०४ सीता-अनसूया-मिलन

मूल (चौपाई)

अनुसुइया के पद गहि सीता।
मिली बहोरि सुसील बिनीता॥
रिषिपतिनी मन सुख अधिकाई।
आसिष देइ निकट बैठाई॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर परम शीलवती विनम्र सीतेने अत्रिपत्नी अनसूयेचे पाय धरून तिची भेट घेतली. ऋषि-पत्नीच्या मनास खूप आनंद झाला. तिने आशीर्वाद देऊन सीतेला जवळ बसवून घेतले.॥ १॥

मूल (चौपाई)

दिब्य बसन भूषन पहिराए।
जे नित नूतन अमल सुहाए॥
कह रिषिबधू सरस मृदु बानी।
नारिधर्म कछु ब्याज बखानी॥

अनुवाद (हिन्दी)

आणि तिने नित्य नवी, निर्मळ आणि सुंदर राहाणारी दिव्य वस्त्रे व अलंकार सीतेला घातले. नंतर ऋषि-पत्नी त्या निमित्ताने मधुर व कोमल वाणीने स्त्रियांच्या काही धर्मांचे वर्णन सांगू लागली.॥ २॥

मूल (चौपाई)

मातु पिता भ्राता हितकारी।
मितप्रद सब सुनु राजकुमारी॥
अमित दानि भर्ता बयदेही।
अधम सो नारि जो सेव न तेही॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे राजकुमारी, ऐक. माता, पिता, भाऊ हे सर्व हितकारक असतात, परंतु ते एका मर्यादेपर्यंतच सुख देणारे आहेत. परंतु हे जानकी, पती हा मोक्षरूप असीम सुख देणारा असतो. अशा पतीची जी सेवा करीत नाही, ती स्त्री अधम होय.॥ ३॥

मूल (चौपाई)

धीरज धर्म मित्र अरु नारी।
आपद काल परिखिअहिं चारी॥
बृद्ध रोगबस जड़ धनहीना।
अंध बधिर क्रोधी अति दीना॥

अनुवाद (हिन्दी)

धैर्य, धर्म, मित्र व स्त्री या चौघांची परीक्षा संकटकाळीच होत असते. वृद्ध, रोगी, मूर्ख, निर्धन, अंध, बहिरा, क्रोधी व अत्यंत दीन,॥ ४॥

मूल (चौपाई)

ऐसेहु पति कर किएँ अपमाना।
नारि पाव जमपुर दुख नाना॥
एकइ धर्म एक ब्रत नेमा।
कायँ बचन मन पति पद प्रेमा॥

अनुवाद (हिन्दी)

अशाही पतीचा अपमान केल्यास स्त्रीला यमपुरीत तऱ्हेतऱ्हेचे दुःख भोगावे लागते. शरीर, वचन आणि मनाने पतीच्या चरणी प्रेम करणे हा स्त्रीचा एकच धर्म आहे, एकच व्रत आहे आणि एकच नियम आहे.॥ ५॥

मूल (चौपाई)

जग पतिब्रता चारि बिधि अहहीं।
बेद पुरान संत सब कहहीं॥
उत्तम के अस बस मन माहीं।
सपनेहुँ आन पुरुष जग नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

जगात चार प्रकारच्या पतिव्रता असतात. वेद, पुराण व संत हे सर्व असे म्हणतात की, जगात माझा पती सोडल्यास दुसरा पुरुष माझ्या स्वप्नातही येत नाही, असा भाव उत्तम श्रेणीच्या पतिव्रतेच्या मनात असतो.॥ ६॥

मूल (चौपाई)

मध्यम परपति देखइ कैसें।
भ्राता पिता पुत्र निज जैसें॥
धर्म बिचारि समुझि कुल रहई।
सो निकिष्ट त्रिय श्रुति अस कहई॥

अनुवाद (हिन्दी)

मध्यम श्रेणीची पतिव्रता दुसऱ्या पुरुषाला अवस्थेप्रमाणे आपला सख्खा भाऊ, पिता किंवा पुत्र यांच्या रूपात पहाते. जी धर्माचा विचार करून आणि आपल्या कुळाची मर्यादा जाणून स्वतःचा (मनात असूनही) परपुरुषापासून बचाव करते, ती निकृष्ट प्रतीची पतिव्रता होय, असे वेद म्हणतात.॥ ७॥

मूल (चौपाई)

बिनु अवसर भय तें रह जोई।
जानेहु अधम नारि जग सोई॥
पति बंचक परपति रति करई।
रौरव नरक कल्प सत परई॥

अनुवाद (हिन्दी)

आणि ज्या स्त्रीला व्यभिचाराची संधी मिळत नाही, किंवा जी भीतीमुळे पतिव्रता राहते, जगात त्या स्त्रीला अधम मानावे. पतीचा विश्वासघात करून जी स्त्री परपुरुषाशी रती करते, ती स्त्री तर शंभर कल्पांपर्यंत रौरव नरकात पडते.॥ ८॥

मूल (चौपाई)

छनसुख लागि जनम सत कोटी।
दुख न समुझ तेहि सम को खोटी॥
बिनु श्रम नारि परम गति लहई।
पतिब्रत धर्म छाड़ि छल गहई॥

अनुवाद (हिन्दी)

क्षणभराच्या सुखासाठी कोटॺावधी जन्मामध्ये भोगावे लागणारे दुःख जिला समजत नाही, त्या स्त्रीसारखी दुष्ट कोण असणार? जी स्त्री फसवणूक न करता पातिव्रत्य धर्म स्वीकारते, तिला विनासायास परम गती प्राप्त होते.॥ ९॥

मूल (चौपाई)

पति प्रतिकूल जनम जहँ जाई।
बिधवा होइ पाइ तरुनाई॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु जी पतीविरुद्ध वागते, ती पुढे जेथे जन्म घेते, तेथे ती तारुण्यातच विधवा होते.॥१०॥

सोरठा

मूल (दोहा)

सहज अपावनि नारि पति सेवत सुभ गति लहइ।
जसु गावत श्रुति चारि अजहुँ तुलसिका हरिहि प्रिय॥ ५ (क)॥

अनुवाद (हिन्दी)

स्त्री जन्माने अपवित्र आहे. परंतु पतीची सेवा केल्याने ती अनायासच शुभ गती प्राप्त करते. पातिव्रत्य धर्मामुळे तुळस ही आजही भगवंतांना प्रिय आहे आणि चारी वेद तिची कीर्ती गातात.॥ ५(क)॥

मूल (दोहा)

सुनु सीता तव नाम सुमिरि नारि पतिब्रत करहिं।
तोहि प्रानप्रिय राम कहिउँ कथा संसार हित॥ ५(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हे सीते, ऐक. तुझे नाव घेऊनच स्त्रिया पातिव्रत्य धर्माचे पालन करतील. तुला श्रीराम हे प्राणांहून प्रिय आहेत. ही पातिव्रत्य धर्माची गोष्ट मी जगातील स्त्रियांच्या हितासाठी सांगितली आहे.’॥ ५(ख)॥

मूल (चौपाई)

सुनि जानकी परम सुखु पावा।
सादर तासु चरन सिरु नावा॥
तब मुनि सन कह कृपानिधाना।
आयसु होइ जाउँ बन आना॥

अनुवाद (हिन्दी)

हे ऐकून जानकीला खूप आनंद झाला आणि तिने मोठॺा आदराने अनसूयेच्या चरणी मस्तक ठेवले. मग कृपेची खाण असलेल्या श्रीरामांनी मुनींना सांगितले की, ‘आज्ञा असेल तर आता मी दुसऱ्या वनात जातो.॥ १॥

मूल (चौपाई)

संतत मो पर कृपा करेहू।
सेवक जानि तजेहु जनि नेहू॥
धर्म धुरंधर प्रभु कै बानी।
सुनि सप्रेम बोले मुनि ग्यानी॥

अनुवाद (हिन्दी)

माझ्यावर निरंतर तुम्ही कृपा ठेवा आणि आपला सेवक मानून माझ्यावरील प्रेम सोडू नका.’ धर्मधुरंधर प्रभू श्रीरामांचे बोलणे ऐकून ज्ञानी मुनी प्रेमाने म्हणाले,॥ २॥

मूल (चौपाई)

जासु कृपा अज सिव सनकादी।
चहत सकल परमारथ बादी॥
ते तुम्ह राम अकाम पिआरे।
दीन बंधु मृदु बचन उचारे॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे रामा, ब्रह्मदेव, शिव व सनकादिक हे सर्व परमार्थवादी ज्यांची कृपा इच्छितात, ते निष्काम पुरुषांनाही प्रिय आणि दीनांचे बंधू असलेले भगवान तुम्हीच आहात. म्हणून असे गोड शब्द बोलत आहात.॥ ३॥

मूल (चौपाई)

अब जानी मैं श्री चतुराई।
भजी तुम्हहि सब देव बिहाई॥
जेहि समान अतिसय नहिं कोई।
ता कर सील कस न अस होई॥

अनुवाद (हिन्दी)

आता मला श्रीलक्ष्मीचे चातुर्य समजले की, तिने इतर सर्व देव सोडून तुम्हांलाच का भजले ते. सर्व गोष्टींमध्ये ज्यांच्याहून फार मोठा दुसरा कोणीही नाही, त्याचे शील असे श्रेष्ठ का बरे असणार नाही?॥ ४॥

मूल (चौपाई)

केहि बिधि कहौं जाहु अब स्वामी।
कहहु नाथ तुम्ह अंतरजामी॥
असकहि प्रभु बिलोकि मुनि धीरा।
लोचन जल बह पुलक सरीरा॥

अनुवाद (हिन्दी)

हे स्वामी, मी कसे म्हणू की ‘आता जा.’ हे नाथ, तुम्ही अंतर्यामी आहात, तुम्हीच सांगा.’ असे म्हणून धीर मुनी प्रभूंच्याकडे पाहू लागले. मुनींच्या नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले आणि त्यांचे शरीर रोमांचित झाले.॥ ५॥

छंद

मूल (दोहा)

तन पुलक निर्भर प्रेम पूरन नयन मुख पंकज दिए।
मन ग्यान गुन गोतीत प्रभु मैं दीख जप तप का किए॥
जप जोग धर्म समूह तें नर भगति अनुपम पावई।
रघुबीर चरित पुनीत निसि दिन दास तुलसी गावई॥

अनुवाद (हिन्दी)

अत्रिमुनी अत्यंत प्रेमात मग्न होते, त्यांचे शरीर पुलकित होत होते आणि नेत्र श्रीरामांच्या मुख-कमलावर लागले होते. ते मनात विचार करीत होते की, मी असे कोणते जप-तप केले होते की, ज्याच्यामुळे मन, ज्ञान, गुण व इंद्रिये यांच्या पलीकडील प्रभूंचे दर्शन मला लाभले. जप, योग आणि धर्म-समूह यांमुळे मनुष्याला अनुपम भक्ती प्राप्त होते. अशा श्रीरघुवीरांचे पवित्र चरित्र तुलसीदास रात्रंदिवस गात आहेत.॥ ६॥

दोहा

मूल (दोहा)

कलिमल समन दमन मन राम सुजस सुखमूल।
सादर सुनहिं जे तिन्ह पर राम रहहिं अनुकूल॥ ६ (क)॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांची सुंदर कीर्ती कलियुगातील पापांचा नाश करणारी, मनाचे दमन करणारी आणि सुखाचे मूळ आहे. जे लोक ती आदराने ऐकतात, त्यांच्यावर श्रीराम प्रसन्न असतात.॥ ६(क)॥

सोरठ

मूल (दोहा)

कठिन काल मल कोस धर्म न ग्यान न जोग जप।
परिहरि सकल भरोस रामहि भजहिं ते चतुरनर॥ ६ (ख)॥

अनुवाद (हिन्दी)

हा कठीण कलिकाळ पापांचा खजिना आहे. यात धर्म, ज्ञान, योग व जप योग्य प्रकारे होत नाही. म्हणून या युगात जे लोक इतर सर्वांवरचा विश्वास सोडून श्रीरामांनाच भजतात, तेच धन्य होत.॥ ६ (ख)॥