५२ जनक-वसिष्ठादि-संवाद

मूल (चौपाई)

आपु आश्रमहि धारिअ पाऊ।
भयउ सनेह सिथिल मुनिराऊ॥
करि प्रनामु तब रामु सिधाए।
रिषि धरि धीर जनक पहिं आए॥

अनुवाद (हिन्दी)

म्हणून तुम्ही आश्रमाला जा.’ इतके म्हणून मुनिराज प्रेमाने भरून गेले. मग श्रीराम प्रणाम करून निघाले आणि ऋषी वसिष्ठ मोठॺा धैर्याने जनकांकडे गेले.॥ ३॥

मूल (चौपाई)

राम बचन गुरु नृपहि सुनाए।
सील सनेह सुभायँ सुहाए॥
महाराज अब कीजिअ सोई।
सब कर धरम सहित हित होई॥

अनुवाद (हिन्दी)

गुरुजींनी श्रीरामचंद्रांच्या शील व स्नेहाबद्दल अत्यंत स्वाभाविकपणे जनकराजांना सांगितले आणि ते म्हणाले, ‘महाराज, ज्यामध्ये सर्वांचे धर्मासह हित होईल असे करा.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

ग्यान निधान सुजान सुचि धरम धीर नरपाल।
तुम्ह बिनु असमंजस समन को समरथ एहि काल॥ २९१॥

अनुवाद (हिन्दी)

हे राजन, तुम्ही ज्ञानाचे भांडार, ज्ञानी, पवित्र व धर्मामध्ये धीर आहात. या वेळी तुमच्याविना ही द्विधा स्थिती दूर करण्यास दुसरा कोण समर्थ आहे?’॥ २९१॥

मूल (चौपाई)

सुनिमुनि बचन जनक अनुरागे।
लखि गति ग्यानु बिरागु बिरागे॥
सिथिल सनेहँ गुनत मन माहीं।
आए इहाँ कीन्ह भल नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मुनि वसिष्ठांचे बोलणे ऐकून जनक प्रेममग्न झाले. त्यांची ती दशा पाहून ज्ञान व वैराग्य यांनाही वैराग्य आले. ते प्रेमांत बुडून गेले. मनात विचार करू लागले की, ‘आम्ही येथे आलो, हे काही चांगले केले नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

रामहि रायँ कहेउ बन जाना।
कीन्ह आपु प्रिय प्रेम प्रवाना॥
हम अब बन तें बनहि पठाई।
प्रमुदित फिरब बिबेक बड़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

राजा दशरथांनी श्रीरामांना वनात जाण्यास सांगितले आणि स्वतः प्रिय रामांच्या वियोगामध्ये प्राण सोडून आपले प्रेम सिद्ध केले. परंतु आता आम्ही यांना या वनातून आणखी दाट अशा वनात पाठवून आपल्या विवेकाचा मोठेपणा मिरवीत आनंदाने परत जायचे काय?’॥ २॥

मूल (चौपाई)

तापस मुनि महिसुर सुनि देखी।
भए प्रेम बस बिकल बिसेषी॥
समउ समुझि धरि धीरजु राजा।
चले भरत पहिं सहित समाजा॥

अनुवाद (हिन्दी)

तपस्वी, मुनी, ब्राह्मण हे सर्व ऐकून आणि पाहून प्रेमामुळे व्याकूळ झालेले आहेत. शेवटी प्रसंग पाहून राजा जनक मोठॺा धीराने आपल्या समाजासह भरताकडे गेले.॥ ३॥

मूल (चौपाई)

भरत आइ आगें भइ लीन्हे।
अवसर सरिस सुआसन दीन्हे॥
तात भरत कह तेरहुति राऊ।
तुम्हहि बिदित रघुबीर सुभाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

भरताने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले. आणि प्रसंगानुरूप चांगले आसन दिले. राजा जनक म्हणू लागले, ‘हे बाळ भरत, तुला श्रीरामांचा स्वभाव ठाऊक आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम सत्यब्रत धरम रत सब कर सीलु सनेहु।
संकट सहत सकोच बस कहिअ जो आयसु देहु॥ २९२॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम सत्यव्रती आणि धर्मपरायण आहेत. सर्वांचे मन व प्रेम राखणारे आहेत. म्हणून ते संकोचामुळे संकट सहन करीत आहेत. आता तू जी आज्ञा देशील, ती त्यांना सांगू.’॥ २९२॥

मूल (चौपाई)

सुनि तन पुलकि नयनभरि बारी।
बोले भरतु धीर धरि भारी॥
प्रभु प्रिय पूज्यपिता सम आपू।
कुलगुरु सम हित माय न बापू॥

अनुवाद (हिन्दी)

हे ऐकून भरत पुलकित होऊन आणि डोळ्यांत पाणी आणून मोठॺा धीराने म्हणाला, ‘हे तात! तुम्ही आम्हांला पित्याप्रमाणे प्रिय व पूज्य आहात आणि कुलगुरू वसिष्ठ हे माता-पित्यांहून अधिक आमचे हित पहाणारे आहेत.॥ १॥

मूल (चौपाई)

कौसिकादि मुनि सचिव समाजू।
ग्यान अंबुनिधि आपुनु आजू॥
सिसु सेवकु आयसु अनुगामी।
जानि मोहि सिख देइअ स्वामी॥

अनुवाद (हिन्दी)

विश्वामित्र इत्यादी मुनींचा समाज आहे, मंत्र्यांचा समाज आहे आणि आज ज्ञानाचे समुद्र असलेले तुम्हीसुद्धा उपस्थित आहात. हे स्वामी, मला आपला बालक, सेवक आणि आज्ञाधारक समजून योग्य सल्ला द्या.॥ २॥

मूल (चौपाई)

एहिं समाज थल बूझब राउर।
मौन मलिन मैं बोलब बाउर॥
छोटे बदन कहउँ बड़ि बाता।
छमब तात लखि बाम बिधाता॥

अनुवाद (हिन्दी)

या समाजात व पुण्य स्थानात आपणासारख्या ज्ञानी व पूज्य पुरुषाने विचारले आणि त्यावर मी गप्प बसलो, तर मला अविचारी समजले जाईल आणि मी बोलणे हे वेडेपणाचे ठरेल. तरीही मी लहान तोंडी मोठी गोष्ट सांगतो. हे तात, दैव प्रतिकूल आहे असे समजून मला क्षमा करा.॥ ३॥

मूल (चौपाई)

आगम निगम प्रसिद्ध पुराना।
सेवाधरमु कठिन जगु जाना॥
स्वामि धरम स्वारथहि बिरोधू।
बैरु अंध प्रेमहि न प्रबोधू॥

अनुवाद (हिन्दी)

वेद, शास्त्र व पुराणे यांमध्ये हे प्रसिद्ध आहे आणि जगालाही माहीत आहे की, सेवाधर्म हा मोठा कठीण आहे. स्वामिधर्म व स्वार्थ यांमध्ये विरोध आहे. दोन्ही एकाच वेळी निभावता येत नाहीत. वैर आंधळे असते आणि प्रेमाला ज्ञान नसते. मी स्वार्थाने बोललो किंवा प्रेमाने बोललो, तर दोन्ही गोष्टींमध्ये चूक होण्याची भीती आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राखि राम रुख धरमु ब्रतु पराधीन मोहि जानि।
सब कें संमत सर्ब हित करिअ पेमु पहिचानि॥ २९३॥

अनुवाद (हिन्दी)

म्हणून मला पराधीन समजून श्रीरामांचा रोख, धर्म व सत्यव्रत राखून, जे सर्वांना संमत असेल व सर्वांसाठी हितकारक असेल, ते सर्वांचे प्रेम ओळखून आपणच त्याप्रमाणे करा.’॥ २९३॥

मूल (चौपाई)

भरत बचन सुनि देखि सुभाऊ।
सहित समाज सराहत राऊ॥
सुगम अगम मृदु मंजु कठोरे।
अरथु अमित अति आखर थोरे॥

अनुवाद (हिन्दी)

भरताचे बोलणे ऐकून आणि त्याचा स्वभाव पाहून सर्व समाजासह राजा जनक त्याची वाखाणणी करू लागले. भरताचे बोलणे सुगम पण अगम्य, सुंदर, कोमल पण कठोर होते. त्यात अक्षरे थोडी पण अर्थ अत्यंत अपार भरला होता.॥ १॥

मूल (चौपाई)

ज्योंमुखु मुकुर मुकुरु निज पानी।
गहि न जाइ अस अदभुत बानी॥
भूप भरतु मुनि सहित समाजू।
गे जहँ बिबुध कुमुद द्विजराजू॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे आरशात मुख दिसते आणि आरसा हातात असूनही ते मुखाचे प्रतिबिंब पकडता येत नाही, त्याप्रमाणे भरताची अद्भुत वाणी हीसुद्धा पकडता येत नव्हती. आशय समजत नव्हता. कुणाला काही बोलता येईना, तेव्हा राजा जनक, भरत व मुनी वसिष्ठ सर्व समाजाबरोबर देवता-रूपी कुमुदांना प्रफुल्लित करणारे चंद्रमा श्रीराम यांच्याकडे गेले.॥ २॥

मूल (चौपाई)

सुनि सुधि सोच बिकल सब लोगा।
मनहुँ मीनगन नव जल जोगा॥
देवँ प्रथम कुलगुर गति देखी।
निरखि बिदेह सनेह बिसेषी॥

अनुवाद (हिन्दी)

ही वार्ता ऐकून सर्व लोक काळजीने व्याकूळ झाले, ज्याप्रमाणे पहिल्या पावसाच्या पाण्यामुळे मासे व्याकूळ होतात. देवांनी प्रथम कुलगुरू वसिष्ठांची प्रेमविव्हळ दशा पाहिली, नंतर विदेहांचे उत्कट प्रेम पाहिले.॥ ३॥

मूल (चौपाई)

राम भगतिमय भरतु निहारे।
सुर स्वारथी हहरि हियँ हारे॥
सब कोउ राम पेममय पेखा।
भए अलेख सोच बस लेखा॥

अनुवाद (हिन्दी)

आणि मग श्रीरामभक्तीने ओतप्रोत भरलेल्या भरताला पाहिले. या सर्वांना पाहून स्वार्थी देव घाबरले आणि मनातून निराश झाले. त्यांना सर्वजण श्रीराम-प्रेमामध्ये ओथंबलेले दिसून आले. त्यामुळे देव इतक्या काळजीत पडले की, सांगता सोय नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

रामु सनेह सकोच बस कह ससोच सुरराजु।
रचहु प्रपंचहि पंच मिलि नाहिं त भयउ अकाजु॥ २९४॥

अनुवाद (हिन्दी)

इंद्र चिंतेने म्हणू लागला की, ‘श्रीरामचंद्र हे स्नेह व संकोचाच्या अधीन आहेत. म्हणून सर्वजण मिळून काही तरी माया करा, नाही तर काम बिघडेल, असे समजा.’॥ २९४॥

मूल (चौपाई)

सुरन्ह सुमिरि सारदा सराही।
देबि देव सरनागत पाही॥
फेरि भरत मति करि निज माया।
पालु बिबुध कुल करि छल छाया॥

अनुवाद (हिन्दी)

देवांनी सरस्वतीचे स्मरण करून तिची स्तुती केली आणि म्हटले की, ‘हे देवी, आम्ही देव तुझे शरणागत आहोत. आमचे रक्षण कर. आपली माया करून भरताची बुद्धी फिरव. कपट रचून देवांच्या कुलाचे रक्षण कर.’॥ १॥

मूल (चौपाई)

बिबुध बिनय सुनिदेबि सयानी।
बोली सुर स्वारथ जड़ जानी॥
मो सन कहहु भरत मति फेरू।
लोचन सहस न सूझ सुमेरू॥

अनुवाद (हिन्दी)

देवांची विनंती ऐकून व ते स्वार्थामुळे मूर्ख झाल्याचे पाहून बुद्धिमती सरस्वती म्हणाली, ‘भरताची बुद्धी पालटा असे तुम्ही मला सांगता? हजार नेत्रांनीही तुम्हांला सुमेरूसारखा पर्वत दिसत नाही?॥२॥

मूल (चौपाई)

बिधि हरि हरमाया बड़ि भारी।
सोउ न भरत मति सकइ निहारी॥
सोमति मोहि कहत करु भोरी।
चंदिनि कर कि चंडकर चोरी॥

अनुवाद (हिन्दी)

ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांची माया मोठी प्रबळ आहे, परंतु तेसुद्धा भरताच्या बुद्धीकडे पाहू शकत नाहीत. त्या बुद्धीला भ्रमात पाडण्यास तुम्ही मला सांगता? अरे, चांदणे हे कधी प्रचंड किरणांच्या सूर्याला चोरू शकेल काय?॥ ३॥

मूल (चौपाई)

भरत हृदयँ सिय राम निवासू।
तहँ कि तिमिर जहँ तरनि प्रकासू॥
अस कहि सारद गइ बिधि लोका।
बिबुध बिकल निसि मानहुँ कोका॥

अनुवाद (हिन्दी)

भरताच्या हृदयात श्रीसीतारामांचा निवास आहे. जेथे सूर्याला प्रकाश असतो, तेथे कुठे अंधार राहू शकतो काय?’ असे म्हणून सरस्वती ब्रह्मलोकी निघून गेली. रात्री चक्रवाक पक्षी जसा व्याकूळ होतो, त्याप्रमाणे देव व्याकूळ होऊन गेले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सुर स्वारथी मलीन मन कीन्ह कुमंत्र कुठाटु।
रचि प्रपंच माया प्रबल भय भ्रम अरति उचाटु॥ २९५॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु मलिन मनाच्या स्वार्थी देवांनी दुष्ट सल्लामसलत करून षडयंत्र रचले. प्रबळ मायाजाल पसरून भय, भ्रम, अप्रीती आणि उद्वेग पसरून टाकले.॥ २९५॥

मूल (चौपाई)

करि कुचालि सोचत सुरराजू।
भरत हाथ सबु काजु अकाजू॥
गए जनकु रघुनाथ समीपा।
सनमाने सब रबिकुल दीपा॥

अनुवाद (हिन्दी)

दुष्ट चाल खेळून इंद्र विचार करू लागला की, ‘काम होणे न होणे हे सर्व भरताच्या हाती आहे.’ इकडे जनक, वसिष्ठ मुनी इत्यादींच्याबरोबर श्रीरामचंद्रांकडे गेले. सूर्यकुलाचे दीपक श्रीराम-चंद्रांनी सर्वांचा सन्मान केला.॥ १॥

मूल (चौपाई)

समय समाज धरम अबिरोधा।
बोले तब रघुबंस पुरोधा॥
जनक भरत संबादु सुनाई।
भरत कहाउति कही सुहाई॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा रघुकुलाचे पुरोहित वसिष्ठ वेळ, समाज व धर्म यांना अनुकूल असे बोलले. त्यांनी प्रथम जनक व भरत यांच्यात झालेला संवाद सांगितला. नंतर भरताने सांगितलेल्या चांगल्या गोष्टी ऐकविल्या.॥ २॥

मूल (चौपाई)

तात राम जस आयसु देहू।
सो सबु करै मोर मत एहू॥
सुनि रघुनाथ जोरि जुग पानी।
बोले सत्य सरल मृदु बानी॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर ते म्हणाले, ‘हे रामा, माझ्या मते तुमची जशी आज्ञा असेल, तसेच सर्वांनी करावे.’ हे ऐकून दोन्ही हात जोडून श्रीरघुनाथ सत्य, सरळ व कोमल शब्दांत म्हणाले,॥ ३॥

मूल (चौपाई)

बिद्यमान आपुनि मिथिलेसू।
मोर कहब सब भाँति भदेसू॥
राउर राय रजायसु होई।
राउरि सपथ सही सिर सोई॥

अनुवाद (हिन्दी)

‘तुम्ही व मिथिलेश्वर जनक असताना मी काही बोलणे, हे अनुचित आहे. तुमची व जनक महाराजांची जी आज्ञा असेल, मी शपथेवार सांगतो की, ती सर्वांना निश्चितपणे शिरोधार्य होईल.’॥ ४॥