०५ सुवेळ पर्वतावर श्रीरामांचे दर्शन

मूल (चौपाई)

इहाँ सुबेल सैल रघुबीरा।
उतरे सेन सहित अति भीरा॥
सिखर एक उतंग अति देखी।
परम रम्य सम सुभ्र बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

इकडे सुवेळ पर्वतावर प्रचंड सेनेसह श्रीराम उतरले. पर्वताचे एक फार उंच, परमरमणीय, सपाट व उजळ शिखर पाहून॥ १॥

मूल (चौपाई)

तहँ तरु किसलय सुमन सुहाए।
लछिमन रचि निज हाथ डसाए॥
ता पर रुचिर मृदुल मृगछाला।
तेहिं आसन आसीन कृपाला॥

अनुवाद (हिन्दी)

तेथे लक्ष्मणाने वृक्षांची कोमल पाने व फुले आपल्या हातांनी सजवून अंथरली. त्यावर सुंदर व कोमल मृगचर्म घातले. त्या आसनावर कृपाळू श्रीराम विराजमान झाले होते.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रभु कृत सीस कपीस उछंगा।
बाम दहिन दिसि चाप निषंगा॥
दुहुँ कर कमल सुधारत बाना।
कह लंकेस मंत्र लगि काना॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंनी वानरराज सुग्रीवाच्या मांडीवर आपले डोके ठेवले होते. त्यांच्या डावीकडे धनुष्य व उजवीकडे बाणांचा भाता ठेवलेला होता. ते आपल्या दोन्ही कर-कमलांनी बाण व्यवस्थित करीत होते. बिभीषण त्यांच्याशी एकान्तात सल्लामसलत करीत होता.॥ ३॥

मूल (चौपाई)

बड़भागी अंगद हनुमाना।
चरन कमल चापत बिधि नाना॥
प्रभु पाछें लछिमन बीरासन।
कटि निषंग कर बान सरासन॥

अनुवाद (हिन्दी)

परम भाग्यशाली अंगद व हनुमान अनेक प्रकारे प्रभूंची चरण-कमले चेपत होते. लक्ष्मण कमरेला भाता बांधून व हातामध्ये धनुष्यबाण घेऊन वीरासनात प्रभूंच्या मागे शोभून दिसत होता.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एहि बिधि कृपा रूप गुन धाम रामु आसीन।
धन्य ते नर एहिं ध्यान जे रहत सदा लयलीन॥ ११(क)॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे कृपा, रूप व गुणांचे धाम असलेले श्रीराम विराजमान होते. जो मनुष्य नित्य अशा रूपाचे ध्यान करतो, तो धन्य होय.॥ ११(क)॥

मूल (दोहा)

पूरब दिसा बिलोकि प्रभु देखा उदित मयंक।
कहत सबहि देखहु ससिहि मृगपति सरिस असंक॥ ११(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

पूर्व दिशेला प्रभू श्रीरामांना चंद्र उगवलेला दिसला. तेव्हा ते सर्वांना म्हणाले, ‘चंद्राकडे पहा तरी. कसा सिंहाप्रमाणे निर्भय आहे.॥ ११(ख)॥

मूल (चौपाई)

पूरब दिसि गिरिगुहा निवासी।
परम प्रताप तेज बल रासी॥
मत्त नाग तम कुंभ बिदारी।
ससि केसरी गगन बन चारी॥

अनुवाद (हिन्दी)

पूर्व दिशारूपी पर्वताच्या गुहेत राहणारा, अत्यंत प्रताप, तेज व बलाची राशी असलेला हा चंद्रमारूपी सिंह अंधकाररूपी उन्मत्त हत्तीचे मस्तक विदीर्ण करून आकाशरूपी वनात निर्भयपणे विहरत आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

बिथुरे नभ मुकुताहल तारा।
निसि सुंदरी केर सिंगारा॥
कह प्रभु ससि महुँ मेचकताई।
कहहु काह निज निज मति भाई॥

अनुवाद (हिन्दी)

आकाशात विखुरलेले तारे मोत्यांसारखे आहेत. ते रात्ररूपी सुंदर स्त्रीचे अलंकार आहेत.’ प्रभू मग म्हणाले, ‘बंधूंनो! चंद्रामध्ये जे काळे डाग आहेत, ते काय आहेत? हे आपापल्या बुद्धीप्रमाणे सांगा.॥ २॥

मूल (चौपाई)

कह सुग्रीव सुनहु रघुराई।
ससि महुँ प्रगट भूमि कै झाँई॥
मारेउ राहु ससिहि कह कोई।
उर महँ परी स्यामता सोई॥

अनुवाद (हिन्दी)

सुग्रीव म्हणाला, हे रामा! ऐका. चंद्रावर पृथ्वीची छाया दिसत आहे. कोणी म्हणाले, राहूने चंद्राला मारले होते, तोच काळा डाग त्याच्या छातीवर दिसत आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

कोउ कह जब बिधि रति मुख कीन्हा।
सार भाग ससि कर हरि लीन्हा॥
छिद्र सो प्रगट इंदु उर माहीं।
तेहि मग देखिअ नभ परिछाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

कोणी म्हणाला, ‘जेव्हा ब्रह्मदेवाने रतीचे मुख बनविले, तेव्हा त्यांनी चंद्रम्याचा सारभाग काढून घेतला, त्यामुळे रतीचे मुख सुंदर झाले, परंतु चंद्राच्या हृदयाला छिद्र पडले, ते अजुनी आहे. त्यामुळे आकाशाची नीलिमा त्यामधून दिसते.’॥ ४॥

मूल (चौपाई)

प्रभु कह गरल बंधु ससि केरा।
अति प्रिय निज उर दीन्ह बसेरा॥
बिष संजुत कर निकर पसारी।
जारत बिरहवंत नर नारी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, ‘विष हा चंद्राचा प्रिय भाऊ आहे. म्हणूनच त्याने विष आपल्या हृदयात ठेवले आहे. त्यामुळे विषयुक्त किरण-समूह पसरून तो वियोगी नर-नारींना पीडा देतो.’॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

कह हनुमंत सुनहु प्रभु ससि तुम्हार प्रिय दास।
तव मूरति बिधु उर बसति सोइ स्यामता अभास॥ १२(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हनुमान म्हणाला, ‘हे प्रभो, ऐका. चंद्र हा तुमचा प्रिय दास आहे. तुमची सुंदर श्याम मूर्ती त्याच्या हृदयात वसते. त्याच्या श्यामलतेची झलक चंद्रामध्ये आहे.’॥ १२(क)॥