०३ लंकावर्णन, लंकिनीवर प्रहार, लंकेत प्रवेश

मूल (चौपाई)

नाना तरु फल फूल सुहाए।
खग मृग बृंद देखि मन भाए॥
सैल बिसाल देखि एक आगें।
ता पर धाइ चढ़ेउ भय त्यागें॥

अनुवाद (हिन्दी)

त्या वनात अनेक प्रकारचे वृक्ष फळा-फुलांनी बहरलेले होते. ते फार शोभून दिसत होते. तेथील पशु-पक्ष्यांचे समूह पाहून हनुमानाचे मन प्रसन्न होऊन गेले. त्याला समोर एक विशाल पर्वत दिसला. तो निर्भयपणे उडी मारून त्या पर्वतावर चढला.॥ ४॥

मूल (चौपाई)

उमा न कछु कपि कै अधिकाई।
प्रभु प्रताप जो कालहि खाई॥
गिरि पर चढ़ि लंका तेहिं देखी।
कहि न जाइ अति दुर्ग बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

शिव म्हणतात, ‘हे उमे, यामध्ये वानर हनुमानाचा काही मोठेपणा नाही. जो काळाचाही काळ आहे, त्या प्रभू रामांचा हा प्रताप होता. हनुमानाने पर्वतावर चढून लंका पाहिली. त्याने विचार केला की, हा किल्ला कल्पनेहून फारच मोठा आहे.॥ ५॥

मूल (चौपाई)

अति उतंग जलनिधि चहु पासा।
कनक कोट कर परम प्रकासा॥

अनुवाद (हिन्दी)

तो अत्यंत उंच होता. त्याच्या चारी बाजूंना समुद्र होता. किल्‍ल्याच्या सोन्याच्या तटबंदीचा मोठा प्रकाश पसरलेला होता.॥ ६॥

छंद

मूल (दोहा)

कनक कोट बिचित्र मनि कृत सुंदरायतना घना।
चउहट्ट हट्ट सुबट्ट बीथीं चारु पुर बहु बिधि बना॥
गज बाजि खच्चर निकर पदचर रथ बरूथन्हि को गनै।
बहुरूप निसिचर जूथ अतिबल सेन बरनत नहिं बनै॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

ती चित्रविचित्र रत्नांनी जडविलेली सोन्याची तटबंदी होती. तिच्या आतल्या बाजूस सुंदर सुंदर घरे होती. तेथे चौक, बाजार, सुंदर मार्ग व गल्ली-बोळ होते. सुंदर नगर नाना प्रकारे सजविलेले होते. हत्ती, घोडे व खेचरांच्या झुंडी, तसेच पायदळ आणि रथांचे समूह यांची गणना कोण करू शकेल? अनेक रूपांमध्ये राक्षसांची सैन्यदले होती आणि त्या बलवान सेनेचे वर्णन करणेच कठीण.॥ १॥

मूल (दोहा)

बन बाग उपबन बाटिका सर कूप बापीं सोहहीं।
नर नाग सुर गंधर्ब कन्या रूप मुनि मन मोहहीं॥
कहुँ माल देह बिसाल सैल समान अतिबल गर्जहीं।
नाना अखारेन्ह भिरहिं बहुबिधि एक एकन्ह तर्जहीं॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

वने, बागा, उपवने, फुलवाडॺा, तलाव, विहिरी आणि आड शोभत होते. मनुष्यकन्या, नागकन्या, देवकन्या व गंधर्वकन्या या आपल्या सौंदर्याने मुनींच्या मनालाही भुरळ पाडणाऱ्या होत्या. कुठे पर्वतासारख्या विशाल शरीराचे बलवान मल्ल गर्जना करीत होते. ते अनेक आखाडॺांमध्ये अनेक प्रकारे एकमेकांशी भिडून आव्हान देत होते.॥ २॥

मूल (दोहा)

करि जतन भट कोटिन्ह बिकट तन नगर चहुँ दिसि रच्छहीं।
कहुँ महिष मानुष धेनु खर अज खल निसाचर भच्छहीं॥
एहि लागि तुलसीदास इन्ह की कथा कछु एक है कही।
रघुबीर सर तीरथ सरीरन्हि त्यागि गति पैहहिं सही॥ ३॥

अनुवाद (हिन्दी)

भयानक शरीराचे कोटॺवधी राक्षस काळजीपूर्वक नगराची चारी बाजूंनी रखवाली करीत होते. दुष्ट राक्षस कुठे म्हशी, गाई, गाढवे व बकऱ्या मारून खात होते. तुलसीदासाने हे सर्व थोडक्यात एवढॺासाठीच सांगितले आहे की, प्रभू श्रीरामांच्या बाणरूपी तीर्थामध्ये आपला देह विसर्जित करून हे सर्वजण निश्चितपणे परमगती प्राप्त करणार आहेत.॥ ३॥

दोहा

मूल (दोहा)

पुर रखवारे देखि बहु कपि मन कीन्ह बिचार।
अति लघु रूप धरौं निसि नगर करौं पइसार॥ ३॥

अनुवाद (हिन्दी)

नगराचे बहुसंख्य रखवालदार पाहून हनुमानाने मनात विचार केला की, आता छोटे रूप धरावे आणि रात्रीच्या वेळी नगरात प्रवेश करावा.॥ ३॥

मूल (चौपाई)

मसक समान रूप कपि धरी।
लंकहि चलेउ सुमिरि नरहरी॥
नाम लंकिनी एक निसिचरी।
सो कह चलेसि मोहि निंदरी॥

अनुवाद (हिन्दी)

हनुमान अतिशय छोटे रूप घेऊन मनुष्यलीला करणाऱ्या श्रीरामचंद्रांचे स्मरण करून लंकेला निघाला. लंकेच्या दारावर लंकिनी नावाची एक राक्षसी रहात होती. ती म्हणाली, ‘माझी उपेक्षा करून मला न विचारता कुठे निघालास?॥ १॥

मूल (चौपाई)

जानेहि नहीं मरमु सठ मोरा।
मोर अहार जहाँ लगि चोरा॥
मुठिका एक महा कपि हनी।
रुधिर बमत धरनीं ढनमनी॥

अनुवाद (हिन्दी)

हे मूर्खा, तुला माझे रहस्य कुठे ठाऊक आहे? जितके चोर असतात, ते माझा आहार बनतात.’ हनुमानाने तिला एक ठोसा दिला, त्यामुळे ती रक्त ओकत जमिनीवर पडली.॥ २॥

मूल (चौपाई)

पुनि संभारि उठी सो लंका।
जोरि पानि कर बिनय ससंका॥
जब रावनहि ब्रह्म बर दीन्हा।
चलत बिरंचि कहा मोहि चीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

ती लंकिनी स्वतःला सावरत पुन्हा उठली आणि भीतीने हात जोडून विनंती करू लागली. ती म्हणाली, ‘ब्रह्मदेवांनी रावणाला जेव्हा वर दिला होता, तेव्हा जाताना त्यांनी मला राक्षसांच्या नाशाची खूण सांगितली होती की,॥ ३॥

मूल (चौपाई)

बिकल होसि तैं कपि के मारे।
तब जानेसु निसिचर संघारे॥
तात मोर अति पुन्य बहूता।
देखेउँ नयन राम कर दूता॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा तू वानराने मारल्यावर व्याकूळ होशील, तेव्हा तू राक्षसांचा संहार झाला, असे समज’. मी श्रीरामचंद्रांच्या दूताला आपल्या डोळ्यांनी पाहिले, हे माझे मोठे पुण्य होय.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तात स्वर्ग अपबर्ग सुख धरिअ तुला एक अंग।
तूल न ताहि सकल मिलि जो सुख लव सतसंग॥ ४॥

अनुवाद (हिन्दी)

हे कपिराज, स्वर्ग व मोक्ष यांचे सर्व सुख एका पारडॺात घातले, तरी ते सर्व मिळून दुसऱ्या पारडॺात ठेवलेल्या क्षणभराच्या सत्संगाच्या सुखाची बरोबरी करू शकत नाही.॥ ४॥

मूल (चौपाई)

प्रबिसि नगर कीजे सब काजा।
हृदयँ राखि कोसलपुर राजा॥
गरल सुधा रिपु करहिं मिताई।
गोपद सिंधु अनल सितलाई॥

अनुवाद (हिन्दी)

तू अयोध्यापुरीचे राजा श्रीरघुनाथ यांना हृदयात धारण करून नगरामध्ये प्रवेश कर. श्रीरामांमुळे विष अमृत बनते, शत्रू मैत्री करू लागतो, समुद्र गाईच्या खुरामुळे पडलेल्या किंचित् खड्ड्याएवढा होतो आणि अग्नीमध्ये शीतलता येते.’॥ १॥

मूल (चौपाई)

गरुड़ सुमेरु रेनु सम ताही।
राम कृपा करि चितवा जाही॥
अति लघु रूप धरेउ हनुमाना।
पैठा नगर सुमिरि भगवाना॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडी म्हणतात, ‘हे गरुडा, ज्याला श्रीरामचंद्रांनी एकदा कृपा दृष्टीने पाहिले, त्याला सुमेरू पर्वत हा सुद्धा धुळिकणासारखा होतो.’ नंतर हनुमानाने छोटे रूप धारण केले आणि भगवंतांचे स्मरण करून लंकेत प्रवेश केला.॥ २॥

मूल (चौपाई)

मंदिर मंदिर प्रति करि सोधा।
देखे जहँ तहँ अगनित जोधा॥
गयउ दसानन मंदिर माहीं।
अति बिचित्र कहि जात सो नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने तेथील प्रत्येक महालाचा शोध घेतला. जिकडे-तिकडे असंख्य योद्धे होते. नंतर तो रावणाच्या महालात गेला. तो इतका विलक्षण होता की, त्याचे वर्णन करणे कठीण.॥ ३॥

मूल (चौपाई)

सयन किएँ देखा कपि तेही।
मंदिर महुँ न दीखि बैदेही॥
भवन एक पुनि दीख सुहावा।
हरि मंदिर तहँ भिन्न बनावा॥

अनुवाद (हिन्दी)

हनुमानाने रावण झोपलेला पाहिला. परंतु महालात जानकी दिसली नाही. नंतर एक सुंदर महाल दिसला. तेथे भगवंतांचे एक स्वतंत्र मंदिर होते.॥ ४॥