०८ शूर्पणखाख्यान, खर-दूषणादींचा वध

मूल (चौपाई)

सूपनखा रावन कै बहिनी।
दुष्ट हृदय दारुन जस अहिनी॥
पंचबटी सो गइ एक बारा।
देखि बिकल भइ जुगल कुमारा॥

अनुवाद (हिन्दी)

शूर्पणखा नावाची रावणाची एक बहीण होती. जी नागिणीसारखी भयानक आणि दुष्ट मनाची होती. ती एकदा पंचवटीत गेली आणि दोन्ही राजकुमारांना पाहून कामासक्त झाली.॥ २॥

मूल (चौपाई)

भ्राता पिता पुत्र उरगारी।
पुरुष मनोहर निरखत नारी॥
होइ बिकल सक मनहि न रोकी।
जिमि रबिमनि द्रव रबिहि बिलोकी॥

अनुवाद (हिन्दी)

काकभुशुंडी म्हणतात, की ‘हे गरुडा, शूर्पणखेसारखी राक्षसी, धर्मज्ञानशून्य, कामांध स्त्री मनोहर पुरुष पाहून, मग तो, भाऊ, बाप, पुत्र का असेना, बेचैन होते आणि मन आवरू शकत नाही. ज्याप्रमाणे सूर्यकांतमणी हा सूर्याला पहाताच पाझरू लागतो.॥ ३॥

मूल (चौपाई)

रुचिर रूप धरि प्रभु पहिं जाई।
बोली बचन बहुत मुसुकाई॥
तुम्ह सम पुरुष न मो सम नारी।
यह संँजोग बिधि रचा बिचारी॥

अनुवाद (हिन्दी)

ती सुंदर रूप धारण करून प्रभूंजवळ आली आणि मोहक हास्य करीत म्हणाली, ‘तुमच्यासारखा कोणी पुरुष नाही आणि माझ्यासारखी स्त्री. विधात्याने ही आपली जोडी खूप विचार करून बनविली आहे.॥ ४॥

मूल (चौपाई)

मम अनुरूप पुरुष जग माहीं।
देखेउँ खोजि लोक तिहु नाहीं॥
तातें अब लगि रहिउँ कुमारी।
मनु माना कछु तुम्हहि निहारी॥

अनुवाद (हिन्दी)

मी तिन्ही लोक शोधले, परंतु माझ्याजोगा पुरुष जगात कोठेही नाही. त्यामुळे मी आत्तापर्यत कुमारी राहिले आहे. आता तुम्हांला पाहून माझे मन मोहित झाले.’॥ ५॥

मूल (चौपाई)

सीतहि चितइ कही प्रभु बाता।
अहइ कुआर मोर लघु भ्राता॥
गइ लछिमन रिपु भगिनी जानी।
प्रभु बिलोकि बोले मृदु बानी॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीरामचंद्र सीतेकडे पहात म्हणाले की, ‘माझा लहान भाऊ कुमार आहे’ तेव्हा ती लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणाने ती शत्रूची बहीण आहे, हे ओळखून प्रभूंकडे पहात कोमल वाणीने थट्टेत तिला म्हटले,॥ ६॥

मूल (चौपाई)

सुंदरि सुनु मैं उन्ह कर दासा।
पराधीन नहिं तोर सुपासा॥
प्रभु समर्थ कोसलपुर राजा।
जो कछु करहिं उनहि सब छाजा॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे सुंदरी, ऐक. मी तर त्यांचा दास आहे. मी पराधीन आहे, म्हणून तुला सुख मिळणार नाही. प्रभू समर्थ आहेत, कोसलपुरचे राजे आहेत, त्यांनी काहीही केले, तरी ते त्यांना शोभते.॥ ७॥

मूल (चौपाई)

सेवक सुख चह मान भिखारी।
ब्यसनी धन सुभ गति बिभिचारी॥
लोभी जसु चह चार गुमानी।
नभ दुहि दूध चहत ए प्रानी॥

अनुवाद (हिन्दी)

सेवकाने सुखाची इच्छा करणे, भिकाऱ्याने सन्मानाची इच्छा करणे, व्यसनी माणसाने पैशाची व व्यभिचाऱ्याने शुभगतीची इच्छा करणे, लोभ्याने कीर्तीचा हव्यास धरणे आणि दूताने मानाचा हव्यास धरणे, हे सर्व आकाशाची धार काढून दूध मिळविण्यासारखे आहे.॥ ८॥

मूल (चौपाई)

पुनि फिरि राम निकट सो आई।
प्रभु लछिमन पहिं बहुरि पठाई॥
लछिमन कहा तोहि सो बरई।
जो तृन तोरि लाज परिहरई॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा ती परत श्रीरामांजवळ आली. प्रभूंनी तिला लक्ष्मणाकडे पाठविले. लक्ष्मण म्हणाला, ‘जो अत्यंत निर्लज्ज असेल, तोच तुला वरील.॥ ९॥

मूल (चौपाई)

तब खिसिआनि राम पहिं गई।
रूप भयंकर प्रगटत भई॥
सीतहि सभय देखि रघुराई।
कहा अनुज सन सयन बुझाई॥

अनुवाद (हिन्दी)

मग ती चिडून श्रीरामांकडे गेली आणि तिने आपले भयंकर रूप प्रकट केले. तिला पाहून सीता भयभीत झाल्याचे पाहिले, तेव्हा श्रीरघुनाथांनी लक्ष्मणाला इशारा केला.॥ १०॥

दोहा

मूल (दोहा)

लछिमन अति लाघवँ सो नाक कान बिनु कीन्हि।
ताके कर रावन कहँ मनौ चुनौती दीन्हि॥ १७॥

अनुवाद (हिन्दी)

लक्ष्मणाने मोठॺा चपळाईने तिचे नाक व कान कापले. जणू त्याने तिच्याद्वारे रावणाला आव्हान दिले.॥ १७॥

मूल (चौपाई)

नाक कान बिनु भइ बिकरारा।
जनु स्रव सैल गेरु कै धारा॥
खर दूषन पहिं गइ बिलपाता।
धिग धिग तव पौरुष बल भ्राता॥

अनुवाद (हिन्दी)

नाक-कानांविना ती भयंकर दिसू लागली. काळ्या पर्वतातून कावेचा (गेरू) प्रवाह वाहावा, तसे तिच्या शरीरातून रक्त वाहू लागले. ती विलाप करीत खर-दूषण यांच्यापाशी गेली. आणि म्हणाली, ‘बंधूंनो, तुमच्या पौरुषाचा धिक्कार असो, तुमच्या सामर्थ्याचा धिक्कार असो.’॥ १॥

मूल (चौपाई)

तेहिं पूछा सब कहेसि बुझाई।
जातुधान सुनि सेन बनाई॥
धाए निसिचर निकर बरूथा।
जनु सपच्छ कज्जल गिरि जूथा॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांनी विचारल्यावर तिने सर्व सांगितले. ते सर्व ऐकून राक्षसांनी सेना सज्ज केली. राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी धावून गेल्या. त्या जणू पंखधारी काजळाच्या पर्वतां झुंडी दिसत होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

नाना बाहन नानाकारा।
नानायुध धर घोर अपारा॥
सूपनखा आगें करि लीनी।
असुभ रूप श्रुति नासा हीनी॥

अनुवाद (हिन्दी)

ते अनेक प्रकारच्या वाहनांवर बसलेले व अनेक आकारांचे होते. ते अपार होते आणि अनेक प्रकारची असंख्य भयंकर शस्त्रे त्यांनी धारण केली होती. त्यांनी नाक-कान कापलेल्या अमंगलरूपिणी शूर्पणखेस पुढे केले.॥ ३॥

मूल (चौपाई)

असगुन अमित होहिं भयकारी।
गनहिं न मृत्यु बिबस सब झारी॥
गर्जहिं तर्जहिं गगन उड़ाहीं।
देखि कटकु भट अति हरषाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

अगणित भयंकर अपशकुन होत होते. परंतु मृत्यूच्या तोंडी असल्यामुळे त्या सर्वांनी त्याची पर्वा केली नाही. गर्जना करीत, ललकारत आणि आकाशात ते उडत होते. सेना पाहून योद्ध्यांना फार हर्ष वाटत होता.॥ ४॥

मूल (चौपाई)

कोउ कह जिअत धरहु द्वौ भाई।
धरि मारहु तिय लेहु छड़ाई॥
धूरि पूरि नभ मंडल रहा।
राम बोलाइ अनुज सन कहा॥

अनुवाद (हिन्दी)

कोणी म्हणत होता की, ‘दोघा भावांना पकडा, पकडून मारून टाका आणि स्त्रीचे अपहरण करा.’ आकाश धुळीने भरून गेले होते. तेव्हा श्रीरामांनी लक्ष्मणाला बोलावून सांगितले,॥ ५॥

मूल (चौपाई)

लै जानकिहि जाहु गिरि कंदर।
आवा निसिचर कटकु भयंकर॥
रहेहु सजग सुनि प्रभु कै बानी।
चले सहित श्री सर धनु पानी॥

अनुवाद (हिन्दी)

‘राक्षसांची भयंकर सेना आलेली आहे. जानकीला घेऊन तू पर्वताच्या गुहेमध्ये जा. सावध राहा.’ प्रभू रामचंद्रांचे बोलणे ऐकून लक्ष्मण हातांमध्ये धनुष्य-बाण घेऊन सीतेसह निघाला.॥ ६॥

मूल (चौपाई)

देखि राम रिपुदल चलि आवा।
बिहसि कठिन कोदंड चढ़ावा॥

अनुवाद (हिन्दी)

शत्रूंची सेना जवळ आल्याचे पाहून श्रीरामांनी हसून कठीण धनुष्य सज्ज केले.॥ ७॥

छंद

मूल (दोहा)

कोदंड कठिन चढ़ाइ सिर जट जूट बाँधत सोह क्यों।
मरकत सयल पर लरत दामिनि कोटि सों जुग भुजग ज्यों॥
कटि कसि निषंग बिसाल भुज गहि चाप बिसिख सुधारि कै।
चितवत मनहुँ मृगराज प्रभु गजराज घटा निहारि कै॥

अनुवाद (हिन्दी)

कठीण धनुष्य सज्ज केलेले व शिरावर जटा बांधलेले प्रभू असे शोभत होते की पाचूच्या पर्वतावर कोटॺवधी विजांबरोबर दोन साप लढत आहेत. कमरेला भाते बांधून, विशाल भुजांमध्ये धनुष्य बाण सज्ज करून प्रभू श्रीरामचंद्र राक्षसांकडे पहात होते. जणू उन्मत्त हत्तींचे झुंड पाहून सिंह त्यांना पहात होता.

सोरठा

मूल (दोहा)

आइ गए बगमेल धरहु धरहु धावत सुभट।
जथा बिलोकि अकेल बाल रबिहि घेरत दनुज॥ १८॥

अनुवाद (हिन्दी)

‘पकडा, पकडा’ असे ओरडत राक्षस योद्धे मोठॺा वेगाने धावत आले. त्यांनी श्रीरामांना चोहीकडे घेरले. ज्याप्रमाणे बालसूर्य एकटा आहे, असे पाहून मंदेह नामक दैत्यांनी त्याला घेरावे.॥१८॥

मूल (चौपाई)

प्रभु बिलोकि सरस कहिं न डारी।
थकित भई रजनीचर धारी॥
सचिव बोलि बोले खर दूषन।
यह कोउ नृपबालक नर भूषन॥

अनुवाद (हिन्दी)

साैंदर्य-माधुर्य-निधी असलेल्या श्रीरामांना पाहून राक्षसांची सेना थक्क झाली. ती त्यांच्यावर बाण सोडू शकली नाही. मंत्र्याला बोलावून खर-दूषण म्हणाले, ‘हा राजकुमार कोणी मनुष्यांचा भूषण असावा.॥ १॥

मूल (चौपाई)

नाग असुर सुर नर मुनि जेते।
देखे जिते हते हम केते॥
हम भरि जन्म सुनहु सब भाई।
देखी नहिं असि सुंदरताई॥

अनुवाद (हिन्दी)

जितके म्हणून नाग, असुर, देव, मनुष्य आणि मुनी आहेत, त्यांपैकी किती तरी आम्ही पाहिले आहेत. जिंकले आहेत आणि मारून टाकले आहेत. परंतु सर्व बंधूनो, आम्ही जन्मात कधी असे सौंदर्य कोठे पाहिले नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

जद्यपि भगिनी कीन्हि कुरूपा।
बध लायक नहिं पुरुष अनूपा॥
देहु तुरत निज नारि दुराई।
जीअत भवन जाहु द्वौ भाई॥

अनुवाद (हिन्दी)

जरी याने आमच्या बहिणीला कुरूप केले असले, तरी हा अनुपम पुरुष वध करण्याजोगा नाही. ‘लपविलेली तुमची स्त्री आम्हांला ताबडतोब द्या आणि तुम्ही दोघे बंधू जिवंतपणे परत जा.॥ ३॥

मूल (चौपाई)

मोर कहा तुम्ह ताहि सुनावहु।
तासु बचन सुनि आतुर आवहु॥
दूतन्ह कहा राम सन जाई।
सुनत राम बोले मुसुकाई॥

अनुवाद (हिन्दी)

असा माझा निरोप त्याला सांगा आणि त्याचे उत्तर घेऊन लगेच परत या.’ दूतांनी जाऊन हा निरोप श्रीरामचंद्रांना सांगितला. तो ऐकून श्रीराम हसून म्हणाले,॥ ४॥

मूल (चौपाई)

हम छत्री मृगया बन करहीं ।
तुम्ह से खल मृग खोजत फिरहीं॥
रिपु बलवंत देखि नहिं डरहीं।
एक बार कालहु सन लरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

‘आम्ही क्षत्रिय आहोत. आम्ही वनात शिकार करतो व तुमच्या-सारख्या दुष्ट पशूंना शोधत असतो. आम्ही बलवान शत्रू पाहून घाबरत नसतो. लढाई करण्यास प्रत्यक्ष काळ आला तरी वेळ आली तर आम्ही त्याच्याशीही लढू.॥ ५॥

मूल (चौपाई)

जद्यपि मनुज दनुज कुल घालक।
मुनि पालक खल सालक बालक॥
जौं न होइ बल घर फिरि जाहू।
समर बिमुख मैं हतउँ न काहू॥

अनुवाद (हिन्दी)

जरी आम्ही मनुष्य असलो, तरी दैत्यकुळाचा नाश करणारे आणि मुनींचे रक्षण करणारे आहोत. आम्ही बालक आहोत. परंतु दुष्टांना दंड देणारे आहोत. जर बळ नसेल तर परत जा. युद्धामध्ये पाठ फिरविणाऱ्याला मी मारत नाही.॥ ६॥

मूल (चौपाई)

रन चढ़ि करिअ कपट चतुराई।
रिपु पर कृपा परम कदराई॥
दूतन्ह जाइ तुरत सब कहेऊ।
सुनि खर दूषन उर अति दहेऊ॥

अनुवाद (हिन्दी)

रणामध्ये येऊन कपटकारस्थान करणे आणि शत्रूला पाठ दाखविणे, हा फार मोठा भित्रेपणा आहे’ दूतांनी परतून लगेच सर्व गोष्टी सांगितल्या. त्या ऐकून खर-दूषण यांचे पित्त खवळले.॥ ७॥

छंद

मूल (दोहा)

उर दहेउ कहेउ कि धरहु धाए बिकट भट रजनीचरा।
सर चाप तोमर सक्ति सूल कृपान परिघ परसु धरा॥
प्रभु कीन्हि धनुष टकोर प्रथम कठोर घोर भयावहा।
भए बधिर ब्याकुल जातुधान न ग्यान तेहि अवसर रहा॥

अनुवाद (हिन्दी)

खर-दूषण भडकले. ते म्हणाले, ‘पकडा’ ते ऐकून भयानक राक्षस योद्धे बाण, धनुष्य, तोमर, शक्ती, बरछी, कृपाण, परिघ आणि परशू घेऊन धावले. प्रभू श्रीरामांनी प्रथमतः धनुष्याचा कठोर, घोर व भयानक टणत्कार केला. तो ऐकताच राक्षस बहिरे व व्याकूळ झाले. त्यावेळी त्यांना शुद्ध राहिली नाही.

दोहा

मूल (दोहा)

सावधान होइ धाए जानि सबल आराति।
लागे बरषन राम पर अस्त्र सस्त्र बहुभाँति॥ १९ (क)॥

अनुवाद (हिन्दी)

मग ते शत्रू बलवान आहेत, असे पाहून सावध होऊन धावले आणि श्रीरामचंद्रांवर अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे सोडू लागले.॥ १९ (क)॥

मूल (दोहा)

तिन्ह के आयुध तिल सम करि काटे रघुबीर।
तानि सरासन श्रवन लगि पुनि छाँड़े निज तीर॥ १९(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुवीरांनी त्यांची शस्त्रे तिळाप्रमाणे तुकडे तुकडे करून टाकली. नंतर धनुष्य कानापर्यंत खेचून आपले बाण सोडले.॥ १९(ख)॥

छंद

मूल (दोहा)

तब चले बान कराल। फुंकरत जनु बहु ब्याल।
कोपेउ समर श्रीराम। चले बिसिख निसित निकाम॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

ते भयानक बाण असे सुटले की, जणू पुष्कळ साप फूत्कार करीत जात होते. श्रीराम अत्यंत क्रुद्ध होऊन तीक्ष्ण बाण सोडू लागले.॥ १॥

मूल (दोहा)

अवलोकि खरतर तीर। मुरि चले निसिचर बीर।
भए क्रुद्ध तीनिउ भाइ। जो भागि रन ते जाइ॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

ते अत्यंत तीक्ष्ण बाण पाहून राक्षसवीर पाठ दाखवून पळू लागले. तेव्हा खर, दूषण, त्रिशिरा हे तिन्ही भाऊ खवळून म्हणाले, ‘जो युद्धातून पळेल,॥ २॥

मूल (दोहा)

तेहि बधब हम निज पानि। फिरे मरन मन महुँ ठानि।
आयुध अनेक प्रकार। सनमुख ते करहिं प्रहार॥ ३॥

अनुवाद (हिन्दी)

त्याला आम्ही मारून टाकू.’ तेव्हा पळून जाणारे राक्षस मनात मरण्याचा निश्चय करून परत फिरले आणि समोर येऊन अनेक प्रकारच्या शस्त्रांचा श्रीरामांवर प्रहार करू लागले.॥ ३॥

मूल (दोहा)

रिपु परम कोपे जानि। प्रभु धनुष सर संधानि।
छाँड़े बिपुल नाराच। लगे कटन बिकट पिसाच॥ ४॥

अनुवाद (हिन्दी)

शत्रू फार क्रुद्ध झाल्याचे पाहून प्रभूंनी धनुष्याला बाण लावून पुष्कळ बाण सोडले. त्यामुळे भयानक राक्षस कापले जाऊ लागले.॥ ४॥

मूल (दोहा)

उर सीस भुज कर चरन। जहँ तहँ लगे महि परन।
चिक्करत लागत बान। धर परत कुधर समान॥ ५॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांची छाती, शिर, हात आणि पाय पृथ्वीवर इकडे-तिकडे पडू लागले. बाण लागताच ते हत्तीप्रमाणे चीत्कार करू लागले. त्यांची डोंगरासारखी धडे कापली जाऊन पडू लागली.॥ ५॥

मूल (दोहा)

भट कटत तन सत खंड। पुनि उठत करि पाषंड।
नभ उड़त बहु भुज मुंड। बिनु मौलि धावत रुंड॥ ६॥

अनुवाद (हिन्दी)

योद्ध्यांचे देह कापले जाऊन शेकडो तुकडे होत होते. मग ते मायेने उठून पुन्हा उभे रहात. आकाशात पुष्कळ भुजा व शिरे उडत होती आणि शिरांविना धडे पळत होती.॥ ६॥

मूल (दोहा)

खग कंक काक सृगाल। कटकटहिं कठिन कराल॥ ७॥

अनुवाद (हिन्दी)

घारी, कावळे इत्यादी पक्षी आणि कोल्हे भयंकर ‘कटकट’ असा आवाज करीत होते.॥७॥

छंद

मूल (दोहा)

कटकटहिं जंबुक भूत प्रेत पिसाच खर्पर संचहीं।
बेताल बीर कपाल ताल बजाइ जोगिनि नंचहीं॥
रघुबीर बान प्रचंड खंडहिं भटन्ह के उर भुज सिरा।
जहँ तहँ परहिं उठि लरहिं धर धरु धरु करहिं भयकर गिरा॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

कोल्हे कटकट करीत होते. भुते, प्रेते, पिशाचे मुंडकी गोळा करीत होती. वीर-वेताळ मुंडक्यांवर ताल देत होते आणि योगिनी नाचत होत्या. श्रीरघुवीरांचे प्रचंड बाण राक्षस योद्ध्यांची वक्षःस्थळे, भुजा व शिरांचे तुकडे-तुकडे करून टाकीत होते, त्यांची धडे जिकडे-तिकडे पडत होती. ते पुन्हा उठून लढत होते आणि ‘पकडा, पकडा’ असा भयंकर आरडा-ओरडा करीत होते.॥ १॥

मूल (दोहा)

अंतावरीं गहि उड़त गीध पिसाच कर गहि धावहीं।
संग्राम पुर बासी मनहुँ बहु बाल गुड़ी उड़ावहीं॥
मारे पछारे उर बिदारे बिपुल भट कहँरत परे।
अवलोकि निज दल बिकल भट तिसिरादि खर दूषन फिरे॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

आंतडॺांचे एक टोक पकडून गिधाडे उडत होती तर त्यांचेच दुसरे टोक हाताने पकडून पिशाचे धावत होती. असे वाटत होते की, जणू युद्धरूपी नगरातील अनेक बालक पतंग उडवीत आहेत. अनेक योद्धे मारले गेले आणि खाली पडले. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले होते, असे बरेचसे राक्षस खाली पडून विव्हळत होते. आपली सेना व्याकूळ झाल्याचे पाहून त्रिशिरा, खर, दूषण इत्यादी योद्धे श्रीरामांकडे वळले.॥ २॥

मूल (दोहा)

सर सक्ति तोमर परसु सूल कृपान एकहि बारहीं।
करि कोप श्रीरघुबीर पर अगनित निसाचर डारहीं॥
प्रभु निमिष महुँ रिपु सर निवारि पचारि डारे सायका।
दस दस बिसिख उर माझ मारे सकल निसिचर नायका॥ ३॥

अनुवाद (हिन्दी)

असंख्य राक्षस एकाच वेळी क्रोधाने बाण, शक्ती, तोमर, परशू, शूल आणि तलवार यांचा मारा श्रीरामांवर करू लागले. प्रभूंनी एक क्षणात शत्रूंचे बाण तोडून टाकून, ललकार करीत त्यांच्यावर आपले बाण सोडले. सर्व राक्षस-सेनापतींच्या छातीवर दहा-दहा बाण मारले.॥

मूल (दोहा)

महि परत उठि भट भिरत मरत न करत माया अति घनी।
सुर डरत चौदह सहस प्रेत बिलोकि एक अवध धनी॥
सुर मुनि सभय प्रभु देखि मायानाथ अति कौतुक करॺो।
देखहिं परसपर राम करि संग्राम रिपुदल लरि मरॺो॥ ४॥

अनुवाद (हिन्दी)

योद्धे पृथ्वीवर पडत होते, पुन्हा उठून भिडत होते. मरत नव्हते. पुष्कळ प्रकारची मोठी माया करीत होते. राक्षस चौदा हजार आहेत आणि श्रीराम एकटे आहेत, ते पाहून देव व मुनी भयभीत होऊन पहात होते. त्यावेळी मायेचे स्वामी असलेल्या प्रभूंनी एक मोठे कौतुक केले. त्यामुळे शत्रूंच्या सेनेला एकमेक जण श्रीरामांच्या रूपात दिसू लागला आणि ते एकमेकांशीच युद्ध करीत मरून गेले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम राम कहि तनु तजहिं पावहिं पद निर्बान।
करि उपाय रिपु मारे छन महुँ कृपानिधान॥ २०(क)॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजण ‘हाच राम आहे, याला मारा’ अशा प्रकारे राम-राम म्हणत देह सोडत होते आणि त्यांना मोक्ष मिळत होता. कृपानिधान श्रीरामांनी असा उपाय करून क्षणभरात शत्रूंना मारून टाकले.॥ २०(क)॥

मूल (दोहा)

हरषित बरषहिं सुमन सुर बाजहिं गगन निसान।
अस्तुति करि करि सब चले सोभित बिबिध बिमान॥ २०(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

देव आनंदाने फुले उधळू लागले. आकाशात नगारे वाजू लागले. मग ते सर्व स्तुती करीत अनेक विमानात बसून निघून गेले.॥ २० (ख)॥

मूल (चौपाई)

जब रघुनाथ समर रिपु जीते।
सुर नर मुनि सब के भय बीते॥
तब लछिमन सीतहि लै आए।
प्रभु पद परत हरषि उर लाए॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा श्रीरामांनी शत्रूला युद्धात जिंकले आणि देव, मनुष्य आणि मुनी या सर्वांचे भय नष्ट झाले, तेव्हा लक्ष्मण सीतेला घेऊन आला. तो श्रीरामांच्या चरणी लोटांगण घालू लागला. तेवढॺात प्रभूंनी त्याला मोठॺा आनंदाने उठवून हृदयाशी धरले.॥ १॥

मूल (चौपाई)

सीता चितव स्याम मृदु गाता।
परम प्रेम लोचन न अघाता॥
पंचबटीं बसि श्रीरघुनायक।
करत चरित सुर मुनि सुखदायक॥

अनुवाद (हिन्दी)

सीता श्रीरामांच्या श्यामल व कोमल देहाकडे अत्यंत प्रेमाने पाहू लागली. तिचे नेत्र तृप्त होत नव्हते. अशाप्रकारे पंचवटीत राहून श्रीरघुनाथ देवांना व मुनींना सुख देणाऱ्या लीला करू लागले.॥२॥