१५ नारद-राम-संवाद

मूल (चौपाई)

बिरहवंत भगवंतहि देखी।
नारद मन भा सोच बिसेषी॥
मोर साप करि अंगीकारा।
सहत राम नाना दुख भारा॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंतांना विरही अवस्थेत पाहून नारदांना मनातून विशेष दुःख झाले. त्यांनी विचार केला की, माझाच शाप स्वीकारून श्रीराम हे नाना प्रकारची दुःखे सहन करीत आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

ऐसे प्रभुहि बिलोकउँ जाई।
पुनि न बनिहि अस अवसरु आई॥
यह बिचारि नारद कर बीना।
गए जहाँ प्रभु सुख आसीना॥

अनुवाद (हिन्दी)

अशा भक्तवत्सल प्रभूंना जाऊन पहावे तरी. पुन्हा अशी संधी येणार नाही.असा विचार करून नारद हातात वीणा घेऊन प्रभू जेथे सुखाने बसले होते, तेथे गेले.॥ ४॥

मूल (चौपाई)

गावत राम चरित मृदु बानी।
प्रेम सहित बहु भाँति बखानी॥
करत दंडवत लिए उठाई।
राखे बहुत बार उर लाई॥

अनुवाद (हिन्दी)

ते कोमल वाणीने व मोठॺा प्रेमाने राम-चरित्राचे वर्णन गात जात होते. ते दंडवत करीत आहेत, असे पाहून श्रीरामांनी त्यांना उठवले व हृदयाशी धरले.॥ ५॥

मूल (चौपाई)

स्वागत पूँछि निकट बैठारे।
लछिमन सादर चरन पखारे॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर त्यांचे स्वागत करून व खुशाली विचारून त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले. लक्ष्मणाने आदराने त्यांचे चरण धुतले.॥ ६॥

दोहा

मूल (दोहा)

नाना बिधि बिनती करि प्रभु प्रसन्न जियँ जानि।
नारद बोले बचन तब जोरि सरोरुह पानि॥ ४१॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारे प्रभूंची विनवणी करून व ते प्रसन्न आहेत, असे पाहून नारद आपले कर-कमल जोडून म्हणाले,॥ ४१॥

मूल (चौपाई)

सुनहु उदार सहज रघुनायक।
सुंदर अगम सुगम बर दायक॥
देहु एक बर मागउँ स्वामी।
जद्यपि जानत अंतरजामी॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे स्वभावाने उदार असलेल्या श्रीरघुनाथा, तुम्ही सुंदर, दुर्लभ व सुखदायक वर देणारे आहात. हे स्वामी, मी एक वर मागतो, तो मला द्या. अंतर्यामी असल्यामुळे तुम्ही सर्व जाणताच.’॥ १॥

मूल (चौपाई)

जानहु मुनि तुम्ह मोर सुभाऊ।
जन सन कबहुँ कि करउँ दुराऊ॥
कवन बस्तु असि प्रिय मोहि लागी।
जो मुनिबर न सकहु तुम्ह मागी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम म्हणाले, ‘हे मुनी, तुम्ही माझा स्वभाव जाणताच. मी आपल्या भक्तांपासून काही लपवून ठेवतो काय? मला अशी कोणती गोष्ट प्रिय वाटते की, ती हे मुनिश्रेष्ठ, तुम्ही मागू शकणार नाही?॥ २॥

मूल (चौपाई)

जन कहुँ कछु अदेय नहिं मोरें।
अस बिस्वास तजहु जनि भोरें॥
तब नारद बोले हरषाई।
अस बर मागउँ करउँ ढिठाई॥

अनुवाद (हिन्दी)

भक्ताला न देण्यासारखे माझ्याकडे काही नाही, हा विश्वास चुकूनही विसरू नका.’ तेव्हा हर्षित होऊन नारद म्हणाले की, ‘मी असा वर मागण्याचे धाडस करीत आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

जद्यपि प्रभु के नाम अनेका।
श्रुति कह अधिक एक तें एका॥
राम सकल नामन्ह तें अधिका।
होउ नाथ अघ खग गन बधिका॥

अनुवाद (हिन्दी)

जरी प्रभूंची अनेक नावे आहेत आणि ती सर्व एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत, असे वेद सांगतात, तरीही हे नाथ, रामनाम हे सर्व नामांहून श्रेष्ठ असावे आणि ते पापरूपी पक्ष्यांच्या समूहासाठी पारध्याप्रमाणे असावे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राका रजनी भगति तव राम नाम सोइ सोम।
अपर नाम उडगन बिमल बसहुँ भगत उर ब्योम॥ ४२(क)॥

अनुवाद (हिन्दी)

तुमची भक्ती ही पौर्णिमेची रात्र आहे. आणि तिच्यात ‘राम’ नाम हे पूर्ण चंद्रासारखे बनून इतर सर्व नामे तारागण बनून भक्तांच्या हृदयरूपी निर्मळ आकाशात निवास करोत.’॥ ४२(क)॥

मूल (दोहा)

एवमस्तु मुनि सन कहेउ कृपासिंधु रघुनाथ।
तब नारद मन हरष अति प्रभु पद नायउ माथ॥ ४२(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

कृपासागर श्रीरघुनाथांनी मुनींना ‘तथास्तु’ म्हटले. तेव्हा नारद मनापासून आनंदित होऊन प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले.॥ ४२(ख)॥

मूल (चौपाई)

अति प्रसन्न रघुनाथहि जानी।
पुनि नारद बोले मृदु बानी॥
राम जबहिं प्रेरेउ निज माया।
मोहेहु मोहि सुनहु रघुराया॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ अत्यंत प्रसन्न असलेले पाहून नारद पुन्हा मृदू वाणीने म्हणाले-‘हे श्रीराम, हे रघुनाथ, जेव्हा तुम्ही आपल्या मायेने मला प्रेरित करून मोहित केले होते,॥ १॥

मूल (चौपाई)

तब बिबाह मैं चाहउँ कीन्हा।
प्रभु केहि कारन करै न दीन्हा॥
सुनु मुनि तोहि कहउँ सहरोसा।
भजहिं जे मोहि तजि सकल भरोसा॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा मी विवाह करू इच्छित होतो. हे प्रभू, तुम्ही त्या वेळी मला कोणत्या कारणाने विवाह करू दिला नाहीत?’ प्रभू म्हणाले, ‘हे मुनी, मी तुम्हांला अत्यंत हर्षाने सांगतो की, जे सर्व आशा व विषयविश्वास सोडून फक्त मलाच भजतात.॥ २॥

मूल (चौपाई)

करउँ सदा तिन्ह कै रखवारी।
जिमि बालक राखइ महतारी॥
गह सिसु बच्छ अनल अहि धाई।
तहँ राखइ जननी अरगाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांचे रक्षण मी, माता जशी बालकाची काळजी घेते, तशी करतो. लहान मूल जेव्हा धावत आग किंवा साप पकडण्यास जाते, तेव्हा आई त्याला हाताने मागे ओढून वाचविते.॥ ३॥

मूल (चौपाई)

प्रौढ़ भएँ तेहि सुत पर माता।
प्रीति करइ नहिं पाछिलि बाता॥
मोरें प्रौढ़ तनय सम ग्यानी।
बालक सुत सम दास अमानी॥

अनुवाद (हिन्दी)

मूल शहाणे झाल्यावर माता त्याच्यावर प्रेम तर करते, पण ती पूर्वीची गोष्ट उरत नाही. माता त्याला वाचविण्याची काळजी करीत नाही. तो आपले रक्षण आपण करू शकतो. ज्ञानीजन हे माझे प्रौढ शहाण्या पुत्रासारखे आहेत. तुमच्यासारखा आपल्या बळाची घमेंड न बाळगणारा सेवक हा माझ्या लहान मुलासारखा आहे. ॥ ४॥

मूल (चौपाई)

जनहि मोर बल निज बल ताही।
दुहु कहँ काम क्रोध रिपु आही॥
यह बिचारि पंडित मोहि भजहीं।
पाएहुँ ग्यान भगति नहिं तजहीं॥

अनुवाद (हिन्दी)

माझ्या सेवकाला फक्त माझ्याच बळाचा आधार असतो. आणि तो ज्ञानी मनुष्य स्वतःच्या बळावर विसंबून असतो. परंतु काम-क्रोधरूपी शत्रू हे तर दोघांनाही आहेत. भक्ताच्या शत्रूला मारण्याची जबाबदारी माझी आहे, कारण तो मला शरण असल्यामुळे माझेच बळ मानतो, परंतु स्वतःचे बळ मानणाऱ्या ज्ञानी मनुष्याची जबाबदारी माझ्यावर नाही. असा विचार करून बुद्धिमान लोक मलाच भजतात. ज्ञान प्राप्त झाल्यावरही ते भक्ती सोडत नाहीत.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

काम क्रोध लोभादि मद प्रबल मोह कै धारि।
तिन्ह महँ अति दारुन दुखद मायारूपी नारि॥ ४३॥

अनुवाद (हिन्दी)

काम, क्रोध, लोभ, मद इत्यादी प्रबळ सेना आहे. यामध्ये मायारूपिणी स्त्री ही अत्यंत दारुण दुःख देणारी आहे.॥ ४३॥

मूल (चौपाई)

सुनु मुनि कह पुरान श्रुति संता।
मोह बिपिन कहुँ नारि बसंता॥
जप तप नेम जलाश्रय झारी।
होइ ग्रीषम सोषइ सब नारी॥

अनुवाद (हिन्दी)

हे मुनि, ऐका. पुराण, वेद व संत असे म्हणतात की, मोहरूपी वनाला फुलविणारा हा वसंत ऋतू आहे. जप, तप, नियमरूपी संपूर्ण जल-स्थानांना स्त्री ही ग्रीष्म ऋतू बनून शोषून घेते.॥ १॥

मूल (चौपाई)

काम क्रोध मद मत्सर भेका।
इन्हहि हरषप्रद बरषा एका॥
दुर्बासना कुमुद समुदाई।
तिन्ह कहँ सरद सदा सुखदाई॥

अनुवाद (हिन्दी)

काम, क्रोध, मद व मत्सर हे बेडूक आहेत. यांना वर्षा-ऋतू बनून हर्ष देणारी स्त्री हीच एकमात्र आहे. वाईट वासना या कुमूदांचे समूह आहेत. त्यांना सदैव सुख देणारी स्त्री ही शरदऋतू आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

धर्म सकल सरसीरुह बृंदा।
होइ हिम तिन्हहि दहइ सुख मंदा॥
पुनि ममता जवास बहुताई।
पलुहइ नारि सिसिर रितु पाई॥

अनुवाद (हिन्दी)

संपूर्ण धर्म हे कमलांचे ताटवे आहेत. ही विषयजन्य सुख देणारी स्त्री हिम-ऋतू होऊन त्यांना नष्ट करते. मग ममतारूपी तांबडॺा धमाशाचे वन स्त्रीरूपी शिशिर-ऋतू येताच हिरवेगार बनते.॥ ३॥

मूल (चौपाई)

पाप उलूक निकर सुखकारी।
नारि निबिड़ रजनी अँधिआरी॥
बुधि बल सील सत्य सब मीना।
बनसी सम त्रिय कहहिं प्रबीना॥

अनुवाद (हिन्दी)

पापरूपी घुबडांच्या समूहांना सुख देणारी स्त्री ही घोर अंधकारमय रात्र आहे. बुद्धी, बल, शील व सत्य हे सर्व मासे आहेत आणि त्यांना फसवून त्यांचा नाश करण्यासाठी स्त्री ही गळासारखी आहे, असे चतुर पुरुष म्हणतात.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अवगुन मूल सूलप्रद प्रमदा सब दुख खानि।
ताते कीन्ह निवारन मुनि मैं यह जियँ जानि॥ ४४॥

अनुवाद (हिन्दी)

तरुण स्त्री ही अवगुणांचे मूळ, पीडा देणारी आणि सर्व दुःखांची खाण आहे. म्हणून हे मुनी, मनात असा विचार करून तुम्हांला विवाह करण्यापासून मी रोखले होते.’॥ ४४॥

मूल (चौपाई)

सुनि रघुपति के बचन सुहाए।
मुनि तन पुलक नयन भरि आए॥
कहहु कवन प्रभु कै असि रीती।
सेवक पर ममता अरु प्रीती॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांचे हे सुंदर बोलणे ऐकून मुनींचे शरीर रोमांचित झाले आणि नेत्र प्रेमाश्रूंनी भरले. ते मनात म्हणू लागले, कोणत्या प्रभूची अशी रीत आहे की, ज्यांचे सेवकावर इतके ममत्व व प्रेम असेल?॥ १॥