३५ बिभीषणाची प्रार्थना, श्रीराम त्वरित अयोध्येला जाण्यास उत्सुक

मूल (चौपाई)

करि बिनती जब संभु सिधाए।
तब प्रभु निकट बिभीषनु आए॥
नाइ चरन सिरु कह मृदु बानी।
बिनय सुनहु प्रभु सारँगपानी॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा शिव विनंती करून निघून गेले, तेव्हा बिभीषण प्रभूंजवळ आला आणि चरणी नतमस्तक होऊन कोमल वाणीने म्हणाला, ‘हे शार्ङ्गधनुष्य धारण करणारे प्रभो, माझी विनंती ऐका.॥ १॥

मूल (चौपाई)

सकुल सदल प्रभु रावन मारॺो।
पावन जस त्रिभुवन बिस्तारॺो॥
दीन मलीन हीन मति जाती।
मो पर कृपा कीन्हि बहु भाँती॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही कुलासह व सेनेसह रावणाचा वध केला. त्रिभुवनात आपली पवित्र कीर्ती पसरविली आणि मज दीन, पापी, बुद्धिहीन व जातिहीन सेवकावर अनेक प्रकारे कृपा केली.॥ २॥

मूल (चौपाई)

अब जन गृह पुनीत प्रभु कीजे।
मज्जनु करिअ समर श्रम छीजे॥
देखि कोस मंदिर संपदा।
देहु कृपाल कपिन्ह कहुँ मुदा॥

अनुवाद (हिन्दी)

आता हे प्रभू, या दासाचे घर पवित्र करा आणि तेथे येऊन स्नान करा. त्यामुळे युद्धाचा शीण नाहीसा होईल. हे कृपाळू! खजिना, महाल आणि संपत्तीचे निरीक्षण करून तिने प्रसन्नपणे वानरांचा सत्कार करा.॥ ३॥

मूल (चौपाई)

सब बिधि नाथ मोहि अपनाइअ।
पुनि मोहि सहित अवधपुर जाइअ॥
सुनत बचन मृदु दीनदयाला।
सजल भए द्वौ नयन बिसाला॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, मला सर्व प्रकारे आपले करून घ्या आणि हे प्रभो, मला बरोबर घेऊन अयोध्यापुरीला जा.’ बिभीषणाचे हे मृदू बोलणे ऐकताच दीनदयाळ प्रभूंच्या दोन्ही विशाल नेत्रांमध्ये प्रेमाश्रू दाटले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तोर कोस गृह मोर सब सत्य बचन सुनु भ्रात।
भरत दसा सुमिरत मोहि निमिष कल्प सम जात॥ ११६(क)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम म्हणाले, ‘हे बंधू, ऐक. तुझा खजिना आणि घर हे माझेच आहे ही गोष्ट खरी. परंतु भरताच्या अवस्थेची आठवण येताच मला एक एक पळ कल्पाप्रमाणे वाटतो.॥ ११६ (क)॥

मूल (दोहा)

तापस बेष गात कृस जपत निरंतर मोहि।
देखौं बेगि सो जतनु करु सखा निहोरउँ तोहि॥ ११६(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

तपस्वी वेषामध्ये दुर्बल शरीराने तो निरंतर माझ्या नामाचा जप करीत बसला आहे. मी त्याला लवकरात लवकर भेटू शकेन, अशी व्यवस्था कर. माझी तुला हीच विनंती आहे.॥ ११६ (ख)॥

मूल (दोहा)

बीतें अवधि जाउँ जौं जिअत न पावउँ बीर।
सुमिरत अनुज प्रीति प्रभु पुनि पुनि पुलक सरीर॥ ११६ (ग)॥

अनुवाद (हिन्दी)

जर वेळ चुकली, तर मी माझ्या भावाला जिवंत पाहू शकणार नाही.’ लहान भाऊ भरत याच्या प्रेमाच्या आठवणीने प्रभूंचे शरीर वारंवार पुलकित होत होते.॥ ११६ (ग)॥

मूल (दोहा)

करेहु कल्प भरि राजु तुम्ह मोहि सुमिरेहु मन माहिं।
पुनि मम धाम पाइहहु जहाँ संत सब जाहिं॥ ११६(घ)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम पुढे म्हणाले, ‘हे बिभीषणा, तू कल्पापर्यंत राज्य कर आणि मनामध्ये माझे निरंतर स्मरण करीत राहा. मग जेथे सर्व संत जातात, ते परमधाम तुला मिळेल.॥ ११६ (घ)॥

मूल (चौपाई)

सुनत बिभीषन बचन राम के।
हरषि गहे पद कृपाधाम के॥
बानर भालु सकल हरषाने।
गहि प्रभु पद गुन बिमल बखाने॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांचे बोलणे ऐकताच बिभीषणाने हर्षित होऊन कृपाधाम श्रीरामचंद्रांचे चरण धरले. सर्व वानर व अस्वले आनंदित झाली आणि प्रभूंचे पाय धरून त्यांच्या निर्मल गुणांची वाखाणणी करू लागली.॥ १॥