०८ सभेमध्ये अंगद-रावण-संवाद

मूल (चौपाई)

इहाँ प्रात जागे रघुराई।
पूछा मत सब सचिव बोलाई॥
कहहु बेगि का करिअ उपाई।
जामवंत कह पद सिरु नाई॥

अनुवाद (हिन्दी)

इकडे सुवेळ पर्वतावर प्रातःकाळी श्रीरघुनाथ जागे झाले आणि त्यांनी सर्व मंत्र्यांना बोलावून सल्ला विचारला की, ‘लवकर सांगा की, आता कोणती गोष्ट करायला हवी?’ जांबवान श्रीरामांच्या चरणी मस्तक ठेवून म्हणाला,॥ १॥

मूल (चौपाई)

सुनु सर्बग्य सकल उर बासी।
बुधि बल तेज धर्म गुन रासी॥
मंत्र कहउँ निज मति अनुसारा।
दूत पठाइअ बालि कुमारा॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे सर्वज्ञ, हे सर्वांच्या हृदयात वसणारे, हे बुद्धी, बल, तेज, धर्म आणि गुणांची खाण असलेले, प्रभू! ऐका. मी आपल्या बुद्धीप्रमाणे सल्ला देतो की, बालिकुमार अंगदाला दूत म्हणून पाठवावे.’॥ २॥

मूल (चौपाई)

नीक मंत्र सब के मन माना।
अंगद सन कह कृपानिधाना॥
बालितनय बुधि बल गुन धामा।
लंका जाहु तात मम कामा॥

अनुवाद (हिन्दी)

हा चांगला सल्ला सर्वांना पटला. कृपानिधान श्रीरामांनी अंगदाला सांगितले, ‘हे बल, बुद्धी व गुणांचे धाम असलेल्या वालिपुत्रा, बाळा, तू माझ्या कामासाठी लंकेला जा.॥ ३॥

मूल (चौपाई)

बहुत बुझाइ तुम्हहि का कहऊँ।
परम चतुर मैं जानत अहऊँ॥
काजु हमार तासु हित होई।
रिपु सन करेहु बतकही सोई॥

अनुवाद (हिन्दी)

तुुला जास्त काय सांगू? तू अतिशय चतुर आहेस, हे मला माहीत आहे. शत्रूशी अशी बोलणी कर की, आपले काम होईल आणि त्याचेही कल्याण होईल.’॥ ४॥

सोरठा

मूल (दोहा)

प्रभु अग्या धरि सीस चरन बंदि अंगद उठेउ।
सोइ गुन सागर ईस राम कृपा जा पर करहु॥ १७(क)॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंची आज्ञा शिरसावंद्य मानून आणि त्यांच्या चरणी वंदन करून अंगद उठला. तो म्हणाला, ‘हे भगवान श्रीराम, तुम्ही ज्याच्यावर कृपा करता, तो गुणांचा समुद्र बनतो.॥ १७(क)॥

मूल (दोहा)

स्वयंसिद्ध सब काज नाथ मोहि आदरु दियउ।
अस बिचारि जुबराज तन पुलकित हरषित हियउ॥ १७(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

स्वामींची सर्व कामे स्वतःच सिद्ध आहेत. मला आपल्या कामासाठी पाठवीत आहात, हा मला प्रभूंनी दिलेला आदर आहे.’ या विचाराने युवराज अंगद मनातून आनंदित झाला आणि त्याचे शरीर पुलकित झाले.॥ १७(ख)॥

मूल (चौपाई)

बंदि चरन उर धरि प्रभुताई।
अंगद चलेउ सबहि सिरु नाई॥
प्रभु प्रताप उर सहज असंका।
रन बाँकुरा बालिसुत बंका॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंच्या चरणांना वंदन करून व भगवंतांची प्रभुता मनात बाळगून अंगद सर्वांना नमस्कार करून निघाला. प्रभूंचा प्रताप हृदयात असलेला रणझुंजार वीर वालिपुत्र मुळातच निर्भय होता.॥ १॥

मूल (चौपाई)

पुर पैठत रावन कर बेटा।
खेलत रहा सो होइ गै भेटा॥
बातहिं बात करष बढ़ि आई।
जुगल अतुल बल पुनि तरुनाई॥

अनुवाद (हिन्दी)

लंकेत प्रवेश करताच त्याला रावणाचा पुत्र भेटला. तो खेळत होता. एकाएकी त्यांच्यात भांडण सुरू झाले. दोघेही अतुलनीय बलवान होते आणि दोघेही तरुण होते.॥ २॥

मूल (चौपाई)

तेहिं अंगद कहुँ लात उठाई।
गहि पद पटकेउ भूमि भवाँई॥
निसिचर निकर देखि भट भारी।
जहँ तहँ चले न सकहिं पुकारी॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने अंगदाला मारण्यास लाथ उगारली, तेव्हा अंगदाने त्याच्या पायाला धरून त्याला गरागरा फिरविले आणि जमिनीवर आदळले. राक्षसांचे समूह त्या बलवान योद्ध्यास पाहून जिकडे तिकडे पळून गेले. भीतीपोटी ओरडूही शकले नाहीत.॥ ३॥

मूल (चौपाई)

एक एक सन मरमु न कहहीं।
समुझि तासु बध चुप करि रहहीं॥
भयउ कोलाहल नगर मझारी।
आवा कपि लंका जेहिं जारी॥

अनुवाद (हिन्दी)

कुणीही दुसऱ्याला खरी गोष्ट सांगत नव्हता. त्या रावण-पुत्राचा वध झाला, असे पाहून सर्वजण गप्प होते. राक्षस भीतीने पळत आहेत, असे पाहून नगरामध्ये अफवा पसरली की, ज्याने लंका जाळली होती, तो वानर पुन्हा आला आहे.॥ ४॥

मूल (चौपाई)

अब धौं कहा करिहि करतारा।
अति सभीत सब करहिं बिचारा॥
बिनु पूछें मगु देहिं दिखाई।
जेहि बिलोक सोइ जाइ सुखाई॥

अनुवाद (हिन्दी)

ते खूप घाबरून विचार करू लागले की, दैव आता काय करणार कोणास ठाऊक! न विचारताच त्यांनी अंगदाला रावणाच्या दरबाराची वाट दाखविली. अंगद ज्याला पहात असे, तो भीतीने गळून जाई.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

गयउ सभा दरबार तब सुमिरि राम पद कंज।
सिंह ठवनि इत उत चितव धीर बीर बल पुंज॥ १८॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांच्या चरण-कमलांचे स्मरण करून अंगद रावणाच्या सभेच्या दारात आला. तो धीर, वीर आणि बलाची खाण असलेला अंगद सिंहासारखा ऐटीत इकडे तिकडे पाहू लागला.॥ १८॥

मूल (चौपाई)

तुरत निसाचर एक पठावा।
समाचार रावनहि जनावा॥
सुनत बिहँसि बोला दससीसा।
आनहु बोलि कहाँ कर कीसा॥

अनुवाद (हिन्दी)

लगेच त्याने एका राक्षसाला आपण आल्याची वार्ता सांगण्यासाठी रावणाकडे पाठविले. ते ऐकताच रावण हसून म्हणाला, ‘बोलावून आण. पाहू या, कुठला वानर आहे ते.’॥ १॥

मूल (चौपाई)

आयसु पाइ दूत बहु धाए।
कपिकुंजरहि बोलि लै आए॥
अंगद दीख दसानन बैसें।
सहित प्रान कज्जलगिरि जैसें॥

अनुवाद (हिन्दी)

आज्ञा होताच बरेच दूत धावले व वानरांमध्ये हत्तीसारखा असलेल्या अंगदाला बोलावून घेऊन गेले. बसलेल्या रावणाला पाहून अंगदाला वाटले की, जणू एखादा काजळाचा सजीव डोंगर असावा.॥ २॥

मूल (चौपाई)

भुजा बिटप सिर सृंग समाना।
रोमावली लता जनु नाना॥
मुख नासिका नयन अरु काना।
गिरि कंदरा खोह अनुमाना॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच्या भुजा वृक्षांप्रमाणे आणि शिर पर्वताच्या शिखराप्रमाणे होते. रोमावली जणू पुष्कळशा वेलींप्रमाणे होत्या. तोंड, नाक, डोळे आणि कान हे पर्वताच्या गुहा व भगदाडासारखे होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

गयउ सभाँ मन नेकु न मुरा।
बालितनय अतिबल बाँकुरा॥
उठे सभासद कपि कहुँ देखी।
रावन उर भा क्रोध बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

अत्यंत बलवान बहादूर वीर अंगद सभेमध्ये गेला. त्याच्या मनात जरासुद्धा भीती नव्हती. अंगदाला पहाताच सर्व सभासद उठून उभे राहिले. हे पाहून रावणाला फार राग आला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जथा मत्त गज जूथ महुँ पंचानन चलि जाइ।
राम प्रताप सुमिरि मन बैठ सभाँ सिरु नाइ॥ १९॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे मस्त झालेल्या हत्तींच्या कळपात सिंह निःशंकपणे चालत जातो, त्याप्रमाणे श्रीरामांच्या प्रतापाचे मनात स्मरण करून तो निर्भयपणे नमस्कार करून सभेत बसला.॥ १९॥

मूल (चौपाई)

कह दसकंठ कवन तैं बंदर।
मैं रघुबीर दूत दसकंधर॥
मम जनकहि तोहि रही मिताई।
तव हित कारन आयउँ भाई॥

अनुवाद (हिन्दी)

रावण म्हणाला, ‘अरे वानरा, तू कोण आहेस?’ अंगद म्हणाला, ‘हे दशग्रीवा, मी श्रीरघुवीरांचा दूत आहे. माझ्या पित्याची व तुमची मैत्री होती. म्हणून हे बंधू, मी तुमच्या भल्यासाठी आलो आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

उत्तम कुल पुलस्ति कर नाती।
सिव बिरंचि पूजेहु बहु भाँती॥
बर पायहु कीन्हेहु सब काजा।
जीतेहु लोकपाल सब राजा॥

अनुवाद (हिन्दी)

तुमचे कुल उत्तम आहे. तुम्ही पुलस्त्य ऋषींचे नातू आहात. तुम्ही शिव व ब्रह्मदेवांची अनेक प्रकारे पूजा केली आहे. त्यांच्याकडून वर मिळवून सर्व कार्ये सिद्ध केली आहेत. लोकपालांना आणि सर्व राजांना तुम्ही जिंकून घेतले आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

नृप अभिमान मोह बस किंबा।
हरि आनिहु सीता जगदंबा॥
अब सुभ कहा सुनहु तुम्ह मोरा।
सब अपराध छमिहि प्रभु तोरा॥

अनुवाद (हिन्दी)

राजमदामुळे किंवा मोहामुळे तुम्ही जगज्जननी सीतेला हरण करून आणले आहे. आता तुम्ही माझे हिताचे सांगणे ऐका. त्यामुळे श्रीराम तुमचे सर्व अपराध क्षमा करतील.॥ ३॥

मूल (चौपाई)

दसन गहहु तृन कंठ कुठारी।
परिजन सहित संग निज नारी॥
सादर जनकसुता करि आगें।
एहि बिधि चलहु सकल भय त्यागें॥

अनुवाद (हिन्दी)

दाती तृण धरा. (म्हणजेच गाईप्रमाणे दीन होऊन जा.) गळ्यात कुऱ्हाड घाला (म्हणजेच अभिमान सोडून जा.) आणि कुटुंबियांसह आपल्या स्त्रियांना बरोबर घेऊन, आदराने जानकीला पुढे करून सर्व प्रकारचे भय सोडून चला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

प्रनतपाल रघुबंसमनि त्राहि त्राहि अब मोहि।
आरत गिरा सुनत प्रभु अभय करैगो तोहि॥ २०॥

अनुवाद (हिन्दी)

आणि ‘हे शरणागताचे पालन करणारे रघुवंशशिरोमणी श्रीराम, माझे रक्षण करा, रक्षण करा.’ अशी आर्त प्रार्थना करा. ती आर्त हाक ऐकताच प्रभू तुमच्या सर्व अपराधांना क्षमा करतील.’॥ २०॥

मूल (चौपाई)

रे कपिपोत बोलु संभारी।
मूढ़ न जानेहि मोहि सुरारी॥
कहु निज नाम जनक कर भाई।
केहि नातें मानिऐ मिताई॥

अनुवाद (हिन्दी)

रावण म्हणाला, ‘अरे वानराच्या पोरा! सांभाळून बोल. मूर्खा, देवांचाही शत्रू असलेल्या मला तू ओळखले नाहीस? अरे बाबा! स्वतःचे आणि आपल्या बापाचे नाव तर सांग. कोणत्या नात्याने तू मैत्री जोडलीस?’॥ १॥

मूल (चौपाई)

अंगद नाम बालि कर बेटा।
तासों कबहुँ भई ही भेटा॥
अंगद बचन सुनत सकुचाना।
रहा बालि बानर मैं जाना॥

अनुवाद (हिन्दी)

अंगद म्हणाला, ‘माझे नाव अंगद आहे. मी बालीचा पुत्र आहे. त्यांच्याशी तुमची कधी भेट झाली होती काय?’ अंगदाचे बोलणे ऐकताच रावण ओशाळून गेला. आणि म्हणाला, ‘होय, मला आठवले. बाली नावाचा एक वानर होता खरा!॥ २॥

मूल (चौपाई)

अंगद तहीं बालि कर बालक।
उपजेहु बंस अनल कुल घालक॥
गर्भ न गयहु ब्यर्थ तुम्ह जायहु।
निज मुख तापस दूत कहायहु॥

अनुवाद (हिन्दी)

अरे अंगदा, तू त्याचा मुलगा होय? अरे कुलनाशका, तू आपल्या कुलरूपी वेळूसाठी अग्नीच ठरलास. गर्भातच नष्ट का झाला नाहीस? तू उगाच जन्माला आलास, जो आपल्याच तोंडून तपस्व्याचा दूत म्हणू लागलास!॥ ३॥

मूल (चौपाई)

अब कहु कुसल बालि कहँ अहई।
बिहँसि बचन तब अंगद कहई॥
दिन दस गएँ बालि पहिं जाई।
बूझेउ कुसल सखा उर लाई॥

अनुवाद (हिन्दी)

आता वालीची खुशाली सांग. हल्ली तो कुठे आहे?’ तेव्हा अंगद हसून म्हणाला, ‘दहा दिवसांनंतर स्वतःच वालीजवळ जाऊन आपल्या त्या मित्राला हृदयाशी कवटाळून त्यालाच खुशाली विचारा.॥ ४॥

मूल (चौपाई)

राम बिरोध कुसल जसि होई।
सो सब तोहि सुनाइहि सोई॥
सुनु सठ भेद होइ मन ताकें।
श्रीरघुबीर हृदय नहिं जाकें॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांशी विरोध केला असता कशी खुशाली असते, ते तोच सर्व तुम्हांला सांगेल. हे मूर्खा, भेद-नीतीचा प्रभाव ज्याच्या मनात श्रीरघुवीर नसतील, त्याच्यावर पडतो.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

हम कुल घालक सत्य तुम्ह कुल पालक दससीस।
अंधउ बधिर न अस कहहिं नयन कान तव बीस॥ २१॥

अनुवाद (हिन्दी)

मी तर कुलाचा नाश करणारा आहे, हे खरे, आणि रावणा, तू काय कुलाचा रक्षक आहेस? आंधळे-बहिरेसुद्धा असे म्हणणार नाहीत. तुला तर वीस डोळे आणि वीस कान आहेत.॥ २१॥

मूल (चौपाई)

सिव बिरंचि सुर मुनि समुदाई।
चाहत जासु चरन सेवकाई॥
तासु दूत होइ हम कुल बोरा।
अइसिहुँ मति उर बिहर न तोरा॥

अनुवाद (हिन्दी)

शिव, ब्रह्मा इत्यादी देव आणि मुनि-समाज ज्यांच्या चरणांची सेवा करू इच्छितात, त्यांचा दूत बनून मी काय कुळाला बुडवणारा झालो? अरे, असे विचार मनात येऊनही तुझे हृदय विदीर्ण होत नाही?’॥ १॥

मूल (चौपाई)

सुनि कठोर बानी कपि केरी।
कहत दसानन नयन तरेरी॥
खल तव कठिन बचन सब सहऊँ।
नीति धर्म मैं जानत अहऊँ॥

अनुवाद (हिन्दी)

अंगदाचे कठोर बोलणे ऐकून रावण डोळे वटारून म्हणाला, ‘अरे दुष्टा! मी तुझे सर्व टोचून बोलणे यासाठी सहन करीत आहे की, मी नीती आणि धर्म जाणतो.’॥ २॥

मूल (चौपाई)

कह कपि धर्मसीलता तोरी।
हमहुँ सुनी कृत पर त्रिय चोरी॥
देखी नयन दूत रखवारी।
बूड़ि न मरहु धर्म ब्रतधारी॥

अनुवाद (हिन्दी)

अंगद म्हणाला, ‘तुझी धर्मशीलता मीही ऐकून आहे. तू पर-स्त्रीला चोरलेस आणि दूताचे रक्षण केल्याचे मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. अशा धर्माचे व्रत धारण करणाऱ्या तू जीव का नाही दिलास?॥ ३॥

मूल (चौपाई)

कान नाक बिनु भगिनि निहारी।
छमा कीन्हि तुम्ह धर्म बिचारी॥
धर्मसीलता तव जग जागी।
पावा दरसु हमहुँ बड़भागी॥

अनुवाद (हिन्दी)

नाक-कान कापलेल्या बहिणीला पाहून तू धर्माचा विचार करून क्षमा केली होतीस. तुझी धर्मशीलता जग-जाहीर आहे. मी खरेच भाग्यवान, म्हणून मला तुझे दर्शन झाले.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जनि जल्पसि जड़ जंतु कपि सठ बिलोकु मम बाहु।
लोकपाल बल बिपुल ससि ग्रसन हेतु सब राहु॥ २२(क)॥

अनुवाद (हिन्दी)

रावण म्हणाला, ‘अरे मूर्ख प्राण्या, वानरा, व्यर्थ बडबड करू नकोस. अरे मूर्खा, माझ्या भुजा तर बघ. या सर्व लोकपालांच्या विशाल बलरूपी चंद्राला ग्रासणारे राहू आहेत.॥ २२(क)॥

मूल (दोहा)

पुनि नभ सर मम कर निकर कमलन्हि पर करि बास।
सोभत भयउ मराल इव संभु सहित कैलास॥ २२(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

शिवाय तू ऐकलेच असशील की, आकाशरूपी तलावामध्ये माझ्या भुजारूपी कमळांवर राहून शिवांसह कैलासपर्वत हंसासारखा शोभून दिसत होता.॥ २२(ख)॥

मूल (चौपाई)

तुम्हरे कटक माझ सुनु अंगद।
मो सन भिरिहि कवन जोधा बद॥
तव प्रभु नारि बिरहँ बलहीना।
अनुज तासु दुख दुखी मलीना॥

अनुवाद (हिन्दी)

अरे अंगदा, ऐक. तुझ्या सेनेत कोण योद्धा असा आहे की, जो माझ्याशी भिडू शकेल? तुझा स्वामी तर स्त्रीच्या वियोगामुळे दुबळा झाला आहे आणि त्याचा धाकटा भाऊ त्याच्या दुःखामुळे दुःखी व उदास आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

तुम्ह सुग्रीव कूलद्रुम दोऊ।
अनुज हमार भीरु अति सोऊ॥
जामवंत मंत्री अति बूढ़ा।
सो कि होइ अब समरारूढ़ा॥

अनुवाद (हिन्दी)

तू आणि सुग्रीव हे नदीच्या दोन्ही तटावरील वृक्ष आहात. उरला माझा लहान भाऊ. तो तर फारच भित्रा. मंत्री जांबवान फार म्हातारा आहे. तो आता लढाईला कसा तयार होणार!॥ २॥

मूल (चौपाई)

सिल्पिकर्म जानहिं नल नीला।
है कपि एक महा बलसीला॥
आवा प्रथम नगरु जेहिं जारा।
सुनत बचन कह बालिकुमारा॥

अनुवाद (हिन्दी)

नल-नील हे तर कारागीर. त्यांना लढायचे काय माहीत? हां! एक वानर नक्की महाबलवान आहे, हे खरे. तो प्रथम येथे आला होता आणि त्याने लंका जाळली होती.’ हे बोलणे ऐकताच अंगद म्हणाला.॥ ३॥

मूल (चौपाई)

सत्य बचन कहु निसिचर नाहा।
साँचेहुँ कीस कीन्ह पुर दाहा॥
रावन नगर अल्प कपि दहई।
सुनि अस बचन सत्य को कहई॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे राक्षसराज, खरे सांग. खरोखरच त्या वानराने तुझे नगर जाळले होते काय? रावणासारख्या जगद्विजयी योद्धॺाचे नगर एका छोटॺाशा वानराने जाळले, हे ऐकून ते खरे कोण म्हणेल?॥ ४॥

मूल (चौपाई)

जो अति सुभट सराहेहु रावन।
सो सुग्रीव केर लघु धावन॥
चलइ बहुत सो बीर न होई।
पठवा खबरि लेन हम सोई॥

अनुवाद (हिन्दी)

हे रावणा, ज्याला तू मोठा योद्धा मानून प्रशंसा केलीस, तो तर सुग्रीवाचा एक छोटासा धावत जाणारा निरोप्या आहे. तो फार चालतो. तो वीर नव्हे. त्याला तर आम्ही फक्त बातमी आणण्यासाठी पाठविला होता.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

सत्य नगरु कपि जारेउ बिनु प्रभु आयसु पाइ।
फिरि न गयउ सुग्रीव पहिं तेहिं भय रहा लुकाइ॥ २३(क)॥

अनुवाद (हिन्दी)

खरोखरच त्या वानराने प्रभूंच्या आज्ञेविना तुमचे नगर जाळून टाकले काय? मला वाटले, याच भीतीमुळे तो परत आल्यावर सुग्रीवाजवळ गेला नाही आणि कुठे तरी लपला आहे.॥ २३ (क)॥

मूल (दोहा)

सत्य कहहि दसकंठ सब मोहि न सुनि कछु कोह।
कोउ न हमारें कटक अस तो सन लरत जो सोह॥ २३(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे रावणा! तू सांगतोस ते सर्व खरे आहे. ते ऐकल्यावर मला राग नाही आला. खरोखरच आमच्या सेनेमध्ये असा कोणीही नाही की, जो तुझ्याशी लढण्याच्या पात्रतेचा आहे?॥ २३ (ख)॥

मूल (दोहा)

प्रीति बिरोध समान सन करिअ नीति असि आहि।
जौं मृगपति बध मेडुकन्हि भल कि कहइ कोउ ताहि॥ २३(ग)॥

अनुवाद (हिन्दी)

प्रीती व वैर बरोबरीच्याशीच केली पाहिजे, अशीच नीती आहे. सिंहाने जर बेडकांना मारले, तर त्याला कुणी शूर म्हणेल?॥ २३ (ग)॥

मूल (दोहा)

जद्यपि लघुता राम कहुँ तोहि बधें बड़ दोष।
तदपि कठिन दसकंठ सुनु छत्र जाति कर रोष॥ २३(घ)॥

अनुवाद (हिन्दी)

जरी तुला मारण्यात श्रीरामांचा कमीपणा आहे आणि त्यात मोठा दोषही आहे, तरी हे रावणा, क्षत्रिय जातीचा क्रोध फार अनावर असतो.’॥ २३(घ)॥

मूल (दोहा)

बक्र उक्ति धनु बचन सर हृदय दहेउ रिपु कीस।
प्रतिउत्तर सड़सिन्ह मनहुँ काढ़त भट दससीस॥ २३(ङ)॥

अनुवाद (हिन्दी)

वक्रोक्तिरूपी धनुष्याने वचनरूपी बाण मारून अंगदाने शत्रूच्या हृदयाचा जळफळाट केला. वीर रावण ते बाण जणू प्रत्युत्तररूपी चिमटॺाने काढत होता.॥ २३(ङ)॥

मूल (दोहा)

हँसि बोलेउ दसमौलि तब कपि कर बड़ गुन एक।
जो प्रतिपालइ तासु हित करइ उपाय अनेक॥ २३(च)॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा रावण हसून म्हणाला, ‘वानरामध्ये एक मोठा गुण आहे की,जो त्याला पाळतो, त्याचे तो अनेक उपायांनी कल्याण करण्याचा प्रयत्न करतो.॥ २३(च)॥

मूल (चौपाई)

धन्य कीस जो निज प्रभु काजा।
जहँ तहँ नाचइ परिहरि लाजा॥
नाचि कूदि करि लोग रिझाई।
पति हित करइ धर्म निपुनाई॥

अनुवाद (हिन्दी)

धन्य आहे वानराची! तो आपल्या मालकासाठी लाज सोडून कोठेही नाचतो. नाचून, उडॺा मारून लोकांना खूष करून तो मालकाचे हित करतो. ही त्याची धर्म-निपुणता आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

अंगद स्वामिभक्त तव जाती।
प्रभु गुन कस न कहसि एहि भाँती॥
मैं गुन गाहक परम सुजाना।
तव कटु रटनि करउँ नहिं काना॥

अनुवाद (हिन्दी)

हे अंगदा! तुझी जात स्वामिभक्त आहे. (तर मग) तू आपल्या मालकाचे गुण अशा प्रकारे का बरे गाणार नाहीस? मी गुणांचा आदर करणारा आणि अत्यंत समजूनदार आहे. त्यामुळेच तुझ्या या जळजळीत बडबडीकडे लक्ष देत नाही.’॥ २॥

मूल (चौपाई)

कह कपि तव गुन गाहकताई।
सत्य पवनसुत मोहि सुनाई॥
बन बिधंसि सुत बधि पुर जारा।
तदपि न तेहिं कछु कृत अपकारा॥

अनुवाद (हिन्दी)

अंगदाने म्हटले, ‘तुझी खरी गुणग्राहकता तर मला हनुमानाने सांगितली होती. त्याने अशोकवनाचा विध्वंस करून, तुझ्या पुत्राला मारून, नगर जाळले होते. तरीसुद्धा (तू तुझ्या गुणग्राहकतेमुळेच समजलास की,) त्याने तुझ्यावर काहीच अपकार केला नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

सोइ बिचारि तव प्रकृति सुहाई।
दसकंधर मैं कीन्हि ढिठाई॥
देखेउँ आइ जो कछु कपि भाषा।
तु्म्हरें लाज न रोष न माखा॥

अनुवाद (हिन्दी)

तुझा तोच सुंदर स्वभाव विचारात घेऊन हे दशग्रीवा! मी थोडी धृष्टता केली आहे. हनुमानाने जे काही सांगितले होते, ते येथे येऊन मी प्रत्यक्षच पाहिले की, तुला लाजही नाही, क्रोधही नाही आणि चीडही नाही.’॥ ४॥

मूल (चौपाई)

जौं असि मति पितु खाए कीसा।
कहि अस बचन हँसा दससीसा॥
पितहि खाइ खातेउँ पुनि तोही।
अबहीं समुझि परा कछु मोही॥

अनुवाद (हिन्दी)

रावण म्हणाला, ‘अरे वानरा! तुझी अशी बुद्धी आहे, म्हणूनच तू बापाला खाऊन टाकलेस.’ असे म्हणून रावण हसला. अंगद म्हणाला, ‘बापाला खाल्‍ल्यावर तुम्हांलाही खाल्ले असते, परंतु आता लगेच माझ्या मनात वेगळीच गोष्ट आली आहे.॥ ५॥

मूल (चौपाई)

बालि बिमल जस भाजन जानी।
हतउँ न तोहि अधम अभिमानी॥
कहु रावन रावन जग केते।
मैं निज श्रवन सुने सुनु जेते॥

अनुवाद (हिन्दी)

अरे नीच अभिमान्या, वालीच्या निर्मळ कीर्तीस पात्र झाल्याचे समजून मी तुला मारत नाही. आता हे सांग की, जगात किती रावण आहेत? मी जितके रावण कानांनी ऐकलेत, ते ऐक.॥ ६॥

मूल (चौपाई)

बलिहि जितन एक गयउ पताला।
राखेउ बाँधि सिसुन्ह हयसाला॥
खेलहिं बालक मारहिं जाई।
दया लागि बलि दीन्ह छोड़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

एक रावण तर बलीला जिंकण्यासाठी पाताळात गेला होता, तेव्हा मुलांनी त्याला पागेत बांधून घातले. मुले खेळत होती आणि जवळ जाऊन त्याला मारत होती. बळीला दया आली, तेव्हा त्याने त्याला सोडून दिले.॥ ७॥

मूल (चौपाई)

एक बहोरि सहसभुज देखा।
धाइ धरा जिमि जंतु बिसेषा॥
कौतुक लागि भवन लै आवा।
सो पुलस्ति मुनि जाइ छोड़ावा॥

अनुवाद (हिन्दी)

मग सहस्रार्जुनाने एक रावण पाहिला. त्याने धावत जाऊन एखाद्या विचित्र प्राण्यासारखे समजून त्याला पकडले. मजा म्हणून तो घरी घेऊन आला, तेव्हा पुलस्त्य मुनींनी जाऊन त्याला सोडविले.॥ ८॥

दोहा

मूल (दोहा)

एक कहत मोहि सकुच अति रहा बालि कीं काँख।
इन्ह महुँ रावन तैं कवन सत्य बदहि तजि माख॥ २४॥

अनुवाद (हिन्दी)

एका रावणाची गोष्ट सांगताना मला संकोच वाटत आहे. तो बराच वेळ वालीच्या काखेत होता. यांपैकी तू कोणता रावण? न चिडता खरेखरे सांग.’॥ २४॥

मूल (चौपाई)

सुनु सठ सोइ रावन बलसीला।
हरगिरि जान जासु भुज लीला॥
जान उमापति जासु सुराई।
पूजेउँ जेहि सिर सुमन चढ़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

रावण म्हणाला, ‘अरे मूर्खा, मी तोच रावण आहे, ज्याच्या भुजांची करामत कैलास पर्वत जाणतो, ज्याची शूरता उमापती महादेव जाणतात, ज्यांना मी आपली शिररूपी पुष्पे अर्पण करून त्यांची पूजा केली होती.॥ १॥

मूल (चौपाई)

सिर सरोज निज करन्हि उतारी।
पूजेउँ अमित बार त्रिपुरारी॥
भुज बिक्रम जानहिं दिगपाला।
सठ अजहूँ जिन्ह कें उर साला॥

अनुवाद (हिन्दी)

शिररूपी कमळे आपल्या हातांनी कापून मी अनेकदा त्रिपुरारी शिवांची पूजा केली आहे. अरे मूर्खा, माझ्या भुजांचा पराक्रम दिक्पालांना ठाऊक आहे. आजही त्यांच्या मनात तो बोचत आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

जानहिं दिग्गज उर कठिनाई।
जब जब भिरउँ जाइ बरिआई॥
जिन्ह के दसन कराल न फूटे।
उर लागत मूलक इव टूटे॥

अनुवाद (हिन्दी)

दिग्गज माझी छाती किती कठोर आहे, ते जाणतात. जेव्हा जेव्हा मी जोराने जाऊन त्यांना भिडलो, तेव्हा त्यांचे दात माझ्या छातीवर व्रणसुद्धाकरू शकले नाहीत. उलट माझ्या छातीला ते लागताच मुळ्याप्रमाणे तुटून गेले.॥ ३॥

मूल (चौपाई)

जासु चलत डोलति इमि धरनी।
चढ़त मत्त गज जिमि लघु तरनी॥
सोइ रावन जग बिदित प्रतापी।
सुनेहि न श्रवन अलीक प्रलापी॥

अनुवाद (हिन्दी)

मी चालतो तेव्हा पृथ्वी हादरते, ज्याप्रमाणे छोटॺा नावेत मस्त झालेला हत्ती चढतो तेव्हा ती डगमगते. मीच तो जगप्रसिद्ध प्रतापी रावण आहे. अरे, खोटी बकबक करणाऱ्या, तू कधी आपल्या कानांनी माझ्याबद्दल ऐकले नाहीस काय?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तेहि रावन कहँ लघु कहसि नर कर करसि बखान।
रे कपि बर्बर खर्ब खल अब जाना तव ग्यान॥ २५॥

अनुवाद (हिन्दी)

त्या महान प्रतापी व जगप्रसिद्ध मज रावणाला छोटा म्हणतोस? आणि माणसाला मोठा म्हणतोस? अरे दुष्टा, असभ्य व क्षुद्र माकडा, आता मला तुझे शहाणपण समजले.’॥ २५॥

मूल (चौपाई)

सुनि अंगद सकोप कह बानी।
बोलु सँभारि अधम अभिमानी॥
सहसबाहु भुज गहन अपारा।
दहन अनल सम जासु कुठारा॥

अनुवाद (हिन्दी)

रावणाचे हे बोलणे ऐकून अंगद रागाने म्हणाला, ‘अरे नीच गर्विष्ठा, सांभाळून बोल. ज्याचा परशू सहस्रबाहूच्या भुजारूपी अपार वनास जाळण्यासाठी अग्नीप्रमाणे होता,॥ १॥

मूल (चौपाई)

जासु परसु सागर खर धारा।
बूड़े नृप अगनित बहु बारा॥
तासु गर्ब जेहि देखत भागा।
सो नर क्यों दससीस अभागा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याच्या परशुरूपी समुद्राच्या प्रचंड प्रवाहामध्ये अगणित राजे अनेक वेळा बुडून गेले, त्या परशुरामांचा गर्व ज्यांना पहाताच गळून गेला, अरे अभागी दशमुखा! ते मनुष्य कसे असतील?॥ २॥

मूल (चौपाई)

राम मनुज कस रे सठ बंगा।
धन्वी कामु नदी पुनि गंगा॥
पसु सुरधेनु कल्पतरु रूखा।
अन्न दान अरु रस पीयूषा॥

अनुवाद (हिन्दी)

अरे मूर्ख उन्मत्ता! ते श्रीरामचंद्र काय मनुष्य आहेत? कामदेव हा काय सामान्य धनुर्धारी आहे? आणि गंगा ही सामान्य नदी आहे काय? कामधेनू ही सामान्य गाय आहे काय? कल्पवृक्ष सामान्य झाड आहे काय? अन्नदान हे दान आहे काय? आणि अमृत हा रस आहे काय?॥ ३॥

मूल (चौपाई)

बैनतेय खग अहि सहसानन।
चिंतामनि पुनि उपल दसानन॥
सुनु मतिमंद लोक बैकुंठा।
लाभ कि रघुपति भगति अकुंठा॥

अनुवाद (हिन्दी)

गरुड हा काय सामान्य पक्षी आहे? शेष काय साधा सर्प आहे? अरे रावणा! चिंतामणीसुद्धा साधा दगड आहे काय? अरे मूर्खा, आणखी ऐक. वैकुंठसुद्धा सामान्य लोक आहे काय? श्रीरघुनाथांची अखंड भक्ती म्हणजे साधा लाभ आहे काय?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सेन सहित तव मान मथि बन उजारि पुर जारि।
कस रे सठ हनुमान कपि गयउ जो तव सुत मारि॥ २६॥

अनुवाद (हिन्दी)

सेनेसह तुझा मान मर्दन करून, अशोकवन उध्वस्त करून आणि तुझ्या पुत्राला मारून लंका नगरी जाळून जो परत गेला, ज्याचे तू काहीही वाकडे करू शकला नाहीस, अरे दुष्टा, तो हनुमान साधा वानर आहे काय?॥ २६॥

मूल (चौपाई)

सुनु रावन परिहरि चतुराई।
भजसि न कृपासिंधु रघुराई॥
जौं खल भएसि राम कर द्रोही।
ब्रह्म रुद्र सक राखि न तोही॥

अनुवाद (हिन्दी)

अरे रावणा, आपले मोठेपण सोडून देऊन ऐक. कृपेचे समुद्र असलेल्या प्रभू श्रीरघुनाथांचे तू भजन का करीत नाहीस? अरे दुष्टा, तू श्रीरामांचा वैरी झालास, तर तुला ब्रह्मदेव व रुद्रसुद्धा वाचवू शकणार नाहीत.॥ १॥

मूल (चौपाई)

मूढ़ बृथा जनि मारसि गाला।
राम बयर अस होइहि हाला॥
तव सिर निकर कपिन्ह के आगें।
परिहहिं धरनि राम सर लागें॥

अनुवाद (हिन्दी)

हे मूढा, फुकटची घमेंड मिरवू नकोस. श्रीरामांशी वैर केल्याने तुझी स्थिती अशी होईल की, तुझी मुंडकी श्रीरामांचे बाण लागताच वानरांसमोर जमिनीवर पडतील॥ २॥

मूल (चौपाई)

ते तव सिर कंदुक सम नाना।
खेलिहहिं भालु कीस चौगाना॥
जबहिं समर कोपिहि रघुनायक।
छुटिहहिं अति कराल बहु सायक॥

अनुवाद (हिन्दी)

आणि अस्वले व वानरे तुझी ती मुंडकी चेंडूप्रमाणे उडवून चेंडूचा खेळ खेळतील. जेव्हा श्रीरघुनाथ युद्ध करतील आणि त्यांचे पुष्कळ अत्यंत तीक्ष्ण बाण सुटतील,॥ ३॥

मूल (चौपाई)

तब कि चलिहिअस गाल तुम्हारा।
अस बिचारि भजु राम उदारा॥
सुनत बचन रावन परजरा।
जरत महानल जनु घृत परा॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा तुझी अशी वटवट चालेल? असा विचार करून कृपाळू श्रीरामांना भज.’ अंगदाचे हे बोलणे ऐकून रावणाच्या अंगाची लाही लाही झाली. जणू जळणाऱ्या प्रचंड आगीमध्ये तूप पडले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कुंभकरन अस बंधु मम सुत प्रसिद्ध सक्रारि।
मोेर पराक्रम नहिं सुनेहि जितेउँ चराचर झारि॥ २७॥

अनुवाद (हिन्दी)

तो म्हणाला, ‘अरे मूर्खा, कुंभकर्णासारखा माझा भाऊ आहे, इंद्राला जिंकणारा सुप्रसिद्ध मेघनाद माझा पुत्र आहे आणि माझा पराक्रम तर तू ऐकलाच नाहीस की, मी संपूर्ण चराचर जग जिंकून घेतले आहे.॥ २७॥

मूल (चौपाई)

सठ साखामृग जोरि सहाई।
बाँधा सिंधु इहइ प्रभुताई॥
नाघहिं खग अनेक बारीसा।
सूर न होहिं ते सुनु सब कीसा॥

अनुवाद (हिन्दी)

अरे दुष्टा, वानरांची मदत घेऊन तुझ्या स्वामींनी समुद्राला बांध घातला.हाच काय तो त्यांचा मोठेपणा! समुद्र तर अनेक पक्षी ओलांडून जातात, परंतु त्यामुळे ते सर्व काही शूरवीर ठरत नाहीत. अरे मूर्ख माकडा, ऐक.॥ १॥

मूल (चौपाई)

मम भुज सागर बल जल पूरा।
जहँ बूड़े बहु सुर नर सूरा॥
बीस पयोधि अगाध अपारा।
को अस बीर जो पाइहि पारा॥

अनुवाद (हिन्दी)

माझा एक एक भुजारूपी समुद्र बलरूपी जलाने भरलेला आहे.त्यामध्ये पुष्कळसे शूर देव व मनुष्य बुडाले आहेत. सांग, माझ्या या अथांग व अपार वीस भुजांच्या समुद्रांना ओलांडेल असा कोण शूर आहे?॥ २॥

मूल (चौपाई)

दिगपालन्ह मैं नीर भरावा।
भूप सुजस खल मोहि सुनावा॥
जौं पै समर सुभट तव नाथा।
पुनि पुनि कहसि जासु गुन गाथा॥

अनुवाद (हिन्दी)

अरे दुष्टा, मी दिक्पालांना पाणी भरायला लावले आणि तू एका राजाची कीर्ती मला सांगतोस? ज्याचे गुणगान तू वारंवार सांगत आहेस, तो तुझा मालक युद्धात लढणारा योद्धा आहे, ॥ ३॥

मूल (चौपाई)

तौ बसीठ पठवत केहि काजा।
रिपु सन प्रीति करत नहिं लाजा॥
हरगिरि मथन निरखु मम बाहू।
पुनि सठ कपि निज प्रभुहि सराहू॥

अनुवाद (हिन्दी)

तर त्याने दूत कशाला पाठवला आहे? शत्रूशी तह करताना त्याला लाज वाटत नाही? प्रथम कैलासाचे मंथन करणाऱ्या माझ्या भुजांकडे बघ. मग हे मूर्ख वानरा! आपल्या मालकाची प्रशंसा कर.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सूर कवन रावन सरिस स्वकर काटि जेहिं सीस।
हुने अनल अति हरष बहु बार साखि गौरीस॥ २८॥

अनुवाद (हिन्दी)

रावणासारखा वीर आहे कोण? त्याने आपलीच शिरे तोडून अत्यंत आनंदाने अनेक वेळा अग्नीमध्ये होम केलेली आहेत. गौरीपती शिव हे या गोष्टीला साक्ष आहेत.॥ २८॥

मूल (चौपाई)

जरत बिलोकेउँ जबहिं कपाला।
बिधि के लिखे अंक निज भाला॥
नर कें कर आपन बध बाँची।
हसेउँ जानि बिधि गिरा असाँची॥

अनुवाद (हिन्दी)

मस्तके जळत असताना मी आपल्या ललाटावर लिहिलेली विधात्याची अक्षरे पाहिली, तेव्हा ‘मनुष्याच्या हातून माझा मृत्यू होणार’ हे वाचून विधात्याची ती अक्षरे असत्य समजून मी हसलो.॥ १॥

मूल (चौपाई)

सोउ मन समुझि त्रास नहिं मोरें।
लिखा बिरंचि जरठ मति भोरें॥
आन बीर बल सठ मम आगें।
पुनि पुनि कहसि लाज पति त्यागें॥

अनुवाद (हिन्दी)

ती गोष्ट समजल्यावरही माझ्या मनाला भय वाटले नाही. मला वाटते की, म्हाताऱ्या ब्रह्मदेवाने बुद्धिभ्रम झाल्यामुळे असे लिहिले आहे. अरे मूर्खा, तू लाज आणि मर्यादा सोडून माझ्यासमोर वारंवार दुसऱ्या वीराचे बल काय सांगतोस?’॥ २॥

मूल (चौपाई)

कह अंगद सलज्ज जग माहीं।
रावन तोहि समान कोउ नाहीं॥
लाजवंत तव सहज सुभाऊ।
निज मुख निज गुन कहसि न काऊ॥

अनुवाद (हिन्दी)

अंगद म्हणाला, ‘अरे रावणा, तुझ्यासारखा लज्जावान जगात कोणी नाही. लाज हा तर तुझा सहज स्वभाव आहे. तू आपल्या तोंडाने आपले गुण कधी सांगत नाहीस.॥ ३॥

मूल (चौपाई)

सिर अरु सैल कथा चित रही।
ताते बार बीस तैं कही॥
सो भुजबल राखेहु उर घाली।
जीतेहु सहसबाहु बलि बाली॥

अनुवाद (हिन्दी)

शिरे तोडणे आणि कैलास पर्वत उचलल्याची गोष्ट तुझ्या मनात ठसली आहे. म्हणून ती तू वीस एक वेळा सांगितलीस. परंतु तू ज्या भुजांनी सहस्रबाहू व वालीला जिंकलेस, ते आपल्या भुजांचे बळ मनातून टाळलेस.॥ ४॥

मूल (चौपाई)

सुनु मतिमंद देहि अब पूरा।
काटें सीस कि होइअ सूरा॥
इंद्रजालि कहुँ कहिअ न बीरा।
काटइ निज कर सकल सरीरा॥

अनुवाद (हिन्दी)

अरे मंदबुद्धीच्या, आता पुरे कर. शिर तोडल्याने कुणी शूरवीर होते काय? जादुगाराने जरी आपल्या हातांनी आपले शरीर कापले तरी, जादू करणाऱ्याला काही वीर म्हणता येत नाही.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

जरहिं पतंग मोह बस भार बहहिं खर बृंद।
ते नहिं सूर कहावहिं समुझि देखु मतिमंद॥ २९॥

अनुवाद (हिन्दी)

अरे मूढा!, समजून घे. पतंग कीटक मोहामुळे आगीत जळून मरतात, गाढवांचे तांडे ओझे घेऊन चालतात, परंतु तेवढॺाने त्यांना कोणी शूर म्हणत नाहीत.॥ २९॥

मूल (चौपाई)

अब जनि बत बढ़ाव खल करही।
सुनु मम बचन मान परिहरही॥
दसमुख मैं न बसीठीं आयउँ।
अस बिचारि रघुबीर पठायउँ॥

अनुवाद (हिन्दी)

अरे दुष्टा, आता बडबड करू नकोस, माझे म्हणणे ऐक आणि ताठा सोडून दे. हे दशमुखा, मी दूताप्रमाणे तह करायला आलो नाही. श्रीरघुवीरांनी असा विचार करून मला पाठविले आहे की,॥ १॥

मूल (चौपाई)

बार बार अस कहइ कृपाला।
नहिं गजारि जसु बधें सृकाला॥
मन महुँ समुझि बचन प्रभु केरे।
सहेउँ कठोर बचन सठ तेरे॥

अनुवाद (हिन्दी)

कृपाळू श्रीराम वारंवार असे म्हणतात की, कोल्ह्याला मारल्याने सिंहाला कीर्ती मिळत नाही. अरे मूर्खा, प्रभूंचे म्हणणे मनापासून समजून घेऊनच मी तुझे कठोर बोलणे ऐकून घेतले.॥ २॥

मूल (चौपाई)

नाहिं त करि मुख भंजन तोरा।
लै जातेउँ सीतहि बरजोरा॥
जानेउँ तव बल अधम सुरारी।
सूनें हरि आनिहि परनारी॥

अनुवाद (हिन्दी)

नाही तर तुझे तोंड तोडून सीतेला बळेच नेले असते. अरे अधमा, देवांच्या शत्रो, एकटी असताना परस्त्रीला तू चोरून आणलेस, तेव्हाच मी तुझे बळ जाणले.॥ ३॥

मूल (चौपाई)

तैं निसिचरपति गर्ब बहूता।
मैं रघुपति सेवक कर दूता॥
जौं न राम अपमानहि डरऊँ।
तोहि देखत अस कौतुक करऊँ॥

अनुवाद (हिन्दी)

तू राक्षसांचा राजा आणि मोठा अहंकारी आहेस, परंतु मी श्रीरघुनाथांचा सेवक सुग्रीव याचा सेवक आहे. तर मी यात श्रीरामांचा अपमान होईल, म्हणून घाबरत नसतो, तर तुझ्या डोळ्यांसमोर अशी फजिती केली असती की,॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तोहि पटकि महि सेन हति चौपट करि तव गाउँ।
तव जुबतिन्ह समेत सठ जनकसुतहि लै जाउँ॥ ३०॥

अनुवाद (हिन्दी)

तुला जमिनीवर आपटून, तुझ्या सेनेचा संहार करून आणि तुझे गाव नष्ट भ्रष्ट करून, अरे मूर्खा! तुझ्या स्त्रियांसह जानकीला घेऊन गेलो असतो.॥ ३०॥

मूल (चौपाई)

जौं अस करौं तदपि न बड़ाई।
मुएहि बधें नहिं कछु मनुसाई॥
कौल कामबस कृपिन बिमूढ़ा।
अति दरिद्र अजसी अति बूढ़ा॥

अनुवाद (हिन्दी)

जरी मी असे केले तरीही त्यात माझा काही मोठेपणा नाही. मेलेल्याला मारण्यात काहीही बहादुरी नाही. वागमार्गी, कामी, कंजूष, अत्यंत मूढ, अत्यंत दरिद्री बदनाम आणि म्हातारा,॥ १॥

मूल (चौपाई)

सदा रोगबस संतत क्रोधी।
बिष्नु बिमुख श्रुति संत बिरोधी॥
तनु पोषक निंदक अघ खानी।
जीवत सव सम चौदह प्रानी॥

अनुवाद (हिन्दी)

नेहमी रोगी असणारा, नित्य संतापणारा, भगवान विष्णूंना विन्मुख,वेद आणि संत-विरोधी, आपलेच शरीर पोसणारा, दुसऱ्याची निंदा करणारा आणि मोठा पापी, हे चौदा प्राणी जिवंतपणीच मेल्याप्रमाणे असतात.॥ २॥

मूल (चौपाई)

अस बिचारि खल बधउँ न तोही।
अब जनि रिस उपजावसि मोही॥
सुनि सकोप कह निसिचर नाथा।
अधर दसन दसि मीजत हाथा॥

अनुवाद (हिन्दी)

अरे दुष्टा, या विचाराने मी तुला मारत नाही. आता तू माझा क्रोध वाढवू नकोस.’ अंगदाचे बोलणे ऐकून राक्षसराज दात-ओठ खात, क्रुद्ध होऊन हात चोळत म्हणाला,॥ ३॥

मूल (चौपाई)

रे कपि अधम मरन अब चहसी।
छोटे बदन बात बड़ि कहसी॥
कटु जल्पसि जड़ कपि बल जाकें।
बल प्रताप बुधि तेज न ताकें॥

अनुवाद (हिन्दी)

‘अरे नीच माकडा, आता तुला मरायची इच्छा झाली आहे. म्हणून लहान तोंडी मोठा घास घेत आहेस. अरे मूर्ख माकडा, ज्याच्या बळावर तू कडवट बोलत आहेस, त्याच्यामध्ये बळ, प्रताप, बुद्धी व तेज हे काहीही नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अगुन अमान जानि तेहि दीन्ह पिता बनबास।
सो दुख अरु जुबती बिरह पुनि निसि दिन मम त्रास॥ ३१(क)॥

अनुवाद (हिन्दी)

तो गुणहीन आणि मानहीन आहे, असे समजूनच पित्याने त्याला वनवास दिला. त्याला स्वतःचे दुःख, त्यावर तरुण पत्नीचा विरह आणि शिवाय रात्रंदिवस माझी भीती आहे.॥ ३१(क)॥

मूल (दोहा)

जिन्ह के बल कर गर्ब तोहि अइसे मनुज अनेक।
खाहिं निसाचर दिवस निसि मूढ़ समुझु तजि टेक॥ ३१(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याच्या बळावर तुला गर्व आहे, अशा अनेक मनुष्यांना राक्षस रात्रंदिवस खात असतात. अरे मूढा, हट्ट सोडून विचार कर.’॥ ३१(ख)॥

मूल (चौपाई)

जब तेहिं कीन्हि राम कै निंदा।
क्रोधवंत अति भयउ कपिंदा॥
हरि हर निंदा सुनइ जो काना।
होइ पाप गोघात समाना॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा रावणाने श्रीरामांची निंदा केली, तेव्हा कपिश्रेष्ठ अंगद अत्यंत क्रुद्ध झाला. कारण शास्त्रे असे म्हणतात की, आपल्या कानांनी भगवान विष्णू आणि शिव यांची निंदा ऐकणे, हे गोवधाच्या पापासारखे असते.॥ १॥

मूल (चौपाई)

कटकटान कपिकुंजर भारी।
दुहु भुजदंड तमकि महि मारी॥
डोलत धरनि सभासद खसे।
चले भाजि भय मारुत ग्रसे॥

अनुवाद (हिन्दी)

वानरश्रेष्ठ अंगदाने मोठॺा जोराने दात खाल्ले आणि आवेशाने आपले भुजदंड पृथ्वीवर आपटले. पृथ्वी हादरली आणि आसनांवर बसलेले सभासद पडले आणि भयरूपी भुताने ग्रस्त होऊन पळाले.॥ २॥

मूल (चौपाई)

गिरत सँभारि उठा दसकंधर।
भूतल परे मुकुट अति सुंदर॥
कछु तेहिं लै निज सिरन्हि सँवारे।
कछु अंगद प्रभु पास पबारे॥

अनुवाद (हिन्दी)

रावण पडता-पडता वाचला. त्याचे अत्यंत सुंदर मुकुट जमिनीवर पडले. काही त्याने उचलून आपल्या डोक्यावर व्यवस्थित बसविले आणि अंगदाने काही उचलून प्रभू श्रीरामांकडे फेकून दिले.॥ ३॥

मूल (चौपाई)

आवत मुकुट देखि कपि भागे।
दिनहीं लूक परन बिधि लागे॥
की रावन करि कोप चलाए।
कुलिस चारि आवत अति धाए॥

अनुवाद (हिन्दी)

मुकुट येताना पाहून वानर पळू लागले. ते विचार करू लागले की, हे विधात्या, दिवसाही उल्कापात होऊ लागला काय? अथवा रावणाने रागारागाने चार वज्रे फेकली काय की, जी वेगाने येत आहेत?॥ ४॥

मूल (चौपाई)

कह प्रभु हँसि जनि हृदयँ डेराहू।
लूक न असनि केतु नहिं राहू॥
ए किरीट दसकंधर केरे।
आवत बालितनय के प्रेरे॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंनी हसत म्हटले, ‘घाबरू नका. या उल्का नव्हेत, वज्र नव्हे आणि केतू किंवा राहूही नव्हे. अरे बाबांनो! हे रावणाचे मुकुट आहेत. अंगदाने फेकले होते, ते येत आहेत.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

तरकि पवनसुत कर गहे आनि धरे प्रभु पास।
कौतुक देखहिं भालु कपि दिनकर सरिस प्रकास॥ ३२(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हनुमानाने उडी मारून ते हातांनी पकडले आणि प्रभूंजवळ आणून ठेवले. अस्वल व वानर मजा पाहू लागले. मुकुटांचा प्रकाश सूर्यासारखा होता.॥ ३२(क)॥

मूल (दोहा)

उहाँ सकोपि दसानन सब सन कहत रिसाइ।
धरहु कपिहि धरि मारहु सुनि अंगद मुसुकाइ॥ ३२(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

रावण सभेत रागाने सर्वांना म्हणाला, ‘माकडाला पकडा आणि मारून टाका.’ हे ऐकून अंगद हसू लागला.॥ ३२(ख)॥

मूल (चौपाई)

एहि बधि बेगि सुभट सब धावहु।
खाहु भालु कपि जहँ जहँ पावहु॥
मर्कटहीन करहु महि जाई।
जिअत धरहु तापस द्वौ भाई॥

अनुवाद (हिन्दी)

रावण पुढे म्हणाला, ‘याला मारून सर्व योद्धे त्वरित धावा आणि जिथे कुठे अस्वल व वानर दिसेल, तिथे त्याला खाऊन टाका. पृथ्वी वानररहित करा आणि जाऊन त्या दोघा तपस्व्यांना जिवंत पकडून आणा.’॥ १॥

मूल (चौपाई)

पुनि सकोप बोलेउ जुबराजा।
गाल बजावत तोहि न लाजा॥
मरु गर काटि निलज कुलघाती।
बल बिलोकि बिहरति नहिं छाती॥

अनुवाद (हिन्दी)

रावणाचे रागाने बोललेले शब्द ऐकून युवराज अंगद संतापून म्हणाला, ‘बकबक करायला तुला लाज वाटत नाही? अरे निर्लज्जा, अरे कुलनाशका, गळा कापून घेऊन आत्महत्या कर. माझे बळ पाहूनही तुझी छाती विदीर्ण होत नाही काय?॥ २॥

मूल (चौपाई)

रे त्रिय चोर कुमारग गामी।
खल मल रासि मंदमति कामी॥
सन्यपात जल्पसि दुर्बादा।
भएसि कालबस खल मनुजादा॥

अनुवाद (हिन्दी)

अरे स्त्रीचोरा, अरे कुमार्गावर चालणाऱ्या, अरे दुष्टा, पापांच्या ढिगा, मंदबुद्धी आणि कामातुर तू वात झाल्याप्रमाणे कशाला भल भलते बरळत आहेस? अरे दुष्ट राक्षसा, तू काळाच्या तोंडी आहेस.॥ ३॥

मूल (चौपाई)

याको फलु पावहिगो आगें।
बानर भालु चपेटन्हि लागें॥
रामु मनुज बोलत असि बानी।
गिरहिं न तव रसना अभिमानी॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर जेव्हा वानर व अस्वले तुला बदडतील, तेव्हा तुला याचे फळ मिळेल. श्रीराम मनुष्य आहेत, असे म्हणताना अरे गर्विष्ठा, तुझ्या जिभा का झडल्या नाहीत?॥ ४॥

मूल (चौपाई)

गिरिहहिं रसना संसय नाहीं।
सिरन्हि समेत समर महि माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

तुझ्या जिभा डोक्यांबरोबरच रणभूमीत पडतील, यात काही शंका नाही.॥ ५॥

सोरठा

मूल (दोहा)

सो नर क्यों दसकंध बालि बध्यो जेहिं एक सर।
बीसहुँ लोचन अंध धिग तव जन्म कुजाति जड़॥ ३३(क)॥

अनुवाद (हिन्दी)

अरे दशकंधरा! ज्याने एकाच बाणाने वालीला मारले, तो मनुष्य कसा असेल? अरे कुजातीच्या मूर्खा! वीस डोळे असूनही तू आंधळा आहेस. तुझ्या जन्माचा धिक्कार असो.॥ ३३(क)॥

मूल (दोहा)

तव सोनित कीं प्यास तृषित राम सायक निकर।
तजउँ तोहि तेहि त्रास कटु जल्पक निसिचर अधम॥ ३३(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांचे बाणसमूह तुझ्या रक्ताचे पिपासू आहेत. ते तहानलेले राहू नयेत, या भीतीने अरे कटू बडबड करणाऱ्या नीच राक्षसा, मी तुला सोडून देतो.॥ ३३(ख)॥

मूल (चौपाई)

मैं तव दसन तोरिबे लायक।
आयसु मोहि न दीन्ह रघुनायक॥
असि रिस होति दसउ मुख तोरौं।
लंका गहि समुद्र महँ बोरौं॥

अनुवाद (हिन्दी)

तुझे दात तोडायला मी समर्थ आहे, पण काय करू? श्रीरामांची मला आज्ञा नाही. मला असा क्रोध येतोय की, तुझी दाही तोंडे फोडून टाकावीत आणि तुझी लंका उचलून समुद्रात फेकून द्यावी.॥ १॥

मूल (चौपाई)

गूलरि फल समान तव लंका।
बसहु मध्य तुम्ह जंतु असंका॥
मैं बानर फल खात न बारा।
आयसु दीन्ह न राम उदारा॥

अनुवाद (हिन्दी)

तुझी लंका उंबराच्या फळासारखी आहे. तुम्ही सर्व त्यातील किडे आहात आणि अज्ञानामुळे निर्भयपणे तिथे रहात आहात. मी वानर आहे. मला हे फळ खायला कितीसा वेळ लागला असता? परंतु कृपाळू श्रीरामचंद्रांनी तशी मला आज्ञा दिलेली नाही.’॥ २॥

मूल (चौपाई)

जुगुति सुनत रावन मुसुकाई।
मूढ़ सिखिहि कहँ बहुत झुठाई॥
बालि न कबहुँ गाल अस मारा।
मिलि तपसिन्ह तैं भएसि लबारा॥

अनुवाद (हिन्दी)

अंगदाची युक्ती ऐकून रावण हसला आणि म्हणाला, ‘अरे मूर्खा, खोटे बोलायला तू कुठून शिकलास? वाली कधी अशा गप्पा मारत नव्हता. असे वाटते की, तपस्व्यांना भेटल्यामुळे तू लबाड झाला आहेस.’॥ ३॥

मूल (चौपाई)

साँचेहुँ मैं लबार भुज बीहा।
जौं न उपारिउँ तव दस जीहा॥
समुझि राम प्रताप कपि कोपा।
सभा माझ पन करि पद रोपा॥

अनुवाद (हिन्दी)

अंगद म्हणाला, ‘अरे वीस भुजांच्या! जर तुझ्या दहाही जिभा मी उपटून टाकल्या नाही, तर मी खरोखर लबाड ठरेन.’ श्रीरामचंद्रांचा प्रताप आठवताच अंगद क्रुद्ध झाला आणि त्याने रावणाच्या सभेत प्रतिज्ञापूर्वक जमिनीवर पाय रोवला.॥ ४॥

मूल (चौपाई)

जौं मम चरन सकसि सठ टारी।
फिरहिं रामु सीता मैं हारी॥
सुनहु सुभट सब कह दससीसा।
पद गहि धरनि पछारहु कीसा॥

अनुवाद (हिन्दी)

आणि तो म्हणाला, ‘अरे मूर्खा, जर तू माझा पाय हलवू शकलास, तर श्रीराम परत जातील आणि मी सीतेला गमावून बसेन.’ रावण म्हणाला, ‘हे सर्व वीरांनो, ऐका. पाय पकडून या माकडाला खाली पाडा.’॥ ५॥

मूल (चौपाई)

इंद्रजीत आदिक बलवाना।
हरषि उठे जहँ तहँ भट नाना॥
झपटहिं करि बल बिपुल उपाई।
पद न टरइ बैठहिं सिरु नाई॥

अनुवाद (हिन्दी)

इंद्रजित इत्यादी अनेक योद्धे सगळीकडे आनंदित होऊन उठले. संपूर्ण बळ पणास लावून बरेच प्रयत्न करून त्यांनी पाहिले, परंतु पाय हलत नव्हता. तेव्हा मान खाली घालून ते आपापल्या जागी जाऊन बसले.॥ ६॥

मूल (चौपाई)

पुनि उठि झपटहिं सुर आराती।
टरइ न कीस चरन एहि भाँती॥
पुरुष कुजोगी जिमि उरगारी।
मोह बिटप नहिं सकहिं उपारी॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडी म्हणतात, ‘ते देवांचे शत्रू पुन्हा उठून धावून जात. परंतु हे सर्पांच्या शत्रू गरुडा, विषयी पुरुष ज्याप्रमाणे मोहरूपी वृक्ष उपटू शकत नाही, त्याप्रमाणे ते अंगदाचा पाय हलवू शकत नव्हते.॥ ७॥

दोहा

मूल (दोहा)

कोटिन्ह मेघनाद सम सुभट उठे हरषाइ।
झपटहिं टरै न कपि चरन पुनि बैठहिं सिर नाइ॥ ३४(क)॥

अनुवाद (हिन्दी)

बळामध्ये मेघनादासारखे जे असंख्य वीर योद्धे होते, ते आनंदाने उठले. ते वारंवार वेगाने येत होते, परंतु वानराचा पाय काही उचलत नव्हता, तेव्हा लाजेने मान खाली घालून ते बसत होते.॥ ३४(क)॥

मूल (दोहा)

भूमि न छाँड़त कपि चरन देखत रिपु मद भाग।
कोटि बिघ्न ते संत कर मन जिमि नीति न त्याग॥ ३४(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे विघ्ने आली तरी संतांचे मन नीती सोडत नाही, त्याप्रमाणेच अंगदाचा पाय भूमीला सोडत नव्हता. हे पाहून रावणाचा गर्व नाहीसा झाला.॥ ३४(ख)॥

मूल (चौपाई)

कपि बल देखि सकल हियँ हारे।
उठा आपु कपि कें परचारे॥
गहत चरन कह बालिकुमारा।
मम पद गहें न तोर उबारा॥

अनुवाद (हिन्दी)

अंगदाचे बळ पाहून सर्वजण मनातून निराश झाले. नंतर अंगदाने आव्हान दिले, तेव्हा स्वतः रावण उठला. जेव्हा तो अंगदाचा पाय धरू लागला, तेव्हा बालिकुमार अंगद म्हणाला, ‘माझा पाय धरून तू वाचणार नाहीस.॥ १॥

मूल (चौपाई)

गहसि न राम चरन सठ जाई।
सुनत फिरा मन अति सकुचाई॥
भयउ तेजहत श्री सब गई।
मध्य दिवस जिमि ससि सोहई॥

अनुवाद (हिन्दी)

अरे मूर्खा, तू जाऊन श्रीरामांचे चरण का धरत नाहीस?’ हे ऐकून रावण ओशाळून परत गेला. त्याचे सर्व तेज नाहीसे झाले. माध्यान्हीला जसा चंद्र निस्तेज होतो, तसा तो निस्तेज झाला.॥ २॥

मूल (चौपाई)

सिंघासन बैठेउ सिर नाई।
मानहुँ संपति सकल गँवाई॥
जगदातमा प्रानपति रामा।
तासु बिमुख किमि लह बिश्रामा॥

अनुवाद (हिन्दी)

तो मान खाली घालून सिंहासनावर जाऊन बसला. जणू सर्व संपत्ती त्याने गमावली होती. श्रीरामचंद्र हे संपूर्ण जगाचे आत्मा आणि प्राणांचे स्वामी आहेत. त्यांच्याशी विन्मुख राहणाऱ्याला शांतता कशी मिळणार?॥ ३॥

मूल (चौपाई)

उमा राम की भृकुटि बिलासा।
होइ बिस्व पुनि पावइ नासा॥
तृन ते कुलिस कुलिस तृन करई।
तासु दूत पन कहु किमि टरई॥

अनुवाद (हिन्दी)

शिव म्हणतात, ‘हे उमा, ज्या श्रीरामचंद्रांच्या भुवईच्या इशाऱ्यावर विश्व उत्पन्न होते आणि नंतर ते नाश पावते, जे तृणाला वज्र आणि वज्राला तृण बनवितात, त्यांच्या दूताची प्रतिज्ञा कशी टळेल, सांग बरे?’॥ ४॥

मूल (चौपाई)

पुनि कपि कही नीतिबिधि नाना।
मान न ताहि कालु निअराना॥
रिपु मद मथिप्रभु सुजसु सुनायो।
यह कहि चल्यो बालि नृप जायो॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर अंगदाने अनेक प्रकारची नीती सांगितली, परंतु रावणाने मानले नाही, कारण त्याचा काळ जवळ आला होता. शत्रूचा गर्व धुळीला मिळवून अंगदाने रावणाला प्रभू श्रीरामचंद्रांची सुकीर्ती ऐकविली आणि मग तो राजा बालीचा पुत्र असे म्हणत निघाला,॥ ५॥

मूल (चौपाई)

हतौं न खेत खेलाइ खेलाई।
तोहि अबहिं का करौं बड़ाई॥
प्रथमहिं तासु तनय कपि मारा।
सो सुनि रावन भयउ दुखारा॥

अनुवाद (हिन्दी)

‘रणभूमीमध्ये तुला खेळवून जोपर्यंत मारीत नाही, तोपर्यंत फुशारकी कशाला मारू?’ अंगदाने सभेत येण्यापूर्वीच रावणाच्या पुत्राला मारले होते, ही वार्ता ऐकून रावण दुःखी झाला.॥ ६॥

मूल (चौपाई)

जातुधान अंगद पन देखी।
भय ब्याकुल सब भए बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

अंगदाची प्रतिज्ञा यशस्वी झाल्याचे पाहून सर्व राक्षस अत्यंत व्याकूळ झाले.॥ ७॥

दोहा

मूल (दोहा)

रिपु बल धरषि हरषि कपि बालितनय बल पुंज।
पुलक सरीर नयन जल गहे राम पद कंज॥ ३५(क)॥

अनुवाद (हिन्दी)

शत्रूच्या बलाचे मर्दन करून, बलाची खाण असलेल्या वालिपुत्र अंगदाने आनंदाने येऊन श्रीरामांची चरणकमले धरली. त्याचे शरीर पुलकित झाले होते आणि नेत्रांमध्ये आनंदाश्रू भरले होते.॥ ३५(क)॥