१४ शबरीवर कृपा

मूल (चौपाई)

ताहि देइ गति राम उदारा।
सबरी कें आश्रम पगु धारा॥
सबरी देखि राम गृहँ आए।
मुनि के बचन समुझि जियँ भाए॥

अनुवाद (हिन्दी)

उदार श्रीराम त्याला गती देऊन शबरीच्या वनात आले. श्रीराम आपल्या घरी आल्याचे शबरीने पाहिले, तेव्हा मतंग मुनींचे वचन आठवून तिचे मन प्रसन्न झाले.॥ ३॥

मूल (चौपाई)

सरसिज लोचन बाहु बिसाला।
जटा मुकुट सिर उर बनमाला॥
स्याम गौर सुंदर दोउ भाई।
सबरी परी चरन लपटाई॥

अनुवाद (हिन्दी)

कमलासारखे नेत्र व विशाल भुजा असलेल्या, शिरावर जटांचा मुकुट आणि गळ्यात वनमाला धारण केलेल्या, सुंदर, सावळ्या आणि गोऱ्या त्या दोघा बंधूंचे चरण शबरीने धरले.॥ ४॥

मूल (चौपाई)

प्रेम मगन मुख बचन न आवा।
पुनि पुनि पद सरोज सिर नावा॥
सादर जल लै चरन पखारे।
पुनि सुंदर आसन बैठारे॥

अनुवाद (हिन्दी)

ती प्रेमात इतकी मग्न झाली होती की, तोंडातून शब्द निघत नव्हता. वारंवार चरण-कमलांवर नतमस्तक होत होती. नंतर तिने पाणी आणून मोठॺा आदराने दोघा भावांचे चरण धुतले आणि त्यांना सुंदर आसनांवर बसविले.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

कंद मूल फल सुरस अति दिए राम कहुँ आनि।
प्रेम सहित प्रभु खाए बारंबार बखानि॥ ३४॥

अनुवाद (हिन्दी)

तिने अत्यंत रसाळ व स्वादिष्ट कंद-मुळे आणि फळे आणून श्रीरामांना दिली. श्रीप्रभूंनी वारंवार प्रशंसा करीत ती प्रेमाने खाल्ली.॥ ३४॥

मूल (चौपाई)

पानि जोरि आगें भइ ठाढ़ी।
प्रभुहि बिलोकि प्रीति अति बाढ़ी॥
केहि बिधि अस्तुति करौं तुम्हारी।
अधम जाति मैं जड़मति भारी॥

अनुवाद (हिन्दी)

मग ती हात जोडून समोर उभी राहिली. प्रभूंना पाहून तिचे प्रेम उचंबळून आले. ती म्हणाली, ‘मी कशा प्रकारे तुमची स्तुती करू? मी नीच जातीची आणि अत्यंत मंदबुद्धीची आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

अधम ते अधमअधम अति नारी।
तिन्ह महँ मैं मतिमंद अघारी॥
कह रघुपति सुनु भामिनि बाता।
मानउँ एक भगति कर नाता॥

अनुवाद (हिन्दी)

जे अधमांपेक्षा अधम आहेत, त्यांच्यामध्येही स्त्रिया या अत्यंत अधम आहेत. हे पापनाशना, त्यातही पुन्हा मी मंदबुद्धीची आहे.’ श्रीराम म्हणाले, ‘हे भामिनी, माझे ऐक. मी फक्त भक्तीला महत्त्व देतो.॥ २॥

मूल (चौपाई)

जाति पाँति कुल धर्म बड़ाई।
धन बल परिजन गुन चतुराई॥
भगति हीन नर सोहइ कैसा।
बिनु जल बारिद देखिअ जैसा॥

अनुवाद (हिन्दी)

जात-पात, कुल, मोठेपणा, धन, बल, कुटुंब, गुण आणि चातुर्य हे सर्व असूनही भक्तीने रहित मनुष्य जलहीन मेघासारखा मला वाटतो.॥ ३॥

मूल (चौपाई)

नवधा भगति कहउँ तोहि पाहीं।
सावधान सुनु धरु मन माहीं॥
प्रथम भगति संतन्ह कर संगा।
दूसरि रति मम कथा प्रसंगा॥

अनुवाद (हिन्दी)

मी तुला आता माझी नवविधा भक्ती सांगतो. तू लक्ष देऊन ऐक आणि मनात ठेव. पहिली भक्ती म्हणजे संतांचा संग. दुसरी भक्ती आहे माझ्या कथा-प्रसंगांबद्दल प्रेम.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

गुर पद पंकज सेवा तीसरि भगति अमान।
चौथि भगति मम गुन गन करइ कपट तजि गान॥ ३५॥

अनुवाद (हिन्दी)

अभिमानरहित होऊन गुरूंच्या चरणांची सेवा ही तिसरी भक्ती आणि निष्कपट भावनेने माझे गुणगान करणे ही चौथी भक्ती.॥ ३५॥

मूल (चौपाई)

मंत्र जाप मम दृढ़ बिस्वासा।
पंचम भजन सो बेद प्रकासा॥
छठ दम सीलबिरति बहु करमा।
निरत निरंतर सज्जन धरमा॥

अनुवाद (हिन्दी)

माझ्या राममंत्राचा जप आणि माझ्यावर दृढ विश्वास ही पाचवी भक्ती. वेदांमध्ये ही प्रसिद्ध आहे. सहावी भक्ती म्हणजे इंद्रियनिग्रह, शील, अनेक लौकिक कार्यांबद्दल वैराग्य आणि संत पुरुषांप्रमाणे आचरण करणे, हे होय.॥ १॥

मूल (चौपाई)

सातवँ सम मोहि मय जग देखा।
मोतें संत अधिक करि लेखा॥
आठवँ जथालाभ संतोषा।
सपनेहुँ नहिं देखइ परदोषा॥

अनुवाद (हिन्दी)

सातवी भक्ती म्हणजे संपूर्ण जगाला समभावाने माझ्यामध्ये ओतप्रोत असलेले पाहणे आणि संतांना माझ्यापेक्षाही अधिक मानणे. आठवी भक्ती म्हणजे जे काही मिळेल, त्यात संतोष मानणे आणि स्वप्नातही कधी दुसऱ्याचे दोष न पाहणे.॥ २॥

मूल (चौपाई)

नवम सरल सब सन छलहीना।
मम भरोस हियँ हरष न दीना॥
नव महुँ एकउ जिन्ह कें होई।
नारि पुरुष सचराचर कोई॥

अनुवाद (हिन्दी)

नववी भक्ती म्हणजे सरळपणा व सर्वांबरोबर कपटरहित वागणे, मनातून माझ्यावर श्रद्धा ठेवणे आणि कोणत्याही अवस्थेमध्ये हर्ष व दैन्य नसणे. या नऊंपैकी ज्याला एकही भक्ती प्राप्त असते, तो स्त्री-पुरुष, जड-चेतन कुणीही असो,॥ ३॥

मूल (चौपाई)

सोइ अतिसय प्रिय भामिनि मोरें।
सकल प्रकार भगति दृढ़ तोरें॥
जोगि बृंद दुरलभ गति जोई।
तो कहुँ आजु सुलभ भइ सोई॥

अनुवाद (हिन्दी)

हे भामिनी, तोच मला प्रिय आहे आणि तुझ्यात तर सर्व भक्ती दृढ आहेत. म्हणून योग्यांनाही जी गती दुर्लभ आहे, तीच आज तुला सुलभ झाली आहे.॥ ४॥

मूल (चौपाई)

मम दरसन फल परम अनूपा।
जीव पाव निज सहज सरूपा॥
जनकसुता कइ सुधि भामिनी।
जानहि कहु करिबर गामिनी॥

अनुवाद (हिन्दी)

जीव आपले सहज स्वरूप प्राप्त करतो, हेच माझ्या दर्शनाचे परम अनुपम फल आहे. बाई गं! जर तुला सुंदरी सीतेची काही बातमी असेल, तर ती आता सांग.’॥ ५॥

मूल (चौपाई)

पंपा सरहि जाहु रघुराई।
तहँ होइहि सुग्रीव मिताई॥
सो सब कहिहि देव रघुबीरा।
जानतहूँ पूछहु मतिधीरा॥

अनुवाद (हिन्दी)

शबरी म्हणाली, ‘हे रघुनाथ, तुम्ही पंपासरोवराला जा. तेथे तुमची सुग्रीवाशी मैत्री होईल. हे देवा, हे रघुवीरा, तो सर्व परिस्थिती सांगेल. हे धीरबुद्धी श्रीराम, सर्व जाणत असतानाही तुम्ही मला विचारता आहात.’॥ ६॥

मूल (चौपाई)

बार बार प्रभु पद सिरु नाई।
प्रेम सहित सब कथा सुनाई॥

अनुवाद (हिन्दी)

वारंवार प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन तिने प्रेमाने आपली सर्व कथा सांगितली.॥ ७॥

छंद

मूल (दोहा)

कहि कथा सकल बिलोकि हरि मुख हृदयँ पद पंकज धरे।
तजि जोग पावक देह हरि पद लीन भइ जहँ नहिं फिरे॥
नर बिबिध कर्म अधर्म बहु मत सोकप्रद सब त्यागहू।
बिस्वास करि कह दास तुलसी राम पद अनुरागहू॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व कथा सांगितल्यावर भगवंतांच्या मुखाचे दर्शन घेऊन, हृदयामध्ये तिने त्यांचे चरण-कमल धारण केले आणि योगाग्नीने देह-त्याग करून ती दुर्लभ हरिपदांमध्ये लीन झाली की, जेथून परत यावे लागत नाही. तुलसीदास म्हणतात की, अनेक प्रकारची कर्मे, अधर्म आणि अनेक मते ही सर्व दुःख देणारी आहेत. मनुष्यांनो, त्यांचा त्याग करा आणि विश्वासपूर्वक श्रीरामांच्या चरणी प्रेम करा.

दोहा

मूल (दोहा)

जाति हीन अघ जन्म महि मुक्त कीन्हि असि नारि।
महामंद मन सुख चहसि ऐसे प्रभुहि बिसारि॥ ३६॥

अनुवाद (हिन्दी)

जी शबरी हलक्या जातीत जन्मली असतानाही तिला ज्यांनी मुक्त केले, अरे महामूर्ख मना, तू अशा प्रभूंना विसरून ऐहिक सुखप्राप्तीची इच्छा करतोस?॥ ३६॥

मूल (चौपाई)

चले राम त्यागा बन सोऊ।
अतुलित बल नर केहरि दोऊ॥
बिरही इव प्रभु करत बिषादा।
कहत कथा अनेक संबादा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांनी ते वन सोडले आणि ते पुढे निघाले. दोन्ही पुरुषसिंह बंधू अतुलनीय बलवान होते. प्रभू एखाद्या विरही पुरुषाप्रमाणे विषाद करीत अनेक कथा सांगत संवाद करीत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

लछिमन देखु बिपिन कइ सोभा।
देखत केहि कर मन नहिं छोभा॥
नारि सहित सब खग मृग बृंदा।
मानहुँ मोरि करत हहिं निंदा॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे लक्ष्मणा, जरा वनाची शोभा तर बघ. ती पाहून कुणाचे मन क्षुब्ध होणार नाही? पक्षी व पशूंचे समूह हे सर्व आपापल्यामाद्यांसोबत आहेत, जणू ते माझी निंदा करीत आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

हमहि देखि मृग निकर पराहीं।
मृगीं कहहिं तुम्ह कहँ भय नाहीं॥
तुम्ह आनंद करहु मृग जाए।
कंचन मृग खोजन ए आए॥

अनुवाद (हिन्दी)

आपणाला पाहून घाबरून हरिणांचे कळप पळत आहेत, तेव्हा हरिणी त्यांना म्हणत आहेत, ‘तुम्ही भिऊ नका. तुम्ही तर सामान्य हरीण आहात, म्हणून तुम्ही आनंदात राहा. हे लोक सोन्याचे हरीण शोधायला आले आहेत.’॥ ३॥

मूल (चौपाई)

संग लाइ करिनीं करि लेहीं।
मानहुँ मोहि सिखावनु देहीं॥
सास्त्र सुचिंतित पुनि पुनि देखिअ।
भूप सुसेवित बस नहिं लेखिअ॥

अनुवाद (हिन्दी)

हत्ती हत्तिणींच्या मागे असतात. ते जणू मला शिकवीत आहेत की, ‘स्त्रीला कधी एकटे सोडू नये. गहनपणे चिंतन केलेली शास्त्रेही वारंवार पहात राहिले पाहिजे. चांगल्या प्रकारे सेवा केल्यावरही राजा आपल्याला वश आहे, असे समजू नये.॥ ४॥

मूल (चौपाई)

राखिअ नारि जदपि उर माहीं।
जुबती सास्त्र नृपति बस नाहीं॥
देखहु तात बसंत सुहावा।
प्रिया हीन मोहि भय उपजावा॥

अनुवाद (हिन्दी)

आणि स्त्रीला अगदी हृदयात ठेवले, तरी युवती स्त्री, शास्त्र आणि राजा कुणालाही वश होत नाहीत. हे बंधो! हा सुंदर वसंत ऋतू बघ. प्रियेविना तो माझ्या मनात भय उत्पन्न करीत आहे.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

बिरह बिकल बलहीन मोहि जानेसि निपट अकेल।
सहित बिपिन मधुकर खग मदन कीन्ह बगमेल॥ ३७(क)॥

अनुवाद (हिन्दी)

मी विरहाने व्याकूळ, बलहीन आणि अगदी एकटा झालो आहे, हे पाहून कामदेवाने वने, भ्रमर आणि पक्षी यांना घेऊन माझ्यावर हल्ला केला आहे.॥ ३७(क)॥

मूल (दोहा)

देखि गयउ भ्राता सहित तासु दूत सुनि बात।
डेरा कीन्हेउ मनहुँ तब कटकु हटकि मनजात॥ ३७(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु जेव्हा त्याला दिसले की, माझ्यासोबत भाऊ आहे, मी एकटा नाही, तेव्हा ही गोष्ट ऐकल्यावर कामदेवाने जणू आपली सेना थांबवून तळ ठोकला आहे.॥ ३७(ख)॥

मूल (चौपाई)

बिटप बिसाल लता अरुझानी।
बिबिध बितान दिए जनु तानी॥
कदलि ताल बर ध्वजा पताका।
देखि न मोह धीर मन जाका॥

अनुवाद (हिन्दी)

विशाल वृक्षांना बिलगलेल्या वेली पाहून असे वाटते की, जणू नाना प्रकारचे तंबू ठोकले आहेत. केळी, ताड हे जणू सुंदर ध्वज-पताका आहेत. त्या पाहून ज्याचे मन धीट आहे, तोच मोहित होणार नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

बिबिध भाँति फूले तरु नाना।
जनु बा नैत बने बहु बाना॥
कहुँ कहुँ सुंदर बिटप सुहाए।
जनु भट बिलग बिलग होइ छाए॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक वृक्ष नाना प्रकारे फुललेले आहेत. जणू ते वेगवेगळे वेष घातलेले पुष्कळ तिरंदाज असावेत, असे वाटते. कुठे कुठे सुंदर वृक्ष शोभून दिसत आहेत. ते जणू वेगवेगळ्या ठिकाणी योद्ध्यांनी छावणी केल्याप्रमाणे वाटतात.॥ २॥

मूल (चौपाई)

कूजत पिक मानहुँ गज माते।
ढेक महोख ऊँट बिसराते॥
मोर चकोर कीर बर बाजी।
पारावत मराल सब ताजी॥

अनुवाद (हिन्दी)

कोकिळ कूजन करीत आहेत, ते जणू मत्त हत्ती आहेत. तितर, लावा पक्षी जणू उंट व खेचरे आहेत. मोर, चकोर, पोपट, कबूतर आणि हंस हे सर्व जणू अरबी घोडे आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

तीतिर लावक पदचर जूथा।
बरनि न जाइ मनोज बरूथा॥
रथ गिरि सिला दुंदुभीं झरना।
चातक बंदी गुन गन बरना॥

अनुवाद (हिन्दी)

तितिर व बटेर पक्षी हे पायदळ शिपायांचे जमाव आहेत. कामदेवाची सेना अद्भुत आहे. पर्वतावरील शिळा हे रथ व पाण्याचे झरे हे नगारे आहेत. चातक हे भाट आहेत. ते बिरुदावली गात आहेत.॥ ४॥

मूल (चौपाई)

मधुकर मुखर भेरि सहनाई।
त्रिबिध बयारि बसीठीं आई॥
चतुरंगिनी सेन सँग लीन्हें।
बिचरत सबहि चुनौती दीन्हें॥

अनुवाद (हिन्दी)

भ्रमरांचा गुंजारव दुंदुभी आणि सनई आहेत. शीतल, मंद आणि सुगंधित वारे जणू दूताचे काम करण्यासाठी आले आहेत. अशा प्रकारे चतुरंग सेना बरोबर घेऊन कामदेव जणू सर्वांना आव्हान देत फिरत आहे.॥ ५॥

मूल (चौपाई)

लछिमन देखत काम अनीका।
रहहिं धीर तिन्ह कै जग लीका॥
एहि कें एक परम बल नारी।
तेहि तें उबर सुभट सोइ भारी॥

अनुवाद (हिन्दी)

हे लक्ष्मणा, कामदेवाची ही सेना पाहूनही जे निश्चल रहातात. त्यांनाच जगात प्रतिष्ठा मिळते. स्त्रीमध्ये या कामदेवाची मोठी शक्ती आहे. तिच्यापासून जो बचावेल, तोच मोठा योद्धा होय.॥ ६॥

दोहा

मूल (दोहा)

तात तीनि अति प्रबल खल काम क्रोध अरु लोभ।
मुनि बिग्यान धाम मन करहिं निमिष महुँ छोभ॥ ३८(क)॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधो! काम, क्रोध आणि लोभ हे तिन्ही अत्यंत प्रबल व दुष्ट आहेत. ते ज्ञानसंपन्न मुनींचेही मन क्षणात क्षुब्ध करून टाकतात.॥ ३८(क)॥

मूल (दोहा)

लोभ कें इच्छा दंभ बल काम कें केवल नारि।
क्रोध कें परुष बचन बल मुनिबर कहहिं बिचारि॥ ३८(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

लोभाला इच्छा व दंभाचे बळ असते, कामाला केवळ स्त्रीचे बळ असते आणि क्रोधाला कठोर वचनांचे. श्रेष्ठ मुनी विचारपूर्वक असेच सांगतात.’॥ ३८(ख)॥

मूल (चौपाई)

गुनातीत सचराचर स्वामी।
राम उमा सब अंतरजामी॥
कामिन्ह कै दीनता देखाई।
धीरन्ह कें मन बिरति दृढ़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

शिव म्हणतात, ‘हे पार्वती, श्रीरामचंद्र हे त्रिगुणातीत, चराचर जगाचे स्वामी आणि सर्वांच्या मनातील जाणणारे आहेत.’ त्यांनी वरील वर्णनातून कामी लोकांची लाचारी दाखवून दिली आणि विवेकी पुरुषांच्या मनातील वैराग्य दृढ केले.॥ १॥

मूल (चौपाई)

क्रोध मनोज लोभ मद माया।
छूटहिं सकल राम कीं दाया॥
सो नर इंद्रजाल नहिं भूला।
जा पर होइ सो नट अनुकूला॥

अनुवाद (हिन्दी)

काम, क्रोध, लोभ, मद आणि माया हे सर्व श्रीरामांच्या दयेमुळे सुटतात. ते नटराज भगवंत ज्याच्यावर प्रसन्न होतात, तो मनुष्य मायेमुळे भटकत नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

उमा कहउँ मैं अनुभव अपना।
सत हरि भजनु जगत सब सपना॥
पुनि प्रभु गए सरोबर तीरा।
पंपा नाम सुभग गंभीरा॥

अनुवाद (हिन्दी)

हे उमे, मी तुला आपला अनुभव सांगतो. हरीचे भजनच सत्य आहे आणि हे संपूर्ण जग स्वप्नाप्रमाणे खोटे आहे. नंतर प्रभू श्रीराम पंपा नामक सुंदर आणि अथांग सरोवराकाठी आले.॥ ३॥

मूल (चौपाई)

संत हृदय जस निर्मल बारी।
बाँधे घाट मनोहर चारी॥
जहँ तहँ पिअहिं बिबिध मृग नीरा।
जनु उदार गृह जाचक भीरा॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सरोवराचे पाणी संतांच्या हृदयाप्रमाणे निर्मळ होते. त्याला बांधलेले मनोहर सुंदर चार घाट होते. तऱ्हेतऱ्हेचे पशू इकडे तिकडे पाणी पीत होते. जणू उदार दानी पुरुषांच्या घरी याचकांची गर्दी झालेली असावी.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

पुरइनि सघन ओट जल बेगि न पाइअ मर्म।
मायाछन्न न देखिऐ जैसें निर्गुन ब्रह्म॥ ३९(क)॥

अनुवाद (हिन्दी)

दाट कमल-पत्रांनी झाकलेल्या पाण्याचा लवकर पत्ता लागत नाही, ज्याप्रमाणे मायेने झाकल्यामुळे निर्गुण ब्रह्म दिसत नाही.॥ ३९(क)॥

मूल (दोहा)

सुखी मीन सब एकरस अति अगाध जल माहिं।
जथा धर्मसीलन्ह के दिन सुख संजुत जाहिं॥ ३९(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सरोवराच्या अत्यंत अथांग जलामध्ये सर्व मासे सतत एकसमान सुखी रहात होते. ज्याप्रमाणे धर्मशील पुरुषांचे सर्व दिवस सुखात जातात.॥ ३९(ख)॥

मूल (चौपाई)

बिकसे सरसिज नाना रंगा।
मधुर मुखर गुंजत बहु भृंगा॥
बोलत जलकुक्कुट कलहंसा।
प्रभु बिलोकि जनु करत प्रसंसा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यात रंगी-बेरंगी कमळे उमललेली होती. पुष्कळ भ्रमर मधुर स्वरांनी गुंजारव करीत होते. पाणकोंबडे व राजहंस बोलत होते, जणू प्रभूंना पाहून ते त्यांची प्रशंसा करीत असावेत.॥ १॥

मूल (चौपाई)

चक्रबाक बक खग समुदाई।
देखत बनइ बरनि नहिं जाई॥
सुंदर खग गन गिरा सुहाई।
जात पथिक जनु लेत बोलाई॥

अनुवाद (हिन्दी)

चक्रवाक, बगळे इत्यादी पक्ष्यांचे समुदाय पहातच रहावे, असे अवर्णनीय वाटत होते. सुंदर पक्ष्यांची किलबिल फार गोड वाटत होती; जणू रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूंना ते बोलावीत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

ताल समीप मुनिन्ह गृह छाए।
चहु दिसि कानन बिटप सुहाए॥
चंपक बकुल कदंब तमाला।
पाटल पनस परास रसाला॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सरोवराजवळ मुनींनी आश्रम बनविले होते. त्याच्या चारी बाजूंना वनातील सुंदर वृक्ष होते. चाफा, बकुळ, कदंब, तमाल,पाटल, फणस, पळस, आम्रवृक्ष इत्यादी॥ ३॥

मूल (चौपाई)

नव पल्लव कुसुमित तरु नाना।
चंचरीक पटली कर गाना॥
सीतल मंद सुगंध सुभाऊ।
संतत बहइ मनोहर बाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक प्रकारचे वृक्ष नवनवीन पाने आणि सुगंधित फुलांनी भरलेले होते, त्यांवर भ्रमरांचे समूह गुंजारव करीत होते. तसेच शीतल, मंद, सुगंधित हवा नित्य वाहात होती.॥ ४॥

मूल (चौपाई)

कुहू कुहू कोकिल धुनि करहीं।
सुनि रव सरस ध्यान मुनि टरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

कोकिळ ‘कुहू-कुहू’ बोलत होते. त्यांचे मधुर बोल ऐकून मुनींचे ध्यानही भंग पावत होते.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

फल भारन नमि बिटप सब रहे भूमि निअराइ।
पर उपकारी पुरुष जिमि नवहिं सुसंपति पाइ॥ ४०॥

अनुवाद (हिन्दी)

फळांच्या ओझ्यामुळे वृक्ष वाकून जमिनीजवळ येऊन टेकत, ज्याप्रमाणे परोपकारी पुरुष खूप संपत्ती मिळाल्यावरही विनयाने नम्र होतात.॥ ४०॥

मूल (चौपाई)

देखि राम अति रुचिर तलावा।
मज्जनु कीन्ह परम सुख पावा॥
देखी सुंदर तरुबर छाया।
बैठे अनुज सहित रघुराया॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी ते सुंदर सरोवर पाहून स्नान केले. त्यामुळे त्यांना फार समाधान वाटले. एका सुंदर व उत्तम वृक्षाची सावली पाहून श्रीराम लक्ष्मणासह तेथे बसले.॥ १॥

मूल (चौपाई)

तहँ पुनि सकल देव मुनि आए।
अस्तुति करि निज धाम सिधाए॥
बैठे परम प्रसन्न कृपाला।
कहत अनुज सन कथा रसाला॥

अनुवाद (हिन्दी)

मग तेथे सर्व देव व मुनी आले आणि श्रीरामांची स्तुती करून घरी परत गेले. कृपाळू श्रीराम अत्यंत प्रसन्न होऊन लक्ष्मणाला रसाळ कथा सांगत होते.॥ २॥