१७ लक्ष्मण सावध

मूल (चौपाई)

उहाँ राम लछिमनहि निहारी।
बोले बचन मनुज अनुसारी॥
अर्ध राति गइ कपि नहिं आयउ।
राम उठाइ अनुज उर लायउ॥

अनुवाद (हिन्दी)

तिकडे लंकेमध्ये लक्ष्मणाला पहात श्रीराम सामान्य माणसाप्रमाणे बोलू लागले-‘अर्धी रात्र होऊन गेली, हनुमान अद्याप आला नाही.’ असे म्हणून श्रीरामांनी लक्ष्मणाला उचलून हृदयाशी धरले.॥ १॥

मूल (चौपाई)

सकहु न दुखित देखि मोहि काऊ।
बंधु सदा तव मृदुल सुभाऊ॥
मम हित लागि तजेहु पितु माता।
सहेहु बिपिन हिम आतप बाता॥

अनुवाद (हिन्दी)

आणि म्हणाले की, ‘हे बंधू, तू मला कधीही दुःखी पाहू शकत नव्हतास. तुझा स्वभाव नेहमीच कोमल होता. माझ्या हितासाठी तू माता-पित्याला सोडलेस आणि वनामध्ये थंडी, ऊन, वारा हे सर्व सहन केलेस.॥ २॥

मूल (चौपाई)

सो अनुराग कहाँ अब भाई।
उठहु न सुनि मम बच बिकलाई॥
जौं जनतेउँ बन बंधु बिछोहू।
पिता बचन मनतेउँ नहिं ओहू॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधू, आता ते तुझे प्रेम कुठे गेले? माझे व्याकूळ बोलणे ऐकून उठत का नाहीस? जर मला ठाऊक असते की, वनात भावाचा वियोग होणार आहे, तर परम कर्तव्य असलेले पित्याचे वचनही मी मान्य केले नसते.॥ ३॥

मूल (चौपाई)

सुत बित नारि भवन परिवारा।
होहिं जाहिं जग बारहिं बारा॥
अस बिचारि जियँ जागहु ताता।
मिलइ न जगत सहोदर भ्राता॥

अनुवाद (हिन्दी)

पुत्र, धन, स्त्री, घर आणि परिवार हे जगामध्ये वारंवार मिळतात आणि जातात. परंतु जगात सख्खा भाऊ वारंवार मिळत नाही. मनात असा विचार करून हे बंधू, जागा हो.॥ ४॥

मूल (चौपाई)

जथा पंख बिनु खग अति दीना।
मनि बिनु फनि करिबर कर हीना॥
अस मम जिवन बंधु बिनु तोही।
जौं जड़ दैव जिआवै मोही॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे पंखाविना पक्षी, मण्याविना सर्प आणि सोंडेविना श्रेष्ठ हत्ती हे अत्यंत दीन होऊन जातात, हे बंधू, जर दुर्दैवाने मला जिवंत ठेवले, तर तुझ्याविना माझे जीवनही असेच होईल.॥ ५॥

मूल (चौपाई)

जैहउँ अवध कवन मुहु लाई।
नारि हेतु प्रिय भाइ गँवाई॥
बरु अपजस सहतेउँ जग माहीं।
नारि हानि बिसेष छति नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

पत्नीसाठी प्रिय भावाला गमावल्यावर मी कोणते तोंड घेऊन अयोध्येला जाऊ? मी जगामध्ये हवी तर बदनामी सहन केली असती की, रामामध्ये शौर्य नाही, की ज्याने पत्नी गमावली. तुझ्यापुढे पत्नीला गमावणे, हे काही विशेष नाही.॥ ६॥

मूल (चौपाई)

अब अपलोकु सोकु सुत तोरा।
सहिहि निठुर कठोर उर मोरा॥
निज जननी के एक कुमारा।
तात तासु तुम्ह प्रान अधारा॥

अनुवाद (हिन्दी)

आता हे वत्सा, माझे निष्ठुर आणि कठोर हृदय हा अपवाद आणि तुझा शोक, हे दोन्हीही सहन करीत राहील. हे वत्सा, तू आपल्या आईला माझ्यासाठी सर्वस्व सोडणारा एकमात्र पुत्र आहेस आणि तिचा प्राणाधार आहेस.॥ ७॥

मूल (चौपाई)

सौंपेसि मोहि तुम्हहि गहि पानी।
सब बिधि सुखद परम हित जानी॥
उतरु काह दैहउँ तेहि जाई।
उठि किन मोहि सिखावहु भाई॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व प्रकारे सुख देणारा आणि परम हितकारी म्हणून सुमित्रा मातेने तुझा हात धरून मला सोपविले होते. आता मी जाऊन तिला काय उत्तर देऊ? हे बंधू, तू उठून मला का समजावत नाहीस?’॥ ८॥

मूल (चौपाई)

बहु बिधि सोचत सोच बिमोचन।
स्रवत सलिल राजिव दल लोचन॥
उमा एक अखंड रघुराई।
नर गति भगत कृपाल देखाई॥

अनुवाद (हिन्दी)

चिंता-मुक्त करणारे श्रीराम अनेक प्रकारे स्वतःच चिंता करीत होते. कमळाच्या पाकळी प्रमाणे असलेल्या नेत्रांतून विषादाचे अश्रु-जल वाहात होते. शिव म्हणतात, ‘हे उमा, श्रीरघुनाथ अद्वितीय व अखंड आहेत. भक्तांवर कृपा करणारे भगवान हे लीला करून मनुष्यासारखे वागत होते.’॥ ९॥

सोरठा

मूल (दोहा)

प्रभु प्रलाप सुनि कान बिकल भए बानर निकर।
आइ गयउ हनुमान जिमि करुना महँ बीर रस॥ ६१॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंनी लीला म्हणून केलेला विलाप ऐकून वानरांचे समूह व्याकूळ झाले. इतक्यात हनुमान आला. जणू करुण रसाच्या प्रसंगामध्ये वीररसाचा प्रसंग आला.॥ ६१॥

मूल (चौपाई)

हरषि राम भेटेउ हनुमाना।
अति कृतग्य प्रभु परम सुजाना॥
तुरत बैद तब कीन्हि उपाई।
उठि बैठे लछिमन हरषाई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी आनंदित होऊन हनुमानाला हृदयाशी धरले. प्रभू परम चतुर आणि अत्यंत कृतज्ञ आहेत. मग वैद्य सुषेणाने त्वरित उपाय केले. त्यामुळे लक्ष्मण प्रसन्न होऊन उठून बसला.॥ १॥

मूल (चौपाई)

हृदयँ लाइ प्रभु भेंटेउ भ्राता।
हरषे सकल भालु कपि ब्राता॥
कपि पुनि बैद तहाँ पहुँचावा।
जेहि बिधि तबहिं ताहि लइ आवा॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंनी लक्ष्मणाला हृदयाशी धरले. अस्वले व वानर यांचे समूह सर्वजण आनंदित झाले. नंतर हनुमानाने वैद्यांना पूर्वीप्रमाणेच घरी पोहोचविले.॥ २॥