५६ भरताचे अयोध्येस परतणे

दोहा

मूल (दोहा)

सानुज सीय समेत प्रभु राजत परन कुटीर।
भगति ग्यानु बैराग्य जनु सोहत धरें सरीर॥ ३२१॥

अनुवाद (हिन्दी)

लक्ष्मण व सीतेसह प्रभू रामचंद्र पर्णकुटीमध्ये असे शोभून दिसत होते की, जणू वैराग्य, भक्ती आणि ज्ञान हेच शरीर धारण करून तेथे रहात होते.॥ ३२१॥

मूल (चौपाई)

मुनि महिसुर गुर भरत भुआलू।
राम बिरहँ सबु साजु बिहालू॥
प्रभु गुन ग्राम गनत मन माहीं।
सब चुपचाप चले मग जाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मुनी, ब्राह्मण, गुरू वसिष्ठ, भरत आणि राजा जनक हा सारा समाज श्रीरामचंद्रांच्या विरहाने विव्हळ झाला होता. प्रभूंच्या गुणसमूहांचे मनात स्मरण करीत सर्व लोक वाटेने मौन होऊन चालले होते.॥ १॥

मूल (चौपाई)

जमुना उतरि पार सबु भयऊ।
सो बासरु बिनु भोजन गयऊ॥
उतरि देवसरि दूसर बासू।
रामसखाँ सब कीन्ह सुपासू॥

अनुवाद (हिन्दी)

पहिल्या दिवशी सर्व लोक यमुना ओलांडून पलीकडे गेले. तो दिवस भोजनाविना गेला. दुसरा मुक्काम गंगा ओलांडून पलीकडे शृंगवेरपुरास झाला. तेथे रामसखा निषादराजाने सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.॥

मूल (चौपाई)

सई उतरि गोमतीं नहाए।
चौथें दिवस अवधपुर आए॥
जनकु रहे पुर बासर चारी।
राज काज सब साज सँभारी॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर त्यांनी सई पार करून गोमती नदीत स्नान केले आणि चौथ्या दिवशी सर्वजण अयोध्येला पोहोचले. जनक राजे चार दिवस अयोध्येत राहिले. तेथील राज्यकारभार, सामान-सुमान सांभाळून,॥ ३॥

मूल (चौपाई)

सौंपि सचिव गुरभरतहि राजू।
तेरहुति चले साजि सबु साजू॥
नगर नारि नर गुरसिख मानी।
बसे सुखेन राम रजधानी॥

अनुवाद (हिन्दी)

तसेच मंत्री, गुरुजी आणि भरत यांच्यावर राज्य सोपवून, सर्व संपत्तीची व्यवस्था लावून मिथिलेला निघाले. अयोध्यानगरीतील स्त्री-पुरुष गुरुजींचा उपदेश मानून श्रीरामांची राजधानी अयोध्येमध्ये सुखाने राहू लागले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम दरस लगि लोग सब करत नेम उपबास।
तजि तजि भूषन भोग सुख जिअत अवधि कीं आस॥ ३२२॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व लोक श्रीरामचंद्रांच्या पुनर्दर्शनासाठी नियम व उपास करू लागले. ते भूषणे व भोग-सुख यांचा त्याग करून अवधी पूर्ण होऊन श्रीराम येण्याच्या आशेवर जगत आहेत.॥ ३२२॥

मूल (चौपाई)

सचिव सुसेवक भरत प्रबोधे।
निज निज काज पाइ सिख ओधे॥
पुनिसिखदीन्हि बोलिलघु भाई।
सौंपी सकल मातु सेवकाई॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने मंत्र्यांना व विश्वासू सेवकांना समजावून कार्य-प्रवण केले. तेही आज्ञा मिळाल्यावर आपापल्या कामाला लागले. भरताने शत्रुघ्नाला बोलावून उपदेश दिला आणि सर्व मातेंची सेवा त्याच्यावर सोपविली.॥ १॥

मूल (चौपाई)

भूसुर बोलि भरत कर जोरे।
करि प्रनाम बय बिनय निहोरे॥
ऊँच नीच कारजु भल पोचू।
आयसु देब न करब सँकोचू॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने ब्राह्मणांना बोलावून हात जोडून प्रणाम केला. त्यांच्या मानाप्रमाणे विनयाने विनंती केलीकी, ‘तुम्ही लहान-मोठे, चांगले-सामान्य जे काही काम असेल, त्यासाठी आज्ञा करा. संकोच बाळगू नका.’॥

मूल (चौपाई)

परिजन पुरजन प्रजा बोलाए।
समाधानु करि सुबस बसाए॥
सानुज गे गुर गेहँ बहोरी।
करि दंडवत कहत कर जोरी॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने नंतर परिवारातील लोकांना, नागरिकांना आणि इतर प्रजेला बोलावून, त्यांचे समाधान करून त्यांना सुखाने राहण्यास सांगितले. नंतर तो शत्रुघ्नाबरोबर गुरुजींच्या घरी गेला आणि दंडवत घालून हात जोडून म्हणाला.॥ ३॥

मूल (चौपाई)

आयसु होइ त रहौं सनेमा।
बोले मुनि तन पुलकि सपेमा॥
समुझब कहबकरब तुम्ह जोई।
धरम सारु जग होइहि सोई॥

अनुवाद (हिन्दी)

आपली आज्ञा घेऊन मी नियमपूर्वक रहावे असे म्हणतो. मुनी वसिष्ठ पुलकित होऊन प्रेमाने म्हणाले, ‘हे भरता, तू जे काही समजतोस, करतोस व म्हणतोस, तेच या जगात धर्माचे सार असेल.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुनि सिख पाइ असीस बड़ि गनक बोलि दिनु साधि।
सिंघासन प्रभु पादुका बैठारे निरुपाधि॥ ३२३॥

अनुवाद (हिन्दी)

हे ऐकून, आज्ञा घेऊन व मोठा आशीर्वाद मिळवून भरताने ज्योतिष्यांना बोलाविले आणि चांगला मुहूर्त पाहून प्रभूंच्या चरणपादुका निर्विघ्नपणे सिंहासनावर विराजमान केल्या.॥ ३२३॥

मूल (चौपाई)

राम मातु गुर पद सिरु नाई।
प्रभु पद पीठ रजायसु पाई॥
नंदिगावँ करि परन कुटीरा।
कीन्ह निवासु धरम धुर धीरा॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर श्रीरामांची माता कौसल्या आणि गुरुजींच्या चरणांना नतमस्तक होऊन व प्रभूंच्या चरणपादुकांची आज्ञा घेऊन धर्माची धुरा धारण करण्यामध्ये धैर्यशील असलेल्या भरताने नंदीग्रामात पर्णकुटी बनविली आणि तेथे तो राहू लागला.॥ १॥

मूल (चौपाई)

जटाजूट सिर मुनिपट धारी।
महि खनि कुस साँथरी सँवारी॥
असन बसन बासन ब्रत नेमा।
करत कठिन रिषिधरम सप्रेमा॥

अनुवाद (हिन्दी)

शिरावर जटाजूट आणि शरीरावर वल्कले धारण करून त्याने पृथ्वी खोदून तिच्यामध्ये कुशांचे आसन घातले. भोजन, वस्त्रे, भांडी, व्रते, नियम या गोष्टींमध्ये तो ऋषींच्या कठीण धर्माचे श्रद्धापूर्वक आचरण करू लागला.॥ २॥

मूल (चौपाई)

भूषन बसन भोग सुख भूरी।
मन तन बचन तजे तिन तूरी॥
अवध राजु सुर राजु सिहाई।
दसरथ धनु सुनि धनदु लजाई॥

अनुवाद (हिन्दी)

दागिने-कपडे आणि इतर अनेक प्रकारचे सुखभोग यांचा त्याने कायावाचामनाने प्रतिज्ञापूर्वक त्याग केला. ज्या अयोध्येच्या राज्याचा इंद्रालाही हेवा वाटे आणि जेथील राजा दशरथ यांच्या संपत्तीबद्दल ऐकून कुबेरही ओशाळून जात असे,॥ ३॥

मूल (चौपाई)

तेहिंपुर बसत भरत बिनु रागा।
चंचरीक जिमि चंपक बागा॥
रमा बिलासु राम अनुरागी।
तजत बमन जिमि जन बड़भागी॥

अनुवाद (हिन्दी)

त्याच अयोध्यापुरीमध्ये भरत असा अनासक्त बनून निवास करीत होता की, ज्याप्रमाणे सोनचाफ्याच्या बागेत भ्रमर चाफ्याजवळ फिरकत नाही. श्रीरामचंद्रांचे प्रेमी मोठे भाग्यवान पुरुष असतात. ते लक्ष्मीच्या विलासाचा वमनाप्रमाणे त्याग करतात.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम पेम भाजन भरतु बड़े न एहिं करतूति।
चातक हंस सराहिअत टेंक बिबेक बिभूति॥ ३२४॥

अनुवाद (हिन्दी)

मग भरत हा तर प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांचा आवडता होता. तो या भोगैश्वर्याच्या त्यागाच्या बळावर मोठा झाला नव्हता. (तर श्रीराम येईपर्यंत त्यागाने रहाण्याचा निग्रह व धर्माधर्मविवेक या दोन गुणांमुळे भरत श्रेष्ठ ठरला.) पृथ्वीवरील पाणी न पिण्याचा हट्ट धरून बसलेल्या चातकाची आणि नीर-क्षीर-विवेकाची शक्ती असलेल्या हंसाचीच प्रशंसा होत असते.॥ ३२४॥

मूल (चौपाई)

देह दिनहुँ दिन दूबरि होई।
घटइ तेजु बलु मुखछबि सोई॥
नित नवराम प्रेम पनु पीना।
बढ़त धरम दलु मनु न मलीना॥

अनुवाद (हिन्दी)

भरताचे शरीर तर दिवसेंदिवस दुबळे होत होते. पण बळ व तेज वाढत होते. मुखावरील कांतीही वाढत होती. रामप्रेमाचा निश्चय नित्य नवीन व पुष्ट होत होता. धर्मनिष्ठा वाढत होती, त्यामुळे मनात श्रीरामभक्ती दिवसेंदिवस वाढत होती.॥ १॥

मूल (चौपाई)

जिमि जलु निघटत सरद प्रकासे।
बिलसत बेतस बनज बिकासे॥
सम दम संजम नियम उपासा।
नखत भरत हिय बिमल अकासा॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे शरद्ऋतूच्या येण्याने पाणी स्वच्छ होते, आकाशही स्वच्छ होते. आणि कमळे विकसित होतात. तसे शम, दम, संयम, नियम, उपवास इत्यादी भरताच्या निर्मळ हृदयरूपी आकाशातील तारागण प्रकाशित होत होते.॥ २॥

मूल (चौपाई)

ध्रुव बिस्वासु अवधि राका सी।
स्वामि सुरति सुरबीथि बिकासी॥
राम पेम बिधु अचल अदोषा।
सहित समाज सोह नित चोखा॥

अनुवाद (हिन्दी)

त्या आकाशातील ध्रुवतारा विश्वासच होता. चौदा वर्षांच्या अवधीचे ध्यान हा पौर्णिमेचा चंद्र होता. स्वामी श्रीरामचंद्र यांचीस्मृती ही आकाशगंगेप्रमाणे प्रकाशित होती. राम-प्रेम हाच नित्य राहणारा अढळ व कलंकरहित चंद्र होता. तो आपल्या समाजरूपी नक्षत्रांसह शोभत होता.॥ ३॥

मूल (चौपाई)

भरत रहनि समुझनि करतूती।
भगति बिरति गुन बिमल बिभूती॥
बरनत सकल सुकबि सकुचाहीं।
सेस गनेस गिरा गमु नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

भरताची राहणी, समजूत, करणी, भक्ती, वैराग्य, निर्मळ गुण आणि ऐश्वर्य यांचे वर्णन करण्यास सर्व मोठमोठॺा कवींना संकोच वाटतो. कारण तेथे स्वतः शेष, गणेश व सरस्वतीसुद्धा पोहोचू शकत नाहीत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

नित पूजत प्रभु पाँवरी प्रीति न हृदयँ समाति।
मागि मागि आयसु करत राज काज बहु भाँति॥ ३२५॥

अनुवाद (हिन्दी)

भरत प्रभूंच्या पादुकांची नित्य पूजा करी. त्याच्या हृदयात प्रेम मावत नव्हते. पादुकांची आज्ञा मागूनच तो सर्व प्रकारचा राज्यकारभार करीत असे.॥ ३२५॥

मूल (चौपाई)

पुलक गात हियँ सिय रघुबीरू।
जीह नामु जप लोचन नीरू॥
लखनराम सियकानन बसहीं।
भरतु भवन बसि तप तनु कसहीं॥

अनुवाद (हिन्दी)

त्याचे शरीर पुलकित असे. कारण त्याच्या हृदयात श्रीसीताराम होते. जीभ राम-नाम जपत असे. नेत्रांमध्ये प्रेमाश्रू भरलले असत. लक्ष्मण, श्रीराम आणि सीता हे तर वनात निवास करतात, परंतु भरत घरात राहूनच तपाद्वारे शरीर कृश करीत होता.॥ १॥

मूल (चौपाई)

दोउ दिसि समुझि कहत सबु लोगू।
सब बिधि भरत सराहन जोगू॥
सुनि ब्रत नेम साधु सकुचाहीं।
देखि दसा मुनिराज लजाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्हीकडची स्थिती समजून आल्यावर सर्व लोक म्हणत की, ‘भरत सर्वप्रकारे प्रशंसनीय आहे. त्याचे व्रत आणि नियम ऐकून साधु-संतांनाही संकोच वाटे आणि त्याची प्रेमनिष्ठा पाहून मुनिराजांनाही लज्जा वाटे.॥ २॥

मूल (चौपाई)

परम पुनीत भरत आचरनू।
मधुर मंजु मुद मंगल करनू॥
हरन कठिन कलि कलुष कलेसू।
महामोह निसि दलन दिनेसू॥

अनुवाद (हिन्दी)

भरताचे परम पवित्र चरित्र हे मधुर, सुंदर, आनंददायक व मांगल्य करणारे आहे. कलियुगातील पापे व कठीण क्लेश यांचे हरण करणारे आहे. महामोहरूपी रात्रीचा नाश करणाऱ्या सूर्यासारखे आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

पाप पुंज कुंजर मृगराजू।
समन सकल संताप समाजू॥
जन रंजन भंजन भव भारू।
राम सनेह सुधाकर सारू॥

अनुवाद (हिन्दी)

हे चरित्र पापसमूहरूपी हत्तींसाठी सिंह आहे. सर्व तापांच्या समुदायाचा नाश करणारे आहे. भक्तांना आनंद देणारे आहे आणि सांसारिक दुःखांचा भंग करणारे व श्रीरामप्रेमरूपी चंद्रम्यातून स्रवणारे अमृत आहे.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

सिय राम प्रेम पियूष पूरन होत जनमु न भरत को।
मुनि मन अगम जम नियम सम दम बिषम ब्रत आचरत को॥
दुख दाह दारिद दंभ दूषन सुजस मिस अपहरत को।
कलिकाल तुलसी से सठन्हि हठि राम सनमुख करत को॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीसीतारामांच्या प्रेमरूपी अमृताने परिपूर्ण असलेल्या भरताचा जन्म जर झाला नसता तर मुनींच्या मनालाही अगम्य असलेले यम, नियम, शम, दम इत्यादी कठीण व्रताचे आचरण कुणी केले असते? दुःख, संताप, दरिद्रता, दंभ इत्यादी दोषांचे आपल्या उत्तम कीर्तीच्या निमित्ताने कोणी हरण केले असते? आणि कलिकाळात, तुलसीदासासारख्या अभक्तांना बळेच श्रीरामांच्याकडे वळविले असते?

दोहा

मूल (दोहा)

भरत चरित करि नेमु तुलसी जो सादर सुनहिं।
सीय राम पद पेमु अवसि होइ भव रस बिरति॥ ३२६॥

अनुवाद (हिन्दी)

तुलसीदास म्हणतात, जे कोणी भरताचे चरित्र नियमाने आदरपूर्वक ऐकतील त्यांना निश्चितपणे श्रीसीतारामांच्या चरणी प्रेम उत्पन्न होईल आणि सांसारिक विषय रसाविषयी वैराग्य वाटू लागेल.॥ ३२६॥