अंगदा, हे लंकापती बिभीषणा, ऐका. ही नगरी पवित्र आहे आणि हा देश सुंदर आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

जद्यपि सब बैकुंठ बखाना।
बेद पुरान बिदित जगु जाना॥
अवधपुरी सम प्रिय नहिं सोऊ।
यह प्रसंग जानइ कोउ कोऊ॥

अनुवाद (हिन्दी)

जरी सर्वांनी वैकुंठाचा महिमा सांगितला आहे, तो वेद-पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे आणि सर्व जगाला माहीत आहे, तरीसुद्धा अयोध्यापुरीइतका तो वैकुंठ मला प्रिय नाही, ही गोष्ट काही लोकच जाणतात.॥ २॥

मूल (चौपाई)

जन्मभूमि मम पुरी सुहावनि।
उत्तर दिसि बह सरजू पावनि॥
जा मज्जन ते बिनहिं प्रयासा।
मम समीप नर पावहिं बासा॥

अनुवाद (हिन्दी)

ही शोभिवंत नगरी माझी जन्मभूमी आहे. हिच्या उत्तर दिशेला जीवांना पवित्र करणारी शरयू नदी वाहाते. तिच्यामध्ये स्नान केल्याने मनुष्याला विनासायास माझी सामीप्यमुक्ती मिळते.॥ ३॥

मूल (चौपाई)

अति प्रिय मोहि इहाँ के बासी।
मम धामदा पुरी सुख रासी॥
हरषे सब कपि सुनि प्रभु बानी।
धन्य अवध जो राम बखानी॥

अनुवाद (हिन्दी)

येथील निवासी मला फार आवडतात. ही पुरी सुखाची खाण आणि माझे परमधाम देणारी आहे.’ प्रभूंचे बोलणे ऐकून सर्व वानरांना आनंद झाला. ते म्हणू लागले की, ‘ज्या अयोध्येची महती स्वतः श्रीरामांनी सांगितली, ती नक्कीच धन्य होय.’॥ ४॥