११ युद्धारंभ

दोहा

मूल (दोहा)

जयति राम जय लछिमन जय कपीस सुग्रीव।
गर्जहिं सिंघनाद कपि भालु महा बल सींव॥ ३९॥

अनुवाद (हिन्दी)

बळाची परिसीमा असलेले ते वानर व अस्वले सिंहाप्रमाणे उच्च स्वराने ‘श्रीरामकी जय’, ‘लक्ष्मणकी जय’, ‘वानरराज सुग्रीवकी जय’, अशी गर्जना करू लागले.॥ ३९॥

मूल (चौपाई)

लंकाँ भयउ कोलाहल भारी।
सुना दसानन अति अहँकारी॥
देखहु बानरन्ह केरि ढिठाई।
बिहँसि निसाचर सेन बोलाई॥

अनुवाद (हिन्दी)

लंकेमध्ये मोठा गोंधळ माजला. अत्यंत अहंकारी रावणाने ते ऐकून म्हटले, ‘वानरांचे धारिष्ट्य तर पाहा.’ असे म्हणून हसत हसत त्याने राक्षसांची सेना बोलावली.॥ १॥

मूल (चौपाई)

आए कीस काल के प्रेरे।
छुधावंत सब निसिचर मेरे॥
अस कहि अट्टहास सठ कीन्हा।
गृह बैठें अहार बिधि दीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

तो म्हणाला, ‘वानर काळाच्या प्रेरणेने मरण्यासाठी आले आहेत, माझे सर्व राक्षस भुकेलेले आहेत. विधात्याने त्यांना घरबसल्या भोजन पाठवून दिले आहे.’ असे म्हणत तो मूर्ख खदखदा हसला.॥ २॥

मूल (चौपाई)

सुभट सकल चारिहुँ दिसि जाहू।
धरि धरि भालु कीस सब खाहू॥
उमा रावनहि अस अभिमाना।
जिमि टिट्टिभ खग सूत उताना॥

अनुवाद (हिन्दी)

आणि म्हणाला, ‘हे वीरांनो, सर्व जण चारी दिशांना जा आणि अस्वले-वानर या सर्वांना पकडून पकडून खाऊन टाका.’ श्रीशिव म्हणतात, ‘हे उमा, टिटवी पक्षी पाय वर करून झोपतो व मानतो की, त्याने जणू आकाशाला पाय लावले, असा अभिमान रावणाला झाला होता.’॥ ३॥

मूल (चौपाई)

चले निसाचर आयसु मागी।
गहि कर भिंडिपाल बर साँगी॥
तोमर मुद्गर परसु प्रचंडा।
सूल कृपान परिघ गिरिखंडा॥

अनुवाद (हिन्दी)

आज्ञा मागून हातामध्ये, उत्तम भिंदिपाल, बरछी, तोमर, मुद्गल, प्रचंड परशू, शूल, दुधारी तलवारी, परिघ आणि पर्वतांचे तुकडे घेऊन राक्षस निघाले.॥ ४॥

मूल (चौपाई)

जिमि अरुनोपल निकर निहारी।
धावहिं सठ खग मांस अहारी॥
चोंच भंग दुख तिन्हहि न सूझा।
तिमि धाए मनुजाद अबूझा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे मूर्ख मांसाहारी पक्षी लाल दगडांचा ढीग पाहून त्याच्यावर तुटून पडतात आणि चोच तुटल्याच्या दुःखाकडे त्यांचे लक्ष नसते, तसेच ते समज नसलेले राक्षस धावले.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

नानायुध सर चाप धर जातुधान बल बीर।
कोट कँगूरन्हि चढ़ि गए कोटि कोटि रनधीर॥ ४०॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे, धनुष्यबाण धारण केलेले कोटॺवधी बलवान आणि रणधीर राक्षस वीर तटबंदीच्या शिखरांवर चढले.॥ ४०॥

मूल (चौपाई)

कोट कँगूरन्हि सोहहिं कैसे।
मेरु के सृंगनि जनु घन बैसे॥
बाजहिं ढोल निसान जुझाऊ।
सुनि धुनि होइ भटन्हि मन चाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

ते तटबंदीच्या टोकांवर असे शोभत होते की, जणू सुमेरू पर्वतावर ढग बसले आहेत. युद्धाचे ढोल व डंके इत्यादी वाजू लागले. त्यांचा आवाज ऐकून योद्ध्यांच्या मनात चेव येत होता.॥ १॥

मूल (चौपाई)

बाजहिं भेरि नफीरि अपारा।
सुनि कादर उर जाहिं दरारा॥
देखिन्ह जाइ कपिन्ह के ठट्टा।
अति बिसाल तनु भालु सुभट्टा॥

अनुवाद (हिन्दी)

अगणित नौबती व भेरी वाजत होत्या. ते ऐकून घाबरटांच्या मनात खळगे पडत होते. त्यांनी जाऊन अत्यंत विशाल शरीराचे महान योद्धे वानर व अस्वले यांचे कळप पाहिले.॥ २॥

मूल (चौपाई)

धावहिं गनहिं न अवघट घाटा।
पर्बत फोरि करहिं गहि बाटा॥
कटकटाहिं कोटिन्ह भट गर्जहिं।
दसन ओठ काटहिं अति तर्जहिं॥

अनुवाद (हिन्दी)

अस्वले व वानर धावत होते. अवघड घाटांची त्यांना पर्वा नव्हती. पर्वतांना धरून व ते फोडून रस्ता बनवीत होते. कोटॺवधी योद्धे दात करकरवत व गर्जना करीत होते. दात-ओठ चावत होते आणि खूप चेकाळले होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

उत रावन इत राम दोहाई।
जयति जयति जय परी लराई॥
निसिचर सिखर समूह ढहावहिं।
कूदि धरहिं कपि फेरि चलावहिं॥

अनुवाद (हिन्दी)

तिकडे रावणाचा तर इकडे श्रीरामांचा जयजयकार होत होता. ‘जय, जय, जय’ चा आवाज होताच युद्ध सुरू झाले. राक्षस पर्वतांची शिखरे ढिगाने फेकीत होते. वानर ते उडॺा मारून पकडत होते आणि परत राक्षसांकडे फेकत होते.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

धरि कुधर खंड प्रचंड मर्कट भालु गढ़ पर डारहीं।
झपटहिं चरन गहि पटकि महि भजि चलत बहुरि पचारहीं॥
अति तरल तरुन प्रताप तरपहिं तमकि गढ़ चढ़ि चढ़ि गए।
कपि भालु चढ़ि मंदिरन्ह जहँ तहँ राम जसु गावत भए॥

अनुवाद (हिन्दी)

प्रचंड वानर व अस्वले पर्वतांचे तुकडे घेऊन किल्‍ल्यांवर टाकत होते. ते हल्ला करून राक्षसांचे पाय पकडून त्यांना जमिनीवर आपटून पळून जात आणि पुन्हा गर्जना करीत. फार चंचल व मोठी तेजस्वी वानर-अस्वले मोठॺा चपळाईने उडॺा मारून किल्‍ल्यावर चढली आणि जिकडे तिकडे महालात घुसून श्रीरामांची कीर्ती गाऊ लागली.

दोहा

मूल (दोहा)

एकु एकु निसिचर गहि पुनि कपि चले पराइ।
ऊपर आपु हेठ भट गिरहिं धरनि पर आइ॥ ४१॥

अनुवाद (हिन्दी)

मग एकेका राक्षसाला पकडून वानर पळून जात. स्वतः वर आणि खाली राक्षस योद्धे-अशा प्रकारे ते किल्‍ल्यावरून जमिनीवर उडॺा घेत.॥ ४१॥

मूल (चौपाई)

राम प्रताप प्रबल कपिजूथा।
मर्दहिं निसिचर सुभट बरूथा॥
चढ़े दुर्ग पुनि जहँ तहँ बानर।
जय रघुबीर प्रताप दिवाकर॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या प्रतापामुळे प्रबल वानरांच्या झुंडी राक्षस योद्ध्यांच्या अनेक समूहांना चिरडत होते. वानर पुन्हा जिकडे-तिकडे किल्‍ल्यांवर चढले आणि प्रतापसूर्य श्रीरघुवीरांचा जयजयकार करू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

चले निसाचर निकर पराई।
प्रबल पवन जिमि घन समुदाई॥
हाहाकार भयउ पुर भारी।
रोवहिं बालक आतुर नारी॥

अनुवाद (हिन्दी)

जोराचे वारे आल्यावर ढगांचे समूह जसे विखरून जातात त्याप्रमाणे राक्षसांच्या झुंडी पळू लागल्या. लंका नगरीत मोठा हाहाकार माजला. मुले व बायका घाबरून रडू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

सब मिलि देहिं रावनहि गारी।
राज करत एहिं मृत्यु हँकारी॥
निज दल बिचल सुनी तेहिं काना।
फेरि सुभट लंकेस रिसाना॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजण रावणाला शिव्या देऊ लागले की, सुखाने राज्य करीत असताना याने मृत्यूला बोलावले. जेव्हा आपली सेना विचलित झाली आहे, असे रावणाने ऐकले, तेव्हा पळत असलेल्या राक्षस-योद्ध्यांना परत पाठवून रागाने तो म्हणाला,॥ ३॥

मूल (चौपाई)

जो रन बिमुख सुना मैं काना।
सो मैं हतब कराल कृपाना॥
सर्बसु खाइ भोग करि नाना।
समर भूमि भए बल्लभ प्राना॥

अनुवाद (हिन्दी)

‘कोणी पाठ दाखवून पळाला, असे मला समजले, तर मी स्वतः भयानक दुधारी तलवारीने त्याला ठार मारीन. माझे सर्व काही खाल्ले, निरनिराळे भोग भोगले, आता युद्धात तुम्हांला प्राण प्रिय वाटू लागले काय?’॥ ४॥

मूल (चौपाई)

उग्र बचन सुनि सकल डेराने।
चले क्रोध करि सुभट लजाने॥
सन्मुख मरन बीर कै सोभा।
तब तिन्ह तजा प्रान कर लोभा॥

अनुवाद (हिन्दी)

रावणाचे टोचून बोलणे ऐकून सर्व राक्षस-वीर घाबरले आणि ओशाळून रागारागाने युद्धासाठी परत निघाले. युद्धात शत्रूसमोर मरण्यातच वीराची शोभा आहे, असा विचार करून त्यांनी प्राणांचा लोभ सोडून दिला.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

बहु आयुध धर सुभट सब भिरहिं पचारि पचारि।
ब्याकुल किए भालु कपि परिघ त्रिसूलन्हि मारि॥ ४२॥

अनुवाद (हिन्दी)

पुष्कळशी शस्त्रास्त्रे धारण करून ते सर्व वीर आरडा-ओरडा करीत भिडू लागले. त्यांनी परिघांनी व त्रिशूळांनी मार-मारून अस्वलांना, वानरांना व्याकूळ केले.॥ ४२॥

मूल (चौपाई)

भय आतुर कपि भागन लागे।
जद्यपि उमा जीतिहहिं आगे॥
कोउ कह कहँ अंगद हनुमंता।
कहँ नल नील दुबिद बलवंता॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीशिव म्हणतात, हे उमा, पुढे तेच जिंकणार असले तरी यावेळी वानर भयामुळे पळू लागले. ते म्हणू लागले, ‘अंगद व हनुमान कोठे आहेत? बलवान नल-नील आणि द्विविद कोठे आहेत?’॥ १॥

मूल (चौपाई)

निज दल बिकल सुना हनुमाना।
पच्छिम द्वार रहा बलवाना॥
मेघनाद तहँ करइ लराई।
टूट न द्वार परम कठिनाई॥

अनुवाद (हिन्दी)

हनुमानाला जेव्हा कळले की, आपली सेना भयभीत झाली आहे, त्यावेळी तो बलवान पश्चिम दारात होता. तेथे त्याच्याबरोबर मेघनाद युद्ध करीत होता. ते दार मोडत नव्हते. फार मोठी अडचण झाली होती.॥ २॥

मूल (चौपाई)

पवनतनय मन भा अति क्रोधा।
गर्जेउ प्रबल काल सम जोधा॥
कूदि लंक गढ़ ऊपर आवा।
गहि गिरि मेघनाद कहुँ धावा॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा हनुमानाला मोठा राग आला. त्या काळासारख्या योद्धॺाने मोठी गर्जना केली आणि उडी मारून तो लंकेच्या किल्‍ल्यावर आला आणि डोंगर घेऊन मेघनादावर धावून गेला.॥ ३॥

मूल (चौपाई)

भंजेउ रथ सारथी निपाता।
ताहि हृदय महुँ मारेसि लाता॥
दुसरें सूत बिकल तेहि जाना।
स्यंदन घालि तुरत गृह आना॥

अनुवाद (हिन्दी)

मेघनादाचा रथ मोडला. सारथ्याला मारून टाकले आणि मेघनादाच्या छातीवर लाथ मारली. मेघनाद व्याकूळ झालेला पाहून दुसरा सारथी रथात घालून त्याला लगेच घरी घेऊन गेला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अंगद सुना पवनसुत गढ़ पर गयउ अकेल।
रन बाँकुरा बालिसुत तरकि चढ़ेउ कपि खेल॥ ४३॥

अनुवाद (हिन्दी)

इकडे अंगदाला समजले की, हनुमान किल्‍ल्यावर एकटाच आहे, तेव्हा रणामध्ये बहादुर बालिपुत्र सहजपणे उडी मारून किल्‍ल्यावर चढला.॥ ४३॥

मूल (चौपाई)

जुद्ध बिरुद्ध क्रुद्ध द्वौ बंदर।
राम प्रताप सुमिरि उर अंतर॥
रावन भवन चढ़े द्वौ धाई।
करहिं कोसलाधीस दोहाई॥

अनुवाद (हिन्दी)

युद्धामध्ये ते दोन वानर शत्रूंवर संतापले होते. हृदयामध्ये श्रीरामांच्या प्रतापाचे स्मरण करून दोघे धावून रावणाच्या महालावर चढले आणि कोसलराज श्रीरामांचा जयजयकार करू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

कलस सहित गहि भवनु ढहावा।
देखि निसाचरपति भय पावा॥
नारि बृंद कर पीटहिं छाती।
अब दुइ कपि आए उतपाती॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी कळसासह महाल धरून पाडला. हे पाहून राक्षसराज रावण घाबरला. सर्व स्त्रिया छाती बडवून म्हणू लागल्या, ‘आता उत्पात माजवणारे दोन वानर एकदम आले आहेत.’॥ २॥

मूल (चौपाई)

कपिलीला करि तिन्हहि डेरावहिं।
रामचंद्र कर सुजसु सुनावहिं॥
पुनि कर गहि कंचन के खंभा।
कहेन्हि करिअ उतपात अरंभा॥

अनुवाद (हिन्दी)

वानरलीला करून दोघे त्यांना घाबरवू लागले आणि श्रीरामांची कीर्ती ऐकवू लागले. मग सोन्याचा खांब हातांनी धरून ते म्हणाले, ‘आता उत्पात सुरू करू या.’॥ ३॥

मूल (चौपाई)

गर्जि परे रिपु कटक मझारी।
लागे मर्दै भुज बल भारी॥
काहुहि लात चपेटन्हि केहू।
भजहु न रामहि सो फल लेहू॥

अनुवाद (हिन्दी)

गर्जना करीत शत्रूच्या सेनेत त्यांनी मधोमध उडी मारली आणि आपल्या प्रचंड भुजबलाने ते त्यांचे मर्दन करू लागले. कुणाला लाथ तर कुणाला थप्पड मारीत होते. आणि म्हणत होते, ‘तुम्ही श्रीरामांना भजत नाही, त्याचे हे फळ भोगा.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एक एक सों मर्दहिं तोरि चलावहिं मुंड।
रावन आगें परहिं ते जनु फूटहिं दधि कुंड॥ ४४॥

अनुवाद (हिन्दी)

एकाला धरून त्याला दुसऱ्यावर पाडून चिरडत होते आणि त्यांची मुंडकी मोडून फेकत होते. ती मुंडकी रावणासमोर जाऊन पडत होती. आणि दह्याच्या मडक्याप्रमाणे फुटत होती.॥ ४४॥

मूल (चौपाई)

महा महा मुखिआ जे पावहिं।
ते पद गहि प्रभु पास चलावहिं॥
कहइ बिभीषनु तिन्ह के नामा।
देहिं राम तिन्हहू निज धामा॥

अनुवाद (हिन्दी)

ते ज्या मोठमोठॺा सेनापतींना पकडत होते, त्यांचे पाय धरून त्यांना श्रीरामांकडे फेकत होते. बिभीषण त्यांचे नाव सांगे व श्रीराम त्यांना आपल्या परमधामास पाठवीत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

खल मनुजाद द्विजामिष भोगी।
पावहिं गति जो जाचत जोगी॥
उमा राम मृदुचित करुनाकर।
बयर भाव सुमिरत मोहि निसिचर॥

अनुवाद (हिन्दी)

ब्राह्मणांचे मांस खाणाऱ्या त्या नरभक्षी दुष्ट राक्षसांनाही तीच गती मिळे, जिची याचना करूनही योग्यांना जी गती सहजपणे मिळत नसे. श्रीशिव म्हणतात, ‘हे उमा, श्रीराम हे फार कोमलहृदय व करुणेची खाण आहेत. ते विचार करीत की, वैरभावाने का होईना, ते माझे स्मरण तर करतातच ना!॥ २॥

मूल (चौपाई)

देहिं परम गति सो जियँ जानी।
अस कृपाल को कहहु भवानी॥
अस प्रभु सुनि न भजहिं भ्रम त्यागी।
नर मतिमंद ते परम अभागी॥

अनुवाद (हिन्दी)

मनात असा विचार करून ते त्यांना परमगती देत होते. हे भवानी, असा कृपाळू कोण आहे ते सांग. प्रभूंचा असा स्वभाव जाणूनही जी माणसे भ्रम सोडून त्यांचे भजन करीत नाहीत, ती अत्यंत मंदबुद्धीची व परम अभागी होत’.॥ ३॥

मूल (चौपाई)

अंगद अरु हनुमंत प्रबेसा।
कीन्ह दुर्ग अस कह अवधेसा॥
लंकाँ द्वौ कपि सोहहिं कैसें।
मथहिं सिंधु दुइ मंदर जैसें॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम म्हणाले, ‘अंगद व हनुमान किल्‍ल्यात घुसले आहेत. दोन्ही वानर लंकेत विध्वंस करताना असे शोभत आहेत की, दोन मंदराचल समुद्राचे मंथन करीत आहेत.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भुज बल रिपु दल दलमलि देखि दिवस कर अंत।
कूदे जुगल बिगत श्रम आए जहँ भगवंत॥ ४५॥

अनुवाद (हिन्दी)

बाहुबळाने शत्रु-सेनेला तुडवून व तिंबून काढून दिवस सरत आल्याचे पाहून हनुमान व अंगद या दोघांनी उडॺा मारल्या व कोणतेही श्रम न झाल्यासारखे ते भगवान श्रीरामांजवळ आले.॥ ४५॥

मूल (चौपाई)

प्रभु पद कमल सीस तिन्ह नाए।
देखि सुभट रघुपति मन भाए॥
राम कृपा करि जुगल निहारे।
भए बिगतश्रम परम सुखारे॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी प्रभूंच्या चरणी मस्तक ठेवले. त्या उत्तम योद्धॺांना पाहून श्रीरघुनाथ खूप प्रसन्न झाले. श्रीरामांनी कृपापूर्वक दोघांना पाहिले. त्यामुळे त्यांचा थकवा तर गेलाच; उलट ते सुखावले.॥ १॥

मूल (चौपाई)

गए जानि अंगद हनुमाना।
फिरे भालु मर्कट भट नाना॥
जातुधान प्रदोष बल पाई।
धाए करि दससीस दोहाई॥

अनुवाद (हिन्दी)

अंगद आणि हनुमान गेल्याचे समजल्यावर अस्वले व वानर परत आले. राक्षसांनी रात्रीच्या वेळेच्या बळाचा फायदा घेऊन रावणाचा जयजयकार करीत वानरांवर हल्ला केला.॥ २॥

मूल (चौपाई)

निसिचर अनी देखि कपि फिरे।
जहँ तहँ कटकटाइ भट भिरे॥
द्वौ दल प्रबल पचारि पचारी।
लरत सुभट नहिं मानहिं हारी॥

अनुवाद (हिन्दी)

राक्षसांची सेना येत आहे, असे पाहून वानर परत फिरले आणि ते जिकडे तिकडे दात खाऊन शत्रूशी भिडले. दले अतिशय बलवान होती आणि ते समान बलाचे योद्धे होते. योद्धे आरडाओरडा करीत लढत होते, कोणी हार मानायला तयार नव्हता.॥ ३॥

मूल (चौपाई)

महाबीर निसिचर सब कारे।
नाना बरन बलीमुख भारे॥
सबल जुगल दल समबल जोधा।
कौतुक करत लरत करि क्रोधा॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व राक्षस महान वीर व काळेकुट्ट होते. आणि वानर विशालकाय आणि अनेक रंगांचे होते. दोन्ही पक्ष बलवान होते आणि समसमान बळाचे योद्धे होते. ते क्रोधाने लढून आपले शौर्य दाखवीत होते.॥ ४॥

मूल (चौपाई)

प्राबिट सरद पयोद घनेरे।
लरत मनहुँ मारुत के प्रेरे॥
अनिप अकंपन अरु अतिकाया।
बिचलत सेन कीन्हि इन्ह माया॥

अनुवाद (हिन्दी)

राक्षस व वानर युद्ध करताना असे वाटत होते की, वर्षाऋतूचे आणि शरद्ऋतूचे मेघ वाऱ्याने प्रेरित होऊन लढत आहेत. अनिप, अकंपन व अतिकाय या राक्षस सेनापतींनी आपली सेना विचलित झाल्याचे पाहून माया केली.॥ ५॥

मूल (चौपाई)

भयउ निमिष महँ अति अँधिआरा।
बृष्टि होइ रुधिरोपल छारा॥

अनुवाद (हिन्दी)

एका क्षणात अंधार झाला आणि ते रक्त, दगड व राखेचा वर्षाव करू लागले.॥ ६॥

दोहा

मूल (दोहा)

देखि निबिड़ तम दसहुँ दिसि कपिदल भयउ खभार।
एकहि एक न देखई जहँ तहँ करहिं पुकार॥ ४६॥

अनुवाद (हिन्दी)

दाही दिशांना अत्यंत दाट अंधार पाहून वानरांच्या सेनेमध्ये खळबळ माजली. कुणी कुणाला दिसत नव्हता आणि सर्वजण जिकडे तिकडे रक्षणासाठी ओरडू लागले.॥ ४६॥

मूल (चौपाई)

सकल मरमु रघुनायक जाना।
लिए बोलि अंगद हनुमाना॥
समाचार सब कहि समुझाए।
सुनत कोपि कपिकुंजर धाए॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांनी हे रहस्य जाणले. त्यांनी अंगद व हनुमान यांना बोलावून सर्व गोष्टी सांगितल्या. ते ऐकताच दोघे कपिश्रेष्ठ रागाने धावले.॥ १॥

मूल (चौपाई)

पुनि कृपाल हँसि चाप चढ़ावा।
पावक सायक सपदि चलावा॥
भयउ प्रकास कतहुँ तम नाहीं।
ग्यान उदयँ जिमि संसय जाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मग कृपाळू श्रीरामांनी हसत हसत धनुष्य सज्ज करून त्यावरून तत्काळ अग्निबाण सोडला. त्यामुळे प्रकाश झाला आणि अंधार उरला नाही. ज्याप्रमाणे ज्ञानाचा उदय झाल्यावर सर्व संदेह दूर होतात.॥ २॥

मूल (चौपाई)

भालु बलीमुख पाइ प्रकासा।
धाए हरष बिगत श्रम त्रासा॥
हनूमान अंगद रन गाजे।
हाँक सुनत रजनीचर भाजे॥

अनुवाद (हिन्दी)

अस्वले आणि वानर प्रकाश दिसताच श्रम व भय विसरून व प्रसन्न होऊन धावून गेले. हनुमान व अंगद यांनी युद्धात गर्जना केली. त्यांची हाक ऐकताच राक्षस पळून गेले.॥ ३॥

मूल (चौपाई)

भागत भट पटकहिं धरि धरनी।
करहिं भालु कपि अद्भुत करनी॥
गहि पद डारहिं सागर माहीं।
मकर उरग झष धरि धरि खाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

पळत सुटलेल्या राक्षस योद्ध्यांना अस्वले व वानर पकडून पृथ्वीवर आपटण्याची अद्भुत कामगिरी करू लागले. त्यांचे पाय पकडून ते त्यांना समुद्रात टाकून देत होते. तेथे मगरी, साप व मासे त्यांना पकडून खाऊन टाकीत होते.॥ ४॥