५१ जनक-सुनयना-संवाद

दोहा

मूल (दोहा)

बार बार मिलि भेंटि सिय बिदा कीन्हि सनमानि।
कही समय सिर भरत गति रानि सुबानि सयानि॥ २८७॥

अनुवाद (हिन्दी)

राजा-राणीने वारंवार तिला भेटून व हृदयाशी धरून सन्मानाने तिला निरोप दिला. चतुर राणीने सवडीने राजांना सुंदर वाणीने भरताच्या दशेचे वर्णन करून सांगितले.॥ २८७॥

मूल (चौपाई)

सुनि भूपाल भरत ब्यवहारू।
सोन सुगंध सुधा ससि सारू॥
मूदे सजल नयन पुलके तन।
सुजसु सराहन लगे मुदित मन॥

अनुवाद (हिन्दी)

सोन्याला सुगंध असावा, तसेच तशी चंद्रम्याचे सार असलेल्या अमृतासमान भरताची वागणूक ऐकून राजा जनकांनी प्रेम-विव्हळ होऊन प्रेमाश्रूंनी भरलेले नेत्र मिटून घेतले. जणू ते भरताच्या प्रेमामध्ये ध्यानस्थ झाले. त्यांचे शरीर पुलकित झाले आणि आनंदित होऊन ते भरताच्या सुंदर कीर्तीची प्रशंसा करू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

सावधान सुनु सुमुखि सुलोचनि।
भरत कथा भव बंध बिमोचनि॥
धरम राजनय ब्रह्मबिचारू।
इहाँ जथामति मोर प्रचारू॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणाले, ‘हे सुमुखी, हे सुनयने, लक्षात ठेव. भरताची कथासंसार-बंधनातून मुक्त करणारी आहे. धर्म, राजनीती आणि ब्रह्मविचार या तिन्ही विषयांमध्ये माझ्या बुद्धीप्रमाणे मला कमी-जास्त गती आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

सो मति मोरि भरत महिमाही।
कहै काह छलि छुअति न छाँही॥
बिधि गनपति अहि पति सिव सारद।
कबि कोबिद बुध बुद्धि बिसारद॥

अनुवाद (हिन्दी)

ती माझी बुद्धी भरताच्या महिम्याचे वर्णन काय करणार? चुकूनही माझी बुद्धी त्याच्या सावलीलासुद्धा स्पर्श करू शकत नाही. ब्रह्मदेव, गणेश, शेष, महादेव, सरस्वती, कवी, ज्ञानी, पंडित आणि बुद्धिमान॥ ३॥

मूल (चौपाई)

भरत चरित कीरति करतूती।
धरम सील गुन बिमल बिभूती॥
समुझत सुनत सुखद सब काहू।
सुचि सुरसरि रुचि निदर सुधाहू॥

अनुवाद (हिन्दी)

या सर्वांना भरताचे चरित्र, कीर्ती, कृती, धर्म, शील, गुण, निर्मल ऐश्वर्य हे गुण समजून घेण्याने आणि ऐकण्याने सुख देणारे आहेत आणि पावित्र्यामध्ये गंगेला आणि माधुर्यामध्ये अमृतालाही मागे टाकणारे आहेत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

निरवधि गुन निरुपम पुरुषु भरतु भरत सम जानि।
कहिअ सुमेरु कि सेर सम कबिकुल मति सकुचानि॥ २८८॥

अनुवाद (हिन्दी)

भरत अनंत गुणसंपन्न आणि उपमारहित पुरुष आहे. भरतासारखा भरतच आहे, असे समज. सुमेरू पर्वताला तराजूत तोलता येईल काय? म्हणून त्याला कुणा पुरुषाची उपमा देताना कवींची बुद्धीही संकोच पावते.॥ २८८॥

मूल (चौपाई)

अगम सबहि बरनत बरबरनी।
जिमि जलहीन मीन गमु धरनी॥
भरत अमित महिमा सुनु रानी।
जानहिं रामु न सकहिं बखानी॥

अनुवाद (हिन्दी)

हे सुंदरी, भरताचा महिमा वर्णन करणे हे जलरहित पृथ्वीवर माशाने चालण्यासारखे सर्वांना अगम्य आहे. हे राणी, भरताचा अपार महिमा फक्त श्रीरामचंद्रच जाणतात, परंतु ते सुद्धा त्याचे वर्णन करू शकत नाहीत.’॥ १॥

मूल (चौपाई)

बरनि सप्रेम भरत अनुभाऊ।
तिय जिय की रुचि लखि कह राऊ॥
बहुरहिं लखनु भरतु बन जाहीं।
सब कर भल सब के मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे भरताच्या प्रभावाचे वर्णन प्रेमाने करून, मग पत्नीच्या मनातील इच्छा पाहून राजे म्हणाले, ‘लक्ष्मणाने परत जावे व भरताने वनात जावे, यामध्ये सर्वांचे भले आहे आणि हेच सर्वांच्या मनात आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

देबि परंतु भरत रघुबर की।
प्रीति प्रतीति जाइ नहिं तरकी॥
भरतु अवधि सनेह ममता की।
जद्यपि रामु सीम समता की॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु हे देवी, भरत व श्रीराम यांचे प्रेम, परस्पर विश्वास, हे बुद्धी व विचारांच्या पलीकडेच आहेत. जरी श्रीराम हे समतेची परिसीमा आहेत, तरी भरत हा प्रेम व ममता यांची परिसीमा आहे. ॥ ३॥

मूल (चौपाई)

परमारथ स्वारथ सुख सारे।
भरत न सपनेहुँ मनहुँ निहारे॥
साधन सिद्धि राम पग नेहू।
मोहि लखि परत भरत मत एहू॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांविषयी एक अनन्य प्रेम सोडल्यास भरताने सर्व परमार्थ, स्वार्थ आणि सुख यांचेकडे स्वप्नातही चुकूनही पाहिले नाही. श्रीरामांच्या चरणीचे प्रेम हेच त्याचे साधन आहे आणि हीच त्याची सिद्धी आहे. मला भरताचा फक्त हाच एक सिद्धांत वाटतो.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भोरेहुँ भरत न पेलिहहिं मनसहुँ राम रजाइ।
करिअ न सोचु सनेह बस कहेउ भूप बिलखाइ॥ २८९॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी प्रेमाने सद्गदित होऊन म्हटले की, ‘भरत हा चुकूनही श्रीरामचंद्राची आज्ञा टाळण्याचे मनातही आणणार नाही. म्हणून प्रेमवश होऊन चिंता करू नये.॥ २८९॥

मूल (चौपाई)

राम भरत गुन गनत सप्रीती।
निसि दंपतिहि पलक सम बीती॥
राज समाज प्रात जुग जागे।
न्हाइ न्हाइ सुर पूजन लागे॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीराम आणि भरत यांच्या गुणांची प्रेमाने चर्चा करता करता पति-पत्नींची रात्र क्षणाप्रमाणे सरून गेली. प्रातःकाली दोन्ही राजसमाज जागे झाले आणि स्नान करून देव-पूजा करू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

गे नहाइ गुर पहिं रघुराई।
बंदि चरन बोले रुख पाई॥
नाथ भरतु पुरजन महतारी।
सोक बिकल बनबास दुखारी॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ स्नान करून गुरू वसिष्ठांच्याजवळ गेले. आणि त्यांच्या चरणांना वंदन करून व त्यांचा कल पाहून म्हणाले, ‘हे गुरुवर्य! भरत, अयोध्यावासी व माता हे सर्वजण शोकाने व्याकूळ आणि वनवासामुळे दुःखी आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

सहित समाज राउ मिथिलेसू।
बहुत दिवस भए सहत कलेसू॥
उचित होइ सोइ कीजिअ नाथा।
हित सबही कर रौरें हाथा॥

अनुवाद (हिन्दी)

मिथिलापती राजा जनक हे सुद्धा आपल्या परिवारासह बरेच दिवस कष्ट सहन करीत आहेत. म्हणून हे नाथ, योग्य असेल, त्याप्रमाणे करा. तुमच्या हाती सर्वांचे हित आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

अस कहि अति सकुचे रघुराऊ।
मुनि पुलके लखि सीलु सुभाऊ॥
तुम्ह बिनु राम सकल सुख साजा।
नरक सरिस दुहु राज समाजा॥

अनुवाद (हिन्दी)

असे म्हणून श्रीराम अत्यंत संकोचले. त्यांचे शील व स्वभाव पाहून मुनी वसिष्ठ प्रेम व आनंदाने पुलकित झाले. ते म्हणाले, ‘हे रामा! तुमच्याविनाघर-दार इत्यादी सर्व सुखे दोन्हीकडच्या समाजाला नरकासारखी आहेत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

प्रान प्रान के जीव के जिव सुख के सुख राम।
तुम्ह तजि तात सोहात गृह जिन्हहि तिन्हहि बिधि बाम॥ २९०॥

अनुवाद (हिन्दी)

हे रामा, तुम्ही प्राणांचेही प्राण, आत्म्याचेही आत्मा आणि सुखाचे सुख आहात. हे प्रभो! तुम्हांला सोडून ज्यांना घर आवडते, त्यांना विधाता प्रतिकूल असतो.॥ २९०॥

मूल (चौपाई)

सो सुखु करमु धरमु जरि जाऊ।
जहँ न राम पद पंकज भाऊ॥
जोगु कुजोगु ग्यानु अग्यानू।
जहँ नहिं राम पेम परधानू॥

अनुवाद (हिन्दी)

जेथे श्रीरामांच्या चरण-कमलांविषयी प्रेम नाही, ते सुख, कर्म आणि धर्म जळून जावोत. ज्यामध्ये श्रीरामांच्या प्रेमाला प्राधान्य नाही, तो योग कुयोग होय आणि ते ज्ञान अज्ञान होय.॥ १॥

मूल (चौपाई)

तुम्ह बिनु दुखी सुखी तुम्ह तेहीं।
तुम्ह जानहु जिय जो जेहि केहीं॥
राउर आयसु सिर सबही कें।
बिदित कृपालहि गति सब नीकें॥

अनुवाद (हिन्दी)

तुमच्याविना सर्व दुःखी आहेत आणि जे सुखी आहेत ते तुमच्यामुळेच सुखी आहेत. कुणाच्या मनात काय आहे ते सर्व तुम्ही जाणता. तुमची आज्ञा सर्वांना शिरोधार्य आहे. हे कृपाळू! तुम्हांला सर्वांची स्थिती चांगली ठाऊक आहे.॥ २॥