०४ हनुमान्-बिभीषण-संवाद

दोहा

मूल (दोहा)

रामायुध अंकित गृह सोभा बरनि न जाइ।
नव तुलसिका बृंद तहँ देखि हरष कपिराइ॥ ५॥

अनुवाद (हिन्दी)

त्या महालावर श्रीरामांच्या धनुष्य-बाणाची चिन्हे अंकित होती. त्याची शोभा अवर्णनीय होती. तेथे तुळशीची नवनवीन झाडे पाहून कपिराज हनुमानाला हर्ष झाला.॥ ५॥

मूल (चौपाई)

लंका निसिचर निकर निवासा।
इहाँ कहाँ सज्जन कर बासा॥
मन महुँ तरक करैं कपि लागा।
तेहीं समय बिभीषनु जागा॥

अनुवाद (हिन्दी)

लंका ही राक्षसांच्या समाजाचे निवासस्थान आहे. येथे साधु-पुरुषाचा निवास कसा? हनुमान मनात असा विचार करीत होता, त्याचवेळी बिभीषण जागा झाला.॥ १॥

मूल (चौपाई)

राम राम तेहिं सुमिरन कीन्हा।
हृदयँ हरष कपि सज्जन चीन्हा॥
एहि सन हठि करिहउँ पहिचानी।
साधु ते होइ न कारज हानी॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने राम-नाम घेतले. हनुमानाला वाटले की, हा साधू आहे. त्याला मनापासून आनंद झाला. त्याने विचार केला की, आपण याची मुद्दाम ओळख करून घेऊया. साधूमुळे कार्याची हानी होत नाही, उलट फायदाच होतो.॥ २॥

मूल (चौपाई)

बिप्र रूप धरि बचन सुनाए।
सुनत बिभीषन उठि तहँ आए॥
करि प्रनाम पूँछी कुसलाई।
बिप्र कहहु निज कथा बुझाई॥

अनुवाद (हिन्दी)

ब्राह्मणाचे रूप धारण करून हनुमानाने त्याला हाक मारली. ऐकताच बिभीषण उठून बाहेर आला. प्रणाम करून त्याने क्षेम-कुशल विचारले आणि म्हटले, ‘हे ब्राह्मणदेवा, आपली ओळख करून द्या.॥ ३॥

मूल (चौपाई)

की तुम्ह हरि दासन्ह महँ कोई।
मोरें हृदय प्रीति अति होई॥
की तुम्ह रामु दीन अनुरागी।
आयहु मोहि करन बड़भागी॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही हरिभक्तांपैकी कोणी आहात काय? कारण तुम्हांला पाहून माझ्या मनात खूप प्रेम उसळत आहे. अथवा तुम्ही दीनांवर प्रेम करणारे प्रत्यक्ष श्रीरामचंद्रच असून मला घरबसल्या कृतार्थ करण्यासाठी आला आहात काय?’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तब हनुमंत कही सब राम कथा निज नाम।
सुनत जुगल तन पुलक मन मगन सुमिरि गुन ग्राम॥ ६॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा हनुमानाने श्रीरामचंद्रांची सर्व हकिगत सांगून आपले नाव सांगितले. ऐकताच दोघांची शरीरे रोमांचित झाली आणि श्रीरामांच्या गुण-समूहांचे स्मरण करून दोघेही प्रेम व आनंदात मग्न झाले.॥ ६॥

मूल (चौपाई)

सुनहु पवनसुत रहनि हमारी।
जिमि दसनन्हि महुँ जीभ बिचारी॥
तात कबहुँ मोहि जानि अनाथा।
करिहहिं कृपा भानुकुल नाथा॥

अनुवाद (हिन्दी)

बिभीषण म्हणाला, ‘हे पवनपुत्रा, माझी परिस्थिती ऐकून घे. ज्याप्रमाणे दातांमध्ये बिचारी जीभ दबून रहाते, त्याप्रमाणे मी येथे रहातो. हे तात, मला अनाथ समजून सूर्यकुलाचे नाथ श्रीरामचंद्र कधी माझ्यावरही कृपा करतील काय?॥ १॥

मूल (चौपाई)

तामस तनु कछु साधन नाहीं।
प्रीति न पद सरोज मन माहीं॥
अब मोहि भा भरोस हनुमंता।
बिनु हरिकृपा मिलहिं नहिं संता॥

अनुवाद (हिन्दी)

माझे हे तामसी राक्षसशरीर असल्यामुळे साधन तर काही जमत नाही आणि मनातही श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांविषयी प्रेमही नाही. परंतु हे हनुमाना, श्रीरामचंद्रांची माझ्यावर कृपा आहे, असा मला आता विश्वास वाटत आहे, कारण हरीच्या कृपेविना संतांची भेट होत नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

जौं रघुबीर अनुग्रह कीन्हा।
तौ तुम्ह मोहि दरसु हठि दीन्हा॥
सुनहु बिभीषन प्रभु कै रीती।
करहिं सदा सेवक पर प्रीती॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुवीरांनी कृपा केली आहे, त्यामुळेच तुम्ही आपणहून मला दर्शन दिले.’ हनुमान म्हणाला, ‘हे बिभीषणा, ऐकून घे की, सेवकावर सदा प्रेम करणे ही प्रभूंची रीतच आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

कहहु कवन मैं परम कुलीना।
कपि चंचल सबहीं बिधि हीना॥
प्रात लेइ जो नाम हमारा।
तेहि दिन ताहि न मिलै अहारा॥

अनुवाद (हिन्दी)

सांग बरे! मी कुठे मोठा कुलीन लागून गेलो आहे? सर्व दृष्टींनी तुच्छ असा मी चंचल वानर आहे. सकाळी-सकाळी जो आम्हा वानरांचे नाव घेतो, त्याला त्या दिवशी भोजनही मिळत नाही, (असे म्हणतात.)॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अस मैं अधम सखा सुनु मोहू पर रघुबीर।
कीन्ही कृपा सुमिरि गुन भरे बिलोचन नीर॥ ७॥

अनुवाद (हिन्दी)

हे सखा, मी असा अधम आहे, परंतु श्रीरामचंद्रांनी तरीही माझ्यावर कृपा केली.’ भगवंतांच्या गुणांचे स्मरण करताना हनुमानाच्या डोळ्यांत प्रेमाश्रू भरले.॥ ७॥

मूल (चौपाई)

जानतहूँ अस स्वामि बिसारी।
फिरहिं ते काहे न होहिं दुखारी॥
एहि बिधि कहत राम गुन ग्रामा।
पावा अनिर्बाच्य बिश्रामा॥

अनुवाद (हिन्दी)

जे लोक हे जाणत असूनही असे स्वामी असलेले श्रीरघुनाथ यांना विसरून विषयांच्यामागे भटकत फिरतात, ते का बरे दुःखी होणार नाहीत? अशा प्रकारे श्रीरामांचे गुण-गान करताना त्यांना अनिर्वचनीय परम शांती लाभली.॥ १॥

मूल (चौपाई)

पुनि सब कथा बिभीषन कही।
जेहि बिधि जनकसुता तहँ रही॥
तब हनुमंत कहा सुनु भ्राता।
देखी चहउँ जानकी माता॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर बिभीषणाने जानकी लंकेमध्ये कुठे रहात आहे, ती सर्व वार्ता सांगितली. तेव्हा हनुमान म्हणाला, ‘हे बंधू, मला जानकी मातेला पहायचे आहे.’॥ २॥