३२ बिभीषणाला राज्याभिषेक

मूल (चौपाई)

आइ बिभीषन पुनि सिरु नायो।
कृपासिंधु तब अनुज बोलायो॥
तुम्ह कपीस अंगद नल नीला।
जामवंत मारुति नयसीला॥
सब मिलि जाहु बिभीषन साथा।
सारेहु तिलक कहेउ रघुनाथा॥
पिता बचन मैं नगर न आवउँ।
आपु सरिस कपि अनुज पठावउँ॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व क्रिया-कर्म केल्यानंतर बिभीषण येऊन श्रीरामांसमोर नतमस्तक झाला. तेव्हा कृपेचे समुद्र असलेल्या श्रीरामांनी लक्ष्मणाला बोलावले. श्रीरघुनाथ म्हणाले की, ‘तू, वानरराज सुग्रीव, अंगद, नल, नील, जांबुवंत व मारुती हे सर्व नीति-निपुण लोक एकत्रपणे बिभीषणाबरोबर जा आणि त्याला राजतिलक करा.’ नंतर बिभीषणाला उद्देशून ते म्हणाले, ‘वडिलांच्या आज्ञेमुळे मी नगरात येऊ शकत नाही. परंतु माझ्यासारख्याच असलेल्या वानरांना व लहान भावाला पाठवीत आहे.’॥ १-२॥

मूल (चौपाई)

तुरत चले कपि सुनि प्रभु बचना।
कीन्ही जाइ तिलक की रचना॥
सादर सिंहासन बैठारी।
तिलक सारि अस्तुति अनुसारी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंचे बोलणे ऐकताच वानर त्वरित निघाले आणि त्यांनी जाऊन राजतिलक करण्याची सर्व व्यवस्था केली. त्यांनी आदरपूर्वक बिभीषणाला सिंहासनावर बसवून राजतिलक केला आणि त्याची स्तुती केली.॥ ३॥

मूल (चौपाई)

जोरि पानि सबहीं सिर नाए।
सहित बिभीषन प्रभु पहिं आए॥
तब रघुबीर बोलि कपि लीन्हे।
कहि प्रिय बचन सुखी सब कीन्हे॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजणांनी हात जोडून त्याच्यापुढे मस्तक नम्र केले. त्यानंतर बिभीषणासह सर्वजण प्रभूंजवळ आले. मग श्रीरामांनी वानरांना बोलावून घेतले आणि गोड बोलून सर्वांना सुखावले.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

किए सुखी कहि बानी सुधा सम बल तुम्हारें रिपु हयो।
पायो बिभीषन राज तिहुँ पुर जसु तुम्हारो नित नयो॥
मोहि सहित सुभ कीरति तुम्हारी परम प्रीति जो गाइहैं।
संसार सिंधु अपार पार प्रयास बिनु नर पाइहैं॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंतांनी अमृतासमान वाणीने म्हटले की, ‘तुमच्यामुळेच हा प्रबळ शत्रू मारला गेला आणि बिभीषणाला राज्य मिळाले. ‘त्यामुळे सर्वांना आनंद झाला. प्रभू पुढे म्हणाले, ‘यामुळे तुमची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये नित्य नवीन टिकून राहील. जे लोक माझ्यासह तुमची शुभ कीर्ती परम प्रेमाने गातील, ते विनासायास हा अपार संसार-सागर पार करू शकतील.’

दोहा

मूल (दोहा)

प्रभु के बचन श्रवन सुनि नहिं अघाहिं कपि पुंज।
बार बार सिर नावहिं गहहिं सकल पद कंज॥ १०६॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंची वाणी ऐकून वानर-समूह तृप्त होत नव्हते. ते सर्व वारंवार नतमस्तक होत होते व त्यांचे चरणकमल धरीत होते.॥ १०६॥