२१ मेघनाद-यज्ञ-विध्वंस, युद्ध, मेघनादाचा उद्धार

मूल (चौपाई)

मेघनाद कै मुरछा जागी।
पितहि बिलोकि लाज अति लागी॥
तुरत गयउ गिरिबर कंदरा।
करौं अजय मख अस मन धरा॥

अनुवाद (हिन्दी)

मेघनादाची मूर्च्छा दूर झाली, तेव्हा पित्याला पाहून तो फारच ओशाळला. तो म्हणाला, ‘मी अजेय होण्यासाठी यज्ञ करतो.’ असा निश्चय करून तो त्वरित श्रेष्ठ पर्वताच्या गुहेत गेला.॥ १॥

मूल (चौपाई)

इहाँ बिभीषन मंत्र बिचारा।
सुनहु नाथ बल अतुल उदारा॥
मेघनाद मख करइ अपावन।
खल मायावी देव सतावन॥

अनुवाद (हिन्दी)

इकडे बिभीषणाने विचार करून श्रीरामांना सांगितले, ‘हे अतुलनीय बलवान उदार प्रभो, देवांना सतावणारा दुष्ट व मायावी मेघनाद तामसी यज्ञ करीत आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

जौं प्रभु सिद्ध होइ सो पाइहि।
नाथ बेगि पुनि जीति न जाइहि॥
सुनि रघुपति अतिसय सुख माना।
बोले अंगदादि कपि नाना॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभो, जर हा यज्ञ पूर्ण झाला, तर हे नाथ, मग मेघनादाला लवकर जिंकणे शक्य होणार नाही.’ हे ऐकून श्रीरघुनाथांना खूप बरे वाटले आणि अंगदादी बऱ्याच वानरांना बोलावून त्यांनी सांगितले,॥ ३॥

मूल (चौपाई)

लछिमन संग जाहु सब भाई।
करहु बिधंस जग्य कर जाई॥
तुम्ह लछिमन मारेहु रन ओही।
देखि सभय सुर दुख अति मोही॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे बंधूंनो, सर्वजण लक्ष्मणासोबत जा आणि यज्ञाचा विध्वंस करा. हे लक्ष्मणा, संग्रामामध्ये तू त्याला मारून टाक. देव भयभीत झाल्याचे पाहून मला फार वाईट वाटते.॥ ४॥

मूल (चौपाई)

मारेहु तेहि बल बुद्धि उपाई।
जेहिं छीजै निसिचर सुनु भाई॥
जामवंत सुग्रीव बिभीषन।
सेन समेत रहेहु तीनिउ जन॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधू, त्याला बलाने व युक्तीने मार. त्यामुळेच त्या निशाचराचा नाश होईल. हे जांबवाना, सुग्रीवा, बिभीषणा, तुम्ही तिघेजण सेनेसह त्याच्याबरोबर राहा.’॥ ५॥

मूल (चौपाई)

जब रघुबीर दीन्हि अनुसासन।
कटि निषंग कसि साजि सरासन॥
प्रभु प्रताप उर धरि रनधीरा।
बोले घन इव गिरा गँभीरा॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे जेव्हा रघुनाथांनी आज्ञा केली, तेव्हा कमरेला भाता बांधून आणि धनुष्य सज्ज करून रणधीर लक्ष्मण प्रभूंचा प्रताप हृदयी धरून मेघासारख्या गंभीर वाणीने म्हणाला,॥ ६॥

मूल (चौपाई)

जौं तेहि आजु बधें बिनु आवौं।
तौ रघुपति सेवक न कहावौं॥
जौं सत संकर करहिं सहाई।
तदपि हतउँ रघुबीर दोहाई॥

अनुवाद (हिन्दी)

‘जर मी आज त्याला न मारता परत आलो, तर श्रीरघुनाथांचा सेवक म्हणविणार नाही. जरी शेकडो शंकरसुद्धा त्याच्या मदतीला आले, तरीही श्रीरामांची शपथ आहे की, आज मी त्याला मारीनच.’॥ ७॥

दोहा

मूल (दोहा)

रघुपति चरन नाइ सिरु चलेउ तुरंत अनंत।
अंगद नील मयंद नल संग सुभट हनुमंत॥ ७५॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन लक्ष्मण त्वरित निघाला. त्याच्याबरोबर अंगद, नल, नील, मैंद, हनुमान इत्यादी उत्तम योद्धे निघाले.॥ ७५॥

मूल (चौपाई)

जाइ कपिन्ह सो देखा बैसा।
आहुति देत रुधिर अरु भैंसा॥
कीन्ह कपिन्ह सब जग्य बिधंसा।
जब न उठइ तब करहिं प्रसंसा॥

अनुवाद (हिन्दी)

वानरांनी जाऊन पाहिले की, मेघनाद बसून रक्त व रेडॺांची आहुती देत आहे. वानरांनी यज्ञाचा पूर्ण विध्वंस करून टाकला. तरीही जेव्हा तो उठला नाही, तेव्हा ते त्याची वक्रोक्ति पूर्ण प्रशंसा करू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

तदपि न उठइ धरेन्हि कच जाई।
लातन्हि हति हति चले पराई॥
लै त्रिसूल धावा कपि भागे।
आए जहँ रामानुज आगे॥

अनुवाद (हिन्दी)

तरीही तो उठला नाही, तेव्हा त्यांनी त्याचे केस पकडले आणि त्याला लाथांनी बदडून ते पळून गेले. तेव्हा तो त्रिशूळ घेऊन धावला. वानर पळाले, ते लक्ष्मणा जवळ आले.॥ २॥

मूल (चौपाई)

आवा परम क्रोध कर मारा।
गर्ज घोर रव बारहिं बारा॥
कोपि मरुतसुत अंगद धाए।
हति त्रिसूल उर धरनि गिराए॥

अनुवाद (हिन्दी)

तो अत्यंत क्रोधाने आला व वारंवार भयंकर गर्जना करू लागला. हनुमान आणि अंगद रागाने धावून गेले. मेघनादाने दोघांच्या छातीत त्रिशूळ मारून त्यांना जमिनीवर पाडले.॥ ३॥

मूल (चौपाई)

प्रभु कहँ छाँड़ेसि सूल प्रचंडा।
सर हति कृत अनंत जुग खंडा॥
उठि बहोरि मारुति जुबराजा।
हतहिं कोपि तेहि घाउ न बाजा॥

अनुवाद (हिन्दी)

मग त्याने लक्ष्मणावर प्रचंड त्रिशूळ फेकला. लक्ष्मणाने बाण मारून त्रिशूळाचे दोन तुकडे करून टाकले. हनुमान व अंगद पुन्हा उठले व त्याला मारू लागले, परंतु त्याला काही लागले नाही.॥ ४॥

मूल (चौपाई)

फिरे बीर रिपु मरइ न मारा।
तब धावा करि घोर चिकारा॥
आवत देखि क्रुद्ध जनु काला।
लछिमन छाड़े बिसिख कराला॥

अनुवाद (हिन्दी)

शत्रू मेघनाद हा मारूनही मरत नाही, हे पाहून वीर परतू लागले, तेव्हा तो प्रचंड चीत्कार करून धावला. क्रुद्ध काळाप्रमाणे तो येत आहे, असे पाहून लक्ष्मणाने भयंकर बाण मारले.॥ ५॥

मूल (चौपाई)

देखेसि आवत पबि सम बाना।
तुरत भयउ खल अंतरधाना॥
बिबिध बेष धरि करइ लराई।
कबहुँक प्रगट कबहुँ दुरि जाई॥

अनुवाद (हिन्दी)

वज्रासारखे बाण येताना पाहून तो दुष्ट लगेच अदृश्य झाला आणि नंतर वेगवेगळी रूपे घेऊन युद्ध करू लागला. कधी तो प्रकट होई, तर कधी लपून जाई.॥ ६॥

मूल (चौपाई)

देखि अजय रिपु डरपे कीसा।
परम क्रुद्ध तब भयउ अहीसा॥
लछिमन मन अस मंत्र दृढ़ावा।
एहि पापिहि मैं बहुत खेलावा॥

अनुवाद (हिन्दी)

शत्रू पराजित होत नाही, असे पाहून वानर घाबरले. तेव्हा लक्ष्मण अत्यंत क्रुद्ध झाला. लक्ष्मणाने मनात पक्का निश्चय केला की, आता या पाप्याशी खेळ फार झाला. आता याला संपविले पाहिजे.॥ ७॥

मूल (चौपाई)

सुमिरि कोसलाधीस प्रतापा।
सर संधान कीन्ह करि दापा॥
छाड़ा बान माझ उर लागा।
मरती बार कपटु सब त्यागा॥

अनुवाद (हिन्दी)

कोसलपती श्रीरामांचे स्मरण करून लक्ष्मणाने वीरोचित गर्वाने बाण लावला. बाण सुटताच त्याच्या छातीत मधोमध लागला. मरताना त्याने सर्व माया सोडून दिल्या.॥ ८॥

दोहा

मूल (दोहा)

रामानुज कहँ रामु कहँ अस कहि छाँड़ेसि प्रान।
धन्य धन्य तव जननी कह अंगद हनुमान॥ ७६॥

अनुवाद (हिन्दी)

‘रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण कुठे आहे? राम कुठे आहे?’ असे म्हणत त्याने प्राण सोडले. त्याला अंगद व हनुमान, ‘तुझी माता धन्य आहे, धन्य आहे,’ कारण मरताना तू श्रीराम-लक्ष्मणांचे स्मरण केलेस, असे म्हणू लागले.॥ ७६॥

मूल (चौपाई)

बिनु प्रयास हनुमान उठायो।
लंका द्वार राखि पुनि आयो॥
तासु मरन सुनि सुर गंधर्बा।
चढ़ि बिमान आए नभ सर्बा॥

अनुवाद (हिन्दी)

हनुमानाने सहजपणे त्याला उचलले व लंकेच्या दारावर त्याला ठेवून तो परत आला. त्याच्या मृत्यूची वार्ता ऐकून देव, गंधर्व इत्यादी सर्वजण विमानात बसून आकाशात जमले.॥ १॥

मूल (चौपाई)

बरषि सुमन दुंदुभीं बजावहिं।
श्रीरघुनाथ बिमल जसु गावहिं॥
जय अनंत जय जगदाधारा।
तुम्ह प्रभु सब देवन्हि निस्तारा॥

अनुवाद (हिन्दी)

ते फुले उधळून नगारे वाजवत होते आणि श्रीरामांची निर्मल कीर्ती गात होते. ‘हे अनंता, तुझा विजय असो. हे जगदाधारा, तुझा विजय असो. हे प्रभो, तुम्ही सर्व देवांना संकटातून मुक्त केले.’॥ २॥

मूल (चौपाई)

अस्तुति करि सुर सिद्ध सिधाए।
लछिमन कृपासिंधु पहिं आए॥
सुत बध सुना दसानन जबहीं।
मुरुछित भयउ परेउ महि तबहीं॥

अनुवाद (हिन्दी)

देव व सिद्ध स्तुती करून निघून गेले. मग कृपासागर श्रीरामांजवळ लक्ष्मण आला. इकडे रावणाने पुत्र-वधाची वार्ता ऐकताच तो मूर्च्छित होऊन जमिनीवर पडला.॥ ३॥

मूल (चौपाई)

मंदोदरी रुदन कर भारी।
उर ताड़न बहु भाँति पुकारी॥
नगर लोग सब ब्याकुल सोचा।
सकल कहहिं दसकंधर पोचा॥

अनुवाद (हिन्दी)

मंदोदरी छाती बडवून घेत आणि अनेक प्रकारे हाका मारत मोठा विलाप करू लागली. नगरातील सर्व राक्षस शोकाने व्याकूळ झाले. सर्वजण रावणाला नावे ठेवू लागले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तब दसकंठ बिबिधि बिधि समुझाईं सब नारि।
नस्वर रूप जगत सब देखहु हृदयँ बिचारि॥ ७७॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा रावणाने सर्व स्त्रियांना अनेक तऱ्हेने समजावले की, ‘संपूर्ण जगाचे हे दृश्य रूप नाशवान आहे. मनात विचार करून बघा.’॥ ७७॥

मूल (चौपाई)

तिन्हहि ग्यान उपदेसा रावन।
आपुन मंद कथा सुभ पावन॥
पर उपदेस कुसल बहुतेरे।
जे आचरहिं ते नर न घनेरे॥

अनुवाद (हिन्दी)

रावणाने त्यांना ज्ञानाचा उपदेश केला. तो स्वतः नीच होता, परंतु त्याचे बोलणे शुभ व पवित्र होते. दुसऱ्याला उपदेश देण्यात लोक पटाईत असतात. पण उपदेशाप्रमाणे आचरणही करणारे लोक कमी असतात.॥ १॥

मूल (चौपाई)

निसा सिरानि भयउ भिनुसारा।
लगे भालु कपि चारिहुँ द्वारा॥
सुभट बोलाइ दसानन बोला।
रन सन्मुख जा कर मन डोला॥

अनुवाद (हिन्दी)

रात्र गेली, सकाळ झाली. अस्वले-वानर चारी दरवाजांवर जाऊन ठाकले. योद्ध्यांना बोलावून रावण म्हणाला, ‘लढाईमध्ये शत्रूसमोर ज्याचे मन धास्तावत असेल,॥ २॥

मूल (चौपाई)

सो अबहीं बरु जाउ पराई।
संजुग बिमुख भएँ न भलाई॥
निज भुज बल मैं बयरु बढ़ावा।
देहउँ उतरु जो रिपु चढ़ि आवा॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने आताच पळून जावे, हे बरे. युद्धात जाऊन पळून जाण्यात शहाणपणा नाही. मी आपल्या भुजांच्या बळावर वैर वाढविले आहे. जो शत्रू चाल करून आला आहे, त्याला मी उत्तर देईन.’॥ ३॥

मूल (चौपाई)

अस कहि मरुत बेग रथ साजा।
बाजे सकल जुझाऊ बाजा॥
चले बीर सब अतुलित बली।
जनु कज्जल कै आँधी चली॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून वायुगतीने चालणारा रथ त्याने सज्ज करविला. युद्धाचे नगारे वाजू लागले. सर्व अतुलनीय बलवान वीर काजळाच्या वावटळीप्रमाणे निघाले.॥ ४॥

मूल (चौपाई)

असगुन अमित होहिं तेहि काला।
गनइ न भुज बल गर्ब बिसाला॥

अनुवाद (हिन्दी)

त्या प्रसंगी असंख्य अपशकुन होऊ लागले. परंतु आपल्या भुजांच्या बळाचा मोठा गर्व असल्यामुळे रावणाने तिकडे लक्ष दिले नाही.॥ ५॥

छंद

मूल (दोहा)

अति गर्ब गनइ न सगुन असगुन स्रवहिं आयुध हाथ ते।
भट गिरत रथ ते बाजि गज चिक्करत भाजहिं साथ ते॥
गोमाय गीध कराल खर रव स्वान बोलहिं अति घने।
जनु कालदूत उलूक बोलहिं बचन परम भयावने॥

अनुवाद (हिन्दी)

अत्यंत गर्वामुळे शकुन-अपशकुनाचा विचार त्याला नव्हता. हातातून शस्त्रे खाली पडत होती. योद्धे रथांतून खाली पडत होते. घोडे, हत्ती हे बाजूला जाऊन चीत्कार करीत पळून जात होते. कोल्हे, गिधाडे, कावळे आणि गाढवे ओरडत होती. बरीच कुत्री जोरजोराने भुंकत होती. काळाचे दूत असल्याप्रमाणे घुबडे फार भयानक आवाज काढीत होती.