०६ राक्षस-वधाची प्रतिज्ञा

दोहा

मूल (दोहा)

निसिचर हीन करउँ महि भुज उठाइ पन कीन्ह।
सकल मुनिन्ह के आश्रमन्हि जाइ जाइ सुख दीन्ह॥ ९॥

अनुवाद (हिन्दी)

त्यावेळी श्रीरामांनी हात उचलून प्रतिज्ञा केली की, ‘मी पृथ्वीला राक्षसरहित करून टाकीन.’ नंतर त्यांनी सर्व मुनींच्या आश्रमांना भेटी देऊन दर्शन व संभाषणाचे त्यांना सुख दिले.॥ ९॥

मूल (चौपाई)

मुनि अगस्ति कर सिष्य सुजाना।
नाम सुतीछन रति भगवाना॥
मन क्रम बचन राम पद सेवक।
सपनेहुँ आन भरोस न देवक॥

अनुवाद (हिन्दी)

अगस्त्य मुनींचे सुतीक्ष्ण नावाचे एक ज्ञानी शिष्य होते. त्यांना भगवंतांविषयी अत्यंत प्रेम होते. ते काया-वाचा-मनाने श्रीरामांच्या चरणांचे सेवक होते. त्यांना स्वप्नातही इतर कोणत्याही देवाविषयी आदर वाटत नव्हता.॥ १॥

मूल (चौपाई)

प्रभु आगवनु श्रवन सुनि पावा।
करत मनोरथ आतुर धावा॥
हे बिधि दीनबंधु रघुराया।
मो से सठ पर करिहहिं दाया॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा त्यांनी प्रभूंचे आगमन होत असल्याचे ऐकले, तेव्हा ते अनेक मनोरथ करीत आतुर होऊन धावत निघाले. ते मनात म्हणत होते की, ‘हे विधात्या, दीनबंधू श्रीरघुनाथ माझ्यासारख्या दुष्टावरही दया करतील काय?॥ २॥

मूल (चौपाई)

सहित अनुज मोहि राम गोसाईं।
मिलिहहिं निज सेवक की नाईं॥
मोरे जियँ भरोस दृढ़ नाहीं।
भगति बिरति न ग्यान मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

स्वामी राम हे लक्ष्मणासह मला आपल्या सेवकाप्रमाणे भेटतील काय? माझ्या मनाला याची खात्री वाटत नाही. कारण माझ्या मनात भक्ती, वैराग्य किंवा ज्ञान यांपैकी काहीही नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

नहिं सतसंग जोग जप जागा।
नहिं दृढ़ चरन कमल अनुरागा॥
एक बानि करुनानिधान की।
सो प्रिय जाकें गति न आन की॥

अनुवाद (हिन्दी)

मी कधी सत्संग, योग, जप किंवा यज्ञसुद्धा केलेला नाही; आणि प्रभूंच्या चरणी माझे दृढ प्रेमही नाही. एक मात्र खरे की, ज्याला कुणाचा आधार नाही, तो प्रभूंना प्रिय असतो. असा दयेचे भांडार असलेल्या प्रभूंचा स्वभाव आहे.

मूल (चौपाई)

होइहैं सुफल आजु मम लोचन।
देखि बदन पंकज भव मोचन॥
निर्भर प्रेम मगन मुनि ग्यानी।
कहि न जाइ सो दसा भवानी॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंतांच्या या स्वभावाची आठवण येताच ते आनंदमग्न होऊन म्हणू लागले की, ‘भवबंधनांतून मुक्त करणारे प्रभूंचे मुखकमल पाहून आज माझ्या डोळ्यांचे पारणे फिटेल.’ शिव म्हणतात, ‘हे भवानी, ज्ञानी मुनी प्रेमामध्ये पूर्णपणे निमग्न झाले. त्यांची ती दशा अवर्णनीय होती.॥ ५॥

मूल (चौपाई)

दिसि अरु बिदिसि पंथ नहिं सूझा।
को मैं चलेउँ कहाँ नहिं बूझा॥
कबहुँक फिरि पाछें पुनि जाई।
कबहुँक नृत्य करइ गुन गाई॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांना दिशा किंवा रस्ता हे काहीच कळत नव्हते. आपण कोण आहोत आणि कुठे जात आहोत, हे काहीही कळत नव्हते. ते कधी मागे वळून पुन्हा पुढे चालू लागत आणि कधी प्रभूंचे गुण गात नाचू लागत.॥ ६॥

मूल (चौपाई)

अबिरल प्रेम भगति मुनि पाई।
प्रभु देखैं तरु ओट लुकाई॥
अतिसय प्रीति देखि रघुबीरा।
प्रगटे हृदयँ हरन भव भीरा॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींनी प्रगाढ अशी प्रेमभक्ती प्राप्त केली होती. प्रभू श्रीराम वृक्षाआडून लपून भक्ताची ती प्रेमोन्मत्त दशा पहात होते. मुनींचे अत्यंत प्रेम पाहून भव-भय हरण करणारे श्रीरघुनाथ मुनींच्या हृदयात प्रकट झाले.॥ ७॥

मूल (चौपाई)

मुनि मग माझ अचल होइ बैसा।
पुलक सरीर पनस फल जैसा॥
तब रघुनाथ निकट चलि आए।
देखि दसा निज जन मन भाए॥

अनुवाद (हिन्दी)

हृदयात प्रभूंचे दर्शन झाल्याने मुनी रस्त्यामध्येच स्तब्ध बसले. त्यांचे शरीर रोमांच्यांमुळे फणसासारखे काटेदार झाले. तेव्हा श्रीरघुनाथ त्यांच्याजवळ आले आणि आपल्या भक्ताची प्रेमदशा पाहून मनाने अत्यंत प्रसन्न झाले.॥ ८॥

मूल (चौपाई)

मुनिहि राम बहु भाँति जगावा।
जाग न ध्यान जनित सुख पावा॥
भूप रूप तब राम दुरावा।
हृदयँ चतुर्भुज रूप देखावा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी त्यांना जागे करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते जागे झाले नाहीत, कारण त्यांना प्रभूंच्या ध्यानाचे सुख लाभत होते. तेव्हा श्रीरामांनी आपले राजरूप लपविले आणि मुनींच्या हृदयात आपले चतुर्भुजरूप प्रकट केले.॥ ९॥

मूल (चौपाई)

मुनि अकुलाइ उठा तब कैसें।
बिकल हीन मनि फनिबर जैसें॥
आगें देखि राम तन स्यामा।
सीता अनुज सहित सुख धामा॥

अनुवाद (हिन्दी)

आपले इष्ट-स्वरूप अंतर्धान होताच, जसा श्रेष्ठ मणिधर साप मण्याविना व्याकूळ होऊन जातो, तसे मुनी व्याकूळ झाले. मुनींना आपल्या डोळ्यांसमोर सीता व लक्ष्मणासह श्यामसुंदर मूर्ती असलेले सुखधाम श्रीराम दिसले.॥ १०॥

मूल (चौपाई)

परेउ लकुट इव चरनन्हि लागी।
प्रेम मगन मुनिबर बड़भागी॥
भुज बिसाल गहि लिए उठाई।
परम प्रीति राखे उर लाई॥

अनुवाद (हिन्दी)

प्रेमात मग्न झालेल्या त्या भाग्यवान श्रेष्ठ मुनींनी दंडवत करीत श्रीरामांच्या चरणी लोळण घेतली. श्रीरामांनी आपल्या विशाल भुजांनी धरून त्यांना उठवले आणि मोठॺा प्रेमाने हृदयाशी धरले.॥ ११॥

मूल (चौपाई)

मुनिहि मिलत अस सोह कृपाला।
कनक तरुहि जनु भेंट तमाला॥
राम बदनु बिलोक मुनि ठाढ़ा।
मानहुँ चित्र माझ लिखि काढ़ा॥

अनुवाद (हिन्दी)

कृपाळू श्रीरामचंद्र मुनींना भेटताना असे वाटत होते की, जणू सोन्याच्या वृक्षाला तमाल वृक्ष मिठी मारत आहे. मुनी निस्तब्ध उभे होते आणि एकटक श्रीरामांचे मुख न्याहाळत होते; जणू ते चित्र चितारून बनविले असावे.॥ १२॥

दोहा

मूल (दोहा)

तब मुनि हृदयँ धीर धरि गहि पद बारहिं बार।
निज आश्रम प्रभु आनि करि पूजा बिबिध प्रकार॥ १०॥

अनुवाद (हिन्दी)

मग मुनींनी मनात धीर धरून वारंवार प्रभूंच्या चरणांना स्पर्श केला. नंतर ते प्रभूंना आपल्या आश्रमात घेऊन गेले व त्यांची त्यांनी अनेक प्रकारे पूजा केली.॥ १०॥

मूल (चौपाई)

कह मुनि प्रभु सुनु बिनती मोरी।
अस्तुति करौं कवन बिधि तोरी॥
महिमा अमित मोरि मति थोरी।
रबि सन्मुख खद्योत अँजोरी॥

अनुवाद (हिन्दी)

मुनी म्हणू लागले, ‘हे प्रभो, माझी विनंती ऐका. मी कशाप्रकारे तुमची स्तुती करू? तुमचा महिमा अपार आहे आणि माझी बुद्धी अल्प आहे, जणू सूर्यासमोर काजव्याचा प्रकाश.॥ १॥

मूल (चौपाई)

श्याम तामरस दाम शरीरं।
जटा मुकुट परिधन मुनिचीरं॥
पाणि चाप शर कटि तूणीरं।
नौमि निरंतर श्रीरघुवीरं॥

अनुवाद (हिन्दी)

हे नीलकमलांच्या माळेसारखे सावळे शरीर असलेले, हे जटामुकुट आणि मुनींची वल्कल वस्त्रे नेसलेले, हातांमध्ये धनुष्य-बाण व कटीला भाते बांधलेले श्रीराम, मी तुम्हांला निरंतर नमस्कार करतो.॥ २॥

मूल (चौपाई)

मोह विपिन घन दहन कृशानुः।
संत सरोरुह कानन भानुः॥
निसिचर करि वरूथ मृगराजः।
त्रातु सदा नो भव खग बाजः॥

अनुवाद (हिन्दी)

जे मोहरूपी दाट वनास जाळणारा अग्नी आहेत, संतरूपी कमल-वनास प्रफुल्लित करणारा सूर्य आहेत, राक्षसरूपी हत्तींच्या कळपास लोळवणारे सिंह आहेत आणि जन्ममृत्युरूपी पक्ष्याला मारणारा बहिरी ससाणा आहेत, ते प्रभू श्रीराम सदा आमचे रक्षण करोत.॥ ३॥

मूल (चौपाई)

अरुण नयन राजीव सुवेशं।
सीता नयन चकोर निशेशं॥
हर हृदि मानस बाल मरालं।
नौमि राम उर बाहु विशालं॥

अनुवाद (हिन्दी)

हे लाल कमळासारखे नेत्र व सुंदर वेष धारण करणारे, सीतेच्यानेत्ररूपी चकोराचे चंद्र, श्रीशिवांच्या मानसरूप मानससरोवरातील बालहंस, विशाल हृदय व बाहू असलेले हे श्रीरामप्रभू! मी तुमची स्तुती करतो.॥ ४॥

मूल (चौपाई)

संशय सर्प ग्रसन उरगादः।
शमन सुकर्कश तर्क विषादः॥
भव भंजन रंजन सुर यूथः।
त्रातु सदा नो कृपा वरूथः॥

अनुवाद (हिन्दी)

जे संशयरूप सर्पाला ग्रासणारे गरुड, जे अत्यंत कठोर तर्काने उत्पन्न होणारा विषाद नाहीसा करणारे, जे जन्ममृत्यू नाहीसा करणारे व देवसमुदायाला आनंद देणारे ते कृपानिधान श्रीराम नेहमी आमचे रक्षण करोत.॥ ५॥

मूल (चौपाई)

निर्गुण सगुण विषम सम रूपं।
ज्ञान गिरा गोतीतमनूपं॥
अमलमखिलमनवद्यमपारं।
नौमि राम भंजन महि भारं॥

अनुवाद (हिन्दी)

हे निर्गुण-सगुण, विषम-समरूप, हे ज्ञान, वाणी आणि इंद्रियांना अतीत, हे अनुपम, निर्मल, दोषरहित, अनंत व पृथ्वीचा भार हरण करणारे श्रीराम, मी तुम्हांला नमस्कार करतो.॥ ६॥

मूल (चौपाई)

भक्त कल्पपादप आरामः।
तर्जन क्रोध लोभ मद कामः॥
अति नागर भव सागर सेतुः।
त्रातु सदा दिनकर कुल केतुः॥

अनुवाद (हिन्दी)

जे भक्तांसाठी कल्पवृक्षांची उद्याने आहेत, क्रोध, लोभ, मद आणि काम यांना भयभीत करणारे आहेत, अत्यंत चतुर आहेत आणि संसाररूपी समुद्र तरून जाण्यासाठी सेतुरूप आहेत, ते सूर्यकुलाचा ध्वज असणारे श्रीराम सदा माझे रक्षण करोत.॥ ७॥

मूल (चौपाई)

अतुलित भुज प्रताप बल धामः।
कलि मल विपुल विभंजन नामः॥
धर्म वर्म नर्मद गुण ग्रामः।
संतत शं तनोतु मम रामः॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्या भुजांचा प्रताप अतुलनीय आहे, जे बलाचे धाम आहेत, ज्यांचे नाव कलियुगातील फार मोठॺा पापांचा नाश करणारे आहे, जे धर्मरक्षक असून ज्यांचा गुणसमूह आनंद देणारा आहे, ते श्रीराम निरंतर माझ्या कल्याणाचा विस्तार करोत.॥ ८॥

मूल (चौपाई)

जदपि बिरज ब्यापक अबिनासी।
सब के हृदयँ निरंतर बासी॥
तदपि अनुज श्री सहित खरारी।
बसतु मनसि मम काननचारी॥

अनुवाद (हिन्दी)

जरी तुम्ही निर्मल, व्यापक, अविनाशी आणि सर्वांच्या हृदयात निरंतर निवास करणारे आहात, तरीही हे श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेसह वनात फिरणारे, याच रूपात तुम्ही माझ्या हृदयात निवास करावा.॥ ९॥

मूल (चौपाई)

जे जानहिं ते जानहुँ स्वामी।
सगुन अगुन उर अंतरजामी॥
जो कोसलपति राजिव नयना।
करउ सो राम हृदय मम अयना॥

अनुवाद (हिन्दी)

हे स्वामी, तुम्हांला जे सगुण, निर्गुण, अंतर्यामी म्हणून जाणतात, ते तसे जाणोत. माझ्या हृदयात कोसलपती कमलनयन श्रीराम या रूपातच तुम्ही निवास करावा.॥ १०॥

मूल (चौपाई)

अस अभिमान जाइ जनि भोरे।
मैं सेवक रघुपति पति मोरे॥
सुनि मुनि बचन राम मन भाए।
बहुरि हरषि मुनिबर उर लाए॥

अनुवाद (हिन्दी)

मी सेवक आहे आणि श्रीरघुनाथ माझे स्वामी आहेत, असा अभिमान चुकूनही सुटू नये.’ मुनींचे वचन ऐकून श्रीराम मनातून खूप प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी आनंदाने त्या श्रेष्ठ मुनींना हृदयाशी धरले.॥ ११॥

मूल (चौपाई)

परम प्रसन्न जानु मुनि मोही।
जो बर मागहु देउँ सो तोही॥
मुनि कह मैं बर कबहुँ न जाचा।
समुझि न परइ झूठ का साचा॥

अनुवाद (हिन्दी)

आणि म्हटले, ‘हे मुनी, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, असे समजा. जो वर मागाल, तो मी तुम्हांला देईन.’ तेव्हा सुतीक्ष्ण म्हणाले, ‘मी वर तर कधी मागितलाच नाही. मला समजतच नाही की, काय खोटे व काय खरे आहे. मग काय मागू व काय नको?॥ १२॥

मूल (चौपाई)

तुम्हहि नीक लागै रघुराई।
सो मोहि देहु दास सुखदाई॥
अबिरल भगति बिरति बिग्याना।
होहु सकल गुन ग्यान निधाना॥

अनुवाद (हिन्दी)

म्हणून हे रघुनाथ, हे दासांना सुख देणारे, जे तुम्हांला चांगले वाटेल, ते मला द्या.’ श्रीरामचंद्र म्हणाले, ‘हे मुनी, तुम्ही प्रगाढभक्ती, वैराग्य, विज्ञान आणि सर्व गुणांचे व ज्ञानाचे निधान व्हाल.’॥ १३॥

मूल (चौपाई)

प्रभु जो दीन्ह सो बरु मैं पावा।
अब सो देहु मोहि जो भावा॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा मुनी म्हणाले की, ‘प्रभूंनी जे वरदान दिले, ते मला मिळाले. आता मला जे चांगले वाटते, ते द्या,॥ १४॥

दोहा

मूल (दोहा)

अनुज जानकी सहित प्रभु चाप बान धर राम।
मम हिय गगन इंदु इव बसहु सदा निहकाम॥ ११॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभो! हे श्रीराम, लक्ष्मण व सीतेसह धनुष्य-बाण-धारी या रूपात तुम्ही माझ्या हृदयाकाशात चंद्राप्रमाणे नित्य निवास करावा.’॥ ११॥

मूल (चौपाई)

एवमस्तु करि रमानिवासा।
हरषि चले कुंभज रिषि पासा॥
बहुत दिवस गुर दरसनु पाएँ।
भए मोहि एहिं आश्रम आएँ॥

अनुवाद (हिन्दी)

‘तथास्तु’ असे म्हणून लक्ष्मीनिवास श्रीरामचंद्र आनंदाने अगस्त्य ऋषींकडे निघाले. मग सुतीक्ष्ण मुनी म्हणाले, ‘गुरू अगस्ती यांचे दर्शन घेऊन या आश्रमात आलेले मला पुष्कळ दिवस झाले.॥ १॥

मूल (चौपाई)

अब प्रभु संग जाउँ गुर पाहीं।
तुम्ह कहँ नाथ निहोरा नाहीं॥
देखि कृपानिधि मुनि चतुराई।
लिए संग बिहसे द्वौ भाई॥

अनुवाद (हिन्दी)

आता मीही हे प्रभू, तुमच्याबरोबर गुरुजींच्या जवळ येतो. हे नाथ, यामध्ये माझा तुमच्यावर काहीही उपकार नाही.’ मुनींचे चातुर्य पाहून कृपानिधी श्रीरामांनी त्यांना आपल्यासोबत घेतले. मग दोघे बंधू हसू लागले.॥ २॥

मूल (चौपाई)

पंथ कहत निज भगति अनूपा।
मुनि आश्रम पहुँचे सुरभूपा॥
तुरत सुतीछन गुर पहिं गयऊ।
करि दंडवत कहत अस भयऊ॥

अनुवाद (हिन्दी)

वाटेत आपल्या अनुपम भक्तीचे वर्णन करीत देवांचे राजराजेश्वर श्रीराम अगस्त्य मुनींच्या आश्रमात पोहोचले. सुतीक्ष्ण त्वरित गुरू अगस्त्यांपाशी गेले आणि दंडवत करून म्हणू लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

नाथ कोसलाधीस कुमारा।
आए मिलन जगत आधारा॥
राम अनुज समेत बैदेही।
निसि दिनु देव जपत हहु जेही॥

अनुवाद (हिन्दी)

‘गुरुवर्य, तुम्ही रात्रंदिवस ज्यांचा जप करता ते अयोध्येचे राजे दशरथ यांचे कुमार जगदाधार श्रीरामचंद्र हे लक्ष्मण व सीता यांचे सोबत तुम्हांला भेटायला येत आहेत.॥ ४॥

मूल (चौपाई)

सुनत अगस्ति तुरत उठि धाए।
हरि बिलोकि लोचन जल छाए॥
मुनि पद कमल परे द्वौ भाई।
रिषि अति प्रीति लिए उर लाई॥

अनुवाद (हिन्दी)

हे ऐकताच अगस्त्य मुनी त्वरित उठून धावले. भगवंतांना पाहताच त्यांच्या नेत्रांतून आनंद आणि प्रेमाचे अश्रू वाहू लागले. दोन्ही बंधूंनी मुनींच्या चरणी लोटांगण घातले. ऋषींनी उठवून मोठॺा प्रेमाने त्यांना हृदयाशी धरले.॥ ५॥

मूल (चौपाई)

सादर कुसल पूछि मुनि ग्यानी।
आसन बर बैठारे आनी॥
पुनि करि बहु प्रकार प्रभु पूजा।
मोहि सम भाग्यवंत नहिं दूजा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्ञानी मुनींनी आदराने क्षेम-कुशल विचारून त्यांना श्रेष्ठ आसनावर बसविले. नंतर अनेक प्रकारे प्रभूंची पूजा करून म्हटले, ‘माझ्यासारखा भाग्यवान असा दुसरा कोणी नाही.’॥ ६॥

मूल (चौपाई)

जहँ लगि रहे अपर मुनि बृंदा।
हरषे सब बिलोकि सुखकंदा॥

अनुवाद (हिन्दी)

तेथे जितके इतर मुनिगण होते, ते सर्व आनंदकंद श्रीरामांचे दर्शन घेऊन आनंदित झाले.॥ ७॥

दोहा

मूल (दोहा)

मुनि समूह महँ बैठे सन्मुख सब की ओर।
सरद इंदु तन चितवत मानहुँ निकर चकोर॥ १२॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींच्या समाजामध्ये श्रीरामचंद्र सर्वांच्याकडे मुख करून बसले. सर्व मुनी त्यांना एकटक पाहू लागले. असे वाटत होते की, जणू चकोर पक्ष्यांचा जमाव शरत्पौर्णिमेच्या चंद्राकडे पहात आहे.॥ १२॥

मूल (चौपाई)

तब रघुबीर कहा मुनि पाहीं।
तुम्ह सन प्रभु दुराव कछु नाहीं॥
तुम्ह जानहु जेहि कारन आयउँ।
ताते तात न कहि समुझायउँ॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा श्रीरामांनी मुनींना सांगितले की, ‘हे प्रभो, तुमच्यापासून काही लपून नाही. मी ज्यासाठी आलो आहे, ते तुम्ही जाणताच. म्हणून हे मुनिवर्य! मी आपल्याला स्पष्टपणे काही सांगितले नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

अब सो मंत्र देहु प्रभु मोही।
जेहि प्रकार मारौं मुनिद्रोही॥
मुनि मुसुकाने सुनि प्रभु बानी।
पूछेहु नाथ मोहि का जानी॥

अनुवाद (हिन्दी)

हे मुनिवर्य! आता तुम्ही मला सल्ला द्या की, कशाप्रकारे मी मुनि-द्रोही राक्षसांना मारू?’ प्रभूंची वाणी ऐकून मुनी हसले आणि म्हणाले? ‘हे नाथ, तुम्ही काय म्हणून मला हा प्रश्न विचारलात?॥ २॥

मूल (चौपाई)

तुम्हरेइँ भजन प्रभाव अघारी।
जानउँ महिमा कछुक तुम्हारी॥
ऊमरि तरु बिसाल तव माया।
फल ब्रह्मांड अनेक निकाया॥

अनुवाद (हिन्दी)

हे पापांचा नाश करणारे. मी जर तुमच्याच भजनाच्या प्रभावाने तुमचा काही थोडासाच महिमा जाणतो. तुमची माया ही औदुंबराच्या विशाल वृक्षासारखी आहे. अनेक ब्रह्मांडांचे समूह हे त्याचीच फळे आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

जीव चराचर जंतु समाना।
भीतर बसहिं न जानहिं आना॥
ते फल भच्छक कठिन कराला।
तव भयँ डरत सदा सोउ काला॥

अनुवाद (हिन्दी)

चराचर जीव हे उंबराच्या फळात राहणाऱ्या लहान जंतूंप्रमाणे ब्रह्मांडरूपी फळांमध्ये राहातात आणि आपल्या त्या छोटॺाशा जगाशिवाय दुसरे काही त्यांना माहीत नसते. त्या फळांना खाऊन टाकणारा कराल काल आहे. तो कालसुद्धा नेहमी तुम्हांला भिऊन असतो.॥ ४॥

मूल (चौपाई)

ते तुम्ह सकल लोकपति साईं।
पूँछेहु मोहि मनुज की नाईं॥
यह बर मागउँ कृपानिकेता।
बसहु हृदयँ श्री अनुज समेता॥

अनुवाद (हिन्दी)

त्या सर्व लोकपालांचे स्वामी असूनही तुम्ही मला सामान्य मनुष्याप्रमाणे प्रश्न विचारला. मी असा वर मागतो की, तुम्ही सीता व लक्ष्मण यांच्यासह माझ्या हृदयात नित्य निवास करावा.॥ ५॥

मूल (चौपाई)

अबिरल भगति बिरति सतसंगा।
चरन सरोरुह प्रीति अभंगा॥
जद्यपि ब्रह्म अखंड अनंता।
अनुभव गम्य भजहिं जेहि संता॥

अनुवाद (हिन्दी)

मला प्रगाढ भक्ती, वैराग्य, सत्संग व तुमच्या चरणकमली अतूट प्रेम मिळो. जरी तुम्ही अखंड व अनंत ब्रह्म आहात, अनुभवानेच तुम्हांला जाणता येते आणि संतजन तुमचे भजन करतात,॥ ६॥

मूल (चौपाई)

अस तव रूप बखानउँ जानउँ।
फिरि फिरि सगुन ब्रह्म रति मानउँ॥
संतत दासन्ह देहु बड़ाई।
तातें मोहि पूँछेहु रघुराई॥

अनुवाद (हिन्दी)

जरी मी तुमचे हे रूप जाणतो आणि त्याचे वर्णनसुद्धा करतो, तरीही पुनःपुन्हा मी सगुण ब्रह्मावरच प्रेम करतो. तुम्ही नेहमी सेवकांना मोठेपणा देता, म्हणून हे रघुनाथ, तुम्ही मला हे विचारले.॥ ७॥