१६ बिभीषण श्रीरामांना शरण

दोहा

मूल (दोहा)

रामु सत्यसंकल्प प्रभु सभा कालबस तोरि।
मैं रघुबीर सरन अब जाउँ देहु जनि खोरि॥ ४१॥

अनुवाद (हिन्दी)

‘श्रीराम सत्यसंकल्प व सर्वसमर्थ प्रभू आहेत व हे रावणा, तुझी सभा काळाच्या दाढेत आहे. म्हणून मी श्रीरामांना शरण जातो. नंतर मला दोष देऊ नकोस.’॥ ४१॥

मूल (चौपाई)

अस कहि चला बिभीषनु जबहीं।
आयूहीन भए सब तबहीं॥
साधु अवग्या तुरत भवानी।
कर कल्यान अखिल कै हानी॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून बिभीषण जाताच सर्व राक्षसांचा मृत्यू निश्चित झाला. शिव म्हणतात, ‘हे भवानी, साधूचा अपमान संपूर्ण कल्याणाचा तत्काळ नाश करतो.॥ १॥

मूल (चौपाई)

रावन जबहिं बिभीषन त्यागा।
भयउ बिभव बिनु तबहिं अभागा॥
चलेउ हरषि रघुनायक पाहीं।
करत मनोरथ बहु मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

रावणाने ज्या क्षणी बिभीषणाचा त्याग केला, त्याच क्षणी तो अभागी ऐश्वर्यहीन झाला. बिभीषण आनंदामध्ये अनेक मनोरथ करीत श्रीरघुनाथांकडे गेला.॥ २॥

मूल (चौपाई)

देखिहउँ जाइ चरन जलजाता।
अरुन मृदुल सेवक सुखदाता॥
जे पद परसि तरी रिषिनारी।
दंडक कानन पावनकारी॥

अनुवाद (हिन्दी)

तो विचार करीत होता की, ‘मी जाऊन भगवंतांच्या कोमल व तांबूस चरण-कमलांचे दर्शन घेईन. ते सेवकांना सुख देणारे आहेत. त्या चरणांच्या स्पर्शाने ऋषिपत्नी अहिल्येचा उद्धार झाला आणि ते चरण दंडकवनास पवित्र करणारे आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

जे पद जनकसुताँ उर लाए।
कपट कुरंग संग धर धाए॥
हर उर सर सरोज पद जेई।
अहोभाग्य मैं देखिहउँ तेई॥

अनुवाद (हिन्दी)

जे चरण जानकीने आपल्या हृदयी धारण केले आहेत, जे चरण कपटमृगाच्या मागे पृथ्वीवर धावले होते आणि जी चरण-कमले साक्षात शिवांच्या हृदयरूपी सरोवरात विराजमान आहेत, तीच मी आज पाहीन. हे केवढे माझे भाग्य!॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जिन्ह पायन्ह के पादुकन्हि भरतु रहे मन लाइ।
ते पद आजु बिलोकिहउँ इन्ह नयनन्हि अब जाइ॥ ४२॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या चरणांच्या पादुकांमध्ये भरताने आपले मन मग्न केले आहे,अहाहा, आज जाऊन त्याच चरणांचे दर्शन मी आपल्या नेत्रांनी घेणार!॥ ४२॥

मूल (चौपाई)

एहि बिधि करत सप्रेम बिचारा।
आयउ सपदि सिंधु एहिं पारा॥
कपिन्ह बिभीषनु आवत देखा।
जाना कोउ रिपु दूत बिसेषा॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे प्रेमपूर्वक विचार करीत बिभीषण लगेच समुद्राच्या पलीकडील तीरावर पोहोचला. बिभीषण येताना पाहून वानरांना वाटले की, हा शत्रूचा कोणी खास दूत असावा.॥ १॥

मूल (चौपाई)

ताहि राखि कपीस पहिं आए।
समाचार सब ताहि सुनाए॥
कह सुग्रीव सुनहु रघुराई।
आवा मिलन दसानन भाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्याला पहाऱ्यावर थांबवून ते सुग्रीवाजवळ आले आणि त्यांनी बातमी सांगितली. सुग्रीवाने श्रीरामांजवळ सांगितले की, ‘हे रघुनाथ, रावणाचा भाऊ तुम्हांला भेटायला आला आहे.’॥ २॥

मूल (चौपाई)

कह प्रभु सखा बूझिऐ काहा।
कहइ कपीस सुनहु नरनाहा॥
जानि न जाइ निसाचर माया।
कामरूप केहि कारन आया॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू राम म्हणाले, ‘हे मित्रा, तुझा काय विचार आहे?’ वानरराजसुग्रीव म्हणाला, ‘हे महाराज, राक्षसांची माया समजत नाही. आपल्या इच्छेप्रमाणे रूप बदलणारा हा कशासाठी आला आहे, कुणास ठाऊक!॥ ३॥

मूल (चौपाई)

भेद हमार लेन सठ आवा।
राखिअ बाँधि मोहि अस भावा॥
सखा नीति तुम्ह नीकि बिचारी।
मम पन सरनागत भयहारी॥

अनुवाद (हिन्दी)

मला असे वाटते की, हा मूर्ख आपले रहस्य जाणून घेण्यासाठी आला आहे, म्हणून याला बांधून ठेवावे,’ श्रीराम म्हणाले, ‘हे मित्रा, तू चांगली नीती सांगितलीस. परंतु शरणागताचे भय दूर करणे, हे माझे ब्रीद आहे.’॥ ४॥

मूल (चौपाई)

सुनि प्रभु बचन हरष हनुमाना।
सरनागत बच्छल भगवाना॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंचे वचन ऐकून हनुमानाला आनंद झाला. तो मनात म्हणू लागला की, ‘भगवंत किती शरणागतवत्सल आहेत!’॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

सरनागत कहुँ जे तजहिं निज अनहित अनुमानि।
ते नर पावँर पापमय तिन्हहि बिलोकत हानि॥ ४३॥

अनुवाद (हिन्दी)

मग श्रीराम म्हणू लागले, ‘जे लोक आपले अहित होईल, असे अनुमान करून शरण आलेल्याला दूर लोटतात, ते क्षुद्र होत, पापी होत. त्यांना पाहणे हे सुद्धा पाप आहे.’॥ ४३॥

मूल (चौपाई)

कोटि बिप्र बध लागहिं जाहू।
आएँ सरन तजउँ नहिं ताहू॥
सनमुख होइ जीव मोहि जबहीं।
जन्म कोटि अघ नासहिं तबहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याने कोटॺावधी ब्राह्मणांची हत्या केली असेल, तोही शरण आल्यास मी त्याचा त्याग करीत नाही. ज्याक्षणी जीव माझ्यासमोर येतो, त्याच क्षणी त्याचे कोटॺवधी जन्मांचे पाप नष्ट होते.॥ १॥

मूल (चौपाई)

पापवंत कर सहज सुभाऊ।
भजनु मोर तेहि भाव न काऊ॥
जौं पै दुष्ट हृदय सोइ होई।
मोरें सनमुख आव कि सोई॥

अनुवाद (हिन्दी)

माझे भजन कधीही न आवडणे, हा पापी मनुष्याचा मुळचा स्वभाव असतो. जर तो रावणाचा भाऊ खराच दुष्ट मनाचा असता, तर तो माझ्यासमोर आला असता का?॥ २॥

मूल (चौपाई)

निर्मल मन जन सो मोहि पावा।
मोहि कपट छल छिद्र न भावा॥
भेद लेन पठवा दससीसा।
तबहुँ न कछु भय हानि कपीसा॥

अनुवाद (हिन्दी)

जो मनुष्य निर्मल मनाचा असतो, तोच मला भेटतो. मला कपट, लबाडी हे आवडत नाहीत. जरी रावणाने आपले रहस्य जाणण्यासाठी त्याला पाठविले असले, तरी हे सुग्रीवा, आपल्याला कोणतेही भय किंवा नुकसान नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

जग महुँ सखा निसाचर जेते।
लछिमनु हनइ निमिष महुँ तेते॥
जौं सभीत आवा सरनाईं।
रखिहउँ ताहि प्रान की नाईं॥

अनुवाद (हिन्दी)

कारण हे मित्रा, जगात जितके म्हणून राक्षस आहेत, त्यांना एका क्षणात लक्ष्मण मारू शकतो आणि जर तो भयभीत होऊन मला शरण आला असेल, तर मी त्याला प्राणाप्रमाणे जपेन.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

उभय भाँति तेहि आनहु हँसि कह कृपानिकेत।
जय कृपाल कहि कपि चले अंगद हनू समेत॥ ४४॥

अनुवाद (हिन्दी)

कृपेचे धाम असलेले श्रीराम हसून म्हणाले, ‘दोन्हीही परिस्थितींमध्ये त्याला घेऊन ये.’ मग अंगद आणि हनुमान यांना सोबत घेऊन ‘कृपाळू श्रीरामांचा विजय असो.’ असे म्हणत सुग्रीव निघाला.॥ ४४॥

मूल (चौपाई)

सादर तेहि आगें करि बानर।
चले जहाँ रघुपति करुनाकर॥
दूरिहि ते देखे द्वौ भ्राता।
नयनानंद दान के दाता॥

अनुवाद (हिन्दी)

बिभीषणाला आदराने पुढे घालून वानर, करुणेची खाण असलेल्या श्रीरघुनाथांजवळ आले. नेत्रांना आनंद देणाऱ्या दोघा बंधूंना बिभीषणाने दुरूनच पाहिले.॥ १॥

मूल (चौपाई)

बहुरि राम छबिधाम बिलोकी।
रहेउ ठटुकि एकटक पल रोकी॥
भुज प्रलंब कंजारुन लोचन।
स्यामल गात प्रनत भय मोचन॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर लावण्यनिधी श्रीरामांना पाहून डोळ्यांची उघडझाप विसरून-थबकून तो पहातच राहिला. भगवंतांच्या विशाल भुजा होत्या, लाल कमलांसारखे प्रफुल्ल नेत्र होते आणि शरणागताच्या भयाचा नाश करणारे त्यांचे सावळे शरीर होते.॥ २॥

मूल (चौपाई)

सिंघ कंध आयत उर सोहा।
आनन अमित मदन मन मोहा॥
नयन नीर पुलकित अति गाता।
मन धरि धीर कही मृदु बाता॥

अनुवाद (हिन्दी)

सिंहासारखे खांदे होते, विशाल वक्षःस्थल शोभून दिसत होते. असंख्य कामदेवांच्या मनाला मोहित करणारे मुख होते. भगवंतांचे ते स्वरूप पाहून बिभीषणाच्या नेत्रात प्रेमाश्रू भरून आले आणि शरीर अत्यंत पुलकित झाले. मग मनात धीर धरून तो कोमल शब्दांमध्ये बोलू लागला-॥ ३॥

मूल (चौपाई)

नाथ दसानन कर मैं भ्राता।
निसिचर बंस जनम सुरत्राता॥
सहज पापप्रिय तामस देहा।
जथा उलूकहि तम पर नेहा॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे नाथ, मी दशमुख रावणाचा भाऊ आहे. हे देवांचे रक्षक, माझा जन्म राक्षसकुळात झाला. माझे शरीर तामसी आहे. स्वभावतः पाप मला प्रिय आहे. ज्याप्रमाणे घुबडाला अंधकाराबद्दल सहज प्रेम असते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

श्रवन सुजसु सुनि आयउँ प्रभु भंजन भव भीर।
त्राहि त्राहि आरति हरन सरन सुखद रघुबीर॥ ४५॥

अनुवाद (हिन्दी)

मी तुमची सुकीर्ती ऐकून आलो आहे की, प्रभू जन्म-मरणाचे भय दूर करणारे आहेत. हे दुःखीजनांचे दुःख दूर करणारे आणि शरणागताला सुख देणारे श्रीरघुवीर! माझे रक्षण करा.’॥ ४५॥

मूल (चौपाई)

अस कहि करत दंडवत देखा।
तुरत उठे प्रभु हरष बिसेषा॥
दीन बचन सुनि प्रभु मन भावा।
भुज बिसाल गहि हृदयँ लगावा॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणत दंडवत करताना त्याला प्रभूंनी पाहिले मात्र आणि तेअत्यंत आनंदाने उठून उभे राहिले. बिभीषणाचे नम्र भाषण प्रभूंच्या मनाला खूप आवडले. त्यांनी आपल्या विशाल भुजांनी त्याला हृदयाशी धरले.॥ १॥

मूल (चौपाई)

अनुज सहित मिलि ढिग बैठारी।
बोले बचन भगत भयहारी॥
कहु लंकेस सहित परिवारा।
कुसल कुठाहर बास तुम्हारा॥

अनुवाद (हिन्दी)

लक्ष्मणानेही त्याला आलिंगन दिल्यावर त्यांनी त्याला जवळ बसवूनभक्तांचे भय दूर करणारे श्रीराम म्हणालेकी, ‘हे लंकेशा, परिवारासह आपले क्षेम-कुशल सांग. तुझा निवास वाईट जागी आहे, (म्हणून विचारतो.)॥ २॥

मूल (चौपाई)

खल मंडली बसहु दिनु राती।
सखा धरम निबहइ केहि भाँती॥
मैं जानउँ तुम्हारि सब रीती।
अति नय निपुन न भाव अनीती॥

अनुवाद (हिन्दी)

तू रात्रंदिवस दुष्टांच्या मंडळीमध्ये रहातोस. अशा अवस्थेमध्ये हे मित्रा, तुला धर्म कसा सांभाळता येतो? मला तुझा सर्व आचार-व्यवहार माहीत आहे. तू अत्यंत नीतिनिपुण आहेस, तुला अनीती बरी वाटत नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

बरु भल बास नरक कर ताता।
दुष्ट संग जनि देइ बिधाता॥
अब पद देखि कुसल रघुराया।
जौं तुम्ह कीन्हि जानि जन दाया॥

अनुवाद (हिन्दी)

बाबा रे! नरकात रहाणे चांगले; परंतु विधाता दुष्टांचा संग कधी न देवो.’ बिभीषण म्हणाला, ‘हे रघुनाथ, आता तुमच्या चरणांच्या दर्शनामुळे सर्व कुशल आहे. तुम्ही आपला सेवक समजून माझ्यावर दया केलीत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तब लगि कुसल न जीव कहुँ सपनेहुँ मन बिश्राम।
जब लगि भजत न राम कहुँ सोक धाम तजि काम॥ ४६॥

अनुवाद (हिन्दी)

जोपर्यंत जीव हा शोकाचे घर असणारी विषय-वासना सोडून श्रीरामांना भजत नाही, तोपर्यंत जीवाला सुख लाभत नाही आणि स्वप्नातही त्याच्या मनाला शांतता लाभत नाही.॥ ४६॥

मूल (चौपाई)

तब लगि हृदयँ बसत खल नाना।
लोभ मोह मच्छर मद माना॥
जब लगि उर न बसत रघुनाथा।
धरें चाप सायक कटि भाथा॥

अनुवाद (हिन्दी)

लोभ, मोह, मत्सर, मद, मान इत्यादी अनेक दुष्ट विकार हृदयात तोपर्यंत रहात असतात, जोपर्यंत धनुष्यबाण आणि कमरेला भाता धारण केलेले श्रीरघुनाथ हृदयामध्ये निवास करीत नाहीत.॥ १॥

मूल (चौपाई)

ममता तरुन तमी अँधिआरी।
राग द्वेष उलूक सुखकारी॥
तब लगि बसति जीव मन माहीं।
जब लगि प्रभु प्रताप रबि नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ममता ही पूर्ण अंधारी रात्र आहे. ती राग-द्वेषरूपी घुबडांना सुख देणारी आहे. ती ममतारूप रात्र तोपर्यंतच जीवाच्या मनात निवास करते, जोपर्यंत प्रभू, तुमचा प्रतापरूपी सूर्य उदय पावत नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

अब मैं कुसल मिटे भय भारे।
देखि राम पद कमल तुम्हारे॥
तुम्ह कृपाल जा पर अनुकूला।
ताहि न ब्याप त्रिबिध भव सूला॥

अनुवाद (हिन्दी)

हे श्रीराम, तुमच्या चरणारविंदांच्या दर्शनाने आता मी सुखरूप झालो आहे. माझे मोठे भय नाहीसे झाले. हे कृपाळू, तुम्ही ज्यांना अनुकूल असता, त्याला आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तीनही प्रकारचे भवताप त्रास देत नाहीत.॥ ३॥

मूल (चौपाई)

मैं निसिचर अति अधम सुभाऊ।
सुभ आचरनु कीन्ह नहिं काऊ॥
जासु रूप मुनि ध्यान न आवा।
तेहिं प्रभु हरषि हृदयँ मोहि लावा॥

अनुवाद (हिन्दी)

मी अत्यंत नीच स्वभावाचा राक्षस आहे. मी कधी चांगले आचरण केलेले नाही. असे असूनही ज्यांचे रूप मुनींच्या ध्यानातही येत नाही, त्या प्रभूंनी स्वतः आनंदाने मला हृदयाशी धरले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अहोभाग्य मम अमित अति राम कृपा सुख पुंज।
देखेउँ नयन बिरंचि सिव सेब्य जुगल पद कंज॥ ४७॥

अनुवाद (हिन्दी)

हे कृपा व सुखाचे निधान असलेले श्रीराम, ब्रह्मदेव व शिव हे ज्यांची सेवा करतात, त्या चरण-कमल युगलांचे मी स्वतःच्या डोळ्यांनी आज दर्शन घेतले, हे माझे फार मोठे भाग्य आहे.’॥ ४७॥

मूल (चौपाई)

सुनहु सखा निज कहउँ सुभाऊ।
जान भुसुंडि संभु गिरिजाऊ॥
जौं नर होइ चराचर द्रोही।
आवै सभय सरन तकि मोही॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम म्हणाले, ‘हे मित्रा, मी तुला माझा स्वभाव सांगतो. तो काकभुशुंडी, शिव व पार्वती यांनाही ठाऊक आहे. कुणी मनुष्य संपूर्ण जगाचा जरी द्रोही असला, तरीही तो भयभीत होऊन जर मला शरण आला,॥ १॥

मूल (चौपाई)

तजि मद मोह कपट छल नाना।
करउँ सद्य तेहि साधु समाना॥
जननी जनक बंधु सुत दारा।
तनु धनु भवन सुहृद परिवारा॥

अनुवाद (हिन्दी)

आणि मद, मोह आणि नाना प्रकारची कपट-फसवणूक त्याने सोडून दिली, तर मी फार लवकर त्याला साधूसारखा बनवितो. माता, पिता, भाऊ, पुत्र, स्त्री, शरीर, धन, घर, मित्र आणि परिवार,॥२॥

मूल (चौपाई)

सब कै ममता ताग बटोरी।
मम पद मनहि बाँध बरि डोरी॥
समदरसी इच्छा कछु नाहीं।
हरष सोक भय नहिं मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

जो या सर्वांच्या ममत्वरूपी धाग्यांना गुंडाळून त्या सर्वांची एक दोरी वळतो आणि त्या दोरीने आपले मन माझ्या चरणी बांधतो, जो समदर्शी आहे, ज्याला कशाची इच्छा नाही आणि ज्याच्या मनात हर्ष, शोक व भय नाही,॥ ३॥

मूल (चौपाई)

अस सज्जन मम उर बस कैसें।
लोभी हृदयँ बसइ धनु जैसें॥
तुम्ह सारिखे संत प्रिय मोरें।
धरउँ देह नहिं आन निहोरें॥

अनुवाद (हिन्दी)

असा सज्जन, लोभी माणसाच्या मनात जसे धन वसलेले असते, तसा माझ्या मनात वसलेला असतो. तुझ्यासारखे संतच मला प्रिय असतात. मी इतर कोणत्याही कारणाने देह धारण करीत नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सगुन उपासक परहित निरत नीति दृढ़ नेम।
ते नर प्रान समान मम जिन्ह कें द्विज पद प्रेम॥ ४८॥

अनुवाद (हिन्दी)

जे सगुण-साकार भगवंताचे उपासक असतात, दुसऱ्याच्या हितासाठी झटतात, नीती आणि नियमांच्याबाबतीत कणखर असतात आणि ज्यांना ब्राह्मणांविषयी प्रेम आहे, ते मनुष्य मला प्राणांसारखे प्रिय असतात.॥ ४८॥

मूल (चौपाई)

सुनु लंकेस सकल गुन तोरें।
तातें तुम्ह अतिसय प्रिय मोरें॥
राम बचन सुनि बानर जूथा।
सकल कहहिं जय कृपा बरूथा॥

अनुवाद (हिन्दी)

हे लंकापती, ऐक. तुझ्या अंगी वरील सर्व गुण आहेत. म्हणून तू मला अत्यंत आवडता आहेस.’ श्रीरामांचे बोलणे ऐकून वानरांचे सर्व समूह म्हणू लागले की, ‘कृपानिधी श्रीरामांचा विजय असो.’॥ १॥

मूल (चौपाई)

सुनत बिभीषनु प्रभु कै बानी।
नहिं अघात श्रवनामृत जानी॥
पद अंबुज गहि बारहिं बारा।
हृदयँ समात न प्रेमु अपारा॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभूंचे बोलणे ऐकताना कानांसाठी ते अमृत समजून बिभीषण तृप्त होत नव्हता. तो वारंवार श्रीरामांचे चरण-कमल धरीत होता. त्याच्या मनात अपार प्रेम होते. इतके की, ते हृदयात मावत नव्हते.॥ २॥

मूल (चौपाई)

सुनहु देव सचराचर स्वामी।
प्रनतपाल उर अंतरजामी॥
उर कछु प्रथम बासना रही।
प्रभु पद प्रीति सरित सो बही॥

अनुवाद (हिन्दी)

बिभीषण म्हणाला, ‘हे देवा, हे चराचराचे स्वामी, हे शरणागताचे रक्षक, हे सर्वांच्या हृदयामधील जाणणारे, माझ्या मनात पूर्वी काही विषयवासना होती, परंतु प्रभूंच्या चरणांच्या प्रीतिरूपी नदीमध्ये ती वाहून गेली.॥ ३॥

मूल (चौपाई)

अब कृपाल निज भगति पावनी।
देहु सदा सिव मन भावनी॥
एवमस्तु कहि प्रभु रनधीरा।
मागा तुरत सिंधु कर नीरा॥

अनुवाद (हिन्दी)

आता तर हे कृपाळू! शिवांच्या मनाला सदैव प्रिय वाटणारी आपली पवित्र भक्ती मला द्या.’ ‘तथास्तु’ असे म्हणून रणधीर प्रभू श्रीरामांनी त्वरित समुद्र-जल मागविले.॥ ४॥

मूल (चौपाई)

जदपि सखा तव इच्छा नाहीं।
मोर दरसु अमोघ जग माहीं॥
अस कहि राम तिलक तेहि सारा।
सुमन बृष्टि नभ भई अपारा॥

अनुवाद (हिन्दी)

आणि म्हटले, ‘हे सखा, जरी तुझी इच्छा नसली, तरी जगामध्ये माझे दर्शन अमोघ आहे. ते निष्फल होत नाही.’ असे म्हणून श्रीरामांनी त्याला राजतिलक केला. आकाशातून पुष्पांची अपार वृष्टी झाली.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

रावन क्रोध अनल निज स्वास समीर प्रचंड।
जरत बिभीषनु राखेउ दीन्हेउ राजु अखंड॥ ४९(क)॥

अनुवाद (हिन्दी)

रावणाचा क्रोधरूपी अग्नी बिभीषणाच्या वचनांच्या वाऱ्याने भडकला होता, त्यात जळण्यापासून बिभीषणाला श्रीरामांनी वाचविले आणि अखंड राज्य दिले.॥ ४९(क)॥

मूल (दोहा)

जो संपति सिव रावनहि दीन्हि दिएँ दस माथ।
सोइ संपदा बिभीषनहि सकुचि दीन्हि रघुनाथ॥ ४९(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

रावणाने आपल्या दहा शिरांचा बळी दिल्यावर शिवांनी जी संपत्तीत्याला दिली होती, तीच संपत्ती श्रीरघुनाथांनी बिभीषणाला मोठॺा संकोचाने दिली.॥ ४९(ख)॥

मूल (चौपाई)

अस प्रभु छाड़ि भजहिं जे आना।
ते नर पसु बिनु पूँछ बिषाना॥
निज जन जानि ताहि अपनावा।
प्रभु सुभाव कपि कुल मन भावा॥

अनुवाद (हिन्दी)

अशा परम कृपाळू प्रभूंना सोडून जे दुसऱ्या कुणाला भजतात, ते शिंग व शेपूट नसलेले पशू होत. आपला सेवक मानून बिभीषणाला श्रीरामांनी स्वीकारले. प्रभूंचा हा स्वभाव वानर कुळाच्या मनाला आवडला.॥ १॥

मूल (चौपाई)

पुनि सर्बग्य सर्ब उर बासी।
सर्बरूप सब रहित उदासी॥
बोले बचन नीति प्रतिपालक।
कारन मनुज दनुज कुल घालक॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर सर्व काही जाणणारे, सर्वांच्या हृदयात वसणारे, सर्व रूपांमध्ये प्रकट असणारे, सर्वांहून रहित, उदासीन, भक्तांवर कृपा करण्यासाठी मनुष्य बनलेले आणि राक्षस कुळाचा नाश करणारे श्रीराम नीतीचे पालन करण्यासाठी म्हणाले,॥ २॥