२० मेघनादाचे युध्द, श्रीराम नागपाशात बद्ध

दोहा

मूल (दोहा)

मेघनाद मायामय रथ चढ़ि गयउ अकास।
गर्जेउ अट्टहास करि भइ कपि कटकहि त्रास॥ ७२॥

अनुवाद (हिन्दी)

मेघनाद आपल्या त्या मायामय रथावर आरूढ होऊन आकाशात गेला आणि खदखदा हसून त्याने गर्जना केली. त्यामुळे वानरसेनेमध्ये भय पसरले.॥ ७२॥

मूल (चौपाई)

सक्ति सूल तरवारि कृपाना।
अस्त्र सस्त्र कुलिसायुध नाना॥
डारइ परसु परिघ पाषाना।
लागेउ बृष्टि करै बहु बाना॥

अनुवाद (हिन्दी)

तो शक्ती, शूळ, तलवार, कृपाण इत्यादी शस्त्रास्त्रे आणि वज्र इत्यादी पुष्कळ आयुधांचा मारा करू लागला. तसेच परशू, परिघ, पाषाण इत्यादी टाकत पुष्कळ बाणांचा वर्षाव करू लागला.॥ १॥

मूल (चौपाई)

दस दिसि रहे बान नभ छाई।
मानहुँ मघा मेघ झरि लाई॥
धरु धरु मारु सुनिअ धुनि काना।
जो मारइ तेहि कोउ न जाना॥

अनुवाद (हिन्दी)

आकाशात दाही दिशा बाणांनी आच्छादून गेल्या. जणू मघा नक्षत्रांच्या मेघांनी पर्जन्यवृष्टी सुरू केली होती. ‘पकडा, पकडा, मारा’ हे शब्द कानी पडत होते. परंतु कोण मारत होता, ते काही दिसत नव्हते.॥ २॥

मूल (चौपाई)

गहि गिरि तरु अकास कपि धावहिं।
देखहिं तेहि न दुखित फिरि आवहिं॥
अवघट घाट बाट गिरि कंदर।
माया बल कीन्हेसि सर पंजर॥

अनुवाद (हिन्दी)

वानर पर्वत व वृक्ष घेऊन आकाशात धावून जात होते, परंतु शत्रूला पाहू शकत नव्हते. त्यामुळे निराश होऊन परत येत होते. मेघनादाने आपल्या मायेने दुर्गम घाट, रस्ते आणि पर्वतातील गुहेंना बाणांनी आच्छादून टाकले.॥ ३॥

मूल (चौपाई)

जाहिं कहाँ ब्याकुल भए बंदर।
सुरपति बंदि परे जनु मंदर॥
मारुतसुत अंगद नल नीला।
कीन्हेसि बिकल सकल बलसीला॥

अनुवाद (हिन्दी)

आता कुठे जायचे, या विचाराने वानर व्याकूळ झाले, जणू पर्वत इंद्राच्या कैदेत पडले. मेघनादाने मारुती, अंगद, नील इत्यादी साऱ्या बलवानांना व्याकूळ करून टाकले.॥ ४॥

मूल (चौपाई)

पुनि लछिमन सुग्रीव बिभीषन।
सरन्हि मारि कीन्हेसि जर्जर तन॥
पुनि रघुपति सैं जूझै लागा।
सर छाँड़इ होइ लागहिं नागा॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर त्याने लक्ष्मण, सुग्रीव व बिभीषण यांना बाण मारून त्यांची शरीरे जर्जर करून टाकली. मग तो रघुनाथांशी लढू लागला. तो जे बाण सोडत होता, ते साप बनून लागत होते.॥ ५॥

मूल (चौपाई)

ब्याल पास बस भए खरारी।
स्वबस अनंत एक अबिकारी॥
नट इव कपट चरित कर नाना।
सदा स्वतंत्र एक भगवाना॥

अनुवाद (हिन्दी)

जे स्वतंत्र, अनंत, एक आणि निर्विकार आहेत, ते श्रीराम हे लीलेसाठी नागपाशाच्या अधीन होऊन त्यामध्ये बद्ध झाले. श्रीरामचंद्र सदा स्वतंत्र, अद्वितीय भगवान आहेत. ते अभिनेत्याप्रमाणे अनेक प्रकारच्या लीला लोकांना दाखविण्यासाठी करीत होते.॥ ६॥

मूल (चौपाई)

रन सोभा लगि प्रभुहिं बँधायो।
नागपास देवन्ह भय पायो॥

अनुवाद (हिन्दी)

रणाच्या शोभेसाठी प्रभूंनी स्वतःला नागपाशात बांधून घेतले, परंतु त्यामुळे देवांना भीती वाटू लागली.॥ ७॥

दोहा

मूल (दोहा)

गिरिजा जासु नाम जपि मुनि काटहिं भव पास।
सो कि बंध तर आवइ ब्यापक बिस्व निवास॥ ७३॥

अनुवाद (हिन्दी)

शिव म्हणतात, ‘हे गिरिजा, ज्यांचे नाम जपून मुनी जन्म-मृत्यूच्या भवाची दोरी तोडून टाकतात, ते सर्वव्यापक, विश्वाचे आधार असलेले प्रभू कधी बंधनात पडू शकतील काय?॥ ७३॥

मूल (चौपाई)

चरित राम के सगुन भवानी।
तर्कि न जाहिं बुद्धि बल बानी॥
अस बिचारि जे तग्य बिरागी।
रामहि भजहिं तर्क सब त्यागी॥

अनुवाद (हिन्दी)

हे भवानी, श्रीरामांच्या या सगुण लीलेंविषयी बुद्धी व तर्काने निर्णय घेता येत नाही. म्हणून विचारपूर्वक तत्त्वज्ञानी आणि विरक्त पुरुष सर्व तर्क-वितर्क सोडून श्रीरामांचे भजनच करतात.॥ १॥

मूल (चौपाई)

ब्याकुल कटकु कीन्ह घननादा।
पुनि भा प्रगट कहइ दुर्बादा॥
जामवंत कह खल रहु ठाढ़ा।
सुनि करि ताहि क्रोध अति बाढ़ा॥

अनुवाद (हिन्दी)

मेघनादाने सेनेला व्याकूळ करून सोडले. पुन्हा तो प्रकट होऊन अपशब्द बोलू लागला. जेव्हा जांबवान म्हणाला, ‘अरे दुष्टा, उभा राहा’ तेव्हा हे ऐकून मेघनादाचा क्रोध वाढला.॥ २॥

मूल (चौपाई)

बूढ़ जानि सठ छाँड़ेउँ तोही।
लागेसि अधम पचारै मोही॥
अस कहि तरल त्रिसूल चलायो।
जामवंत कर गहि सोइ धायो॥

अनुवाद (हिन्दी)

तो म्हणाला, ‘अरे मूर्खा, म्हातारा समजून मी तुला सोडले होते. अरे अधमा, आता तू मलाच आव्हान देत आहेस ?’ असे म्हणून त्याने धारदार त्रिशूळ सोडला. जांबवान तोच त्रिशूळ हाताने पकडून धावला.॥ ३॥

मूल (चौपाई)

मारिसि मेघनाद कै छाती।
परा भू्मि घुर्मित सुरघाती॥
पुनि रिसान गहि चरन फिरायो।
महि पछारि निज बल देखरायो॥

अनुवाद (हिन्दी)

आणि त्याने तो मेघनादाच्या छातीवर मारला. तेव्हा तो देवांचा शत्रू चक्कर येऊन पृथ्वीवर पडला. जांबवानाने पुन्हा रागारागाने त्याचे पाय पकडून त्याला गरागरा फिरवले आणि पृथ्वीवर आपटून त्याला आपले बळ दाखवून दिले.॥ ४॥

मूल (चौपाई)

बर प्रसाद सो मरइ न मारा।
तब गहि पद लंका पर डारा॥
इहाँ देवरिषि गरुड़ पठायो।
राम समीप सपदि सो आयो॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु वरदानामुळे तो मारूनही मरत नव्हता. तेव्हा जांबवंताने त्याचा पाय धरून त्याला लंकेत फेकून दिले. इकडे देवर्षी नारदांनी गरुडाला पाठविले. तो त्वरित श्रीरामांजवळ येऊन पोहोचला. ॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

खगपति सब धरि खाए माया नाग बरूथ।
माया बिगत भए सब हरषे बानर जूथ॥ ७४(क)॥

अनुवाद (हिन्दी)

पक्षिराज गरुड येताच सर्व माया-सर्प त्याने जणू खाल्‍ल्यासारखे कोठे दिसेनासे झाले. मग सर्व वानरांच्या झुंडी मायेने रहित होऊन आनंदित झाल्या.॥ ७४(क)॥

मूल (दोहा)

गहि गिरि पादप उपल नख धाए कीस रिसाइ।
चले तमीचर बिकलतर गढ़ पर चढ़े पराइ॥ ७४(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

पर्वत, वृक्ष, पाषाण व नखे धारण केलेले वानर क्रुद्ध होऊन धावले. निशाचर फार व्याकूळ होऊन पळून गेले आणि किल्‍ल्यावर चढले.॥ ७४(ख)॥