३३ सीतेला कुशल वर्तमान

मूल (चौपाई)

पुनि प्रभु बोलि लियउ हनुमाना।
लंका जाहु कहेउ भगवाना॥
समाचार जानकिहि सुनावहु।
तासु कुसल लै तुम्ह चलि आवहु॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर प्रभूंनी हनुमानाला बोलावले. भगवंत म्हणाले, ‘तू लंकेत जा. जानकीला सर्व सांग आणि तिची खुशाली घेऊन ये.’॥ १॥

मूल (चौपाई)

तब हनुमंत नगर महुँ आए।
सुनि निसिचरी निसाचर धाए॥
बहु प्रकार तिन्ह पूजा कीन्ही।
जनकसुता देखाइ पुनि दीन्ही॥

अनुवाद (हिन्दी)

मग हनुमान नगरात आला. हे ऐकून राक्षस व राक्षसी त्याचा सत्कार करण्यासाठी धावल्या. त्यांनी अनेक प्रकारे हनुमानाचे स्वागत करुन जानकी कुठे आहे, ते दाखविले.॥ २॥

मूल (चौपाई)

दूरिहि ते प्रनाम कपि कीन्हा।
रघुपति दूत जानकीं चीन्हा॥
कहहु तात प्रभु कृपानिकेता।
कुसल अनुज कपि सेन समेता॥

अनुवाद (हिन्दी)

हनुमानाने सीतेला दुरूनच प्रणाम केला. जानकीने त्याला ओळखले की, हा तोच श्रीरामचंद्रांचा दूत आहे आणि विचारले की, ‘वत्सा! कृपेचे धाम माझे प्रभू हे लक्ष्मण व वानरांच्या सेनेसह सुखरूप आहेत ना?’॥ ३॥

मूल (चौपाई)

सब बिधि कुसल कोसलाधीसा।
मातु समर जीत्यो दससीसा॥
अबिचल राजु बिभीषन पायो।
सुनि कपि बचन हरष उर छायो॥

अनुवाद (हिन्दी)

हनुमानाने सांगितले की, ‘हे माते, कोसलपती श्रीराम पूर्णपणे सुखरूप आहेत. त्यांनी युद्धात रावणाला जिंकले आहे आणि बिभीषणाला कायमचे राज्य दिले आहे.’ हनुमानाचे बोलणे ऐकून सीतेच्या मनाला हर्ष झाला.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

अति हरष मन तन पुलक लोचन सजल कह पुनि पुनि रमा।
का देउँ तोहि त्रैलोक महुँ कपि किमपि नहिं बानी समा॥
सुनु मातु मैं पायो अखिल जग राजु आजु न संसयं।
रन जीति रिपुदल बंधु जुत पस्यामि राममनामयं॥

अनुवाद (हिन्दी)

जानकीच्या हृदयात अत्यंत आनंद झाला.तिचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रांमध्ये आनंदाश्रू आले. ती वारंवार म्हणत होती की, ‘हे हनुमाना, मी तुला काय देऊ? या वार्तेसारखे तिन्ही लोकात इतर काहीच आनंददायक नाही.’ हनुमान म्हणाला, ‘हे माते, ऐक. मी आज खरोखर सर्व जगाचे राज्य मिळविले आहे. कारण रणामध्ये शत्रुसेनेला जिंकूनही लक्ष्मण व श्रीरामांना निर्विकार रूपात मी पहात आहे.’

दोहा

मूल (दोहा)

सुनु सुत सदगुन सकल तव हृदयँ बसहुँ हनुमंत।
सानुकूल कोसलपति रहहुँ समेत अनंत॥ १०७॥

अनुवाद (हिन्दी)

जानकी म्हणाली, ‘हे पुत्रा. ऐक. सर्व सद्गुण तुझ्या हृदयात वसोत. आणि हे हनुमाना, लक्ष्मणासह कोसलपती प्रभू तुझ्यावर सदा प्रसन्न राहोत.॥ १०७॥

मूल (चौपाई)

अब सोइ जतन करहु तुम्ह ताता।
देखौं नयन स्याम मृदु गाता॥
तब हनुमान राम पहिं जाई।
जनकसुता कै कुसल सुनाई॥

अनुवाद (हिन्दी)

हे वत्सा, आता मी या डोळ्यांनी प्रभूंच्या कोमल शरीराचे दर्शन करू शकेन, असा उपाय कर.’ तेव्हा हनुमानाने श्रीरामांजवळ जाऊन जानकीच्या खुशालीची वार्ता सांगितली.॥ १॥

मूल (चौपाई)

सुनि संदेसु भानुकुलभूषन।
बोलि लिए जुबराज बिभीषन॥
मारुतसुत के संग सिधावहु।
सादर जनकसुतहि लै आवहु॥

अनुवाद (हिन्दी)

सूर्यकुलभूषण श्रीरामांनी वार्ता ऐकल्यावर युवराज अंगद व बिभीषण यांना बोलावून सांगितले की, ‘हनुमानाला बरोबर घेऊन जा आणि सीतेला आदराने घेऊन या.’॥ २॥

मूल (चौपाई)

तुरतहिं सकल गए जहँ सीता।
सेवहिं सब निसिचरीं बिनीता॥
बेगि बिभीषन तिन्हहि सिखायो।
तिन्ह बहु बिधि मज्जन करवायो॥

अनुवाद (हिन्दी)

ते त्वरित सीतेकडे गेले. सर्व राक्षसी अत्यंत नम्रतेने सीतेची सेवा करीत होत्या. बिभीषणाने त्वरित त्यांना समजावून सांगितले. तेव्हा त्यांनी अनेक प्रकारे सीतेला स्नान घातले.॥ ३॥

मूल (चौपाई)

बहु प्रकार भूषन पहिराए।
सिबिका रुचिर साजि पुनि ल्याए॥
ता पर हरषि चढ़ी बैदेही।
सुमिरि राम सुखधाम सनेही॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारचे दागिने घातले व मग एक सुंदर पालखी सजवून तिला ते घेऊन आले. सीता प्रसन्न होऊन सुखाचे धाम असलेल्या प्रियतम श्रीरामांचे स्मरण करीत मोठॺा हर्षाने पालखीत बसली.॥ ४॥

मूल (चौपाई)

बेतपानि रच्छक चहु पासा।
चले सकल मन परम हुलासा॥
देखन भालु कीस सब आए।
रच्छक कोपि निवारन धाए॥

अनुवाद (हिन्दी)

चारी बाजूंना हातांत छडी घेऊन रक्षक निघाले. सर्वांच्या मनात परम उल्हास होता. सर्व अस्वले व वानर दर्शन घेण्यासाठी आले, तेव्हा रक्षक रागावून सर्वांना रोखण्यासाठी धावले.॥ ५॥

मूल (चौपाई)

कह रघुबीर कहा मम मानहु।
सीतहि सखा पयादें आनहु॥
देखहुँ कपि जननी की नाईं।
बिहसि कहा रघुनाथ गोसाईं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ हसत म्हणाले, ‘हे मित्रा, माझे सांगणे ऐक आणि सीतेला पायी चालत घेऊन ये. त्यामुळे वानर तिला मातेप्रमाणे पाहू शकतील.’॥ ६॥

मूल (चौपाई)

सुनि प्रभु बचन भालु कपि हरषे।
नभ ते सुरन्ह सुमन बहु बरषे॥
सीता प्रथम अनल महुँ राखी।
प्रगट कीन्हि चह अंतर साखी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंचे वचन ऐकून अस्वले व वानर यांना आनंद झाला. आकाशातून देवांनी फुले उधळली. सीतेचे खरे स्वरूप पूर्वी अग्नीत ठेवले होते. आता अंतर्यामी भगवंत ते स्वरूप प्रकट करू इच्छित होते.॥ ७॥

दोहा

मूल (दोहा)

तेहि कारन करुनानिधि कहे कछुक दुर्बाद।
सुनत जातुधानीं सब लागीं करै बिषाद॥ १०८॥

अनुवाद (हिन्दी)

त्यासाठी करुणेचे भांडार असलेले श्रीराम लीलेसाठी काही कठोर बोलले. ते ऐकून सर्व राक्षसींना वाईट वाटले.॥ १०८॥

मूल (चौपाई)

प्रभु के बचन सीस धरि सीता।
बोली मन क्रम बचन पुनीता॥
लछिमन होहु धरम के नेगी।
पावक प्रगट करहु तुम्ह बेगी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंचे बोलणे शिरोधार्य मानून कायावाचामनाने पवित्र असलेली सीता म्हणाली, ‘हे लक्ष्मणा, तू मला धर्मासाठी साहाय्य कर आणि त्वरित अग्नी तयार कर.’॥ १॥

मूल (चौपाई)

सुनि लछिमन सीता कै बानी।
बिरह बिबेक धरम निति सानी॥
लोचन सजल जोरि कर दोऊ।
प्रभु सन कछु कहि सकत न ओऊ॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेचे विरह, विवेक, धर्म आणि नीतीने परिपूर्ण बोलणे ऐकून लक्ष्मणाच्या डोळ्यांत पाणी आले. तो दोन्ही हात जोडून उभा राहिला. तोसुद्धा प्रभूंना काही बोलू शकत नव्हता.॥ २॥

मूल (चौपाई)

देखि राम रुख लछिमन धाए।
पावक प्रगटि काठ बहु लाए॥
पावक प्रबल देखि बैदेही।
हृदयँ हरष नहिं भय कछु तेही॥

अनुवाद (हिन्दी)

मग श्रीरामांचा रोख पाहून लक्ष्मणाने ताबडतोब बरीचशी लाकडे आणून आग पेटवली. आग भडकल्याचे पाहून जानकीच्या मनात आनंद झाला. तिला कसलीही भीती वाटली नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

जौं मन बच क्रम मम उर माहीं।
तजि रघुबीर आन गति नाहीं॥
तौ कृसानु सब कै गति जाना।
मो कहुँ होउ श्रीखंड समाना॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेने लीला करायची म्हणून म्हटले, ‘जर कायावाचामनाने माझ्या हृदयात श्रीरघुनाथांना सोडून दुसऱ्या कुणाचाही विचार आला नसेल, तर सर्वांचे मनोगत जाणणारे अग्निदेव माझेही मनोगत जाणून माझ्यासाठी चंदनासमान शीतल होवोत.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

श्रीखंड सम पावक प्रबेस कियो सुमिरि प्रभु मैथिली।
जय कोसलेस महेस बंदित चरन रति अति निर्मली॥
प्रतिबिंब अरु लौकिक कलंक प्रचंड पावक महुँ जरे।
प्रभु चरित काहुँ न लखे नभ सुर सिद्ध मुनि देखहिं खरे॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीरामांचे स्मरण करून आणि ज्यांच्या चरणांचे वंदन महादेव करतात, तसेच ज्यांच्यावर सीतेचे अत्यंत शुद्ध प्रेम आहे, त्या कोसलपतींचा जयजयकार करीत जानकीने चंदनाप्रमाणे शीतल झालेल्या अग्नीमध्ये प्रवेश केला. सीतेच्या प्रतिबिंबाने बिंबरूप चितेत प्रवेश केला आणि तिचा लौकिक कलंक प्रचंड अग्नीत जळून गेला. प्रभूंची ही लीला कुणाला समजू शकली नाही. देव, सिद्ध आणि मुनी हे सर्व आकाशात उभे राहून पहात होते.॥ १॥

मूल (दोहा)

धरि रूप पावक पानि गहि श्री सत्य श्रुति जग बिदित जो।
जिमि छीरसागर इंदिरा रामहि समर्पी आनि सो॥
सो राम बाम बिभाग राजति रुचिर अति सोभा भली।
नव नील नीरज निकट मानहुँ कनक पंकज की कली॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा अग्नीने शरीर धारण करून वेदांमध्ये व जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या खऱ्या सीतेचा हात धरून तिला श्रीरामांना समर्पित केले. ज्याप्रमाणे क्षीरसागराने भगवान विष्णूंना लक्ष्मी समर्पित केली होती. सीता श्रीरामांच्या डाव्या भागी विराजमान झाली. तेव्हा त्यांची शोभा अनुपम होती, जणू नव्या उमललेल्या निळ्या कमळाजवळ सोनेरी कमळाची कळी शोभून दिसत होती.॥ २॥