०२ नल-नीलांकडून सेतुबंधन

सोरठा

मूल (दोहा)

सिंधु बचन सुनि राम सचिव बोलि प्रभु अस कहेउ।
अब बिलंबु केहि काम करहु सेतु उतरै कटकु॥

अनुवाद (हिन्दी)

समुद्राचे बोलणे ऐकून प्रभू श्रीरामांनी मंत्र्यांना बोलावून घेतले आणि म्हटले, ‘आता उशीर कशासाठी? सेतू तयार करा. त्यामुळे सेना पलीकडे जाऊ शकेल.’

मूल (दोहा)

सुनहु भानुकुल केतु जामवंत कर जोरि कह।
नाथ नाम तव सेतु नर चढ़ि भव सागर तरहिं॥

अनुवाद (हिन्दी)

जांबवान हात जोडून म्हणाला, ‘हे सूर्यकुलाचे ध्वजस्वरूप श्रीराम, ऐकून घ्या. हे नाथ, सर्वांत मोठा सेतू तर तुमचे नावच आहे. त्याचा आधार घेऊन मनुष्य संसाररूपी समुद्र पार करतो.

मूल (चौपाई)

यह लघु जलधितरत कति बारा।
अस सुनि पुनि कह पवनकुमारा॥
प्रभु प्रताप बड़वानल भारी।
सोषेउ प्रथम पयोनिधि बारी॥

अनुवाद (हिन्दी)

मग हा लहानसा समुद्र पार करण्यास कितीसा वेळ लागेल?’ हे ऐकून पवनकुमार श्रीहनुमान म्हणाला, ‘प्रभूंचा प्रताप हा प्रचंड वडवानला सारखा आहे. त्याने पूर्वीच समुद्राचे पाणी शोषून घेतले आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

तव रिपु नारि रुदन जल धारा।
भरेउ बहोरि भयउ तेहिं खारा॥
सुनि अति उकुति पवनसुत केरी।
हरषे कपि रघुपति तन हेरी॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु तुमच्या शत्रूंच्या स्त्रियांच्या अश्रूंच्या धारांनी हा पुन्हा भरला आहे आणि त्यामुळे खारा आहे.’ हनुमानाचे अलंकारपूर्ण बोलणे ऐकून श्रीरघुनाथांकडे पहात सर्व वानर आनंदित झाले.॥ २॥

मूल (चौपाई)

जामवंत बोले दोउ भाई।
नल नीलहि सब कथा सुनाई॥
राम प्रताप सुमिरि मन माहीं।
करहु सेतु प्रयास कछु नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

जांबवानाने नल-नील या दोघा भावांना बोलावून सर्व सांगितले आणि म्हटले, ‘मनात श्रीरामांच्या प्रतापाचे स्मरण करून सेतू बनवा. रामांच्या प्रतापामुळे काहीही कष्ट होणार नाहीत.’॥ ३॥

मूल (चौपाई)

बोलि लिए कपि निकर बहोरी।
सकल सुनहु बिनती कछु मोरी॥
राम चरन पंकज उर धरहू।
कौतुक एक भालु कपि करहू॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर वानरांच्या समूहांना बोलावून घेतले आणि सांगितले की, ‘तुम्ही सर्वजण माझी विनंती ऐका. आपल्या मनात श्रीरामांचे चरण-कमल धारण करा आणि सर्व अस्वले व वानर मिळून एक कौतुक करा.॥ ४॥

मूल (चौपाई)

धावहु मर्कट बिकट बरूथा।
आनहु बिटप गिरिन्ह के जूथा॥
सुनि कपि भालु चले करि हूहा।
जय रघुबीर प्रताप समूहा॥

अनुवाद (हिन्दी)

बलवान वानरांच्या समूहांनी धावत जाऊन वृक्ष व पर्वतांचे समूह उपटून आणावेत.’ हे ऐकताच वानर व अस्वले हुंकार करीत आणि श्रीरघुनाथांच्या प्रतापाचा जयजयकार करीत निघाले.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

अति उतंग गिरि पादप लीलहिं लेहिं उठाइ।
आनि देहिं नल नीलहि रचहिं ते सेतु बनाइ॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

ते उंच उंच पर्वत व वृक्ष लीलया सहजपणे उपटून घेत होते आणि नल व नील यांना आणून देत होते. ते दोघे चांगल्याप्रकारे पर्वत, वृक्ष रचून सेतू बनवू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

सैल बिसाल आनि कपि देहीं।
कंदुक इव नल नील ते लेहीं॥
देखि सेतु अति सुंदर रचना।
बिहसि कृपानिधि बोले बचना॥

अनुवाद (हिन्दी)

वानर मोठमोठे पर्वत आणून देत होते आणि नल-नील ते चेंडूप्रमाणे सहज घेत होते. सेतूची सुंदर रचना पाहून कृपासिंधू श्रीराम हसून म्हणाले.॥ १॥

मूल (चौपाई)

परम रम्य उत्तम यह धरनी।
महिमा अमित जाइ नहिं बरनी॥
करिहउँ इहाँ संभु थापना।
मोरे हृदयँ परम कलपना॥

अनुवाद (हिन्दी)

‘येथील भूमी परम रमणीय व उत्तम आहे. तिचा महिमा अगाध आहे. मी येथे श्रीशंकरांची स्थापना करतो. माझ्या मनात हा महान संकल्प आहे.’॥ २॥

मूल (चौपाई)

सुनि कपीस बहु दूत पठाए।
मुनिबर सकल बोलि लै आए॥
लिंग थापि बिधिवत करि पूजा।
सिव समान प्रिय मोहि न दूजा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे बोलणे ऐकून वानरराज सुग्रीवाने पुष्कळ दूत पाठविले. त्यांनी सर्व श्रेष्ठ मुनींना बोलावून आणले. शिवलिंगाची स्थापना करून विधिपूर्वक त्याची पूजा केली. मग भगवंत म्हणाले, ‘शिवांसारखा दुसरा कोणी मला प्रिय नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

सिव द्रोही मम भगत कहावा।
सो नर सपनेहुँ मोहि न पावा॥
संकर बिमुख भगति चह मोरी।
सो नारकी मूढ़ मति थोरी॥

अनुवाद (हिन्दी)

जो शिवांचा द्रोह करतो आणि स्वतःला माझा भक्त म्हणवून घेतो, तो मनुष्य स्वप्नातही मला प्राप्त करू शकत नाही. शंकरांना विन्मुख होऊन जो माझी भक्ती प्राप्त करू इच्छितो, तो नरकगामी, मूर्ख आणि अल्पबुद्धीचा होय.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

संकरप्रिय मम द्रोही सिव द्रोही मम दास।
ते नर करहिं कलप भरि घोर नरक महुँ बास॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांना शंकर प्रिय आहेत, परंतु जे माझे द्रोही आहेत आणि जे शिवांचे द्रोही आहेत आणि माझे दास बनू इच्छितात, ते मनुष्य कल्पापर्यंत घोर नरकात जातात.॥ २॥

मूल (चौपाई)

जे रामेस्वर दरसनु करिहहिं।
ते तनु तजि मम लोक सिधारिहहिं॥
जो गंगाजलु आनि चढ़ाइहि।
सो साजुज्य मुक्ति नर पाइहि॥

अनुवाद (हिन्दी)

जे लोक मी स्थापन केलेल्या या रामेश्वराचे दर्शन घेतील, ते शरीर सोडल्यावर माझ्या लोकी जातील आणि जो गंगाजल या रामेश्वराला अर्पण करील, तो मनुष्य सायुज्य मुक्ती प्राप्त करून माझ्यामध्ये एकरूप होईल.॥ १॥

मूल (चौपाई)

होइ अकाम जो छल तजि सेइहि।
भगति मोरि तेहि संकर देइहि॥
मम कृत सेतु जो दरसनु करिही।
सो बिनु श्रम भवसागर तरिही॥

अनुवाद (हिन्दी)

जे कपट सोडून निष्काम मनाने श्रीरामेश्वराची सेवा करतील, त्यांना शंकर माझी भक्ती देतील आणि जे मी बनविलेल्या सेतूचे दर्शन घेतील, ते विनासायास संसाररूपी समुद्र तरून जातील.’॥ २॥

मूल (चौपाई)

रामबचन सब के जिय भाए।
मुनिबर निज निज आश्रम आए॥
गिरिजा रघुपति कै यह रीती।
संतत करहिं प्रनत पर प्रीती॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे बोलणे सर्वांना मनापासून आवडले. त्यानंतर श्रेष्ठ मुनी आपल्या आश्रमाला गेले. शिव म्हणतात, ‘हे पार्वती, शरणागतावर नेहमी प्रेम करणे, ही श्रीरघुनाथांची रीतच आहे.’॥ ३॥

मूल (चौपाई)

बाँधा सेतु नील नल नागर।
राम कृपाँ जसु भयउ उजागर॥
बूड़हिं आनहि बोरहिं जेई।
भए उपल बोहित सम तेई॥

अनुवाद (हिन्दी)

चतुर नल व नील यांनी सेतू बांधला. श्रीरामांच्या कृपेमुळे त्यांची उज्ज्वल कीर्ती सर्वत्र पसरली. जे पाषाण बुडतात आणि दुसऱ्यांनाही बुडवितात, तेच पाषाण जहाजाप्रमाणे स्वतः तरणारे व दुसऱ्यांना तारून नेणारे झाले.॥ ४॥

मूल (चौपाई)

महिमा यह न जलधि कइ बरनी।
पाहन गुन न कपिन्ह कइ करनी॥

अनुवाद (हिन्दी)

हा काही समुद्राचा महिमा नाही, दगडांचा गुण नाही की, ही वानरांची करामत नाही.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

श्री रघुबीर प्रताप ते सिंधु तरे पाषान।
ते मतिमंद जे राम तजि भजहिं जाइ प्रभु आन॥ ३॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुवीरांच्या प्रतापाने पाषाणसुद्धा समुद्रावर तरले. अशा श्रीरामांना सोडून जो दुसऱ्या कुणा स्वामीकडे जाऊन त्याला भजतो, तो खरोखरच मंदबुद्धीचा होय.॥ ३॥

मूल (चौपाई)

बाँधि सेतु अति सुदृढ़ बनावा।
देखि कृपानिधि के मन भावा॥
चली सेन कछु बरनि न जाई।
गर्जहिं मर्कट भट समुदाई॥

अनुवाद (हिन्दी)

नल-नील यांनी सेतू बांधून तो मजबूत बनविला. तो पाहून श्रीरामांना फार बरे वाटले. सेना निघाली. तिचे वर्णन करणे कठीण. योद्धे असलेल्या वानरांचे समूह गर्जना करीत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

सेतुबंध ढिग चढ़ि रघुराई।
चितव कृपाल सिंधु बहुताई॥
देखन कहुँ प्रभु करुना कंदा।
प्रगट भए सब जलचर बृंदा॥

अनुवाद (हिन्दी)

कृपाळू श्रीरघुनाथ सेतुबंधनाच्या तटावर चढून समुद्राचा विस्तार पाहू लागले. करुणानिधी प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी सर्व जलचरांचे समूह पाण्याबाहेर आले.॥ २॥

मूल (चौपाई)

मकर नक्र नाना झष ब्याला।
सत जोजन तन परम बिसाला॥
अइसेउ एक तिन्हहि जे खाहीं।
एकन्ह कें डर तेपि डेराहीं॥

अनुवाद (हिन्दी)

बऱ्याच प्रकारच्या मगरी, नक्र, मासे आणि सर्प होते. त्यांची विशाल शरीरे शंभर-शंभर योजने होती. काही असेही जंतू होते, जे त्यांनाही खाऊन टाकत. काहींच्या भीतीने ते सुद्धा घाबरत होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

प्रभुहि बिलोकहिं टरहिं न टारे।
मन हरषित सब भए सुखारे॥
तिन्ह कीं ओट न देखिअ बारी।
मगन भए हरि रूप निहारी॥

अनुवाद (हिन्दी)

ते सर्वजण वैर विसरून प्रभूंचे दर्शन घेत होते. हाकलले तरी जात नव्हते. सर्वांची मने आनंदित होती. सर्वजण सुखी झाले. त्यांच्या आच्छादनामुळे पाणी दिसत नव्हते. ते सर्व भगवंतांचे रूप पाहून आनंद-प्रेममग्न झाले होते.॥ ४॥

मूल (चौपाई)

चला कटकु प्रभु आयसु पाई।
को कहि सक कपि दल बिपुलाई॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीरामांची आज्ञा झाल्यावर सेना निघाली. वानरसेना प्रचंड होती. तिची गणना कोण करणार?॥ ५॥