२४ रावणाला मूर्च्छा, रावण-यज्ञ-विध्वंस, राम-रावण-युद्ध

दोहा

मूल (दोहा)

देखि पवनसुत धायउ बोलत बचन कठोर।
आवत कपिहि हन्यो तेहिं मुष्टि प्रहार प्रघोर॥ ८३॥

अनुवाद (हिन्दी)

हे पाहून पवनपुत्र हनुमान त्याला दटावीत त्याच्यावर धावला. हनुमान येताच रावणाने त्याला अत्यंत भयंकर ठोसा मारला.॥ ८३॥

मूल (चौपाई)

जानु टेकि कपि भूमि न गिरा।
उठा सँभारि बहुत रिस भरा॥
मुठिका एक ताहि कपि मारा।
परेउ सैल जनु बज्र प्रहारा॥

अनुवाद (हिन्दी)

हनुमान गुडघे टेकून बसला. जमिनीवर पडला नाही आणि मग तोल सांभाळून रागाने उठला. हनुमानाने रावणाला एक ठोसा मारला. तेव्हा वज्राच्या माऱ्यामुळे पर्वत खाली कोसळावा, त्याप्रमाणे रावण खाली पडला.॥ १॥

मूल (चौपाई)

मुरुछा गै बहोरि सो जागा।
कपि बल बिपुल सराहन लागा॥
धिग धिग मम पौरुष धिग मोही।
जौं तैं जिअत रहेसि सुरद्रोही॥

अनुवाद (हिन्दी)

मूर्च्छा दूर झाल्यावर रावण जागा झाला आणि हनुमानाच्या मोठॺा बळाची प्रशंसा करू लागला. मग हनुमान म्हणाला, ‘माझ्या पौरुषाचा धिक्कार असो आणि माझाही धिक्कार असो. कारण हे देवद्रोह्या, तू अजुनी जिवंत राहिला आहेस.’॥ २॥

मूल (चौपाई)

असकहि लछिमन कहुँ कपि ल्यायो।
देखि दसानन बिसमय पायो॥
कह रघुबीर समुझु जियँ भ्राता।
तुम्ह कृतांत भच्छक सुर त्राता॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून आणि लक्ष्मणास उचलून हनुमान श्रीरघुनाथांजवळ घेऊन गेला. हे पाहून रावणाला आश्चर्य वाटले. श्रीरघुवीर लक्ष्मणाला म्हणाले,‘हे बंधू, लक्षात ठेव की, तू काळाचाही भक्षक आणि देवांचा रक्षक आहेस.’॥ ३॥

मूल (चौपाई)

सुनत बचन उठि बैठ कृपाला।
गई गगन सो सकति कराला॥
पुनि कोदंड बान गहि धाए।
रिपु सन्मुख अति आतुर आए॥

अनुवाद (हिन्दी)

हे ऐकताच कृपाळू लक्ष्मण उठून बसला. ती कराल शक्ती आकाशात निघून गेली. लक्ष्मण पुन्हा धनुष्यबाण घेऊन धावला आणि लगबगीने शत्रूसमोर उभा ठाकला.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

आतुर बहोरि बिभंजि स्यंदन सूत हति ब्याकुल कियो।
गिरॺो धरनि दसकंधर बिकलतर बान सत बेध्यो हियो॥
सारथी दूसर घालि रथ तेहि तुरत लंका लै गयो।
रघुबीर बंधु प्रताप पुंज बहोरि प्रभु चरनन्हि नयो॥

अनुवाद (हिन्दी)

मग त्याने मोठॺा झपाटॺाने रावणाच्या रथाचा चुराडा केला आणि सारथ्याला मारून रावणाला व्याकूळ करून सोडले. शंभर बाणांनी त्याचे हृदय वेधले गेले होते. त्यामुळे रावण अत्यंत व्याकूळ होऊन खाली पडला. तेव्हा दुसऱ्या सारथ्याने त्याला रथात घालून पटकन लंकेत नेले. प्रतापाचा समूह असलेल्या श्रीरघुवीरांचा भाऊ लक्ष्मण परत येऊन प्रभूंच्या पाया पडला.

दोहा

मूल (दोहा)

उहाँ दसानन जागि करि करै लाग कछु जग्य।
राम बिरोध बिजय चह सठ हठ बस अति अग्य॥ ८४॥

अनुवाद (हिन्दी)

तिकडे लंकेत रावण मूर्च्छेतून जागा झाल्यावर एक यज्ञ करू लागला. तो मूर्ख आणि अत्यंत अज्ञानी हट्टाने श्रीरामांशी वैर धरून विजय प्राप्त करू इच्छित होता.॥ ८४॥

मूल (चौपाई)

इहाँ बिभीषन सब सुधि पाई।
सपदि जाइ रघुपतिहि सुनाई॥
नाथ करइ रावन एक जागा।
सिद्ध भएँ नहिं मरिहि अभागा॥

अनुवाद (हिन्दी)

ही वार्ता इकडे बिभीषणाला मिळाली आणि लगेच जाऊन त्याने श्रीरघुनाथांना सांगितले की, ‘हे नाथ, रावण एक यज्ञ करीत आहे. तो पूर्ण झाल्यास तो अभागी सहजपणे मरणार नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

पठवहु नाथ बेगि भट बंदर।
करहिं बिधंस आव दसकंधर॥
प्रात होत प्रभु सुभट पठाए।
हनुमदादि अंगद सब धाए॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, ताबडतोब वानर योद्धॺांना पाठवा. यज्ञाचा विध्वंस त्यांनी करावा, त्यामुळे रावण युद्धासाठी येईल. प्रातःकाळ होताच प्रभूंनी वीर योद्ध्यांना पाठविले. हनुमान व अंगद इत्यादी प्रमुख वीर पुढे धावले.॥ २॥

मूल (चौपाई)

कौतुक कूदि चढ़े कपि लंका।
पैठे रावन भवन असंका॥
जग्य करत जबहीं सो देखा।
सकल कपिन्ह भा क्रोध बिसेषा॥

अनुवाद (हिन्दी)

वानर सहजगत्या उडॺा मारून लंकेवर चढले आणि निर्भय रावणाच्या महालात घुसले. रावणाला यज्ञ करीत असलेला पाहून सर्व वानरांना फार राग आला.॥ ३॥

मूल (चौपाई)

रन ते निलज भाजि गृह आवा।
इहाँ आइ बक ध्यान लगावा॥
अस कहि अंगद मारा लाता।
चितव न सठ स्वारथ मन राता॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणाले, ‘अरे निलाजऱ्या, रणभूमीतून घरी पळून आलास आणि येथे येऊन बगळ्यासारखे ध्यान करीत बसला आहेस?’ असे म्हणून अंगदाने लाथ मारली. परंतु त्याने तिकडे लक्ष दिले नाही. त्या दुष्टाचे मन स्वार्थामध्ये मग्न झाले होते.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

नहिं चितव जब करि कोप कपि गहि दसन लातन्ह मारहीं।
धरि केस नारि निकारि बाहेर तेऽतिदीन पुकारहीं॥
तब उठेउ क्रुद्ध कृतांत सम गहि चरन बानर डारई।
एहि बीच कपिन्ह बिधंस कृत मख देखि मन महुँ हारई॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा त्याने पाहिले नाही, तेव्हा वानर क्रोधाने त्याला दातांनी चावून लाथांनी मारू लागले. त्यांनी स्त्रियांचे केस पकडून त्यांना घराबाहेर फरफटत आणले. त्या अत्यंत दीनवाण्या होऊन रडू लागल्या. तेव्हा रावण कालासारखा क्रुद्ध होऊन उठला आणि वानरांचे पाय पकडून त्यांना आपटू लागला. एवढॺा वेळात वानरांनी यज्ञाचा विध्वंस करून टाकला. हे पाहून रावण मनातून निराश झाला.

दोहा

मूल (दोहा)

जग्य बिधंसि कुसल कपि आए रघुपति पास।
चलेउ निसाचर क्रुद्ध होइ त्यागि जिवन कै आस॥ ८५॥

अनुवाद (हिन्दी)

यज्ञाचा विध्वंस करून सर्व रणकुशल वानर श्रीरघुनाथां जवळआले. तेव्हा रावणाने जीवनाची आशा सोडली आणि तो क्रुद्ध होऊन निघाला.॥ ८५॥

मूल (चौपाई)

चलत होहिं अति असुभ भयंकर।
बैठहिं गीध उड़ाइ सिरन्ह पर॥
भयउ कालबस काहु न माना।
कहेसि बजावहु जुद्ध निसाना॥

अनुवाद (हिन्दी)

जाते वेळी अत्यंत अपशकुन होऊ लागले. गिधाडे उठून त्याच्या डोक्यांवर फिरू लागली. परंतु तो आता काळाच्या जबडॺात होता, त्यामुळे तो कोणताही अपशकुन मानत नव्हता. तो म्हणाला, ‘युद्धाचा डंका वाजवा.’॥ १॥

मूल (चौपाई)

चली तमीचर अनी अपारा।
बहु गज रथ पदाति असवारा॥
प्रभु सन्मुख धाए खल कैसें।
सलभ समूह अनल कहँ जैसें॥

अनुवाद (हिन्दी)

निशाचरांची अपार सेना निघाली. त्यामध्ये पुष्कळसे हत्ती, रथ, घोडेस्वार आणि पायदळ होते. ते दुष्ट प्रभूंसमोर असे धावून गेले की, ज्याप्रमाणे पतंगांचे थवे मरण्यासाठी अग्नीवर धाव घेतात.॥ २॥

मूल (चौपाई)

इहाँ देवतन्ह अस्तुति कीन्ही।
दारुन बिपति हमहि एहिं दीन्ही॥
अब जनि राम खेलावहु एही।
अतिसय दुखित होति बैदेही॥

अनुवाद (हिन्दी)

इकडे देव स्तुती करू लागले की, ‘हे श्रीराम, याने आम्हांला भीषणदुःख दिले आहे. आता याला खेळवत बसू नका. जानकी फारच दुःखी आहे.’॥ ३॥

मूल (चौपाई)

देव बचन सुनि प्रभु मुसुकाना।
उठि रघुबीर सुधारे बाना॥
जटा जूट दृढ़ बाँधें माथे।
सोहहिं सुमन बीच बिच गाथे॥

अनुवाद (हिन्दी)

देवांचे बोलणे ऐकून प्रभू हसले. मग श्रीरघुवीरांनी उठून बाण सज्ज केले. मस्तकावरील जटांचा मुकुट चांगल्याप्रकारे बांधला. त्यामध्ये अधूनमधून माळलेली फुले शोभून दिसत होती.॥ ४॥

मूल (चौपाई)

अरुन नयन बारिद तनु स्यामा।
अखिल लोक लोचनाभिरामा॥
कटितट परिकर कस्यो निषंगा।
कर कोदंड कठिन सारंगा॥

अनुवाद (हिन्दी)

ते लालसर नेत्र आणि मेघासारख्या श्याम शरीराचे आणि संपूर्ण लोकांना नेत्रांचा आनंद देणारे होते. प्रभूंनी शेला कमरेला बांधला, त्यात भाता खोचला, अणि हातात कठीण शार्ङ्ग धनुष्य घेतले. ॥ ५॥

छंद

मूल (दोहा)

सारंग कर सुंदर निषंग सिलीमुखाकर कटि कस्यो।
भुजदंड पीन मनोहरायत उर धरासुर पद लस्यो॥
कह दास तुलसी जबहिं प्रभु सर चाप कर फेरन लगे।
ब्रह्मांड दिग्गज कमठ अहि महि सिंधु भूधर डगमगे॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंनी हातात शार्ङ्ग धनुष्य घेऊन कमरेला अक्षय बाणांचा सुंदर भाता बांधला. त्यांचे भुजदंड पुष्ट होते आणि मनोहर विशाल छातीवर भृगू ऋषींचे चरण शोभत होते. तुलसीदास म्हणतात, प्रभू धनुष्यबाण हातात घेऊन फिरवू लागताच ब्रह्मांड, दिग्गज, कूर्म, शेष, पृथ्वी, समुद्र आणि पर्वत डगमगू लागले.

दोहा

मूल (दोहा)

सोभा देखि हरषि सुर बरषहिं सुमन अपार।
जय जय जय करुनानिधि छबि बल गुन आगार॥ ८६॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंतांची शोभा पाहून देव आनंदित होऊन अपार फुलांचा वर्षाव करू लागले आणि ‘शोभा, शक्ती आणि गुणांचे धाम असलेल्या करुणानिधान प्रभूंचा विजय असो, विजय असो, विजय असो,’ असा घोष करू लागले.॥ ८६॥

मूल (चौपाई)

एहीं बीच निसाचर अनी।
कसमसात आई अति घनी॥
देखि चले सन्मुख कपि भट्टा।
प्रलयकाल के जनु घन घट्टा॥

अनुवाद (हिन्दी)

एवढॺात निशाचरांची अत्यंत विपुल सेना युद्धाच्या आवेशात आली. ती पाहून वानर योद्धे अशा प्रकारे समोर निघाले, जसे प्रलयकालातील मेघांचे समूह.॥ १॥

मूल (चौपाई)

बहु कृपान तरवारि चमंकहिं।
जनु दहँ दिसि दामिनीं दमंकहिं॥
गज रथ तुरग चिकार कठोरा।
गर्जहिं मनहुँ बलाहक घोरा॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक कृपाणे आणि तलवारी चमकत होत्या. वाटे, दाही दिशांना विजा चमकत आहेत. हत्ती, घोडे भयंकर चीत्कार करीत होते. रथांचा गडगडाट चालू होता. असे वाटे की, जणू मेघ भयंकर गर्जना करीत आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

कपि लंगूर बिपुल नभ छाए।
मनहुँ इंद्रधनु उए सुहाए॥
उठइ धूरि मानहुँ जलधारा।
बान बुंद भै बृष्टि अपारा॥

अनुवाद (हिन्दी)

वानरांच्या खूप शेपटॺा आकाशात पसरल्या होत्या. त्या सुंदर इंद्रधनुष्य प्रकटल्याप्रमाणे शोभून दिसत होत्या. जलधारांप्रमाणे धूळ उडत होती आणि बाणरूपी थेंबांची अपार वृष्टी होत होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

दुहुँ दिसि पर्बत करहिं प्रहारा।
बज्रपात जनु बारहिं बारा॥
रघुपति कोपि बान झरि लाई।
घायल भै निसिचर समुदाई॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्ही बाजूंचे योद्धे पर्वतांचा प्रहार करीत होते. जणू वारंवार वज्रपात होत होता. श्रीरघुनाथांनी रागाने बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे राक्षसांची सेना घायाळ झाली.॥ ४॥

मूल (चौपाई)

लागत बान बीर चिक्करहीं।
घुर्मि घुर्मि जहँ तहँ महि परहीं॥
स्रवहिं सैल जनु निर्झर भारी।
सोनित सरि कादर भयकारी॥

अनुवाद (हिन्दी)

बाण लागताच वीर चीत्कार करीत होते आणि चक्कर येऊन पृथ्वीवर अस्ताव्यस्त पडत होते. त्यांच्या शरीरांतून रक्त असे वाहात होते की, जणू पर्वतातील मोठॺा झऱ्यांतून पाणी वाहात असावे. अशा प्रकारे भित्र्यांना भीती उत्पन्न करणारी रक्ताची नदी वाहात होती.॥ ५॥

छंद

मूल (दोहा)

कादर भयंकर रुधिर सरिता चली परम अपावनी।
दोउ कूल दल रथ रेत चक्र अबर्त बहति भयावनी॥
जलजंतु गज पदचर तुरग खर बिबिध बाहन को गने।
सर सक्ति तोमर सर्प चाप तरंग चर्म कमठ घने॥

अनुवाद (हिन्दी)

भित्र्यांना भीती उत्पन्न करणारी अत्यंत अपवित्र अशी रक्ताची नदी वाहू लागली. दोन्ही पक्ष तिच्या दोन्ही तटांवर होते. रथ हे वाळू होते आणि त्यांची चाके नदीतील भोवरे होते. ती नदी फार भयानक होऊन वाहात होती.हत्ती, पायदळ, घोडे, गाढवे आणि इतर अनेक वाहने हे नदीतील जलजंतू होते. त्यांची गणना कोण करणार? बाण, शक्ती आणि तोमर हे सर्प होते, धनुष्ये ही नदीतील तरंग होते आणि ढाली या पुष्कळशी कासवे होत्या.

दोहा

मूल (दोहा)

बीर परहिं जनु तीर तरु मज्जा बहु बह फेन।
कादर देखि डरहिं तहँ सुभटन्ह के मन चेन॥ ८७॥

अनुवाद (हिन्दी)

वीर पृथ्वीवर असे पडत होते की, जणू नदी किनाऱ्याचे वृक्ष कोसळत होते. खूपशी मज्जा वाहात होती, ती फेस होती. भित्र्यांना ते पाहून भीती वाटत होती, तर उत्तम योद्ध्यांना मनात आनंद वाटत होता.॥ ८७॥

मूल (चौपाई)

मज्जहिं भूत पिसाच बेताला।
प्रमथ महा झोटिंग कराला॥
काक कंक लै भुजा उड़ाहीं।
एक ते छीनि एक लै खाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

भूत, पिशाच आणि वेताळ, मोठमोठॺा झिंज्या असलेले भयंकर झोटिंग व शिवगण त्या नदीत स्नान करीत होते. कावळे व घारी या तुटलेल्या भुजा घेऊन उडत होते आणि एक दुसऱ्याकडून हिसकावून घेऊन खात होते.॥ १॥

मूल (चौपाई)

एक कहहिं ऐसिउ सौंघाई।
सठहु तुम्हार दरिद्र न जाई॥
कहँरत भट घायल तट गिरे।
जहँ तहँ मनहुँ अर्धजल परे॥

अनुवाद (हिन्दी)

कोणी म्हणे, ‘अरे मूर्खांनो, असले स्वस्त चिक्कार मिळते, तरीही तुमचा हावरटपणा जात नाही?’ घायाळ योद्धे किनाऱ्यावर पडून विव्हळत होते. ज्याप्रमाणे मरणाऱ्या व्यक्तीला अर्ध्या पाण्यात ठेवतात, त्याप्रमाणे ते रक्तात पडले होते.॥ २॥

मूल (चौपाई)

खैंचहिं गीध आँत तट भए।
जनु बंसी खेलत चित दए॥
बहु भट बहहिं चढ़े खग जाहीं।
जनु नावरि खेलहिं सरि माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

गिधाडे आतडी ओढत होती, जणू मासेमार नदी-तटी लक्षपूर्वक काटा टाकून बसले होते. पुष्कळसे योद्धे वाहून जात होते आणि पक्षी त्यांच्यावर जाऊन बसत होते, जणू ते नदीमध्ये नौका-विहार करीत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

जोगिनि भरि भरि खप्पर संचहिं।
भूत पिसाच बधू नभ नंचहिं॥
भट कपाल करताल बजावहिं।
चामुंडा नाना बिधि गावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

योगिनी कवटॺांमध्ये रक्त जमा करीत होत्या. भूत-पिशाचांच्या बायका आकाशात नाचत होत्या. चामुंडा योद्ध्यांच्या कवटॺा घेऊन वाजवीत होत्या आणि नाना प्रकारे गात होत्या.॥ ४॥

मूल (चौपाई)

जंबुक निकर कटक्कट कट्टहिं।
खाहिं हुआहिं अघाहिं दपट्टहिं॥
कोटिन्ह रुंड मुंड बिनु डोल्लहिं।
सीस परे महि जय जय बोल्लहिं॥

अनुवाद (हिन्दी)

कोल्ह्यांचे कळप कटकट असा आवाज करीत, मुडद्यांचे लचके तोडून खात होते व कोल्हे कुई करीत होते आणि पोट भरल्यावर एकमेकांवर गुरगुरत होते. कोटॺावधी धडे शिरांविना फिरत होती आणि पृथ्वीवर पडलेली मुंडकी ‘जय जय’ म्हणत होती.॥ ५॥

छंद

मूल (दोहा)

बोल्लहिं जो जय जय मुंड रुंड प्रचंड सिर बिनु धावहीं।
खप्परिन्ह खग्ग अलुज्झि जुज्झहिं सुभट भटन्ह ढहावहीं॥
बानर निसाचर निकर मर्दहिं राम बल दर्पित भए।
संग्राम अंगन सुभट सोवहिं राम सर निकरन्हि हए॥

अनुवाद (हिन्दी)

मुंडकी जयजय बोलत होती आणि प्रचंड धडे शिराविना धावत होती. पक्षी कवटॺांसाठी परस्पर लढत व मरत होते. चांगले योद्धे दुसऱ्या योद्ध्यांना खाली पाडत होते, श्रीरामांच्या बळावर गर्व करणारे वानर राक्षसांच्या झुंडी चिरडून टाकत होते. श्रीरामांच्या बाणांच्या माऱ्याने मेलेले योद्धे रणभूमीत चिरनिद्रा घेत होते.

दोहा

मूल (दोहा)

रावन हृदयँ बिचारा भा निसिचर संघार।
मैं अकेल कपि भालु बहु माया करौं अपार॥ ८८॥

अनुवाद (हिन्दी)

रावणाने विचार केला की, राक्षसांचा नाश झाला आहे आणि मी एकटा उरलो आहे. वानर व अस्वले खूप आहेत, म्हणून आपण आता मोठी माया करावी.॥ ८८॥