३१ मंदोदरी-विलाप, रावणाची अंत्येष्टिक्रिया

मूल (चौपाई)

पति सिर देखत मंदोदरी।
मुरुछित बिकल धरनि खसि परी॥
जुबति बृंद रोवत उठि धाईं।
तेहि उठाइ रावन पहिं आईं॥

अनुवाद (हिन्दी)

पतीचे शिर पाहताच मंदोदरी व्याकूळ व मूर्च्छित होऊन जमिनीवर पडली. रावणाच्या इतर स्त्रिया रडत उठून धावल्या आणि तिला उठवून रावणाजवळ घेऊन आल्या.॥ १॥

मूल (चौपाई)

पति गति देखि ते करहिं पुकारा।
छूटे कच नहिं बपुष सँभारा॥
उर ताड़ना करहिं बिधि नाना।
रोवत करहिं प्रताप बखाना॥

अनुवाद (हिन्दी)

पतीची दशा पाहून मंदोदरी आक्रोश करीत रडू लागली. तिचे केस मोकळे सुटले, देहाची शुद्ध नव्हती. ती वारंवार छाती बडवून घेत होती आणि रडत रडत रावणाच्या प्रतापाचे वर्णन करीत होती.॥ २॥

मूल (चौपाई)

तव बल नाथ डोल नित धरनी।
तेज हीन पावक ससि तरनी॥
सेष कमठ सहि सकहिं न भारा।
सो तनु भूमि परेउ भरि छारा॥

अनुवाद (हिन्दी)

मंदोदरी म्हणत होती, ‘हे नाथ, तुमच्या बळामुळे पृथ्वी नेहमी कापत असे. अग्नी, चंद्र आणि सूर्य हे तुमच्यासमोर तेजहीन होते. शेष आणि कूर्म हे सुद्धा ज्या शरीराचा भार सहन करू शकत नव्हते, तेच तुमचे शरीर अरेरे! आज धुळीने माखून पृथ्वीवर पडले आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

बरुन कुबेर सुरेस समीरा।
रन सन्मुख धरि काहुँ न धीरा॥
भुजबल जितेहु काल जम साईं।
आजु परेहु अनाथ की नाईं॥

अनुवाद (हिन्दी)

वरुण, कुबेर, इंद्र आणि वायू यांपैकी कुणीही युद्धामध्ये तुमच्यासमोर धीर धरला नव्हता. हे स्वामी, तुम्ही आपल्या भुजबळावर काल आणि यमराज यांनाही जिंकले होते. तेच तुम्ही आज अनाथाप्रमाणे येथे पडला आहात.॥ ४॥

मूल (चौपाई)

जगत बिदित तुम्हारि प्रभुताई।
सुत परिजन बल बरनि न जाई॥
राम बिमुख अस हाल तुम्हारा।
रहा न कोउ कुल रोवनिहारा॥

अनुवाद (हिन्दी)

तुमची सत्ता जगभरात प्रसिद्ध होती. तुमच्या पुत्रांच्या आणि कुटुंबीयांच्या शक्तीचे वर्णन करता येणार नाही. श्रीरामचंद्रांशी विन्मुख होण्यामुळे तुमची अशी दुर्दशा झाली की, आज कुलामध्ये रडणाराही कोणी उरला नाही.॥ ५॥

मूल (चौपाई)

तव बस बिधि प्रपंच सब नाथा।
सभय दिसिप नित नावहिं माथा॥
अब तव सिर भुज जंबुक खाहीं।
राम बिमुख यह अनुचित नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, विधात्याची संपूर्ण सृष्टी तुमच्या अधीन होती. लोकपाल नेहमी भयभीत होऊन नतमस्तक होत होते. परंतु अरेरे, आता तुमची शिरे व भुजा कोल्हे खात आहेत. रामविन्मुख होणाऱ्यासाठी असे होणे तसे अनुचितही नाही.॥ ६॥

मूल (चौपाई)

काल बिबस पति कहा न माना।
अग जग नाथु मनुज करि जाना॥

अनुवाद (हिन्दी)

हे पतिराज, काळाच्या पूर्णपणे अधीन झाल्यामुळे तुम्ही कुणाचे सांगणे मानले नाही आणि चराचराचे नाथ असणाऱ्या परमात्म्याला मनुष्य समजलात.॥ ७॥

छंद

मूल (दोहा)

जान्यो मनुज करि दनुज कानन दहन पावक हरि स्वयं।
जेहि नमत सिव ब्रह्मादि सुर पिय भजेहु नहिं करुनामयं॥
आजन्म ते परद्रोह रत पापौघमय तव तनु अयं।
तुम्हहू दियो निज धाम राम नमामि ब्रह्म निरामयं॥

अनुवाद (हिन्दी)

दैत्यरूपी वनाला जाळण्यासाठी अग्निस्वरूप असलेल्या साक्षात श्रीहरींना तुम्ही मनुष्य मानले. शिव व ब्रह्मदेव इत्यादी देव ज्यांना नमस्कार करतात, त्या करुणामय भगवंताला हे प्रियतम, तुम्ही भजले नाही. तुमचे हे शरीर जन्मतःच दुसऱ्याचा द्रोह करण्यामध्ये तत्पर आणि पापसमूह बनून राहिले. असे असूनही ज्या रागद्वेषरहित ब्रह्म असलेल्या श्रीरामांनी तुम्हांला आपले परमधाम दिले, त्यांना मी नमस्कार करते.

दोहा

मूल (दोहा)

अहह नाथ रघुनाथ सम कृपासिंधु नहिं आन।
जोगि बृंद दुर्लभ गति तोहि दीन्हि भगवान॥ १०४॥

अनुवाद (हिन्दी)

अरेरे, नाथ, श्रीरघुनाथांसारखा कृपेचा समुद्र दुसरा कोणी नाही, त्या भगवंतांनी योगिजनांना दुर्लभ असलेली गती तुम्हांला दिली.’॥ १०४॥

मूल (चौपाई)

मंदोदरी बचन सुनि काना।
सुर मुनि सिद्ध सबन्हि सुख माना॥
अज महेस नारद सनकादी।
जे मुनिबर परमारथबादी॥

अनुवाद (हिन्दी)

मंदोदरीचे बोलणे ऐकून देव, मुनी व सिद्ध या सर्वांना समाधान वाटले. ब्रह्मदेव, महादेव, नारद, सनकादिक आणि इतर जे परमार्थवादी श्रेष्ठ मुनी होते,॥ १॥

मूल (चौपाई)

भरि लोचन रघुपतिहि निहारी।
प्रेम मगन सब भए सुखारी॥
रुदन करत देखीं सब नारी।
गयउ बिभीषनु मन दुख भारी॥

अनुवाद (हिन्दी)

ते सर्वच श्रीरघुनाथांना डोळे भरून पहात प्रेममग्न झाले आणि सुखी झाले. आपल्या घरच्या सर्व स्त्रियांना रडत असलेले पाहून बिभीषणाच्या मनाला फार दुःख झाले आणि तो त्यांच्याजवळ गेला.॥ २॥

मूल (चौपाई)

बंधु दसा बिलोकि दुख कीन्हा।
तब प्रभु अनुजहि आयसु दीन्हा॥
लछिमन तेहि बहु बिधि समुझायो।
बहुरि बिभीषन प्रभु पहिं आयो॥

अनुवाद (हिन्दी)

भावाची दशा पाहून त्याने दुःख व्यक्त केले. तेव्हा प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणाला आज्ञा केली की, बिभीषणाला जाऊन धीर दे. लक्ष्मणाने जाऊन त्याला पुष्कळ प्रकारे समजाविले, तेव्हा बिभीषण प्रभूंजवळ परत आला.॥ ३॥

मूल (चौपाई)

कृपादृष्टि प्रभु ताहि बिलोका।
करहु क्रिया परिहरि सब सोका॥
कीन्हि क्रिया प्रभु आयसु मानी।
बिधिवत देस काल जियँ जानी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंनी त्याला कृपादृष्टीने पाहिले आणि म्हटले, ‘सर्व शोक सोडून रावणाचा अंत्य-संस्कार कर.’ प्रभूंची आज्ञा मानून व मनात परिस्थितीचा विचार करून बिभीषणाने विधिपूर्वक सर्व अंत्यक्रिया केल्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

मंदोदरी आदि सब देइ तिलांजलि ताहि।
भवन गईं रघुपति गुन गन बरनत मन माहि॥ १०५॥

अनुवाद (हिन्दी)

मंदोदरी इत्यादी सर्व स्त्रिया रावणाला तिलांजली देऊन मनात श्रीरघुनाथांचे गुणगान करीत महालात गेल्या.॥ १०५॥