५३ श्रीराम-भरत-संवाद

दोहा

मूल (दोहा)

राम सपथ सुनि मुनि जनकु सकुचे सभा समेत।
सकल बिलोकत भरत मुखु बनइ न ऊतरु देत॥ २९६॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांची शपथ ऐकून सर्व सभा, मुनी व जनक संकोचून गेले. कुणाला उत्तर देता येईना. सर्व लोक भरताच्या तोंडाकडे पाहू लागले.॥ २९६॥

मूल (चौपाई)

सभा सकुच बस भरत निहारी।
रामबंधु धरि धीरजु भारी॥
कुसमउ देखि सनेहु सँभारा।
बढ़त बिंधि जिमि घटज निवारा॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने मोठॺा संकोचाने सभेकडे पाहिले. त्याने मोठा धीर धरून व वेळ वाईट असल्याचे पाहून आपले प्रेम आवरते घेतले. ज्याप्रमाणे वाढत जाणाऱ्या विंध्याचलाला अगस्त्य मुनींनी रोखले होते.॥ १॥

मूल (चौपाई)

सोक कनक लोचन मति छोनी।
हरी बिमल गुन गन जगजोनी॥
भरत बिबेकबराहँ बिसाला।
अनायास उधरी तेहि काला॥

अनुवाद (हिन्दी)

शोकरूपी हिरण्याक्षाने सर्व सभेची बुद्धिरूपी पृथ्वी हरण केली. जी गुणसमूहरूपी जगताला उत्पन्न करणारी होती. भरताच्या विवेकरूपी विशाल वराहाने शोकरूपी हिरण्याक्षाला नष्ट करून विनासायास तिचा उद्धार केला.॥ २॥

मूल (चौपाई)

करि प्रनामु सब कहँकर जोरे।
रामु राउ गुर साधु निहोरे॥
छमब आजु अति अनुचित मोरा।
कहउँ बदन मृदु बचन कठोरा॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने प्रणाम करून सर्वांना हात जोडले आणि श्रीरामचंद्र, राजा जनक, गुरू वसिष्ठ आणि साधु-संतांना विनंती करीत म्हटले, ‘आज माझ्या या अत्यंत अयोग्य वर्तनाबद्दल क्षमा करा. मी लहान तोंडी उद्धटपणे बोलत आहे.’॥ ३॥

मूल (चौपाई)

हियँ सुमिरी सारदा सुहाई।
मानस तें मुख पंकज आई॥
बिमल बिबेक धरमनय साली।
भरत भारती मंजु मराली॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर त्याने हृदयामध्ये सुंदर देवी सरस्वतीचे स्मरण केले. ती त्याच्या मनरूपी मानससरोवरातून मुखारविंदावर येऊन विराजित झाली. ती निर्मल विवेक, धर्म आणि नीतिपूर्ण भरताची नीरक्षीर यांचे विवेचन करणारी वाणीरूपी हंसी झाली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

निरखि बिबेक बिलोचनन्हि सिथिल सनेहँ समाजु।
करि प्रनामु बोले भरतु सुमिरि सीय रघुराजु॥ २९७॥

अनुवाद (हिन्दी)

विवेकाच्या नेत्रांनी भरताने पाहिले की, सारा समाज प्रेमाने भरून गेला आहे. त्याने सर्वांना प्रणाम केला आणि सीता व रघुनाथांचे स्मरण करून म्हटले,॥ २९७॥

मूल (चौपाई)

प्रभुपितु मातु सुहृदगुर स्वामी।
पूज्य परम हित अंतरजामी॥
सरल सुसाहिबु सील निधानू।
प्रनतपाल सर्बग्य सुजानू॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे प्रभो, तुम्ही पिता, माता, मित्र, गुरू, स्वामी, पूज्य, परम हितैषी व अंतर्यामी आहात. सरल हृदयी, श्रेष्ठ स्वामी, सद्गुणांचे भांडार, शरणागताचे रक्षक, सर्वज्ञ,॥ १॥

मूल (चौपाई)

समरथ सरनागत हितकारी।
गुनगाहकु अवगुन अघ हारी॥
स्वामि गोसाँइ हि सरिस गोसाईं।
मोहि समान मैं साइँ दोहाईं॥

अनुवाद (हिन्दी)

समर्थ, शरणागताचे कल्याण करणारे, गुणांचा आदर करणारे आणि अवगुण व पाप यांचे हरण करणारे आहात. हे स्वामी, तुमच्यासारखे स्वामी तुम्हीच आहात आणि स्वामींचा अपराध करणारा माझ्यासारखा मीच आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रभु पितु बचन मोह बस पेली।
आयउँ इहाँ समाजु सकेली॥
जग भल पोच ऊँच अरु नीचू।
अमिअ अमरपद माहुरु मीचू॥

अनुवाद (हिन्दी)

मी मोहामुळे तुमच्या व वडिलांच्या वचनांचे उल्लंघन करून आणि समाज गोळा करून येथे आलो आहे. जगामध्ये चांगले-वाईट, उच्च-नीच,अमृत व अमरपद, विष व मृत्यू इत्यादी,॥ ३॥

मूल (चौपाई)

राम रजाइ मेट मन माहीं।
देखा सुना कतहुँ कोउ नाहीं॥
सो मैं सब बिधि कीन्हि ढिठाई।
प्रभु मानी सनेह सेवकाई॥

अनुवाद (हिन्दी)

यांपैकी असा कोणीही पाहिला किंवा ऐकला नाही की, ज्याने श्रीरामचंद्रांची आज्ञा मोडली. मी सर्व प्रकारे ते धार्ष्ट्य केले, परंतु प्रभूंनी तेच स्नेह व सेवा असेच मानले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कृपाँ भलाईं आपनी नाथ कीन्ह भल मोर।
दूषन भे भूषन सरिस सुजसु चारु चहु ओर॥ २९८॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, तुम्ही आपल्या कृपेने व चांगुलपणाने माझे चांगलेच केले. त्यामुळे माझे दोषसुद्धा भूषण ठरले. चोहीकडे माझी उत्तम कीर्ती पसरली.॥ २९८॥

मूल (चौपाई)

राउरि रीति सुबानि बड़ाई।
जगत बिदित निगमागम गाई॥
कूर कुटिल खल कुमति कलंकी।
नीच निसील निरीस निसंकी॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, तुमची नीती आणि सुंदर महिमा जगात प्रसिद्ध आहे आणि त्याचे गायन वेद व शास्त्रांनी केले आहे. जे क्रूर, दुष्ट, कुबुद्धी, कलंकी, नीच, शीलरहित, नास्तिक व निर्भय आहेत;॥ १॥

मूल (चौपाई)

तेउ सुनि सरन सामुहें आए।
सकृत प्रनामु किहें अपनाए॥
देखि दोष कबहुँ न उर आने।
सुनि गुन साधु समाज बखाने॥

अनुवाद (हिन्दी)

तेही शरण येऊन समोर आल्यावर एकदा प्रणाम करताच त्यांना तुम्ही आपलेसे केले. त्या शरणागतांचे दोष कधी मनात ठेवले नाहीत आणि त्यांचे गुण ऐकून साधु-समाजात त्यांची वाखाणणी केली.॥ २॥

मूल (चौपाई)

को साहिब सेवकहि नेवाजी।
आपु समाज साज सब साजी॥
निज करतूति न समुझिअ सपनें।
सेवक सकुच सोचु उर अपनें॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे सेवकाच्या सर्व गरजा पूर्ण करणारा व सेवकावर कृपा करणारा स्वामी कोण आहे? शिवाय स्वप्नातही आपण सेवकासाठी काही केले आहे, असे न मानता उलट सेवकाला संकोच वाटू नये, याचीच तुम्ही मनापासून काळजी घेता.॥ ३॥

मूल (चौपाई)

सो गोसाइँ नहिं दूसर कोपी।
भुजा उठाइ कहउँ पन रोपी॥
पसु नाचत सुक पाठ प्रबीना।
गुन गति नट पाठक आधीना॥

अनुवाद (हिन्दी)

मी दोन्ही हात उभारून प्रतिज्ञापूर्वक सांगतो की, तुमच्यासारखा दुसरा कोणीही स्वामी नाही. वानर इत्यादी पशू नाच करतात, पोपट शिकविल्यावर बोलण्यात कुशल होतात, परंतु पोपटाच्या बोलण्याचा गुण आणि पशूचे नाचणे हे नाचविणाऱ्याच्या आणि शिकविणाऱ्याच्या हाती असते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

यों सुधारि सनमानि जन किए साधु सिरमोर।
को कृपाल बिनु पालिहै बिरिदावलि बरजोर॥ २९९॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे आपल्या सेवकाची चूक सुधारून व त्याला सन्मान देऊन तुम्ही त्याला साधूंचा शिरोमणी बनविता. हे कृपाळू, तुमच्याविना आपल्या बिरुदावलीचे असे आग्रहाने पालन करणारा दुसरा कोण आहे?॥ २९९॥

मूल (चौपाई)

सोक सनेहँ कि बाल सुभाएँ।
आयउँ लाइ रजायसु बाएँ॥
तबहुँ कृपाल हेरि निज ओरा।
सबहि भाँति भल मानेउ मोरा॥

अनुवाद (हिन्दी)

मी शोकाने किंवा स्नेहाने आपल्या बालस्वभावानुसार आज्ञा न मानता निघून आलो, तरीही हे कृपाळू स्वामी, तुम्ही आपल्या स्वभावानुसार सर्व प्रकारे माझे कृत्य चांगलेच मानले.॥ १॥

मूल (चौपाई)

देखेउँ पाय सुमंगल मूला।
जानेउँ स्वामि सहज अनुकूला॥
बड़े समाज बिलोकेउँ भागू।
बड़ीं चूक साहिब अनुरागू॥

अनुवाद (हिन्दी)

मी सुंदर मांगल्याचे मूळ असलेल्या तुमच्या चरणांचे दर्शन घेतले,तेव्हा स्वामी माझ्यावर स्वभावतःच अनुकूल आहेत, हे मी जाणले. माझ्याकडून एवढी मोठी चूक होऊनही स्वामींचा माझ्यावर किती लोभ आहे, हे एवढॺा मोठॺा समाजामध्ये मी स्वतःचे भाग्य असल्याचे जाणले.॥ २॥

मूल (चौपाई)

कृपा अनुग्रहु अंगु अघाई।
कीन्हि कृपानिधि सब अधिकाई॥
राखा मोर दुलार गोसाईं।
अपनें सील सुभायँ भलाईं॥

अनुवाद (हिन्दी)

कृपानिधानांनी माझ्यावर संपूर्णपणे कृपा केली, अनुग्रह केला. माझी योग्यता नसतानाही हे खूपच केले. हे स्वामी, तुम्ही आपल्या शील, स्वभाव आणि चांगुलपणाने माझे प्रेम राखले.॥ ३॥

मूल (चौपाई)

नाथ निपट मैं कीन्हि ढिठाई।
स्वामि समाज सकोच बिहाई॥
अबिनय बिनय जथारुचि बानी।
छमिहि देउ अति आरति जानी॥

अनुवाद (हिन्दी)

हे नाथ, स्वामी व समाज यांची भीड न बाळगता मी मन मानेल तसे बोलण्याचे धारिष्ट्य केले. हे देवा, माझी व्याकुळता जाणून तुम्ही मला क्षमा करावी.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुहृद सुजान सुसाहिबहि बहुत कहब बड़ि खोरि।
आयसु देइअ देव अब सबइ सुधारी मोरि॥ ३००॥

अनुवाद (हिन्दी)

अकारण हित करणाऱ्या सुहृद, बुद्धिमान व श्रेष्ठ स्वामींना जास्त सांगणे हा अपराध आहे. म्हणून हे देव, आता मला आज्ञा द्या. तुम्ही मला सर्वतोपरी सांभाळून घेतले.॥ ३००॥

मूल (चौपाई)

प्रभु पद पदुमपराग दोहाई।
सत्य सुकृत सुख सीवँ सुहाई॥
सो करि कहउँ हिए अपने की।
रुचि जागत सोवत सपने की॥

अनुवाद (हिन्दी)

हे प्रभू, तुमच्या चरणांची धूळ ही सत्य, पुण्य व सुख यांची मोठी परिसीमा आहे. तिचे स्मरण करून मी आपल्या हृदयातील जागेपणी, झोपेत व स्वप्नातही असणारी इच्छा सांगतो.॥ १॥

मूल (चौपाई)

सहज सनेहँ स्वामि सेवकाई।
स्वारथ छल फल चारि बिहाई॥
अग्या सम न सुसाहिब सेवा।
सो प्रसादु जन पावै देवा॥

अनुवाद (हिन्दी)

ती इच्छा की, कपट, स्वार्थ आणि अर्थ-कामादी चारी फले सोडून स्वाभाविक प्रेमाने स्वामींची सेवा करणे, हीच आहे आणि आज्ञापालनासारखी स्वामींची दुसरी कोणतीही श्रेष्ठ सेवा नाही. म्हणून हे देवा, आता तोच आज्ञारूप प्रसाद सेवकाला मिळावा.’॥ २॥

मूल (चौपाई)

असकहि प्रेम बिबस भए भारी।
पुलक सरीर बिलोचन बारी॥
प्रभु पद कमल गहे अकुलाई।
समउ सनेहु न सो कहि जाई॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून भरत प्रेमात मग्न झाला. त्याचे शरीर पुलकित झाले. डोळ्यांत प्रेमाश्रू दाटले. व्याकूळ होऊन त्याने प्रभू रामचंद्रांचे चरणकमल धरून ठेवले. तो प्रसंग व ते प्रेम यांचे वर्णन करता येणार नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

कृपासिंधु सनमानि सुबानी।
बैठाए समीप गहि पानी॥
भरत बिनय सुनि देखि सुभाऊ।
सिथिल सनेहँ सभा रघुराऊ॥

अनुवाद (हिन्दी)

कृपासिंधू श्रीरामचंद्रांनी सुंदर वाणीने भरताचा मान राखून त्याचा हात धरून त्याला आपल्याजवळ बसवून घेतले. भरताची विनंती ऐकून व त्याचा स्वभाव पाहून सर्व सभा आणि श्रीरघुनाथ स्नेहामुळे स्वतःला हरवून बसले.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

रघुराउ सिथिल सनेहँ साधु समाज मुनि मिथिला धनी।
मन महुँ सराहत भरत भायप भगति की महिमा घनी॥
भरतहि प्रसंसत बिबुध बरषत सुमन मानस मलिन से।
तुलसी बिकल सब लोग सुनि सकुचे निसागम नलिन से॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ, साधु-समाज, मुनी वसिष्ठ आणि मिथिलापती जनक हे स्नेहाने ओथंबून गेले. सर्वजण मनातल्या मनात भरताचे बंधु-प्रेम आणि त्याच्या भक्तीचा महिमा यांची खूप प्रशंसा करू लागले. देव नाईलाजाने भरताची प्रशंसा करून त्याच्यावर फुले उधळू लागले. तुलसीदास म्हणतात, सर्व लोक भरताचे भाषण ऐकून व्याकूळ झाले आणि ज्याप्रमाणे रात्र झाल्यावर कमळ कोमेजते, तसे म्लान झाले.

सोरठा

मूल (दोहा)

देखि दुखारी दीन दुहु समाज नर नारि सब।
मघवा महा मलीन मुए मारि मंगल चहत॥ ३०१॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्ही समाजांतील सर्व स्त्री-पुरुष दीन व दुःखी झालेले पाहून महामलिन मनाचा इंद्र मेलेल्याला मारून आपले मंगल व्हावे, अशी इच्छा करीत होता.॥ ३०१॥

मूल (चौपाई)

कपट कुचालि सीवँ सुरराजू।
पर अकाज प्रिय आपन काजू॥
काक समान पाकरिपु रीती।
छली मलीन कतहुँ न प्रतीती॥

अनुवाद (हिन्दी)

इंद्र हा कपट व वाईट चालीची परिसीमा होता. त्याला दुसऱ्याची हानी आणि आपला लाभ आवडे. इंद्राची रीत कावळ्यासारखी होती. तो कपटी आणि मलिन मनाचा होता आणि त्याचा कुठेही व कुणावरही विश्वास नव्हता.॥ १॥

मूल (चौपाई)

प्रथम कुमत करि कपटु सँकेला।
सो उचाटु सब कें सिर मेला॥
सुरमायाँ सब लोग बिमोहे।
राम प्रेम अतिसय न बिछोहे॥

अनुवाद (हिन्दी)

प्रथम त्याने वाईट विचार करून कपट रचले. नंतर त्याने आपल्या मनातील कपटी मळमळ सर्वांच्या डोक्यात भरली आणि देवमाया टाकली. तिने सर्व लोकांना खूप मोहित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे श्रीरामांबद्दलचे प्रेम पूर्णपणे नाहीसे झाले नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

भयउ चाट बसमन थिर नाहीं।
छन बन रुचि छन सदन सोहाहीं॥
दुबिध मनोगति प्रजा दुखारी।
सरित सिंधु संगम जनु बारी॥

अनुवाद (हिन्दी)

भय व इंद्राच्या माया-प्रयोगामुळे कुणाचे मन स्थिर नव्हते. एका क्षणी त्यांना वनात राहण्याची इच्छा होई आणि दुसऱ्या क्षणी त्यांना घर बरे वाटू लागे. मनाच्या द्विधा अवस्थेमध्ये प्रजा दुःखी झाली. जसे नदी व समुद्र यांच्या संगमाचे पाणी क्षुब्ध होते, तशी प्रजेच्या मनाची स्थिती झाली.॥ ३॥

मूल (चौपाई)

दुचितकतहुँपरितोषुन लहहीं।
एक एक सन मरमु न कहहीं॥
लखि हियँ हँसिकह कृपानिधानू।
सरिस स्वान मघवान जुबानू॥

अनुवाद (हिन्दी)

चित्त द्विधा झाल्यामुळे त्यांना समाधान वाटत नव्हते. शिवाय दुसऱ्याला आपल्या मनातील ही गोष्ट सांगताही येईना. कृपानिधान रामचंद्र त्यांची ही दशा पाहून मनात हसून म्हणाले, ‘कुत्रा, इंद्र आणि युवक एकसारख्या स्वभावाचे असतात.’ (पाणिनीने श्वन् (कुत्रा), युवन् (तरुण), मघवन् (इंद्र) या तिन्ही शब्दांची रूपे एकसारखी होतात, असे एका सूत्रात सांगितले आहे. तो संदर्भ येथे आहे.)॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भरतु जनकु मुनिजन सचिव साधु सचेत बिहाइ।
लागि देवमाया सबहि जथाजोगु जनु पाइ॥ ३०२॥

अनुवाद (हिन्दी)

भरत, जनक, मुनिजन, मंत्री आणि ज्ञानी साधु-संत यांना सोडून इतर सर्वांवर प्रत्येक मनुष्याच्या प्रकृती व स्थितीप्रमाणे देवमायेचा प्रभाव पडला.॥३०२॥

मूल (चौपाई)

कृपासिंधु लखि लोग दुखारे।
निज सनेहँ सुरपति छल भारे॥
सभा राउ गुर महिसुर मंत्री।
भरत भगति सब कै मति जंत्री॥

अनुवाद (हिन्दी)

कृपासिंधू श्रीरामांनी आपल्या प्रेमाने व इंद्राच्या अनिवार मायेमुळे लोक दुःखी असल्याचे पाहिले. सभा, राजा जनक, गुरू, ब्राह्मण, मंत्री इत्यादी सर्वांना भरताच्या भक्तीने आपल्या अधीन केले.

मूल (चौपाई)

रामहि चितवत चित्र लिखे से।
सकुचत बोलत बचन सिखे से॥
भरत प्रीति नति बिनय बड़ाई।
सुनत सुखद बरनत कठिनाई॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व लोक चित्राप्रमाणे स्तब्ध होऊन श्रीरामचंद्रांकडे पहात होते. शिकविल्याप्रमाणे संकोचाने बोलत होते. भरताची प्रीती, नम्रता, विनय व महिमा हे ऐकण्यास सुखद होते, परंतु त्यांचे वर्णन करणे फार कठीण.॥ २॥

मूल (चौपाई)

जासु बिलोकि भगति लवलेसू।
प्रेम मगन मुनिगन मिथिलेसू॥
महिमा तासु कहै किमि तुलसी।
भगति सुभायँ सुमति हियँ हुलसी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याच्या भक्तीचा लवलेश पाहून मुनिगण व मिथिलेश्वर जनक हे प्रेममग्न झाले, त्या भरताचा महिमा तुलसीदास कसा सांगणार? भरताची भक्ती व सुंदर भाव पाहून कवीच्या हृदयातील सुबुद्धी विकसित होत होती.॥ ३॥

मूल (चौपाई)

आपु छोटि महिमा बड़ि जानी।
कबिकुल कानि मानि सकुचानी॥
कहि न सकति गुन रुचि अधिकाई।
मति गति बाल बचन की नाई॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु कवीची ती बुद्धी स्वतःला लहान व भरताचा महिमा मोठा समजून कविपरंपरेची मर्यादा मानून संकोच पावत होती. तिला गुणांची खूप आवड होती. परंतु ते ती सांगू शकत नव्हती. त्यामुळे बुद्धीची गती बालकांच्या बोलांप्रमाणे कुंठित झाली.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भरत बिमल जसु बिमल बिधु सुमति चकोरकुमारि।
उदित बिमल जन हृदय नभ एकटक रही निहारि॥ ३०३॥

अनुवाद (हिन्दी)

भरताची निर्मल कीर्ती ही निर्मल चंद्रमा आहे आणि कवीची सुबुद्धी ही चकोरी आहे. ती भक्तांच्या हृदयरूपी निर्मल आकाशात तो चंद्रमा उगवल्याचे पाहून त्याच्याकडे एकटक पहातच राहिली. मग वर्णन कसे करणार?॥ ३०३॥

मूल (चौपाई)

भरत सुभाउ न सुगम निगमहूँ।
लघु मति चापलता कबि छमहूँ॥
कहत सुनत सति भाउ भरत को।
सीय राम पद होइ न रत को॥

अनुवाद (हिन्दी)

भरताच्या स्वभावाचे वर्णन वेदांनाही सुगम नाही. म्हणून माझ्या तुच्छ बुद्धीच्या चांचल्याबद्दल कविजनांनी क्षमा करावी. भरताचा स्वभाव सांगताना व ऐकताना कोण मनुष्य श्रीसीतारामांच्या चरणी अनुरक्त होणार नाही?॥ १॥

मूल (चौपाई)

सुमिरत भरतहि प्रेमु राम को।
जेहि न सुलभु तेहि सरिस बाम को॥
देखि दयाल दसा सबही की।
राम सुजान जानि जन जी की॥

अनुवाद (हिन्दी)

भरताचे स्मरण केल्याने ज्याला श्रीरामांचे प्रेम लाभले नसेल, त्याच्यासारखा दुर्दैवी दुसरा कोण असणार? दयाळू आणि ज्ञानी श्रीरामांनी सर्वांची ती दशा आणि भक्त भरताच्या मनाची अवस्था जाणली,॥ २॥

मूल (चौपाई)

धरम धुरीन धीर नय नागर।
सत्य सनेह सील सुख सागर॥
देसु कालु लखि समउ समाजू।
नीति प्रीति पालक रघुराजू॥

अनुवाद (हिन्दी)

आणि धर्मधुरंधर, धीर, नीति-चतुर; सत्य, स्नेह, शील आणि सुखाचे समुद्र असलेले आणि नीती-प्रीतीचे पालन करणारे श्रीरघुनाथ देश, काल, प्रसंग व समाज पाहून,॥ ३॥

मूल (चौपाई)

बोले बचन बानि सरबसु से।
हित परिनाम सुनत ससि रसु से॥
तात भरत तुम्ह धरम धुरीना।
लोक बेद बिद प्रेम प्रबीना॥

अनुवाद (हिन्दी)

त्याप्रमाणे बोलू लागले. ते बोलणे जणू वाणीचे सर्वस्वच होते. परिणामी हितकारक व ऐकण्यास चंद्राच्या अमृतासारखे होते. ते म्हणाले, ‘कुमार भरता, तू धर्माची धुरा धारण करणारा आहेस. लोकव्यवहार व वेद जाणणारा आहेस आणि प्रेमाचे निधान आहेस.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

करम बचन मानस बिमल तुम्ह समान तुम्ह तात।
गुर समाज लघु बंधु गुन कुसमयँ किमि कहि जात॥ ३०४॥

अनुवाद (हिन्दी)

बाबा रे! कायावाचामनाने निर्मल असा तुझ्यासारखा तूच आहेस. गुरुजनांच्या समाजामध्ये आणि अशा वाईट प्रसंगी लहान भावाचे गुण कसे सांगता येतील?॥ ३०४॥

मूल (चौपाई)

जानहु तात तरनिकुल रीती।
सत्यसंध पितु कीरति प्रीती॥
समउ समाजु लाज गुरजन की।
उदासीन हित अनहित मन की॥

अनुवाद (हिन्दी)

हे वत्सा, तू सूर्यकुलाची रीत, सत्यप्रतिज्ञ पित्याची कीर्ती आणि प्रीती, प्रसंग, समाज आणि गुरुजनांची मर्यादा तसेच उदासीन, मित्र व शत्रू या सर्वांच्या मनातील जाणतोस.॥ १॥

मूल (चौपाई)

तुम्हहि बिदित सबही कर करमू।
आपन मोर परम हित धरमू।
मोहि सब भाँति भरोस तुम्हारा।
तदपि कहउँ अवसर अनुसारा॥

अनुवाद (हिन्दी)

तुला सर्व कर्तव्यांची व स्वतःच्या व माझ्या परम हितकारक धर्माची जाण आहे. जरी माझा सर्व प्रकारे तुझ्यावर विश्वास आहे, तरीही मी प्रसंगानुरूप काही सांगतो.॥ २॥

मूल (चौपाई)

तात तात बिनु बात हमारी।
केवल गुरकुल कृपाँ सँभारी॥
नतरु प्रजा परिजन परिवारू।
हमहि सहित सबु होत खुआरू॥

अनुवाद (हिन्दी)

हे बंधो! वडिलांच्या अनुपस्थितीत केवळ कुलगुरू वसिष्ठांच्या कृपेने आम्हांला सांभाळून घेतले, नाहीतर आमच्यासह प्रजा, कुटुंब, परिवार या सर्वांची वाताहत झाली असती.॥ ३॥

मूल (चौपाई)

जौं बिनु अवसर अथवँ दिनेसू।
जग केहि कहहु न होइ कलेसू॥
तस उतपातु तातबिधि कीन्हा।
मुनि मिथिलेस राखि सबु लीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

जर अवेळी सूर्याचा अस्त झाला, तर मग सांग, जगात कुणाला धक्का बसणार नाही? तशाच प्रकारचा उत्पात विधात्याने पित्याच्या अवेळी मृत्यूने घडवला आहे. परंतु पूज्य वसिष्ठांनी व मिथिलेश्वरांनी सर्वांना सांभाळले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राज काज सब लाज पति धरम धरनि धन धाम।
गुर प्रभाउ पालिहि सबहि भल होइहि परिनाम॥ ३०५॥

अनुवाद (हिन्दी)

राज्याचे सर्व कार्य, मर्यादा, प्रतिष्ठा, धर्म, पृथ्वी, धन, घर या सर्वांचे पालन गुरुजींचा प्रभाव करील आणि परिणाम शुभ होईल.॥ ३०५॥

मूल (चौपाई)

सहित समाज तुम्हार हमारा।
घर बन गुर प्रसाद रखवारा॥
मातु पिता गुर स्वामि निदेसू।
सकल धरम धरनीधर सेसू॥

अनुवाद (हिन्दी)

गुरुजींचा अनुग्रह हाच घरामध्ये व वनामध्ये समाजासह तुझा व आमचा रक्षक आहे. माता, पिता, गुरू आणि स्वामींच्या आज्ञेचे पालन करणे, हे संपूर्ण धर्मरूपी पृथ्वीला धारण करणाऱ्या शेषासारखे आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

सो तुम्ह करहु करावहु मोहू।
तात तरनिकुल पालक होहू॥
साधक एक सकल सिधि देनी।
कीरति सुगति भूतिमय बेनी॥

अनुवाद (हिन्दी)

भरता! तू तेच कर, माझ्याकडून करवून घे आणि सूर्यकुलाचा रक्षक बन. साधकासाठी ही एकच आज्ञापालनरूपी साधना संपूर्ण सिद्धी देणारी आहे. ती कीर्ती, सद्गती आणि ऐश्वर्य यांची त्रिवेणी आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

सो बिचारि सहि संकटु भारी।
करहु प्रजा परिवारु सुखारी॥
बाँटी बिपति सबहिं मोहि भाई।
तुम्हहि अवधि भरि बड़ि कठिनाई॥

अनुवाद (हिन्दी)

याचा विचार करून, मोठे संकट सोसूनही तू प्रजेला व कुटुंबाला सुखी कर. हे बंधू, माझी विपत्ती सर्वांनी वाटून घेतली. परंतु तुला मात्र चौदा वर्षांच्या अवधीत मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

जानि तुम्हहि मृदु कहउँ कठोरा।
कुसमयँ तात न अनुचित मोरा॥
होहिं कुठायँ सुबंधु सहाए।
ओड़िअहिं हाथ असनिहु के घाए॥

अनुवाद (हिन्दी)

तू कोमल आहेस, हे माहीत असूनही मी वियोगाची कठोर गोष्ट सांगत आहे. कठीण प्रसंगी हे सांगणे माझ्या दृष्टीने अयोग्य नाही. कारण कठीण प्रसंगी थोरला भाऊच मदत करतो. वज्राचे प्रहार हातानेच अडवता येतात.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सेवक कर पद नयन से मुख सो साहिबु होइ।
तुलसी प्रीति कि रीति सुनि सुकबि सराहहिं सोइ॥ ३०६॥

अनुवाद (हिन्दी)

सेवक हा हात, पाय व नेत्रांसारखा आणि स्वामी हा मुखासारखा असला पाहिजे. तुलसीदास म्हणतात की, सेवक-स्वामी यांच्या प्रेमाची अशी रीत ऐकून सुकवी तिची स्तुती करतात.॥ ३०६॥

मूल (चौपाई)

सभा सकल सुनि रघुबर बानी।
प्रेम पयोधि अमिअँ जनु सानी॥
सिथिल समाज सनेह समाधी।
देखि दसा चुप सारद साधी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांची प्रेमरूपी समुद्रातील अमृताने ओथंबलेली वाणी ऐकून सर्व समाजावरील दडपण उतरले व सर्वांना प्रेमाची समाधी लागली. ही दशा पाहून सरस्वतीसुद्धा मौन झाली.॥ १॥

मूल (चौपाई)

भरतहि भयउ परम संतोषू।
सनमुख स्वामि बिमुख दुख दोषू॥
मुख प्रसन्न मन मिटा बिषादू।
भा जनु गूँगेहि गिरा प्रसादू॥

अनुवाद (हिन्दी)

भरताला फार संतोष वाटला. स्वामी अनुकूल होताच त्याचे दुःख व दोष पळून गेले. त्याचे मुख प्रसन्न झाले आणि मनातील विषाद दूर झाला. जणू मुक्यावर सरस्वतीची कृपा झाली.॥ २॥

मूल (चौपाई)

कीन्ह सप्रेम प्रनामु बहोरी।
बोले पानि पंकरुह जोरी॥
नाथ भयउ सुखु साथ गए को।
लहेउँ लाहु जग जनमु भए को॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने प्रेमाने प्रणाम केला आणि करकमल जोडून तो म्हणाला की, ‘हे नाथ, मला तुमच्याबरोबर येण्याचे सुख लाभले आणि मला जगामध्ये जन्म घेण्याचा लाभही मिळाला.॥ ३॥

मूल (चौपाई)

अब कृपाल जस आयसु होई।
करौं सीस धरि सादर सोई॥
सो अवलंब देव मोहि देई।
अवधि पारु पावौं जेहि सेई॥

अनुवाद (हिन्दी)

हे कृपाळू, आता जशी आज्ञा असेल, तशी ती मी शिरोधार्य मानून आदराने पाळीन. परंतु हे देवा, तुम्ही मला असा आधार द्या की, त्याची सेवा करून मी हा काळ घालवू शकेन.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

देव देव अभिषेक हित गुर अनुसासनु पाइ।
आनेउँ सब तीरथ सलिलु तेहि कहँ काह रजाइ॥ ३०७॥

अनुवाद (हिन्दी)

हे देव, तुमच्या अभिषेकासाठी मी गुरुजींच्या आज्ञेने सर्व तीर्थांतील जल घेऊन आलो आहे. त्याबद्दल काय आज्ञा आहे?॥ ३०७॥

मूल (चौपाई)

एकु मनोरथु बड़ मन माहीं।
सभयँ सकोच जात कहि नाहीं॥
कहहु तात प्रभु आयसु पाई।
बोले बानि सनेह सुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

माझ्या मनात आणखी एक मोठी इच्छा आहे, परंतु भय व संकोचामुळे ती सांगवत नाही.’ श्रीराम म्हणाले, ‘हे बंधू, सांग.’ तेव्हा प्रभूंची आज्ञा झाल्यावर भरत स्नेहपूर्ण सुंदर वाणीने म्हणाला.॥ १॥

मूल (चौपाई)

चित्रकूट सुचि थलतीरथ बन।
खग मृग सर सरि निर्झर गिरिगन॥
प्रभु पद अंकित अवनि बिसेषी।
आयसु होइ त आवौं देखी॥

अनुवाद (हिन्दी)

‘आज्ञा असेल तर चित्रकूटावरील पवित्र स्थाने, तीर्थे, वन, पशु-पक्षी, तलाव, नद्या, झरे आणि पर्वतांचे समूह, विशेषतः प्रभू, तुमच्या चरणचिह्नांनी अंकित झालेली भूमी पाहून येतो.’॥ २॥

मूल (चौपाई)

अवसि अत्रि आयसु सिर धरहू।
तात बिगतभय कानन चरहू॥
मुनि प्रसाद बनु मंगल दाता।
पावन परम सुहावन भ्राता॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ म्हणाले, ‘अवश्य. अत्री ऋषींच्या आज्ञेने ते सांगतील तसे कर आणि निर्भयपणे वनात फिरून ये. हे बंधू, अत्रिमुनींच्या प्रसादामुळे हे वन मांगल्य देणारे, परम पवित्र व अत्यंत सुंदर झाले आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

रिषिनायकु जहँ आयसु देहीं।
राखेहु तीरथ जलु थल तेहीं॥
सुनि प्रभु बचन भरत सुखु पावा।
मुनि पद कमल मुदित सिरु नावा॥

अनुवाद (हिन्दी)

आणि ऋषींचे प्रमुख अत्री हे आज्ञा देतील तेथे ते आणलेले तीर्थांचे जल स्थापन कर.’ प्रभूंचे बोलणे ऐकून भरत सुखावला आणि आनंदित होऊन त्याने अत्रिमुनींच्या चरणी मस्तक ठेवले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भरत राम संबादु सुनि सकल सुमंगल मूल।
सुर स्वारथी सराहि कुल बरषत सुरतरु फूल॥ ३०८॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व सुंदर मांगल्याचे मूळ असलेला भरत व श्रीरामांचा संवाद ऐकून स्वार्थी देव रघुकुलाची प्रशंसा करून कल्पवृक्षाची फुले उधळू लागले.॥ ३०८॥

मूल (चौपाई)

धन्य भरत जय राम गोसाईं।
कहत देव हरषत बरिआईं॥
मुनि मिथिलेस सभाँ सब काहू।
भरत बचन सुनि भयउ उछाहू॥

अनुवाद (हिन्दी)

‘भरत धन्य आहे, स्वामी श्रीरामांचा विजय असो,’ असे म्हणत देव अत्यंत हर्षित होऊ लागले. भरताचे बोलणे ऐकून मुनी वसिष्ठ, मिथिलापती जनक आणि सभेतील सर्वांना आनंद झाला.॥ १॥

मूल (चौपाई)

भरत राम गुन ग्राम सनेहू।
पुलकि प्रसंसत राउ बिदेहू॥
सेवक स्वामि सुभाउ सुहावन।
नेमु पेमु अति पावन पावन॥

अनुवाद (हिन्दी)

भरत आणि श्रीरामचंद्र यांच्या गुणांची व प्रेमाची प्रशंसा विदेहराजा जनक पुलकित होऊन करू लागले, ‘सेवक व स्वामी या दोघांचा सुंदर स्वभाव आहे. या दोघांचे नियम व प्रेम हे पावित्र्यालाही अत्यंत पवित्र करणारे आहे.’॥ २॥

मूल (चौपाई)

मति अनुसार सराहन लागे।
सचिव सभासद सब अनुरागे॥
सुनि सुनि रामभरत संबादू।
दुहु समाज हियँ हरषु बिषादू॥

अनुवाद (हिन्दी)

मंत्री आणि सभासद सर्वजण प्रेममुग्ध होऊन आपापल्या बुद्धीप्रमाणे त्या दोघांच्या प्रेमाची वाखाणणी करू लागले. श्रीरामचंद्र आणि भरत यांचा संवाद ऐकून दोन्ही समाजांच्या हृदयांमध्ये भरताचा सेवाधर्म पाहून हर्ष आणि रामवियोगाच्या कल्पनेमुळे विषाद वाटला.॥ ३॥

मूल (चौपाई)

राम मातु दुखु सुखु सम जानी।
कहि गुन राम प्रबोधीं रानी॥
एक कहहिं रघुबीर बड़ाई।
एक सराहत भरत भलाई॥

अनुवाद (हिन्दी)

राममाता कौसल्येने दुःख व सुख समान मानून श्रीरामांचे गुण सांगत इतर राण्यांना धीर दिला. कोणी श्रीरामांच्या मोठेपणाची चर्चा करीत होते. तर कोणी भरताच्या चांगुलपणाची प्रशंसा करीत होते.॥ ४॥