२८ घोर युद्ध, रावणाला मूर्च्छा

मूल (चौपाई)

हाहाकार करत सुर भागे।
खलहु जाहु कहँ मोरें आगे॥
देखि बिकल सुर अंगद धायो।
कूदि चरन गहि भूमि गिरायो॥

अनुवाद (हिन्दी)

देव हाहाकार करीत पळाले. रावण म्हणाला, ‘अरे दुष्टांनो, माझ्या समोरून कुठे जाणार?’ देव व्याकूळ झालेले पाहून अंगद धावून गेला आणि उडी मारून त्याने रावणाचा पाय धरून त्याला पृथ्वीवर पाडले.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

गहि भूमि पारॺो लात मारॺो बालिसुत प्रभु पहिं गयो।
संभारि उठि दसकंठ घोर कठोर रव गर्जत भयो॥
करि दाप चाप चढ़ाइ दस संधानि सर बहु बरषई।
किए सकल भट घायल भयाकुल देखि निज बल हरषई॥

अनुवाद (हिन्दी)

त्याला पकडून व पृथ्वीवर पाडून अंगद प्रभूंजवळ आला. रावण स्वतःला सावरून उठला आणि भयंकर कठोर आवाजाने गर्जू लागला. तो गर्वाने दाही धनुष्ये सज्ज करून व त्यावर बरेचसे बाण लावून बाणांचा वर्षाव करू लागला. त्याने सर्व योद्ध्यांना घायाळ केले व भयाने व्याकूळ करून टाकले. आपले बळ दाखवून तो आनंदित झाला.

दोहा

मूल (दोहा)

तब रघुपति रावन के सीस भुजा सर चाप।
काटे बहुत बढ़े पुनि जिमि तीरथ कर पाप॥ ९७॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा श्रीरघुनाथांनी रावणाची शिरे, भुजा, बाण आणि धनुष्य मोडून टाकले. परंतु ज्याप्रमाणे तीर्थक्षेत्री केलेली पापे कित्येकपट वाढतात, त्याप्रमाणे रावणाच्या भुजा इत्यादी पुन्हा खूप वाढल्या.॥ ९७॥

मूल (चौपाई)

सिर भुज बाढ़ि देखि रिपु केरी।
भालु कपिन्ह रिस भई घनेरी॥
मरत न मूढ़ कटेहुँ भुज सीसा।
धाए कोपि भालु भट कीसा॥

अनुवाद (हिन्दी)

शत्रूची शिरे आणि भुजा वाढल्याचे पाहून अस्वले-वानर यांना खूप राग आला. ‘हा मूर्ख भुजा व शिरे कापल्यावर सुद्धा मरत नाही,’ असे म्हणत ते योद्धे रागाने धावून गेले.॥ १॥

मूल (चौपाई)

बालितनय मारुति नल नीला।
बानरराज दुबिद बलसीला॥
बिटप महीधर करहिं प्रहारा।
सोइ गिरि तरु गहि कपिन्ह सो मारा॥

अनुवाद (हिन्दी)

अंगद, हनुमान, नल, नील, वानरराज सुग्रीव, द्विविद इत्यादी बलवान वानर वृक्ष व पर्वतांचा त्याच्यावर मारा करू लागले. तो तेच वृक्ष व पर्वत घेऊन वानरांना मारू लागला.॥ २॥

मूल (चौपाई)

एक नखन्हि रिपु बपुष बिदारी।
भागि चलहिं एक लातन्ह मारी॥
तब नलनील सिरन्हि चढ़ि गयऊ।
नखन्हि लिलार बिदारत भयऊ॥

अनुवाद (हिन्दी)

कुणी वानर नखांनी शत्रूचे शरीर फाडून तर कुणी त्याला लाथांनी मारून पळून जात होते. तेव्हा नल व नील रावणाच्या डोक्यांवर चढले आणि नखांनी त्याचे ललाट फाडू लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

रुधिर देखि बिषाद उर भारी।
तिन्हहि धरन कहुँ भुजा पसारी॥
गहे न जाहिं करन्हि पर फिरहीं।
जनु जुग मधुप कमल बन चरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

रक्त पाहून त्याला मनातून दुःख झाले. त्याने त्यांना पकडण्यासाठी हात पसरले, परंतु त्यांना पकडता येईना. ते त्याच्या हातांवरच फिरत होते, जणू दोन भ्रमर कमल-वनामध्ये फिरत होते.॥ ४॥

मूल (चौपाई)

कोपि कूदि द्वौ धरेसि बहोरी।
महि पटकत भजे भुजा मरोरी॥
पुनि सकोप दस धनु कर लीन्हे।
सरन्हि मारि घायल कपि कीन्हे॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा त्याने रागाने उडी मारून दोघांनाही पकडले. त्यांना पृथ्वीवर आपटताना ते त्याचे हात मुरगाळून पळून गेले. त्याने रागाने हातांमध्ये दहा धनुष्ये घेऊन आणि वानरांना बाण मारून घायाळ केले.॥ ५॥

मूल (चौपाई)

हनुमदादि मुरुछित करि बंदर।
पाइ प्रदोष हरष दसकंधर॥
मुरुछित देखि सकल कपि बीरा।
जामवंत धायउ रनधीरा॥

अनुवाद (हिन्दी)

हनुमान इत्यादी सर्व वानरांना मूर्च्छित करून संध्याकाळ झाल्यामुळे रावण आनंदित झाला. सर्व वानर-वीर मूर्च्छित झाल्याचे पाहून रणधीर जांबवान धावला.॥ ६॥

मूल (चौपाई)

संग भालु भूधर तरु धारी।
मारन लगे पचारि पचारी॥
भयउ क्रुद्ध रावन बलवाना।
गहि पद महि पटकइ भट नाना॥

अनुवाद (हिन्दी)

जांबवानासोबत जी अस्वले होती. ती पर्वत व वृक्ष घेऊन रावणाला आव्हान देऊन मारू लागली. बलवान रावण क्रुद्ध झाला. आणि पाय पकडून तो अनेक योद्ध्यांना पृथ्वीवर आपटू लागला.॥ ७॥

मूल (चौपाई)

देखि भालुपति निज दल घाता।
कोपि माझ उर मारेसि लाता॥

अनुवाद (हिन्दी)

जांबवानाने आपल्या सैन्याचा संहार झालेला पाहून रागाने रावणाच्या छातीवर लाथ मारली.॥ ८॥

छंद

मूल (दोहा)

उर लात घात प्रचंड लागत बिकल रथ ते महि परा।
गहि भालु बीसहुँ कर मनहुँ कमलन्हि बसे निसि मधुकरा॥
मुरुछित बिलोकि बहोरि पद हति भालुपति प्रभु पहिं गयो।
निसि जानि स्यंदन घालि तेहि तब सूत जतनु करत भयो॥

अनुवाद (हिन्दी)

छातीवर लाथेचा प्रचंड आघात झाल्यामुळे रावण व्याकूळ होऊन रथावरून खाली पडला. त्याने वीसही हातांनी अस्वलांना पकडून ठेवले होते. असे वाटत होते की, जणू रात्रीच्या वेळी कमळांमध्ये भ्रमर अडकून पडले असावेत. तो मूर्च्छित झाल्याचे पाहून, पुन्हा रावणाला लाथ मारून जाम्बवान प्रभूंजवळ गेला. रात्र झाल्याचे पाहून सारथी रावणाला रथात घालून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला.

दोहा

मूल (दोहा)

मुरुछा बिगत भालु कपि सब आए प्रभु पास।
निसिचर सकल रावनहि घेरि रहे अति त्रास॥ ९८॥

अनुवाद (हिन्दी)

मूर्च्छा जाताच सर्व अस्वले व वानर प्रभूंजवळ आले. तिकडे सर्व राक्षसांनी खूपच भयभीत होऊन रावणाला घेरले.॥ ९८॥