०१ मंगलाचरण

Misc Detail

श्लोक

मूल (दोहा)

मूलं धर्मतरोर्विवेकजलधेः पूर्णेन्दुमानन्ददं
वैराग्याम्बुजभास्करं ह्यघघनध्वान्तापहं तापहम्।
मोहाम्भोधरपूगपाटनविधौ स्वःसम्भवं शङ्करं
वन्दे ब्रह्मकुलं कलङ्कशमनं श्रीरामभूपप्रियम्॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

धर्मरूपी वृक्षाचे मूळ, विवेकरूपी समुद्राला आनंदित करणारे पूर्णचंद्र, वैराग्यरूपी कमळाला विकसित करणारे सूर्य, पापरूपी घोर अंधकार समूळ नष्ट करणारे, तिन्ही ताप हरण करणारे, मोहरूपी मेघांच्या समूहाला छिन्न-भिन्न करण्याच्या क्रियेमध्ये आकाशात उत्पन्न होणाऱ्या वाऱ्यासारखे, ब्रह्मदेवांचे आत्मज, कलंकनाशक आणि महाराज श्रीरामचंद्रांना प्रिय अशा श्रीशंकरांना मी वंदन करतो.॥ १॥

मूल (दोहा)

सान्द्रानन्दपयोदसौभगतनुं पीताम्बरं सुन्दरं
पाणौ बाणशरासनं कटिलसत्तूणीरभारं वरम्।
राजीवायतलोचनं धृतजटाजूटेन संशोभितं
सीतालक्ष्मणसंयुतं पथिगतं रामाभिरामं भजे॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांचे शरीर सजल मेघांसारखे सुंदर, श्यामल आणि आनंदघन आहे, ज्यांनी सुंदर वल्कलाचे पीतांबर धारण केले आहे, ज्यांच्या हातांमध्ये धनुष्य-बाण आहेत, ज्यांच्या कमरेला उत्तम भाते शोभून दिसत आहेत, ज्यांचे कमलासमान विशाल नेत्र आहेत आणि ज्यांनी मस्तकावर जटाजूट धारण केला आहे, त्या अत्यंत शोभायमान श्रीसीता व लक्ष्मण यांच्यासह मार्गाने निघालेल्या आनंद देणाऱ्या श्रीरामचंद्रांना मी भजतो.॥ २॥

सोरठा

मूल (दोहा)

उमा राम गुन गूढ़ पंडित मुनि पावहिं बिरति।
पावहिं मोह बिमूढ़ जे हरि बिमुख न धर्म रति॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीशंकर म्हणतात, ‘हे पार्वती, श्रीरामांचे गुण गूढ आहेत. पंडित व मुनी ते जाणून वैराग्य प्राप्त करतात. परंतु जे लोक भगवंतांशी विन्मुख असतात आणि ज्यांना धर्माबद्दल प्रेम नाही, ते महामूर्ख लोक त्यांची लीला ऐकून त्यावर विश्वास ठेवत नाहीत.॥ १॥

मूल (चौपाई)

पुर नर भरत प्रीति मैं गाई।
मति अनुरूप अनूप सुहाई॥
अब प्रभु चरित सुनहु अति पावन।
करत जे बन सुर नर मुनि भावन॥

अनुवाद (हिन्दी)

अयोध्या व मिथिलावासींच्या तसेच भरताच्या अनुपम आणि सुंदर प्रेमाचे गायन मी आपल्या बुद्धीप्रमाणे केले. आता देव, मनुष्य आणि मुनी यांच्या मनाला आवडणारे प्रभू श्रीरामचंद्रांचे वनात घडलेले अत्यंत पवित्र चरित्र ऐक.॥ १॥