१९ राम-कुंभकर्ण युद्ध

मूल (चौपाई)

बंधु बचन सुनि चला बिभीषन।
आयउ जहँ त्रैलोक बिभूषन॥
नाथ भूधराकार सरीरा।
कुंभकरन आवत रनधीरा॥

अनुवाद (हिन्दी)

भावाचे बोलणे ऐकून बिभीषण परत गेला. आणि त्रैलोक्यभूषण श्रीरामांकडे जाऊन म्हणाला, ‘हे नाथ, पर्वतासारख्या विशाल देहाचा रणधीर कुंभकर्ण येत आहे.’॥ १॥

मूल (चौपाई)

एतना कपिन्ह सुना जब काना।
किलकिलाइ धाए बलवाना॥
लिए उठाइ बिटप अरु भूधर।
कटकटाइ डारहिं ता ऊपर॥

अनुवाद (हिन्दी)

हे वानरांनी जेव्हा ऐकले, तेव्हा बलवान असे ते वानर किलकिलाट करीत धावले. त्यांनी वृक्ष व पर्वत उपटून घेतले आणि क्रोधाने दात वाजवीत ते कुंभकर्णावर टाकू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

कोटि कोटि गिरि सिखर प्रहारा।
करहिं भालु कपि एक एक बारा॥
मुरॺो न मनु तनु टरॺो न टारॺो।
जिमि गज अर्क फलनि को मारॺो॥

अनुवाद (हिन्दी)

अस्वले व वानर एकाच वेळी कोटॺवधी पर्वत-शिखरांनी त्याच्यावर प्रहार करीत होते, परंतु तो जराही विचलित झाला नाही की त्याचे शरीर हालले नाही. ज्याप्रमाणे रुईच्या झाडांची फळे मारल्याने हत्तीवर काही परिणाम होत नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

तब मारुतसुत मुठिका हन्यो।
परॺो धरनि ब्याकुल सिर धुन्यो॥
पुनि उठि तेहिं मारेउ हनुमंता।
घुर्मित भूतल परेउ तुरंता॥

अनुवाद (हिन्दी)

मग हनुमानाने त्याला एक ठोसा मारला, त्यामुळे तो व्याकूळ होऊन जमिनीवर पडला आणि डोके बडवू लागला. नंतर पुन्हा उठून त्याने हनुमानाला मारले. त्यामुळे त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला.॥ ४॥

मूल (चौपाई)

पुनि नल नीलहि अवनि पछारेसि।
जहँ तहँ पटकि पटकि भट डारेसि॥
चली बलीमुख सेन पराई।
अति भय त्रसित न कोउ समुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर कुंभकर्णाने नल, नील यांना पृथ्वीवर आदळले आणि दुसऱ्या योद्ध्यांनाही आपटून टाकून दिले. वानरसेना पळाली. सर्व अत्यंत घाबरले होते आणि कुंभकर्णासमोर येण्यास कोणी धजावत नव्हते.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

अंगदादि कपि मुरुछित करि समेत सुग्रीव।
काँख दाबि कपिराज कहुँ चला अमित बल सींव॥ ६५॥

अनुवाद (हिन्दी)

सुग्रीवासह अंगदादी वानरांना मूर्च्छित करून तो अपार बलाची परिसीमा असलेला कुंभकर्ण वानरराज सुग्रीवाला काखेत धरून निघाला.॥ ६५॥

मूल (चौपाई)

उमा करत रघुपति नरलीला।
खेलत गरुड़ जिमि अहिगन मीला॥
भृकुटि भंग जो कालहि खाई।
ताहि कि सोहइ ऐसि लराई॥

अनुवाद (हिन्दी)

शिव म्हणतात, ‘हे उमा, सापांच्या झुंडीमध्ये गरुड जसा खेळत असतो, त्याप्रमाणे श्रीरघुनाथ नरलीला करीत होते. जे भुवईच्या इशाऱ्यावर कालालाही खाऊन टाकतात, त्यांना अशी लढाई शोभून दिसते का?॥ १॥

मूल (चौपाई)

जग पावनि कीरति बिस्तरिहहिं।
गाइ गाइ भवनिधि नर तरिहहिं॥
मुरुछा गइ मारुत सुत जागा।
सुग्रीवहि तब खोजन लागा॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंत याद्वारे जगाला पवित्र करणारी अशी कीर्ती पसरवतील की, ती गाऊन मनुष्य भवसागर तरून जातील. मूर्च्छा गेली, तेव्हा मारुती शुद्धीवर आला व तो सुग्रीवाला शोधू लागला.॥ २॥

मूल (चौपाई)

सुग्रीवहु कै मुरुछा बीती।
निबुकि गयउ तेहि मृतक प्रतीती॥
काटेसि दसन नासिका काना।
गरजि अकास चलेउ तेहिं जाना॥

अनुवाद (हिन्दी)

सुग्रीवाची मूर्च्छा जेव्हा गेली, तेव्हा तो शवाप्रमाणे घसरून कुंभकर्णाच्या काखेतून खाली पडला. कुंभकर्णाला वाटले, तो मेला. परंतु त्याने कुंभकर्णाचे कान-नाक दातांनी तोडून टाकले आणि गर्जना करीत तो आकाशात उडाला. त्यावेळी कुंभकर्णाला त्याची जाणीव झाली.॥ ३॥

मूल (चौपाई)

गहेउ चरन गहि भूमि पछारा।
अति लाघवँ उठि पुनि तेहि मारा॥
पुनि आयउ प्रभु पहिं बलवाना।
जयति जयति जय कृपानिधाना॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने सुग्रीवाचा पाय धरून त्याला जमिनीवर आपटले. मग सुग्रीवाने चपळाईने उठून त्याला मारले. आणि तो बलवान सुग्रीव प्रभूंजवळ येऊन म्हणाला, ‘कृपानिधान प्रभूंचा त्रिवार विजय असो.’॥ ४॥

मूल (चौपाई)

नाक कान काटे जियँ जानी।
फिरा क्रोध करि भइ मन ग्लानी॥
सहज भीम पुनि बिनु श्रुति नासा।
देखत कपि दल उपजी त्रासा॥

अनुवाद (हिन्दी)

कान-नाक कापले गेल्याचे जाणवल्यावर कुंभकर्णाला दुःख झाले. तो क्रोधाने परत फिरला. एक तर तो आकाराने भयंकर होता. आणि कान-नाक नसल्याने आणखीच भयंकर दिसू लागला. त्याला पाहताच वानरांची सेना घाबरून गेली.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

जय जय जय रघुबंस मनि धाए कपि दै हूह।
एकहि बार तासु पर छाड़ेन्हि गिरि तरु जूह॥ ६६॥

अनुवाद (हिन्दी)

‘रघुवंशमणींचा विजय असो, विजय असो’ असे पुकारत वानर ‘हुप्प हुप्प’ असे ओरडत धावले आणि सर्वांनी एकदम त्याच्यावर पर्वत व वृक्षांचे समूह टाकले.॥ ६६॥

मूल (चौपाई)

कुंभकरन रन रंग बिरुद्धा।
सन्मुख चला काल जनु क्रुद्धा॥
कोटि कोटि कपि धरि धरि खाई।
जनु टीड़ी गिरि गुहाँ समाई॥

अनुवाद (हिन्दी)

युद्धाच्या उन्मादामध्ये कुंभकर्ण शत्रुसेनेसमोर असा चालू लागला की, रागावलेला कालच चालत येत आहे. तो कोटिकोटी वानरांना एकदम पकडून खाऊ लागला. पर्वताच्या गुहेत टोळांच्या धाडी जशा घुसतात, तसे कुंभकर्णाच्या तोंडात ते सामावू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

कोटिन्ह गहि सरीर सन मर्दा।
कोटिन्ह मीजि मिलव महि गर्दा॥
मुख नासा श्रवनन्हि कीं बाटा।
निसरि पराहिं भालु कपि ठाटा॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने कोटॺवधी वानरांना पकडून चुरगळून टाकले. कोटॺावधी वानरांना हातांनी कुसकरून धुळीला मिळविले. त्याच्या पोटात गेलेली अस्वले व वानर यांचे थवेच्या थवे तोंड, नाक व कान यांच्या वाटे बाहेर पडून पळू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

रन मद मत्त निसाचर दर्पा।
बिस्व ग्रसिहि जनु एहि बिधि अर्पा॥
मुरे सुभट सब फिरहिं न फेरे।
सूझ न नयन सुनहिं नहिं टेरे॥

अनुवाद (हिन्दी)

युद्धाच्या उन्मत्त दशेमध्ये राक्षस कुंभकर्ण असा गर्विष्ठ झाला की, विधात्याने त्याला जणू संपूर्ण विश्व अर्पण केले आहे आणि तो त्याला खाऊन टाकेल. सर्व योद्धे पळून गेले. ते परतायचे म्हटले, तरी परत फिरत नव्हते. त्यांच्या डोळ्यांना काही दिसत नव्हते आणि हाक मारली तरी त्यांना ऐकू येत नव्हते.॥ ३॥

मूल (चौपाई)

कुंभकरन कपि फौज बिडारी।
सुनि धाई रजनीचर धारी॥
देखी राम बिकल कटकाई।
रिपु अनीक नाना बिधि आई॥

अनुवाद (हिन्दी)

कुंभकर्णाने वानर-सेनेची पांगापांग केली, हे समजताच राक्षस-सेनाही धावून आली. श्रीरामचंद्रांनी पाहिले की, आपली सेना व्याकूळ झाली आहे आणि शत्रूच्या नाना प्रकारच्या सेना आल्या आहेत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुनु सुग्रीव बिभीषन अनुज सँभारेहु सैन।
मैं देखउँ खल बल दलहि बोले राजिवनैन॥ ६७॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा कमलनयन श्रीराम म्हणाले, ‘सुग्रीवा, हे बिभीषणा आणि हे लक्ष्मणा, तुम्ही सेना सांभाळा. मी या दुष्टाचे बळ आणि सेना यांना पाहून घेतो.’॥ ६७॥

मूल (चौपाई)

कर सारंग साजि कटि भाथा।
अरि दल दलन चले रघुनाथा॥
प्रथम कीन्हि प्रभु धनुष टँकोरा।
रिपु दल बधिर भयउ सुनि सोरा॥

अनुवाद (हिन्दी)

हातात शार्ङ्गधनुष्य व कमरेचा भाता सज्ज करून श्रीरघुनाथ शत्रुसेनेचे निर्दालन करण्यास निघाले. प्रभूंनी प्रथम धनुष्याचा टणत्कार केला. त्याचा भयानक आवाज ऐकताच शत्रुसेना बहिरी झाली.॥ १॥

मूल (चौपाई)

सत्यसंध छाँड़े सर लच्छा।
कालसर्प जनु चले सपच्छा॥
जहँ तहँ चले बिपुल नाराचा।
लगे कटन भट बिकट पिसाचा॥

अनुवाद (हिन्दी)

मग सत्यप्रतिज्ञ श्रीरामांनी एक लाख बाण सोडले. ते बाण असे सुटले की, जणू पंख असलेले काल-सर्प सुटले आहेत. जिकडे तिकडे पुष्कळ बाण सुटले व भयंकर राक्षस योद्धे कापले जाऊ लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

कटहिं चरन उर सिर भुजदंडा।
बहुतक बीर होहिं सत खंडा॥
घुर्मि घुर्मि घायल महि परहीं।
उठि संभारि सुभट पुनि लरहीं॥
लागत बान जलद जिमि गाजहिं।
बहुतक देखि कठिन सर भाजहिं॥
रुंड प्रचंड मुंड बिनु धावहिं।
धरु धरु मारु मारु धुनि गावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

पुष्कळ वीरांचे शेकडो तुकडे होत होते. घायाळ वीर घेरी येऊन जमिनीवर पडत. श्रेष्ठ योद्धे पुन्हा उठून लढू लागत. बाण लागताच ते ढगांच्या गडगडाटासारखे ओरडत. त्यांचे पाय, छाती, डोकी आणि भुजदंड कापले जात होते. बरेच राक्षस तीक्ष्ण बाण पाहूनच पळून गेले. शिर तुटलेली प्रचंड धडे धावत होती आणि ‘पकडा, पकडा, मारा, मारा’ असे म्हणत योद्धे ओरडत होते.॥ ३-४॥

दोहा

मूल (दोहा)

छन महुँ प्रभु के सायकन्हि काटे बिकट पिसाच।
पुनि रघुबीर निषंग महुँ प्रबिसे सब नाराच॥ ६८॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंच्या बाणांनी एका क्षणात भयानक राक्षसांना कापून काढले. मग ते सर्व बाण परतून श्रीरघुनाथांच्या भात्यात येऊन बसले.॥ ६८॥

मूल (चौपाई)

कुंभकरन मन दीख बिचारी।
हति छन माझ निसाचर धारी॥
भा अति क्रुद्ध महाबल बीरा।
कियो मृगनायक नाद गँभीरा॥

अनुवाद (हिन्दी)

कुंभकर्णाने मनात विचार केला की, श्रीरामांनी एका क्षणात राक्षस-सेनेचा संहार करून टाकला. तेव्हा तो महाबली वीर अत्यंत क्रुद्ध झाला आणि त्याने गंभीर सिंहनाद केला.॥ १॥

मूल (चौपाई)

कोपि महीधर लेइ उपारी।
डारइ जहँ मर्कट भट भारी॥
आवत देखि सैल प्रभु भारे।
सरन्हि काटि रज सम करि डारे॥

अनुवाद (हिन्दी)

तो रागारागाने पर्वत उपटून जिथे जिथे मोठमोठे वानर-योद्धे होते, तिथे तिथे टाकू लागला. मोठमोठे पर्वत येत असल्याचे पाहून प्रभूंनी ते बाणांनी तोडून धुळीप्रमाणे चूर चूर करून टाकले.॥ २॥

मूल (चौपाई)

पुनि धनु तानि कोपि रघुनायक।
छाँडे़ अति कराल बहु सायक॥
तनु महुँ प्रबिसि निसरि सर जाहीं।
जिमि दामिनि घन माझ समाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मग श्रीरघुनाथांनी अत्यंत क्रोधाने धनुष्य ओढून पुष्कळसे अत्यंत भयानक बाण सोडले. ते बाण कुंभकर्णाच्या शरीरात घुसून पाठीतून निघून जात होते. त्याला त्यांची जाणीवही होत नव्हती, ज्याप्रमाणे विजा ढगांमध्ये सामावून जातात त्याप्रमाणे.॥ ३॥

मूल (चौपाई)

सोनित स्रवत सोह तन कारे।
जनु कज्जल गिरि गेरु पनारे॥
बिकलबिलोकि भालु कपि धाए।
बिहँसा जबहिं निकट कपि आए॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच्या काळ्या शरीरातून रक्ताचे प्रवाह वाहात होते. काजळाच्या पर्वतातून कावेचे प्रवाह वाहावेत, असे ते शोभत होते. तो व्याकूळ झालेला पाहून अस्वले व वानर धावले. ते जवळ येताच तो हसला,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

महानाद करि गर्जा कोटि कोटि गहि कीस।
महि पटकइ गजराज इव सपथ करइ दससीस॥ ६९॥

अनुवाद (हिन्दी)

आणि त्याने भीषण आवाजाने गर्जना केली आणि कोटॺावधी वानरांना पकडून तो गजराजाप्रमाणे त्यांना पृथ्वीवर आपटू लागला आणि रावणाचा जयजयकार करू लागला.॥ ६९॥

मूल (चौपाई)

भागे भालु बलीमुख जूथा।
बृकु बिलोकि जिमि मेष बरूथा॥
चले भागि कपि भालु भवानी।
बिकल पुकारत आरत बानी॥

अनुवाद (हिन्दी)

हे पाहून अस्वले व वानरांच्या झुंडी लांडग्याला पाहून मेंढरांचे कळप पळतात, तशा पळू लागल्या. शिव म्हणतात, ‘हे भवानी, वानर व अस्वले व्याकूळ होऊन आर्त स्वराने ओरडत पळू लागले.’॥ १॥

मूल (चौपाई)

यह निसिचर दुकाल सम अहई।
कपिकुल देस परन अब चहई॥
कृपा बारिधर राम खरारी।
पाहि पाहि प्रनतारति हारी॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणू लागले, ‘हा राक्षस दुष्काळाप्रमाणे आहे. तो आता वानरकुलरूपी देशात पडू पहात आहे. हे कृपारूपी जल धारण करणाऱ्या मेघरूप श्रीराम! हे खराचे शत्रू! हे शरणागताचे दुःखहरण करणारे! रक्षण करा, रक्षण करा.’॥ २॥

मूल (चौपाई)

सकरुन बचन सुनत भगवाना।
चले सुधारि सरासन बाना॥
राम सेन निज पाछें घाली।
चले सकोप महा बलसाली॥

अनुवाद (हिन्दी)

हा करुणापूर्ण धावा ऐकताच भगवान धनुष्यबाण सज्ज करून निघाले. महाबलशाली श्रीरामांनी सेनेला आपल्या पाठीमागे घेतले आणि ते एकटे क्रोधाने निघाले.॥ ३॥

मूल (चौपाई)

खैंचि धनुष सर सत संधाने।
छूटे तीर सरीर समाने॥
लागत सर धावा रिस भरा।
कुधर डगमगत डोलति धरा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी धनुष्य ओढून शंभर बाण मारले. बाण सुटले व ते कुंभकर्णाच्या शरीरात घुसले. बाण लागताच तो रागाने धावून गेला. तो धावल्याने पर्वत डळमळू लागले आणि पृथ्वी हादरू लागली.॥ ४॥

मूल (चौपाई)

लीन्ह एक तेहिं सैल उपाटी।
रघुकुलतिलक भुजा सोइ काटी॥
धावा बाम बाहु गिरि धारी।
प्रभु सोउ भुजा काटि महि पारी॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने पर्वत उपटून घेतला. रघुकुलतिलक श्रीरामांनी त्याची भुजाच छाटून टाकली. तेव्हा तो डाव्या हातात पर्वत घेऊन धावला. प्रभूंनी त्याची ती भुजाही छाटून जमिनीवर पाडली.॥ ५॥

मूल (चौपाई)

काटें भुजा सोह खल कैसा।
पच्छहीन मंदर गिरि जैसा॥
उग्र बिलोकनि प्रभुहि बिलोका।
ग्रसन चहत मानहुँ त्रैलोका॥

अनुवाद (हिन्दी)

भुजा कापल्या गेल्यावर तो दुष्ट पंख नसलेल्या मंदराचल पर्वताप्रमाणे शोभून दिसू लागला. त्याने उग्र दृष्टीने प्रभूंना पाहिले. जणू तो तिन्ही लोकांना गिळू पहात होता.॥ ६॥

दोहा

मूल (दोहा)

करि चिक्कार घोर अति धावा बदनु पसारि।
गगन सिद्ध सुर त्रासित हा हा हेति पुकारि॥ ७०॥

अनुवाद (हिन्दी)

तो मोठॺा जोराने चीत्कार करीत तोंड पसरून धावला. आकाशामध्ये सिद्ध व देव घाबरून हाहाकार करू लागले.॥ ७०॥

मूल (चौपाई)

सभय देव करुनानिधि जान्यो।
श्रवन प्रजंत सरासनु तान्यो॥
बिसिख निकर निसिचरमुख भरेऊ।
तदपि महाबल भूमि न परेऊ॥

अनुवाद (हिन्दी)

करुणानिधान भगवंतांनी देवांना भयभीत झाल्याचे पाहिले. तेव्हा धनुष्य कानापर्यंत खेचून राक्षसाचे तोंड बाणांच्या समूहाने भरून टाकले. तरीही तो महाबली पृथ्वीवर पडला नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

सरन्हि भरा मुख सन्मुख धावा।
काल त्रोन सजीव जनु आवा॥
तब प्रभु कोपि तीब्र सर लीन्हा।
धर ते भिन्न तासु सिर कीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

तोंडात बाण भरलेल्या स्थितीत तो प्रभूंच्या समोर धावून आला. जणू कालरूपी सजीव भाता चालून येत होता. तेव्हा प्रभूंनी क्रुद्ध होऊन एक तीक्ष्ण बाण घेतला आणि त्याचे शिर धडापासून वेगळे केले.॥ २॥

मूल (चौपाई)

सो सिर परेउ दसानन आगें।
बिकल भयउ जिमि फनि मनि त्यागें॥
धरनि धसइ धर धाव प्रचंडा।
तब प्रभु काटि कीन्ह दुइ खंडा॥

अनुवाद (हिन्दी)

ते शिर रावणासमोर जाऊन पडले. ते पाहून रावण असा व्याकूळ झाला की, ज्याप्रमाणे मणी हरवल्यावर सर्प व्याकूळ होतो. तरीही कुंभकर्णाचे प्रचंड धड धावत होते, त्यामुळे पृथ्वी खचत होती. तेव्हा प्रभूंनी त्या धडाचे कापून दोन तुकडे केले.॥ ३॥

मूल (चौपाई)

परे भूमि जिमि नभ तें भूधर।
हेठ दाबि कपि भालु निसाचर॥
तासु तेज प्रभु बदन समाना।
सुर मुनि सबहिं अचंभव माना॥

अनुवाद (हिन्दी)

वानरे, अस्वले आणि निशाचरांना खाली चिरडत ते दोन्ही तुकडेपृथ्वीवर असे पडले, जसे आकाशातून दोन पर्वत पडावेत. कुंभकर्णाचे तेज श्रीरामचंद्रात सामावून गेले. हे पाहून देव व मुनी सर्वांनाच आश्चर्य वाटले.॥ ४॥

मूल (चौपाई)

सुर दुंदुभीं बजावहिं हरषहिं।
अस्तुति करहिं सुमन बहु बरषहिं॥
करि बिनती सुर सकल सिधाए।
तेही समय देवरिषि आए॥

अनुवाद (हिन्दी)

देव नगारे वाजवत, आनंदाने स्तुती करीत फुले उधळत होते. श्रीरामांचा निरोप घेऊन देव निघून गेले. त्याच वेळी देवर्षी नारद आले.॥ ५॥

मूल (चौपाई)

गगनोपरि हरि गुन गन गाए।
रुचिर बीररस प्रभु मन भाए॥
बेगि हतहु खल कहि मुनि गए।
राम समर महि सोभत भए॥

अनुवाद (हिन्दी)

आकाशातूनच त्यांनी श्रीहरींच्या सुंदर वीररसयुक्त गुणसमूहांचे गायन केले. ते प्रभूंच्या मनाला फार आवडले. नारद मुनी असे सांगून गेले की, ‘आता दुष्ट रावणाला त्वरित मारा.’ त्याचवेळी श्रीरामचंद्र रणभूमीवर येऊन उभे ठाकले.॥ ६॥

छंद

मूल (दोहा)

संग्राम भूमि बिराज रघुपति अतुल बल कोसल धनी।
श्रम बिंदु मुख राजीव लोचन अरुन तन सोनित कनी॥
भुज जुगल फेरत सर सरासन भालु कपि चहु दिसि बने।
कह दास तुलसी कहि न सक छबि सेष जेहि आनन घने॥

अनुवाद (हिन्दी)

अतुलनीय बलाचे कोसलपती श्रीरघुनाथ रणभूमीवर विराजमान झाले. मुखावर घामाचे थेंब होते, कमळासारखे त्यांचे नेत्र काहीसे लाल झाले होते. शरीरावर रक्ताचे कण होते आणि दोन्ही हातांनी ते धनुष्यबाण फिरवीत होते. चोहीकडे अस्वले व वानर शोभून दिसत होते. तुलसीदास म्हणतात की, प्रभूंच्या या सौंदर्याचे वर्णन हजार मुखांचा शेषही करू शकणार नाही.

दोहा

मूल (दोहा)

निसिचर अधम मलाकर ताहि दीन्ह निज धाम।
गिरिजा ते नर मंदमति जे न भजहिं श्रीराम॥ ७१॥

अनुवाद (हिन्दी)

शिव म्हणतात, ‘हे गिरिजे, कुंभकर्ण हा नीच राक्षस व पापाची खाण होता, त्यालाही श्रीरामांनी आपले परमधाम दिले. अशा श्रीरामांना न भजणारे मनुष्य निश्चितपणे मंदबुद्धीचे होत.॥ ७१॥

मूल (चौपाई)

दिन के अंत फिरीं द्वौ अनी।
समर भई सुभटन्ह श्रम घनी॥
राम कृपाँ कपि दल बल बाढ़ा।
जिमि तृन पाइ लाग अति डाढ़ा॥

अनुवाद (हिन्दी)

दिवस मावळल्यावर दोन्ही सेना परत गेल्या. त्या दिवशीच्या युद्धात योद्ध्यांना खूप श्रम झाले. परंतु श्रीरामांच्या कृपेने वानरसेनेचे बळ गवत मिळाल्यावर आग वाढत जाते, तसे वाढले.॥ १॥

मूल (चौपाई)

छीजहिं निसिचर दिनु अरु राती।
निज मुख कहें सुकृत जेहि भाँती॥
बहु बिलाप दसकंधर करई।
बंधु सीस पुनि पुनि उर धरई॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे स्वतःच्या तोंडाने सांगितल्यावर पुण्य कमी होते, तसे तिकडे राक्षस रात्रंदिवस कमी होत होते. रावण खूप विलाप करीत होता. वारंवार कुंभकर्णाचे शिर हृदयाशी कवटाळत होता.॥ २॥

मूल (चौपाई)

रोवहिं नारि हृदय हति पानी।
तासु तेज बल बिपुल बखानी॥
मेघनाद तेहि अवसर आयउ।
कहि बहु कथा पिता समुझायउ॥

अनुवाद (हिन्दी)

स्त्रिया कुंभकर्णाचे मोठे तेज आणि बल याची वाखाणणी करत हातांनी छाती बडवून घेत रडत होत्या, त्याचवेळी मेघनाद आला आणि त्याने बऱ्याच गोष्टी सांगून पित्याला समजावले.॥ ३॥

मूल (चौपाई)

देखेहु कालि मोरि मनुसाई।
अबहिं बहुत का करौं बड़ाई॥
इष्टदेव सैं बल रथ पायउँ।
सो बल तात न तोहि देखायउँ॥

अनुवाद (हिन्दी)

आणि म्हणाला, ‘उद्या माझा पुरुषार्थ पाहा. आत्ताच स्वतःचे मोठेपण जास्त काय सांगू ? हे तात, मी आपल्या इष्टदेवतेकडून जे बळ व रथ मिळविला होता, ते अजुनी मी तुम्हांला दाखविले नाही.’॥ ४॥

मूल (चौपाई)

एहि बिधि जल्पत भयउ बिहाना।
चहुँ दुआर लागे कपि नाना॥
इत कपि भालु काल सम बीरा।
उत रजनीचर अति रनधीरा॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे तो फुशारक्या मारीत असतानाच सकाळ झाली. लंकेच्या चारी दरवाजांवर पुष्कळ वानर येऊन उभे ठाकले. इकडे कालासारखे वीर वानर व अस्वले होती, तर तिकडे अत्यंत रणधीर राक्षस.॥ ५॥

मूल (चौपाई)

लरहिं सुभट निज निज जय हेतू।
बरनि न जाइ समर खगकेतू॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्हीकडचे योद्धे आपापल्या विजयासाठी लढत होते. काकभुशुंडी म्हणतात, ‘हे गरुडा, त्यांच्या युद्धाचे वर्णन करणे अशक्य.’॥ ६॥