१० मारीच प्रसंग

दोहा

मूल (दोहा)

करि पूजा मारीच तब सादर पूछी बात।
कवन हेतु मन ब्यग्र अति अकसर आयहु तात॥ २४॥

अनुवाद (हिन्दी)

मग मारीचाने रावणाचा सन्मान करून आदराने विचारले, ‘हे स्वामी! तुमचे मन कशामुळे इतके बेचैन आहे आणि तुम्ही एकटेच कसे आलात?’॥ २४॥

मूल (चौपाई)

दसमुख सकल कथा तेहि आगें।
कही सहित अभिमान अभागें॥
होहु कपट मृग तुम्ह छलकारी।
जेहि बिधि हरि आनौं नृपनारी॥

अनुवाद (हिन्दी)

भाग्यहीन रावणाने सर्व कथा अभिमानाने त्याला सांगितली. आणि म्हटले, ‘तू फसवणारा कपटमृग बन. त्या उपायाने मी त्या राजवधूला हरण करून आणीन.’॥ १॥

मूल (चौपाई)

तेहिं पुनि कहा सुनहु दससीसा।
ते नररूप चराचर ईसा॥
तासों तात बयरु नहिं कीजै।
मारें मरिअ जिआएँ जीजै॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा मारीच म्हणाला, ‘हे दशानन! ऐका. ते मनुष्यरूपातील चराचराचे ईश्वर आहेत. स्वामी! त्यांच्याशी वैर धरू नका. त्यांनी मारल्यास मरण व त्यांनी जगविल्यास जगणे असते. सर्वांचे जीवन-मरण त्यांच्या हाती आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

मुनि मख राखन गयउ कुमारा।
बिनु फर सर रघुपति मोहि मारा॥
सत जोजन आयउँ छन माहीं।
तिन्ह सन बयरु किएँ भल नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

हेच राजकुमार मुनी विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी श्रीरघुनाथांनी फाळ नसलेला बाण मला मारला होता, त्यामुळे मी एका क्षणात शंभर योजने दूर येऊन पडलो. त्यांच्याशी वैर करण्यात कल्याण नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

भइ मम कीट भृंग की नाई।
जहँ तहँ मैं देखउँ दोउ भाई॥
जौं नर तात तदपि अति सूरा।
तिन्हहि बिरोधि न आइहि पूरा॥

अनुवाद (हिन्दी)

माझी अवस्था कुंभारमाशीसारखी झालेली आहे. मला जिकडे तिकडे राम-लक्ष्मण हे दोघे भाऊच दिसतात. आणि हे राजा! जर ते मनुष्य असतील, तरीही मोठे शूरवीर आहेत. त्यांना विरोध करून यश मिळणार नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

जेहिं ताड़का सुबाहु हति खंडेउ हर कोदंड।
खर दूषन तिसिरा बधेउ मनुज कि अस बरिबंड॥ २५॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याने ताडका व सुबाहू यांना मारून शिवांचे धनुष्य मोडले आणि खर, दूषण व त्रिशिरा यांचा वध केला, असा प्रचंड बलवान कधी मनुष्य असेल काय?॥ २५॥

मूल (चौपाई)

जाहु भवन कुल कुसल बिचारी।
सुनत जरा दीन्हिसि बहु गारी॥
गुरु जिमि मूढ़ करसि मम बोधा।
कहु जग मोहि समान को जोधा॥

अनुवाद (हिन्दी)

म्हणून आपल्या कुळाच्या कल्याणाचा विचार करून परत जा.’ हे ऐकून रावण रागावला आणि त्याने खूप शिव्या दिल्या. तो म्हणाला, ‘अरे मूर्खा, तू एखाद्या गुरूप्रमाणे मला शिकवतोस काय? सांग बरे! जगात माझ्यासारखा योद्धा आहे कोण?’॥ १॥

मूल (चौपाई)

तब मारीच हृदयँ अनुमाना।
नवहि बिरोधें नहिं कल्याना॥
सस्त्री मर्मी प्रभु सठ धनी।
बैद बंदि कबि भानस गुनी॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा मारीचाने मनात विचार केला की, शस्त्रधारी, रहस्य जाणणारा, समर्थ मालक, मूर्ख, श्रीमंत, वैद्य, भाट, कवी व स्वयंपाकी या नऊ व्यक्तींशी वैर करणाऱ्याचे कल्याण होत नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

उभय भाँति देखा निज मरना।
तब ताकिसि रघुनायक सरना॥
उतरु देत मोहि बधब अभागें।
कस न मरौं रघुपति सर लागें॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा मारीचाने दोन्हीकडे आपले मरण आहे, असे जाणले, तेव्हा त्याने श्रीरघुनाथांना शरण जाणे, हे चांगले असे ठरविले. त्याने विचार केला की, ‘नाही’ म्हणताच हा नीच रावण मला मारणार. मग श्रीरघुनाथांचा बाण लागून मी का मरू नये?॥ ३॥

मूल (चौपाई)

अस जियँ जानि दसानन संगा।
चला राम पद प्रेम अभंगा॥
मन अति हरष जनाव न तेही।
आजु देखिहउँ परम सनेही॥

अनुवाद (हिन्दी)

मनात असा विचार करून तो रावणाबरोबर निघाला. श्रीरामांच्या चरणी त्याचे अखंड प्रेम होते. त्याला मनातून आनंद वाटत होता की, आज मी आपल्या परमप्रिय श्रीरामांना पाहीन. परंतु ही आनंदाची गोष्ट त्याने रावणाला सांगितली नाही.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

निज परम प्रीतम देखि लोचन सुफल करि सुख पाइहौं।
श्री सहित अनुज समेत कृपानिकेत पद मन लाइहौं॥
निर्बान दायक क्रोध जा कर भगति अबसहि बसकरी।
निज पानि सर संधानि सो मोहि बधिहि सुखसागर हरी॥

अनुवाद (हिन्दी)

तो मनात विचार करू लागला की, आपल्या परमप्रियतम श्रीरामांना पाहून नेत्रांचे पारणे फेडीन. जानकीसह व लक्ष्मणासह कृपानिधान श्रीरामांच्या चरणी मन लावीन. ज्यांचा क्रोध सुद्धा मोक्ष देणारा आहे आणि ज्यांची भक्ती स्वतंत्र अशा भगवंतांना वश करणारी आहे, अहाहा! तेच आनंदाचे सागर असलेले श्रीहरी आपल्या हातांनी बाण मारून माझा वध करणार!

दोहा

मूल (दोहा)

मम पाछें धर धावत धरें सरासन बान।
फिरि फिरि प्रभुहि बिलोकिहउँ धन्य न मो सम आन॥ २६॥

अनुवाद (हिन्दी)

धनुष्य-बाण धारण केलेल्या प्रभूंना मी माझ्या मागे मागे मला पकडण्यासाठी पृथ्वीवर धावताना वारंवार पाहीन. माझ्यासारखा धन्य दुसरा कोणीही नाही.॥ २६॥

मूल (चौपाई)

तेहि बन निकट दसानन गयऊ।
तब मारीच कपटमृग भयऊ॥
अति बिचित्र कछु बरनि न जाई।
कनक देह मनि रचित बनाई॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम ज्या वनात रहात होते, त्या वनाजवळ जेव्हा रावण पोहोचला, तेव्हा मारीच वेषधारी मृग झाला. तो इतका अद्भुत होता की, त्याचे वर्णन करता येत नाही. त्याचे सोन्याचे शरीर रत्नजडित होते.॥ १॥

मूल (चौपाई)

सीता परम रुचिर मृग देखा।
अंग अंग सुमनोहर बेषा॥
सुनहु देव रघुबीर कृपाला।
एहि मृग कर अति सुंदर छाला॥

अनुवाद (हिन्दी)

सीतेने ते अत्यंत सुंदर हरण बघितले. त्याच्या अंगांची शोभा फार मनोहर होती. ती म्हणू लागली, ‘हे देवा, हे कृपाळू रघुवीर, ऐका. या मृगाचे कातडे फारच सुंदर आहे.’॥ २॥

मूल (चौपाई)

सत्यसंध प्रभु बधि करि एही।
आनहु चर्म कहति बैदेही॥
तब रघुपति जानत सब कारन।
उठे हरषि सुर काजु संवारन॥

अनुवाद (हिन्दी)

जानकी म्हणाली, ‘हे सत्यप्रतिज्ञ प्रभो, याला मारून याचे कातडे आणून द्या.’ तेव्हा रघुनाथ मारीच हा खोटा मृग असल्याचे जाणूनही देवांचे कार्य सिद्ध करण्यासाठी आनंदाने उठले.॥ ३॥

मूल (चौपाई)

मृग बिलोकि कटि परिकर बाँधा।
करतल चाप रुचिर सर साँधा॥
प्रभु लछिमनहि कहा समुझाई।
फिरत बिपिन निसिचर बहु भाई॥

अनुवाद (हिन्दी)

हरणाला पाहून श्रीरामांनी कंबर कसली आणि हातात धनुष्य घेऊन त्याच्यावर दिव्य बाण चढविला. मग प्रभूंनी लक्ष्मणाला समजावून सांगितले की, ‘हे बंधू, वनात पुष्कळ राक्षस फिरत आहेत.॥ ४॥

मूल (चौपाई)

सीता केरि करेहु रखवारी।
बुधि बिबेक बल समय बिचारी॥
प्रभुहि बिलोकि चला मृग भाजी।
धाए रामु सरासन साजी॥

अनुवाद (हिन्दी)

तू बुद्धीने आणि विवेकाने शक्ती व वेळ-प्रसंग पाहून सीतेचे रक्षण कर.’ प्रभूंना पाहून मृग पळू लागला. श्रीरामचंद्रसुद्धा धनुष्य सज्ज करून त्याच्यामागे धावले.॥ ५॥

मूल (चौपाई)

निगम नेति सिव ध्यान न पावा।
मायामृग पाछें सो धावा॥
कबहुँ निकट पुनि दूरि पराई।
कबहुँक प्रगटइ कबहुँ छपाई॥

अनुवाद (हिन्दी)

वेद ज्यांच्याविषयी ‘नेति नेति’ असे म्हणतात आणि शिवांनाही ध्यानामध्ये ज्यांचे दर्शन घडत नाही, जे मन व वाणी यांच्या पलीकडचे आहेत, तेच श्रीराम मायेने बनलेल्या मृगामागे धावत होते. तो कधी जवळ येई, तर कधी दूर पळे. कधी प्रकट दिसे, तर कधी लपून राही.॥ ६॥

मूल (चौपाई)

प्रगटत दुरत करत छल भूरी।
एहि बिधि प्रभुहि गयउ लै दूरी॥
तब तकि राम कठिन सर मारा।
धरनि परेउ करि घोर पुकारा॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे कधी दिसत तर कधी लपत अनेक प्रकारे कपट करीत तो प्रभूंना दूर घेऊन गेला. तेव्हा श्रीरामांनी नेम धरून तीक्ष्ण बाण मारला. तो लागताच तो किंचाळून खाली पडला.॥ ७॥

मूल (चौपाई)

लछिमन कर प्रथमहिं लै नामा।
पाछें सुमिरेसि मन महुँ रामा॥
प्रान तजत प्रगटेसि निज देहा।
सुमिरेसि रामु समेत सनेहा॥

अनुवाद (हिन्दी)

प्रथम लक्ष्मणाचे नाव घेऊन त्याने श्रीरामांचे स्मरण केले. प्राण-त्याग करताना त्याने आपले राक्षसी रूप प्रकट केले आणि प्रेमाने श्रीरामांचे स्मरण केले.॥ ८॥

मूल (चौपाई)

अंतर प्रेम तासु पहिचाना।
मुनि दुर्लभ गति दीन्हि सुजाना॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वज्ञ श्रीरामांनी त्याच्या मनातील प्रेम पाहून त्याला मुनींनाही दुर्लभ असलेली आपल्या परमपदाची गती दिली.॥ ९॥

दोहा

मूल (दोहा)

बिपुल सुमन सुर बरषहिं गावहिं प्रभु गुन गाथ।
निज पद दीन्ह असुर कहुँ दीनबंधु रघुनाथ॥ २७॥

अनुवाद (हिन्दी)

देव फुले उधळत होते आणि प्रभूंची स्तुती करीत होते की, श्रीरघुनाथ असे दीनबंधू आहेत की, त्यांनी असुरालाही आपले परमपद दिले.॥ २७॥

मूल (चौपाई)

खल बधि तुरत फिरे रघुबीरा।
सोह चाप कर कटि तूनीरा॥
आरत गिरा सुनी जब सीता।
कह लछिमन सन परम सभीता॥

अनुवाद (हिन्दी)

दुष्ट मारीचाला मारून श्रीरघुवीर लगेच परतले. त्यांच्या हातात धनुष्य व कमरेला भाता शोभून दिसत होता. इकडे मरताना मारीचाने ‘हा लक्ष्मणा’ असा आवाज काढला होता. जेव्हा सीतेने ती दुःखपूर्ण वाणी ऐकली, तेव्हा ती फार घाबरली आणि लक्ष्मणाला म्हणू लागली,॥ १॥

मूल (चौपाई)

जाहु बेगि संकट अति भ्राता।
लछिमन बिहसि कहा सुनु माता॥
भृकुटि बिलास सृष्टि लय होई।
सपनेहुँ संकट परइ कि सोई॥

अनुवाद (हिन्दी)

‘तू ताबडतोब जा. तुझे भाऊ संकटात आहेत.’ लक्ष्मण हसून म्हणाला, ‘हे माते, ज्यांच्या भृकुटीच्या नुसत्या इशाऱ्यावर संपूर्ण सृष्टीचा नाश होतो, ते श्रीराम कधी स्वप्नातही संकटात पडू शकतील काय’?॥ २॥

मूल (चौपाई)

मरम बचन जब सीता बोला।
हरि प्रेरित लछिमन मन डोला॥
बन दिसि देव सौंपि सब काहू।
चले जहाँ रावन ससि राहू॥

अनुवाद (हिन्दी)

त्यावर सीता मनाला बोचणारे बोलू लागली. तेव्हा भगवंतांच्या प्रेरणेने लक्ष्मणाचे मनही अस्थिर झाले. तो सीतेला वन-देवता व दिशा-देवतांच्या भरवशावर सोडून निघाला. रावणरूपी चंद्राला ग्रासणारे राहुरूप श्रीराम होते, तिकडे तो गेला.॥ ३॥