१९ श्रीरामांचा समुद्रावर क्रोध आणि समुद्राकडून प्रार्थना, श्रीराम-गुणगानाचा महिमा

दोहा

मूल (दोहा)

बिनय न मानत जलधि जड़ गए तीनि दिन बीति।
बोले राम सकोप तब भय बिनु होइ न प्रीति॥ ५७॥

अनुवाद (हिन्दी)

इकडे तीन दिवस झाले, तरी जड बुद्धीच्या समुद्र्राने श्रीरामांची विनंती मानली नाही. तेव्हा श्रीरामांनी क्रोधाने म्हटले-‘भीतीशिवाय प्रीती होत नाही.॥ ५७॥

मूल (चौपाई)

लछिमन बान सरासन आनू।
सोषौं बारिधि बिसिख कृसानू॥
सठ सन बिनय कुटिल सन प्रीती।
सहज कृपन सन सुंदर नीती॥

अनुवाद (हिन्दी)

हे लक्ष्मणा, धनुष्य-बाण आण. मी अग्निबाणाने समुद्राला शोषून टाकतो. मूर्खाशी नम्रता, कुटिलाशी प्रेम, स्वभावाने कंजूष असलेल्याला उदार उपदेश,॥ १॥

मूल (चौपाई)

ममता रत सन ग्यान कहानी।
अति लोभी सन बिरति बखानी॥
क्रोधिहि सम कामिहि हरिकथा।
ऊसर बीज बएँ फल जथा॥

अनुवाद (हिन्दी)

ममतेमध्ये अडकलेल्या माणसाला ज्ञानाची गोष्ट, अत्यंत लोभ्याला वैराग्याचे वर्णन, क्रोधी माणसाला शांततेची गोष्ट आणि कामी माणसाला भगवंताची कथा-यांचा परिणाम नापीक जमिनीत बी पेरल्याप्रमाणे फुकट ठरतो.’॥ २॥

मूल (चौपाई)

अस कहि रघुपति चाप चढ़ावा।
यह मत लछिमन के मन भावा॥
संधानेउ प्रभु बिसिख कराला।
उठी उदधि उर अंतर ज्वाला॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून श्रीरघुनाथांनी धनुष्य सज्ज केले. हा विचार लक्ष्मणाला फार चांगला वाटला. प्रभूंनी अग्निबाणाचा नेम धरला, त्यासरशी समुद्राच्या हृदयात अग्नीची ज्वाळा उठली.॥ ३॥

मूल (चौपाई)

मकर उरग झष गन अकुलाने।
जरत जंतु जलनिधि जब जाने॥
कनक थार भरि मनिगन नाना।
बिप्र रूप आयउ तजि माना॥

अनुवाद (हिन्दी)

मगर, साप आणि मासे यांचे समूह व्याकूळ झाले. जेव्हा समुद्राने पाहिले की, जलचर जीव जळू लागले आहेत, तेव्हा तो अभिमान सोडून सोन्याच्या थाळीमध्ये अनेक रत्ने घेऊन ब्राह्मणाच्या रूपाने आला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

काटेहिं पइ कदरी फरइ कोटि जतन कोउ सींच।
बिनय न मान खगेस सुनु डाटेहिं पइ नव नीच॥ ५८॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडी म्हणतात, ‘हे गरुडा, कोणी कितीही उपाय केले, तरी केळीचे झाड कापल्यावरच फळे देते. नीच मनुष्य नम्रता मानत नाही. शासन केल्यावरच तो वाकतो.॥ ५८॥

मूल (चौपाई)

सभय सिंधुगहि पद प्रभु केरे।
छमहु नाथ सब अवगुन मेरे॥
गगन समीर अनल जल धरनी।
इन्ह कइ नाथ सहज जड़ करनी॥

अनुवाद (हिन्दी)

समुद्राने भयभीत होऊन प्रभूंचे चरण धरले आणि तो म्हणाला, ‘हे नाथ, माझे सर्व दोष क्षमा करा. हे नाथ, आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी या सर्वांची करणी स्वभावतःच ज्ञानहीन असते.॥ १॥

मूल (चौपाई)

तव प्रेरित मायाँ उपजाए।
सृष्टि हेतु सब ग्रंथनि गाए॥
प्रभुआयसु जेहि कहँ जस अहई।
सो तेहि भाँति रहें सुख लहई॥

अनुवाद (हिन्दी)

तुमच्या प्रेरणेमुळे मायेने यांना सृष्टीसाठी उत्पन्न केलेले आहे. सर्व ग्रंथांमध्ये असेच सांगितले आहे. ज्याच्यासाठी स्वामींची जशी आज्ञा असेल, तो त्याप्रमाणे राहाण्यातच सुखी असतो.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रभु भल कीन्ह मोहि सिख दीन्ही।
मरजादा पुनि तुम्हरी कीन्ही॥
ढोल गवाँर सूद्र पसु नारी।
सकल ताड़ना के अधिकारी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंनी मला शिक्षा देऊन चांगले केले, परंतु जिवांचे स्वभावसुद्धा तुम्हीच बनविले आहेत. ढोल, खेडूत, (गांवढळ) शूद्र, पशू व स्त्री हे सर्व दंडानेच वठणीवर येतात.॥ ३॥

मूल (चौपाई)

प्रभु प्रताप मैं जाब सुखाई।
उतरिहि कटकु न मोरि बड़ाई॥
प्रभु अग्या अपेल श्रुति गाई।
करौं सो बेगि जो तुम्हहि सोहाई॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूं प्रतापामुळे मी सुकून जाईन आणि सेना पलीकडे उतरेल,यात माझे मोठेपण नाही, तरीही प्रभूंची आज्ञा मोडता येत नाही, असे वेदांनी प्रतिपादन केले आहे. आता तुम्हांला जे बरे वाटेल, ते मी त्वरित करतो.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुनत बिनीत बचन अति कह कृपाल मुसुकाइ।
जेहि बिधि उतरै कपि कटकु तात सो कहहु उपाइ॥ ५९॥

अनुवाद (हिन्दी)

समुद्राची अत्यंत विनीत वचने ऐकून कृपाळू श्रीरामांनी हसून म्हटले ‘बाबा रे, ज्या रीतीने वानरांची सेना पार उतरून जाईल असा उपाय सांग.’॥ ५९॥

मूल (चौपाई)

नाथ नील नल कपि द्वौ भाई।
लरिकाईं रिषि आसिष पाई॥
तिन्ह कें परस किएँ गिरि भारे।
तरिहहिं जलधि प्रताप तुम्हारे॥

अनुवाद (हिन्दी)

समुद्र म्हणाला, ‘हे नाथ, नील व नल हे दोन वानर बंधू आहेत. त्यांना लहानपणी ऋषींचा आशीर्वाद मिळाला होता. त्यांनी स्पर्श केल्यास मोठमोठे पर्वतसुद्धा तुमच्या प्रतापाने समुद्रात तरंगू लागतील.॥ १॥

मूल (चौपाई)

मैं पुनि उर धरि प्रभु प्रभुताई।
करिहउँ बल अनुमान सहाई॥
एहि बिधि नाथ पयोधि बँधाइअ।
जेहिं यह सुजसु लोक तिहुँ गाइअ॥

अनुवाद (हिन्दी)

मी प्रभूंची सत्ता ध्यानात ठेवून आपल्या बळानुसार जी शक्य होईल, ती मदत करतो. अशा प्रकारे समुद्राला बांध घाला की. त्यामुळे त्रैलोक्यामध्ये तुमची सुंदर कीर्ती गाईली जाईल.॥ २॥

मूल (चौपाई)

एहिं सर मम उत्तर तट बासी।
हतहु नाथ खल नर अघ रासी॥
सुनि कृपाल सागर मन पीरा।
तुरतहिं हरी राम रनधीरा॥

अनुवाद (हिन्दी)

या बाणाने माझ्या उत्तरेकडील तटावर रहाणारे जे अत्यंत पापी व दुष्ट मनुष्य आहेत, त्यांचा वध करा.’ कृपाळू आणि रणधीर रामांनी समुद्राच्या मनातील दुःख ऐकून, ते त्वरित दूर केले व त्या दुष्टांना बाणाने मारून टाकले.॥ ३॥

मूल (चौपाई)

देखि राम बल पौरुष भारी।
हरषि पयोनिधि भयउ सुखारी॥
सकल चरित कहि प्रभुहि सुनावा।
चरन बंदि पाथोधि सिधावा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचा प्रचंड पराक्रम पाहून समुद्र आनंदित झाला. त्याने त्या दुष्टांची सारी हकीगत प्रभूंना सांगितली. नंतर त्यांच्या चरणांना वंदन करून समुद्र निघून गेला.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

निज भवन गवनेउ सिंधु श्रीरघुपतिहि यह मत भायऊ।
यह चरित कलि मलहर जथामति दास तुलसी गायऊ॥
सुख भवन संसय समन दवन बिषाद रघुपति गुन गना।
तजि सकल आस भरोस गावहि सुनहि संतत सठ मना॥

अनुवाद (हिन्दी)

समुद्र आपल्या घरी गेला. श्रीरघुनाथांना त्याचा विचार आवडला. हे चरित्र कलियुगातील पापांचे हरण करणारे आहे, आणि तुलसीदासाने आपल्या बुद्धीप्रमाणे ते गाईले आहे. श्रीरघुनाथ हे गुण-निधी, सुख-धाम, संशयाचा नाश करणारे आणि विषादाचे दमन करणारे आहेत. अरे मूर्ख मना, तू संसारातील सर्व आशा व विश्वास सोडून निरंतर त्यांचे गायन कर व त्यांचे चरित्र ऐक.

दोहा

मूल (दोहा)

सकल सुमंगल दायक रघुनायक गुन गान।
सादर सुनहिं ते तरहिं भव सिंधु बिना जलजान॥ ६०॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांचे गुणगान हे संपूर्ण मांगल्य देणारे आहे. जे आदरपूर्वक हे ऐकतील, ते कोणत्याही जहाजाविना-साधनाविना-भवसागरातून तरून जातील.॥ ६०॥