०५ विराध-वध, शरभंग-प्रसंग

मूल (चौपाई)

मुनि पद कमल नाइ करि सीसा।
चले बनहि सुर नर मुनि ईसा॥
आगें राम अनुज पुनि पाछें।
मुनि बर बेष बने अति काछें॥

अनुवाद (हिन्दी)

मुनींच्या चरणी नतमस्तक होऊन देव, मनुष्य व मुनींचे स्वामी असलेले श्रीराम पुढील वनाकडे निघाले. पुढे श्रीराम, त्यांच्यामागे लक्ष्मण असे हे दोघेही मुनि-वेषामध्ये फारच शोभून दिसत होते.॥ १॥

मूल (चौपाई)

उभय बीच श्री सोहइ कैसी।
ब्रह्म जीव बिच माया जैसी॥
सरिता बन गिरि अवघट घाटा।
पति पहिचानि देहिं बर बाटा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे परब्रह्म व जीव यांच्यामध्ये माया असते, त्याप्रमाणे राम-लक्ष्मण यांच्यामध्ये सीता शोभत होती. नदी, वन, पर्वत आणि दुर्गम घाट हे सर्व आपल्या स्वामींना ओळखून चांगल्या प्रकारे वाट देत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

जहँ जहँ जाहिं देव रघुराया।
करहिं मेघ तहँ तहँ नभ छाया॥
मिला असुर बिराध मग जाता।
आवतहीं रघुबीर निपाता॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ जिथे जिथे जात, तिथे तिथे मेघ आकाशातून सावली धरीत होते. रस्त्यात विराध नावाचा राक्षस भेटला. समोर येताच श्रीरामांनी त्याला ठार मारले.॥ ३॥

मूल (चौपाई)

तुरतहिं रुचिर रूप तेहिं पावा।
देखि दुखी निज धाम पठावा॥
पुनि आए जहँ मुनि सरभंगा।
सुंदर अनुज जानकी संगा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांच्या हातून मृत्यू पावताच विराधाला दिव्य रूप प्राप्त झाले. तो दुःखी आहे, असे पाहून प्रभूंनी त्याला परमधामास पाठवून दिले. नंतर लक्ष्मण व सीता यांना घेऊन प्रभू शरभंग मुनींच्याकडे गेले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

देखि राम मुख पंकज मुनिबर लोचन भृंग।
सादर पान करत अति धन्य जन्म सरभंग॥ ७॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांचे मुखकमल पाहून मुनिश्रेष्ठ शरभंगांचे नेत्ररूपी भ्रमर अत्यंत आदराने त्याचे सौंदर्यपान करू लागले. शरभंगांचा जन्म धन्य होय.॥ ७॥

मूल (चौपाई)

कह मुनि सुनु रघुबीर कृपाला।
संकर मानस राजमराला॥
जात रहेउँ बिरंचि के धामा।
सुनेउँ श्रवन बन ऐहहिं रामा॥

अनुवाद (हिन्दी)

मुनी म्हणाले, ‘हे कृपाळू रघुवीर, हे श्रीशंकरांच्या मनरूपी मानससरोवरातील राजहंस, ऐका. मी ब्रह्मलोकी जात होतो. इतक्यात माझ्या कानी आले की, श्रीराम वनात येणार आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

चितवत पंथ रहेउँ दिन राती।
अब प्रभु देखि जुड़ानी छाती॥
नाथ सकल साधन मैं हीना।
कीन्ही कृपा जानि जन दीना॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हापासून रात्रंदिवस मी तुमची वाट पहात आहे. आज प्रभूंना पाहून मन शांत झाले. हे नाथ, मी कोणतेही साधन केलेले नाही. तरीही तुम्ही आपला दीन सेवक समजून माझ्यावर कृपा केली.

मूल (चौपाई)

सो कछु देव न मोहि निहोरा।
निज पन राखेउ जन मन चोरा॥
तब लगि रहहु दीन हित लागी।
जब लगि मिलौं तुम्हहि तनु त्यागी॥

अनुवाद (हिन्दी)

हे देवा, हा काही माझ्यावर तुमचा उपकार नाही. हे भक्ताचे हृदय चोरणारे, असे करून तुम्ही आपल्या ब्रीदाचे पालन केलेत. आता मी शरीर सोडून तुमच्या परमधामात जात नाही, तोपर्यंत या दीन सेवकाच्या कल्याणासाठी येथे थांबा.’॥ ३॥

मूल (चौपाई)

जोग जग्य जप तप ब्रत कीन्हा।
प्रभु कहँ देइ भगति बर लीन्हा॥
एहि बिधि सर रचि मुनि सरभंगा।
बैठे हृदयँ छाड़ि सब संगा॥

अनुवाद (हिन्दी)

योग, यज्ञ, जप, तप व व्रत इत्यादी जे काही शरभंगांनी केले होते, ते सर्व प्रभूंना अर्पण केले आणि त्याबदली भक्तीचे वरदान घेतले. अशाप्रकारे दुर्लभ भक्ती प्राप्त केल्यावर मुनी शरभंगांनी चिता रचली व मनःपूर्वक सर्व आसक्ती सोडून ते चितेवर बसले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सीता अनुज समेत प्रभु नील जलद तनु स्याम।
मम हिय बसहु निरंतर सगुनरूप श्रीराम॥ ८॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणाले, ‘हे नील मेघाप्रमाणे श्याम शरीर असणाऱ्या सगुण रूप श्रीराम, सीता व लक्ष्मणासह तुम्ही माझ्या हृदयात निरंतर निवास करा.’॥ ८॥

मूल (चौपाई)

अस कहि जोग अगिनि तनु जारा।
राम कृपाँ बैकुंठ सिधारा॥
ताते मुनि हरि लीन न भयऊ।
प्रथमहिं भेद भगति बर लयऊ॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून शरभंगांनी योगाग्नीने आपले शरीर भस्म करून टाकले व ते श्रीरामांच्या कृपेने वैकुंठास गेले. त्यांनी भेद-भक्तीचा वर पूर्वीच घेतला होता, म्हणून ते भगवंतांमध्ये लीन झाले नाहीत.॥१॥

मूल (चौपाई)

रिषि निकाय मुनिबर गति देखी।
सुखी भए निज हृदयँ बिसेषी॥
अस्तुति करहिं सकल मुनि बृंदा।
जयति प्रनत हित करुना कंदा॥

अनुवाद (हिन्दी)

ऋषि-समाज मुनिश्रेष्ठ शरभंगांची ती दुर्लभ गती पाहून आपल्या मनातून खूप सुखावला. सर्व मुनिवृंद श्रीरामांची स्तुती करू लागला. ते म्हणत होते, ‘शरणागत हितकारी करुणाकंद प्रभूंचा विजय असो.’॥ २॥

मूल (चौपाई)

पुनि रघुनाथ चले बन आगे।
मुनिबर बृंद बिपुल संँग लागे॥
अस्थि समूह देखि रघुराया।
पूछी मुनिन्ह लागि अति दाया॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर श्रीरघुनाथ पुढील वनात गेले. श्रेष्ठ मुनींची अनेक मंडळे त्यांच्याबरोबर निघाली. वाटेत एका ठिकाणी हाडांचे ढीग पाहून श्रीरामांना अतिशय दया आली. त्यांनी मुनींना विचारले,॥ ३॥

मूल (चौपाई)

जानतहूँ पूछिअ कस स्वामी।
सबदरसी तुम्ह अंतरजामी॥
निसिचर निकर सकल मुनि खाए।
सुनि रघुबीर नयन जल छाए॥

अनुवाद (हिन्दी)

मुनी म्हणाले, ‘हे स्वामी, तुम्ही सर्वदर्शी आणि अंतर्यामी आहात. सर्व जाणत असतानाही आम्हांस का विचारता? राक्षसांच्या झुंडींनी सर्व मुनींना खाऊन टाकले, त्यांची ही हाडे आहेत.’ हे ऐकताच श्रीरघुवीरांच्या नेत्रांमध्ये करुणेमुळे पाणी आले.॥ ४॥