०८ शरद्-ऋतु-वर्णन

मूल (चौपाई)

बरषा बिगत सरद रितु आई।
लछिमन देखहु परम सुहाई॥
फूलें कास सकल महि छाई।
जनु बरषाँ कृत प्रगट बुढ़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

हे लक्ष्मणा, बघ. वर्षाकाल संपला आणि परम सुंदर शरद्ऋतू आला. फुललेल्या कास गवतामुळे संपूर्ण पृथ्वी झाकली गेली आहे. जणू वर्षाऋतूने कासरूपी पांढऱ्या केसांच्या रूपाने आपले म्हातारपण प्रकट केले आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

उदित अगस्ति पंथ जल सोषा।
जिमि लोभहि सोषइ संतोषा॥
सरिता सर निर्मल जल सोहा।
संत हृदय जस गत मद मोहा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे संतोष हा लोभाला शोषून घेतो, त्याप्रमाणे अगस्त्य ताऱ्याने उदित होऊन मार्गावरील पाणी शोषले आहे. ज्याप्रमाणे संतांचे हृदय मद-मोहरहित निर्मल असते, त्याप्रमाणे नद्या व तलाव यांचे निर्मळ जल शोभत आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

रस रस सूख सरित सर पानी।
ममता त्याग करहिं जिमि ग्यानी॥
जानि सरद रितु खंजन आए।
पाइ समय जिमि सुकृत सुहाए॥

अनुवाद (हिन्दी)

नद्या व तलाव यांचे पाणी हळू हळू घटत आहे, ज्याप्रमाणे ज्ञानी पुरुष ममतेचा त्याग करतात. शरदऋतूची चाहूल लागताच खंजनपक्षी आले आहेत, ज्याप्रमाणे वेळ येताच चांगले पुण्य प्रकट होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

पंक न रेनु सोह असि धरनी।
नीति निपुन नृप कै जसि करनी॥
जल संकोच बिकल भइँ मीना।
अबुध कुटुंबी जिमि धनहीना॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे नीतिनिपुण राजाचा कारभार स्वच्छ असतो, त्याप्रमाणे चिखल व धूळ नसल्याने धरणी निर्मल बनून शोभून दिसत आहे. पाणी कमी झाल्यामुळे मासे व्याकूळ झाले आहेत, ज्याप्रमाणे विवेकशून्य गृहस्थ धनाविना व्याकूळ होतो.॥ ४॥

मूल (चौपाई)

बिनु घन निर्मल सोह अकासा।
हरिजन इव परिहरि सब आसा॥
कहुँ कहुँ बृष्टि सारदी थोरी।
कोउ एक पाव भगति जिमि मोरी॥

अनुवाद (हिन्दी)

मेघांविना निर्मळ आकाश असे शोभून दिसत आहे की, ज्याप्रमाणे भगवद्भक्त सर्व आशा सोडून निर्मळ होतात. कुठे कुठे शरदऋतूचा थोडा थोडा पाऊस पडत आहे, ज्याप्रमाणे कोणी विरळाच माझी भक्ती प्राप्त करतो.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

चले हरषि तजि नगर नृप तापस बनिक भिखारि।
जिमि हरिभगति पाइ श्रम तजहिं आश्रमी चारि॥ १६॥

अनुवाद (हिन्दी)

शरदऋतू आल्यामुळे राजा, तपस्वी, व्यापारी आणि भिक्षुक हे विजय, तप, व्यापार आणि भिक्षुकी मिळवण्यासाठी आनंदाने नगर सोडून निघतात, त्याप्रमाणे श्रीहरीची भक्ती मिळाल्यावर चारी आश्रमांतील लोक नाना प्रकारच्या साधनांचे श्रम सोडून देतात.॥ १६॥

मूल (चौपाई)

सुखी मीन जे नीर अगाधा।
जिमि हरि सरन न एकउ बाधा॥
फूलें कमल सोह सर कैसा।
निर्गुन ब्रह्म सगुन भएँ जैसा॥

अनुवाद (हिन्दी)

जे मासे खोल पाण्यात आहेत, ते सुखी आहेत. ज्याप्रमाणे श्रीहरीला शरण गेल्यावर एकही संकट येत नाही. कमळांनी फुललेले तलाव असे शोभत आहेत की, जसे निर्गुण ब्रह्म सगुण झाल्यावर शोभून दिसते.॥ १॥

मूल (चौपाई)

गुंजत मधुकर मुखर अनूपा।
सुंदर खग रव नाना रूपा॥
चक्रबाक मन दुख निसि पेखी।
जिमि दुर्जन पर संपति देखी॥

अनुवाद (हिन्दी)

भ्रमर अनुपम आवाज करीत गुंजन करीत आहेत आणि पक्षी नानाप्रकारचे सुंदर कूजन करीत आहेत. रात्र झाल्याचे पाहून चक्रवाक पक्ष्याच्या मनात तसेच दुःख होते, ज्याप्रमाणे दुसऱ्याची संपत्ती पाहून दुष्टाला दुःख वाटते.॥ २॥

मूल (चौपाई)

चातक रटत तृषा अति ओही।
जिमि सुख लहइ न संकरद्रोही॥
सरदातप निसि ससि अपहरई।
संत दरस जिमि पातक टरई॥

अनुवाद (हिन्दी)

चातक ढगाला आळवत आहे, त्याला खूप तहान लागली आहे, ज्याप्रमाणे शंकरांचा द्वेष करणाऱ्या माणसाला सुख न मिळाल्यामुळे तो दुःखी होतो. शरदऋतूचा ताप रात्री चंद्र हरण करतो, ज्याप्रमाणे संतांच्या दर्शनाने पापे नाहीशी होतात.॥ ३॥

मूल (चौपाई)

देखि इंदु चकोर समुदाई।
चितवहिं जिमि हरिजन हरि पाई॥
मसक दंस बीते हिम त्रासा।
जिमि द्विज द्रोह किएँ कुल नासा॥

अनुवाद (हिन्दी)

चकोर पक्ष्यांचे समुदाय चंद्राला अशा प्रकारे एकटक पाहू लागतात, ज्याप्रमाणे भगवद्भक्त भगवंत भेटल्यावर निर्निमेष नेत्रांनी त्यांचे दर्शन घेतात. मच्छर, डास हे थंडीच्या भीतीने अशा प्रकारे नाहीसे झाले आहेत की, ज्याप्रमाणे ब्राह्मणांशी वैर केल्याने कुळाचा नाश होतो.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भूमि जीव संकुल रहे गए सरद रितु पाइ।
सदगुर मिलें जाहिं जिमि संसय भ्रम समुदाइ॥ १७॥

अनुवाद (हिन्दी)

वर्षाऋतूमुळे पृथ्वीवर जे जीव भरले होते, ते जीव शरदऋतू आल्यावर नष्ट झाले, ज्याप्रमाणे सद्गुरू लाभल्यावर संशय आणि भ्रम यांचे समूह नष्ट होतात.॥ १७॥