१४ मंदोदरी-रावण-संवाद

मूल (चौपाई)

उहाँ निसाचर रहहिं ससंका।
जब तें जारि गयउ कपि लंका॥
निज निज गृहँ सब करहिं बिचारा।
नहिं निसिचर कुल केर उबारा॥

अनुवाद (हिन्दी)

तिकडे लंकेत हनुमान लंका जाळून गेला, तेव्हापासून राक्षस भयभीत झाले होते. आपापल्या घरात सर्वजण विचार करीत होते की, आता राक्षसकुळाच्या बचावाचा कोणताही उपाय नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

जासु दूत बल बरनि न जाई।
तेहि आएँ पुर कवन भलाई॥
दूतिन्ह सन सुनि पुरजन बानी।
मंदोदरी अधिक अकुलानी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्या दूताच्या बळाचे वर्णन करणे शक्य नाही, ते श्रीराम स्वतः नगरात आल्यावर आमची काय अवस्था होणार! दूतींच्याकडून नगरवासींचे बोलणे ऐकून मंदोदरी फार व्याकूळ झाली.॥ २॥

मूल (चौपाई)

रहसि जोरि कर पति पग लागी।
बोली बचन नीति रस पागी॥
कंत करष हरि सन परिहरहू।
मोर कहा अति हित हियँ धरहू॥

अनुवाद (हिन्दी)

ती एकांतात हात जोडून रावणाच्या पाया पडली आणि नीतिरसाने परिपूर्ण वाणीने म्हणाली, ‘हे प्रियतम, श्रीहरींशी विरोध करणे सोडून द्या. माझे म्हणणे अत्यंत हितकारक समजून हृदयात धरा.॥ ३॥

मूल (चौपाई)

समुझत जासु दूत कइ करनी।
स्रवहिं गर्भ रजनीचर घरनी॥
तासु नारि निज सचिव बोलाई।
पठवहु कंत जो चहहु भलाई॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्या दूताच्या कृत्याचा विचार करताच राक्षसांच्या स्त्रिया गर्भगळित होतात, हे प्रिय स्वामी, जर कल्याण व्हावेसे वाटत असेल, तर, आपल्या मंत्र्यांना बोलावून त्यांच्याबरोबर श्रीरामांच्या पत्नीला पाठवून द्या.॥ ४॥

मूल (चौपाई)

तव कुल कमल बिपिन दुखदाई।
सीता सीत निसा सम आई॥
सुनहु नाथ सीता बिनु दीन्हें।
हित न तुम्हार संभु अज कीन्हें॥

अनुवाद (हिन्दी)

सीता ही आपल्या कुलरूपी कमलवनाला दुःख देणाऱ्या थंडीच्या रात्रीप्रमाणे झाली आहे. हे नाथ, ऐकून घ्या. सीतेला परत पाठविल्याशिवाय शंभू किंवा ब्रह्मदेवही तुमचे भले करणार नाहीत.॥५॥

दोहा

मूल (दोहा)

राम बान अहि गन सरिस निकर निसाचर भेक।
जब लगि ग्रसत न तब लगि जतनु करहु तजि टेक॥ ३६॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचे बाण हे सर्पांच्या समूहांसारखे आहेत आणि राक्षस-समूह त्यांच्यापुढे बेडकाप्रमाणे आहेत. ते जोपर्यंत यांना खाऊन टाकत नाहीत, तोपर्यंत आपला हट्ट सोडून काही उपाय करा.’॥ ३६॥

मूल (चौपाई)

श्रवन सुनी सठ ता करि बानी।
बिहसा जगत बिदित अभिमानी॥
सभय सुभाउ नारि कर साचा।
मंगल महुँ भय मन अति काचा॥

अनुवाद (हिन्दी)

मूर्ख आणि जगप्रसिद्ध घमेंडखोर रावण आपल्या कानांनी मंदोदरीचे बोलणे ऐकून मोठॺाने हसून म्हणाला, ‘स्त्रियांचा स्वभाव खरोखरच भित्रट असतो. तू मंगल प्रसंगीसुद्धा भीत आहेस. तुझे मन फारच हळवे आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

जौं आवइ मर्कट कटकाई।
जिअहिं बिचारे निसिचर खाई॥
कंपहिं लोकप जाकीं त्रासा।
तासु नारि सभीत बड़ि हासा॥

अनुवाद (हिन्दी)

जर वानरांची सेना आली, तर बिचारे राक्षस त्यांना खाऊन आपली पोटे भरतील. लोकपालही माझ्या भयाने कापू लागतात, त्याची बायको असून तू घाबरतेस, ही मोठी हास्यास्पद गोष्ट आहे.’॥ २॥

मूल (चौपाई)

अस कहि बिहसि ताहि उर लाई।
चलेउ सभाँ ममता अधिकाई॥
मंदोदरी हृदयँ कर चिंता।
भयउ कंत पर बिधि बिपरीता॥

अनुवाद (हिन्दी)

रावणाने असे म्हणत हसून तिला हृदयाशी धरले आणि मोठे प्रेम दाखवून तो सभेला गेला. मंदोदरी मनात काळजी करू लागली की, विधाता आपल्या पतीला प्रतिकूल झालेला आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

बैठेउ सभाँ खबरि असि पाई।
सिंधु पार सेना सब आई॥
बूझेसि सचिव उचित मत कहहू।
ते सब हँसे मष्ट करि रहहू॥

अनुवाद (हिन्दी)

रावण सभेमध्ये जाऊन बसताच त्याला समजले की, शत्रूची सर्व सेना समुद्रापलीकडे आली आहे. त्याने मंत्र्यांना म्हटले की, योग्य सल्ला द्या. तेव्हा सर्वजण हसले व म्हणाले की, ‘गप्प रहावे, यात सल्ला काय द्यायचा?॥ ४॥

मूल (चौपाई)

जितेहु सुरासुर तब श्रम नाहीं।
नर बानर केहि लेखे माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही देव व राक्षसांना जिंकून घेतले, तेव्हासुद्धा काही कष्ट पडले नाहीत. मग मनुष्य व वानर यांचे काय घेऊन बसलात?’॥ ५॥