२२ रावणाचे युद्धासाठी प्रस्थान, वानर-राक्षस-युद्ध

दोहा

मूल (दोहा)

ताहि कि संपति सगुन सुभ सपनेहुँ मन बिश्राम।
भूत द्रोह रत मोहबस राम बिमुख रति काम॥ ७८॥

अनुवाद (हिन्दी)

जो जिवांशी द्रोह करण्यात मग्न आहे, मोहाला वश झालेला आहे, राम-विन्मुख आहे आणि कामासक्त आहे, त्याला स्वप्नातही संपत्ती, शुभशकुन आणि मनाचे समाधान मिळू शकेल काय?॥ ७८॥

मूल (चौपाई)

चलेउ निसाचर कटकु अपारा।
चतुरंगिनी अनी बहु धारा॥
बिबिधि भाँति बाहन रथ जाना।
बिपुल बरन पताक ध्वज नाना॥

अनुवाद (हिन्दी)

राक्षसांची अपार सेना निघाली. चतुरंग सेनेच्या पुष्कळ तुकडॺा होत्या. अनेक प्रकारची वाहने, रथ आणि पायदळ होते. तसेच बऱ्याच रंगांच्या अनेक पताका आणि ध्वज होते.॥ १॥

मूल (चौपाई)

चले मत्त गज जूथ घनेरे।
प्राबिट जलद मरुत जनु प्रेरे॥
बरन बरन बिर दैत निकाया।
समर सूर जानहिं बहु माया॥

अनुवाद (हिन्दी)

मत्त हत्तींच्या पुष्कळ झुंडी निघाल्या. जणू वाऱ्याने प्रेरित झालेले पावसाळ्यातील ढग असावेत. रंगी-बेरंगी पोषाख घातलेले वीरांचे समूह होते. ते युद्धामध्ये मोठे वीर होते आणि पुष्कळ प्रकारची माया जाणणारे होते.॥ २॥

मूल (चौपाई)

अति बिचित्र बाहिनी बिराजी।
बीर बसंत सेन जनु साजी॥
चलत कटक दिगसिंधुर डगहीं।
छुभित पयोधि कुधर डगमगहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ती सेना अत्यंत विलक्षण शोभत होती. जणू वीर वसंतऋतूने आपल्या सेनेला सजविले होते. सेना चालू लागली, तेव्हा दिग्गज डळमळू लागले, समुद्र खवळला आणि पर्वत डगमगू लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

उठी रेनु रबि गयउ छपाई।
मरुत थकित बसुधा अकुलाई॥
पनव निसान घोर रव बाजहिं।
प्रलय समय के घन जनु गाजहिं॥

अनुवाद (हिन्दी)

धूळ इतकी उडाली की, सूर्य दिसेनासा झाला. वारा थांबला आणि पृथ्वी व्याकूळ झाली. ढोल व नगारे भयंकर आवाज करीत वाजू लागले. जणू प्रलयकाळाचे मेघ गर्जत होते.॥ ४॥

मूल (चौपाई)

भेरि नफीरि बाज सहनाई।
मारू राग सुभट सुखदाई॥
केहरि नाद बीर सब करहीं।
निज निज बल पौरुष उच्चरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

भेरी, तुरई आणि सनई यांमधून योद्ध्यांना सुखावणारा मारू राग वाजत होता. सर्व वीर सिंहनाद करीत होते आणि आपापल्या पराक्रमाचे वर्णन करीत होते.॥ ५॥

मूल (चौपाई)

कहइ दसानन सुनहु सुभट्टा।
मर्दहु भालु कपिन्ह के ठट्टा॥
हौं मारिहउँ भूप द्वौ भाई।
अस कहि सन्मुख फौज रेंगाई॥

अनुवाद (हिन्दी)

रावण म्हणाला, ‘हे उत्तम योद्धॺांनो, ऐका. तुम्ही अस्वले आणि वानरांचे कळप चिरडून टाका आणि मी दोन्ही राजकुमारांना मारतो.’ असे म्हणून त्याने आपली सेना पुढच्या बाजूला घेतली.॥ ६॥

मूल (चौपाई)

यह सुधि सकल कपिन्ह जब पाई।
धाए करि रघुबीर दोहाई॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा वानरांना हे समजले, तेव्हा ते श्रीरघुवीरांचा जयजयकार करीत धावून गेले.॥ ७॥

छंद

मूल (दोहा)

धाए बिसाल कराल मर्कट भालु काल समान ते।
मानहुँ सपच्छ उड़ाहिं भूधर बृंद नाना बान ते॥
नख दसन सैल महाद्रुमायुध सबल संक न मानहीं।
जय राम रावन मत्त गज मृगराज सुजसु बखानहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ती विशाल व काळासारखी वानर-अस्वले धावत निघाली. जणू काही पंख असलेले पर्वतांचे समूह उडत होते. ते अनेक रंगांचे होते. नखे, दात, पर्वत व मोठमोठे वृक्ष ही त्यांची शस्त्रे होती. ते मोठे बलवान होते आणि कुणाला भीत नव्हते. रावणरूपी उन्मत्त हत्तीसाठी सिंहरूप असलेल्या श्रीरामांचा जयजयकार करून ते त्यांच्या सुंदर कीर्तीचे वर्णन करीत होते.

दोहा

मूल (दोहा)

दुहु दिसि जय जयकार करि निज निज जोरी जानि।
भिरे बीर इत रामहि उत रावनहि बखानि॥ ७९॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्ही बाजूचे योद्धे जयजयकार करीत आपापली जोडी बनवून इकडे श्रीरघुनाथांचे आणि तिकडे रावणाचे कीर्तिगान करीत परस्पर भिडले.॥ ७९॥

मूल (चौपाई)

रावनु रथी बिरथ रघुबीरा।
देखि बिभीषन भयउ अधीरा॥
अधिक प्रीति मन भा संदेहा।
बंदि चरन कह सहित सनेहा॥

अनुवाद (हिन्दी)

रावण रथावर आरूढ होता आणि रघुवीर रथाविना होते, हे पाहून बिभीषण बेचैन झाला. अधिक प्रेम असल्यामुळे त्याच्या मनात शंका आली की, श्रीराम रथाविना रावणाला कसे जिंकू शकतील? श्रीरामांच्या चरणांना वंदन करून तो प्रेमाने म्हणू लागला.॥ १॥

मूल (चौपाई)

नाथ न रथ नहिं तन पद त्राना।
केहि बिधि जितब बीर बलवाना॥
सुनहु सखा कह कृपानिधाना।
जेहिं जय होइ सो स्यंदन आना॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे नाथ, तुमच्याकडे रथ नाही, शरीराचे रक्षण करण्यासाठी कवच नाही आणि पादत्राणही नाही. मग त्या बलवान वीर रावणाला कसे जिंकता येईल?’ कृपानिधान श्रीराम म्हणाले, ‘हे मित्रा, ज्याच्यामुळे विजय होतो, तो रथ वेगळाच आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

सौरज धीरज तेहि रथ चाका।
सत्य सील दृढ़ ध्वजा पताका॥
बल बिबेक दम परहित घोरे।
छमा कृपा समता रजु जोरे॥

अनुवाद (हिन्दी)

शौर्य व धैर्य ही त्याची चाके आहेत. सत्य व शील हे त्याचे ध्वज व पताका आहेत. बल, विवेक, संयम आणि परोपकार—हे चार त्याचे घोडे आहेत. ते क्षमा, दया आणि समतारूपी दोरीने रथाला बांधले आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

ईस भजनु सारथी सुजाना।
बिरति चर्म संतोष कृपाना॥
दान परसु बुधि सक्ति प्रचंडा।
बर बिग्यान कठिन कोदंडा॥

अनुवाद (हिन्दी)

ईश्वरभजन हाच रथ चालविणारा सारथी आहे. वैराग्य ही ढाल आहे आणि संतोष ही तलवार आहे. दान हा परशू आहे, बुद्धी ही प्रचंड शक्ती आहे आणि श्रेष्ठ विज्ञान हे बळकट धनुष्य आहे.॥ ४॥

मूल (चौपाई)

अमल अचल मन त्रोन समाना।
सम जम नियम सिलीमुख नाना॥
कवच अभेद बिप्र गुर पूजा।
एहि सम बिजय उपाय न दूजा॥

अनुवाद (हिन्दी)

निर्मल व अचल मन हे भाते आहेत. शम, यम, नियम हे पुष्कळसे बाण आहेत. ब्राह्मण व गुरू यांचे पूजन हे अभेद्य कवच आहे. याच्याशिवाय विजयाचा दुसरा उपाय नाही.॥ ५॥

मूल (चौपाई)

सखा धर्ममय अस रथ जाकें।
जीतन कहँ न कतहुँ रिपु ताकें॥

अनुवाद (हिन्दी)

हे मित्रा, असा धर्ममय रथ ज्याच्याकडे आहे. त्याला जिंकण्यासाठी कुठेही शत्रूच नाही.॥ ६॥

दोहा

मूल (दोहा)

महा अजय संसार रिपु जीति सकइ सो बीर।
जाकें अस रथ होइ दृढ़ सुनहु सखा मतिधीर॥ ८०(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हे धीरबुद्धीच्या मित्रा, ऐकून घे. ज्याच्या जवळ असा मजबूत रथ असेल, तो वीर जन्म-मृत्युरूपी महान दुर्जय शत्रूला सुद्धा जिंकू शकतो. रावणाचे ते काय?’॥ ८०(क)॥

मूल (दोहा)

सुनि प्रभु बचन बिभीषन हरषि गहे पद कंज।
एहि मिस मोहि उपदेसेहु राम कृपा सुख पुंज॥ ८०(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंचे बोलणे ऐकून बिभीषणाने आनंदभरित होऊन त्यांची चरण-कमले धरली. तो म्हणाला, ‘हे कृपा व सुखाचे निधान श्रीराम, तुम्ही या निमित्ताने मला उपदेश केला.’॥ ८०(ख)॥

मूल (दोहा)

उत पचार दसकंधर इत अंगद हनुमान।
लरत निसाचर भालु कपि करि निज निज प्रभु आन॥ ८० (ग)॥

अनुवाद (हिन्दी)

तिकडून रावण आव्हान देत होता आणि इकडून अंगद व हनुमान.राक्षस आणि अस्वले-वानर आपापल्या स्वामींचा जयजयकार करीत लढत होते.॥ ८०(ग)॥

मूल (चौपाई)

सुर ब्रह्मादि सिद्ध मुनि नाना।
देखत रन नभ चढ़े बिमाना॥
हमहू उमा रहे तेहिं संगा।
देखत राम चरित रन रंगा॥

अनुवाद (हिन्दी)

ब्रह्मदेवादी देव आणि अनेक सिद्ध व मुनी विमानात बसून आकाशातून युद्ध पहात होते. शिव म्हणतात, ‘हे उमा, मीसुद्धा त्या समाजात होतो आणि श्रीरामांच्या रणोत्सवाची लीला पहात होतो.’॥ १॥

मूल (चौपाई)

सुभट समर रस दुहु दिसि माते।
कपि जयसील राम बल ताते॥
एक एक सन भिरहिं पचारहिं।
एकन्ह एक मर्दि महि पारहिं॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्हीकडचे योद्धे रण-रसात मत्त होऊन गेले होते. वानरांना श्रीरामांचे बळ होते, म्हणून ते जिंकत होते. एक दुसऱ्याशी भिडत होते आणि आव्हान देत होते आणि एक दुसऱ्याला चिरडून जमिनीवर टाकत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

मारहिं काटहिं धरहिं पछारहिं।
सीस तोरि सीसन्ह सन मारहिं॥
उदर बिदारहिं भुजा उपारहिं।
गहि पद अवनि पटकि भट डारहिं॥

अनुवाद (हिन्दी)

ते मारत होते, कापत होते, पकडत होते, खाली पाडत होते आणि राक्षसांची शिरे तोडून त्याच मुंडक्यांनी दुसऱ्यांना मारत होते. पोट फाडत होते, भुजा उपटून टाकत होते आणि योद्ध्यांचे पाय पकडून त्यांना पृथ्वीवर आपटत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

निसिचर भट महि गाड़हिं भालू।
ऊपर ढारि देहिं बहु बालू॥
बीर बलीमुख जुद्ध बिरुद्धे।
देखिअत बिपुल काल जनु क्रुद्धे॥

अनुवाद (हिन्दी)

राक्षस-योद्ध्यांना अस्वले पृथ्वीत गाडून टाकीत होती आणि वर पुष्कळ वाळू टाकीत होती. युद्धात शत्रूविरुद्ध लढणारे वीर वानर जणू पुष्कळ क्रुद्ध काळांसारखे दिसत होते.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

क्रुद्धे कृतांत समान कपि तन स्रवत सोनित राजहीं।
मर्दहिं निसाचर कटक भट बलवंत घन जिमि गाजहीं॥
मारहिं चपेटन्हि डाटि दातन्ह काटि लातन्ह मीजहीं।
चिक्करहिं मर्कट भालु छल बल करहिं जेहिं खल छीजहीं॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

शरीरावरून वाहाणाऱ्या रक्तांमुळे ते क्रोधित झालेल्या काळाप्रमाणे वाटत होते. ते बलवान वीर राक्षस-सेनेतील योद्ध्यांना चिरडून टाकीत होते आणि मेघांप्रमाणे गर्जना करीत होते. रागावून थपडा मारीत होते, दातांनी चावून व लाथांनी तिंबून काढीत होते. वानर व अस्वले चीत्कार करीत होती आणि दुष्ट राक्षस नष्ट व्हावेत, म्हणून कपट-नीती व बळाचा वापर करीत होती.॥ १॥

मूल (दोहा)

धरि गाल फारहिं उर बिदारहिं गल अँतावरि मेलहीं।
प्रह्लादपति जनु बिबिध तनु धरि समर अंगन खेलहीं॥
धरु मारु काटु पछारु घोर गिरा गगन महि भरि रही।
जय राम जो तृन ते कुलिस कर कुलिस ते कर तृन सही॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

ते राक्षसांचे गाल पकडून फाडत होते, छाती चिरून टाकत होते आणि त्यांची आतडी बाहेर काढून गळ्यात घालीत होते. प्रह्लादाचे स्वामी भगवान नृसिंहच अनेक शरीरे धारण करून युद्धाच्या मैदानात क्रीडा करीत आहेत, असे ते वानर दिसत होते. पकडा, मारा, कापून काढा, आपटा इत्यादी घोर शब्दांनी आकाश व पृथ्वी भरून गेली होती. जे खरोखर तृणाला वज्र आणि वज्राला तृण बनवून टाकतात, त्या श्रीरामचंद्रांचा विजय असो.॥ २॥

दोहा

मूल (दोहा)

निज दल बिचलत देखेसि बीस भुजाँ दस चाप।
रथ चढ़ि चलेउ दसानन फिरहु फिरहु करि दाप॥ ८१॥

अनुवाद (हिन्दी)

आपली सेना गोंधळून गेल्याचे पाहून वीस भुजांमध्ये दहा धनुष्ये धरून रावण रथावर चढून गर्वाने ‘परता, परता’ असे म्हणत निघाला.॥ ८१॥

मूल (चौपाई)

धायउ परम क्रुद्ध दसकंधर।
सन्मुख चले हूह दै बंदर॥
गहि कर पादप उपल पहारा।
डारेन्हि ता पर एकहिं बारा॥

अनुवाद (हिन्दी)

रावण अत्यंत क्रोधाने धावून गेला. वानर हुंकार करीत लढण्यासाठी त्याच्यासमोर गेले. त्यांनी हातांमध्ये वृक्ष, पाषाण आणि पर्वत घेऊन एकदम रावणावर टाकले.॥ १॥

मूल (चौपाई)

लागहिं सैल बज्र तन तासू।
खंड खंड होइ फूटहिं आसू॥
चला न अचल रहा रथ रोपी।
रन दुर्मद रावन अति कोपी॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच्या वज्रासारख्या शरीरावर पडताच पर्वत लगेच तुकडे तुकडे होऊन फुटून जात होते. अत्यंत क्रोधी रावण रथ थांबवून दृढपणे उभा राहिला. जराही हलला नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

इत उत झपटि दपटि कपि जोधा।
मर्दै लाग भयउ अति क्रोधा॥
चले पराइ भालु कपि नाना।
त्राहि त्राहि अंगद हनुमाना॥

अनुवाद (हिन्दी)

त्याला खूप राग आला. तो इकडे तिकडे धावून, धमकावून वानर योद्ध्यांना चिरडू लागला. अनेक वानर व अस्वले ‘हे अंगदा, हे हनुमाना, रक्षण करा, रक्षण करा’ असे ओरडत पळू लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

पाहि पाहि रघुबीर गोसाईं।
यह खल खाइ काल की नाईं॥
तेहिं देखे कपि सकल पराने।
दसहुँ चाप सायक संधाने॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे रघुवीर, हे गोस्वामी, रक्षण करा. रक्षण करा. हा दुष्ट रावण काळाप्रमाणे आम्हांला खाऊन टाकीत आहे.’ रावणाने पाहिले की, सर्व वानर पळत सुटले आहेत. तेव्हा त्याने दाही धनुष्यांनी नेम धरला.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

संधानि धनु सर निकर छाड़ेसि उरग जिमि उड़ि लागहीं।
रहे पूरि सर धरनी गगन दिसि बिदिसि कहँ कपि भागहीं॥
भयो अति कोलाहल बिकल कपि दल भालु बोलहिं आतुरे।
रघुबीर करुना सिंधु आरत बंधु जन रच्छक हरे॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने नेम धरून बाणांचे समूह सोडले. ते बाण सर्पांप्रमाणे उडून जाऊन लागत होते. पृथ्वी-आकाश आणि दिशा-विदिशांना सर्वत्र भरून गेले होते. वानर पळणार तरी कुठे? मोठा गोंधळ उडाला. वानर-अस्वलांची सेना व्याकूळ होऊन आर्त्त स्वराने ओरडू लागली. ‘हे रघुवीर, हे करुणासागर, हे पीडितांचे बंधू, हे सेवकांचे रक्षण करून त्यांचे दुःख हरण करणाऱ्या श्रीहरी! रक्षण करा.’